परत एकदा श्रद्धा

श्री.नानावटी यांचा दिवाळी अंकातील लेख वाचून वाटू लागले की आपण श्रद्धावान असू किंवा अश्रद्ध असू, आपल्याला न कळलेल्या बर्‍याच गोष्टी यात आल्या आहेत. स्वत:चा गोंधळ कमी करावयास लेख दोनदा वाचला व मग आकलन न झालेले मुद्दे लिहून काढले. हे दहाबारा मुद्दे तरीही नीट न कळल्याने (श्रद्धापूर्वक) गुरुजनांकडून केवळ ज्ञान मिळावे या हेतूनेच नवीन चर्चा प्रस्ताव म्हणून मांडत आहे. मागील लेखात श्री. यनावाला यांच्यावर टीका करावयाचा उद्देश नव्हता तसाच येथेही श्री. नानावटी यांच्यावरही नाही.
अथ तो ज्ञानजिज्ञासा.
(१) विचार करण्याच्या पद्धतीत काही उणीवा राहिलेल्या जाणवतात. या उणिवांचे मूळ आपण जोपासत असलेल्या श्रद्धांपर्यंत पोचते.
विचार करण्याची प्रत्येकाची क्षमता कमी जास्त असणारच. जेवढी जास्त, तेवढी निर्णय प्रक्रीया लांबत जाणार. उणीव न राहिलेला विचार करणे ही अशक्य गोष्ट आहे. एक सोपे उदाहरण घेतो. एक भाजी खरेदी करावयास बाजारात जा व खरेदीच्या विचारात उणीव न ठेवता खरेदी करावयाची आहे असे ठरवा. दहा-वीस भाज्यांमधील कोणती घ्यावी, ती किती ताजी-शिळी आहे, कोणत्या भाजीवर कमी-जास्त रोगराईची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या शरीरस्वास्थ्यावर काय परिणाम होईल, कोणत्या भाजीत कोणकोणती व्हिटॅमिन्स व मिनरल्स आहेत, आपणास आज कुणाकुणाची गरज आहे, पालेभाजी घ्यावी की फळभाजी, की कडधान्यच बरे, ५०० ग्रॅम घेतली तर केती उरेल. २५० ग्रॅम घेतली तर किती कमी पडेल, अंबाडीची घेतली तर बायको तेल जास्त घालील का, त्याचा कोलॅस्टरवर किती परिणाम होईल, इत्यादी इत्यादी( तात्या-पंथीय असाल तर या भाजीवालीकडची घ्यावे की पलीकडच्या, ती जरा जास्त तरूण व रुपवान दिसते आहे, ही उणीव राहून उपयोगी नाही!) शेवटी रिकामी पिशवी घेऊनच घरी यावे लागेल. जर
कमीत कमी (सर्वांचा विचार झालाच असे नव्हे) उणिवा राहिल्या एवढ्या समाधानावर एखादी खरेदी केलीतच तर घरी आल्यावर बायको सुनावणारच की " इतका उशीर करून हीच आणलीत का? बंड्या याला तोंड लावत नाही. एवढेही कळत नाही?" रोज घ्याव्या लागणार्‍या निर्णयांकरिता विचार करताना उणिवा राहणारच व त्यांचा संबंध कुठल्याही श्रद्धेशी जोडण्यात फार तर्कशुद्धता वा व्यवहारिकपणा मला दिसत नाही.

(२) तो दृष्टीकोन पुरावा नसतानासुद्धा खरा आहे असा वाटत असतो. त्यालाच सामान्यपणे आपण श्रद्धा म्हणतो.
पुरावा नसतांना दृष्टीकोन खरा वाटणे म्हणजे श्रद्धा. ठीक आहे. आता माझे म्हणणे हे की पुरावा मानणे हेच श्रद्धेचे लक्षण आहे... जोपर्यंत तो तुम्ही स्वत: सिद्ध करून बघत नाही. " पृथ्वी सुर्याभोवती फिरते" हे मी मानतो कारण ते गुरुजींनी सांगितले, पुस्तकात आहे व काही शतके ह्या जगातील बरीच माणसे त्यावर विश्वास ठेवतात म्हणून. पण
मी किंवा वाचणार्‍यापैकी एकानेही ते स्वत: सिद्ध करून पाहिलेले नाही. जो पुरावा तुम्ही स्वत: सिद्ध करून पाहिला नाही त्यावर विश्वास का ठेवावा ?तो खोटा असण्याची शक्यता आहेच. "देव आहे" असे अनेक आचार्य म्हणतात, शेकडो ग्रंथात तसे लिहले आहे व गेली अनेक सहस्रके जगातील बहुतांश माणसे त्यावर विश्वास ठेवत आली आहेत. मग यालाच श्रद्धा का म्हणावयाचे ? आपण आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी कुणावरतरी, कशावरतरी विश्वास ठेवूनच करतो; जगरहाटी त्यावरच चालली आहे. माझ्या आईने माझ्या लहानपणी प्रेमाने वाढविले हे मी सिद्ध करू शकत नाही म्हणून ती झाली श्रद्धा व त्यावर विसंबावयाचे नाही म्हणून तीच्या वृद्धावस्तेत मी तीची प्रेमाने सेवा
करावयाचे कारणच नाही ही झाली वैज्ञानिक विचारसरणी. ही जगाला कोठे घेऊन जाणार ?

(३) निर्णय घेतांना आपल्या हातून कळत-नकळत चुकाही होत असतात.
नकळत चुका घडतात, मान्य. पण कळत चुका ? " हां, आता मी चुक करतोच" असे किती वेळा घडते हो ? आणि यांचा श्रद्धेशी काय संबंध ?

(४) श्रद्धेच्यापायी सारासार विचार करण्याची कुवतच हरवून बसतो.
वर (१) मध्ये लिहल्याप्रमाणे सारासार विचार करून निर्णय फार कमी वेळा घ्यावा लागतो. तेवढा वेळच नसतो. असे दुर्मिळ प्रसंग तुमची कुवत घालवून बसतात म्हणणे जरा अतिशयोक्तीचे वाटते. समजा माझी पुढील ५ गोष्टींवर श्रद्धा आहे. देव, नातेवाईक-मित्र-शेजारी यांना फसवणे चुकीची गोष्ट आहे, चोरी करणे चुक, राष्ट्राकरिता त्याग करावयाची तयारी पाहिजे व आपल्याला भेटणार्‍या १०० माणसांपैकी ९९ तरी सज्जन असतात. मला पुढील ३ गोष्टी सारासार विचार करून ठरवावयाच्या आहेत. नवीन गाडी खरेदी करणे, मुलाला कुठल्या कॉलेजात जा याचा सल्ला देणे व लग्नात प्रेझेंट देणे. आता माझ्या ५ श्रद्धांमुळे या ३ निर्णयांत फरक पडेल का ? श्रद्धा म्हणजे तांत्रिक-
मांत्रिक, नवस-सायास, उरुस-जत्रा एवढेच का ?

(५)श्रद्धेमुळे माहितीचे विकृतीकरण होते.
आजच्या जगात इतकी माहिती मिळू शकते की ती सर्व आत्मसात करणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. बहुश्रुत माणसाला ती १/१०० असेल, इतरांना १/१०००. तेव्हा या तुटपुंज्या माहितीवरच व्यक्तीला निर्णय घ्यावयाचे असतात. त्यात श्रद्धेमुळे विकृतीकरण होणे अवघड दिसते. श्रद्धेमुळे माहितीचे विकृतीकरण झाल्याची २-४ उदाहरणे मिळतील काय ?

(६) अनुभवजन्य गोष्टींना ... पुरावे म्हणून मान्यता देत असल्यास आपली तार्किक शक्ती कुंठीत होत जाईल.
आपल्या/ इतरांच्या अनुभवांना पुरावा म्हणून मान्यता सर्व तर्कशास्त्रात स्विकारली जाते. नाहीतर प्रगती कशी काय होणार हो ? विस्तवाला हात लागला की भाजतो, हा अनुभव. याला पुरावा म्हणून मान्यता द्यावयाची नाही ? की हा पुरावा मानतो म्हणून माझी तार्किक शक्ती कुंठीत होईल ?

अशाच आणखी ६-७ विधानांबद्दल विचारावयाचे आहे. ते पुढील भागात.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

श्रद्धा

सश्रद्ध व अश्रद्ध असे द्विमितीत वर्गीकरण केल्यास अंधश्रद्ध हा सश्रद्ध या संवर्गात मोडतो. खरतर अश्रद्ध हा वर्ग केवळ पारंपारिक श्रद्धा नसलेला असा आहे. तो ही माणुसच असल्याने निसर्ग साखळीतुन / जैवरासायनिक प्रक्रियेतुन् तो वेगळा नाही. त्याच्या श्रद्धा कदाचित वेगळ्या असतील. माणसाचे विचार / भावना म्हणजे शेवटी मेंदुतील केमिकल लोच्या अस आम्हाला वाटत.कोणाच्या कशा होतील ते सांगता येत नाही. अनिश्चितता या गोष्टीला सश्रद्ध व अश्रद्ध माणसाच्या मेंदुतील प्रतिसाद कदाचित वेगवेगळे असतील.
स्वतः अश्रद्ध असुन् इतरांच्या श्रद्धेचा आदर करणारी माणसे (अथवा उलट) आहेतच की . हे असेच चालत रहाणार. माणसाच्या पिंडातच श्रद्धेची/अश्रद्धेची बीज असली पाहिजेत
प्रकाश घाटपांडे

 
^ वर