आचार्य_गार्गी संवाद

आचार्य: इथे गार्गी मुलीने शंका व्यक्त केली आहे. तिचे निरसन करण्यासाठी आलो आहे. बोला काय शंका आहे?
गार्गी : आचार्य वन्दे.माझा प्रश्न असा आहे : पूर्ववाहिनी तसेच पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी खाली खाली म्हणजे उच्च स्थानाकडून निम्न स्थानाकडे वहात जाते. याचे कारण काय?
आचार्य: म्हणजे पाणी वर वर का वहात नाही असे तुला म्हणायचे आहे काय?
गार्गी : होय. मुळात ते आपण होऊन हालचाल कशी करू शकते? हाही प्रश्न आहेच. कारण पंचमहाभूते अचेतन आहेत असे म्हटले आहे.
आचार्य: वायू सुद्धा एक भूत आहे. तो वाहतोच ना?
गार्गी : होय. तीही एक शंका आहेच. पण तो केवळ जाणवतो.प्रत्यक्ष दिसत नाही. जल नेहमी खाली खालीच जाताना प्रत्यक्ष दिसते. त्यामुळे शंका तीव्र होते.मी जेव्हा प्रवाहाकडे पाहाते तेव्हा कोणीतरी या नदीला खाली ओढून नेत आहे असे वाटते.आचार्य, नदीला कोण खेचून नेते?
( कालविपर्यास.
आचार्य (स्वगत): ही मुलगी त्या संस्थळावर जाऊन वाचते की काय? तिला थेट विचारतोच. पण नको. काहीतरी प्रतिपृच्छा करून मला अडचणीत आणील.तेव्हा सूक्ष्म देहाने परकायाप्रवेश करून आडवळणाने विचारलेले बरे.
[सूक्षमदेहाने कायाप्रवेश करतात.] मुली,नद्यांचे पाणी खाली खालीच का वाहाते हा तुझा प्रश्न आहे. या नद्यांत पूर्ववाहिनी किती? पश्चिमवाहिनी किती? तसेच इतर नद्या किती याचा सर्व विदा तुझ्यापाशी आहे काय?
गार्गी : विदा? आचार्य , हा शब्द प्रथमच ऐकते आहे.व्युत्पत्तीही ध्यानी येत नाही. आपण अर्थ विशद करावा.
आचार्य: (स्वगत) हुश्श! हम्म!! बरे झाले ही त्या स्थळावर जात नाही ते! अन्यथा तिथे वाचलेले नाही नाही ते प्रश्न विचारून माझे डोके खाल्ले असते.असो. आता माझे ब्रह्मास्त्र काढतो.)
(पुन्हा स्वकायेत प्रवेश करतात)
गार्गी :आचार्य, इतकावेळ आपण मौन धारण केले आहे त्याचे कारण काय?
आचार्य:तुझ्या प्रश्नावर विचार करीत होतो.
गार्गी : (स्वगत) माझ्या शंका असतातच तशा विचार करायला लावणार्‍या!
आचार्य: गार्गी, या विश्वाची निर्मिती कशी झाली हे तुला ठाऊक आहे ना?
गार्गी :होय. आधी या अनंत अवकाशात केवळ ब्रह्मतत्त्व ओतप्रोत भरलेले होते.अन्य काहीही अस्तित्वात नव्हते. त्या आदिब्रह्माच्या " एकोsहम् बहु स्याम् प्रजायेय।" या आदि संकल्पामुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असे उपनिषदे सांगतात.
आचार्य: साधु!साधु! उत्तम. ब्रह्मातून विश्वरचना झाली, म्हणजे ते ब्रह्म विश्वात रूपांतरित झाले काय? परब्रह्म संपले काय?
गार्गी : नाही. ब्रह्म अविकारी आहे. विश्वरचना हो्ऊनही ब्रह्म आहे तसेच अबाधित आहे. असे उपनिषद्कार म्हणतात.
आचार्य: ते योग्यच आहे. यातून काय अनुमान निघते?
गार्गी : प्रश्नाचे आकलन झाले नाही आचार्यश्री. आपणच सांगावे.
आचार्य: हे पाहा.आधी ब्रह्म होते. आता ते ब्रह्म तसेच आहे.शिवाय हे एव्हढे मोठे विश्व दिसते आहे.मग त्यासाठी लागलेले उपादान निमित्त(साधनसामग्री) कुठून आले? .
गार्गी : ऊर्णनाभी(कोळी) जाळे विणतो. या जालनिर्मितीचे उपादानकारण (धागा) स्वत:तूनच निर्माण करतो.तद्वत् ब्रह्माने विश्वरचनेची साधनसामग्री स्वत:तूनच निर्माण केली असे म्हटले जाते.
आचार्य: या दृष्टान्तात दोष आहे.कोळी भक्ष्य़ खातो. त्याच्या पोटात त्या भक्ष्य़ाचे रूपांतर धाग्यासाठी लागणार्‍या पदार्थात होते.म्हणजे इथे निमित्तकारण (ऊर्णनाभी) असून त्याहून भिन्न असे उपादानकारण (भक्ष्य) आहे.विश्वरचनेसाठी ब्रह्म हे निमित्तकारण आहे.पण त्याहून भिन्न असे उपादानकारण (साधनसामग्री) उपलब्धच नाही.
गार्गी: मग हे जगत् घडवले कसे?
आचार्य:(आनंदून) तेच तर सांगतो आहे.हे विश्व रचले गेलेच नाही."एकोsहं बहु स्याम्।" या आदिसंकल्पाचे स्फुरण झाले आणि त्या परब्रह्माने आपल्या मायेने हा विश्वपसार्‍याचा भास निर्माण केला.भासासाठी संकल्प पुरेसा आहे. वस्तुरूप साधनसामग्री नको.
गार्गी : म्हणजे हे अखिल जगत् मिथ्याच आहे काय?
आचार्य(उत्साहाने) : नि:संदेह मिथ्याच.सोप्या भाषेत सांगायचे तर तुझे प्रश्न" अगा जे घडलेचि नाही।त्याची वार्ता पुससी कायी?" या प्रकारातले आहेत. तुझ्या त्या नद्या, ते खाली खाली वाहाणारे पाणी सगळे खोटे! मिथ्या गोष्टींना कारण कसले?
गार्गी स्तब्ध राहाते.
आचार्य:(स्वगत) झाली वाटते गप्प.संपले हिचे प्रश्न!.आमचे ब्रह्मास्त्र आहेच तसे प्रभावी!
गार्गी: आचार्य, आपण सर्व या विश्वाचेच घटक आहो ना? विश्व मिथ्या असेल तर आपणही मिथ्या ठरता. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असेल.पण शरीर,मेंदू,आपण बोलता ती वाचा यांचे काय? अशा मिथ्या माध्यमातून "जगन्मिथ्या" हा सिद्धान्त मांडणे हा आत्मविरोध (सेल्फ़ कॉंट्रॅडिक्शन) नाही काय?
पर्यायाने खाली खाली वाहाणारे पाणी वास्तव ठरत नाही काय? त्याला खाली कोण खेचते याचा शोध घेणे आपले कर्तव्य नाही काय?
आचार्य:(हातातील दंड उंचावून): गप्प बैस! सारखे प्रश्न, प्रश्न, प्रश्न!कितीही समजावले तरी येरे माझ्या मागल्या.
ते याज्ञवल्क्य काय म्हणाले होते त्याचे तुला विस्मरण झाले काय?
गार्गी:(बौद्धिक पातळीवरून शारीर पातळीवर येत): क्षमा असावी आचार्य, मर्यादेचे अतिक्रमण झाले.(त्यांच्या दृष्टीला भिडवलेली दृष्टी खाली त्यांच्या पायाजवळ झुकते. ते बसलेले असतात त्या चर्मावरील व्याघ्रमुख उग्रभयंकर दिसते. घाबरून मट्कन खाली बसते.)
आचार्य:( क्षणिक झालेल्या क्रोधाविष्काराने किंचित् लज्जित.उजव्या हाताची वरद मुद्रा. स्वगत): हे बुद्धिमती, तुला भीती वाटण्याचे काही कारण नाही. तुझ्या प्रश्नांनी मीच घाबरून गेलो आहे!)
.........................................पडदा पडतो...............................................

Comments

स्पष्टीकरण १

श्री. यनावाला

आपल्या "नामसंकीर्तन..." या प्रस्तावाला विरोध केला याचा अर्थ मी "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" हे खरे मानणारा आहे असे नाही. माझा विरोध ज्या तर्कदुष्ट पद्धतीने आपण तो प्रस्ताव मांडला होतात त्याला होता. एकच उदाहरण देतो.

म्हणजे ज्या इहलोकात आपण राहातो.,जो प्रत्यक्ष दिसतो, अनुभवता येतो, तो खोटा आणि जो "पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला" असा परलोक खरा !
तिथे अखंड ब्रह्मानंद,परमसुख आहे असे मानायचे.त्याच्या प्राप्तीसाठी सारा आटापिटा करायचा. केव्हढे हे वैपरीत्य! केव्हढा हा भ्रम!!
माणसाने भ्रामक गोष्टींच्या मागे लागावे लागावे म्हणजे किती ? काही सुमार?

हा आपला युक्तिवाद किती तकलादू आहे हे दाखवण्यासाठी मी ऍरिस्टार्कसच्या सूर्यकेंद्रित विश्वाच्या सिद्धांताचे उदाहरण देऊन लिहिले होते.

ऍरिस्टार्कसने सूर्यकेंद्रित विश्वाचे मॉडेल इ. स. पू. २५० च्या सुमारास मांडले. ते अगदी आर्किमिडीजसारख्या (जो ऍरिस्टार्कसपेक्षा २५ वर्षांनी लहान होता आणि ज्याची आजही विश्वातल्या तीन श्रेष्ठ गणितज्ज्ञांमध्ये गणना होते, न्यूटन आणि गॉस हे इतर दोघे) लोकांपासून अगदी सामान्य माणसापर्यंत पुढची १८०० वर्षे कोणालाही पटले नाही. त्या सर्वांचा युक्तिवाद आपण केला तसाच होता. " जिथे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे रोज पृथ्वीभोवती फिरताना दिसतात ते खोटे आणि सूर्य - तारे स्थिर आणि पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, पृथ्वी स्वतःभोवती फिरते वगैरे गोष्टी खर्‍या मानायच्या.त्यासाठी मोठ्या मोठ्या आकड्यांचे खेळ करायचे. केवढे हे वैपरित्य! केवढा हा भ्रम! काही सुमार? छे! या सूर्यकेंद्रित विश्वाच्या मॉडेलमागे लागून (ऍरिस्टार्कसने) आपल्या आयुष्याची अपरिमित हानी करून घेतली बुवा!!"

किंवा पर्स्पेक्टिव यांनी जे विचारले होते " कोणी न बघितलेला परलोक खोटा आहे असे मानण्यास जागा आहे पण ज्या इहलोकात आपण राहतो तो तरी खरा कशावरून?" याला आपण उत्तर दिले नाहीत. "आपण अनुभवतो, रोज बघतो" हे उत्तर असेल तर स्वप्न, मृगजळ, होलोग्राम यांचे काय असे प्रश्न त्यांनी विचारले होते.

आपल्या प्रस्तावातला दुसरा वादग्रस्त भाग असा की "सर्वसाधारणपणे अध्यात्माच्या आणि खासकरून भक्तिमार्गाच्या प्रसाराने सामान्य लोक निष्क्रीय झाले". यासाठी केवळ पुलंची तीन विधाने हा पुरावा पुरेसा नाही. सावरकर आणि राजवाडे यांनी हे प्रतिपादन केले त्याचे गं. बा. सरदार आणि इतर अभ्यासकांनी खंडन केले आहे. मोक्ष किंवा भक्तिमार्गाच्या प्रसाराच्या आधी भारतीय समाज सक्रीय होता आणि नंतर तो निष्क्रीय झाला याचे आपण पुरावे दिलेले नाहीत. बौद्धधर्माच्या प्रसारामुळे लोकांमध्ये संसाराबद्दल निराशा जास्त आली आणि संन्यासमार्गाचे प्रेम उत्पन्न झाले असेही काही अभ्यासक म्हणतात. शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" उक्तीमागेही बौद्धांचा प्रभाव असावा. त्यांचे परात्पर गुरू गौडपादाचार्य यांना प्रच्छन्न बौद्ध असेच म्हणतात. मुसलमानी आक्रमण हे दुसरे एक कारण असू शकते.

आणखीही अनेकांनी अनेक आक्षेप, शंका, प्रतिवाद केले होते त्यांची उत्तरे आपण दिली नाहीत.

माझे "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या"यावर काय मत आहे ते मी दुसर्‍या प्रतिसादात देईन.

गार्गीचा प्रश्न

गार्गीचा प्रश्न :
उपनिषदे न वाचणार्‍यांकरिता थोडीशी मजेदार माहिती. जनक हा राजा तसा चालू दिसतो.एका यज्ञाच्या वेळी कुरु व पंचाल या देशातील ब्राह्मण जमले असतांना प्रश्नांची उत्तरे देण्याला अत्यंत समर्थ कोण असावा हे जाणण्याकरिता त्याने जाहीर केले की " या एक हजार गायींच्या शिंगांना सुवर्णाची नाणी बांधली आहेत. तुमच्यापैकी जो ब्राह्मणश्रेष्ट असेल त्याने या गाई घेऊन जाव्या." आली का पंचाईत? इतक्या सर्वांत मीच श्रेष्ट असे कसे सांगावयाचे ? सगळे गप्प पाहून याज्ञवल्क्य आपल्या शिष्याला म्हणाला " जा गाई घेऊन."
मग सर्व खवळले व त्याला प्रश्न विचारू लागले.त्यातील गार्गी एक. तीने अनेक प्रश्न विचारले, त्यांचे स्वरूप असे ,,"जग उदकाने ओत-प्रोत भरले आहे, उदक कशाने?" उत्तर "वायुने"."वायु कशाने?" असे होता होता प्रश्न आला "आकाश कशाने ? या प्रश्नाचे उत्तर श्री. य.ना.वालांचे आचार्य देत आहेत.( याज्ञवल्क्याचे उत्तर : "अ-क्षर ब्रह्माच्या नियंत्रणाने")
समित्पाणी शरद

एक विनंती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कुठल्याही लेखाच्यासंदर्भात प्रतिसादांचे स्वागतच असते. प्रतिसाद त्या त्या लेखाशी संबंधित असतील तर अधिक चांगले.

गार्गीच्या गालावरील खळ्या हेच ब्रह्म!

आचार्य (स्वगत): ही मुलगी त्या संस्थळावर जाऊन वाचते की काय? तिला थेट विचारतोच. पण नको. काहीतरी प्रतिपृच्छा करून मला अडचणीत आणील.तेव्हा सूक्ष्म देहाने परकायाप्रवेश करून आडवळणाने विचारलेले बरे.

हा हा हा! नाटकातील संस्थळांचा उल्लेख आवडला! :)

या दृष्टान्तात दोष आहे.कोळी भक्ष्य़ खातो. त्याच्या पोटात त्या भक्ष्य़ाचे रूपांतर धाग्यासाठी लागणार्‍या पदार्थात होते.म्हणजे इथे निमित्तकारण (ऊर्णनाभी) असून त्याहून भिन्न असे उपादानकारण (भक्ष्य) आहे.विश्वरचनेसाठी ब्रह्म हे निमित्तकारण आहे.पण त्याहून भिन्न असे उपादानकारण (साधनसामग्री) उपलब्धच नाही.

देवा, आचार्यांना माफ कर, ते काय बोलत आहेत हे त्यांचं त्यांना तरी कळतंय की नाही तूच जाणे!

हे आचार्य, टेक अ चील पिल! :)

अरे तुझ्यासोबत लेका ती तारुण्याने मुसमुसलेली गार्गी चांगली गप्पा मारत बसली आहे. तिला जरा विचार तिच्या कॉलेजातल्या गंमतीजंमती वगैरे! तिला जरा तिच्या बॉयफ्रेंडवरून छेड. बघ तरी कशी छान लाजते ती! अरे मेल्या ब्रह्मच पाहचाय ना तुला, मग बघ ते तिच्या गालावर पडणार्‍या छानश्या खळ्यांत! :)

असो,

यमावालासाहेब, नाट्यप्रवेश आवडला!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

यमावालासाहेब?

अरे बाप रे!! यमावाला साहेब म्हणजे? उपक्रमावर यम आहे?


क्षमा..

टंकनचूक. अनवधानाने 'ना' चा 'मा' झाला!

क्षमा असावी..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

निमित्तकारण,उपादानकारण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आचार्यांच्या संवादातील निमित्तकारण, उपादानकारण हे शब्द वाचून श्री.विसोबा खेचर आपल्या प्रतिसादात लिहितात :
"देवा, आचार्यांना माफ कर, ते काय बोलत आहेत हे त्यांचं त्यांना तरी कळतंय की नाही तूच जाणे! "

असे वाटणे साहजिक आहे.पण या शब्दांचे अर्थ समजायला सोपे आहेत.
समजा मातीचे एक मडके बनवायचे तर
*कुंभार हवा.तो जिवंत हवा. मडके घडवण्याचे त्याच्या मनात हवे.
अध्यात्माच्या भाषेत इथे कुंभार हे निमित्तकारण.ते सचेतन हवे.(जिवंत). त्याने संकल्प करायला हवा.(मनात आणणे)
**मडक्यासाठी माती, पाणी, चाक, अशी साधनसामग्री हवी.हे उपादानकारण.
आता विश्वनिर्मितीसाठी ब्रह्म हे निमित्तकारण. ते सचेतन आहेच. त्याला विश्वनिर्मितीचा आदिसंकल्प स्फुरला आहे.
विश्वनिर्मितीसाठी उपादानकारण (साधनसामग्री) कोणते? इथेच गाडे अडते. निर्मितीपूर्वी ब्रह्माव्यतिरिक्त अन्य काही उपलब्धच नाही.

संवाद आवडला

संवाद चुरचुरीत आहेत. ब्रह्म म्हणजे नेमके काय? त्याची व्याख्या कशी करतात?

गार्गीला विचारा!

संवाद चुरचुरीत आहेत. ब्रह्म म्हणजे नेमके काय? त्याची व्याख्या कशी करतात?

ते प्लीज गार्गीला विचारा! अहो ज्याचं जळतं त्याला कळतं!

चांगलं प्रेम बसलं होतं आश्रमातल्या एका तरतरीत शिष्यावर. बापाने खो घातलान!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

ब्रह्मजिज्ञासा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.टिंकरबेल यांनी ब्रह्म म्हणजे काय? असा प्रश्न सहज निरागसपणे विचारला आहे. हा प्रश्न ऐकून :
..
*काही जण सांगू किती सांगू किती असे वाटून नुसते बोलत सुटतात, तर काहीजण मौनात जातात.
..
* काहीजण "अहं ब्रह्मास्मि| सोsहम् |अहं सः|" असे गर्जत छाती ठोकतात , तर काहीजण"तत्त्वमेव, त्वमेव तत्|" (ते तूच आहेस.तूच ते आहेस) असे सांगत अंगुलिनिर्देश करतात.
..
* काहीजण आनंदु रे हाचि परमानंदु रे" असे गात नाचू लागतात,तर काही जण अंतर्मुख होऊन समाधीत जातात.
..
* काहीजण "सर्वं खल्विदं ब्रह्म|" असे बरळतात, तर काहीजण "नेति नेति तत्त्व न ये अनुमाना| " अशी आरती गात नन्नाची मान हालवतात.
अशा नाना तर्‍हा!
..
थोडक्यात म्हणजे कोणी काही असंबद्ध बोलत असेल (उदा.प्रस्तुत लेखन) तर तो ब्रह्माविषयी सांगतो आहे असे मानावे.असो.
श्री.टिंकरबेल यांचा प्रश्न म्हणजे ब्रह्मजिज्ञासा.वेदान्त सूत्रांतील पहिली दोन सूत्रे आहेतः
अथातो ब्रह्मजिज्ञासा। जन्मादस्य यत:।"
पदच्छेद: अथातो= अथ अत:,(अथ=प्रारंभ, अत:=आता पासून) जन्मादस्य =जन्म आदि अस्य ( अस्य= या जगाचे, जन्म आदि=जन्म इत्यादि= उत्पत्ती,स्थिती लय)
अर्थ:ब्रह्माविषयीच्या विचाराचा आता प्रारंभ होत आहे. या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टींना जे कारणीभूत असते ते ब्रह्म होय.
बौद्धिक पातळीवर याचा शाब्दिक अर्थ आपल्याला समजू शकतो.पण त्याला ब्रह्म जाणले असे म्हणत नाहीत.ब्रह्माची अनुभूती व्हायला हवी.
आंघोळीच्या टबात समाधी लागून सिद्धान्ताचा साक्षात्कार झाल्यावर अर्किमिडीजच्या मुखावाटे" युरेका! युरेका!!" असे आनंदोद्गार बाहेर पडले.
त्याप्रमाणे समाधी लागून, डोक्यात लख्ख प्रकाश पडून,"सांडिली त्रिपुटी।दीप उजळला घटीं उजळला घटीं।"अशी स्थिती प्राप्त होऊन ,"अरेच्चा! हे असे आहे तर! ते ब्रह्म म्हणजे मीच की!!"असे सहजोद्गार मुखावाटे बाहेर पडले तर ब्रह्म उमगले.
(तुरीयावस्था असली तरी बाथरूमातून बाहेर पडताना वास्तवाचे भान ठेऊन टॉवेल अवश्य गुंडाळावा.)

धन्यवाद

यनावाला,

आपल्या प्रतिसादावरुन मला थोडीशी कल्पना आली. खुप कळलं असं नाही. मला फक्त अन्न हे पूर्ण ब्रह्म इतकच माहिती आहे.

वाघासारखं जिणं!

थोडक्यात म्हणजे कोणी काही असंबद्ध बोलत असेल (उदा.प्रस्तुत लेखन) तर तो ब्रह्माविषयी सांगतो आहे असे मानावे.

हा हा हा! हे मात्र खरे..! :)

त्याप्रमाणे समाधी लागून, डोक्यात लख्ख प्रकाश पडून,"सांडिली त्रिपुटी।दीप उजळला घटीं उजळला घटीं।"अशी स्थिती प्राप्त होऊन ,"अरेच्चा! हे असे आहे तर! ते ब्रह्म म्हणजे मीच की!!"असे सहजोद्गार मुखावाटे बाहेर पडले तर ब्रह्म उमगले.

हम्म! आम्ही अगदी अजाणते असल्यापासून वेळोवेळी ब्रह्माची अनुभूती घेतली आहे..त्यात विशेष काही नाही!

यनावालासाहेब, वास्तविक ब्रह्म ही अत्यंत सहजसोप्पी गोष्ट. परंतु या वेदान्तसूत्रवाल्यांनी तिचा अर्थ पटकन कुणाला कळू नये, स्वत:चं महत्व अबाधित रहावं म्हणून अत्यंत अगम अश्या संस्कृत भाषेमध्ये (जी आम पब्लिकची भाषा नाही आणि जिच्यातलं आम पब्लिकला जाम ओ की ठो कळत नाही म्हणून अगम्य!) मुद्दामूनच मोठ्ठा घोळ करून ठेवला आहे!

आणि अगदी आजही काही मंडळी त्या वेदान्तसूत्रवाल्या दाढीदिक्षितांचे एजंट असल्यासारखे लेखन करून ब्रह्माच्या अर्थाबाबतचा घोळ कायम ठेवत आहेत हे पाहून गंमत वाटते!

वास्तविक ब्रह्म या शब्दाची अगदी साधी उकल आहे.

१) अशी कोणतीही गोष्ट (जी कुणाकडूनही हिसकावून, लुबाडून, घेतलेली नाही) जिच्यामुळे आपल्या मनाला निर्भेळ/निर्विष आनंद होतो,

२) आणि आपल्याकडून झालेली अशी कोणतीही कृती, जी मनात काहीही स्वार्थ न ठेवता केवळ दुसर्‍याला आनंद/समाधान देण्याकरता केलेली असते!

बास! एवढी आणि इतकीच साधी, सोपी व्याख्या आहे ब्रह्म या शब्दाची! उगाच त्या अगम्य वेदान्तसूत्रातील दाखले देऊन उपयोग तर काहीच होणार नाही, उलट घोळ मात्र वाढेल! यनावालासाहेब, आपण केव्हातरी आपल्या आई-वडिलांचे किंवा इतर कुणा वडीलधार्‍याचे पाय चेपले असतीलच ना? त्या व्यक्तिने 'बरं वाटलं रे बाबा!' असं जाहीरपणे अथवा मनातल्या मनात म्हणून ज्या दुवा तुम्हाला दिल्या ना, तेच ब्रह्म! आपण कशाला उगाच फार लांब जाऊन वेद नी उपनिषदं धुंडाळून त्यात ब्रह्माचा अर्थ शोधत डोळ्यांचा लंबर वाढवतो कुणास ठाऊक? बहुधा त्या ब्रह्मालाच ठाऊक! :)

अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या एखाद्या बॅक्टेरियाचं उदाहरण घ्या! त्याला कुठे काय माहित्ये ब्रह्म म्हणजे काय ते! तरीदेखील तो जर दुषित पाण्यावाटे पोटात गेला तर ब्रह्म जाणणार्‍या दाढीदिक्षितांनादेखील रात्रभर रेघोट्या ओढाव्याच लागतात ना?

एखाद्या वाघाचं उदाहरण घ्या! त्याला कुठे काय माहित्ये ब्रह्मब्रिह्म म्हणजे काय ते! तो आपल्या मस्तीत जगतो आणि आपल्या मस्तीत मरतो. परंतु एखादा मनुष्य खपला की काही वेळा तुम्हीआम्ही काय म्हणतो?

"बघा कसा वाघासारखा जगला! साक्षात वाघ होता वाघ!"

आहे की नाही गंमत! :)

व्याघ्र जमातीत मात्र एखादा वाघ मेल्यावर इतर वाघ,

"बघा कसा एखाद्या वेदान्तसूत्रवाल्यासारखा जगला आणि मेला! साक्षत एक दाढीदिक्षित ऋषि होता ऋषि!

असं खचितच म्हणत नसतील! :)

असो..

आपला,
तर्कतीर्थ, तीर्थशास्त्रविशारद,
तात्याशास्त्री अभ्यंकर.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर