आचार्य-गार्गी संवाद (प्रस्तावना)

प्रस्तावना:
"नामसंकीर्तन.." या च.प्र.तील प्रतिसादांत श्री. हैयो हैयैयो तसेच श्री.विकास, श्री.विनायक यांनी काही शंका व्यक्त केल्या.त्यावरील "अपरिमित हानी" या स्पष्टीकरणात गार्गीच्या प्रश्नाचे उत्तर उद्धृत केले. ते "गीता प्रेस ,गोरखपूरच्या, श्रीमन्महर्षी वेदव्यासप्रणीत वेदान्तदर्शन(ब्रह्मसूत्रे) ,व्याख्याकार हरिकृष्णदास गोयन्दका" या पुस्तकात पृष्ठ.१५१ वर आहे. अर्थ हिंदीभाषेत आहे. मराठीकरण माझे.तिथे कंसात(बृह.३/८/९) असे आहे. म्हणजे ते बृहदकारण्य उपनिषदातील आहे.प्रश्न दिलेला नाही. पण उत्तर गार्गीला संबोधले आहे. उत्तरावरून प्रश्न काय असावा ते समजते.
उपनिषदकारांनी उत्तर दिले.त्यांच्या ऐवजी त्याकाळी समजा तिथे आद्य शंकराचार्य असते तर त्यांनी कसे उत्तर दिले असते याची कल्पना करून "आचार्य-गार्गी संवाद"लिहिला आहे.त्याला संदर्भ दोनच. गार्गीचा प्रश्न आणि"ब्रह्म सत्यं जग्न्मिथ्या।" हा आचार्यांनी बहुप्रचलित केलेला सिद्धान्त.उर्वरित सगळे काल्पनिक.
"वाहणार्‍या नदीला खाली खाली खेचून कोण नेते?" हा गार्गीचा प्रश्न " झाडाचे फळ खाली का पडते?" या न्यूटनच्या प्रश्नाहून भिन्न नाही असे मला वाटले, म्हणून संवादाची कल्पना सुचली. लेखनाचा हेतू केवळ मनोरंजन,विरंगुळा एव्हढाच!
.................................................
गार्गीविषयी :वचक्नुऋषींची कन्या. म्हणून हिला "गार्गी वाचक्नवी" असे म्हणतात. ती ब्रह्मनिष्ठ होती.(निश्चित अर्थ न कळे).
याज्ञवल्क्याच्या दोन स्त्रिया कात्यायनी आणि मैत्रेयी.या दोघींची गार्गी मैत्रिणी होती. याज्ञवल्क्य, मैत्रेयी आणि गार्गी यांचे अध्यात्म,ब्रह्म या विषयांवर चर्चा, वादविवाद होत. आचार्य-गार्गी या काल्पनिक संवादात गार्गीला मुलगी म्हटले आहे. पण त्यावेळी तिचे वय तसे कमी नसावे.
******************************************************

Comments

ऍरिस्टार्कस आणि आर्किमेडीस - युक्तिवाद विनायक यांचा नसावा

या लेखात यनावाला यांच्याच मागील लेखाचा संदर्भ आहे, आणि अनेक प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिसादाचा उल्लेख आहे. पुढील लेखात तसा नाही. म्हणून मागल्या लेखाच्या बाबतीत आणि विनायक यांच्या प्रतिसादाच्या बाबतीत उपप्रतिसाद येथे देत आहे.

विनायक असा काही उल्लेख करतात, की आर्किमेडीज याने आरिस्टार्कसच्या सूर्यमध्यवादाचे खंडन करण्यासाठी "मला प्रत्यक्ष दिसत नाही" असा काही युक्तिवाद वापरला. विनायक यांच्या शब्दांत :

ते अगदी आर्किमिडीजसारख्या (जो ऍरिस्टार्कसपेक्षा २५ वर्षांनी लहान होता आणि ज्याची आजही विश्वातल्या तीन श्रेष्ठ गणितज्ज्ञांमध्ये गणना होते, न्यूटन आणि गॉस हे इतर दोघे) लोकांपासून अगदी सामान्य माणसापर्यंत पुढची १८०० वर्षे कोणालाही पटले नाही. त्या सर्वांचा युक्तिवाद आपण केला तसाच होता. " जिथे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे रोज पृथ्वीभोवती फिरताना दिसतात ते खोटे आणि सूर्य - तारे स्थिर आणि पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, पृथ्वी स्वतःभोवती फिरते वगैरे गोष्टी खर्‍या मानायच्या.

यामुळे माझे कुतूहल चाळवले. थोरांनी केलेल्या सिद्धांतांइतकेच त्यांच्या चुकाही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतात. (तशा चुका करू नये, या अर्थी.) आर्किमेडीजने नेमके काय शब्द वापरले असतील? आर्किमेडीजचा युक्तिवाद यनावाला यांच्या युक्तिवादासारखा होता का? आता मला ग्रीकही वाचता येत नाही, आणि कदाचित विनायक यांच्याकडे वेगळे संदर्भग्रंथही असतील. पण इंग्रजी दुव्यांवरून असे दिसते, की आर्किमेडीजने (विनायक म्हणतात) तो युक्तिवाद वापरला नाही. इतकेच काय, ऍरिस्टार्कसचे खंडनही केले नाही. त्याहूनही अधिक : अनेक शक्यतांपैकी एक म्हणून ऍरिस्टार्कसची शक्यता मानून घेतली. त्याप्रमाणे विश्वाचे कमाल आकारमान काय असे गणितही सांगितले.

गंमत म्हणजे ऍरिस्टार्कसचा सूर्यमध्यवादाबद्दल मूळ ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे त्याचे ते मत आपल्याला आर्किमेडीजच्या एका ग्रंथातून कळते - "वाळू मोजणारा - (इंग्रजी विकी)" त्यात तो ऍरिस्टार्कसबद्दल सांगतो :

[गेलोन राजा!] तुला माहीत आहे, की बहुतेक खगोलशास्त्रज्ञांनी "विश्व" नाव दिले आहे, ते एक मंडल आहे. त्या मंडलाच्या मध्यभागी पृथ्वीचा मध्य आहे, आणि त्याची त्रिज्या (रेडियस) पृथ्वीमध्यापासून सूर्यमध्यापरंतच्या अंतराइतकी आहे. तू खगोलशास्त्र्यांकडून सामान्यपणे हे आख्यान ऐकले आहेच. पण ऍरिस्टार्कसने काही प्रस्तावित सिद्धांतांचे (हायपोथेसिसचे) एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात असे दिसते, की काही गृहीतके मानल्यास असा निष्कर्ष निघतो की या आताच सांगितलेल्या "विश्वा"पेक्षा विश्व कित्येक पटींने मोठे आहे. त्याचा प्रस्ताव असा आहे, की स्थिर तारका आणि सूर्य हे दोन्ही अचल आहेत. अचल तारकांच्या मंडलाचा मध्य सूर्याच्या मध्याशीच आहे - या मंडलाचे आकारमान इतके प्रचंड आहे, की पृथ्वीच्या परिवलनाच्या मार्गाशी असे गुणोत्तर आहे : पृथ्वीतलाचे विश्वमध्याशी जितके अंतर आहे तितकेच अंतर त्या तारकामंडलाशी आहे.

वर खंडन नाही. पुढे त्या आकाराचे गणित आहे. अन्यलोकांनी खंडन केले. त्यापैकी क्लेआन्थीस याचे खंडन-मत प्लुटार्क या इतिहासकाराच्या ग्रंथात आहे. पण तेसुद्धा "दिसते-तेच-खरे" असे नसून "ऍरिस्टार्कसचा हा पापविचार (इम्पाएटी) आहे" असे खंडन आहे. (विकीपेडिया)

त्या काळात "दिसत-नाही-ते खरे" मानण्याचा मोठा सन्मान होई. फार आधीच्या काळच्या प्लेटोची उपमा - आपल्याला जे दिसते, त्याचा वास्तवाशी संबंध म्हणजे सावल्यांचा संबंध होय - ही उपमा फारच माननीय होती. "दिसते-तेच-खरे" अशा प्रकारे खंडन करणारे असलेत, तर ते फार थोडे होते. कोणी ऍरिस्टार्कसचे विनायक म्हणतात तसे ("दिसते-तेच-खरे") असे खंडन केले आहे का?

(प्लेटो आणि ऍरिस्टॉटल दोघे ऍरिस्टार्कस-आर्किमेडीजच्या आदल्या काळातले होते, म्हणून त्यांनी ऍरिस्टार्कसबद्दल मत दिले असणे संभव नाही.)

कॅथलिक चर्चमधील शास्त्र्यांनी कोपेर्निकस-गॅलिलेओचे खंडन केले, पण त्यांनीसुद्धा प्लेटो-ऍरिस्टॉटल यांचा शब्द प्रमाण म्हणून दिला. त्यातही चर्च म्हणत होते की प्रत्यक्ष नव्हे तर शब्द प्रमाण आहे, तर गॅलिलेओ म्हणत होता, की "प्रत्यक्ष माझ्या दुर्बिणीतून बघा."

ऐतिहासिक घटना बघता ऍरिस्टार्कसचे उदाहरण विनायक यांच्या मुद्द्यासाठी उपयोगी पडत नाही असे वाटते. (आर्किमेडीजच्या काळातले नाही, कारण आर्किमेडीज खंडनच करत नाही. अन्य काही लोक "पापविचार" असे खंडन करतात. आणि कोपेर्निकस-गॅलिलेओच्या काळाचे उपयोगी नाही, कारण सूर्यमध्यवाला गॅलिलेओच "प्रत्यक्ष दिसते, ते बघा" म्हणणारा होता. मधल्या काळात सूर्यमध्यसिद्धांताची फारशी चर्चाच आढळत नाही, मग खंडन कुठचे आढळणार?) अर्थात, माझ्यापाशी ग्रीक-लॅटिन ग्रंथ नाहीत. त्या संदर्भांत असे खंडन दिसत असेल, तर विनायक यांचे म्हणणे पुन्हा विचारार्ह होऊ शकेल.

- - -

पण आजच्या संदर्भात ऍरिस्टार्कसचे उदाहरण कदाचित वेगळ्याच प्रकारे उपयोगी पडते.

ऍरिस्टार्कस म्हणाला की सूर्य विश्वाच्या मध्ये आहे, आणि तारका त्याच्या भोवती आहेत, त्यांचे मंडल इतके दूर आहे की त्या एकमेकांच्या आगेमागे गेलेल्या (पॅरॅलॅक्स) दिसत नाहीत. आज प्रत्यक्ष आपल्याला तारका आगेमागे गेलेल्या दिसतात. (हा ऍरिस्टार्कसचा दोष नव्हे, आज दुर्बिणी आहेत.) प्रत्यक्ष तारा आगेमागे गेलेल्या दिसतात तरी आज प्रत्यक्ष दिसणारे बाजूला ठेवून ऍरिस्टार्कसच्या त्या-काळी-स्तुत्य मताप्रमाणे सूर्यच विश्वाचा मध्य आहे असे आपण मानले, तर आपण आपली हानी करून घेत आहोत असे माझे मत आहे. ('अपरिमित' वगैरे काव्यात्मक शब्द मी बाजूला ठेवतो.)

विनायक यांचे काय मत आहे? आजही ऍरिस्टार्कस यांचा "सूर्य हाच विश्वमध्य" असा सिद्धांत मानावा, की दुर्बिणीतून प्रत्यक्ष दिसलेले तारकांचे आगेमागे होणे बघून तो सिद्धांत त्यागावा?

ऑस्ट्रोनॉमर्स

ऍस्ट्रोनॉमर्स आर ऑफन इन एरर बट नेव्हर इन डौट.

-मार्टिन रिस

सक्तिचे ब्रह्मनिष्ठत्व

गार्गीविषयी :वचक्नुऋषींची कन्या. म्हणून हिला "गार्गी वाचक्नवी" असे म्हणतात. ती ब्रह्मनिष्ठ होती.(निश्चित अर्थ न कळे).

बाय द वे, वचक्नुऋषी स्वभावाने तापट वगैरे होते का हो? त्यांच्या तापट स्वभावमुळे तर गार्गीला सक्तिचे ब्रह्मनिष्ठत्व घ्यावे लागले नसेल ना?! वचक्नुऋषींच्या आश्रमातल्या एखाद्या शिष्याचं आणि तिचं अवचित जमलं असेल आणि त्यामुळे संतापून जाऊन कुणाला लक्षात यायच्या आतच वचक्नुऋषींनी ते प्रेम प्रकरण मोडून काढलं असेल आणि दिल दुखावलेल्या गार्गीने ब्रह्मनिष्ठ राहून उर्वरीत आयुष्यात मार्गक्रमणा करायचं ठरवलं असेल! असं तर काही नसेल ना?

उगीच आपली एक शंका..!

असो..

तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

इहलोक खोटा?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितातः"या लेखात यनावाला यांच्याच मागील लेखाचा संदर्भ आहे, आणि अनेक प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिसादाचा उल्लेख आहे. पुढील लेखात तसा नाही. म्हणून मागल्या लेखाच्या बाबतीत आणि विनायक यांच्या प्रतिसादाच्या बाबतीत उपप्रतिसाद येथे देत आहे. "

हे अगदी योग्य आहे.म्हणून श्री. विनायक यांच्या "....संवाद" लेखासंबंधीच्या प्रतिसादाला इथे उत्तर लिहित आहे.ते अगदी साधे भुईवरचे आहे.
* माझे एक परिचित गृहस्थ आहेत.गेल्या महिन्यात ते अमेरिकेला जाऊन आले.पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सर्व घडले. ठरल्याप्रमाणे गाठी भेटी झाल्या. तिकडे थंडी सुरू व्हायच्या आत ते परतले.
* कोकणातील वडिलोपार्जित जमिनीत त्यांनी काजू झाडे लावली आहेत. भविष्यात ही लागवड अधिक लाभदायक ठरेल असे त्यांना वाटते.
*ते आणि त्यांच्या पत्नी यांनी आपल्या स्थावर जंगम संपत्तीच्या वाटपाचे इच्छापत्र करून ठेवले आहे.
* पुढच्या दिवाळीत मायक्रोवेव्ह आणि म्युझिक सिस्टिम ध्यायची असे परवा म्हणत होते.
..या गृहस्थांचे चुकते आहे असे बहुधा कोणी म्हणणार नाही. हे जग खरे आहे असे मानून आपण इथे वावरतो. त्याच्या खरेपणासाठी मला अन्य कोणत्याही प्रमाणाचे आवश्यकता वाटत नाही.
..या अफाट विश्वाविषयींचे आपले वैज्ञानिक ज्ञान तुटपुंजे आहे. (पण तेच आपले सर्वात विश्वासार्ह असे अमूल्य ज्ञानभांडार आहे.) आपले अज्ञान मोठे आहे. म्हणून इहलोक खोटा आहे असे म्हणणे मला चूक वाटते. आपणच इहलोक आहो.

 
^ वर