वैचारिक गोंधळ

वैचारिक गोंधळ

मला असे सांगा की मी जर (ज्यातले मला काहीही कळत नाही) अशा विषयांवर उदा.रिलेटिव्हिटी वा शास्त्रीय संगीत या बद्दल काही विचार मांडले तर इतर काय करतील ? सज्जन, जाणकार दुर्लक्ष करतील, ज्यांचे अज्ञान माझ्याएवढेच, ते तुटून पडतील व अधलेमधले या साठमारीतली गंमत बघतील, मधेच एखादी पिंक टाकून. खरे कीं नाही ? हल्ली असेच काहीसे इथे चालले आहे असे वाटते.

मला वाटते न्युटन-आईनस्टाईन यांनी योगशास्त्रावर बोलूं नये, किशोरीताईंनी ग्रां प्री वर लिहूं नये आणि रामदेव महाराज यांनी बिटी कॉटनवर वावदूकपणा करूं नये. कां ? तर ते आपापल्या क्षेत्रात उत्तुंग पदावर विराजमान असले तरी सर्वज्ञ नाहीत. त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणे उचित. असे सर्व थोर हे जाणून असतात. प्रश्न असतो अलबत्या-गलबत्यांचा.

माझे साधे म्हणणे असे कीं मला जर संत साहित्यावर काही लिहावयाचे असेल तर माझा त्या विषयावर थोडाबहूत अभ्यास असणे जरूरीचे आहे. मी सर्वश्री देगलूरकर-दांडेकर- करंदीकर-धोंड यांच्या इतका दांडगा अभ्यास करावयास पाहिजेच असे नसले तरी ज्ञानेश्वरी-दासबोध वाचलाच नाही असे होता कामा नये. चार टीकाकार काय म्हणतात ते मला माहिती पाहिजेच.

उदाहरण म्हणून देव रीटायर करावयाला निघालेल्या डॉ. लागूंचे घेऊं. या विषयावर आपल्या इथे शेकडो वर्षांत अगणिक लेखकांनी, संत महात्म्यांनी, जन्मभर ह्यावर आपले आयुष्य वेचले आहे. एका जन्मात ते विचार वाचणे सुद्धा अशक्य आहे, त्याचा अभ्यास तर सोडाच. काय यांचा अभ्यास ? कुठे माझ्या तरी वाचनात आलेला नाही. "रोज दारू पिणे चांगले" हे जितक्या सहजतेने सांगावे तितक्या सहजतेने देवाला रीटायर करणे हास्यास्पद नव्हे कां ? ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे महात्मे, ज्यांना इतरांकडून काही नको आहे, ते जर पोटतिडिकेने "देव आहे" म्हणत असतील तर मी विश्वास कोणावर
ठेवावा ? चार पैसे मिळतात म्हणून कोठल्याही नाटक-सिनेमात काम करणार्‍यावर कीं राजाकडून आलेल्या संपत्तीला धुडकावणार्‍या तुकारामावर ?

देव,परमात्मा,ब्रह्म, समाधी, नामसंकीर्तन यांच्या उपयोगावर लिहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीं हे सहजसाध्य नव्हे. योगाचे सोडा, ते परमकठीण आहे. सर्वांनीच सांगितले आहे, भगवानांनीही. पण "नाम" सोपे आहे असे तरी कोण म्हणतो ? तेथेही एक मोठा अडथळा आहे. सगळ्यांनी एकमताने सांगितले आहे कीं त्याकरता ’भाव’ पाहिजे,’श्रद्धा’ पाहिजे. सोपे नाही. देवळाबाहेरच्या खेटरावर लक्ष असेल तर विठ्ठल जपाचा उपयोग नाही. ’नामाची’ हेटाळणी करताना हे विसरून चालणार नाही.

पंचेंद्रियांना अगोचर असलेल्या हायड्रोजन व ऑक्सिजन या दोन वायूंच्या संयोगाने पाणी होते. माझा विश्वास नाही. दाखवा दोन वायू. असे म्हटले तर तुम्ही म्हणणार "किमान दहावी पर्यंत रसायन शास्त्र शिका, दोन्ही वायूंचे सिलेंडर आणा, मग दाखवतो पाणी तयार करून !" हे ठीक. म्हणजे साधे पाणी करावयाला दहा वर्षे अभ्यास पाहिजे. तर संत म्हणतात "परमात्मा पहावयाचा आहे, आयुष्यभर जीवापाड श्रद्धेने नाम घे, आम्हाला मिळाला, तुलाही मिळेल".Quits.

जीवनात फुकट काहीही मिळत नाही. Law of conservation of energy सारखेच . या हाताने दे, त्या हाताने घे. राम नाम घेणार्‍या गृहस्थांची बातमी आली तेंव्हा ही सुवर्णसंधी म्हणून त्याकडे पहावयास पाहिजे. एक असाधारण प्रयोग जगावेगळा माणूस करतो आहे. अथक प्रयत्नांनी त्यांच्या प्रगतीचा आलेख मिळवण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. कोण करतय ?

संतांच्या शिकवणीने समाज दुर्बल झाला ही एक समजूत. त्याला अनेक कारणे आहेत. एका घटकाने समाज दुर्बळ होतो हा वैचारिक गोंधळ्च आहे.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

जागा

विसोबा खेचर अर्थातच पहिल्या गटातील दिसत आहेत तुम्ही दुसर्‍या गटातले काय?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कशातच नाही...

तुम्ही दुसर्‍या गटातले काय?

छे हो! आम्ही फार लहान आहोत...अजून "जागा चुकलाशीच", म्हणणारे... त्यामुळे कोणी पुढे आले की फक्त गीता वाचायचे काम करतो :-)

 
^ वर