तर्कक्रीडा:७१:यांत काय संशय?

अल्लूकडे एक धड्याळ होते.
सकाळी बल्लूने ते शंभर रुपयांना खरेदी केले.
बल्लूच्या घरी ते कोणालाच आवडले नाही.
दुपारी बल्लू घड्याळ परत करायला गेला.
अल्लूने आता ते ऐशी रुपयांना परत घेतले.
अल्लूने सायंकाळी ते नव्वद रुपयांना कल्लूच्या गळ्यात मारले.
तर या व्यवहारात अल्लूला एकूण किती नफ़ा झाला?
याची तीन संभाव्य उत्तरे अशी:
(१) " ब ने घड्याळ परत केले तेव्हा अ ला २०रु. फ़ायदा झाला ना?"
"हो. फ़ुकटात पडलेले २०रु. म्हणजे फ़ायदाच की!"
"शिवाय दुपारी ८०रु.ना घेतलेली वस्तू त्याने सायंकाळी ९०रु.ना विकली.म्हणजे १०रु.नफा झाला ना?"
"निश्चितच! नफा=विक्रीमूल्य-खरेदी मूल्य हे आम्ही शाळेत शिकलो."
"म्हणजे अ ला एकूण (२०+१०)=३०रु.नफा झाला ना?"
"यात काय संशय?"
...............................................................
(२) " अ ने आपले घड्याळ ब ला १००रु.ना विकले. यात फ़ायदा तोटा काही नाही.ब ने घड्याळ परत केल्यावर अ कडे त्याचे पूर्वीचे घड्याळ होतेच.शिवाय २०रु.मिळाले होते. तो त्याचा फायदा. बरोबर ना?"
"अगदी बरोबर."
" आपल्याला नको असलेले घड्याळ अ ने क ला ९०रु. ना विकले. यात नफा तोटा काही नाही ना?"
"कसा असेल?"
"म्हणजे अ चा एकूण नफा २०रु.च ना?"
"यात काय संशय?"
............................................................
(३)"अ ने आपले घड्याळ ब ला १००रु ना विकले.यात नफा तोटा काही नाही ना?"
"निश्चितच नाही.नुसत्या विक्री किंमतीवरून नफा कसा कळणार?"
"आता विचार करा हं. दुपारी अ ने एक वस्तू ८०रु.ना खरेदी केली. ती सायंकाळी ९०रु.ना विकली.यात नफा किती झाला?"
"सरळ आहे. नफा १०रु."
" म्हणजे या व्यवहारात अ ला एकूण १०रु.च नफा झाला ना?"
"यात काय संशय?"
...................................................................
तर यांतील कोणते उत्तर बरोबर? १० रु,२० रु, की ३० रु? का तिन्ही बरोबर? का कोणतेच उत्तर बरोबर नाही? ब चे तसेच क चे नफा नुकसान किती?

लेखनविषय: दुवे:

Comments

माझ्यामते १० रू चा फायदा झाला.

समजा घड्याळाची किंमत १००रू आहे (अ ने ब ला जेव्हा पहिल्यांदा घड्याळ विकलं तेव्हा ना नफा ना तोटा या तत्त्वावर विकलं)

अ आणि ब च्या दुसर्‍या व्यवहारात "अ" ला २० रू मिळाले..
समजा घड्याळाची किंमत संध्याकाळपर्यंत "डिप्रीशिअट" झाली नसेल् तर् अ ने क ला १० रू तोट्यात घड्याळ् विकलं.म्हणून् अ चा निव्वळ नफा हा १० रु झाला...

ब ला २०रू भाड्यावर १००रू चं घड्याळ् १ दिवसासाठी वापरायला मिळालं.

क ला १०० रू चं घड्याळ थोड्या उशिरा (सकाळ ऐवजी संध्याकाळ्) आणि थोडं वापरलेलं ९० रू ला मिळालं. म्हणलं तर् हा क् चा फायदा आहे..

घड्याळ एका दिवसात १०रू पेक्षा जास्त "डिप्रीशिअट" होत असेल् तर् अ चा फायदा!

व्यक्तिगत निरोपांमधून उत्तरे

व्यक्तिगत निरोपांमधून उत्तरे पाठवण्याबद्दल तळटीप या वेळी यनावाला यांनी दिलेली नाही.
- - -

भाग १: तर यांतील कोणते उत्तर बरोबर? १० रु,२० रु, की ३० रु? का तिन्ही बरोबर? का कोणतेच उत्तर बरोबर नाही?

'अ'बद्दल उत्तर सांगता येत नाही. घड्याळ 'अ'ने पूर्वी किती रुपयांना विकत घेतले, आणि त्यातून किती रुपयांचा स्वतः उपयोग करून घेतला, हे आपल्याला माहीत नाही. घड्याळाची अंगभूत किंमत उपयोगामुळे कमी होते की "संग्रहणीय वस्तू" म्हणून वाढते, हे आपल्याला माहीत नाही. ही जी काय किंमत आहे, तिला आपण "सुयोग्य अंगभूत किंमत" म्हणूया. घड्याळाची सुयोग्य किंमत किती यावर नफा-तोटा अवलंबून आहे. (समजा घड्याळ >११० रुपयांच्या अंगभूत योग्यतेचे होते, तर 'अ'चा तोटा झाला, घड्याळ <११० रुपयांच्या अंगभूत योग्यतेचे असल्यास 'अ'चा फायदा झाला.)

भाग २ व ३: ब चे तसेच क चे नफा नुकसान किती?

'ब'चे वीस रुपये नुकसान झाले.

'क'ला नफा-नुकसान काय झाले, ते घड्याळाच्या सुयोग्य किमतीवर अवलंबून आहे. (समजा घड्याळ >९० रुपयांच्या अंगभूत योग्यतेचे होते, तर 'क'चा तोटा झाला, घड्याळ <९० रुपयांच्या अंगभूत योग्यतेचे असल्यास 'क'चा फायदा झाला.)

धनंजय

घड्याळाची मूळ किंमत

उत्तरे

पहिला प्रश्न -अल्लूने ते घड्याळ किती रुपयांना खरेदी केले होते? याचा उल्लेख नाही .सबब कोणतेच उत्तर बरोबर नाही.
दुसरा प्रश्न - बल्लूचे वीस रुपयांचे नुकसान झाले.(यात ते घड्याळ दुर्मिळ असल्याने डेप्रिशिएट होत नाही असे गृहित धरले आहे.)
तिसरा प्रश्न-
कल्लूचे नफानुकसान (अजूनतरी) झाले नाही.
त्याने ते घड्याळ बल्लूकडून थेट विकत घेतले असते तर त्याला ते १०रु. नी स्वस्त मिळाले असते. म्हणजे त्याचे १०रु.चे नुकसान झाले असे सकृतदर्शनी दिसते.
पण त्याला ते अल्लूकडूनच घ्यावे लागले. अखेरच्या नफ्यातोट्यात जर-तर ना वाव नाही.
त्याने ते घड्याळ कोण्या डल्लूला विकले तर त्याला किती नफातोटा झाला त्याचे गणित करता येईल.

घड्याळाची मूळ किंमत

घड्याळाची मूळ किंमत माहीत नसल्याने बल्लूला १०० रु विकले हा फायद्याचा कि तोट्याचा व्यवहार समजत नाही.

पण जेव्हा बल्लुने दुपारी घड्याळ परत केले (व्यवहार रद्द, २० रु भुर्दंड भरुन ) तेव्हा बल्लुचा २० रु तोटा. व

घड्याळ परत आल्याने अल्लूचा २० रु फायदा.

अल्लूने सायंकाळी ते नव्वद रुपयांना कल्लूच्या गळ्यात मारले. आता ज्या अर्थी विकले तेव्हा ९० रु रास्त वाटत असावे अल्लूला. बल्लुशिवाय कोणी ९०च्या वर एक पैसा देणार नाही अशी खात्री असेल. जर तसे नसेल व संध्याकाळच्या पेयपानाची सोय वेळेत व्हावी म्हणून १०० रु मिळाले असते तरी ९० ला विकले म्हणून १० तोटा म्हणता येईल खरा. अर्थात ह्या बर्‍याच गोष्टी जर तर वाल्या आहेत व यनावालासर संदिग्ध कोडी कधी घालत नाहीत त्यामुळे ह्या किंवा अश्या तर्काला काही अर्थ नाही. ..
तेव्हा परत घड्याळाची मूळ किंमत माहीत नसल्याने ९० रु हा फायद्याचा कि तोट्याचा व्यवहार समजत नाही.

कल्लूने दिलेल्या किंमतीत त्याला रास्त वाटेल असे घड्याळ घेतल्याने / घडयाळाची मुळ किंमत माहीत नसल्याने त्याचे नुकसान का अल्लूचा फायदा काही कल्पना नाही.

अकाउंटन्सी

हे कोडे नाही. अकाउंटन्सीसंबंधित प्रश्न आहे. व्यावसायिक हिशेब ठेवण्याच्या नियमानुसार प्रत्येक वस्तूला एक बुक व्हॅल्यू असते. ते घड्याळ मुळात किती किंमतीला विकत घेतले, त्याशिवाय आणि त्यानंतर त्यावर किती खर्च झाला वगैरे मिळवून ती येते. हे घड्याळ जर प्रॉडक्टिव्ह अॅसेट असेल तर त्याचे डिप्रीशिएशन हिशोबात धरले जाते, ते करण्यासाठी वेगवेगळे नियम आणि दर आहेत. त्या घड्याळाची मार्केट व्हॅल्यू कांही कारणाने वाढली असेल तर ते अॅप्रीशिएटसुध्दा होते. यातले काहीच माहीत नसल्यामुळे अल्लूच्या घड्याळाची त्या दिवशी किती किंमत होती हेच आपल्याला ठाऊक नाही. फक्त सकाळी त्याच्याकडे घड्याळ होते आणि संध्याकाळी त्याऐवजी ११० रुपये होते एवढेच माहीत आहे. एवढ्यावरून नफातोट्याचा हिशोब करता येत नाही.
त्या दिवशी दिवसभर ती १०० रुपये होती असे गृहीत धरले तर दुपारी त्याला २० रुपये फायदा झाला आणि संध्याकाळी १० रुपये तोटा, म्हणजे दिवसभरात १० रुपये नफा असे म्हणता येईल

बल्लू ने विनाकारण २० रुपये घालवले. त्याच्याकडे सकाळीही घड्याळ नव्हते आणि संध्याकाळीही नाही. त्याच्या खिशातले २० रुपये तेवढे कमी झाले. तेवढा त्याला तोटा झाला.

कल्लूने फक्त खरेदी केली आहे, विक्री केलीच नसल्यामुळे त्याला रोख नफानुकसान झालेले नाही. घड्याळाची मार्केट व्हॅल्यू माहीत नसल्यामुळे कल्लूला नोशनल फायदा झाला की नुकसान ते सांगता येत नाही.
ती १०० रुपये असेल तर त्याला १० रुपयांचा फायदा झाला

अल्लू, बल्लू आणि कल्लू यांना घड्याळाची किंवा पैशाची किती आवश्यकता होती वगैरे प्रश्न त्याची किंमत ठरवतांना विचारात घेतले जातात, पण कोरड्या हिशोबात ते गणले जात नाहीत. फार तर त्या आवश्यकतेची एक नोशनल किंमत धरली जाऊ शकते.

फायदा/तोटा

घड्याळाची खरेदी किंमत माहित नसल्याने, सुरुवातीच्या व्यवहारात बल्लूला किती फायदा/तोटा झाला हे सांगणे अशक्य आहे. नंतरच्या घडामोडींमधून बल्लूला १० रुपये जास्तीचे सुटले इतकेच समजते. (१०० ला विकले गेलेले घड्याळ ९० ला विकावे लागल्याने १० रुपयाचे नुकसान पण त्यासाठी २० रुपये दंड आधीच आकारल्याने १० रुपये जास्तीचे). थोडक्यात बल्लूने अल्लूला २० रुपये दंड केला आणि तो १०-१० असा कल्लू बरोबर वाटून घेतला.

सुरुवातीचा सौदा फायद्याचा होता असे धरले तर नंतर तो फायदा १० रुपयांनी वधारला, तोट्याचा असल्यास तोटा १० रुपयांनी कमी झाला.

नफा तोटा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इथे जुन्या वस्तूची खरेदी/विक्री आहे. तसेच अ,ब, क पैकी कोणीही जुन्या/ नव्या वस्तूंचा व्यापारी नाही. तेव्हा जुनी वस्तू विकताना / खरिदताना नफा/तोटा काही नाही असे मानणे योग्य ठरेल.मात्र वस्तू ८०रु ना खरेदी करून ९०रु. ना विकण्यात १०रु. नफा निश्चित आहे. तसेच कालान्तरामुळे किंमतीत होणारा घसारा(डेप्रीसिएशन) विचारात घेणे आवश्यक नाही.
...

असहमत

आपण जमिनीचे/जागेचे/शेअर्सचे व्यापारी नाही, परंतु आपण खूप पूर्वी विकत घेतलेला एखादा फ्लॅट किंवा शेअर आज आजच्या बाजारभावाने विकला, असे मानू.

अशा परिस्थितीत वरील युक्तिवाद एखाद्या आयकर अधिकार्‍यासमवेत करून पहावा, आणि तरीही गजांच्या योग्य बाजूस टिकल्यास मला जरूर कळवावे - मीही प्रयोग करून पहावा म्हणतो.

'कॅपिटल गेन्स' नावाच्या प्रकरणाबद्दल कधीतरी काहीतरी उडतउडत ऐकले होते. असो.

असहमत आणि माझे उत्तर

अल्लूकडे एक धड्याळ होते.

घड्याळ अल्लूने विकत घेतले होते, स्वतः बनवले होते की वडीलोपार्जित/ भेट मिळाले होते याबाबत कोड्यात काही विदा नाही.

तर या व्यवहारात अल्लूला एकूण किती नफ़ा झाला?

वर सांगितल्याप्रमाणे अनेक शक्यतांपैकी एक शक्यता 'विकत घेतले होते' अशी असल्याने आणि केवढ्याला विकत घेतले हे माहीत नसल्याने उत्तर सांगता येत नाही. 'एकूण' नफा विचारल्याने आरंभीचा खरेदी करण्याचा व्यवहार आणि त्यातील नफा विचारात घ्यायला हवा.
एकाच व्यवहारातील किंवा दोन दिवसात एकूण नफा असे काही असते तर १० रु. हे उत्तर योग्य ठरू शकले असते.

.....................................................................................................................
मी पाठवलेले उत्तर पुढीलप्रमाणे:

अकौंटींग दृष्टीकोनातून*
१. तीनही उत्तरे बरोबर नाहीत. अला झालेला नफा काढण्यासाठी त्याने घड्याळ आरंभी किती किंमतीने घेतले हे माहीत असायला हवे. जे कोड्यात दिलेले नाही.
२. बला २० रु. नुकसान झाले. (विक्री -खरेदी=८०-१००=-२०)
३. कने अजुनही घड्याळ विकलेले नसल्याने त्याचा नफा ठरवता येणार नाही.
*या उत्तरात 'टाइम वॅल्यु' विचारात घेतलेली नाही.

अर्थशास्त्रीय
१. तीनही उत्तरे बरोबर नाहीत. अला झालेला नफा काढण्यासाठी त्याने घड्याळ आरंभी किती किंमतीने घेतले हे माहीत असायला हवे तसेच त्याला त्या घड्याळातून मिळालेल्या उपयुक्ततेचे (utility) पैशात रुपांतर करण्यासाठी पुरेसा विदा नाही.
२. बचेही नफा-नुकसान सांगता येणार नाही (उपयुक्तता मूल्याच्या अभावे. उदा. घरातल्या लोकांना विकत घेतलेले घड्याळ दाखवण्याचा आनंद नुकसान कमी करेल तर नापसंतीने आलेले नैराश्य नुकसान वाढवेल.)
३. कचेही सांगता येत नाही. युक्तिवाद वरीलप्रमाणे

उत्तरे दोन्ही प्रकारे दिलेली असली तरीही आपल्याला 'अकौंटींग दृष्टीकोनातून' उत्तर अपेक्षित असावे असे वाटते.

आण़ही कांही उत्तरे

अल्लूला घड्याळ नकोच होते. त्याचे १०० रुपये मिळताच त्याने ते विकून टाकले. बल्लूने परत आणल्यावर त्याने भीडेपोटी ते परत घेतले, पण त्याला वीस रुपये कमी दिले. त्यानंतर कल्लूने दिलेले पैसे घेऊन ते पुन्हा विकून टाकले. म्हणजे त्याला फायदाच फायदा झाला.

बल्लूला या सौद्यात वीस रुपये खोट आली असली तरी ती अक्कलखाती जमा करून 'बायकोला विचारल्याशिवाय कुठली वस्तू घरात आणणे शहाणपणाचे नसते' हा एक फार मोठा धडा तसा स्वस्तातच मिळाला. अल्लूने ते घड्याळ परत घेतलेच नसते तर बल्लूचे १०० रुपये गेले होते.

बल्लूच्या मानाने कल्लूला ते घड्याळ स्वस्तात मिळाले म्हणून तोही खूष.

थोडक्यात सगळ्यांचाच फायदा झाला. याला म्हणतात सकारात्मक विचार.

तर्कक्रीडा:७१:उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
माझे उत्तर असे:
उत्तर:
तीन संभाव्य उत्तरांसाठी केलेला प्रत्येक युक्तिवाद वरवर पाहाता पटण्यासारखा आहे.नेमके अचूक उत्तर काढण्यासाठी घड्याळाची आजची योग्य किंमत काय ते ठाऊक हवे. श्री.धनंजय आणि श्री.कर्क यांनी व्यनि.ने उत्तरे पाठवली. दोन्ही उत्तरांत या गोष्टीचा निर्देश केला आहे.
.....
समजा घड्या्ळाचे योग्य मूल्य क्ष रु. आहे. तर या सर्व व्यवहारानंतर:
*अ ची एकूण संपत्ती (११०-क्ष) रुपयांनी वाढली.
*ब ची संपत्ती २०रु. नी घटली याविषयी दुमत नाही.
*क ची संपत्ती (९०-क्ष) रुपयांनी घटली.
इथे क्ष=९०रु मानणे योग्य होईल.कारण क घड्याळ बदलायला गेला नाही. अ ला सुद्धा ती किंमत योग्य वाटते. कारण अ ने ते कच्या गळ्यात मारले. अगतिकपणे देऊन टाकले असे नाही. म्हणून अ चा खरा नफा २०रुपये.
ब च्या पदरी काहीच न पडता त्याचे २०रु.गेले आहेत. म्हणजे ते कोणाला तरी मिळाले असले पाहिजेत. ते अलाच मिळाले.असे उत्तर देता येईल.
अन्यथा असे निर्विवादपणे म्हणता येईल की अ ला त्याच्या घड्याळाचे ११०रु. मिळाले. त्यातील ९०रु.क ने तर २०रु.ब ने दिले.
........................................

 
^ वर