इष्काची इंगळी डसली - रामभाऊ कदमांची एक आठवण!

राम राम मंडळी,

काही वर्षांपूर्वीची गोष्ट बर्र् का! (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी!;)

मी कलानगरीत काही कामाकरता गेलो होतो. सहज थोडा वेळ होता म्हणून मी चंद्रकांत मांढरे यांच्या घरी त्यांची चित्रं पाहायला गेलो. चंद्रकांत हे एकेकाळचे मराठी रजतपटावरील नायक कलाकार. शिवाय एक उत्तम चित्रकार! अत्यंत साधा आणि निगर्वी माणूस. त्यांनी अगदी आत्मियतेने मला त्यांची चित्र दाखवली. त्यापूर्वीही मी एकदोनदा त्यांच्या घरी गेलो होतो.

त्यांच्या घरी माझी अचानक भेट झाली ती संगीतकार रामभाऊ कदमांशी. रामभाऊ काही कामाकरता मांढरेसाहेबांच्या घरी आले होते. मांढरे साहेबांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. रामभाऊ हा माणूसही अत्यंत साधा, परंतु तेवढाच मिश्कील आणि दिलखुलास!

मी त्यांच्या पायाला स्पर्श केला, आणि 'मला तुमचं पिंजरातलं "इष्काची इंगळी डसली.." हे गाणं अतिशय आवडतं' असं सांगितलं.

'हो का? अरे वा वा वा!' असं म्हणून त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला!

काही वेळाने मांढरे साहेबांच्या घरून मी निघालो, रामभाऊ कदमही निघाले. "तुम्हाला कुठं जायचंय? चला की जाऊ जरा चालत थोडा वेळ' असं रामभाऊंनी म्हटलं आणि मी आनंदाने होकार दिला. आमच्यात पुन्हा एकदा 'इष्काच्या इंगळीचा' विषय निघाला. आमच्यातला संवाद आता मला थोडाफार आठवत आहे. शब्द कदाचित वेगळे असतील. परंतु संगीताचा एक विद्यार्थी या नात्याने त्यातला आशय आजही माझ्या चांगला लक्षात आहे.

मी त्यांना म्हटलं, "रामभाऊ, ही चाल आपल्याला कशी काय सुचली? चाल तर केवळ अफाट आहे."

"अहो कशी काय सुचली हे सांगता येणार नाही. पण बर्‍याच दिवसांपासून यमन राग डोक्यात होता, तो उतरला एकदाचा धडाधडा!"

"पण रामभाऊ, माझ्या मते यातल्या यमनचं स्वरूप हे भावगीताचं नव्हे, भक्तिगीताचं नव्हे तर चक्क शास्त्रीय अंगाचं आहे! लावणीचा ठसका आणि तोदेखील यमनमध्ये? अगदी ख्यालगायकीतल्या यमनची आठवण व्हावी असा? खरंच कमाल केली आहे आपण रामभाऊ!"

माझ्या या बोलण्याचं आणि त्यातल्या उत्सुकतेचं रामभाऊंना क्षणभर कौतुक वाटलं! मंडळी, खरं तर ती माझ्यासारख्या लहान माणसाने दिलेली एक मनमोकळी दाद होती. पण खरा कलाकार हा एका लहानश्या का होईना पण मनापासून आलेल्या दादेचा भुकेला असतो! वास्तविक त्या क्षणीही रामभाऊ कदम हे रामभाऊ कदम होते, नांवारुपाला आलेले होते, मोठे होते. त्यांना अचानक भेटलेल्या कुण्या एका तात्या अभ्यंकराच्या पावतीची मुळीच गरज नव्हती!

मग मलाही राहवेना. माझ्या तोंडून,

'या इंगळीचा कळला इंगा,
खुळ्यावानी मी घातला पिंगा'

किंवा,

'सार्‍या घरात फिरले बाई गं,
मला अवशीद गवलं न्हाई गं'

या कडव्यातल्या यमनाला, त्यातल्या सुरावटीला मनमोकळी दाद जाऊ लागली. माझं बोलणं ऐकतांना रामभाऊ कदमांमधला एक कलाकार तृप्त होत होता. त्यांच्या चेहेर्‍यावर मला फक्त समाधान दिसत होतं!

'कोण कुठलं पोरगं, पण बरं बोलतंय' असं कौतुकही दिसत होतं! ;)

मग रामभाऊंनीही त्या लावणीतल्या यमनाच्या काही खास जागा, त्या कुठून आल्या, कश्या आल्या, त्या जागी दुसरी एखादी हरकत कशी फिट्ट बसते, त्यातल्या कडव्यांचे ठेके कसे आहेत, याबाबत माझ्याशी सविस्तर बोलायला सुरवात केली. अगदी हातचं काहीही राखून न ठेवता!

बराच वेळ रामभाऊ बोलत होते. मी ऐकत होतो, शिकत होतो. अगदी मन लावून!!

मंडळी, गुरू कुठेही, कधीही भेटू शकतो असं म्हणतात. आपली फक्त शिकण्याची तयारी हवी! कोल्हापुरातल्या त्या भर रस्त्यावर गुरू शिष्य परंपरा नांदू लागली. रामभाऊ मला यमन शिकवत होते!!

मी चित्रं पाहायला म्हणून मांढरे साहेबांच्या घरी जातो काय, अन् मला तिथे रामभाऊ भेटतात काय!

त्या प्रसंगानंतर माझी आणि रामभाऊंची कधीही भेट झाली नाही. आता रामभाऊ हयात नाहीत. आमच्या दोघांचे मागच्या जन्मीचे काय ऋणानुबंध होते कुणास ठाऊक, पण हा माणूस मला 'गुरू' म्हणून अवघ्या तासाभरता अचानक भेटला आणि खूप काही शिकवून गेला!!

"मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात,
नको तिथ्थंच पडला, अवचित माझा हात,
हाताखालती नांगं काढून, वैरीण ती बसली,
ग्ग ब्बाई मला, इष्काची इंगळी डसली..
बाई गं, बाई गं.....

क्या बात है, क्या केहेने! इथे उपक्रमावर एकदा केव्हातरी नक्की या गाण्याचं रसग्रहण लिहीन! अगदी मनमुराद..

आमच्या रामभाऊंना श्रद्धांजली म्हणून!

-- तात्य अभ्यंकर.

Comments

तात्या की हरीतात्या?

'प्रत्येक प्रसंगाच्या वेळी हरीतात्या तिथे नेमके कसे हजर होते हा प्रश्न लहानपणी आम्हाला कधी पडला नाही आणि मोठेपणी आम्ही हरीतात्यांना त्यांच्या जागृत समाधीतून कधी जागे करण्याचा प्रयत्न केला नाही!'

ऐहिक

अहो काय सांगू तुम्हाला,..;)

अहो काय सांगू तुम्हाला ऐहिकराव!

अहो असे आम्ही बसलेले. तिकडे जगदीश खेबूडकर लिहितायत त्या लावणीची कडवीच्या कडवी, आणि डोक्यावर कोल्हापुरी फरक्यॅप घातलेल्या आमच्या वणकुद्रे अण्णांचं सर्वांकडे अगदी जातीने लक्ष असायचं बरं का मुलांनो!

सांगा पाहू फरक्यॅपवाले वणकुद्रे अण्णा कोण? ;)

चित्रपती व्ही शांताराम..........

बरोब्बर! ;)

तर काय सांगत होतो?

एकिकडे आमचे रामभाऊ हार्मोनियम घेऊन बसले होते आणि उषाताईंना चाल शिकवत होते!

शेवटी जमली एकदाची त्यांची ती यमनातली चाल! मग माझ्याकडे पाहून रामभाऊंनी विचारलं,
"काय तात्या, जमली की नाही चाल?"!

मी म्हटलं जमली.....;)

असे होते आमचे शांतारामबापू, असे होते आमचे रामभाऊ कदम!

बोला, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके की जय! ;)

चला मुलांनो, मी आता जातो. संध्याकाळी रुग्वेदींना उदबत्त्यांचा हिशेब द्यायचाय! ;)

आपला,
हरितात्या!

वा वा

हो.. आणि आम्ही मग त्या छत्र्या सावरत सावरत..कोणी शांताराम कसे दिसत हे डोळ्यासमोर आणत तर कोणी बाहीने नाक पुसत..

वा वा..तात्या लेख मस्तच. आता पुन्हा काही छान वाचायला मिळणार नक्कीच.
-- (बाहिने नाक पुसत पुसत, समर्थ त्या कपाटात शिरलेच कसे असा विचार करणारा) लिखाळ.

अवांतर : आज याच धर्तिवरचा तुमच्याच शैलीतला लेख आला होता. आता उडला आहे. त्याचा उगम कसा झाला ते इथे समजले.

तात्या आणि हरितात्या!

हरितात्या बहुधा आजच्या काळात तात्यासाहेबांच्या रुपात प्रकट झालेत असेच वाटते.(सुधारित आवृत्ती?)
बाकी प्रसंग खुलवून सांगण्याची हातोटी बाकी जबरी आहे. जियो! तात्या! जियो!

सुरेख आठवण.

तात्या,

सुरेख आठवण. आणि मुख्य म्हणजे Tatya is back again in his old form and andaaj..! याचा अतिशय आनंद वाटला. नेहमीच्या ओघवत्या शैलीतला हा लेख छानच उतरला आहे. आता या गाण्याचे रसग्रहण वाचायची उत्सुकता लागली आहे. ही लावणी सुरेखच आहे आणि उषा मंगेशकरांनी छानच गायली आहे.

बाकी प्रसंग खुलवून सांगण्याची हातोटी बाकी जबरी आहे.

अत्त्यानंदांशी सहमत.

त्या प्रसंगानंतर माझी आणि रामभाऊंची कधीही भेट झाली नाही. आता रामभाऊ हयात नाहीत. आमच्या दोघांचे मागच्या जन्मीचे काय ऋणानुबंध होते कुणास ठाऊक, पण हा माणूस मला 'गुरू' म्हणून अवघ्या तासाभरता अचानक भेटला आणि खूप काही शिकवून गेला!!

सुंदर!

दुवा..

'ग बाई मला इष्काची इंगळी डसली' या गाण्याचा दुवा मी जालावर शोधतो आहे, पण मला अद्याप मिळालेला नाही. कुणाला मिळाल्यास त्याने/तिने येथे तो अवश्य द्यावा.

आमचे शशांकराव हे दुवे शोधण्यात पटाईत आहेत. त्यांनीही अवश्य प्रय्त्न करावा. तेदेखील कलानगरीतलेच आहेत, त्यामुळे त्यांनी विशेष आपुलकीने हा दुवा शोधला पाहिजे आणि इथे दिला पाहिजे!

असो!

आपला,
(इष्काची इंगळी डसलेला!) तात्यागुरूजी.

कूलटोड

तात्या,
हे गाणे इथे उपलब्ध आहे.

अमित

दुवा

इथे पहा?

इथे जाऊन 'राम कदम' म्हणून शोधा. सगळी गाणी सापडतील...

आपला
दुवे शोधणारा अभिजित

आभार..

ऐहिक, लिखाळ, अत्त्यानंद, माधवी गाडगीळ, मिलिंद,

प्रतिसाद दिल्याबद्दल आभार..

अभिजित, अमित कुलकर्णी,

दुवा दिल्याबद्दल आभार. पण हे गाणं ऑनलाईन ऐकता येईल असा एकही दुवा सापडला नाही.
असो,

तात्या.

 
^ वर