कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव
कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव
कवी म्हणजे साहित्य निर्माण कराणारा; मग तो कवी ,कथाकार, कादंबरीकार वा नाटककार असेल. वाचक हा रसिक पाहिजे कारण हिशोबाच्या चोपड्या तपासणारा वा वर्तमानपत्र चाळणारा वाचक इथे अभिप्रेत नाही. त्याला साहित्यात रस पाहिजे. ही आवड नसेल तर मग वाचक मेघदूतही दुकानदार किराण्याची यादी जा पद्धतीने वाचतो तसे वाचेल. तर असा रसिक वाचक काव्यानुभव कसा घेतो वा त्याने कसा घ्यावा याचा विचार या चर्चासत्रात व्हावा हा प्रयत्न.
अनुभव तुम्ही आम्ही सर्वच घेत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला. हा अनुभव घेतांना त्यात "रस" घेतलात तर तुमचे जीवन संमृद्ध होईल. अचानक आलेल्या पावसात कोण भिजले नाही? पण चरफडून छत्री न घेतल्याबद्दल स्वत:ला शिव्या घालण्याऐवजी जर स्वत: भिजण्यातली मजा घेत, इतरांची होणारी तारांबळ बघत, जर अशा पावसाची गंमत घेतलीत तर तुमचे अनुभव विश्व संमृद्ध होईल. हे विश्व जेवढे विशाल तेवढे काव्यानुभव घेणे सोपे. का?
तुम्ही जसे अनुभव घेत असता तेच कवीही घेत असतो. पण एकच घटना दोघांना निरनिराळे दर्शन घडवते.कवीची प्रतिभा (ही तर ईश्वराची देणगी) त्याच्या मनात वेगळे तरंग उठवते; त्याला त्याच्या प्रेयसीच्या गालावरून ओघळणारे आंसू आठवतात. आणि मग एका कवितेचा जन्म होतो. रसिक वाचकाला अशा एखाद्या कवितेचा आस्वाद घ्यावयाचा असेल तर त्याने झरझर झरणार्या पावसाच्या सरी उपभोगलेल्या पाहिजेत. काव्यानुभव घेण्यासाठी विश्वातील प्रत्यक्षानुभव पाहिजेच ! तीच गोष्ट तुमच्या वाचनाची. तुमचे वाचन जेवढे विशाल तेवढे रसास्वाद घेणे सोपे. सावरकर जेंव्हा सागराला दम भरतात ".. अबला न माझी ही माता रे,कथील हे अगस्तीस आता रे .." तेंव्हा याचा चपखलपणा लक्षात येण्यास अगस्तीची गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. आणखी एक.रसिकतेकरिता तुम्ही सहृदय पाहिजे. नेहमी "यात काय आणि त्यात काय़ " म्हणणार्या कोरड्या माणसांकरिता कविता नसतेच.
तर एक कवी आणि एक रसिक वाचक यांचा संबंध जोडते कविता. लिहित असतांना कविता कवीची.ती एकदा पूर्ण झाली व वाचकाच्या हातात पडली की मग ती वाचकाची. प्रत्यक्ष अनुभव व कवीला त्यातून आलेला काव्यानुभव, कवीने कवितेत मांडलेला असतो. आता वाचकाला आपले अनुभव व कवीचा काव्यानुभव यांची सांगड घालावयाची आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचे अनुभव! यामुळे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे कीं कवितेचा तुम्हाला भावलेला "अर्थ" हा तुमच्या पुरता १०० टक्के बरोबर असतो. दुसर्याने दुसरा अर्थ काढला म्हणून तुमचा अर्थ चूकीचा असे नाही. तिसरा तिसरा अर्थ काढेल, काय फरक पडला ? आणि हां, तुमचा अर्थ कवीच्या मनात असलेल्या अर्थाशी जुळलाच पाहिजे असेही नाही.तुम्ही वाचत आहा ती कविता सर्वस्वी तुमचीच आहे. परत तुम्हीच उद्या तीचा निराळा अर्थ लावलात तर बिचकू नका. तोही उद्यापुरता बरोबरच आहे. जीएंच्या कथेचा मला वीस वर्षांपूर्वी भिडलेला अर्थ व आजचा अर्थ नक्कीच निरनिराळे आहेत. नाही पटले? मग मला सांगा, तुम्ही एकदा तरी म्हणाला आहात ना
" अरे, वीस वर्षांपूर्वी शाळेत या कवितेचा अर्थ किती निराळा वाटत होता."
या मुक्त विचारांनंतर पु.शि. रेगे यांची एक कविता घेऊ. पु.शि.रेगेच कां ? तर त्यांच्या कवितेचा तुम्ही काहीही अर्थ लावा,मराठीचा कोणीही प्राध्यापक त्यावर आक्षेप घेत नाही. "नसती कटकट" म्हणतो, सोडून देतो.
लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदां
चुंबितां, डोळां
पाणी मी पाहिले
लिलीची फुले
आता कधीही
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
मी,ती, लिलीचे फुले आणि डोळ्यातील पाणी. पहिले कडवे भूतकाळातील, लिलीची फुले चुंबिताना ती भावविवश व तीच्या डोळ्यात पाणी, मी पाहतो,अलिप्ततेने. पण तीच्या भावनेचे लिलीशी जडलेले नाते आता त्याच्या मनात लिलीशीच जोडले गेले आहे.
दुसर्या कडव्यात ती नाही, काळ वर्तमान(व भविष्यही) पण आता केंव्हाही लिलीची फुले दिसली की ती फुले व त्यांच्याशी जोडले गेलेले संवेदनशील,अमूर्त प्रेम, त्यावेळची तीची करुण भावना, आता मीच्या डोळ्यात पाणी आणतात. पहिल्या कडव्यात भावना रुजली ,भिनली, तीची फुले दुसर्या कडव्यात फुलून आली. अशी विशुद्ध प्रेमकविता अबोल, अंतर्मुख करते.
आता आपण प्रतिसाद द्यावा म्हणून त्यांचीच एक कविता
तेव्हा तू म्हणाली होतीस,
चांदणं जेव्हा पाण्यात डुंबतं,
तेव्हा आपण कोणी बोलावयाचं नसतं,
कारण, ते एकटं असतं.
शरद
Comments
लेख
आवडला. मांडलेल्या विचारांशी बव्हंशी सहमत आहे. बर्या-वाईटाच्या वाचनानेच मग ही समरसता खरी आहे की बेगडी हेही कदाचित जवळजवळ बिनचूकपणे वाचकाला उमगत असावं. अर्थात यात जसे आपले अनुभव मदत करतात तसे आपले पूर्वग्रहही आड येतातच. संपूर्णपणे निरपेक्ष राहणं अशक्य आणि तसं जरी जमलं तरी वाचनाच्या अनुभवातली मजा, त्यातला वैयक्तिकपणाचा भाग निघून जाईल.
चि. त्र्यं. खानोलकरांच्या (आरती प्रभू) साहित्याबद्दल लिहिताना पुलंनी केलेलं हे भाष्य पहा -
"साहित्य-कला यांचे सुलभ उत्तरांच्या हव्यासापायी आपण किती ढोबळ आणि शालोपयोगी वर्गीकरण केले आहे याची जाणीव खानोलकरचे साहित्य वाचताना अधिक प्रखरपणे होते. एका अर्थी शाळाकॉलेजांतल्या निरनिराळ्या पातळीवरच्या वर्गांना शिकवण्याची सोय म्हणूनच हे वर्गीकरण असते. शिकवणे याचा अर्थ उत्तरे सांगणे असा झाल्यावर दुसरे तरी काय करणार? 'प्रत्येक पेशीवर एकेक तीक्ष्ण पान सर्वस्व ऐकतंय' - ह्या अवस्थेला सर्जनशील कलावंतालाच नव्हे, तर आस्वादकालाही जेव्हा जाता येते तेव्हाच कुठे हा कलात्मक शक्तिपात संभवतो. खानोलकरच्या त्या अवस्थेशी सर्वस्वी एकरूप होता आले असा मी दावा करत नाही - कोणीही करू नये. पण त्याच्या साहित्यसहवासात असताना असे अनेक क्षण लाभले आहेत की, त्या वेळी गात्रांना बधिरता आल्यासारखे वाटते.
...
कलानिर्मितीच्या क्षणी त्याची अवस्था हे सारे निस्संगपणे पाहणार्याची असे आणि म्हणूनच त्याचे साहित्य जणू कुणी तरी आपल्याला 'आता अवधारिजो जी' असा इशारा दिला आहे असे मानूनच वाचायला हवे. असा आतून उजळून निघून लिहिणारा एखादाच लेखक आपल्या वाट्याला येत असतो. व्यावहारिक पातळीवरील त्याच्या आचरणातली सारी सुसंगती-विसंगती विसरून त्याच्या 'कृती'पुढे जाताना थोडेसे लीन होऊन जावे. तुलनेसाठी डोकावू पाहणार्या कलाविषयक पूर्वसंस्कारांना क्षणभर बाजूला ठेवावे. तरच 'दोन आर्त स्वरांच्या मधल्या रिकाम्या स्वर्गांत' डोकावणे शक्य होते. ह्या अनुभूतीची गंभीरता ध्यानात घ्यायला हवी.
अर्थात जीएंच्या लेखनाला 'मोठ्या मुलांचा चांदोबा' म्हणणं, पुलंच्या प्रत्येक तिसर्या वाक्याला हुंदका असतो असे शेरे मारणं किंवा विंदांना ज्ञानपीठ मिळाल्यामुळे मराठी समाज वीस वर्षं मागे गेला असे सलीलवाघी उद्गार काढणं आणि त्यांच्या प्रभावाखाली येणं सहज शक्य आहे. प्रवाहपतित असण्याच्या अगतिकतेच्या विरूद्धचं मूर्तिभंजनाचा सोस लागलेलं हे दुसरं टोक. अशा वेळी, आपल्याला सापडलेला अर्थ/आनंद 'हा इथला मज पुरे फवारा'सारखा जपणं महत्त्वाचं, हे माझं वैयक्तिक, अ-अभ्यासू मत.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
'चांदोबा'बाबत
अर्थात जीएंच्या लेखनाला 'मोठ्या मुलांचा चांदोबा' म्हणणं
येथे कदाचित थोडा चुकीचा उल्लेख झाला असावा. नेमाड्यांचे जीएंच्या लेखनाबाबतचे मूळ वाक्य 'मोठ्या मुलांच्या चांदोबामधला लेखक' असे आहे. येथे मोठ्या मुलांचा चांदोबा म्हणजे मौज-सत्यकथा हा कंपू (किंवा नेमाड्यांच्या भाषेत अड्डा).
हे सांगायचे कारण म्हणजे नेमाड्यांनी जीएंबाबत कुठेही अनादराचे किंवा हिणकस असे लिहिल्याचे मी वाचले किंवा ऐकले नाही. नेमाड्यांच्या एकंदर नाराजीचे स्वरुप लक्षात घेता त्यांनी साहित्यिक चमकोगिरी करणारे लेखक, किंवा साहित्य संमेलनांमध्ये व्यासपीठावर खुर्च्या उबवणारे लेखक किंवा समीक्षकांबरोबर हातमिळवणी करुन स्वतःचे साहित्य वर आणणारे लेखक अशा लोकांना प्रामुख्याने लक्ष्य केले आहे हे स्पष्टपणे दिसते. जीएंनी अशा कोणत्याही प्रकाराचा अवलंब केलेला नाही हे सर्वज्ञात आहे.
किंबहुना नेमाड्यांना जीएंबाबत आदर असावा असे वाटण्याचे कारण म्हणजे कथा हा लेखनप्रकार अतिशय खालच्या दर्जाचा आहे असे मत मांडणाऱ्या नेमाड्यांनी तुती या कथेची स्तुती केली आहे.
मौज-सत्यकथा या कंपूबाबतच्या नाराजीबाबत नेमाड्यांच्या एका मुलाखतीतील खालील मासलेवाईक वाक्य पुरेसे उद्बोदक ठरावे.
प्रश्नः सत्यकथा हे उच्च अभिरुचीचे एकमेव नियतकालिक बंद पडल्याने मराठी साहित्यविश्वात पोकळी निर्माण झाली आहे असे आपल्याला वाटते का?
नेमाडेः हेच वाक्य मी उलट फिरवून असे म्हणेन की सत्यकथेमुळे मराठी साहित्यविश्वात जी पोकळी निर्माण झाली होती ती सत्यकथा बंद पडल्यामुळे भरुन निघाली.
सत्यकथा-भागवत-वा.लं.कुलकर्णी अनेकांबाबत नेमाड्यांनी बोचरे वाटावे असे लिखाण केलेच आहे. 'लेखकाचा लेखकराव कसा होतो?' या लेखामध्ये वा.ल. कुलकर्ण्यांचा अड्डा व त्यातील खानोलकर-कुलकर्णी-चित्रे यांचे पाठ खाजवाखाजवीचे सोयीस्कर संबंध याबाबत पुरेसे लेखन आहे.
एका संमेलनात वा.ल. कुलकर्णी अध्यक्ष असताना प्रमुख पाहुणे/वक्ते या नात्याने आलेल्या अत्रे यांनी नेहमीप्रमाणेच अश्लील विवस्त्र विनोदांना आरंभ केला. श्रोतेही वैतागून अत्रे आता पुरे करा वगैरे म्हणू लागले तरी वा.लं. गप्पच. शेवटी व्यासपीठावरील एक मान्यवराने वालं यांना 'तुम्ही अध्यक्ष आहात ही फालतूगिरी बंद करायला सांगा' असा आग्रह केला तरी वालं खुर्चीला चिकटूनच.
आचार्य अत्रे यांच्या अश्लील भाषणासंदर्भातला हा प्रसंग तर सद्यकालीन परिस्थितीतही जसाच्या तसा लागू व्हावा.
(हे वाक्य कोणावरही वैयक्तिक टीका नाही.)
सलील वाघ यांचे काहीच लेखन मी वाचलेले नाही. मात्र नेमाडे किंवा पुलंबाबत तिसऱ्या वाक्याला हुंदका असा शेरा मारणाऱ्या जीएंचे बरेचसे संपूर्ण लेखन वाचलेले आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियांबाबत मलातरी विचार करावासा वाटतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नेमाडे बोलेल हाये
नेमाड्यांनी जीएंबाबत कुठेही अनादराचे किंवा हिणकस असे लिहिल्याचे मी वाचले किंवा ऐकले नाही.
नेमाड्यानी जीएंना हिणकस नसन म्हणलं
पर जीएचे लेखन समजत नाय असे म्हणलेले हाये
पाहा माहा एक जुना प्रतिसाद
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
खानोलकरांबाबत
खानोलकरांबाबतचा पुलंचा परिच्छेद आवडला. नेमाड्यांचा परिच्छेद इथे देण्यासाठी जागा राखून ठेवत आहे. जेणे करुन दोन्ही परिच्छेदांचे विश्लेषण जाणकारांना करता येईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रतिसाद
मूळ लेख आणि काही प्रतिसाद विशेष आवडले.
अर्थात जीएंच्या लेखनाला 'मोठ्या मुलांचा चांदोबा' म्हणणं, पुलंच्या प्रत्येक तिसर्या वाक्याला हुंदका असतो असे शेरे मारणं किंवा विंदांना ज्ञानपीठ मिळाल्यामुळे मराठी समाज वीस वर्षं मागे गेला असे सलीलवाघी उद्गार काढणं आणि त्यांच्या प्रभावाखाली येणं सहज शक्य आहे. प्रवाहपतित असण्याच्या अगतिकतेच्या विरूद्धचं मूर्तिभंजनाचा सोस लागलेलं हे दुसरं टोक. अशा वेळी, आपल्याला सापडलेला अर्थ/आनंद 'हा इथला मज पुरे फवारा'सारखा जपणं महत्त्वाचं, हे माझं वैयक्तिक, अ-अभ्यासू मत.
नंदनशी सहमत आहे. कधीकदी एक वाचक म्हणून मी स्वतःची तुलना मोठ्याशा डिपार्टमेंटल स्टोअर मधे जाणार्या ग्राहकाशी करतो. लेखक-लेखकांमधे काय हेवेदावे असायचे ते असोत. आपण आपल्या वकूबाप्रमाणे एकेका विभागातले घेत असतो. मग त्यात पुलंना हिणवणारे जीए येतात; जीएं च्या लेखनप्रकाराला क्षुद्र म्हणणारे नेमाडे येतात, सर्वगोष्टीना गटारात ढकलणारे ढसाळ येतात. सर्व पूर्वसुरीनाच शिव्या घालणार्यांच्याही कविता आपण उत्सुकतेने वाचत असतोच. उत्तम लिखाण करणारे लोक ही शेवटी माणसेच. त्यांची उत्पादने , त्या उत्पादनांमधले आपल्या आवडी नि कुवतीला साजेलसे आपण घेतो. बाकी काय जत्रेतले तमाशे चालूच असतात. (कधीकधी एखाद्या लेखकाला "अरे तुझा साईड्शो जास्त होतोय. मुख्य काम सुद्धा दाखव की !" असे म्हणायचा मोहही होतो ; परंतु ते तेव्हढ्यापुरतेच :-)
लई ब्येस
शरदजी लई ब्येस
पुढच्या लेखात सुरेश भटांना आणा.
चन्द्रशेखर
छान
शरदराव,
छान चर्चा सुरू केलीय. इतरांची मते जाणण्यास उत्सुक आहे.
काव्यानुभव घेण्यासाठी विश्वातील प्रत्यक्षानुभव पाहिजेच!
हे अगदी खरंय. अनुभवाखेरीज काव्याचा रसास्वाद घेता येणे अवघडच आहे. कधी-कधी तर अश्या साहित्यकृतींचा आस्वाद घेत असताना आपल्या अनुभवांचे काही नवीन पदर उलगडून समोर येतात. अनुभवांतून कळणारे कवितेचे वेगवेगळे अर्थ आणि कवितेमुळे लक्षात आलेले अनुभवांतील वेगळेपण, असा तो दुहेरी आनंद असतो.
" अरे, वीस वर्षांपूर्वी शाळेत या कवितेचा अर्थ किती निराळा वाटत होता. " हे एकदाच काय, अनेकदा म्हणून झालंय :)
पण काही कविता एवढ्या सुंदर मांडलेल्या असतात की अनुभव नसला तरी आपला प्रभाव टाकून जातात.
इथे दिलेल्या कवितेच्या ओळीसुद्धा छानच!
सुरेख
सुरेख लेख. अर्थातच सहमत आहे.
कलाकाराला कलाकृती घडवताना आलेली अनूभूती आणि आस्वादकाला आस्वाद घेताना येणारा अनूभूती एकच असेल ही शक्यता फारच कमी. एकाच जातीची असली तरी त्यात बर्याच छटा असण्याचा संभव अधिक. पण ही उलट त्या कलाकृतीची श्रेष्टता आहे असे वाटते. एकच कलाकृती प्रत्येकाला त्याचे अनुभव, व्यासंग आणि संवेदनशीलता यांच्यानुसार वेगवेगळे अनुभव देण्याची शक्ती ठेवते यावरून त्या कलाकृतीची सखोलता दिसून येते. यासाठी लेखात म्हटल्याप्रमाणे अर्थातच रसिकता हवी. ऋग्वेदातील उषेचे काव्यमय वर्णन वाचताना त्याकाळची परिस्थिती लक्षात घेतली तर वाचन रोमांचकारी होते. निबीड अरण्यांमध्ये श्वापदे, विंचूकाटा इत्यादींपासून स्वतःचा बचाव करताना रात्री नक्कीच भवावह परिस्थिती असणार. अशा वेळेस आतुरतेने त्या ऋषींनी सूर्योदयाची वाट पाहिली तर त्यात नवल ते काय? आणि ऊषेची पहिली किरणे दृष्टीस पडताच त्यांची काव्यमयता बहरास येऊ लागते. मग कुणी उषेला आकाशाच्या रंगमंचावर येणारी नर्तकी म्हणतो तर कुणी तिला सूर्याची पत्नी म्हणतो. तीन-साडेतीन हजार वर्षे उलटून गेल्यानंतर, बटण दाबता क्षणी (लोड शेडींग नसेल तर) अंधार घालवण्याची सवय असूनही त्या अनामिक ऋषींच्या रसिकतेला दाद द्यावीशी वाटते.
रसिकतेपुढे भाषा, प्रांत, देश, धर्म अशी बंधने गळून पडावीत. न पडल्यास ती रसिकताच नव्हे. कुठल्याही नवीन कलाकृतीला सामोरे जाताना तुमचे मन खुले असेल तर रसिकतेकडे जाण्याचा मार्ग अधिक सोपा होतो.
----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"
चिंतन आवडले
निर्मिती कवीची (कुठल्याही कलाकाराची) असली, तरी रसिक स्वतःच्या संदर्भात आस्वाद घेतो. असा सौंदर्यानुभव होतो. हे सर्व पटते.
मस्तच
हा आता कसं बोल्लात.
खरय पन् तो मास्तर मार्क कापतो तेव्हा विद्यार्थ्याला फरक पडतो
मटक्याची 'लाईन' काढताना जुगारी सुद्धा आपल्याला हवा तस अर्थ काढतो.कारण जुगार हा शेवटी आपलाच असतो
अहो हरल्यावर् लाईन बदलावी लागतेच.
वीस वर्षापुर्वीचे आपन आन आत्ताचे आपन याच्यात बी फरक आहेच ना!
बेष्टच शरद रावांचे वाचुन आता आपन बी कवितेच रसग्रहन कर्नार्! चला घ्या कविता अनिलांची
केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी
अशि कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे
किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा
किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली
केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
प्रकाश घाटपांडे
लेख आवडला
ज्याने त्याने कवितेचा जमेल तसा आस्वाद घ्यावा आणि कवितेचा प्रत्येक वाचकाने काढलेला अर्थ (कवितेचा अर्थ न लावताही कविता आवडू शकेल म्हणून न काढलेला अर्थही) स्वतंत्र आणि त्या वाचकापुरताच योग्यही असतो.
बर्याच कवितांच्या बाबतीत बरेच वाचक एकसारखाच काव्यानुभव घेतात, असेही दिसून येते. त्यावेळी त्या कलाकृतीच्या पलिकडे जाऊन कलाकृती ज्या अनुभवविश्वातुन आलेली आहे त्याचा मागोवा घेण्याला काही आक्षेप नसावा. त्यासंदर्भात केलेले विवेचन कोणास योग्य तर कोणास अयोग्य वाटू शकेल पण ते करूच नये, हे मात्र दुराग्रह ठरावे.
उत्तम
उत्तम चर्चा ... लेखाच्या शेवटी आलेल्या कवितेचा "आपल्याला लागलेला" अर्थही उलगडल्यास, वाचण्यास उत्सुक आहे.
चांगला लेख...!
शरदराव लेख आवडला.
कवी आणि एक रसिक वाचक यांचा संबंध जोडते कविता.
शरदराव, आस्वादाच्या बाबतीत रसिकांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागते. कवी आणि रसिक यांच संबंध जोडल्या जाईलच असे वाटत नाही. रसिक ज्या सामाजिक परिस्थितीमधे वावरतो तो समाज,चालीरीती, वेगवेगळे सामाजिक,राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक संदर्भ महत्वाचेच असतात त्या शिवाय संबंध स्पष्ट होणार नाही.
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनी घाई.
हिरव्या माळावरील ढवळ्या गाई कळल्या नाही तर पुढील दोन ओळीचा अर्थ स्पष्ट होणार नाही असे वाटते. म्हणजे कवीची कविता अशाच वातावरणातील असावी की रसिकाला समजली पाहिजे, तरच तो त्या कवितेचा आस्वाद व्यवस्थितपणे घेऊ शकेल. रसिकतेच्या आस्वादाच्या बाबतीत त्याची त्या संस्कृतीशी नाळ जोडलेली असली पाहिजे. आस्वादकाला कवीने कोणता भाव व्यक्त केला आहे. तो अनुभव घेता आला पाहिजे असे मला वाटते. आस्वाद ही साहित्यनिर्मितीची पुन्हा प्रत्यय आणून देणारी प्रकिया आहे. तेव्हा आस्वादकही त्या उंचीचा पाहिजे असेही वाटते. वाचकाच्या ठिकाणी आस्वादाच्या प्रतिभेबरोबर जिज्ञासा असली पाहिजे.
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले
पाऊस आला नाही म्हणून आसवांवर पीक काढले असा एक अर्थ कोणी काढला तर त्या आस्वादकाची रसिकता तपासू नये. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे विकासाचे स्वप्न पाहिले तो विकास आमचा झालाच नाही, असे समजण्यासाठी आस्वादक प्रतिभावंत असला पाहिजे असे वाटते. तरच त्याला कवितेचा अर्थ सापडतो असे वाटते. आस्वादाकाकडे संवेदनशीलता असली पाहिजे नुसता वरवरचा अर्थ समजून उपयोगाचे नसते. भावनांचे सामान्यीकरण असा एक शब्द वापरल्या जातो. अनेकांना एखादी कविता आपली वाटते. कविच्या कवितेतील अर्थ वेगळा असूनही वेगवेगळा अर्थांची आनंद देणारी ती कविता सर्वांची असते.
एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही भेट
अनेकांगांनी विकसित होणारी कवितेचे सौंदर्य अनुभवण्याची क्षमता निकोप रसिकतेच्या ठिकाणी असावी लागते. शब्द, सूर, लय, आणि आशयसंपन्नता घेऊन येणारी कविता रसिकाला आनंद देते. कवी आणि रसिकाचा संबंध जोडते.