द्यूत्क्रीडा

द्यूतक्रीडा

हा प्राचीन खेळ प्राधन्याने जुगार म्हणूनच खेळला जाई. फासे बेहड्याचे, मातीचे, दगडाचे वा हस्तिदंताचे केले जात. द्यूत खेळण्यासाठी स्वतंत्र जागा असे व तीला द्यूतसभा म्हणत. तेथे येणार्‍यांकडून राजा कर वसूल करे. चोर-दरोडेकर यांना हे व्यसन जास्त असल्याने अशा लोकांचा पत्ता तेथे लागे असा चाणक्याने उल्लेख केला आहे.ऋग्वेद कालापासून खेळल्या जाणार्‍या द्यूताचे बहारदार वर्णन खुद्द ऋग्वेदात आहे.(ऋ.१०,३४.१,५,९). काही ऋचा अशा :

वार्‍याच्या सोसाट्यात पोसलेल्या(झाडाच्या)लाकडापासून बनलेले,पटावर घरंगळत थै थै नाचणारे फासे मला बेभान करत आहेत.हा स्वत: जागरूक राहणारा फासा मला मात्र मौजवत पर्वतावरील सोमवल्लीच्या मधुर पेयाने गुंग झाल्याप्रमाणे गुंग करून सोडीत आहे. जेंव्हा मी असा निर्धार करतो, की इत:पर या फाशांनी खेळणार नाही, तेंव्हा संगत तुटलेले माझे सोबती आणि फासे माझा धिक्कार तर करतातच; परंतु एकदा का ते पिंगट रंगाचे फासे पटावर फेकले जाऊन त्यांचा खुळखुळाट सुरू झाला, म्हणजे एखादी बदकर्मी स्त्री अनिवारओढीने संकेतस्थळी जावी त्याप्रमाणे मीही जुगारीच्या अड्ड्याकडे धावतो. हे फासे पडतात खाली, पण फुरफुरतात सर्वांच्या वर, यांना हात नाहीत, तरी हात असलेल्या पुरुषांना हे दीन करतात. हे पटावर टाकले की जणू दिव्यलोकीचे निखारेच असतात,कारण हे हाताला जरी थंड लागतात, तरी काळीजच करपवून टाकत असतात.
हे कवच ऐलूष ऋषी शेवटी मात्र हा नाद सोडा व साधेपणाने शेती करा असा उपदेश करतात! सौ चुवे खाके..

या व्ससनामुळे बरबाद झालेल्या नलाची व युधिष्टराची कथा सगळ्यांनाच माहीत आहे. द्वारकेतही हे व्यसन फोफावलेले होते.परंपरेने शिव हा द्यूताचा प्रवर्तक समजला जातो व शिव पार्वती याच्या सारिपाट खेळाची चित्रे, कथा, शिल्पे सर्वत्र दिसतात.( इथेही बिचारा नवरा दर वेळी बायकोसमोर हरतो व अंगाला राख फासून परांगदा होतो, नशीब एखाद्याचे!) समाजाची द्यूतासक्ती ध्यानात घेऊन धर्मशास्त्रकारांनी कोजागरी पौर्णिमा व बलिप्रतिपदा या दोन दिवशी द्यूत खेळण्याचे विधान सांगितले आहे.
( हा लेख महाभारतावर रोष असलेल्या श्री. बाबुरावांना समर्पण)
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

द्युतोत्सव

हे वाचताना आम्हाला प्रियालीच्या लासवेगास वर्णनाची आठवण झाली. तेथील कॅसीनो नामक द्युत जुगारी बेधुंद होउन खेळतात. काळ कितीही गेला तरी ऋग्वेदातील ऋचा मात्र जणु त्रिकालाबाधित.

हे कवच ऐलूष ऋषी शेवटी मात्र हा नाद सोडा व साधेपणाने शेती करा असा उपदेश करतात! सौ चुवे खाके..

हे मात्र भारीच!
प्रकाश घाटपांडे

आठवण

वेगळी माहिती आवडली.

आधुनिक काळातील एक द्युतक्षेत्र अटलांटिक सिटी द्युतपंढरी लास वेगासची वारी आठवली

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

अरे वा सुंदर दुवा

वा वा कॅसिनोची "भारलेली" स्थळ पाहुन अंमळ विस्फारलो. ऋषिकेशा सुंदर हा दुवा पहाण्यात नव्हता.
(विस्फारलेला)
प्रकाश घाटपांडे

दुर्योधन हरला तर

धृतराष्ट्राने युधिष्ठिराला पणाला लावलेल्या बायका भावांबद्दल माफी दिल्यावर पुन्हा एकदा द्यूत खेळले गेले आणि दुर्योधनाने जो हरेल त्याला वनवास आणि अज्ञातवासाची अट घातली. मला वाटते हा शेवटचा खेळ दुर्योधन न खेळता शकुनी खेळला (चू. भू. दे. घे. तपासून पुन्हा लिहिन) शकुनी वनात गेला असता तर काय बिघडणार होते? युधिष्ठिरासारख्या अट्टल जुगार्‍याला प्रतिस्पर्ध्याने काय आणि कोणाला पणाला लावले हे तपासून पाहण्याची सुद्धा उसंत नव्हती की काय?

अवांतरः जगातले अट्टल जुगारी कोठे ना कोठे, कधी ना कधी खोटे बोलण्याची प्रबळ शक्यता वाटते. युधिष्ठिर अट्टल जुगारी नव्हता की सत्यवचनी नव्हता?

पटले नाही

परंतु एकदा का ते पिंगट रंगाचे फासे पटावर फेकले जाऊन त्यांचा खुळखुळाट सुरू झाला, म्हणजे एखादी बदकर्मी स्त्री अनिवारओढीने संकेतस्थळी जावी त्याप्रमाणे...

तेव्हा संकेतस्थळे होती?

आणि अनिवार ओढीने संकेतस्थळावर (कोणत्याही प्रकारच्या!) जाणारी स्त्री (किंवा फॉर दॅट मॅटर पुरुषसुद्धा - 'व्यक्ती' म्हणू.) ही 'बदकर्मी'? ते कसे काय बुवा?

(अवांतर: लेखाचे शीर्षक हे 'द्यूत्क्रीडा'ऐवजी 'द्यूतक्रीडा' असे नको काय?)

नीट वाचा मग पटेल

पर्स्पेक्टिव काका,

तेव्हा संकेतस्थळे होती?

नसायला काय झालं?

एखादी बदकर्मी स्त्री अनिवारओढीने संकेतस्थळी जावी त्याप्रमाणे
अनिवार ओढीने संकेतस्थळावर (कोणत्याही प्रकारच्या!) जाणारी स्त्री (किंवा फॉर दॅट मॅटर पुरुषसुद्धा - 'व्यक्ती' म्हणू.) ही 'बदकर्मी'?

स्त्रीला आधीच बदकर्मी ठरवलेले आहे हो. संकेतस्थळावर गेल्याने बदकर्मी झाली असा जावईशोध कसा लावलात?

उगीच खाजवून खरूज काढायची असते का संकेतस्थळावर जाणार्‍या बायका बदकर्मी असतात असे दाखवून द्यायचे असते ते आम्हालाही कळले नाही बुवा.

-राजीव.

संकेतस्थळ

त्याकाळी ही संकेतस्थळे होतीच. नदी/समुद्र/तलाव किनारे,मंदिरे, वनस्थळे ही ती संकेतस्थळे.
रामदास कामतांनी गायलेले पद
नको विसरू संकेत मीलनाचा
तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा|
दिवस मावळता धाव किनाऱ्याशी
तुझे चिंतन मी करिन ते मनाशी ||

यात किनारा हे संकेत स्थळ आहे. आंतरजालावरील स्थळांनाही संकेतस्थळ म्हणतातच की. जेथे आपले "इप्सीत" साध्य होईल याचा "संकेत" मिळालेले कोठलेही स्थळ हे संकेतस्थळ.
प्रकाश घाटपांडे

संकेतस्थळ

बहुधा शरदरावांना संकेतस्थळ म्हणजे भेटण्याची जागा (राँदेवू) असा अर्थ अपेक्षित असावा. म्हणजे ती स्त्री ते बदकर्म करण्यास जिथे जाते ते ठिकाण. (हिंदी चित्रपट असल्यास काली घाटी के पीछे, इ.) अर्थात ती बदकर्म करायला जात आहे हे ठरवण्यासाठी तिने कोणते निकष पूर्ण करायला हवेत हे सापेक्ष असावे.

नवीन मराठी शब्द प्रसवणार्‍यांना संकेतस्थळ हा शब्द प्रसवताना बहुधा असा गोंधळ होऊ शकेल याची कल्पना नसावी. याऐवजी आपण सर्व येतो त्या जागांसाठी सायटी हा शद्ब बरा वाटतो. (आणि तिथे आल्यावर बदकर्मी ठरवता येण्याचे कारण नसावे. अगदी सीआयएची साइट ह्याक वगैरे केली तर गोष्ट वेगळी. तेही बदकर्म ठरवता यावे किंवा नाही याबद्दल वाद आहेत. पहा. हॅकर आणि क्रॅकर.)
आंतरजालीय ग्यांगवॉर बदकर्मांमध्ये मोडते का?

----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

पिंगट

पिंगट म्हणजे कोणता हो रंग? तानापिहिनिपाजा यात तो नाही.
चन्द्रशेखर

पिंगट-तांबट

पिंगट, तांबट या सर्व मूळ लाल रंगाच्या फिक्या छटा आहेत. (त्यानंतर बर्गंडी, ब्राऊन वगैरेंच्या फिक्या छटाही टाकता येतील.)

पिंगट ही छटा केसांच्या आणि डोळ्याच्या रंगाच्या वर्णनासाठी वापरली जाते.

आक्षेप आहे का?

पिंगट म्हणजे कोणता हो रंग? तानापिहिनिपाजा यात तो नाही

आपला आक्षेप समजला नाहि. (का हा खरंच पडलेला प्रश्न होता?)
अश्या कितीतरी रंगांची नावे प्रचलित आहेत जी तानापिहिनिपाजा मधे येत नाहित.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

आक्षेप

माझा आक्षेप काहीच नाही. पिंगट म्हणजे कोणचा रंग एवढेच मला हवे होते ते प्रियाली ताईंनी सांगितले. पूर्वीच्या काळच्या कादंबर्‍यांत ' तिच्या केसांच्या पिंगट बटा वायुलहरीँबरोबर खेळत होत्या' अशा पद्धतीची वाक्ये असत. आता केस तांबट होते असे म्हणून लेखकाला काय बरे सुचवायचे असावे. एक शक्यता अशी की नायिकेचे केस पांढरे झाल्याने ती केसांना मेंदी लावत होती हे सांगायचे असेल.
चन्द्रशेखर

मृच्छकटिकातील् संदर्भ्

खूप वर्षांनी द्यूतकाराशी संबंधित सूक्ताचा संदर्भ वाचला.
मृच्छकटिकातही द्यूतक्रीडेचा संदर्भ आला आहे. किंबहुना द्यूतात हरून पैसे बुडविल्याने
त्या व्यक्तीच्या(संवाहकाच्या) मागे दोन व्यक्ती लागतात असा उल्लेख येतो.

आणखी

सध्या वैदिक संस्कृतीचे पैलू हे डॉ. चिं. ग. काशीकर यांचे पुस्तक वाचतो आहे. अत्यंत रोचक आहे. यात या सूक्ताचे विवेचन केले आहे. त्यात डॉ. काशीकर म्हणतात,

"ऋग्वेदात द्यूताचे उल्लेख आणखीही कांही आढळतात. अथर्ववेदात याविषयी चार सूक्ते आहेत. अथर्ववेद हा जनसामान्यांचा वेद. द्यूत ही करमणूक सगळ्यांचीच असल्यामुळे अथर्ववेदात त्याला स्थान लाभले हे योग्यच आहे. द्यूतात जय मिळावा म्हणून त्यात देवतेची प्रार्थना केली आहे. द्यूत कसे खेळत असत याची अस्पष्ट कल्पना वेदावरून येते. द्यूतात चार किंवा पाच फांसे असत. हे फांसे म्हणजे विभितक वृक्षाची - बेहेड्याची फळे असत. ऋग्वेदाच्या सूत्रात 'त्रिपंचाशः' असा शब्द आला आहे. त्याचा अर्थ त्रेपन्न असा कोणी करतात, तर कोणी पंधरा करतात."
----
"ज्यूलिया रॉबर्ट्स की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

अथर्ववेद

अथर्ववेदात बायको पळून गेली तर तिला परत आणण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा तोही दिलेला आहे.

चन्द्रशेखर

काहीहीहीहीही

अथर्ववेदात बायको पळून गेली तर तिला परत आणण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा तोही दिलेला आहे.

हा श्लोक कोण महाभाग म्हणत होते हो?

बायको पळून जावी यासाठी श्लोक असतील तर सांगा बुवा!

-राजीव.

बायको पळून गेली

अहो जंगलात रहाणार्‍या ऋषिमुनींची बायको पळून गेली तर मेजर क्रायसिस् असणार त्या काळी. सरपण कोण जमा करणार. स्वैपाक कोण करणार.आतासारख्या खानावळी नव्हत्या तेंव्हा. म्हणून त्यावर उपाय असावा म्हणून हा मंत्र असावा.
चन्द्रशेखर

 
^ वर