महाभारत-५ असेल हरी तर

असेल हरी तर देईल खाटल्यावरी

हिंदुस्थानातील लोक दैववादी आहेत व त्यामुळेच परकीय हल्लेखोरांपासून ते आपले रक्षण करू शकले नाहीत, व त्यांनी व्यापार, उद्योगधंदे व संशोधनाकडे दुर्लक्ष केले. दैववाद हाच त्यांच्या अधोगतीस कारण आहे हे सर्वजण मान्य करतील.पण हा दैववाद मध्ययुगीन काळातील, पुराणांनंतरचा आहे. महाभारत कालात उद्योग हाच श्रेष्ठ मानला जाई. (अनुशासन पर्व,अ.६ मध्ये) युधिष्ठिर भीष्मांना विचारतो " दैव व उद्योग यात अधिक श्रेष्ठ कोण ?" भीष्म सांगतात "पुरातन इतिहासात असा दाखला देतात कीं हाच प्रश्न वसिष्ठांनी ब्रह्मदेवाला विचारला व त्यावर ब्रह्मदेवाने उत्तर दिले ते असे":
"बीवांचून कांहीएक जन्मास येत नाही व बीजावांचून फलही प्राप्त होत नाही.शेतकरी शेतांत ज्या प्रकारचे बीज टाकेल त्या प्रकारचे त्यास फल मिळते.चांगले बीं पेरले तर चांगले फळ मिळते आणि वाईट पेरले तर वाईट फळ येते. क्षेत्र तयार न करितां त्यांत बीज टाकल्याने ते वाया जाते तसेच उद्योग न करता केवळ दैवावर अवलंबून राहिले तर ते दैव वायां जाते.दैव व उद्योग यांचा विचार करीत असतां बीज व क्षेत्र यांचा दृष्टांत उत्तम लागू पडतो. दैव व उद्योग यांची सांगड घातल्यावाचून पुरुषार्थप्राप्ति व्हावयाची नाही. जर आपणास काही फळ पाहिजे असेल तर उद्योग केलाच पाहिजे.स्वर्ग, भोग किंवा इतर मनोरथ प्राप्त होण्यास उद्योग हाच प्रधान उपाय आहे. नक्षत्रे, देव, नाग, यक्ष, सूर्य,चंद्र, मारूत हे सर्व उद्योगाच्या उपायानेच मनुष्यकोटीतून देव कोटीस गेले.संपत्ति,मित्रवर्ग,कुलानुरूप वैभव व मोठेपणा या सर्वांचा उपभोग घेण्याससुद्धा उद्योग अवश्य केला पाहिजे.जो पुरुष उद्योग न करता दैवावर विसंबून रहातो त्याचे श्रम क्लींबाच्या स्त्रीयेप्रमाणे व्यर्थ होतात. दैव अगदीच पंगू आहे असे समजू नकोस पण प्राधान्य हे कर्मालाच दिले पाहिजे. नित्य उद्योग करणारा महात्मा पुरुष पातालात ठेवलेला व देवांनी राखलेला निधि सुद्धा हस्तगत करून घेतल्याशिवाय रहाणार नाही." या नंतर उद्योगामुळे श्रेष्ठत्व मिळवलेल्या अनेकांची उदाहरणे दिली आहेत.
रामायणात लक्ष्मण ह्ताश झालेल्या रामाला व वनपर्वात द्रौपदी धर्माला असाच सल्ला देतात.
मग ह्या उद्योगाचे महत्व कमी होऊन दैववाद प्रबळ केंव्हा झाला? बौद्ध-जैन धर्माच्या स्थापने पासून तो वाढू लागला व तिसर्‍या चवथ्या शतकापासून कली महिम्याचे स्तोम पुराणांनी वाढवल्यावर उद्योग पार मागे पडला.मला वाटते याचा संबंध फ़िरत्या टोळ्या व स्थीरावलेला कृषीसमाज यांच्यांशी जोडता येईल.घोड्यावर बसून आज इथे तर उद्या तिथे असे सर्वच अनिश्चित असणारा योद्धा दैवावर अवलंबून राहूच शकत नाही. त्याला कर्माचीच कास धरावी लागते. पण या उलट शेतीवर जगणारा, ज्याला कमीजास्त काम केले तरी, काही तरी पदरात पडेलच याची खात्री असते तोच दैववादी बनतो. ज्याला भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणतात त्या काळातच ही अवदसा धार्मिक उच्च वर्णीयांच्या करंटेपणाने भारतात फोफावली. कलीयुगात क्षत्रीय उरले नाहीत, समुद्रगमन हे महापाप, नुसते नामस्मरण केले की झाले, बाकी सर्व देवावर सोडा असला भंपकपणा सुरू
झाल्यावर अवकळा प्राप्त होणार नाही तर काय होणार ? " य़त्न तो देव जाणावा" असे ठामपणे सांगणारा संत जन्मास यावयास सतरावे शतक उजाडावे लागले. आणि आजही "प्रयत्न कर (मी तुझ्या पाठीशी आहे)" असे कां सांगितले जात नाही ?
शरद

Comments

रोचक चिंतन

लेख विचारप्रवर्तक आहे.

महाभारतातला प्रसंग चांगला दिला आहे. त्याच्या आजूबाजूचे विचार चिंतनीय आहेत.

महाभारत काळात जे शेतकरी होते - ते दैववादी असतील का? उत्तरकाळात जे राजेराजवाडे होते, सैनिक होते, ते कर्म करणारे असतील का?

मला वाटते की "काही परिस्थितीतले लोक दैववादी असतात, तर काही परिस्थितींमधले लोक कार्यवादी असतात" हे म्हणणे पटण्यासारखे आहे. कुठल्याही काळातल्या राजांच्या, सरदारांच्या वीरकथा वाचल्या तर बहुधा "आपल्या हिकमतीवर नशीब बदल" वगैरे उल्लेख सापडायची शक्यता खूप आहे. (जिजाबाईंनी आपल्या मुलाला काय उपदेश केला? - असाच काही केला, असे पोवाड्या-बखरींत दिसेल असा माझा कयास आहे. पण माझे वाचन तोकडे आहे, त्यामुळे उद्धरणे देऊ शकत नाही.)

आजकालसुद्धा एखादा उमेदवार निवडणुकीत यश मिळावे म्हणून कुण्या बुवाचे पाय धरेल, हे खरे. पण आपली जाहिरात करणे, विरोधकाची सभा गुंडांकरवी उद्ध्वस्त करणे, वगैरे डावपेच टाकण्यात हयगय करणार नाही, असे वाटते. हा तो भीष्माने सांगितलेलाच तोल झाला - "दैव अगदीच पंगू आहे असे समजू नकोस पण प्राधान्य हे कर्मालाच दिले पाहिजे."

त्यामुळे लढाऊ राज्यकर्त्यांच्या संवादांतून प्रमाणे घेऊन त्या काळातल्या इतरेजनांत दैववाद किती प्रचलित होता, हे सांगणे बहुधा कठिण जाईल.

तरी महाभारतात आणि रामायणात काही बाबतीत राज्यकर्त्यांमध्येही दैववादाबद्दल फरक होता, असे दिसते. दशरथाला मुले होत नव्हती, आणि पंडुला मुले होत नव्हती. पण दोघांनी खूपच वेगळे उपाय केलेत.

अवांतर शंका: हा दैववाद की कर्मवाद?

- 'Alea jacta est' (मराठीत: 'फासा टाकलेला आहे.') हा कर्मवादाचा प्रकार म्हणायचा की दैववादाचा? (डिस्क्लेमर: यातील ऐतिहासिक प्रसंगाच्या तपशिलांबद्दल मला फारशी माहिती नाही. मात्र वाक्प्रचाराचा भावार्थ व्यवस्थित माहीत आहे. ऐतिहासिक तपशिलांकरिता गरजूंनी दिलेला दुवा तपासावा किंवा स्वतः अधिक संशोधन करावे.)
- महाभारतातले द्यूत हा कर्मवादाचा प्रकार म्हणायचा की दैववादाचा?
- लॉटरीचे तिकीट काढणे हे कर्मवादात मोडावे की दैववादात?
- 'Russian Roulette' हा प्रकार कर्मवादात मोडावा की दैववादात?

माझ्या विचारपद्धतीप्रमाणे, पहिल्या दोन प्रश्नांचे उत्तर निश्चितपणे 'कर्मवाद' असे असावे असे मला तरी वाटते, आणि का वाटते याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. तिसर्‍या प्रश्नाच्या बाबतीत सकृद्दर्शनी 'दैववाद' असे चटकन म्हणण्याचा मोह अनावर होतो, परंतु 'कर्मवाद' म्हटल्यास त्याचेही देता येण्याजोगे स्पष्टीकरण ('कर्म' याची व्याख्या निश्चित केल्यावर) मला सुचते, त्यामुळे नक्की काहीच कळत नाही. चौथ्या उदाहरणाच्या बाबतीत अगोदर काहीच कळत नाही, परंतु 'कर्मा'च्या व्याख्येबरोबर 'फला'ची व्याख्या हाही प्रकार आणून या दोन्ही व्याख्या निश्चित केल्यास हा 'कर्मवादा'चा प्रकार असावा अशी शंका येऊ लागते.

थोडक्यात, या चार उदाहरणांपैकी दोन उदाहरणे 'कर्मवादा'ची असावीत, एक उदाहरण हे बहुधा 'दैववादा'चे असावे परंतु 'कर्मवादा'चेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नक्की कळत नाही, तर एक उदाहरण नक्की काय आहे ते कळत नाही परंतु 'कर्मवादा'चे असावे अशी पुसटशी शंका येते.

अर्थात ही झाली माझी विचाराची पद्धत. इतरांची विचाराची पद्धत वेगळी असू शकेल, आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे येऊ शकतील. पैकी काहींची सर्वच उत्तरे एकाच प्रकारची असू शकतील, तर काहींची प्रत्येक उदाहरणासाठी भिन्न प्रकारची असू शकतील. कदाचित वेगवेगळ्या लोकांकडून उत्तरे मिळाल्यास हे पडताळून पाहता येईल, आणि कदाचित अशा उत्तरांची आणि त्या उत्तरांप्रति येण्यामागील विचारपद्धतीची तुलना करून काटछेदाने किंवा समन्वयाने चारही प्रश्नांच्या उत्तरांबद्दल काही अंतिम निर्णयही करता येईल.

मात्र प्रस्तुत मुद्दा किंवा या विचेचनाचा उद्देश तो नाही.

या चारही उदाहरणांकडे नीट निरखून पाहिले, तर या सर्व उदाहरणांत एक कमालीचे साम्य आहे हे लक्षात यावे. ते साम्य म्हणजे, हे चारही शुद्ध जुगाराचे प्रकार आहेत.

मग प्रश्न असा येतो, की जुगार हा 'कर्मवादा'त मोडावा की 'दैववादा'त? किंवा अधिक अचूकपणे बोलायचे झाले तर, जुगार हा 'कर्मवादा'त कधी मोडावा आणि 'दैववादा'त कधी मोडावा, आणि का?

रोचक

रोचक लेख. याचाच एक परीणाम म्हणजे भारतातील राज्यकर्त्यांनी शेजारील देशांवर फारसे आक्रमण केले नाही. आपली सर्व शक्ती परकीय आक्रमणे परतवण्यातच गेली. आणि असे असल्यामुळे तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्येही प्रगती खुंटली. आयुर्वेद ज्या काळात लिहीला गेला त्या काळातील नैसर्गिक उत्सुकता (क्युरीऑसीटी ह शब्द तितका चपखल वाटत नाही) नंतरच्या काळात लुप्त झाली. महाभारतातील उतारा रोचक आहे कारण यात सरळ कर्मवादाचा पुरस्कार केला आहे. दैववादाकडे गाडी कधी वळली यासाठी नंतरचे साहित्य पहावे लागेल.

----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

द्युत

श्री. पर्स्पेक्टिव यांनी "जुगार हा दैववाद मानावा कीं कर्मवाद" असा प्रश्न विचारला आहे.माझ्या
मते जुगार हा दैववादी "खेळ" आहे. महाभारतातील वाद (विचार) हा खेळाचा नसून जीवन शैलीचा, विचारसरणीचा आहे.दैवावर विश्वास ठेवणारा जगतांना सर्वच गोष्टी दैवाधीन आहेत असे समजतो.उद्योगशील मनुष्य सर्व गोष्टी कर्माने मिळू शकतील असे मानतो. तर जुगार खेळणारा फांसे टाकताना,घोड्यावर पैसे लावताना नशिबावर श्रद्धा बाळगून असतो,. आयुष्यात उद्योगशील असणाराही विरंगुळा म्हणून जुगार खेळताना दिसेल.
खरे तर माझे असे प्रामाणिक मत आहे की.अंनिसच्या कार्यकर्त्‍यांनी नागपंचमी, वटपौर्णिमा असल्या निरुपद्रवी वर्षातून एकदा येणार्‍या सणांच्या मागे लागावयच्या ऐवजी लॉटरीकेंद्र,रेसकोर्स अशा अंधश्रद्धेच्या ठिकाणीच आपली शक्ती खर्ची पाडावी. या फुस(फुकट सल्ला) नंतर विषय निघालाच आहे म्हणून द्युतावर मनोरंजक माहिती द्यावी म्हणतो. इथे ती अतिअवांतर होईल (व महाभारतावरचे लेख वाचतो कोण म्हणा) म्हणून निराळीच देत आहे.
शरद

अजूनही साशंक

माझ्या मते जुगार हा दैववादी "खेळ" आहे. महाभारतातील वाद (विचार) हा खेळाचा नसून जीवन शैलीचा, विचारसरणीचा आहे.दैवावर विश्वास ठेवणारा जगतांना सर्वच गोष्टी दैवाधीन आहेत असे समजतो.उद्योगशील मनुष्य सर्व गोष्टी कर्माने मिळू शकतील असे मानतो. तर जुगार खेळणारा फांसे टाकताना,घोड्यावर पैसे लावताना नशिबावर श्रद्धा बाळगून असतो,.

कदाचित दैववाद आणि कर्मवाद यांच्यातील सूक्ष्म फरक समजावून सांगणारी लॉटरीच्या संदर्भातील एक कथा या संदर्भात आठवते.

एक परमेश्वरभक्त असतो. अर्थातच व्याख्येप्रमाणे परमेश्वरावर त्याची नितांत श्रद्धा असते. परमेश्वरावर आपली भक्ती असल्याने आपण मागायचाच अवकाश, परमेश्वर आपल्यासाठी काय वाटेल ते करेल अशी त्याला खात्री असते.

त्याची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच असते. त्यामुळे कधीतरी आपल्याला लॉटरी लागून आपण खूप श्रीमंत व्हावे असे त्याला वाटत असते. म्हणून "परमेश्वरा, मला कधी ना कधी लॉटरी लागून माझे नशीब उजळू दे!" अशी तो परमेश्वराकडे आयुष्यभर सारखी प्रार्थना करत असतो. परमेश्वरावर आपल्या असीम भक्तीमुळे आपण मागायचाच अवकाश, आपल्याला लॉटरी लागेल अशा दृष्टीने परमेश्वर काहीतरी करेलच, असा त्याला विश्वास असतो.

पण असे काहीही होत नाही, आणि शेवटी तो दारिद्र्यातच मरतो. आणि मेल्यावर, तसा पुण्यवान असल्यामुळे आणि त्यात परमेश्वरभक्त असल्यामुळे, थेट स्वर्गात, परमेश्वराच्या दारी पोहोचतो.

परमेश्वराची भेट होते तसा परमेश्वराला खूप शिव्या देतो. "मी तुझी एवढी भक्ती केली, आणि त्याचे हेच फळ काय? आयुष्यात मला एकदा कधीतरी लॉटरी लागो एवढी माझी साधी इच्छा पुरी करणे तुला अवघड होते काय? माझ्या आयुष्याचे भले झाले असते, आणि मला आयुष्यभर कष्ट भोगावे लागले नसते. पण तुला काय त्याचे? उगाच तुझी भक्ती केली. तू मला फसवलेस, विश्वासघात केलास."

परमेश्वर त्याला शांतपणे म्हणतो, "मूर्खा, येथे बसून मला आज शिव्या घालतो आहेस खरा, पण जिवंत असताना आयुष्यात एकदा कधीतरी किमान लॉटरीचे एखादे तिकीट विकत घेण्याचे कष्ट घेतले असतेस, तर काही बिघडले असते काय रे?"

जुगार

आयुष्यातील निर्णय घेताना, पराधीन गोष्टींमुळे आयुष्य हा एक जुगारच ठरतो. द्युतात फासे आपल्या हातात असले तरी काय दान पडेल ही गोष्ट अज्ञातावर च असते. कुणी त्याला दैवगतीचे फासे म्हणेल.
ज्योतिषशास्त्र टिकुन आहे ते या जुगारामुळेच.
प्रकाश घाटपांडे

वाचतात की

महाभारतावरचे लेख वाचतो कोण म्हणा

वाचतात की पण त्यात कोणते ना कोणते "वाद" येऊ लागले की वैताग येतो. ;-) ह. घ्या.

लेखांना ऐतिहासिक किंवा पौराणिक पार्श्वभूमी असते तोपर्यंतच मला लेख आवडतात. ते आध्यात्माकडे वगैरे झुकू लागले की यापेक्षा बरी कामे आठवतात. असते एकेकाची आवड.

आध्यात्म ?

अजूनपर्यंत तरी आध्यात्म आलेच नाही हो, प्रियालीताई. तुम्ही बिनधास्त वाचत जा. तसा
काही भाग आलाच तर तुम्हाला आधी तांबडे निशाण दाखवीन.
शरद

तांबडे निशाण: एक पर्स्पेक्टिव (अवांतर)

तसा काही भाग आलाच तर तुम्हाला आधी तांबडे निशाण दाखवीन.

यावरून आठवले. तांबड्या निशाणाचा अर्थही अनेकदा पाहणार्‍याच्या 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून असतो, असे वाटते.

काही तांबड्या निशाणात येऊ घातलेल्या धोक्याचा इशारा पाहतात. काही धोक्याची पूर्वसूचना म्हणून ते इतरांस दाखवतात. तर तांबडे निशाण पाहून काहींची शिंगे स्फुरण पावतात.

आमचा गट ढोबळमानाने तिसरा. कोणत्याही 'वादा'चा विषय निघाला, की आम्हाला तांबडे (निशाण) दिसते. मग त्वेषाने (आणि शिंगांनिशी) आम्ही त्यावर तुटून पडतो. 'पर्स्पेक्टिव'चा दोष, दुसरे काय?

अतिअवांतर: वृषभ रंगांध असतो, असा वैज्ञानिक जगतात एक समज आहे. त्यात बहुधा तथ्य नसावे, असे स्वानुभूतीवरून वाटते. चूभूद्याघ्या.

एक अवांतरतम (की अवांतम?) गंमत: 'रंगांध' अशा अर्थीच्या इंग्रजीतील 'color-blind' या शब्दाचा मानवी वर्णाच्या (म्हणजे कातडीच्या रंगाच्या) संदर्भातील अर्थ 'वर्णनिरपेक्ष' असा होतो. मराठीतील 'जात्यंध' किंवा 'धर्मांध' या शब्दांचा अर्थ याच्या बरोबर उलट प्रकारे होतो, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

आध्यात्म?

अध्यात्म आणि आध्यात्मिक. आध्यात्म(x), आध्यात्म्य(x)--वाचक्नवी

अध्यात्मच

मी घाईत शिफ्ट की दाबल्याने आध्यात्म झाले पण चूक मान्य. :-)

दैववाद येतो कसा ?

दैवाचा विषय कसा चर्चत येतो कोणास ठाऊक. असो, दैववाद हाच त्यांच्या अधोगतीस कारण आहे हे सर्वजण मान्य करतील.

दैववादामुळे अधोगती होते याला काहीएक आधार नसल्यामुळे आपला हा मुद्दा आम्हाला काही मान्य नाही. पाषाणयुग संपत आले आणि नव्या अश्मयुगाची सुरुवात झाली.या काळात लोक स्थिर झाले, म्हणजे घरे बांधून राहू लागली. शेती करु लागले. प्राण्यांचे अन्न भाजून खाऊ लागले इत्यादी-इत्यादी. आणि याच काळात धार्मिक भावनांचा विकास झाला.(असावा) वादळ, वीज, पाऊस, मृतात्मे, याबद्दल भीती आणि पूजा सुरु झाली. (असावी) म्हणजे वरील गोष्टींचा अर्थ कळत नव्हता. आणि दैवते आकाराला आली. (असावी) सुर्य,पाणी,जमीन, वगैरे इत्यादी. आणि दैववादाला सुरुवात झाली. पुढे कधी-कधी खूप धार्मिक भावना खूप वाढीस लागली असावी, तर कधी-कधी कर्मवादाला महत्व दिले गेले असावे, म्हणजे असा चढ-उतार असा समाजात सतत होता.त्यामुळे दैववादाचा करंटेपणा भारतात कोणामुळे फोफावला त्याची काय माहिती आपल्याला नाही. फक्त सांगायचे इतकेच होते की दैव आणि कर्म ही फार जूनी गोष्ट आहे.
प्रत्येक काळाच्या कसोटीवर प्रगती-अधोगती होत होती,होत आहे. पुढेही होत राहील. त्याला कधी दैववाद आडवा येइल, आला असेल असे काही आम्हाला वाटत नाही. बाकी, चालू द्या !

-दिलीप बिरुटे

आळशीपणा

दैववाद हे आळशीपणाला दिलेले गोंडस रूप आहे असे माझे मत आहे. कोठल्याही धर्माचा किंवा तात्विक विचारांचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. "असेल माझा हरी" यात 'हरी' शब्द आल्याने तसे समजणारा किंवा देवाचे नाव न घेता "देनेवाला देता है छप्पर फाडके" असे म्हणणारा माणूस धार्मिक प्रवृत्तीचा असतो असे कधी दिसत नाही. एकादा माणूस आळशी कसा बनतो याच्या मागे त्याची परिस्थिती, त्याच्या मनावर झालेले संस्कार वगैरे अनेक कारणे असतात.
'आजचा सरसकट सारा भारतीय समाज दैववादी आहे' आणि 'त्याची अधोगती झाली आहे' हे दोन्ही निष्कर्ष मला पटत नाहीत. उद्योगशील आणि यशस्वी माणसांची अगणित उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यांच्याकडे ना पाहता निराश होणे हा देखील कदाचित एक प्रकारचा दैववाद असावा.

पुराण संपणार कव्हा

महाभारतावर फुकट चर्चा करुन काय उप्योग
कव्हा संपनार हे विशय ?

रामायण-महाभारताच्या विष्यावर उपक्रमावर बंदी घालाला पाह्यजेन.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

दैववाद

दैववाद

"भारताच्या अपकर्षाला दैववाद कारणीभूत आहे" ही विचारसरणी डॉ. बिरुटे यांना मान्य नाही. आज थोडक्यात मी वाचलेली काही माहिती देत आहे. ती खोडून त्यांची मते ते सिद्ध करतील. माझे मत म्हणजे अनेक पंडितांच्या/ग्रंथांच्या मताचा गोषवारा. सर्वांचे संदर्भ देणे योग्य पण अशक्य. श्री.पर्स्पेक्टिव यांचे पुढील उद्धरण कॉपी राईट नाही असे समजून देत आहे.( असेल तर रॉयल्टी म्हणून घरी येऊन कॉफ़ी वसूल करावी) "..तपशीलांकरिता गरजूंनी स्वत: संशोधन करावे". आता या पंडितांच्या नानाविध ग्रंथातून किंवा ग्रंथांच्या शेकडो पानांमधून स्वत: तपशील मिळवणे अवघड असल्याने माझ्यासारखा आळशी माणूस काय करतो? तो एखादा ग्रंथ व त्यातील काही चालू विषयाशी संबंधित प्रकरणे वाचतो व त्यातील नित्कर्ष मांडून मोकळा होतो. आज माझ्या हातात आहे कै. डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे यांचे "महाराष्ट्र संस्कृती". आता पु.गं.नी काही संदर्भ दिले तर त्यांच्या खरेपणाबद्दल मी शंका घेत नाही. नित्कर्ष ज्याने त्याने आपापल्या अभ्यासाप्रमाणे, कुवतीप्रमाणे, काढावेत.आपल्या पुस्तकातील समाजरचना व धार्मिक जीवन या दोन प्रकरणात त्यांनी मांडलेल्या विचारांवरून असे दिसते कीं ऐतिहासिक भारताच्या इतिहासाची दोन पर्वे म्हणजे इ.स.पूर्व ३०० ते इ.स. १००० व इ.स.१००० नंतरचा.
या पैकी पहिल्या पर्वाचा शेवट, म्हणजे इ.स.८०० ते १०००, हा संक्रमण काळ धरावा.दोनही पर्वांत समाज धारणा ही धर्मावरच अवलंबून होती. त्यामुळे धर्माचा विचार केला की समाज कसा कसा बदलत गेला हे कळते. पहिल्या पर्वात धर्म हा वेद,महाभारत, पुराणे यांवर विश्वास ठेऊन होता.त्यापैकी वेद अतिपुरातन, महाभारत इ.स.पूर्व ३००-४००. पुराणे थोडी मागे पुढे. वेदात व महाभारतात फार प्रक्षिप्त भाग नंतर घुसडला गेला नाही पण पुराणांत मात्र कोणीही, काहीही, घुसडत गेले.त्यामुळे पुराणात निरनिराळी, एकमेकाविरुद्ध असलेली मतेही दिसतात. परंतु सर्व साधारणत: हे विचार उद्योगाला महत्व देणारे आहेत. उपनिषदातील व बौद्ध-जैन धर्माने पुरस्करलेली निवृत्ती परंपरा ही पहिल्या कालखंडात समाजाने नाकारली. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून जवळजवळ नाहिसा झाला तर जैन धर्म संकुचित राहिला. बौद्ध धर्म विकसित होत असतानासुद्धा त्यामुळे समाज व राजसत्ता फार निष्क्रिय झाली होती असे म्हणणेही फार योग्य नव्हे. कारण तेंव्हाही परकीयांचे हल्ले होतच होते व त्यांना पराभूत करून वा समाजात समावून घेऊन राजसत्तेने/समाजाने आपण क्रियाशील आहोत हे दाखवले होते.
या काळातील वाड्मय् (उदा. गाथा सप्तशती) वाचले तरी इहवादच समोर येतो. बहरलेली शिल्पकलाही याचाच पुरावा आहे.

कुमारील भट्ट व आद्य शंकराचार्य यांच्या वेळेपासून ही परिस्थिति बदलू लागली.आचार्यांनी बौद्धांसारखाच इहवादाला विरोध केला, पण चलाखी अशी केली कीं वेदांना न नाकारता, प्रस्थानत्रयीवर आपल्या टीका अशा लिहल्या की सर्व समाजाला वाटू लागले वेदांत निवृत्तीवादच प्रतिपादला आहे. इतर आचार्य शंकराचार्यांना प्रच्छन्न बुद्ध म्हणतात पण स्वत:ही संसार असार मानतात. बुद्ध मताचेच हे समर्थन सर्वांनी केल्याने ही विचारसरणी विसाव्या शतकापर्यंत मुख्य मतधारा राहिली.
भट्टपादांनी निराळे वळण दिले. मिमांसा दर्शनाचा प्रचार करतांना त्यांनी वेदांचे अपौरूषेयत्व,शब्दप्रामाण्य,अदृष्टवाद यावर भर दिला.त्याच वेळी समन्वयाची पायाभरणी केली.समन्वय म्हणजे काय? म्हणजे सर्व स्मृती एकच सांगतात असे टीकाकारांनी पटवून देणे. एक हास्यास्पद व जीवघेणे उदा.: एक स्मृती म्हणते सती जा, दुसरी म्हणते नका जाऊ. समन्वादी टीकाकाराने हे कसे जुळवावयाचे? तर सती जाऊ नका म्हणजे
दुसर्‍या चितेवर सती जाऊं नका! अदृष्टवाद असाच भयानक आहे. महाभारतकार म्हणतात धर्मनियम हे समाजाच्या धारणेकरता आहे त्त्यांचे दृष्य फल बघा. ही बुद्धीवादी विचारसरणी आहे. कालानुसार बदलाला वाव आहे. मिमांसाकारांनी हे पार बदलेले. अदृष्टवाद म्हणजे धर्माची फळे परलोकात मिळणार ! म्हणजे धर्मनियम कालाप्रमाणे बदलावयाची गरज नाही. या सर्वांचा घोर परिणाम म्हणजे बुद्धीवाद खच्ची झाला व धर्माच्या अधोगतीस सुरवात झाली.संन्यासवाद,पुराणविकृती, भक्ती-कर्मकांड, व्रते वैकल्ये,असहिष्णुता, आणि कलिवर्ज्य ही यातून उत्पन्न झालेली पिल्ले.कलिवर्ज्य ही काही स्मृती नाही. पण समाजावर सर्वात जास्त पगडा असलेली विकृती. कलियुगात क्षत्रिय-वैश्य हे वर्ण नाहीत, यवनांचे राज्य येणार, शूद्रांना वेदाभ्यासाचा राहोच पण देवदर्शनाचाही अधिकार नाही, समुद्रगमन वर्ज्य, एकदा धर्मबाह्य झाला कीं कायमचाच धर्मबाह्य, अशा अनेक गोष्टीनी समाजाला जखडले.ही परिस्थिति साधारणत: इ.स.१००० नंतरची. मी इथे काहीही करावयाचा
प्रयत्न केला तरी त्याची फळे येथे मिळणार नाहित हे तुम्ही एकदा माणसाला बजावले कीं त्याला दैववादी होण्याशिवाय गत्यंतरच नाही. एकदा संसार ही माया म्हटल्यावर त्याला काही कर्तुत्व दाखवण्याची ईर्षा येणारच कोठून? ग्रीकांपासून सुरवात केलीत तर एकही शतक असे आढळणे अवघड कीं ज्यात परकीय आक्रमणे झाली नाहीत.त्या वेळीं वाताहात झाली नाही व मुसलमानांच्या आक्रमणाच्यावेळी मात्र त्यांना आसेतुहिमाचल कोठेही तीव्र प्रतिकार झाला नाही व त्या नंतर त्यांच्या जुलुमांना इथल्या जनतेने प्रत्युत्तर दिले नाही याचे कारण दैववादच नव्हे कां? एकदा बुद्धीवाद संपला कीं उद्योग संपला व दैववाद सुरु झाला.
हा झाला डॉ. बिरुटे यांना लेखन करावयास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न .
आता श्री.घारे साहेबांचा प्रतिसाद. आळशी माणसे दैववादी असतात, मान्य. पण मग कष्ट करून मिळवलेला पैसा लोक लॉटरीवर, मटक्यावर, रेसवर उधळतात याचे समर्थन कसे करावयाचे ? मला तर वाटते आपल्या इथे कष्टकरीच, मग तो शेतकरी असो वा हमाल, जास्त दैववादी दिसतो.

शरद

गोंधळ

वेद अतिपुरातन, महाभारत इ.स.पूर्व ३००-४००. पुराणे थोडी मागे पुढे.

महाभारत इ.स.पूर्व ३००-४०० असेल तर इ.स.पूर्व ३०००-३५०० मधले महाभारत कोणते? महाभारत इ.स.पूर्व ३००-४०० मध्ये लिहून काढले गेले वगैरे असे म्हणायचे आहे का? असल्यास लेखक कोण? नसल्यास व्यास इ.स.पूर्व ३००-४०० मधील असा अर्थ होतो का?

वेदांत व महाभारतात फार प्रक्षिप्त भाग नंतर घुसडला गेला नाही पण पुराणांत मात्र कोणीही, काहीही, घुसडत गेले.

वेदांचे मला फारसे काही माहित नाही परंतु महाभारतात प्रक्षिप्त भाग घुसडला गेला नसता तर भांडारकर रिसर्च इंस्टीट्यूटला महाभारतावर इतके संशोधन करण्याची गरज ती काय?

काहीतरी गोंधळ होतो आहे येथे मात्र बाकी प्रतिसाद विचार करण्याजोगा आहे.

निव्रुती आणि प्रवुत्तीवाद....

डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे यांचे "महाराष्ट्र संस्कृती" मी काही वाचले नाही. आपण नेहमी चांगल्या पुस्तकांचे संदर्भ देता.मला संदर्भ पुस्तके हवीच असतात. असो, माझ्याजवळ आत्ता 'दशावतार' पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रवचनाचे संपादित केलेले पुस्तक आहे, त्यात असलेली काही माहिती, जी सलग नसल्यामुळे पृ. क्रमांक न देता गोषवारावजा असलेली माहिती टंकतो.

देववादाने भारताची प्रगती झाली की अधोगती च्या ऐवजी मी तुमचे लक्ष जरा जागतिक इतिहासाच्या वळवतो. आणि मग भारताचा विचार करु. जागतिक इतिहासाचा विचार केल्यावर लक्षात येते की, प्रवृत्ती आणि निवृत्ती अशी अवस्था सतत राहिलेली आहे. कधी प्रवृत्ती आणि प्रवृत्तीच दिसून येते तर कधी निवृत्ती आणि निवृत्तीच दिसून येते.

'' पाश्चात्य देशात ग्रीकमधे होमरनंतर प्रवृत्तिवादाचा खूपच बोलबोला झाला तो इतक्या पराकाष्ठेला गेला म्हणतात की, लोकांना त्याचा कंटाळा आला. हेच प्रवृत्तीवादी जीवन असेल तर आम्हाला नको. त्यानंतर पायथागोरसच्या काळात लोक निवृत्तीवादाकडे झुकू लागले. जीवन खराब आहे, संसार करायची काय गरज आहे, विवाह नको, कुटुंब नको, इत्यादी त्यानंतर एपीक्युरसपासून मानवसमाज पुन्हा प्रवृतीकडे झुकला.
मानव स्वभाव असा आहे की, एखादी गोष्ट धरली की त्याला पराकाष्टेहला घेऊन जातो. निवृत्तीकडे वळला तर लंगोटी लावायची तयारी असते. जेव्हा प्रवृतीवादाचे कौतुक करतो तेव्हा ईश्वराला मानायचे नाही, ते ढोंग आहे. नंतर ख्रिश्चन धर्मात साधु-जोगिणींच्या झुंडीच्या झुंडी निर्माण झाल्या आणि समाज निवृतीकडे वळला. मग मार्टिन ल्यूथर पासून प्रवृतीवाद सुरु झाला आणि आज समाज प्रवृतीवादाच्या दिशेने झेपावतो आहे. तेव्हा या दोन पवृत्तींमुळे पाश्चात्य देशातील प्रगती-अधोगती शोधली पाहिजे.

आपल्या भारतात श्रुतिकाळात चार आश्रम होते ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासश्रम. त्यातले दोन प्रवृत्तीचे आश्रम होते तर दोन निवृत्तीचे होते. उपनिषदकाळात प्रवृती-निवृत्तीचा समन्वय झाला. नंतर श्रीकृष्णाच्या काळात निवृत्ती-प्रवृत्ती असा समन्वय दिसतो पण नंतर कृष्णाच्या भोग आणि शृंगारालाच जीवन समजल्या जावू लागले. पुढे बुद्ध आणि महावीरांच्या वेळेस समाज पुन्हा निवृत्तीकडे वळला. नंतर मंडनमिश्रांनी त्याला प्रवृत्तीकडे आणले. पुढे शंकाराचार्यांनी दोन्हीचा समन्वय साधून समाजाला दिशा दाखवून् योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. नंतर मध्वचार्य, वल्लभाचार्य, रामानुचार्य यांनी समाजाला प्रवृत्तीकडे वळवले'' आणि आज तर कोणालाही माहित नाही की, आपण प्रवृतीकडे चाललो आहोत की निवृत्तीकडे. त्यामुळे दैववादामुळे प्रगती झाली की अधोगती झाली याची वरील काळातील- प्रवृत्ती-निवृत्तीतील काही आकडेवारी नाही, संदर्भ नाही. त्यामुळे माहित नसलेल्या विषयावर न बोलले बरे ! नाही का ?

विषय महाभारताचा चालू आहे आणि महाभारतावर चाललेल्या चर्चा नेमकेपणाने समजावे म्हणून अदिपर्व वाचायला घेतले. काही पानं वाचून झाल्यावर मेंदूवर ताण पडल्यासारखे वाटले , कधी एकदा ते पुस्तक बंद करतो असे होते त्यामुळे त्याच्यातला दैववाद-कर्मवाद, प्रगती-अधोगतीचा निष्कर्ष मला मांडता येत नाही. :(

संदर्भ : १) दशावतार : प्रकाशक : श्री वल्लभदास जे. झवेरी, 'सद्विचार दर्शन' निर्मल निकेतन, २, डॉ. भाजेकर लेन, मुंबई.

-दिलीप बिरुटे

हा आळशीपणाच नडतो

पण मग कष्ट करून मिळवलेला पैसा लोक लॉटरीवर, मटक्यावर, रेसवर उधळतात याचे समर्थन कसे करावयाचे ? मला तर वाटते आपल्या इथे कष्टकरीच, मग तो शेतकरी असो वा हमाल, जास्त दैववादी दिसतो.

कष्ट करणारे बरेच लोक नाइलाजाने कष्ट करत असतात. त्यांना त्याचे मूल्य समजलेले असते म्हणून नाही. विनासायास धन मिळाले तर त्यांना ते हवेच असते. त्यामुळे ते जुगार खेळतात.
यात कांही विशेष असे नाही. ती माणसाची सहज प्रवृत्ती आहे. शारीरिक श्रम कमी करण्याच्या इच्छेतूनच निरनिराळी औजारे, यंत्रे वगैरे तयार होत गेली आणि तो जनावरांपेक्षा वेगळ्या प्रकारचे जीवन जगू लागला.
प्रयत्नवादी माणूस कष्ट करायला तयार असतो आणि दैववादी माणसाला ते शक्यतो टाळायचे असतात एवढाच त्यांच्यात फरक असतो.

कष्टकरी आणि दैववाद

हा घारे साहेबांना प्रतिसाद नसून त्यांच्याच मताचे अधिक विश्लेषण आहे.

कष्ट करणार्‍या लोकांना 'अनुभवातून' हेही समजलेले असते की कष्टाच्या/प्रयत्नांच्या परमावधीला पोचून देखील आपल्या आयुष्यात फार काही फरक पडणार नाही. असा माणूस कदाचित शेवटचा 'प्रयत्न' म्हणून मटका खेळत असावा. (नेटवर्क मार्केटिंगच्या जाळ्यात अडकणारेही बहुधा असेच लोक असतात असे वाटते). उलट एखादा यशस्वी दुकानदार आपल्या दुकानात १० देवांचे फोटो लावून रोज त्यांच्यापुढे उदबत्त्या लावीत असला तरी त्यांच्या कृपेने आपोआप धंदा होणार आहे असे तो अजिबात समजत नाही आणि धंद्यासाठी आवश्यक कृती करणे थांबवत/टाळत नाही.

जोपर्यंत एखाद्याला कष्टाने आणि प्रयत्नाने प्रगती होण्याची आशा दिसत असते तोवर तो लॉटरी/मटका खेळत नसावा.(हे कदाचित फार स्वीपिंग विधान झाले असेल पण ते बरोबर आहे असे मला वाटते).

जे मुळातच दैववादी असतात त्यांचेविषयी हे विवेचन नाही.

थोडक्यात

थोडक्यात

महाभारताचे लेखन तीन वेळा झाले व म्हणून लेखक तीन.
(१) जय ...लेखक व्यास... श्लोकसंख्या ..८,००० अंदाजे
(२) भारत ..लेखक वैशंपायन.. श्लोकसंख्या ..२४,०००.
(३) महाभारत .. लेखक सौती.. श्लोकसंख्या १,००,०००. हे प्रमुख लेखक. यात यांच्याशिवाय बर्‍याच जणांचा हातभार (लेखणीभार) आहे. या प्रक्षिप्त लेखनामुळे भांडारकर संस्थेला प्रमाणित प्रत शोधण्याचे काम सुरू करावे लागले. सौतीचा, म्हणजे महाभारताचा लेखन काळ इ.स.पूर्व ३००-४०० धरला जातो. त्या नंतर भर फारशी घातली गेली नसावी.
शरद

जवाबदार

भारताच्या अधोगतीला प्रथम बौद्ध आणि नंतर 'त्यांची' आक्रमणे जवाबदार आहेत असे म्हणण्याची काही विशिष्ट लोकांत फॅशन आहे.

अधोगती

भारताच्या अधोगतीला प्रथम बौद्ध आणि नंतर 'त्यांची' आक्रमणे जवाबदार आहेत असे म्हणण्याची काही विशिष्ट लोकांत फॅशन आहे.

:-)

मी कोठेतरी वाचल्याप्रमाणे बौद्ध धर्माच्या भारतातील अधोगतीस हिंदू धर्म जवाबदार आहे. हिंदूंनी बौद्ध धर्माला आपलेपण दाखवून बुद्धाला विष्णूचा अवतार मानायला सुरुवात केली आणि बौद्धधर्मातील वेगळेपणाचा कणाच मोडून टाकला. ;-)

दैववाद - एक युक्तिवाद

पूर्वी श्री. पु. भा. भावे यांनी "शिवाजीराजे हे दैववादी असल्यानेच इतके यशस्वी होऊ शकले" असा एक युक्तिवाद केला होता. त्यात असे म्हटले होते "शिवाजीराजे आध्यात्मिक पिंडाचे होते, त्यांची तुळजाभवानी, शंकरावर किंवा साधू, संत, फकीर वगैरे लोकांवर श्रद्धा होती हा भाग महत्त्वाचा आहे. कारण श्रद्धेमुळेच अफजलखान वध, आग्र्याहून सुटका यासारखी केवळ अशक्य कोटीतली कामे त्यांनी नुसतीच हाती घेतली नाहीत तर यशस्वी करून दाखवली. ते फक्त प्रयत्नवादी असते तर अशी कामे मुळात हातीच घेतली नसती."

शिवाजीराजे साधू, संत, फकीर, यांची कृपा/प्रसाद प्राप्त व्हावी म्हणून किती प्रयत्नशील होते याचे एक वाचलेले उदाहरण म्हणजे एका साधूच्या झोपडीबाहेर थुंकण्याचे तस्त हातात धरून ते सुमारे आठ तास बाहेर उभे होते. नंतर साधूने त्यांना प्रसाद आणि आशिर्वाद दिला. श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेल्यावर त्यांना अचानक आपली मान कापून शंकराला अर्पण करावी अशी भावना झाली. आज प्रयत्नवादी लोक या सर्व गोष्टींना हसतील, थोतांड म्हणतील, पण या स्वभावामुळेच त्यांना अशक्य कोटीतली कामे करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली हे नाकारता येणार नाही.

विनायक

व्याख्येवर अवलंबून आहे

मला वाटते येथे (मूळ लेखात) 'कर्मवादा'च्या व्याख्येत (केवळ) 'शुद्ध कर्मवाद' अपेक्षित नसून 'कर्मवादाला दैववादाची जोड'(सुद्धा) अपेक्षित असावी; उलटपक्षी 'दैववादा'च्या व्याख्येच्या बाबतीत मात्र 'शुद्ध दैववाद'(च) अपेक्षित असावा. (थोडक्यात, व्याख्येचा घोळ आहे असे वाटते.)

या दृष्टीने पहावयाचे झाल्यास, शिवाजीमहाराज हे कर्मवादी होते असे म्हणता येईल. केवळ दैवावर, साधुसंतांच्या आशीर्वादावर अवलंबून राहून त्यांनी प्रयत्नच केले नसते, तर दैववादी म्हणता आले असते.

(अर्थात, puristic व्याख्येच्या दृष्टिकोनातून पहावयाचे झाल्यास कदाचित आपल्या म्हणण्यात तथ्य असावे असे वाटते.)

उदाहरणांत घोळ?

कारण श्रद्धेमुळेच अफजलखान वध, आग्र्याहून सुटका यासारखी केवळ अशक्य कोटीतली कामे त्यांनी नुसतीच हाती घेतली नाहीत तर यशस्वी करून दाखवली. ते फक्त प्रयत्नवादी असते तर अशी कामे मुळात हातीच घेतली नसती

हे कसे काय?
ही कामे मुत्सद्दीपणाने करण्यात त्यांच्या दैववादाचा काय संबंध असलाच तर प्रयत्नवादाचाच आहे असे वाटते.

बाकी दुसर्‍या परिच्छेदांतील उदाहरणे मात्र त्यांच्यातील दैववाद अधोरेखीत करणारी आहेत.

संपूर्ण १००% दैववादी अथवा संपूर्ण प्रयत्नवादी व्यक्तीचे उदा. मिळणे विरळ वाटते

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

सहमत

कारण श्रद्धेमुळेच अफजलखान वध, आग्र्याहून सुटका यासारखी केवळ अशक्य कोटीतली कामे त्यांनी नुसतीच हाती घेतली नाहीत तर यशस्वी करून दाखवली. ते फक्त प्रयत्नवादी असते तर अशी कामे मुळात हातीच घेतली नसती

हे कसे काय?
ही कामे मुत्सद्दीपणाने करण्यात त्यांच्या दैववादाचा काय संबंध असलाच तर प्रयत्नवादाचाच आहे असे वाटते.

ही कामे एकदा हाती घेतल्यावर 'पुरी होतील की नाही' या धास्तीने हातपाय गाळण्याऐवजी त्या भीतीवर मात करण्यासाठी श्रद्धेचा आधार घेण्याइतका श्रद्धेचा (आणि कदाचित म्हणून दैववादाचा; खात्री नाही) संबंध यात आहे. परंतु मुळात ही कामे हाती घेणे, ती पार पाडण्याची इच्छा असणे आणि मुख्य म्हणजे ती पार पाडण्यासाठी आवश्यक ती कृती करण्याची इच्छा असणे आणि तशी कृती करणे, यांमुळे हे मूलतः कर्मवादातच मोडावे असे वाटते. श्रद्धेचा उपयोग हा केवळ प्रयत्नांना पूरक एवढाच आहे. काहीही कृती न करता केवळ दैवाच्या हवाल्यावर सोडलेले नाही. त्यामुळे हा दैववाद म्हणता येऊ नये असे वाटते.

अशक्यप्रायता आणि प्रयत्नवाद

यासारखी केवळ अशक्य कोटीतली कामे त्यांनी नुसतीच हाती घेतली नाहीत तर यशस्वी करून दाखवली. ते फक्त प्रयत्नवादी असते तर अशी कामे मुळात हातीच घेतली नसती

प्रयत्नवादी लोक सकृतदर्शनी अशक्यप्राय वाटणार्‍या गोष्टी हातीच घेत नाहीत असे गृहीतक या विधानात आहे. ते तितकेसे योग्य नसावे असे वाटते. प्रयत्नवादी लोक नेहमीच शक्यता-अशक्यता असा विचार करतातच हेही तितकेसे खरे नसावे. तसे असते तर 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' सारख्या म्हणी प्रचलित झाल्या नसत्या. या म्हणीवरून लोकांनी प्रयत्नवादाचा अवलंब केल्यास अशक्य वाटणार्‍या गोष्टीही शक्य होऊ शकतात असा आशावादी सूर दिसतो. अशक्य वाटणार्‍या कार्यास हाती घेण्याची ऊर्मी प्रयत्नवादाने मिळते असे म्हणावेसे वाटते.

अशक्य?

एकादी गोष्ट 'अशक्य' असेल तर ती करण्याचा प्रयत्न करण्याजोगी आहे. ( इफ इट ईज इम्पॉसिबल, इट ईज वर्थ ट्राइंग) असे आजच्या युगातल्या एका महानुभावाने सांगितले आहे. मला नक्की नांव आठवत नाही.

 
^ वर