मॉरल पोलीस

स्त्रियांशी संबंधित काही विशिष्ट प्रकारच्या वर्तणुकीबद्दल नापसंती दर्शवणार्‍याचा 'मॉरल पोलीस' असा हेटाळणीयुक्त उल्लेख केला जातो. अशी हेटाळणी करणार्‍यांत ज्यांच्या स्वार्थावर गदा येते ते व तारतम्यरहित व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे असतात. कधीकधी आपणही नकळत त्यांच्या सुरात सूर मिसळतो.

असं असलं तरी आपल्यापैकी प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी 'मॉरल पोलीस' बनतो. कधी आपल्याला प्रिय व जवळच्या व्यक्तीबद्दल वाटणार्‍या काळजीपोटी तर कधी समाजात अनाचार माजेल व त्याचा भविष्यात कधीतरी आपल्यालाही फटका बसेल या भीतीनी. अशा वेळी आपल्या विरोधाला सबळ कारण आहे हे आपल्याला समोरच्याला पटवून देता येत नाही कारण जी गोष्ट आपण थांबवू पाहतो तिचे आपल्याला घातक वाटणारे परिणाम ताबडतोब दिसून येत नसतात.

मग ज्यावेळी एकीकडे विनाशाच्या दिशेनी जाणारी प्रिय व्यक्ति वा समाज व दुसरीकडे 'मॉरल पोलीस' म्हणून शिक्का बसण्याची भीति अशा कात्रीत आपण सापडतो त्यावेळी आपण काय करायचं? संबंधितांची विनाशाकडे होणारी वाटचाल हताशपणानी पाहात राहायचं? मुळीच नाही. उलट आपल्यावर काय शिक्का बसेल याची पर्वा न करता सावधानतेचा इशारा द्यायचं काम चालूच ठेवायचं. अशानी फसणारा कधीतरी भानावर येण्याची शक्यता असते. गैरफायदा घेणाराही आपल्यावर सतत कोणाची तरी नजर आहे हे लक्षात आल्यावर जपून वागतो ज्यामुळे धोका टळण्याची शक्यता वाढते. अर्थात् याबाबतीत शारीरिक अत्याचाराचा अवलंब मात्र करू नये.

आपणास काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

उदाहरण द्याल का?

चर्चाप्रस्तावक म्हणतात :

अशी हेटाळणी करणार्‍यांत ज्यांच्या स्वार्थावर गदा येते ते व तारतम्यरहित व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे असतात.

ज्याच्या स्वार्थावर गदा येते तशा एखाद्या स्त्रीबद्धवाद्याला सुयोग्य व्यक्तिस्वातंत्र्य तारतम्यरहित वाटेल. उदाहरणार्थ माझ्या आजीचे पाचवारी साडीविषयीचे मत. माझ्या आईचे (प्रवासातील सोय कळण्यापूर्वीचे) सलवार-कमीजविषयीचे मत. आणि अजूनही माझ्या काही वडीलधार्‍यांना वाटत असलेले मुलींनी घातलेल्या विजारींविषयीचे मत.

"तारतम्यरहित" ठरवणारे कोण असते?

कधीकधी आपणही नकळत त्यांच्या सुरात सूर मिसळतो.

काहीतरी काय. आपली भानगड नाही, असे पटले, की जाणूनबुजून आपण सुरात सूर मिसळतो. स्वतःच्या आप्त लोकांचा विषय असला, तर लोक मतप्रदर्शन करताना दिसतातच, उगाच सुरात सूर मिसळत नाही. लोक समाजातील आचारामध्ये बदल घडण्याला काळानुरूप संमती देतात, त्याबद्दल कुठल्यातरी भ्रामक कल्पनेमुळे चर्चाविषय असा मांडला आहे, असे मला वाटते.

एकमेकांना फसू देऊ नये, एकमेकांना सजग करावे, ही योग्य नीती आहे - सहमत. पण त्या योग्य नीतीचा अयोग्य संबंध येथे लावून (स्वतःच ठरवलेल्या "तारतम्य नसलेल्या") व्यक्तिस्वातंत्र्याची सरसकट नालस्ती करायचा प्रयत्न येथे नकळत होत आहे. तसे नकळत होऊ नये.

उदाहरण द्या : स्त्रियांच्या वर्तनातली अशी कुठली बाब तुम्हाला सलते, स्वैराचार वाटतो, ज्याबद्दल कोणीतरी तारतम्यहीन लोक "मॉरल पोलिसिंग" म्हणून तुमची हेटाळणी करत आहेत? ती बाब तुमच्या आप्तांना (किंवा कोणालाही) फसवत असेल, तर तसा संवाद तुम्ही स्त्रियांशी जरूर साधू शकतात. स्त्रियांना (म्हणजे सर्वांनाच) आपल्या जिवाची परवा असतेच. तुम्ही योग्य मुद्दे दिले तर धोक्याबद्दल तुम्ही त्यांना पटवू शकाल. शारिरिक नाहीच, मानसिक अत्याचाराशिवायही तुम्हाला हे जमेल.

पण तुम्हाला नावडत्या आचाराने त्या स्त्रिया धोक्यात फसत आहेत, हे तुम्ही जर त्यांनाच पटवू शकला नाहीत (आणि त्यांच्याइतकी त्यांच्या जिवाची काळजी कोणाला असू शकते?), तर तुम्हाला तो आचार का नावडतो, याचा पुनर्विचार करण्यालायक आहे.

उदाहरणे

उदाहरणांसाठी प्रियालीताईंनी त्यांच्या प्रतिसादात उल्लेखलेला गूगल सर्च चा दुवा पहावा.

'सातच्या आत घरात' हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. त्यांत अनिर्बंध वागणार्‍या तरुण मुलींना परावृत्त करू पाहणारी वडील मंडळी त्या मुलींना मॉरल पोलीसच वाटतात. पण त्या मुलींचे पुढे काय होते ते चित्रपटात दाखवले आहे. (चित्रपटात दाखवलेल्यावर विश्वास ठेवावा असा आग्रह नाही).

म्हणजे हे पालक-पाल्य संबंधांबद्दल आहे तर

पालक-पाल्य यांचे संबंध कसे असावेत, कौटुंबिक वातावरण कसे असावे, वगैरे याबद्दल चांगली चर्चा होऊ शकते.

कुटुंबात सलोखा निर्माण होताना कुटुंबातील सर्वांचा एकमेकांवर अधिकार असतो, आणि एकमेकांच्या बाबतीत जबाबदार्‍या असतात. हे अधिकार आणि जबाबदार्‍या समाजातील दोन (एका कुटुंबात नसलेल्या) व्यक्तींपेक्षा अधिक असतात.

चर्चाप्रस्ताव ज्या प्रकारे मांडला आहे, त्याप्रकारे समाजात व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांवर टीका केल्यासारखे वाटते.

स्पष्टीकरणासाठी .....

स्पष्टीकरणासाठी राजेंद्र यांच्या ०५-०८ च्या प्रतिसादावर दिलेले उत्तर पाहावे.

अच्छा

तुम्ही तेथे म्हणता :

संदर्भ : चर्चा फक्त पालक-पाल्य संबंधांच्या संदर्भात नाही तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांबद्दल व अनिर्बंध वापराबद्दलही आहे ज्यात परिणामांचा विचार केलेला नसतो.

येथे "अनिर्बंध" आणि "अवास्तव" या शब्दांतच "ते कोणालाच पटणार नाही" हे अध्याहृत आहे. "परिणामांचा विचार केला नसतो" ही तर निरर्थक वाक्यरचना. थोड्या परिणामांचा विचार सर्वांनीच केलेलाच असतो. (अगदी चंगळवादातही "चंगळ" या परिणामाचा विचार केलेला असतो.) आणि अंततोगत्वा अनंत काळापर्यंतच्या परिणामांबाबत कोणीच विचार करू शकत नाही. (पुरणपोळीचा प्रत्येक घास घेताना मधुमेहाच्या वाढीव शक्यतेचा पूर्ण हिशोब करणारा महाभाग तो विरळा!)

समाजातील काही बदलांबद्दल हल्ली एकमत नाही, हे खरेच. त्यातील तुमची काही मते ग्राह्य असतील आणि तुमच्या विरोधातील काही मते अदूरदर्शी असतीलही. पण त्या मुद्द्यांची चर्चा थेट केलीत तर बेहतर.

पण तुम्हाला न आवडणार्‍या बदलत्या प्रथांना तपशील न देता "अवास्तव" आणि "अनिर्बंध" म्हणून कुठलाही तार्किक युक्तिवाद साधत नाही.

रस्त्यात उघड्यावर आधी एक, नंतर एक न-थांबता संभोग करणारी स्त्री मी कधी बघितलेली नाही (पुरुषही बघितला नाही). म्हणजे स्थल-काल-आवड-निवड यांचा काहीतरी निर्बंध सर्वांवर असतो.

आणि जे आहे ते वास्तवच असते. "अवास्तव" या शब्दाबद्दल फारसे विवेचन आवश्यक नाही. वास्तव अहितकारक आहे, की बदल हितकारक याबद्दल चर्चा करण्यात अर्थ आहे. कशालाही "अवास्तव" म्हणण्यात अर्थ नाही.

प्रश्न तुम्ही म्हणता तसा "सनिर्बंध विरुद्ध अनिर्बंध", "वास्तव विरुद्ध अवास्तव" मुळीच नाही. "अमुक निर्बंध" विरुद्ध "तमुक निर्बंध" असा प्रश्न आहे. "हितकारक/अहितकारक चालूप्रथा/बदल" यांच्याविषयी प्रश्न आहे.

प्रियाली यांनी दिलेल्या गूगल दुव्यावर दिसलेले पहिले काही दुवे आहेत -
(१) "सच का सामना" टेलिव्हिजन कार्यक्रम
(२) व्हॅलेन्टाइन दिवसाला झालेली ठोकपीट
(३) पबमधील मुलींना झालेली ठोकपीट

यात निर्बंध काय हवेत आणि काय नकोत, आणि पबमधील मुलींना धोका नेमका कोणाकडून आहे - वगैरे चर्चा करण्यालायक आहे. कोणालातरी निर्बंधच नसतात, आणि त्यांना वास्तवच नसते ही कल्पना भ्रामक आहे, आणि त्यातून कोणाचेही मन वळायचे नाही. "आपली मते मांडणे व अन्यांची आजमावणे" हे अशा भ्रामक कल्पनेच्याबाबतीत निष्फळ आहे.

कोणीही आवश्यक वाटेल तेव्हा मॉरल पोलीसिंग करायला हरकत नसावी.

या सामान्यकल्पनेची व्याप्ती अशक्य आहे. म्हणजे तुम्हाला दाढी वाढवलीच पाहिजे, किंवा तुम्ही सुंता केलीच पाहिजे असे कोणाला आवश्यक वाटले, तर त्या बाबतीत ते तसे मॉरल
पोलिसिंग तुमच्यावर करू शकतात? छे - तुम्हाला असे मुळीच म्हणायचे नाही (असे मला वाटते). आवश्यकता का वाटते ते कोणीही सिद्ध करायला पाहिजे, आणि पोलिसिंगचा हक्क असलेल्या संस्थांनीच पोलिसिंग करणे इष्ट. (या संस्था म्हणजे कुटुंब, पोलीस, न्यायालय, वगैरे).

आवश्यकता सिद्ध केल्याशिवाय कोणी तुम्हाला सुंता करवून घेण्यास भाग पाडले, तर मी त्या मॉरल पोलिसाविरुद्ध तुमची बाजू घेईन, याबाबत निर्धास्त राहा. मग तो गुंड मला अनिर्बंध आणि अवास्तव म्हणेनाका. कारण "अनिर्बंध" आणि "अवास्तव" हे मुद्दे संपलेल्या कफल्लकाचे शब्द आहेत.

आणि आवश्यकता सिद्ध न करता एखाद्या बाईने पँटीऐवजी नऊवारी साडी नेसावी असे मॉरल पोलिसिंग तुम्ही केले, तर तुमच्याविरुद्ध मी त्या बाईची बाजू घेईन, हेसुद्धा ओघाने आलेच. मग तुम्ही मला अनिर्बंध आणि अवास्तव म्हणेनाका.

गूगल सर्च

मॉरल पोलीस या शब्दांवर गूगल सर्च केले असता येणारे मुख्य दुवे भारतातील आहेत ही विचारात घेण्याजोगी गोष्ट वाटते. याचे कारण काय असावे? सदर शब्द देशी (देसी) आहे हे की भारतात जोरदार मॉरल पोलीसांची फॅशन आहे.

असहमत

मग ज्यावेळी एकीकडे विनाशाच्या दिशेनी जाणारी प्रिय व्यक्ति वा समाज व दुसरीकडे 'मॉरल पोलीस' म्हणून शिक्का बसण्याची भीति अशा कात्रीत आपण सापडतो त्यावेळी आपण काय करायचं? संबंधितांची विनाशाकडे होणारी वाटचाल हताशपणानी पाहात राहायचं? मुळीच नाही. उलट आपल्यावर काय शिक्का बसेल याची पर्वा न करता सावधानतेचा इशारा द्यायचं काम चालूच ठेवायचं. अशानी फसणारा कधीतरी भानावर येण्याची शक्यता असते. गैरफायदा घेणाराही आपल्यावर सतत कोणाची तरी नजर आहे हे लक्षात आल्यावर जपून वागतो ज्यामुळे धोका टळण्याची शक्यता वाढते. अर्थात् याबाबतीत शारीरिक अत्याचाराचा अवलंब मात्र करू नये.

प्रिय व्यक्ती जर लहान मूल असेल, आणि आपण त्याचे/तिचे पालक असू तर साम, दाम, दंड, भेद अशा कुठल्याही मार्गाने तिला अयोग्य मार्गापासून परावृत्त करावे. जर ती व्यक्ती स़ज्ञान असेल तर मात्र एकदा सांगून नाद सोडावा हे उत्तम. आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला आपल्या मार्गाने जाण्याचा, चुका करण्याचा, त्यातून स्वतःचे नुकसान करून घेण्याचा क्वचित् दुसर्‍याचेही करण्याचा हक्क आहे हे मान्य केले की हा प्रश्न राहत नाही.

विनायक

किंचित सुधारणा

आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला आपल्या मार्गाने जाण्याचा, चुका करण्याचा, त्यातून स्वतःचे नुकसान करून घेण्याचा क्वचित् दुसर्‍याचेही करण्याचा हक्क आहे हे मान्य केले की हा प्रश्न राहत नाही.

'क्वचित दुसर्‍याचेही करण्याचा' या भागाशी किंचित असहमत.

आपल्या चुकांतून/चुकीच्या निर्णयांतून दुसर्‍याचे जाणूनबुजून, हेतुपुरस्सर नुकसान करण्याचा कोणाला हक्क आहे, असे वाटत किंवा हे पटत नाही. आपल्या चुकांमुळे अनवधानाने किंवा क्वचित्प्रसंगी अप्रत्यक्ष परिणामांतून नाइलाजाने किंवा अपरिहार्यतः दुसर्‍याचे नुकसान होऊ शकते, ही बाब वेगळी, आणि त्या बाबीचा कदाचित वेगळा विचार करता यावा. परंतु हे हक्काच्या कक्षेत येऊ नये.

अर्थात, असे दुसर्‍याचे नुकसान होत असल्यास त्याबद्दल शक्य आणि योग्य ती कृती (तसा पर्याय उपलब्ध असल्यास) करण्याचा हक्क त्या दुसर्‍यासही आहे, हे ओघाने आले. (योग्यायोग्यतेचे निकष हा पुन्हा पूर्णपणे वेगळा मुद्दा.)

तसेच, याचा 'लोकशाही' असण्यानसण्याशी फारसा संबंध असावा असे वाटत नाही. चूभूद्याघ्या.

बाकी प्रतिसादाच्या एकंदर मुद्द्याशी सहमत.

बरोबर!

'क्वचित दुसर्‍याचेही करण्याचा' या भागाशी किंचित असहमत.

बरोबर!

वाहन घेताना कायद्याने विमा (लायाबिलिटी इन्शुरन्स) घ्यावा लागतो ते ह्याच कारणामूळे. तुमच्या वाहनामुळे दुसर्‍याचे नुकसान करण्याचा हक्क तुम्हाला नाही. (तुमचे हवे तेवढे करा. काँप्रेहेन्सीव् पॉलीसी सक्तिची नाही!)

त्याचबरोबर साम दाम दंड भेद ह्यातील 'भेद' ह्याच्याशीही असहमत. ऐकत नसेल तर साम दाम दंड हे उपाय अवलंबुन पहावेत. पण भेद??

सहमत / पुन्हा किंचित सुधारणा

सहमत.

मात्र,

तुमचे हवे तेवढे करा. काँप्रेहेन्सीव् पॉलीसी सक्तिची नाही!

येथे किंचित सुधारणा:

काँप्रिहेन्सिव पॉलिसी कायद्याने सक्तीची नसली, तरी जोपर्यंत वाहनावरचे कर्ज फिटलेले नाही, तोपर्यंत तुमचे वाहन सर्वार्थाने तुमचे नसल्याकारणाने (कर्जदात्या बॅकेचा त्यात सेक्युरिटी इंटरेस्ट असल्याने) तुमच्या वाहनाचे नुकसान हे सर्वस्वी केवळ तुमचे नुकसान नाही. या कारणास्तव, अनेकदा (पण नेहमी नव्हे; जोखिमीच्या प्रमाणावर अवलंबून) कायदा नाही तरी कर्जदात्री बँक काँप्रिहेन्सिव पॉलिसी घेणे कर्जाच्या अटींद्वारे सक्तीचे करते.

अर्थात, एकदा कर्ज फिटले की काँप्रिहेन्सिव पॉलिसी (कायद्याने किंवा इतरमार्गे) सक्तीची नाही.

कर्जदाता

हो कारण अश्या प्रसंगी मूळात गाडी तुमची नसुन (कर्ज फिटेपर्यंत) तुमच्या कर्जदात्याच्या नावावर असल्याने तुम्ही 'त्यांचे' नुकसान करण्याची शक्यता असते ज्यासाठी अर्थातच कर्जदाता परवानगी देत नाही. पण एकदा का वाहन 'तुमचे' झाले की तुम्हाला त्याचे नुकसान करायचे स्वातंत्र्य आहे.

अर्थात!

सहमत.

मुभा आणि हक्क

आपल्या चुकांतून/चुकीच्या निर्णयांतून दुसर्‍याचे जाणूनबुजून, हेतुपुरस्सर नुकसान करण्याचा कोणाला हक्क आहे, असे वाटत किंवा हे पटत नाही.

टेक्सास आणि अनेक राज्यांत आपल्या प्रॉपर्टीवर जर क्ष व्यक्ति ट्रेसपासिंग करताना आढळली तर आपणास क्ष व्यक्तिला जाणूनबुजून, हेतुपुरस्सर नुकसान करण्याची मुभा आहे.

कदाचित...

...दुसर्‍या माणसाने आपल्या मालमत्तेच्या हद्दीत अनधिकृत प्रवेश अथवा वावर केल्यामुळे होणार्‍या आपल्या perceived (याकरिता समर्पक मराठी प्रतिशब्द सुचला नाही.) किंवा संभाव्य नुकसानाबद्दल शक्य कृती या सदराखाली हे मोडावे, असे वाटते.

मुभा आणि हक्क यांत सूक्ष्म फरक असावा, असेही वाटते. नक्की खात्री नाही, परंतु perception of a just or justifiable cause या आधारावर दिलेली सवलत, इतकाच मुभेचा या बाबतीत अर्थ असावा, असे वाटते. म्हणजे, मला मनुष्यप्राण्याची शिकार करायला आवडते म्हणून माझ्या मालमत्तेच्या हद्दीत कोणी आला रे आला, की त्याला गोळी घालण्याचा मला हक्क नाही. मात्र, माझ्या मालमत्तेत अनधिकृत प्रवेश करून वावरणारा मनुष्य मला किंवा माझ्या मालमत्तेला धोका पोहोचवू शकतो, असे मला वाटल्यामुळे जर मी त्याला गोळी घातली, तर कायदा त्यास गुन्हा मानत नाही, आणि त्या दृष्टीने मला ती मुभा आहे, इतकेच. आणि त्यापुढे जाऊन, अनधिकृत प्रवेश करणार्‍या त्या मनुष्याचा इरादा मला नुकसान पोहोचवण्याचा आहे की तो केवळ कोणाचातरी पत्ता विचारायला आला आहे, याचा गोळी घालण्याअगोदर सुरक्षितपणे तपास करण्याचा मार्ग मला नेहमीच उपलब्ध नसेल, हे कायदा लक्षात घेतो आणि तशी अगोदर चौकशी अथवा निश्चिती न करता, केवळ "मला धोका वाटतो" या आधारावर, मी गोळी घातल्यास मला संशयाचा फायदा देतो, इतकेच.

(कायदेशीर बाबींची नक्की खात्री नाही, परंतु नंतर कोणीतरी - नुकसानीचा वगैरे - खटला माझ्याविरुद्ध भरलाच, आणि मला असा कोणताही धोका वाटला नाही, केवळ गंमत म्हणून मी त्या मनुष्यास मारले असे नि:संशयपणे सिद्ध करू शकला - उदाहरणार्थ, गोळी घालताना मी माझ्याबरोबरच्या एखाद्या व्यक्तीस "बघ रे, छान बळीचा बकरा मिळालाय, त्याला गोळी घालू या - मज्जा! नाहीतरी बर्‍याच दिवसांत कोणाला गोळी घातली नव्हती; हात शिवशिवताहेत!" असे काहीतरी म्हणाल्याचा नि:संशय पुरावा वगैरे पुढे आला - तर अशा परिस्थितीत केवळ अनधिकृत प्रवेशाच्या किंवा वावराच्या मुद्द्यावरून कायदा माझ्या बाजूने राहील का, याबद्दल जबरदस्त शंका आहे. तज्ज्ञांनी खुलासा करावा.)

किंचित विवेचन

(कायदेशीर बाबींची नक्की खात्री नाही, परंतु नंतर कोणीतरी - नुकसानीचा वगैरे - खटला माझ्याविरुद्ध भरलाच, आणि मला असा कोणताही धोका वाटला नाही, केवळ गंमत म्हणून मी त्या मनुष्यास मारले असे नि:संशयपणे सिद्ध करू शकला - उदाहरणार्थ, गोळी घालताना मी माझ्याबरोबरच्या एखाद्या व्यक्तीस "बघ रे, छान बळीचा बकरा मिळालाय, त्याला गोळी घालू या - मज्जा! नाहीतरी बर्‍याच दिवसांत कोणाला गोळी घातली नव्हती; हात शिवशिवताहेत!" असे काहीतरी म्हणाल्याचा नि:संशय पुरावा वगैरे पुढे आला - तर अशा परिस्थितीत केवळ अनधिकृत प्रवेशाच्या किंवा वावराच्या मुद्द्यावरून कायदा माझ्या बाजूने राहील का, याबद्दल जबरदस्त शंका आहे. तज्ज्ञांनी खुलासा करावा.)

इथे कृतीमागच्या हेतूचा ("मेन्स् रिआ" चा ) संबंध येतो असे वाटते. "the act does not make a person guilty unless the mind be also guilty"

नेमके हेच!

तांत्रिक किंचित्विवेचनाबद्दल (संधीची चूभूद्याघ्या.) आणि पारिभाषिक संज्ञेबद्दल आभारी आहे.

उद्देश

लेखाचा नेमका उद्देश स्पष्ट झाला नाही. लेख धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे पालक-पाल्य यांच्याबद्दल असेल तर गोष्ट वेगळी.
मॉरल पोलिस म्हटल्यावर व्हॅलेंटाइन डेला दुकाने फोडणारे शिवसैनिक किंवा पबमधील तरूणींना मारहाण करणारे श्रीराम सैनिक आठवतात.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

संदर्भ आणि उद्देश

संदर्भ : चर्चा फक्त पालक-पाल्य संबंधांच्या संदर्भात नाही तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांबद्दल व अनिर्बंध वापराबद्दलही आहे ज्यात परिणामांचा विचार केलेला नसतो.

उद्देश : इतर प्रस्तावांप्रमाणेच मला वाटते ते आपल्यासमोर मांडणे व आपली मते अजमावणे. मला काय वाटतं ते शेवटच्या परिच्छेदात मांडले आहे. तेच आणखी स्पष्टपणे सांगायचे तर असे म्हणता येईल की कोणीही आवश्यक वाटेल तेव्हा मॉरल पोलीसिंग करायला हरकत नसावी.

स्पष्टीकरण

अ च्या कृतीने ब चे नुकसान झाले. क या अ ला जवळचे समजणार्‍या व्यक्तीने अ च्या लक्षात आणून दिल्यावर त्याला "तुझा याच्याशी संबंध नाही, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही" अशा प्रकारची उत्तरे मिळाल्यावर क ची प्रतिक्रिया अशी असते "बाबा रे, तुला चुकीच्या मार्गाने जाण्याचा अधिकार आहे, स्वतःचे नुकसान करून घ्यायचा अधिकार आहे, दुसर्‍याचे करण्याचाही आहे, आपल्याकडे लोकशाही आहे, हवे ते कर. ज्याचे नुकसान झाले तो आणि तू बघून घ्या."

तसेही शिक्षा भोगण्याची तयारी असेल तर चोरी, खून करण्याचाही हक्क आहेच ना.

विनायक

फरक आहे

अ च्या कृतीने ब चे नुकसान झाले. क या अ ला जवळचे समजणार्‍या व्यक्तीने अ च्या लक्षात आणून दिल्यावर त्याला "तुझा याच्याशी संबंध नाही, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही" अशा प्रकारची उत्तरे मिळाल्यावर क ची प्रतिक्रिया अशी असते "बाबा रे, तुला चुकीच्या मार्गाने जाण्याचा अधिकार आहे, स्वतःचे नुकसान करून घ्यायचा अधिकार आहे, दुसर्‍याचे करण्याचाही आहे, आपल्याकडे लोकशाही आहे, हवे ते कर. ज्याचे नुकसान झाले तो आणि तू बघून घ्या."

'ब'चे नुकसान करण्याचा अधिकार 'अ'स आहे असे वाटत नाही. 'क'ने कितीही सांगितले किंवा नाही सांगितले तरीही 'अ' अशा रीतीने 'ब'चे नुकसान केल्यावाचून राहणार नाही ही बाब पूर्णपणे वेगळी. परंतु त्यातून 'अ'ला अशा प्रकारचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही.

तसेही शिक्षा भोगण्याची तयारी असेल तर चोरी, खून करण्याचाही हक्क आहेच ना.

शिक्षा भोगायची तयारी असेल तरीही चोरी, खून करण्याचा हक्क प्राप्त होत नाही. शिक्षा भोगायची तयारी असल्यास चोरी किंवा खून करणारा तरीही चोरी किंवा खून करेलच, एवढेच. (एखादी गोष्ट प्रसंगी परिणामांच्या नाकावर टिच्चूनसुद्धा करणे आणि ती गोष्ट करण्याचा हक्क असणे यात फरक आहे.)

(किंबहुना, हक्क नाही असे कायद्यास वाटते म्हणूनच त्यासाठी शिक्षा योजण्याचे कायद्यास प्रयोजन, असे वाटते. चूभूद्याघ्या.)

अपवाद ?

किंबहुना, हक्क नाही असे कायद्यास वाटते म्हणूनच त्यासाठी शिक्षा योजण्याचे कायद्यास प्रयोजन, असे वाटते.
सर्वसामान्यपणे हे खरे असले तरी काही वेळा कृती घडून गेल्यावर कायदे अस्तित्त्वात येतात आणि मग ती कृती त्या कायद्याच्या अमलाखाली आल्यामुळे शिक्षा होऊ शकते . पहा : http://en.wikipedia.org/wiki/Ex_post_facto_law

अपवाद नव्हे; वेगळा मुद्दा म्हणता येईल

"किंबहुना, हक्क नाही असे कायद्यास वाटते म्हणूनच त्यासाठी शिक्षा योजण्याचे कायद्यास प्रयोजन, असे वाटते" हे विधान एका विशिष्ट प्रतिसादातील विशिष्ट मुद्द्याच्या संदर्भात आहे. कृती घडून गेल्यानंतर अस्तित्वात आलेल्या कायद्याखाली होणार्‍या शिक्षेची शक्यता कोणत्याही प्रकारे वगळलेली किंवा नाकारलेली नाही. ज्या संदर्भात उपरोल्लेखित विधान केले होते त्या संदर्भात कृती घडून गेल्यानंतर अस्तित्वात आलेल्या कायद्याखाली होणार्‍या शिक्षेचा संबंध नसल्याकारणाने त्या शक्यतेचा उल्लेख केला नसून, या कारणास्तव त्या संदर्भात तशी शक्यता वगळण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

त्यामुळे, यास "अपवाद" म्हणण्यापेक्षा "वेगळा मुद्दा" म्हणणे सयुक्तिक ठरावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

दुवा रोचक आणि माहितीपूर्ण आहे.

 
^ वर