नूपोर्टचा रहस्यमय मनोरा

न्यूपोर्टचा मनोरा

न्यूपोर्ट हे अमेरिकेच्या र्‍होड आयलंड ह्या राज्यातले सुप्रसिद्ध गांव. हे गांव २-३ बेटांच बनले आहे आणि इतर शहरांना मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंक सारखे दोन मोठ्या पूलांनी जोडले आहे.

काही जण ह्या शहराला गोव्याची उपमा देतात तर काहींना ह्या शहरातील 'राजवाडे' भारतातल्या राजस्थान मधल्या राजवाड्यांची आठवण करून देतात. भारतातले राजवाडे जास्त चांगले आहेत अशी प्रतिक्रियापण देतात. मी स्वतः राजस्थानमधले राजवाडे प्रत्यक्ष पाहिले नाही पण चित्रातून पाहिले आहे आणि माझीही प्रतिक्रिया आपल्या राजस्थानचे राजवाडे सुरेख आहे अशीच आहे.

२-३ राजवाडे पाहतांना मला तिथे लावलेल्या चित्रात एक दगडी मनोरा चित्रीत केलेला दिसला. उगाच मला त्या मनोर्‍यात काहीतरी रहस्य आहे असे वाटायला लागले. दगडी मनोरा होता. वरती छत नव्हते.

हा मनोरा कुठे आहे? त्याचे काय नाव आहे? त्याची चित्रे न्यूपोर्टच्या राजवाड्यात का लावली आहे? वैगरे... अशी प्रश्ने मनात आली.

मनात कुतूहल जागे झाले आणि त्याची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जमल्यास हा मनोरा आता कसा दिसतो ते पाहू असे ठरवले.

माझ्या ऑफिसमधल्या २-३ सहकार्‍यांना ह्या मनोर्‍याची काही माहिती आहे का हे विचारले पण काही हाती आले नाही. आंतरजालावर माहिती शोधण्याचे काम हाती घेतले. पण कोणते शद्ब शोधण्यासाठी वापरायचे ह्यात गोंधळ झाला आणि पाहिजे ती माहिती लवकर जमवता आली नाही. असे माझ्याबाबती वरचे वर घडत असते. म्हणून हार मानली नाही. शोधकार्य पूढे चालू ठेवले.

आणि एक दिवस माझ्या एका सहकारी मित्राने त्या मनोर्‍याला बरीच नावे आहे. त्यातील ही काही नावे - 'न्यूपोर्ट मनोरा', 'पोर्तुगिज मनोरा', गोल मनोरा', 'तोउरो मनोरा', रहस्यमय मनोरा' इत्यादि. पण त्याची अधिक माहिती माझ्याजवळ नाही. तु आंतरजालावर शोध. आणि जमल्यास येत्या शनिवारी किंवा रविवारी भेट दे.

कामाच्या नादात माहिती मिळवली नाही पण शनिवारी न्यूपोर्टला जावून ह्या रहस्यमय मनोर्‍याला भेट दिली होती.

चित्रात दिसत होता तसाच गोलाकार एकावर एक दगड रचून बांधलेला हा मनोरा होता. मनोरा बघितल्याचे समाधान वाटले होते. पण मला ह्या मनोर्‍यात काय रहस्य दडले आहे हे काही समजले नाही.

Newport Tower

रहस्य जाणून घेण्यासाठी आंतरजालावरून ह्या मनोर्‍याची जी माहिती मला मिळाली ती आपल्या सर्वांसाठी थोडक्यात देत आहे.

हा मनोरा कुठे आहे?
अमेरिकेच्या र्‍होड आयलंड ह्या राज्याच्या न्यूपोर्ट ह्या गावातल्या मिल स्ट्रीटवरच्या तोउरो पार्कमध्ये हा मनोरा आहे.

हा मनोरा कधी बांधला?
१७ व्या शतकामधे हा मनोरा पवन चक्की म्हणून बांधण्यात आला असावा असे मत आहे. पण हा मनोरा त्याच्या खूप आधीपासून अस्तित्वात असावा असे धागे-दोरे पुरातत्व विभागाच्या संशोधकांना सापडले आहे. अजूनही हा मनोरा कोणी आणि कधी बांधला याच्यावर संशोधन चालू आहे.

मनोर्‍याची कोणती वैशिष्ठे आहे?
मनोर्‍याची स्थापत्यकलेच्या दृष्टीकोनातील वैशिष्ठे: हा मनोरा उभा गोलाकार आहे. बाहेरचा जमिनीलगतचा गोलाकार भाग तेवीस फूट आहे. उंची साडे चोवीस फूट आहे. साडे सात फूट उंचीचे ८ गोलाकार खांबाचा हा मनोरा आहे. ८ पैकी २ खांब हे बाकीच्या ६ खांबांपेक्षा थोडे जास्त जाड आहेत. खांबांची जाडी जवळ पास ३ फूट आहे. मनोराच्या आतिल भाग जवळपास अठरा फूटाचा आहे. हे ८ खांब ८ गोलाकार घुमटाने जोडले आहे. त्यामुळे उलट्या इंग्रजी यू (U) ह्या अक्षराचे ८ आकार तयार झाले. हे आकार रोमन स्थापत्यकलेत वापरले जातात असे म्हणतात. चार खिडक्या ह्या खांबाच्या वरच्या भागातल्या भिंतीवर आहे. ह्या खिडक्यांच्या भागाला मनोर्‍याचा पहिला मजला असे ही संबोधतात. ह्या पहिल्या मजल्याच्या वरच्या भागात ३ खिडक्या आहेत. एक खिडकी ईशान्येकडे आहे. दूसरी खिडकी दक्षिणमुखी आहे, ती खिडकी अटलांटीक महासागराकडे बघते. तर तिसरी खिडकी पश्चिममुखी आहे.

Sketch Newport Tower

मनोर्‍याच्या आतील भागाच्या भिंतीत ७ खोलगट जागा आहे त्यामूळे त्या जागा 'फायर प्लेस' म्हणून वापरत असाव्यात असा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक खांबाच्या वरचा भागात आणि घुमटाकार भाग जेथे मिळतो तिथे त्रिकोनाकार छोटी खाच आहे. ही खाच लाकडाची तुळई अडकवण्यासाठी वापरात येत असावा असा अंदाज बांधला जातो.

ह्या मनोर्‍याच्या दगडांवर समुद्रातुन गोळाकेलेल्या शंख, शिंपले आणि चुनखडी यांच्या एकत्रीत बारीक केलेल्या चुर्‍या पासून तयार झालेल्या मिश्रणाचा वापर करून मुलामा दिलेला आहे.

जून्या काळी अमेरिकन नेव्हीच्या बोटींवर व गणवेषावरच्या बिल्ल्यावर ह्या मनोर्‍याचे चित्रण केलेले होते.

ह्या मनोर्‍यावर केलेले आता पर्यंतचे संशोधन कार्ये:

१) १८४८ ला मनोर्‍यावरच्या मुलाम्यावरचे संशोधन : न्यूपोर्टच्या डॉक्टर जॅकसन यांनी न्यूपोर्ट शहरातील इतर इमारतीवरच्या मुलाम्यात वापरलेले साहित्य आणि मनोर्‍याच्या मुलाम्यात वापरलेले साहित्य सारखे आहे का यांवर संशोधन केले आणि त्यांना असे आढळून आले कि हे साहित्य सारखेच आहे. जवळच्या समुद्रातून गोळा केले शंख, शिंपले, चुनखडी वैगरेच साहित्य वापरले गेले होते.

२) १९४८ – खोदणे : १९४८ साली न्यूपोर्टच्या शासनकर्तांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून ह्या मनोर्‍याचे संशोधन करायची परवानगी अमेरिकेच्या पुरातत्व विभागाला (Society for American Archaeology') दिली. संशोधनाचा एक भाग म्हणून जवळपास १ मिटर लांबीची नाली खोदली. ही नाली मनोर्‍याच्या आतील भागातून बाहेरच्या भागात जाईल अशाप्रकारे खोदली. ह्या संशोधनाच्या निरिक्षणातून असे निकर्ष काढण्यात आले की हा मनोरा १७व्या शतकात बांधला आहे. १६७७ सालाच्या आधी बेनेडिक्ट अर्नोल्ड (Benedict Arnold) ह्याने हा दगडी मनोरा पवनचक्की म्हणून बांधला असे समजले जाते.

३) 1992 - कार्बन डेटिंग टेस्ट: १९९२ साली डेनमार्क आणि फिनलंडच्या काही संशोधकांनी मनोर्‍यावरच्या मुलाम्याची रेडियो कार्ब्न डेटिंग टेस्ट (radiocarbon dating test) घेतली. ह्या तपासणीत हा मनोरा १६३५ ते १६९८ सालात बांधला गेला असावा असे आढळले.

४) २००६-०७ चे खोद चाचणी (excavation): २००६ च्या ओक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि २००७ च्या ओक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही चाचणी घेण्यात आली. मागच्या ६० वर्षातली तोउरो पार्कमधली ही पहिलीच चाचणी. ह्या चाचणीचा उद्देश हा मनोरा कोणी व कशासाठी बांधला हे शोधून काढणे हा होता. पुरातत्व विभागाच्या मते त्यांना ह्या संशोधनामुळे हा मनोरा १७च्या शतकात बांधला गेला ह्याच्या पैक्षा अधिक कोणतीच माहिती मिळाली नाही.

हा मनोरा समुद्रमार्गाने अमेरिकेत येणार्‍या प्रवाश्यांना ह्या बेटावर वस्ती आहे हे दर्शवणारा होता. अनेक प्रवासी न्यूपोर्टच्या बेटावर ह्या मनोर्‍याच्या खिडक्यातून होणार्‍या सूर्यकिरणाकडे आकर्षित होऊन ह्या बेटावर आले असाही एक समज आहे.

हा मनोरा आकाश निरिक्षणा साठी वापरला जात असे असापण एक समज आहे.

नक्की कोणी व कश्यासाठी हा मनोरा बांधला हे कोणाला ठामपणे सांगता येत नसल्यामुळे हा मनोरा रहस्यमय मनोरा आहे असे मला वाटते.

संदर्भ दुवे:
१) मनोरा कोणी बांधला
२) रहस्यमय मनोरा
३) संशोधनाचे प्रबंध

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

लेख रोचक आहे. मनोरा कशासाठी वापरला जात असेल याबद्दल उत्सुकता वाटते.

----

वा छान!

वा मस्तच झाला आहे हा लेख.
आवडला.
भरपूर माहिती आणि सर्वांगीण दृष्टीकोनातून.

जून्या काळी अमेरिकन नेव्हीच्या बोटींवर व गणवेषावरच्या बिल्ल्यावर ह्या मनोर्‍याचे चित्रण केलेले होते.
असे असेल तर या विभागात त्याची माहिती निश्चितच असेल.
असो,
लेख आवडला.

आपला
गुंडोपंत

मस्त

वा मस्तच झाला आहे हा लेख.
आवडला.
भरपूर माहिती आणि सर्वांगीण दृष्टीकोनातून.

सहमत आहे.. सचित्र माहितीपूर्ण लेख आवडला

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

निश्चित माहिती नाही

जून्या काळी अमेरिकन नेव्हीच्या बोटींवर व गणवेषावरच्या बिल्ल्यावर ह्या मनोर्‍याचे चित्रण केलेले होते.
असे असेल तर या विभागात त्याची माहिती निश्चितच असेल.

मला जे काही दूवे सापडले, त्यात ह्या विषयावरची जास्त माहिती सापडली नाही.

लेख आवडला

वेगळ्याच तर्‍हेचा लेख. मनोर्‍याचा उपयोग काय असावा याबद्दल कुतूहल वाटत आहे.

दूवे +

 
^ वर