महाभारत-३

सामाजिक परिस्थिति
महाभारतकालीन सामाजिक परिस्थितीचा आज विचार करू. या करिता महाभारताचाच जास्त उपयोग करणे उचित. तरीही इतर संदर्भही उपयोगात आणले आहेत.
(१) अन्न : अन्नात तांदूळ, गहू, ज्वारी, सातू ही धान्ये प्रामुख्याने वापरली जात. सुरवातीच्या पंजाब व आजूबाजूच्या प्रदेशातील मुख्य पिक तांदूळ असल्याने त्याचा वापर जास्त दिसतो. भातात मांस घालून पुलावासारखा पदार्थ केल्याचे वर्णन आढळते. नंतर उत्तर भारतात सर्वत्र रहाण्यास सुरवात झाल्यावर इतर धान्यांचा वापर वाढला.मांसाहार सर्व वर्णात होता पण ब्राह्मणात तो हळूहळू कमी होऊ लागला होता. तरीही यज्ञातील पशूच्या मांसभक्षणाला तेही तोंडभार लावत. हरिणे व वराह हे
पसंतीचे. हत्ती, घोडे, गाढवे, कुत्रे, मांजर वर्ज.पंचनखीं (५ नखे असलेली जनावरे)पैकी शाळ, श्वाविध, घोरपड, ससा व कासव यांना परवांगी.मत्स्यभक्षण सारस्वत ब्राह्मणांमुळे पंजाब व बंगालमध्ये जास्त प्रमाणात.
(२) मद्य : सर्वांना परवांगी होती पण हळूहळू त्याचा निषेध सुरू झाला होता. पण या बाबतीत धर्माचा व शासनाचा निषेध ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट असेच बरेच जण मानत असावेत. द्वारकेत कठोर निर्बंध घालूनही शेवटी मद्यपानानेच यादवी होऊन सर्वनाश झाला.
(३) भोजन परिमित असावे व त्यावेळी बोलू नये व अन्नाची निंदा करू नये अशी अपेक्षा असे. आरालिक, सूपकार व रागखांडविक असे तीन पक्वान्नांचे प्रकार व ते करणारे तीन निरनिराळे आचारी वर्णन केले आहेत. भोजनावर निर्बंध बरेच आहेत. राजाचे, शुद्राचे, पती वा मुलगा नसणार्‍या स्त्रीचे, सावकाराचे, वेश्येचे, व्यभिचारिणीचे, वैद्यांचे, प्रजापालनावर नियुक्त
असलेल्या अधिकार्‍याचे, वगैरे अन्न वर्ज आहे.यादी मोठी व रंजक आहे. शिळ्या अन्नाचाही निषेध आहे.
(४) वस्त्रे : पुरुष दोन वस्त्रे घालत. कमरेखाली एक धोतरासारखे व वर एक उपरण्यासारखे. उजवा हात बाहेर काढून डाव्या खांद्यावर उपरण्याला गाठ देत; रोमन कांच्या "टोग्या"सारखे.डोक्याला रुमालासारखे वस्त्र बांधण्याचेही पद्धत होती. स्त्रीया
साधारणत: असाच पोषाख करत असाव्यात.उत्तरीय फक्त बाहेर जातांना वापरत असाव्यात. दासी व खालच्या वर्गातील स्त्रीया उत्तरीय वापरत नसत. लांब लुगडेच वरही वापरले जायचे. त्या काळात शिंपी नव्हते. त्यामुळे शिवलेले कपडे बाद.इ.स.च्या दुसर्‍या-तिसर्‍या शतकापर्यंत हीच पद्धत असावी असे अजिंठा येथील चित्रकलेवरून वाटते. रामायण-महाभारतकालीन चित्रपट
काढणे किती दुरापास्त आहे हे यावरून कळून येईल.विधवा सर्वसाधारणत: पांढरी वस्त्रे वापरत. कापूस, रेशीम व लोकर यांची वस्त्रे साधारणत: वापरली जात पण वल्कले व कातडे,उदा. मृगाजिन हेही मुनी व त्यांच्या स्त्रीया वापरत.
(५) केशभुषा :स्त्रीया भांग पाडत व पुरुष शेंडी ठेवत. सुवासिनी स्त्रीया एक-दु-त्रिपेडी वेणी घालत. विधवा स्त्रीयांनी वेणी न घालता, न विंचरता नुसतेच बांधून ठेवावेत अशी अपेक्षा असे. भांगात केशर किंवा कुंकुम घावयाची पद्धत होती.
(६) पादत्राणे: पादत्राणे किंवा वहाणा वापरत असत. वहाणा चामड्याच्या किंवा लाकडाच्या असत.
(७) अलंकार : अलंकाराची हौस स्त्री-पुरुष दोघांनाही होती. हे दागिने सोने, चांदी,मोती, हिरे व इतर रत्ने वापरून केलेले असत. माणसेच काय पण जनावरे, घोडे,हत्ती यांनाही मढवण्याची पद्धत होती. मुकुट,कुंडले, गळ्यात मोत्याचे ,सोन्याचे, रत्नांचे हार, स्त्रीयांकरिता बाजुबंद, मेखला, नूपुर वगैरेंची नोंद आहे. त्या कपाळावर एक पट्टीही बांधत( त्यावरून पट्टराणी). नथ मात्र बहुदा
नसावी.
(८) आसने : पीठ म्हणजे चौरंग व मंचक वा पर्यक म्हणजे मोठा चौरंग. यावर गादी व टेकावयाला उशी, गिरदी असे. हे मोत्यांच्या माळा वगैरे लावून शृंगारलेले असत.पालखी म्हणजे नरवाहन उपयोगात होते.
(९) वेशस्त्रीया : सर्वसाधारणपणे भारती समाजात स्त्रीपुरुषांचे आचरण एकमेकांसंबंधाने चांगले होते व ते दोनही बाजूने पाळले जात होते. राजे वेशस्त्रीया (वेश्या नव्हेत) बाळगत. राख, ठेवलेली स्त्री, असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांचे आचरण उत्तम असे व विवाहित बायको नंतर त्यांना योग्य अशी वागणुक व आदरही मिळे.
(१०) आचरण : शुद्ध आचरण, स्पष्टोक्ति, वडीलधार्‍याबद्दल आदर, उद्योगशीलता व शीलाचे महत्व या बद्दल लोकांची ख्याती होती.
चोरीचा अभाव हा एक विशेष.मेगॅस्थिनेसने लिहले आहे कीं, " चंद्रगुप्ताच्या प्रचंड सैन्याच्या छावणीत सरासरी चार लाख माणसे असावीत, परंतु प्रत्यही फारच थोड्या चोर्‍या झाल्याची खवर येत असे, आणि दोनशे द्राम(रुपये) पेक्षा अधीक किंमतीची एकंदर चोर्‍यांची मालमत्ता नसे" म्हणजे चोरी नाहीच म्हणाना.( चंद्रशेखरजी, नोंद करा. तुमच्या हिशेबाने २५०० वर्षांपूर्वी एका राजाकडे इतके सैन्य शक्य आहे का ?) देण्याघेण्याचे व्यवहारही विश्वासावर होत,साक्षी किंवा दस्तऐवज करून नव्हेत.
(११) देहत्याग आणि प्रेतविधि : घरी आजारपणाने मरणे दुर्दैवी समजले जाई. क्षत्रियाने संग्रामात किंवा अरण्यात मरणे श्रेयस्कर मानत. चीतेत वा जलात समाधी घेणे धैर्य़धर माणसाचे लक्षण मानले जाई. मृत्यूनंतर जाळने वा पुरणे नसावे असे युद्धोत्तर लेखावरून वाटते. सर्व वीर रणांगणावर पडलेले राहिले. पशूपक्षांनी त्यांची विल्हेवाट लावावी.
(१२) वाहने : हत्ती, चार घोड्यांचा रथ, उंट व एक घोड्याचा ही उतरत्या क्रमाची वाहने.नरवाहन (पालखी) होतीच. खेचरे व गाढवेही वाहनाकरिता वापरत. ओझ्याकरिता बैल असे.
(१३) शिकार : हल्ली प्रमाणेच. घोड्यांचा वापर जास्त असावा.
(१४) पडदा : उच्च वर्णियांत असावा. कनिष्ट वर्गात नक्कीच नाही.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला लेख

महाभारताचाच जास्त उपयोग करणे उचित. तरीही इतर संदर्भही उपयोगात आणले आहेत.

हे इतर संदर्भ कोण-कोणते वापरलेत ते जाणून घ्यायला आवडेल.

मांसाहार सर्व वर्णात होता पण ब्राह्मणात तो हळूहळू कमी होऊ लागला होता. तरीही यज्ञातील पशूच्या मांसभक्षणाला तेही तोंडभार लावत.

हे महाभारत काळात घडले याला काही संदर्भ आहे का? माझ्यामते हे जैन आणि बौद्धधर्माच्या उगमापासून होऊ लागले. चू. भू. दे. घे. हेच मद्याबाबत. सदर निषेध कधी सुरु झाले? इ.स.पूर्व ३००० च्या काळात की नंतर? द्वारकेत मद्याला बंदी होती असे संदर्भ कोठे सापडतात? (म्हणजे महाभारतातील कोणत्या खंडात?)

राजाचे, शुद्राचे, पती वा मुलगा नसणार्‍या स्त्रीचे, सावकाराचे, वेश्येचे, व्यभिचारिणीचे, वैद्यांचे, प्रजापालनावर नियुक्त असलेल्या अधिकार्‍याचे, वगैरे अन्न वर्ज आहे.यादी मोठी व रंजक आहे.

यादी खरेच रंजक आहे. राजा, शूद्र, व्याभिचारणी, वैद्य, सावकार वगैरेंना एका यादीत बघून मजा वाटली. :-)

विधवा सर्वसाधारणत: पांढरी वस्त्रे वापरत.

विधवेने लाल रंगाचे वस्त्र घालण्याची पद्धत कधी पडली असावी?

पडदा : उच्च वर्णियांत असावा. कनिष्ट वर्गात नक्कीच नाही.

स्त्रियांसाठी पडदा?? महाभारत काळात? पटले नाही. संदर्भ द्यावेत.

कापूस, रेशीम व लोकर यांची वस्त्रे साधारणत: वापरली जात

महाभारत काळात रेशीम नव्हते असे भांडारकरीय संशोधनावरून दिसते. अगदी, राजस्त्रीयाही अभावाने रेशीम वापरत असाव्यात. महाभारत काळात अळशीच्या तंतूंनी बनलेले क्षौम हे वस्र वापरले जाई. कौशेयाचे संदर्भ हे महाभारतात नंतर घुसडलेले आहेत असे मानले जाते. यावर उपक्रमावर पूर्वी चर्चा झाली होती. आता ती मला सापडत नाही आहे.

संदर्भ

यावर गौरी लाड यांचा महाभारत : एक पुरातत्वीय दृष्टीकोन, भा.इ.सं.मं. ६४ : १ जुलै, १९८५ हा लेख वाचनीय आहे.

या लेखानुसार मूळ महाभारताच्या प्रतीमध्ये (भांडारकर संशोधित प्रत) साखर, रेशीम, काच, चलनी नाणी यांचे उल्लेख नाहीत. याचा सरळ अर्थ म्हणजे महाभारत या वस्तू उपयोगात येण्याआधी लिहीले गेले असावे.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

महाभारताचा काळ

हा लेख येथे चढवल्याबद्दल धन्यवाद. राजेंद्रने हा लेख माझ्याकडे मागेच दिला होता पण हापिसातून तो उपलब्ध नसल्याने पंचाईत होते.

महाभारताच्या काळाबद्दल गौरी लाड लिहितात ते विचारकरण्याजोगे आहे.

सुधारित आवृत्ती

श्री. राजेन्द्र यांनी उपलब्ध करून दिलेल्या श्री. गौरी लाड यांच्या लेखामुळे सुधारीत आवृत्तीची सुरेख माहिती
मिळाली. आता प्रश्न असा की, ही आवृत्ती समोर ठेऊन लेखन करणॆ तर मला शक्य नाही(व मी ते पहिल्यांदीच
नमूद केले आहे), असे असतांना मुंबई किंवा निलकंठ प्रत समोर असेल तर काय करावयाचे? यक्षप्रश्न आहे.
तूर्तास श्री. प्रियाली यांनी उपस्थित केलेले मुद्दे व त्याबद्दल आजच्या प्रतीत असलेली माहिती देऊन (कारण
ती जवळ्जवळ लिहून तयार आहे) नंतर काय करावयाचे ते ठरवू.
शरद

महाभारत आणि मद्य

महाभारतातील खांडव-दाह पर्वातील काही भाग येथे देते -

कृष्ण आणि अर्जुन क्रिडेसाठी यमुनातिरी गेले असता, सोबत सर्व राजस्त्रियांना घेऊन गेले. तिथे त्यांनी मनसोक्त क्रिडा केली. द्रौपदी आणि सुभद्रा पिउन इतक्या तर्र झाल्या होत्या की आपली उंची वस्त्रे आणि आभूषणे त्यांनी इतरांना वाटून टाकण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेतील काही स्त्रिया खेळत होत्या, गात होत्या, नाचत होत्या अगदी भांडाभांडीही सुरु झाली होती. कृष्ण आणि अर्जुन या सर्व क्रिडांची गंमत लुटत होते. पांडवांच्या वैभवाची साक्ष देता येईल असे वातावरण तेथे होते. यानंतर त्यांनी काही वेळ एकांतात घालवण्याचे ठरवले आणि ते उठून एका निर्जन स्थळी गेले. तेथे त्यांनी आपल्या भूतकाळाच्या आणि शौर्याच्या खूप गप्पा मारल्या.

अचानक एक तेज:पुंज ब्राह्मण त्यांच्यासमोर उभा राहीला. त्याची झळाळती कांती आणि दाढी उगवत्या सूर्याची आठवण करून देत होती. त्याने या दोघांकडे त्याला तृप्त करण्याची अभिलाषा प्रकट केली. अर्जुन आणि श्रीकृष्णाने अधिक विचारता त्याने सांगितले की तो साक्षात अग्नी असून त्याची भूक प्रचंड आहे आणि ती एखाद्या प्राण्याने मिटण्यासारखी नसून संपूर्ण खांडववनच त्याची क्षुधाशांती करू शकेल.

हे शब्दशः भाषांतर नाही, एक थोडक्यातला अनुवाद आहे.

अशा अनेक उतार्‍यांवरून महाभारतातील पुरुष आणि स्त्रिया दोघे मद्यप्राशनात रुची राखून होते असे दिसेल. रामायणात तर सीतेने गंगेला १०० घड्यांचा मद्याचा नैवेद्य दाखवण्याचे संदर्भ आहेतच.

संदर्भ

संदर्भ

श्री. प्रियाली यांनी निरनिराळ्या गोष्टींबद्दल संदर्भ मागितले आहेत.संदर्भ देण्यास काहीच हरकत नाही पण एक तर त्यामुळे लेखाची लांबी वाढते व किती जण महाभारताचे आठ खण्ड उघडून बघत बसणार असेही वाटते.राहू दे.पुढील लेखापासून तसेही करावयाचा प्रयत्न करीन.
मांसाहार : निवृत्त्तीमार्ग उपनिषदांपासून सुरू झाला. पण आचरणात आणावयाला अवघड असल्याने तो प्रथम ब्राह्मणांनी स्विकारला. जैन व बुद्ध धर्म तो सर्वांकरिता सांगतो हे खरे व त्याचमुळे त्याची प्रसिद्धी जास्त झाली. ऐहिक सुखे नाकारावयाची असतील तर मद्य-मांस सोडणे आलेच.अहिंसेचा महिमा गीतेतही वर्णला आहे.
महाभारतात अनुशासन पर्व अ. ११५ मांसाहाराचा निषेध व ११६ अहिंसेचे फळ अशी आहेत.एका गरीब ब्राह्मणाला एका वैश्याचा धक्का लागला व तो पडल्यामुळे आक्रोश करू लागल्यावर इंद्राने शृगालाचे रूप घेऊन त्याला उपदेश करताना सांगितले की " न त्वं स्मरसि वारुण्यालट्वाकानांच पक्षिणाम ! ताभ्यां चाभ्यधिके भक्ष्यो न नकश्चिद्विद्यते क्वचित !! तुला मद्याचे वा लट्वाक पक्षाच्या मांसाचे कधी स्मरण होत नाही; यांपेक्षा जास्त चांगले भोजन जगात नाही तरीही त्याचा त्याग करणार्‍या तुझ्या सारख्याने इतर गोष्टींचा शोक कशास करावयाचा?"(शांतीपर्व अ. १८०) या उल्लेखांवरून ब्राह्मणांनी मद्य व मांस सोड्ल्याचाचे दिसते.
मद्य :मद्याचा वापर कमी होऊ असे म्हणताना सुरवात ब्राह्मणांपासून झाली. इतर त्रीवर्णात सुरापान निषिद्ध नव्हते. योद्धे युद्धावर जाताना सुरापान करत होतेच. आणि स्त्रीया त्याला वर्ज मानत असेही दिसत नाही. मुद्दा चातुर्वर्णांपैकी एकाने सोडले म्हणून वापर कमी झाला असे म्हटले. आदीपर्व अ.१०६ मध्ये शुक्राचार्य-कचाची गोष्ट येते. त्यात शुक्राचार्यांनी शापवाणीने मर्यादा घालून दिली कीं " (आपले व्यसन नष्ट व्हावे व ब्राह्मणांना ते लागू नये म्हणून) जो कोणी ब्राह्मण या पुढे मोहाने वा स्वत:च्या मूर्खपणाने सुरापान करेल तो धर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण हत्येचे पातक शिरी घेईल." सुरापान हे पंचमहापातक उपनिषदातही सांगितले आहे.मौसलपर्व अ.१ मध्ये दिले आहे कीं ".. मग बलराम,कृष्ण, आहुक व ब्रभ्रु यांच्या आज्ञेवरून दवंडी पिटवली गेली की " आजपासून वृष्णी व अंधक यांच्या कुळातील सर्व पुरुषांनी व नगरातील इतर कोणी मद्यपान केल्याचे उघडकीस आले तर त्याला त्याच्या बांधवासकट तात्काळ जिवंत सूळी दिले जाईल."तरीही मद्यपानाचा अतिरेक करून यादवांनी एकमेकांचा नाश केला. आजही गुजराथमध्ये दारूबंदी आहे व ती सर्रास मोडली जाते याचे मूळ ५००० वर्षांपूर्वीच्या इतिहासात पाहिले पाहिजे.
पडदा : युद्धानंतर, स्त्रीपर्वात, जेंव्हा स्त्रीया रणभूमिकडे जाऊ लागल्या तेंव्हा बुरख्याचा उल्लेख आहे.असेही म्हटले आहे की
आबालवृद्ध सर्व शोकाकुल होऊन हंबरडे फोडूं लागले, "अहो! प्रत्यक्ष देवांसही ज्यांचे नख कधी दिसले नाही, त्याच स्त्रीया आज अनाथ झाल्यामुळे नीच लोकांच्याही नजरेस पडत आहेत! हा बुरख्याचा अप्रत्यक्ष उल्लेख समजावा.
विधवांची श्वेत वस्त्रे : धृतराष्ट्रास त्याच्या विधवा सुना अरण्यात भेटावयास गेल्या त्या वेळेस त्यांचे वर्णन इतर स्त्रीयांहून भिन्न असे"शुक्लोत्तरीय नरराजपत्न्य:" केले आहे. त्यावरून असे वाटते की विधव्चा स्त्रीया पांढरी वस्त्रे परिधान करत असाव्यात(.आश्रमवासिक पर्व, अ. २५.) लाल अलवाणाची पद्धत नंतर बुद्ध-जैन संन्यासिनींच्या रक्त पटाच्या अनुकरणाने पडली असावी.
शरद

गफलत

शरद यांची महाभारतावरून निष्कर्ष काढण्याची पद्धत वाचनीय असली तरी घाईची असल्याने त्यात गफलत असल्याचे आढळते. उदा.

मृत्यूनंतर जाळने वा पुरणे नसावे असे युद्धोत्तर लेखावरून वाटते. सर्व वीर रणांगणावर पडलेले राहिले. पशूपक्षांनी त्यांची विल्हेवाट लावावी.

मृत्यूनंतर जाळणे अथवा पुरणे नसावे असे सरसकट विधान कसे केले असावे हे कळत नाही. महाभारतात सती जाण्याचे उल्लेख आहेत, युद्धानंतर वीरांच्या उत्तरक्रिया, अगदी शत्रूपक्षातील वीरांच्या उत्तरक्रिया केल्याचे उल्लेख आहेत. असे असताना सर्व वीर रणांगणावर पडलेले राहिले या वाक्यात तथ्य दिसत नाही. उत्तरायण सुरु झाल्यावर भीष्मांनी प्राण त्यागले त्यानंतर उत्तरक्रिया केल्याचे संदर्भ महाभारत देते. युद्धानंतर महिनाभर सूतक (याला सूतक म्हणावे का माहित नाही परंतु महिनाभर दुखवटा पाळला गेला) पाळले गेले. वीरांचे विधी करण्यात आले. भीष्मांच्या अस्थिंचे विसर्जन गंगेत करण्यात आले असेही वाचले आहे पण या वाक्याची सत्यासत्यता महाभारतातील शांतीपर्व वाचल्यावर देता येईल.

ज्या वीरांची शरीरे ओळखण्या पलीकडे गेली असावीत किंवा ज्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कोणी पुढे आले नसावे त्या वीरांच्या मृतदेहाची विल्हेवाट पशूपक्ष्यांनी लावणे शक्य वाटते.

संदर्भ देण्यास काहीच हरकत नाही पण एक तर त्यामुळे लेखाची लांबी वाढते व किती जण महाभारताचे आठ खण्ड उघडून बघत बसणार असेही वाटते.राहू दे.पुढील लेखापासून तसेही करावयाचा प्रयत्न करीन.

निदान मी तरी बघेन वेळ होईल तसा म्हणून द्यावेत.

महाभारतात अनुशासन पर्व अ. ११५ मांसाहाराचा निषेध व ११६ अहिंसेचे फळ अशी आहेत.....या उल्लेखांवरून ब्राह्मणांनी मद्य व मांस सोड्ल्याचाचे दिसते.

एका ब्राह्मणाच्या गोष्टीवरून समस्त ब्राह्मणांनी मांसाहार सोडला होता असे म्हणणे थोडे घाईचे वाटते. खांडववनाच्या गोष्टीत येणारी अग्नीची कथा वर आहेच. त्यामुळे संदर्भ निष्कर्ष काढण्यास अपुरे आहेत.

शुक्राचार्य-कचाची गोष्ट येते. त्यात शुक्राचार्यांनी शापवाणीने मर्यादा घालून दिली कीं " (आपले व्यसन नष्ट व्हावे व ब्राह्मणांना ते लागू नये म्हणून) जो कोणी ब्राह्मण या पुढे मोहाने वा स्वत:च्या मूर्खपणाने सुरापान करेल तो धर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण हत्येचे पातक शिरी घेईल."

शुक्राचार्य हे असुरांचे गुरु. असूर म्हणजे जे सूर नाहीत, सुरापान करत नाहीत ते असतील तर शुक्राचार्यांचा नियम सर्व जनपदांना किंवा मानवजातीला लागू असेलच असे नाही. तेव्हा हा संदर्भही पटणारा नाही. थोडका आहे. बलराम, श्रीकृष्ण वगैरे ब्राह्मण नाहीत. यादवांच्या राज्यात सुरापानास बंदी मुसळाच्या प्रकारामुळे वंश वाचवण्याच्या भीतीतून घडली. इतर राज्यांत तशी प्रथा किंवा समज वाढीस लागल्याचे दिसत नाही. मी मौसल पर्व वाचले असे येथे नमूद करते.

"अहो! प्रत्यक्ष देवांसही ज्यांचे नख कधी दिसले नाही, त्याच स्त्रीया आज अनाथ झाल्यामुळे नीच लोकांच्याही नजरेस पडत आहेत! हा बुरख्याचा अप्रत्यक्ष उल्लेख समजावा.

नाही तसे समजता येणार नाही. ही केवळ काव्यात्मक कल्पना वाटते. महाभारतात बुरखा घालणार्‍या स्त्रिया होत्या हे मला थोडेसे हास्यास्पद वाटते. भारतात मुसलमानी शासन येईपर्यंत बुरखा किंवा पडदा पद्धत नव्हती असे दिसते. डोक्यावरून पदर घेण्याची पद्धतही नसावी. अजंठामधील चित्रांवरून, सिंधू संस्कृतीतील बायकांच्या शिल्पांवरूनही हे दिसून येईल.

गौरी लाड यांचा लेख वाचला तर लक्षात येते की महाभारतात एकदा किंवा दोनदा,अभावाने येणारे उल्लेख पुरावे म्हणून बरेचदा गणले जात नाहीत. असे संदर्भ मागाहून महाभारतात घुसडण्यात आले असावेत असे मानले जाते.

 
^ वर