अरे, आपल्याला आपली संस्कृती वगैरे काही आहे की नाही?
"बरोबरच आहे, मी तर म्हणतो की अशा लोकांना नंगे करुन चाबकाने फटके हाणले पाहिजेत. अरे, त्या गोऱ्याला एक काही लाजलज्जा नसेल, पण तुमचे हात काय केळी खायला गेले होते काय? तुम्हाला सांगतो, या बायकांच्या हात चार पैसे पडले की या लाजलज्जा कोळून पिणार बघा! मागे तो चार्ल्स का कुणीतरी आला होता तेंव्हा अशीच एक आपली बया त्याच्या गळ्यात पडली होती. हो! ती तर चांगली कोल्हापूरची मराठमोळी पोरगी! आणि आता हे... मग? कर्नाटक काय हिंदुस्थानात नाही? अरे तुम्हाला काय नंगानाच करायचा तो बंद दाराआड करा की! हे परदेशी वारं आपल्या संस्कृतीला उडवून लावेल बघा! सांगून ठेवतो मी! मी? मी काही नाही असलं चालू देत बुवा! घरी पहिल्या दिवसापासून बायकोला बजावून ठेवलंय. नाही.... असशील म्हटलं तू काय ते सॉफ्टवेअर इंजिनियर बिंजीनियर, पण घरात नखरे नाही पायजेत! कुळाचार, सणवार अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजेत. महिन्यातले चार दिवस तुझी शिवाशीवसुद्धा चालणार नाही म्हटलं! तेच पोरीला! परवा कोपऱ्यावर कुठल्या तरी पोराशी बोलत होती. घरी आल्यावर चांगली फोडून काढली! म्हणत होती काहीतरी मित्र आहे चांगला वगैरे... म्हटलं बापाला शिकवू नकोस! त्या मुसलमानाशी मैत्री? असली थेरं चालू दिली तर उद्या कुणाचा तरी हात धरुन पळून जाशील आणि माझ्या तोंडात शेण घालतील लोक! तर तर! अगदी! श्राद्धं, पक्ष, अनंताची पूजा, झालंच तर श्रावणातला सत्यनारायण - काही म्हणजे काही चुकत नाही! सत्यनारायणाचा प्रसाद तर पायलीच्या हिशेबानं करतो आपण! घरातल्या पूजेचा प्रसाद आईकडं पोचवल्याशिवाय पानावर बसत नाही मी! ती? ते यार जरा लफडंच आहे. जरा कटकटीच आहे म्हातारी! दोन वर्षांपासून शेवटी वृद्धाश्रमातच टाकलंय. सांगीन तुला कधीतरी डीटेलमध्ये! बसू एकदा निवांत! तर सांगत काय होतो, अरे तुम्हाला तुमच्या परंपरा, तुमचे संस्कार असलं काही आहे की नाही? कोण रे ती? नेन्यांची वसू वाटतं! आयला, काय भरलीय रे! चान्स घेतला वाटतं कुणीतरी! अरे आणि तुझ्या त्या देशमुखाची बायको बघीतली रे परवा! माल आहे रे माल! कुठं म्हणजे? सिद्धीविनायकाच्या रांगेत उभा होतो तिथंच दिसली. संकष्टी आणि चतुर्थीलापण! पंधरा वर्षात एक खाडा नाही मिस्टर! एकदा तर अंगात दोन ताप होता, पण म्हटलं, कुछ नही! कुठलं काम? अरे ते सचिवालयातलं होय? ते झालं की! आला होता तो चोरडिया परवा. त्याला सागितलं सरळ, म्हटलं भैय्या, साहेबांचे दहा टक्के आणि माझे पाच! तीनवर तोडा म्हणत होता साला.. शेवटी फाईल दाबून ठेवली आठ दिवस आणि झक मारत पाकीट घेऊन आला! आपलं तत्त्वंच आहे बंधो... एक हाथ दो एक हाथ लो! या शनिवारी? नाही जमणार रे! सत्संगाला चाललोय नगरला! अरे दादांची कृपा आहे म्हणून हे दिवस बघतोय! पण संध्याकाळपर्यंत परत येणार आहे. रात्री चालेल की! कर्नलला सांग, म्हणावं या वेळी दुसरा कुठला ब्रॅंड नको - आर सीच आण! अरे मिलिट्री काय, शेवटी आपल्याच बापाची! बसू माझ्याकडेच! सोमवारपासून बाकी नाही हां... नवरात्र फुल असतं आपल्याकडे! अरे, आपल्याला आपली संस्कृती वगैरे काही आहे की नाही?
Comments
धमाल आहे
संजोप राव
नाट्यछटा धमाल आहे. वाचून खूपच मजा आली.
सर्किट
संजोपरावांचा गंडा बांधा. मोठी मजल माराल.
विनायक
हा हा....
तुपात भिजवलेल्या शेंड्या जळाल्यामुळे येणारा खरपूस वास अजून नाकात आहे. :)
वा!
मस्त! नाट्यछटेतल्या सगळ्या छटा उत्तम उतरल्यात.
वा . रावसाहेब.
रावसाहेब फारच झकास .
माफ करा..
माफ करा रावसाहेब,
तुमच्या दिवाकरशेठच्या नाट्यछटा आम्हाला शाळेतही अभ्यासाला होत्या. पण ना तो साहित्यप्रकार आपल्याला कधी कळला, ना कधी आवडला.
त्यात तुमच्या दिवाकरशेठची काय गलती नाय बरं का. साला आपल्या टक्कुर्यात 'नाट्यछटा' हा विषय कधी शिरलाच नाही.
पर का वो असं म्हन्तो मी? काही सांगू शकाल का?
तात्या.
पसंद अपनी अपनी...
'चार दिवस सासूचे' मला अजिबात आवडत नाही
माझ्या बायकोला क्रिकेट अजिबात आवडत नाही
सीताफळ मला अजिबात आवडत नाही
कलिंगड माझ्या मुलाला अजिबात आवडत नाही
हिमेश रेशमिया हा गायक मला अजिबात आवडत नाही
बाबा कदम हा लेखक मला अजिबात आवडत नाही
हे असे का याला काही उत्तर नाही. 'पसंद अपनी अपनी' एवढेच म्हणूया फार तर!
सन्जोप राव
असं का?
बाबा कदम हा लेखक मला अजिबात आवडत नाही
असं का? बरं बरं!! ;)
आपला,
(सरकारी रेस्टहाऊसमधला!) तात्या.
विरोधाभास
माणसाच्या मनोवृत्तीमध्ये असणारा विरोधाभास अचूक पकडला आहे. नाट्यछटा आवडली.
वा
नाट्यछटा खूपच आवडली. विरोधाभास अगदी ठळक उमटला आहे. विरोधाभास दाखवण्यासाठी परंपरांएवढा उत्तम विषय दुसरा नाही. त्यामुळे विषयाची निवडही विरोधाभासी नाट्यछटेसाठी अतिशय अनुरूप आहे.
नाट्यछटा....
ही नाट्यछटा आवडली असे कळवणार्यांचे आभार. नाट्यछटांचे पुनरुज्जीवन वगैरे करावे असा माझा हेतू नाही. विस्मरणात गेलेल्या या साहित्यप्रकाराचे लोकांना स्मरण झाले, अधूनमधून हा फॉर्म वापरुन पहावासा वाटला, तरी पुष्कळ आहे.
सन्जोप राव
झक्कास आहे
.......अनघा पालेकर
मस्तच
नाट्यछटा खूपच सुंदर आहे. अतिशय आवडली.