खेळ

मराठी भाषा शिकणे व शिकवणे हे दोन्ही कठिण आहे असे माझे ठाम मत आहे. उदा. आमची मुलगी मधील ‘च’ चा देशी उच्चार आमच़ा मुलगा मध्ये पर्शियन होऊन येतो. र्‍हस्व दीर्घाचे ’अनियमित’ नियम जाणून घेताना तर सर्वच मराठी जनांची फेंफें उडते, तिथे अमराठी जनांची काय कथा? इंग्रजी भाषा शिकताना जसे 'का' विचारणे व्यर्थ आहे तशीच काहीशी स्थिती मराठी भाषा शिकताना होते. असे असताना गेल्या आठवड्यात योगायोगाने काही इंग्रजी माध्यमातील इ. ५-६-७-८ वीच्या विद्यार्थ्यांना अमराठी मुलांना मराठी शिकवायचा योग आला. ’हसत खेळत शिकविणे’ हे माझे तत्त्व असल्यामुळे एक गंमत म्हणून आपण लहानपणी खेळायचो तो ’नाव, गाव, फळ, फुल, रंग, प्राणी, पक्षी, खेळ, वस्तु’ हा खेळ घेतला. आधी मुलांना वाटले की हे सर्व इंग्रजीतून लिहायचे आहे. पण जेव्हा मराठी भाषेतील शब्द वापरायचे आहेत हे कळले तेव्हा त्यांचा विरस झाला. तरी पण त्यांनी नेटाने प्रयत्न करून, दिलेल्या संकेतांच्या आधारे बरेचसे शब्द शोधून काढले. त्यातल्या त्यात नाव, गाव, वस्तुंची नावे शोधणे त्यांना फारसे कठिण गेले नाही. मात्र ‘ह’ अक्षरावरून पक्षी शोधणे, ‘ब’ आणि ‘म’ वरूनफळे व रंग शोधणे, ‘र’ वरून खेळ शोधणे इ. इ. मला पण कठिण गेले. पुलंच्या ‘असा मी असामी’ चा पगडा असल्याने ‘ब’ आणि ‘म’ वरून रंग शोधायचा विचार आला तेव्हा मनात बैंगणी व मळखाऊ असे दोन शब्द रुंजी घालायला लागले. असो.

मला आठवलेली काही फळ, फुल, प्राणी, पक्षी, रंग व खेळ ह्यांची नावे सोबत देत आहे. त्यामध्ये आपणही भर घालावी ही विनम्र विनंती. तसेच काही शब्द मुद्दामच पांढर्‍या रंगात देत आहे. आपल्याला जमले तर आपण आधी आठवून पहा आणि आठवले नाहीच तर मात्र ते शब्द पहायला हरकत नाही.

वर्ण फळ फुल रंग प्राणी पक्षी खेळ
बदाम बकुळ बदामी बेडूक, बैल बगळा -
रामफळ रातराणी राखाडी, राणी रेडा - -
- - हिरवा हत्ती होला, हळद्या हुतूतू
मोसंबे मोगरा, मल्लिका मोरपिशी माकड, मगर, मांजर, म्हैस मोर -
खरबुज - - खवले मांजर - खो - खो
चिकू चमेली, चाफा चंदेरी चित्ता चिमणी चोरपोलीस
सीताफळ, सफरचंद - सोनेरी, सफेद साळींदर, सरडा, ससा साळुंखी, ससाणा सारीपाट
पिस्ता पारिजात पिवळा, पोपटी पांडा ससा पोपट पकडापकडी
अननस, अंजीर अबोली, अर्किड अबोली, अंजिरी अस्वल - आंधळी कोशिंबीर

Comments

द्राक्ष, दवणा, -, -, -, दोरीच्या उड्या.

--------------------------X--X-------------------------------
कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे?

पर्शियन् च़?

पर्शियन लिपीत च़ आहे? मला माहीत नव्हते.
बदामी, हिरवा चाफा, हिरडा, राखी, राखाडी, रामा, रावा, रप्पारप्पी, मोतिया, सदाफुली, ससाणा.--वाचक्नवी

माफ करा,

पर्शियन लिपीत च़ आहे? मला माहीत नव्हते.

पर्शियन लिपी मला पण येत नाही पण नुक्तयुक्त च देण्याच्या उद्देश असा की तो उच्चार (पर्शियन भाषेत केला जाणारा) 'हलका च' उच्चार आहे असे दर्शविणे. ह्याच मंचावर पूर्वी शुद्धोच्चारण कार्यशाळेविषयी मी वाचले होते. त्या कार्यशाळेत मला जाण्याचा योग आला व तिथेच ही माहिती कळली होती. असो.

अन्य उदाहरणे - सोनचाफा, मामाचे पत्र हरविले, आकाशी, पत्ते.

क - कलिंगड, काजु, कमळ, काळा, कुत्रा, कावळा, कब्बडी.
--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

स्वाक्षरीत रंग वापरून टॅग उघडला असल्यास तो कृपया बंद करावा.

हे असे आहे का? का आहे?

र्‍हस्व दीर्घाचे ’अनियमित’ नियम जाणून घेताना तर सर्वच मराठी जनांची फेंफें उडते
या वाक्याने अंतर्मुख केले. उच्चारानुसार लघु उच्चाराचे र्‍हस्व स्वरुप व गुरुचे दीर्घ असे एकदा पक्के झाले की सहसा चूक होऊ नये. 'मी' हा शब्द चुकूनही 'मि' अस लिहिला जाईल का? 'दुसरा' हा शब्द 'दूसरा' असा (मराठीत, हिंदीत उच्चारही दीर्घ आहे!) असा लिहिताना चुकल्यासारखे वाटणार नाही का? की आपण उच्चारही चुकीचे करतो आहोत?
'र्‍हस्व दीर्घाचे ’अनियमित’ नियम जाणून घेताना तर सर्वच मराठी जनांची फेंफें उडते' या वाक्यातल्या 'सर्वच' या शब्दाच्या जागी 'सामान्य' असे लेखिकेला म्हणायचे आहे, असे मी समजतो.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!

मी असे ऐकले आहे.
ऊर्ध्वबाहु वृणोम्येष न कश्चित् शृणोति माम् | --वाचक्नवी

मान्य आहे,

'र्‍हस्व दीर्घाचे ’अनियमित’ नियम जाणून घेताना तर सर्वच मराठी जनांची फेंफें उडते' या वाक्यातल्या 'सर्वच' या शब्दाच्या जागी 'सामान्य' असे लेखिकेला म्हणायचे आहे, असे मी समजतो.

मराठी वृत्तपत्रे, मराठी प्रथम भाषेचे विद्यार्थी ह्यांचे लेखन पाहता र्‍हस्व-दीर्घाचे नियम हे सामान्य वकुबाचे काम नाही ह्यावर जणू शिक्कामोर्तब होते. असे सामान्यजन समाजात शेकडा ९५ आढळतील. फार लांब जावयांस नको, मराठी शब्दसंपदेचे काम करणारे जाहिरातदार, कवी, लेखक पण एकुणच र्‍हस्व-दीर्घाच्या नियमांना टरकून असतात असे जाणवते. उदा. जालावरून इ-पत्राने प्राप्त होणार्‍या कविता, मान्य वृत्तपत्रातील जाहिराती.

मला पण मराठी भाषेत लिहिताना क्षणोक्षणी प्रश्न पडतात. उदा. संस्कृतमधील इत प्रत्यत मराठीत ईत होऊन येतो कारण मराठीची प्रवृत्ती दीर्घाकडे झुकणारी आहे उदा. करीत, वापरीत इ. मात्र तोच ईत प्रत्यय मागवित, विनवित असा र्‍हस्व कधी होतो तेच कळत नाही. मंदिर हा शब्द सर्रास मराठी प्रमाण पुस्तकांच्यात पण आढळतो. मला तर कित्येक वर्षे सुर्य हाच शब्द योग्य वाटत आला होता. मला वाटते, ह्या सर्वाला शासनाचे मराठी व्याकरणाबाबतचे धरसोडीचे धोरणच कारणीभूत आहे.

असो. वरील सर्व मते माझी आहेत आणि ती कोणावरही बांधील नाहीत. कारण शेवटी मी पण एक सर्वसामान्य मुलगी आहे.

--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

मागवीत, विनवीत...

संस्कृतमधील इत प्रत्यत मराठीत ईत होऊन येतो कारण मराठीची प्रवृत्ती दीर्घाकडे झुकणारी आहे उदा. करीत, वापरीत इ. मात्र तोच ईत प्रत्यय मागवित, विनवित असा र्‍हस्व कधी होतो तेच कळत नाही.?????
संस्कृतमधील इत प्रत्यय धातूंना त्यांचे क.भू.धा.वि. करताना लागतो. असे संस्कृत शब्द मराठीत लिहिताना तसेच लिहितात. सुधारित, स्वरित, हरित, आधारित, प्रथित(यश), मथित, व्यथित, बाधित, पठित, वगैरे. मराठी ईत प्रत्यय (१) धातूंचे चालू काळातील रूप करताना लागतो. मी सुधारीत/करीत/मागवीत/विनवीत/ताक मथीत आहे इत्यादी.
(२)मराठी ईत प्रत्ययाचा उपयोग आणखी एका प्रकारे खालील शब्दांत होतो. करकरीत, घसघशीत, पटाईत, बागाईत, भालाईत, सराईत, भाकीत, वगैरे.
यावरून नियमः संस्कृत तत्सम शब्दांतला इत र्‍हस्व लिहावा. मराठी शब्दांतला अन्त्य ईत दीर्घ लिहावा. अकारान्त मराठी शब्दांतले ई/ऊकार नेहमी दीर्घच असतात.
तोच नियम इक प्रत्ययासाठी. संस्कृत शब्दांत र्‍हस्व, मराठी शब्दांत दीर्घ. कायिक, वाचिक, मासिक, आधिभौतिक, पारंपरिक, वास्तविक इ.इ. मराठीत दीर्घ:गिर्‍हाईक, तर्‍हेवाईक, वगैरे.
थोडक्यात काय? जसा उच्चार तसे लिखाण. सृष्टिलावण्या--सृष्टीऽऽलावण्या नाही, म्हणून ष्टि र्‍हस्व!
म्हणून, मंदिर, मलिन, तरुण, करुण इ.इ.--वाचक्नवी

चांगली माहिती.

नक्की लक्षात ठेवेन.

असो.

जाता जाता : मी मात्र सृष्टीलावण्या मधला 'ष्टी' दीर्घच उच्चारते :) चालायचे, व्यक्ती तितक्या प्रकृती !
--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

मागवीत, विनवीत...

आणखी एक युक्ती: ईतऐवजी अत लावून चालत असेल तर ईत, अन्यथा इत. 'सुधारीत'ऐवजी सुधारत; 'करीत'ऐवजी करत जिथे चालते, तिथे ईत; 'सुधारित वेतन'ऐवजी 'सुधारत वेतन' चालत नाही, म्हणून रि र्‍हस्व.
मराठीतला सप्तमीचा 'त' प्रत्यय जेव्हा इ/ईकारान्त शब्दांना, तसेच अकारान्त स्त्रीलिंगी नामांना लागतो, तेव्हा ईत प्रत्यय लागल्यासारखा वाटतो, तिथेही ईत(दीर्घ). उदा: मुठीत, प्रॉस्ट्रेट ग्रंथीत, वगैरे. परंतु, 'वेदांत सृष्टिलावण्याचे वर्णन चांगल्या प्रकारे ग्रंथित केले आहे' येथे इत!--वाचक्नवी

ईत

माझ्याकडे कित्येकदा इतर भाषांतरकारांची मराठी भाषांतरे पुनरिक्षणासाठी येतात (काय हा मराठीचा छळ ;) :D ) त्यात भूतकाळ दाखविण्यासाठी कोणत्याही शब्दाला ईत लावलेले असते. उदा. कृषित :O तसेच अनेक जण 'स्वाक्षरीकृत केलेले' असा पण शब्दप्रयोग करतात.

--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

'ब्लू मूड' घालवण्यासाठी... - १

</स्प्यान> ट्याग.

अवांतर

"माझे सदस्यत्व" ह्या भागात तो टॅग व्यवस्थित बंद केला आहे. इथे स्वाक्षरी येताना काय होते देव जाणे. असो.

आपण दिलेल्या एचटीएमएल दुव्याबद्दल आभारी आहे. लवकरच त्याचा सखोल अभ्यास करेन. तसे पण मला संकेत-पान बनवायला शिकायचेच होते.
--------------------------X--X-------------------------------
कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

माझा अनुभव

कारण शेवटी मी पण एक सर्वसामान्य मुलगी आहे.

मीही एक सर्वसामान्य मराठीभाषक मनुष्य आहे, परंतु माझ्या अनुभवात मला र्‍हस्वदीर्घाची किंवा शुद्धलेखनाच्या नियमांची फारशी अडचण आल्याचे आठवत नाही. काहीही लिहिताना ते शुद्धलेखनाच्या नियमांस अनुसरून आहे की नाही याबद्दल मला स्वतःलाच शंका येण्याचे प्रकार घडत नाहीत असे नाही, परंतु असे खूपच क्वचित होते. आणि अशा शंकेअभावी माझ्या शुद्धलेखनाच्या चुका होण्याचे प्रमाणही शून्य नसले तरी नगण्य आहे.

शुद्धलेखनाचे नियम लक्षात ठेवण्याच्या भरीला मी फारसे पडल्याचे मला आठवत नाही. किंबहुना, शुद्धलेखनाचे नेमके नियम मला कोणी विचारल्यास मी ते सांगू शकणार नाही. परंतु बर्‍याच अंशी छापील मजकूर वाचताना अनायासे झालेले निरीक्षण आणि काही अंशी स्मरणशक्ती यांची मला भरपूर मदत होत असावी, असे वाटते. क्वचित्प्रसंगी तरीही शंका आल्यास शब्दाचा उगम, फोड वगैरे (सामान्यतः 'स्पेलिंग बी'साठी वापरली जाणारी) तंत्रे कधीकधी कामी येऊ शकतात. (जसे, 'अनसूया' हा शब्द अनेकांकडून हटकून 'अनुसूया' किंवा 'अनुसया' असा लिहिला जातो. किंवा 'प्रियंवदा'ऐवजी 'प्रियवंदा' वगैरे. अशा प्रसंगी आपण वापरत असलेल्या शब्दाचा नेमका अर्थ, उगम, फोड वगैरे गोष्टी माहीत असल्यास किंवा त्याबद्दल अटकळ बांधता आल्यास उपयुक्त ठरू शकते.) परंतु निरीक्षण आणि स्मरणशक्ती हेच बव्हंशी कामी येतात.

त्यातूनही कधी शंका आल्यास आणि विशेषतः जालावर वगैरे लिहीत असलो (तसेही एरवी मराठीतून लिहिण्याची वेळ हल्ली सहसा येत नाही.), तर सरळ जाहीर प्रश्न विचारतो. कोणी ना कोणी उत्तर देतेच. (कोणता स्रोत विश्वासार्ह आहे याबद्दल अटकळ बांधता येणे मात्र महत्त्वाचे आहे.) आणि लिहिताना स्वतःलाच शंका न आल्यामुळे क्वचित्प्रसंगी जर चूक झालीच, तर कोणी ना कोणीतरी त्याबद्दल जाहीर हजामत करतेच. त्यातूनही आपल्याच चुका आपल्यालाच कळून सुधारणा होऊ शकते. (चुका सुधारण्याकरिता चुकांबद्दल जाहीर लाथा बसण्याइतका उत्तम मार्ग दुसरा नसावा. अशाने केलेल्या चुका व्यवस्थित - आणि बहुधा आयुष्यभर! - लक्षात राहतात, आणि पुन्हा त्याच चुका होण्याची शक्यता खूपच कमी होते. चुका - मान्य असतील तर - सुधारण्याची इच्छा मात्र हवी. (मान्य नसतील, तर प्रश्नच मिटला. अधिक चर्चा संभवत नाही.))

मात्र, कदाचित आजमितीस शुद्धलेखनाबद्दल एकंदर वाढत चाललेली अनास्था आणि त्यामुळे वर्तमानपत्रांत, जाहिरातींत, जालावर किंवा एकंदरीतच वेगवेगळ्या माध्यमांत चांगल्या शुद्धलेखनाचे नमुने पहावयास मिळणे दुरापास्त होणे यामुळे निरीक्षण-स्मरणशक्ती मार्ग चोखाळणे हे या व पुढील पिढ्यांस अधिकाधिक कठीण आणि निरुपयोगी ठरत असावे. चांगली उदाहरणे डोळ्यांसमोर नसल्यामुळे न जमणे - न जमल्यामुळे अनास्था - अनास्थेमुळे चांगली उदाहरणे डोळ्यांसमोर येण्यासाठी निर्माण न होणे असे हे दुष्टचक्रही असू शकेल. (अनास्थेमागे इतरही अनेक कारणे असू शकतील, परंतु त्यांचा विचार प्रस्तुत चर्चेच्या कक्षेत येऊ नये.)

परंतु मुळात मराठीचे (किंवा इंग्रजीचेसुद्धा) शुद्धलेखनाचे (किंवा स्पेलिंगचे) नियम अनियमित आहेत, हे पटत नाही. हे नियम अनेकदा गुंतागुंतीचे असू शकतात हे मान्य होण्यासारखे आहे. (विशेषतः इंग्रजीच्या बाबतीत अनेक भाषांच्या संस्कारांमुळे थोडी गुंतागुंत वाढू शकते.) परंतु नियम नाहीत, असे नाही. केवळ आपल्याला ते माहीत नाहीत, एवढेच. (एखाद्या पूर्णपणे अनोळखी आणि किचकट शब्दाचे स्पेलिंगसुद्धा 'स्पेलिंग बी'सारख्या स्पर्धेतील प्रतिस्पर्धी विविध तंत्रे वापरून ओळखू शकतात, याअर्थी नियम वाटतात तितकेही 'अनियमित' नाहीत. केवळ ही तंत्रे आपल्याला माहीत किंवा अवगत नाहीत, इतकेच. अर्थात स्पेलिंग बीमधील अनेक शब्दांची स्पेलिंगे ओळखणे हे सामान्य मनुष्याच्या आवाक्याबाहेरचे आहे हे खरेच; परंतु सामान्य मनुष्यास रोजच्या आयुष्यात तितके अनोळखी आणि क्लिष्ट शब्द वापरण्याची वेळही येत नाही, हेही तितकेच खरे. परंतु वेळ पडल्यास सामान्य शब्दांकरिताही अशी तंत्रे वापरण्याचा प्रयत्न तर करता येतो. आणि तसेही अनेकदा तितक्या पुढेही जावे लागत नाही. केवळ निरीक्षणानेही बरेच साध्य होण्यासारखे असते. निरीक्षणसंच मात्र चांगला पाहिजे!)

त्याहीपुढे, नियमावली माहीत असण्याची किंवा तोंडपाठ असण्याचीही फारशी गरज असतेच असे वाटत नाही. (आधी म्हटल्याप्रमाणे, मी स्वतः शुद्धलेखनाचा कोणताही नियम उद्धृत करू शकेन असे वाटत नाही. किंबहुना, नियम पाठ करून काही फायदा होतोच, हे मला व्यक्तिशः फारसे पटत नाही.) मात्र, या बाबतीत intuition चांगले पाहिजे. (मराठी शुद्धलेखन आणि इंग्रजी स्पेलिंग दोहोंसाठी हे लागू आहे.) नियम सांगता आला नाही, तरी कोणता शब्द कसा लिहावा याबाबत डोक्यातले प्रिस्क्रिप्शन पक्के पाहिजे - तो शब्द छापील स्वरूपात डोळ्यांसमोर नाचला पाहिजे, visualize झाला पाहिजे. निरीक्षणाने आणि अनुभवाने हे जमू शकते. मात्र इच्छा, आस्था, चुका करण्याची आणि चुकांबद्दल फटके खाऊन त्यातून शिकून चुका सुधारण्याची तयारी, डोळ्यांसमोर चांगली उदाहरणे, चांगले निरीक्षण आणि सराव या सर्व बाबी आवश्यक आहेत असे वाटते. (मनुष्य मातृभाषा, इतर कोणतीही भाषा किंवा इतर कोणतीही कौशल्येसुद्धा अशीच शिकतो, असे वाटते. आणि भाषेचे नियम - विशेषतः मातृभाषेच्या किंवा प्रथमभाषेच्या बाबतीत - सांगता न येताही मनुष्य भाषा व्यवस्थित बोलू शकतो म्हणजे भाषेचे नियम त्यास आतून कोठेतरी intuitively माहीत असतातच, असे वाटते; चूभूद्याघ्या. आणि हीच कार्यपद्धती शुद्धलेखनासही लागू होऊ शकते असे वाटते. पुन्हा चूभूद्याघ्या.)

शतप्रतिशत सहमत.

मराठीचे (किंवा इंग्रजीचेसुद्धा) शुद्धलेखनाचे (किंवा स्पेलिंगचे) नियम अनियमित आहेत, हे पटत नाही. हे तंतोतंत खरे. मला पिक्चर या इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला, पाचवीत असताना सबंध दिवस लागला होता. त्यानंतर स्पेलिंगे कशी लक्षात ठेवायची हे माझ्या वडिलांनी मला शिकवले. पुढच्या आयुष्यात मला एकही स्पेलिंग घोकावे लागले नाही. अगदी तसेच मराठी शुद्धलेखनाबद्दल. शुद्धलेखनाचा एकही नियम माहीत नसताना माझ्या हातून शुद्धलेखनाची चूक फक्त अनवधानानेच झाली असेल. अगदी शालीय दिवसात सुद्धा! शुद्धलेखनाचे काही नियम मी स्वतः बनवले आहेत तर काही(सर्व नाही!) कुठेतरी वाचलेले आहेत. दुसर्‍यांना सांगण्यासाठीच मला त्यांचा उपयोग होतो. माझ्या नशिबाने, लहानपणीच आणि नंतरही शुद्ध ऐकायला आणि चांगले वाचायला मिळाले. एवढी शिदोरी जन्मभर पुरते.--वाचक्नवी

नागाफफू

धागा आवडला
नागाफफू (असे आम्ही ह्या खेळाला म्हणायचो) त्यात आम्ही नाव, गाव, फळ, फूल, रंग, वस्तु, प्राणी, पक्षी,भाजी, खेळ, पुस्तक आणि लेखक/लेखिका अश्या स्वरूपात खेळायचो!!! :)

माझ्या तर्फे पटकन आठवेल ती भर ह्या रंगात (निळा ट्याग चालु असल्याने काळ्या रांगात ;) )
वर्ण फळ फुल रंग प्राणी पक्षी खेळ

बदाम बोर, बकुळ बिट्टी, बदामी बैंगणी, , बेडूक बैल, बगळा बहीरी ससाणा बदक ,(खेळ???)

रामफळ, रातराणी रासतुरा, राखाडी रेशमी राणी, रेडा रानगवा रानमांजर रान..., रोहीत, राघु(चालेल?), रस्सीखेच


- हिरवा चाफा हिरवा हत्ती होला, हळद्या हरणटोळ, हुतूतू


मोसंबे, मोगरा, मल्लिका मोरपिशी मातकट(?) माकड, मगर, मांजर, म्हैस मोर -


खरबुज -खाकी ,खेचर(असे कसे विसरलात? ;) ) खवले मांजर - खो - खो


सीताफळ, सफरचंद सोनचाफा सोनेरी, सफेद, साळींदर, सरडा, ससा, साळुंखी, ससाणा, सारीपाट, सोनसाखळी


पिस्ता, पेरु पपनस पारिजात पिवळा, पोपटी पांडा ससा पोपट पकडापकडी


अननस, अंजीर,आवळा अबोली, अर्किड, अबोली, अंजिरी,अस्मानी अस्वल अजगर - आंधळी कोशिंबीर आट्यापाट्या

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

मस्त

खूपच मस्त नावे देऊन सोडवलेत.

शब्दांचे खेळ खेळून रंजक पद्धतीने शब्दसंपदा वाढू शकते. सृष्टिलावण्या यांच्याशी मी सहमत आहे.

(पण त्यांच्या काही उदाहरणांशी असहमत आहे. पैकी पर्शियन च़ - या दंततालव्य शुद्ध भारतीय आहे, ह्रस्व-दीर्घ वगैरे. या बाबींबद्दल वर लेखाप्रतिसादी झालीच आहे. ते मुद्दे बाजूला ठेवले असते, तर या छान चर्चेला थेट उत्तरे देणारे वरीलसारखे प्रतिसाद अधिक आले असते, आणि मला नवीन शब्दही अधिक कळले असते :-) )

दिलेला धागा

शब्दांचे खेळ खेळून रंजक पद्धतीने शब्दसंपदा वाढू शकते.

प्रकाशन पश्चात संपादित करण्याची सोय उ'पंतांनी करून दिली असती तर नवे कळलेले शब्द वरील तालिकेत भरले असते व आणि एक चांगला विदा झाला असता.

(मनात आले, होतील सुधारणा हळूहळू, गोगलगायीच्या वेगाने आणि आपोआप नवा प्राणी मिळाला, 'गाय').

ग - गाय, गाढव, गेंडा, गरुड, गुलाबी, गुलछडी, गोरखचिंच, गुलाब, गिदीगिदी, गुलामचोर.

प - पाणघोडा, पाणगेंडा
--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

तथाकथित पर्शियन 'च़': अवांतर

पण त्यांच्या काही उदाहरणांशी असहमत आहे. पैकी पर्शियन च़ - या दंततालव्य शुद्ध भारतीय आहे

हा शुद्ध भारतीय प्रकार आहे किंवा नाही याबद्दल मी खात्रीने काहीच बोलू इच्छीत नाही, परंतु भारतीय भाषांमध्येसुद्घा हा उच्चार विरळाच असावा. मराठीव्यतिरिक्त कश्मीरी भाषेतसुद्धा हा उच्चार असण्याबद्दल एका बर्‍यापैकी खात्रीलायक स्रोताकडून एकेकाळी ऐकलेले आहे. हा उच्चार असलेल्या इतर भारतीय भाषांच्या उदाहरणांबद्दल मला कल्पना नाही.

नुक्त

भारतीय भाषांमध्येसुद्घा हा उच्चार विरळाच असावा.

भारतीय वर्ण उच्चार हे जर अक्षर हलन्त असेल तरच हलके असतात. नाहीतर त्यांचा उच्चार पूर्ण व सुस्पष्टच व्हायला हवा. उदा. राजा हा शब्द उच्चारताना त्यातला 'ज' हा जत्रेतला ज असतो, ज़हाजातील ज़ नव्हे इति प्रा.डॉ. सिंधुताई डांगे (म्हणूनच हिंदी भाषेत उर्दू भाषेतून आलेल्या शब्दातील हलक्या उच्चारातील वर्णाखाली नुक्त देतात उदा. ज़मीन, तारीख़, ज़हाज इ.).

प्रा.डॉ. सिंधुताई डांगे ह्यांचा शब्द ह्या विषयात प्रमाण मानण्यास प्रत्यवाय नाही. त्यांचे ह्या विषयातील ज्ञान व प्रा.डॉ. असूनसुद्धा प्रचंड अभ्यासामुळे आलेली विनम्रता पाहून मी चकित झाले. खरोखरच एका सुभाषितात म्हटल्याप्रमाणे जो खरा ज्ञानी असतो तो ज्ञानभाराने विनम्र होतो. असो.

उच्चारण कार्यशाळेविषयी माहिती दिल्याबद्दल हा मंच आणि कै. ऋजु ह्यांना शतशः धन्यवाद.
--------------------------X--X-------------------------------
कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

खंडन

भारतीय वर्ण उच्चार हे जर अक्षर हलन्त असेल तरच हलके असतात. नाहीतर त्यांचा उच्चार पूर्ण व सुस्पष्टच व्हायला हवा. उदा. राजा हा शब्द उच्चारताना त्यातला 'ज' हा जत्रेतला ज असतो, ज़हाजातील ज़ नव्हे

उच्चारांच्या बाबतीत 'हलका', 'पूर्ण' आणि 'सुस्पष्ट' या संज्ञांतून नेमके काय सुचवायचे आहे (किंवा या संज्ञांच्या नेमक्या अपेक्षित व्याख्या काय आहेत) हे कळले नाही.

'पूर्ण'ची अपेक्षित व्याख्या काय असावी याबद्दल अटकळ बांधू शकतो, परंतु प्रस्तुत - current अशा अर्थी - चर्चेत ती व्याख्या प्रस्तुत -relevant अशा अर्थी - कशी होते ते कळले नाही. आणि अपेक्षित व्याख्या माझ्या अटकळीबरहुकुम असेल तर मांडलेला नियम पटतही नाही. कारण 'घर', 'काम', 'वीट' वगैरे मराठी शब्दांतील अंत्याक्षरे ही हलन्त नसूनही त्यांचा उच्चार (माझ्या 'पूर्ण'च्या व्याख्येबद्दलच्या अटकळीप्रमाणे) पूर्ण होत नाही. उलट 'मार्ग' या मराठी शब्दातील अंत्याक्षर हे हलन्त नाही, आणि त्याचा उच्चार पूर्ण होतो. मात्र 'मार्ग'मधील अंत्याक्षराचा दिल्ली-हिंदीतील उच्चार पूर्ण होत नाही, तर हलन्त असल्याप्रमाणे होतो. (मराठी आणि दिल्ली-हिंदी या दोन्ही माझ्या कल्पनेप्रमाणे भारतीय भाषा आहेत.)

याचा अर्थ, किमानपक्षी वर्णोच्चार 'पूर्ण' असण्याबाबत (१) वेगवेगळ्या भारतीय भाषांतील नियम वेगवेगळे असू शकतात, आणि (२) एकाच भारतीय भाषेतसुद्धा वेगवेगळ्या शब्दांना वेगवेगळे नियम लागू होऊ शकतात. त्यामुळे हा नियम पटत नाही.

बाकी, जहाजातील कोणताही ज (लेखी) हलन्त नाही, आणि जहाजातील ज हा उच्चार ('आजी'तील ज या उच्चाराच्या तुलनेत) अस्पष्ट आहे असे म्हणण्यास काही आधार निदान मला तरी दिसत नाही. त्यामुळे 'सुस्पष्ट उच्चारा'बद्दलचा मुद्दाही पटत नाही. तसेच, जहाजातला ज हा (मला पटत नसूनसुद्धा) अस्पष्ट जरी मानायचे ठरवले, तरीही या तथाकथित 'नियमा'स मराठीत 'जावई', 'जुना', 'जात' यांसारखे हवे तेवढे अपवाद सापडू शकतात.

बाकी 'हलका उच्चार' या संज्ञेतून नेमके काय सुचवायचे आहे हे नीटसे कळले नाही. जहाजातले दोन्ही ज हे उच्चार 'हलके' मानायचे झाल्यास, पाणिनीय संस्कृतात किंवा हिंदीच्या फारशी किंवा अरबीचे संस्कार न झालेल्या आवृत्तीत 'चमच्या'तल्या च-वर्गातील कोणतेच उच्चार सापडत नसावेत असे वाटते. (चूभूद्याघ्या.) आणि वर्ण हलन्त असण्यानसण्याशी याचा काहीही संबंध नाही. ताज्या बातमीनुसार, पाणिनीय संस्कृत आणि हिंदीची फारशी किंवा अरबीचा प्रभाव न झालेली, केवळ संस्कृतजन्य शब्दसंपदा असलेली आवृत्ती या दोन्ही अजूनही भारतीय भाषा आहेत असे मानावयास जागा आहे. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

तसेही 'राजा' आणि 'जत्रा' या दोन्ही शब्दांमधील ज या वर्णाचा उच्चार मराठीच्या काही बोलीभाषांत 'जहाजा'तल्या ज या वर्णासारखा होत असल्याबद्दलही ऐकलेले आहे. (नक्की खात्री नाही, परंतु बहुधा कोल्हापूरच्या बाजूला असा उच्चार होऊ शकतो असे वाटते. चूभूद्याघ्या.) त्यामुळे ते उदाहरणही पटत नाही.

कदाचित 'वर्ण उच्चार हे जर अक्षर हलन्त असेल तरच हलके असतात. नाहीतर त्यांचा उच्चार पूर्ण व सुस्पष्टच व्हायला हवा.' हे विधान पाणिनीय संस्कृताबद्दल खरे असेलही. (आधी म्हटल्याप्रमाणे, 'हलक्या' उच्चारांच्या बाबतीत हे तितकेसे पटत नाही, परंतु तरीही घटकाभर ते खरे आहे असे मानू.) तरीही त्या आधारावर 'भारतीय वर्ण उच्चारां'बाबत सरसकट विधान करणे धाडसाचे वाटते. पाणिनीय संस्कृत म्हणजे तमाम भारतीय भाषा नव्हेत.

त्याहीपुढे, 'भारतीय भाषांमध्येसुद्घा हा उच्चार विरळाच असावा' हे विधान केवळ चमच्यामधील च या उच्चाराबाबत केलेले होते. त्यातून भारतीय भाषांमधील उच्चारांबद्दल कोणतेही सरसकट स्वरूपाचे विधान करण्याचा उद्देश नव्हता आणि नाही.

बाकी, कोणत्याही व्यक्तीबद्दलच्या वैयक्तिक स्वरूपाच्या मुद्द्यांवर कोणत्याही प्रकारचे भाष्य करू इच्छीत नाही, करण्याची गरज भासत नाही आणि करणे उचितही समजत नाही.

च़, झ़ आणि हलन्त.

पाणिनीय संस्कृतात किंवा हिंदीच्या फारशी किंवा अरबीचे संस्कार न झालेल्या आवृत्तीत 'चमच्या'तल्या च-वर्गातील कोणतेच उच्चार सापडत नसावेत असे वाटते. (चूभूद्याघ्या.) आणि वर्ण हलन्त असण्यानसण्याशी याचा काहीही संबंध नाही. ताज्या बातमीनुसार, पाणिनीय संस्कृत आणि हिंदीची फारशी किंवा अरबीचा प्रभाव न झालेली, केवळ संस्कृतजन्य शब्दसंपदा असलेली आवृत्ती या दोन्ही अजूनही भारतीय भाषा आहेत असे मानावयास जागा आहे. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

तसेही 'राजा' आणि 'जत्रा' या दोन्ही शब्दांमधील ज या वर्णाचा उच्चार मराठीच्या काही बोलीभाषांत 'जहाजा'तल्या ज या वर्णासारखा होत असल्याबद्दलही ऐकलेले आहे. (नक्की खात्री नाही, परंतु बहुधा कोल्हापूरच्या बाजूला असा उच्चार होऊ शकतो असे वाटते. चूभूद्याघ्या.)
वरील दोन्ही विधानांमध्ये कुठलीही चूकभूल नाही. 'च़' हा उच्चार ही मराठीची खासियत आहे. तो पर्शियन लिपीत नक्कीच नाही. काश्मिरीत असल्यास माहीत नाही. झ़ हा उच्चार मात्र मराठीप्रमाणे इंग्रजीत आहे. तो हिंदीत किंवा फारसी-अरबी भाषांत नाही. राजा ह्या संस्कृत शब्दाचा मराठी उच्चार राजा़ असाच आहे. ज़त्रा हादेखील उच्चार चुकीचा नाही.
आता हलन्त्त उच्चारांबद्दलः मराठीत अकारान्त शब्दातले शेवटचे किंवा शेवटून दुसरे अक्षर, जोडाक्षर वा अनुस्वारयुक्त नसल्यास, साधारणपणे हलन्त उच्चारले जाते. उदा. गवत्, सा|बण्. परंतु, मार्ग, क्षत्रिय, रंग, केळं(हलन्त नाहीत!). आणि बहुतेक संस्कृत शब्द: (जसे,) भा|वना(व् हलन्त नाही) इ.इ.. परंतु शुद्ध मराठी शब्दांतली काही मधली अक्षरे हलन्त उच्चारली जातात. उदा. सावर्|कर्. (या निरीक्षणाला अनेक अपवाद असावेत). --वाचक्नवी

दंततालव्य च़ हा तेलुगुमध्ये सुद्धा आहे

दंततालव्य च़ हा तेलुगुमध्ये सुद्धा आहे. इतकेच काय दंततालव्य श़ हासुद्धा आहे! (तेलुगु नाव "श़र्मा" हे उच्चारायला कित्येक बिगर-तेलुगु लोकांना कठिण जाते.)

हा प्रकार बहुधा द्रविड भाषांमधून मराठीला प्राप्त झाला असावा.

मराठीतील नियम (दंततालव्य च़ चा़ चु़ चू़ चो़ चौ़) पण (तालव्य चि ची चे चै च्य्) हा कमीअधिक फरकाने उडियामध्ये दिसतो (तीसुद्धा द्रविड-सीमेची भाषा), आणि काही प्रमाणात तेलुगु, कन्नड, मुंडा आणि कोर्कू या द्रविड भाषांत दिसतो (दुवा).

शुद्ध द्रविड तमिळमध्ये च (ச) या वर्णाचा उच्चार दंततालव्य (च़ किंवा स़) असा होतो (शब्दाच्या सुरुवातीला - तमिऴनाडु राज्याच्या राजधानीच्या नावाचा उच्चार "से़न्नै"). तमिळमध्ये दंततालव्य ऩ (ன) हासुद्धा दिसतो.

प्रमाण मलयाळम मध्ये हे उच्चारणस्थान नाही (पण बोलीभाषेत आहे.)

चिनी मंत्री (मांदारीन) भाषेत दंततालव्य छ़ आहे. (त्याचा उच्चार काही परिस्थितींमध्ये च़ असा होतो.) च़ असलेली बिगरभारतीय भाषांची यादी आणि ची उदाहरणे येथे बघावीत.

तरी पण "(दंततालव्य च़ चा़ चु़ चू़ चो़ चौ़) पण (तालव्य चि ची चे चै च्य्)" हे वैशिष्ट्य खास भारतीय आहे. फार्सीचा संबंध नाही.

फार्सी आणि उर्दूमध्ये सुद्धा "ज़" हा बहुधा आर्य (इंडो-युरोपियन) नसून अरबीमधून आला असावा. पण त्याचे मूळ उच्चारणाचे अरबी मूळ (किंवा अनेक मुळे!) ही वेगळी. उर्दूमध्ये आणि हिंदुस्तानीमध्ये ﺫ , ﺯ , ﺽ , ﻅ , सर्वांचा उच्चार एकसारखा ज़ असाच केला जातो.

दंततालव्य छ़

दंततालव्य छ़ हा उच्चार मराठीत आहे, पण लिहिला जात नाही. वत्स आणि वत्सल असल्या शब्दांतल्या 'त्स'चा उच्चार संस्कृतमध्ये त्‌स असा होतो, तर मराठीत त्छ़.
तेलुगू आणि तमिऴ भाषांत च़ आहे ही माहिती मला अगदी नवीन आहे. त्या भाषांच्या शब्दकोशांत किंवा व्याकरणाच्या सामान्य पुस्तकांत ही माहिती यापूर्वी मला आढळली नव्हती. मलयालम्‌मध्ये एक अति र्‍हस्व 'उ' आहे, तो अन्य भाषांत नसावा. --वाचक्‍नवी

सविस्तर

प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे. वेळ होईल तसतसे सविस्तर उत्तर देईन. :)

--------------------------X--X-------------------------------

नाही निर्मळ जीवन, काय करील साबण |
तैसे 'चित्त' शुद्ध नाही तेथ बोध करील काई ||

नीलगाय, -, निळा, नारींगी, नीलकमल, नारींग, नारळ, -.

ह्या यादीत किड्यांचा पण समावेश करावा का? तेव्हढीच विदागारात भर ;) बरीच नावे किटकांची आठवत आहेत.

म - माळढोक.
अ - उंट.
त - तरस.
--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

तरस, तित्तिर, तगर, तेरडा, ताडगोळे, तांबडा, -.

--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

'ब्लू मूड' घालवण्यासाठी... - २

आणखी एक </स्प्यान> ट्याग.

लांडगा, लांडोर, लाल, लिंबू, लिची, लिली, लपाछपी, लंगडी.

क - कांडेचोर, कोल्हा.
स - सूर्यफुल, सावळा, सूरपारंब्या.
ब - बेलफळ.
ग - गव्हाळ.
--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

-, -, धवल, धानी, -, धोतरा, -.

--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

'ब्लू मूड' घालवण्यासाठी... - ३ (अर्थात, लष्करच्या भाकर्‍या!)

आणखी एक - शेवटचा - </स्प्यान> ट्याग.

---------------------------------------------------------------------------------------
एचटीएमएल शिका, एचटीएमएल (नीट) वापरा. दुवा क्र. १

'स्प्यान' ट्यागास बंद करणारा ट्याग अनिवार्य आहे. (संदर्भ: दुवा क्र. २)

धानी?

धानी हा हिंदी, मराठीत गुलाबी.--वाचक्नवी

अच्छा...

धानी = गुलाबी होय.

शांताबाईंची ही कविता वाचल्यापासून मी सारखा विचार करीत होते की धानी रंग दिसतो तरी कसा?

--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

दुरुस्ती:धानी म्हणजे गुलाबी नसावा.

पैठणी सहसा गुलाबी नसते, तेव्हा धानी म्हणजे गुलाबी रंग नसावा. धानाच्या रंगासारखा(भाताच्या शेतातील पानांसारखा) हिरवा असला पाहिजे. 'सारेके सारे गमाको लेके' या गाण्यातल्या 'धानीसी दीदी' या शब्दांवरून माझा गैरसमज झाला असला पाहिजे. अधिक माहितीसाठी
येथे पहावे.--वाचक्नवी

धानी : हिरव्या रंगाची छटा

रंगासाठी येथे बघा

धानीसी दीदी प्रमाणे अल्ला मेघ दे पानी दे, पानी दे गुडधानी दे हे गाणे देखील आहे.

चली चली रे

चली चली पतंग मेरी चली रे, या गाण्यातली ओळ: रंग मेरी पतंगका धानी.--वाचक्‍नवी

धानीसी म्हणजे आश्रयदायी अशी

'पापा नहीं तो धानीसी दीदी' ह्या ओळींतल्या धानीचा संबंध धानी रंगाशी नसून धानीचा अर्थ इथे आधार किंवा आश्रयदायी असा आहे असे दिसते.

'राजधानी'प्रमाणे?

'राजधानी'तील 'धानी'शी याचा काही संबंध असावा काय?

अर्थ

अगोदरच

हे अर्थ मी माझ्या २८ जुलैच्या प्रतिसादात आधीच दिले आहेत.--वाचक्नवी

अडई

'अ' वरून मराठीमध्ये पक्षीच नाही की काय ह्या विचाराने हैराण झाले होते. अशावेळी
अचानक मारुतरावांचा अडईवरील लेख वाचायला मिळाला आणि आपले निसर्गज्ञान
किती तोकडे आहे ह्याचा पुनःप्रत्यय आला.

रंगाने तांबुस, तपकिरी आणि चमकणारे लालसर डोळे असलेल्या अडई पक्ष्याला
रानबदक असेही म्हणतात. झिंगे, लहान मासे, कंद हे त्यांचे आवडते खाणे.

पावसाळा येताच लहान तळे, मोह, बेहडा, चिंच किंवा पळसाच्या झाडावर अडई नर व
मादी अंडी घालण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी जोडी-जोडीने बसलेले दिसतात.
त्यांची अंडी फिक्या पिवळसर रंगांची असतात.
--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

 
^ वर