महाभारत-२
महाभारत-२
दाशराज्ञ युद्ध व महाभारत
खरे म्हणजे या दोहोंचा काही संबंध नाही. पण तरीही संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणून थोडीशी माहिती घेऊं.
दाशराज्ञ युद्ध ऋग्वेदात वर्णनेले आहे. या युद्धाचा संदर्भ लक्षात येण्यासाठी सुर्यवंशी व चंद्रवंशी आर्यांची माहिती करून घेतली पाहिजे. आर्य हिंदुस्थानात एका वेळी आले नाहीत. ते एका मागून एक असे बराच काळ येत होते.पहिले आले ते सुर्यवंशी. ते आल्यावर पंजाबपासून पूर्वेस थेट अयोध्या- मिथिलापर्यंत पसरले. मनूच्या वंशातील भरत नावाच्या राजावरून त्यांना
भारत असे नाव पडले व देशाला भारतवर्ष. या भरताचा व दुश्यंतपुत्र भरताचा संबंध नाही. नंतर आले ते चंद्रवंशी आर्य. हे उत्तर हिमालयात, त्याला पूर्वी उत्तरकुरु म्हणत, उतरले. तेथे काही फार चांगली परिस्थिस्ती नव्हती. म्हणून ते खाली उतरले व त्यांच्यात व पहिल्यांदी वसती करून असलेल्या सुर्यवंशी आर्यांत युद्धे सुरू झाली. सुर्यवंशी आर्यांचा वर्ण गौर तर
चंद्रवंशी थोडेसे सावळे. महाभारतातील कृष्ण, दौपदी,ही सावळी मंडळी चंद्रवंशी. दोन्ही वंश इंद्र-अग्नी उपासक. यज्ञ करणारे. भरतांचे गुरु वसिष्ट-विश्वामित्रादी तर चंद्रवंशीयांचे कण्व-आंगिरस इत्यादी. ऋग्वेदात दोहोंबद्दल निरनिराळ्या मंडलात त्यांची स्तुती केलेली आढळते.( जो गायी देईल त्याची स्तुती !)असो. तर या दोन वंशातील एक युद्ध म्हणजे दाशराज्ञ युद्ध.
भरतांच्या बाजूला त्यांचा राजा सुदास व त्यांचे पुरोहित वसिष्ट तर चंद्रवंशीयांकडे पांच आर्य राजे यदु, तुर्वश,द्रुह्यु,अनु,आणि पूरु. त्यांनी आणखी पांच अनार्य राजे गोळा केलेव त्यांची संख्या झाली दहा. म्हणून या युद्धाला म्हणावयाचे दाशराज्ञ युद्ध.
या युद्धात सुरवातीला भारतांचा मोड होत होता व भारतांच्या गायी व धन द्रुह्यु पळवून नेत होते. तेंव्हा वसिष्टांनी इंद्राची प्रार्थना केली व पूराचे पाणी वाढून ६००० अनु व द्रुह्यु वाहून गेले. भारतांनीच हल्लेखोरांचे सामान लुटून नेले. म्हणजे पंजाबातील वरुष्णा(रावी) नदीच्या काठी झालेल्या या युद्धात चंद्रवंशी अयशस्वी ठरले.कथा संपली.इंद्राचा भाग नदीला पूर आणणे एवढाच.
महाभारतातील युद्धात सुर्यवंशी व चंद्रवंशी, सगळे आर्य राजे होते. इतकेच नव्हे तर अनार्य जसे नाग,यवन,म्लेच्छ, किरात इत्यादीही होते.युद्ध एका घराण्यातले होते व इतर राजे त्यात भाग घ्यावयाला आले तेंव्हा काही लुटमार करावयाची नव्हती. सर्व वंशातील राजे दोनही बाजूकडून लढले.प्रमाणाचा (scale)विचार केला तर तुलना करण्यासारखे काहीच नाही.
आदीपर्वात म.व्यासांनी काव्य कसे रचले आहे हे सांगताना " अनेक विषयांचे,सांगोपांग उपनिषदे,इतिहास, पुराणे,जरा-मृत्यु-भय-व्याधी,चातुर्वर्ण्य,तपश्चर्या,ब्रह्मचर्य यांचे विवेचन,पुराणातील कथानिर्देश, पृथ्वी व युगे, चंद्र,सुर्य,ग्रह, नक्षत्रे यांचे प्रमाण,ब्रह्मज्ञान, न्याय,शिक्षा,पुण्यतीर्थे,नद्या,पर्वत, वने व समुद्र,युद्धोपयोगी शास्त्रविचार,लोकाचाराचे निरुपण करणारे नीतिशास्त्र आणि सर्वव्यापक परब्रह्म, यांचे प्रतिपादन या काव्यात केले आहे.यास्तव चतुर लेखक कोण मिळेल याचे चिंतन करत आहे" यावर ब्रह्मदेवाने गणपतीचे नाव सुचविले. म्हणून गणपती लेखक.लेखनकला अवगत नव्हती म्हणून नव्हे. (ज्ञानेश्वरी सच्चिदानंदानी लिहली याचे कारण ज्ञानेश्वर निरक्षर होते असे कोणी म्हणत नाही.)यात कौरव-पांडवांच्या युद्धाचा उल्लेखही नाही.असे दिसते की वरील गोष्टी सांगावयाच्या होत्या त्याला एक पाया (base) पाहिजे म्हणून युद्ध. ते असो.
फ़क्त दोन युद्धांचा विचार करतांना काय साम्य श्री. मूर्तींना दिसले? पांच पांडव व सुदासाच्या बाजूला तो, इंद्र, मरुत, अश्विनीकुमार. हा संदर्भ लागला नाही. पांच चंद्रवंशीय राजे सुदासाविरुद्ध लढले. इंद्राचा भाग फ़क्त वसिष्टांच्या प्रार्थनेनंतर पूर आणणे एवढाच हे वर सांगितले आहेच.इंद्राने रामायणात रामालाही रथ पाठवून मदत केली म्हणून तेथेही दाशराज्ञ युद्ध आणावयाचे का? पहिल्या युद्धात अनार्य सुदासाविरुद्ध आहेत, महाभारतात ते दोनही बाजूंनी लढलेले दिसतात.पहिल्या युद्धातील वसिष्ट व दुसर्यातील कृष्ण यांची तुलना तर हास्यास्पद ठरेल. पहिल्या युद्धात सुदास जवळजवळ हरलाच होता. दुसर्यात तसे दिसत नाही, पांडवांचीच सरशी दिसते (निदान धृतराष्ट्राच्या म्हणण्यानुसार.) मला तरी या साम्यात दम दिसत नाही.
एक गोष्ट स्पष्ट करतो. मी ऋग्वेद संस्कृतमधून वाचला नाही. कोणी विद्वान जर खरेच इंद्र-मरुदादी सुदासाच्या बाजूने लढले का या बद्दल सांगेल तर बरे होईल.
शरद
Comments
बर्यापैकी घोळ
येथे व्यास किंवा ज्ञानेश्वर निरक्षर होते असे म्हणायचे आहे हा बादरायण संबंध शरद यांनी कसा लावला ते न कळे. सिंधू संस्कृतीची लेखनकला इ.स.पूर्व ३००० साली असावी असे वाटते परंतु ही चित्रलिपी आहे. याचदरम्यान इराणापासून भारतवर्षापर्यंत कुठलीही परिपूर्ण लिपी वापरण्यात येत होती असा संदर्भ माझ्या वाचनात नाही. (चू. भू.दे. घे.) तत्कालीन उपलब्ध चित्रलिपी महाभारतासारखा कठिण ग्रंथ टंकित करण्यास पुरेशी नाही. याचाच अर्थ महाभारत ज्या कोणी लिहून काढले ते इ.स.पूर्व ३००० च्या दरम्यान काढले असावे असे मला वाटत नाही. (गजमुखी गणपतीबाप्पांनी लिहिले असे तर मुळीच वाटत नाही.)
असो. कोणाला त्या काळात कोणती लिपी वापरून महाभारतासारखा किचकट ग्रंथ लिहिण्यात आला याबाबत ससंदर्भ माहिती असल्यास मला ती हवी आहे.
दाशराज्ञ युद्धावरून व्यासांना जर महाभारत लिहिण्याची (रचण्याची) प्रेरणा मिळाली असा तर्क कोणी काढत असेल तर त्यात काहीही गैर आहे असे मला वाटत नाही. उलट, हा तर्क मला आवडला. तर्क आवडला म्हणजे तो खराच आहे असे नाही परंतु अशा तर्कांवर चर्चा करण्यास मला आवडेल.
शरद यांचा हा लेख मला -
सलीम-जावेद हे इतके महान लेखक होते की काहीजणांनी, त्यांना शोले या चित्रपटाची कल्पना अकिरा कुरोसावाच्या दी मॅग्निफिशियंट सेवनवरून (किंवा सेवन सामुराय) मिळाली असे म्हटल्यास ते चुकीचे आहे कारण मॅग्निफिशियंट सेवन या चित्रपटाची पार्श्वभूमी मेक्सिकोतील (किंवा मध्ययुगीन जपान) असून त्यात सात नायक असून कोणत्याही नायकाचे नाव जय किंवा विरू नाही वगैरे वगैरे. त्यामुळे सलीम-जावेद यांच्यासारख्या महान लेखकांचा अकिरा कुरोसावाच्या चित्रपटाशी संबंध लावणे अयोग्य आहे
अशाप्रकारचा वाटला.
लेखन
महाभारतकालीन लेखन
घोळ ..मान्य. माझी समजूत झाली की महाभारतकाली लेखन कला नव्हती म्हणून गणपतीला लेखक म्हणून बोलाविले असे म्हणावयाचे आहे.ज्ञानेश्वरांचा निर्देश सोडून द्या.
महाभारतात एक अपवाद सोडला तर लेखनाचा उल्लेख मिळत नाही. निरोप पाठवावयाचा म्हणजे दूत पाठवावयाचा व त्याने तोंडी निरोप द्यावयाचा.उदा. युद्धाच्या आधी धृतराष्ट्र व पांडव एकामेकांना तोंडी निरोप देतात. लेखी नाहीत. अपवाद आडवळणाचा आहे. भारद्वाजाचा मुलगा यवक्रित हा गुरूविना वेदविद्या मिळवावयाचे ठरवितो. त्यात त्याला अनंत अडचणी येतात व इंद्र या पद्धतीचा फोलपणा त्याच्या लक्षात आणून देतो. वेदविद्या गुरुकडून मौखिक मिळते पण त्याच्याशिवाय मिळवावयाची तर पुस्तक पाहिजे. म्हणजे लेखनकला आली. हा ठोस पुरावा नाही हे मान्य.
आता हड्प्पाच्या चित्र लिपीकडे जाऊ. या चित्रलिपीतून खरोष्ठी/ ब्राह्मी लिपी निर्माण झाल्या असाव्यात असा एक तर्क. ब्राह्मी लिपीचा सर्वात जूना पुरावा इ.स.पूर्व ५०० पर्यंतचाच मिळतो. म्हणजे इ.स,पूर्व ३००० ला याचा उपयोग नाही. पण पूराभाषा तज्ञ डॉ. सुनीतीकुमार चतर्जी यांच्या मते वेदकाली ब्राह्मी लिपी सारखी एखादी लिपी प्रचारात असावी. त्या लिपीच्या अस्तित्वाचे पुरावे ते देतात व हेही कबूल करतात तीचे स्वरूप काय असावे जे सांगता येत नाही. श्री. प्रियाली यांच्या करिता माझ्याकडे एवढीच महिती.
दाशराज्ञ युद्ध व महाभारत यांचा संबंध नसावा ह्या माझ्या मताकरिता मी दोहोंमधील विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही त्यांना तसे वाटत असेल किंवा आवडत असेल तर त्यांनी का? याबद्दल अवष्य लिहावे.
शरद
शंका
महाभारतकाली लेखनकलाच जर अस्तित्वात नसेल, तर लेखक म्हणून नेमलेला गणपती तरी असे लेखन नेमके कसे करू शकेल, हे कळले नाही.
इ.स.पूर्व ३००० मधील लोकसंख्या
शरद
इ.स.पूर्व ३००० मधे पंजाब(पाकिस्तान व भारत मिळून) ते अफगाणिस्तान या भूभागातील लोकसंख्या आणि सर्वसाधारण आर्युमर्यादा, यासंबंधी काही अंदाज आपण बांधू शकता का? त्या वेळची भौगोलिक, प्राकृतिक परिस्थिती अर्थातच तुम्ही लक्षात घ्यालच. मला वाटते की श्री. धनंजय या बाबतीत तुम्हाला मदत करू शकतील.
चन्द्रशेखर
लोकसंख्या व आयुष्य़
लोकसंख्येबद्दल कोठे माहिती सापडली नाही.युद्धाच्यावेळी अर्जुन ६५ वर्षाचा, कृष्ण ८३ चा
असे उल्लेख पहिले तर साधारणत: १०० वर्षे ही (आर्यांची) आयुर्मर्यादा धरावयास हरकत नाही. कृष्ण निजधामास गेला तेंव्हा (वय १०० ते १२०) वसुदेव जिवंत होता, त्याचे वय
अंदाजे १४० असावे.
शरद
लोकसंख्या व आयुष्य़
मागच्या १००, २०० वर्षांचा लोकसंख्या वाढीचा वेग आपणास माहिती आहे. तो लक्षात घेउन व त्या वेळची भौगोलिक, सामाजिक, प्राकृतिक परिस्थिती लक्षात घेउन( त्या वेळी जगणे हा एक सततचा लढा असला पाहिजे) त्यावरून उलटे गणित मांडून अंदाज बांधता येइल का असा माझा प्रश्न आहे. तसेच १९४७ साली आपली सर्वसाधारण आयुर्मर्यादा ३७ वर्षे होती. ५००० वर्षांपूर्वी जंगले, हिंस्त्र पशु, लढाया , कुपोषण या सगळ्या गोष्टींना सर्वसाधारण माणसाला सतत तोंड द्यावे लागत असे. त्यामुळे मला असे वाटते की सर्वसाधारण आयुर्मर्यादा २५च्या पुढे असणार नाही.स्त्रियांच्या बाबतीत तर ही आणखीनच कमी असावी.
लोकसंख्येचा जर अंदाज बांधता आला तर महाभारत युद्ध काय स्केलवर लढले गेले असावे ? याचा अंदाज बांधणे शक्य होईल असे मला वाटते.
चन्द्रशेखर
आयुर्मर्यादा आणि लोकसंख्या
चंद्रशेखर म्हणतात तशी २५ ही आयुर्मर्यादा आणि शरद यांची १००+ची आयुर्मर्यादा हे दोन्ही पटत नाही. अर्थातच, या विषयी ठोस माहिती माझ्याकडेही नाही.
त्याकाळात, जंगले, हिंस्त्र पशु, लढाया, कुपोषण, नैसर्गिक उत्पत्ती, मानवी जीवनाविषयी अनास्था वगैरे सर्व बाबी लक्षात घेतल्या तरीही मनुष्याच्या राहणीमानावरही त्याचे आयुष्य अवलंबून असावे असे वाटते. राजघराण्यातील लोकांचे आयुष्य किंवा आश्रम थाटून राहणार्या ऋषीजनांचे आयुष्य हे इतर सामान्यजनांपेक्षा अधिक असणे वगैरे.
पुरातन लोकसंख्येचा दर कसा निश्चित करावा याविषयी अनेक अटकळी मांडण्यात येतात. यांत काही राज्यकाळात लोकसंख्या गणना करण्यात आल्याचे वाचले होते परंतु त्यात बायका, मुले, गुलाम, दास-दास्या किंवा निम्नस्तरीय जमाती वगैरेंना जमेस न धरल्याचेही आढळते. विशेष करून अशा गणना करधारक, जमिनदार, शेतकरी, व्यापारी किंवा ज्यांच्याकडून महसूल गोळा करता येईल अशांची होत असे. लोकसंख्या मोजण्याचा आणखी एक उपाय म्हणजे पुरातन शहरांचा, त्यातील घरे, प्रासाद वगैरे यांच्या दाटीवाटींचा किंवा दफनभूमी यांचा अभ्यास करून लोकसंख्येचा दर निश्चित करणे.
महाभारत कालीन शहरे (जर महाभारत इ.स.पूर्व ३०००-५००० वगैरे मानले) अस्तित्वात नसल्याने हडप्पा किंवा मोहेंजेदारो वगैरे शहरांचा अभ्यास करून अशी लोकसंख्या निश्चित करण्यास मदत होऊ शकेल असे वाटते.
तरीही, काही अक्षौहिणीच्या प्रचंड हिशेबात सैन्य लढले असेल असे वाटत नाही. इथे, चित्तरंजन म्हणतात त्याप्रमाणे कालांतराने काही राजघराण्यांनी आम्हीही महाभारत युद्धात लढलो होतो आणि महान होतो हे दाखवण्यासाठी आपली भरती सैन्याच्या आकड्यांत करून फुगवटा आणला असावा.
दोघांचेही आभार
चर्चा आणि चर्चाप्रस्ताव दोन्ही मस्त आहे.
नवनवीन माहिती मिळत आहे. वादी-प्रतिवादी ;) दोघांचे आभार :)
पुढील भाग व चर्चा वाचण्यास उत्सुक आहे
(माकड)ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
आयुर्मर्यादा आणि लोकसंख्या
आजच्या लोकसंख्येवरून इ.स. पूर्व 3000 मधील लोकसंख्येचा अंदाज बांधणे शक्य नसले तर उलट बाजूने जमते का ते पाहू. नवीनतम संशोधनाप्रमाणे 64000 हजार वर्षांपूर्वी(माझा हा लेख त्याबद्दलच आहे) एक अशी घटना घडली की पृथ्वी तलावरचे जवळ जवळ सर्व आधुनिक मानव(होमो सॅपिएन) इतर प्राणी जातींबरोबर नष्ट झाले. या नंतर 1000 वर्षे एक मिनी शीतयुग आले. या वेळी फक्त विषुव वृत्तीय आफ्रिकेजवळच्या छोट्या बेटांच्यावर टिकलेले आधुनिक मानव कसेबसे जगले. या शीतयुगाच्या शेवटी फक्त 2000 आधुनिक मानव पृथ्वीतलावर होते असा अंदाज आहे. हे मानव मायग्रेटोरी पॅटर्नप्रमाणे आफ्रिकेतून बाहेर पडले व जगभर पसरले.
आता हा मायग्रेटोरी पॅटर्न म्हणजे काय? समजा एखाद्या स्थळी 100 लोकांची टोळी वस्ती करून आहे. त्यांचे उपजिविकेचे साधन म्हणजे शिकार. हळूहळू परिसरातील शिकार करण्याजोगे प्राणी कमी होतात. तोपर्यंत ही टोळीही 200 तोंडांची होते. अर्थातच पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्याने टोळीतले तरूणतरूणी तिथून मायग्रेट होतात. त्यामुळे या मूळच्या स्थानी परत थोडेच लोक उरतात. हा मायग्रेटोरी पॅटर्न आधुनिक मानव शेती करू लागेपर्यंत तरी टिकून राहिला असावा.
या पॅटर्नमुळे कोणत्याही एका भूभागावरची मानवी वस्ती फारशी कधीच वाढली नाही.
भारतात, सिंधू नदीच्या खोर्यात प्रथम सिव्हिलायझेशन म्हणता येईल अशी मानवी वस्ती झाली. बलूचिस्तानच्या बाजूने आलेल्या आक्रमणाने या वस्त्या परत उठवल्या गेल्या. या सगळ्यावरून असे म्हणता येईल की 7000 वर्षांपूर्वीपर्यंत तरी सिव्हिलाईझ्ड वस्ती पंजाब-अफगाणिस्तानात नसावी.
थोडक्यात म्हणजे आर्य लोक भारतात येईपर्यंतच्या काळापर्यंत तरी, भारतातील लोकसंख्या फारशी कधीच वाढू शकली नसावी.
आर्य जसजसे प्रस्थापित होत गेले तसतसे त्यांनी गावे वसवणे, शेती करणे, गुरे पाळणे वगैरे सुरू केले आणि राज्ये प्रस्थापित झाली.
महाभारताचा काल जर 3000 वर्षांपूर्वीचा धरला तर त्या कालची लोकसंख्या 4000 वर्षांतल्या वाढीची असणार.
त्या काळात मानवी आय़ुष्य हे निरनिराळ्या प्रकारच्या असंख्य अडचणींना सामना करावा लागत असल्याने, अल्प असणार. आणि प्रियाली ताईंना मान्य नसले तरी सर्वसाधारण आर्युमर्यादा 25 वर्षेच असणार असे मला वाटते.
या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पंजाब-अफगाणिस्तानची लोकसंख्या काही लाखातच असेल असे मला वाटते. यापैकी निम्या स्त्रिया असल्याने युद्धाला उपयोगी नाहीत. बालके व म्हातारे हेही या संख्येत धरावे लागतील. तेही निरुपयोगी. त्यामुळे युद्धासाठी लक्षावधी योद्धे कोठून आले हा मला पडलेला प्रश्न आहे.
चन्द्रशेखर
एक बाळबोध प्रश्नः
एक बाळबोध प्रश्नः
द्वारका, हस्तिनापूर वगैरे पंजाब-अफगाणिस्तानात धरले आहे का?
नसल्यास तेथील लोकसंख्या का मोजताय?
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
एक बाळबोध प्रश्नः
पंजाब अफगाणिस्तान म्हणजे सध्याचे देश् नाहीत
ऑक्सस नदीच्या दक्षिणपूर्व दिशेपासून पंजाबच्या पाच नद्या व गंगेचे खोरे या पर्यंतचा भूभाग
चन्द्रशेखर
समजले नाही
पूर्वी ऑक्सस नदीच्या दक्षिणपूर्व दिशेपासून पंजाबच्या पाच नद्या व गंगेचे खोरे यापर्यंतच्या भूभागास पंजाब म्हणत होते का अफगाणिस्तान?
तुमचे उदाहरण कीतीही पटण्याजोगे असले/नसले तरी त्या उदाहरणात हल्लीची दोन नावे (पंजाब व अफगाणिस्तान) का/कशी आली हे अजूनही समजले नाहि.
या विषयाबाबत मला जराही ज्ञान नाहि. शरदरावांच्या लेखमालेने व तुमच्या व प्रियालीताईच्या प्रतिसादांनी जागृत झालेली जिज्ञासा जरूर आहे म्हणून हे प्रश्न.
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
पंजाब, अफगाणिस्तान आणि ऑक्सस
:-) तसे नसावे. पंजाब गंगेच्या खोर्यात नाही.
ऑक्सस म्हणजे अमु दर्या, ही कुठेतरी जुन्या अफगाणिस्तानात (आता तजाकिस्तान, उझबेकीस्तान वगैरे असेल. माझी भूगोलाची झेप इतपतच) उगम पावते. वैदिक किंवा त्यापूर्व काळात जे स्थलांतर झाले ते या भूभागातून. हिंदुकुश पार केल्यावर पंजाब क्षेत्रात या स्थलांतरितांनी पहिल्या वसाहती केल्या. पंचनद्या आणि सरस्वती नदी यांच्या तीरांवर त्यांनी हडप्पा, मोहेंजेदाडो, मेहरगढ, लोथल, ढोलवीरा वगैरे ठिकाणी आढळलेली शहरे वसवली.
सिंधू संस्कृतीत गंगा नदीला फारसे महत्त्व नाही कारण तोपर्यंत वस्ती गंगेच्या खोर्यात केलेली नव्हती. ऋग्वेदातही गंगा नदीला फारसे महत्त्व दिसत नाही. रामायण महाभारत काळात मात्र गंगा, यमुना या नद्यांचा उल्लेख येतो. यावरून महाभारताचा काळ इ.स. पूर्व ३००० मधील असावा असे ठोस म्हणता येत नाही असे वाटते.
समांतर अवांतर
हं! थोडफार कळत आहे. प्रतिसाद वाचून एक शंका डोक्यात आली ह्या नद्या इतक्या वर्षांपूर्वी देखील आता वाहत आहेत तेथूनच वाहत होत्या का?
थोडं अवांतर होतंय पण समांतर आहे असे वाटते
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
सरस्वती सोडून बाकी नद्या
जवळजवळ हल्लीच्या प्रवाहांच्या जवळपास वाहत होत्या. सरस्वती ही राजस्थानातून कच्छच्या (आजकालच्या) रणात वाहायची. (विकीवर अधिक दुवे तपासावे) . अधिक अभ्यासपूर्ण पीडीएफ दुवा येथे. या सरस्वतीच्या वाळून जाण्यावरुन काही वैदिक ऋचांचा काळ अनुमानपंचे ठरवता येतो.
(अर्थात त्या नदीच्या प्रमुख उपनद्या शतद्रु/सतलज, आणि यमुना यांचा मार्गही आता बदलला आहे.)
अफगानिस्तानातील हेलमंद नदीचे नाव पूर्वी हरहुवती होते (म्हणजे अवेस्त्याच्या भाषेतील फरकाने "सरस्वती"च). पण ही वैदिक सरस्वती नसावी असे बहुतेकांना वाटते.
सहमत आहे
धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. लोथल हे शहर साबरमतीच्या काठावर होते असे म्हणतात पण पुढे साबरमतीने आपले पात्र बदलले. (म्हणजे एकदम घुमजाव नाही केले. :-))
शेती आणि लक्षावधी योद्धे
७००० वर्षे म्हणजे इ.स.पूर्व ७००० की आजपासून ७००० वर्षे? जर आजपासून ७००० वर्षे मागे गेले तर इ.स.पूर्व सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतात शेती व्यवसाय होता असे दिसते. इतकेच नव्हे तर भारतात इ.स.पूर्व ९००० वर्षांपूर्वी शेती व्यवसाय सुरु झाला असे ऐतिहासिक नोंदींतून कळते. बलुचिस्तानातील मेहरगढ येथील खालील चित्र पाहावे. ही संस्कृती शेती करत होती असे दिसते. या शहराचा/ संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ७००० मानला जातो. गहू, बार्ली आणि खजूर यांची शेती येथे चालत असे. बांधकामात धान्य साठवण्यासाठी गोदामे बांधल्याचे दिसते. सिंधू संस्कृतीत तर (हडप्पा इ.स.पूर्व २६००) जलसिंचनाची सोय दिसते.
हे खरे नाही. उलट, भटके तथाकथित आर्य येथे आले आणि येथील संस्कृतींप्रमाणे नगरे वसवून राहू लागले. जेव्हा लोक शेती करतात त्यावेळी त्यांची शिकार करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. जमीन कसावी लागली की त्या जमिनीवर किंवा बाजूला घरे बांधून स्थायिक होण्याची प्रवृत्ती बळावते. ती या लोकांमध्ये दिसते. परंतु, नैसर्गिक आपत्ती, कुपोषण, बालमृत्यु, प्लेग वगैरे बाबी नाकारण्याजोग्या नाहीत. या सर्वांवरून तत्कालीन लोकसंख्या लाखोंत असावी असे वाटत नाही पण शेकड्यातही नसावी.
आता, महाभारत युद्धात लाखो लढले हे मलाही पटण्याजोगे नाही. सर्वप्रथम, तत्कालीन भारतातील मुख्य राज्ये बघा. गांधार, मगध, कलिंग ही राज्ये हस्तिनापूर राज्यापेक्षा मोठी वाटतात. असे असताना, कौरव पांडवांच्या युद्धात या मोठ्या राज्यांनी सेना पाठवून लढाया केल्या हे थोडेसे न पटणारे आहे. सैन्य पोटावर चालते. एवढे मोठे सैन्य, त्याचा खर्च, दाणा-पाणी वगैरेंची सोय होती का नाही हे कळण्यास मार्ग नाही. महाभारत युद्धात लाखाने आणि अनेक राज्यांचे सैन्य लढले ही कल्पना मला काव्यात्मक वाटते, ऐतिहासिक नाही.
शेती आणि लक्षावधी योद्धे
मला इ.स. पूर्वी ७००० वर्षे असेच म्हणायचे होते. चुभूद्याघ्या
चन्द्रशेखर