महाभारत-१

महाभारत-१

महाभारताबद्दल आपलाल्या खरच किती माहिती असते ? लहानपणी वाचलेल्या/ऐकलेल्या भीम-बकासूराच्या गोष्टी वा नंतर पाहिलेले चित्रपट/दूरसंचावरच्या मालिका किंवा कर्णावरची एखादी कादंबरी सोडली तर संपूर्ण महाभारताचे मराठी भाषांतर किती जणांनी वाचले आहे ? आणि महत्वाचे म्हणजे भारताचार्य चिं.वि.वैद्य यांचा १००० पानांचा उपसंहार ? हे सर्व तुलनात्मक
पाहिले तर फार स्वस्तात मिळते हो. आज ४-५ जणांना दोन वेळां चांगल्या हॉटेलात जेवावयाला जायला जेवढा खर्च होतो तेवढ्यात तुम्हाला हे धन कायमस्वरूपी मिळू शकते. मला भांडारकर इन्स्टिट्युटची शुद्ध प्रत वगैरे बद्दल बोलावयाचे नाही. तो तज्ञांचा प्रांत. जय-भारत-महाभारत हा ग्रंथाचा प्रवास ,त्यांचे लेखक, त्यातील प्रक्षीप्त भाग यांवरील चर्चा, मी वाचतो, तज्ञाच्या
विद्वत्तेला मान डोलावून नमस्कार करतो.. आणि ते विसरून जातो. मला दातार-मोडक यांचे भाषांतर पुरेसे वाटते.त्यामुळे मिळणारा आनंद आज आपणा सर्वांबरोबर घ्यावा या उद्देशाने लिहित आहे.

मी महाभारताचा कुठलाही खंड उचलतो (आठ खंड आहेत), कोणतेही पान उघडतो व वाचावयास सुरवात करतो. वेळ असेल तेवढा वेळ वाचतो, ठेवून देतो. वेळ चांगला जातो. आज लिहावयाचे कारण असे की त्यातील गालव मुनीची कथा वाचतांना वाटले की अरे, ही कथा बर्‍याच जणांना माहित नसणार. आणि त्या काळातील रिवाज व आजचे रिवाज यातील जमीन
अस्मानाचा फरक सगळ्यानाच चकीत करून सोडेल. इतकेच नव्हे तर आज जा गोष्टींना आपण नाके मुरडू वा जोरदार विरोध करू त्या त्या काळी सर्वमान्य होत्या हे कळले तर नवीन गोष्टींना विरोध करावयाच्या आधी थोडा विचारही करू. कथा बरीच मोठी असल्याने संक्षेप करावा लागणार आहे व थोडेसे नाट्य कमी होणार आहे. समजून घ्या.

गालव हा विश्वामित्रांचा शिष्य. गुरूची सेवा केल्यामुळे त्यांनी गालवाला प्रेमाने निरोप दिला.गालव गुरूदक्षिणा घ्याच असा आग्रह करू लागला. आग्रहाचा हट्टाग्रह झाल्यावर विश्वामित्र चिडले व म्हणाले " श्वेत वर्णाचे व एक कान काळा असलेले ८०० घोडे मला दक्षिणा म्हणून दे." गालव हताश झाला. आपल्याकडे पैसे नाहीत, कोणी मित्र नाही, आता काय करावयाचे ?
ही अट कशी पुरी करावयाची ? तेव्हढ्यात त्याला गरुड भेटला व तो गालवाला घेवून निरनिराळ्या देशांना गेला.ययाती राजाकडे गेल्यावर राजा म्हणाला " माझ्याकडे धन नाही व घोडेही नाहीत.पण तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवावयाचे मला पटत नाही. तेंव्हा मी माझी तरुण, लावण्यवती मुलगी, माधवी, देतो. तीला घेऊन तुम्ही कोणत्याही राजाकडे जा. तो तीला
पाहून घोडेच काय, सगळे राज्यही देईल. फक्त हीला होणारी मुले मला दिली पाहिजेत." दुसरे काही समोर नसल्याने गालव व गरुड माधवीला घेऊन निघाले.प्रथम हर्यश्व राजाकडे गेले. त्याला माधवीचे मूल्य सांगितल्यावर तो विचार करून म्हणाला " माझ्याकडे फक्त २०० असे घोडे आहेत. तेंव्हा माधवीला एक मुलगा होईपर्यंत तीला माझ्याकडे ठेवा आणि २०० घोडे व
माधवी परत घेऊन जा. गरुड म्हणाला " एवडे घोडे तर घे, पुढे बघू." त्या प्रमाणे एक मुलगा होईपर्यंत माधवी तेथे राहिली. नंतर तेथून निघाल्यावर माधवी म्हणाली " एका ब्रह्मनिष्ठाने दिलेल्या वरानुसार मी कितीदाही प्रसूत झाले तरी प्रसूतीनंतर परत कुमारीच होऊन राहीन." याच पद्धतीने दिवोदास व उशीनरा या दोघांकडून ४०० घोडे मिळविले. नंतर गालव गरुडास म्हणाला "तीन चतुर्थांश कामगिरी झाली." गरुड म्हणाला "इहलोकात केवळ ६००च घॊडे आहेत. तेंव्हा तू आता विश्वामित्र्रांकडेच जा व त्यांना विनंती कर की उरलेल्या २०० घोड्यांऐवजी माधवीला स्विकारा." गालवाने तसे सांगितल्यावर माधवीकडे पाहून विश्वामित्र म्हणाले " इतकी दगदग कशाला केलीस? प्रथमच माझ्याकडे आला असतास तर मलाच चार पुत्र मिळाले असते. असो. आता हे ६०० घोडे आश्रमाभोवती सोडून दे व एक मुलगा होईपर्यंत माधवी येथे राहू दे." गुरूला एक पुत्र मिळाल्यानंतर गालवाने माधवीला परत ययातीकडे नेऊन सोडले. पुढे ययाती स्वर्गात गेला, तेथून पुण्यक्षय झाल्यावर पदच्युत झाला व परत पृथ्वीवर आल्यावर माधवी, तीची चार मुले व गालव यांच्या पुण्याच्या योगाने परत स्वर्गात गेला.

तर अशी ही गालवाची ( की माधवीची ?) कथा. उद्योग पर्वात (अ.१०६ ते अ. १२२) नारदाने हट्टाग्रहाचे परिणाम काय होतात हे कळावे म्हणून दुर्योधनाला सांगितलेली. ही कथा वाचून काय वाटते ?

(१) माधवीला कौमार्य परत मिळाले हा भाग सोडा. त्यावर वाद नको. अशा आज न पटणार्‍या अनेक गोष्टी "काव्य" म्हणून स्विकाराव्यात.
(२) इथे माधवी ही एक वस्तू (commodity) आहे का? वडीलांनी सांगितले म्हणून ती मुकाटपणे गालवाबरोबर गेली. समोर आलेल्या चौघांचा स्विकार केला. तेव्हा असे वाटते खरे. पण हे तीने स्वेच्छेने केले आहे. कारण पुढील कथेवरून असे दिसते की ती परत आल्यावर ययातीने तीच्या दोन भावांबरोबर तीने स्वयंवर करावे म्हणून निरनिराळ्या देशात पाठवले. तीला कोणी पसंत न पडल्याने तीने वनवास स्विकारून तपस्येचा निश्चय केला व ब्रह्मचर्य पाळून विपुल तपाचरण केले. तीला कोणतीही लालसा दिसत नाही. तीला स्वेच्छेने वागावयाचा अधिकार आहे व ती त्याप्रमाणे आयुष्यभर जगली.
(३) चौघांनीही एक पुत्र प्राप्त झाल्यावर ( कष्टाने का होईना) तीला गालवाकडे परत दिले.माधवी गेल्याच्या दु:खाबरोबर पुत्रप्राप्तीचा आनंद मिळवला.
(४) या सर्व व्यवहारात गालव, ययाती, माधवी, तीचे चार पती (!) व चार मुले, तसेच समाज यापैकी कोणालाच काही अयोग्य वाटले नाही.धर्माची व समाजाची याला मान्यता होती. तीची चारी मुले सदाचारी, प्रतिष्ठीत राजे होते. (कारण)
(५) वंशवृद्धी ही समाजाची (व म्हणून धर्माची) प्राथमिक व महत्वाची गरज, इतर गोष्टी नंतर ?
(६) आज असे घडले तर समाजाची (धर्माला कोण विचारतो म्हणा)प्रतिक्रिया काय असेल? असावी?
(७) नीति कल्पना इतकी कालसापेक्ष आहे का ?

असो. थोडी अवांतर माहिती. माधवीकडॆ बघून हर्यश्व राजा म्हणतो, " ही कन्या नि:संशय सुलक्षण आहे. सामुद्रिकात सांगितल्याप्रमाणे जे सहा अवयव उन्नत असावे; {(१) दोन पायांचे तळवे, दोन हातांचे तळवे व दोन स्तन वा(२) स्तनद्वय, नितंबद्वय व नेत्रद्वय वा(३) छाती, कुशी,केश,खांदे,हात व मुख} जे सात भाग सूक्ष्म असावे; (त्वचा,केश,दंत, करांगुलि, पादांगुलि व त्या अंजुलींची पेरे) जे तीन गंभीर असावे (स्वर, मन आणि नाभि);जे पांच आरक्त असावे (हाताचे तळवे, डोळ्यांचे कोंपरे,ताळू, जिव्हा व अधरोष्ठ)ते तसे आहे.स्त्री सौंदर्याबद्दल आपले मत ?
शरद

शर

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिसाद

येथे उपरोक्त कथा ही केवळ कथा आहे असे समजून त्यातील चमत्कार खरे मानूया. त्याची वैज्ञानिक विश्लेषणे वगैरे नकोत.

(१) माधवीला कौमार्य परत मिळाले हा भाग सोडा. त्यावर वाद नको. अशा आज न पटणार्‍या अनेक गोष्टी "काव्य" म्हणून स्विकाराव्यात.

सहमत आहे.

(२) इथे माधवी ही एक वस्तू (commodity) आहे का? वडीलांनी सांगितले म्हणून ती मुकाटपणे गालवाबरोबर गेली. समोर आलेल्या चौघांचा स्विकार केला. तेव्हा असे वाटते खरे. पण हे तीने स्वेच्छेने केले आहे. कारण पुढील कथेवरून असे दिसते की ती परत आल्यावर ययातीने तीच्या दोन भावांबरोबर तीने स्वयंवर करावे म्हणून निरनिराळ्या देशात पाठवले. तीला कोणी पसंत न पडल्याने तीने वनवास स्विकारून तपस्येचा निश्चय केला व ब्रह्मचर्य पाळून विपुल तपाचरण केले. तीला कोणतीही लालसा दिसत नाही. तीला स्वेच्छेने वागावयाचा अधिकार आहे व ती त्याप्रमाणे आयुष्यभर जगली.

इथे माधवी ही वस्तू म्हणण्यापेक्षा माधवी ही तिच्या बापाची इस्टेट किंवा प्रॉपर्टी आहे असे म्हणता येईल. तिचा सौदा केल्याने त्याला निश्चितच फायदा होत आहे. राजकुलीन स्त्रियांना या प्रकारे वापरलेले इतिहासात सर्वत्र दिसून येईल. माधवीने हे स्वेच्छेने केले किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख महाभारतात नाही. तत्कालीन धारणेनुसार कन्येचा जन्म (पुढे वापर) हा बापाच्या इच्छापूर्तीकरता होत असावा. द्रौपदीच्या कथेतही हेच दिसते. त्यामुळे बापाची इच्छापूर्ती करणे हे आपले कर्तव्य आहे अशी माधवीची धारणा असावी. स्वयंवर करावे हा निर्णयही माधवीचा आहे असे कथेत दिसत नाही. हा निर्णयही ययातीने घेतलेला दिसतो. कारण असे असू शकेल की इतक्या मोठ्या परीक्षेतून माधवी गेल्यानंतर तिला तिच्या मर्जीनुसार वागण्याची मुभा (वर, संमती, परमिशन वगैरे) मिळाली असावी. तिचा कौमार्यभंग झालेला नाही हा देखील यातीलच एक भाग असावा. एखाद्या व्यक्तिचा मानसिकदृष्ट्या विचार करता, चार पुरुषांसह काळ व्यतीत करून आपल्या चार पोटच्या मुलांना सोडून दिलेली बाई व्यथित होऊन रानात दिवस काढायचा विचार करणे मला शक्य वाटते. किंबहुना, आयुष्यात अशा दिवसांना सामोरी गेलेली व्यक्ती या सर्वापासून दूर जाण्याचा निर्णय घेणे शक्य आहे. अशाप्रकारच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. समोर सुख आलेले असतानाही भूतकाळातील दु:खांमुळे व्यथीत होऊन सर्वस्वाचा त्याग करणारी, एक चटकन आठवलेली कथा - आम्रपालीची किंवा उत्तर रामायणातील सीतेची.

यात एक शक्यता अशी की माधवीने जर स्वेच्छेने नवा नवरा किंवा मागील तीनांतील एक नवरा निवडला असता (विश्वामित्रांनी स्वतःच तिला जायला सांगितले, गालवा सुपूर्त केले असे वाटते. बाकी, ठिकाणी गालव येऊन तिला घेऊन गेला असे दिसते. चू. भू. द्या. घ्या.) तर बाकीच्यांनी नाराज होऊन त्याच्याशी युद्ध पुकारले असते (इतर स्वयंवरांत हे झाल्याचे दिसते.) आणि माधवीच्या नशिबी स्वतःच्याच मुलांतील-आप्तांतील युद्ध, विनाश पाहणे आले असते. (कथेत म्हटले आहे की माधवी या राजांकडे सरासरी १ वर्ष राहिली. विश्वामित्रांकडे ती नेमकी किती काळ राहिली हे मला पडताळून पाहायला हवे कारण विश्वामित्राकडून तिला झालेला पुत्र अष्टक बाल्यावस्थेत नव्हता अशी काहीतरी वाक्ये वाचल्याचे आठवते. असो. नेमके पडताळायला हवे.) म्हणूनही तिने वनवास स्वीकारला असणे शक्य आहे.

(३) चौघांनीही एक पुत्र प्राप्त झाल्यावर ( कष्टाने का होईना) तीला गालवाकडे परत दिले.माधवी गेल्याच्या दु:खाबरोबर पुत्रप्राप्तीचा आनंद मिळवला.

कथा वाचताना असे वाटते की ही चारही राजे पुत्रसुखाला वंचित होते. माधवीने "सरोगेट मदर"प्रमाणे काम केले. पुत्रप्राप्तीमध्ये त्यांना जेवढी रूची होती तेवढी माधवीमध्ये नसावी. माधवी गेल्याचे दु:ख झाले असणे साहजिक आहे पण पुत्रप्राप्तीचे सुख यापेक्षा मोठे असावे.

(४) या सर्व व्यवहारात गालव, ययाती, माधवी, तीचे चार पती (!) व चार मुले, तसेच समाज यापैकी कोणालाच काही अयोग्य वाटले नाही.धर्माची व समाजाची याला मान्यता होती. तीची चारी मुले सदाचारी, प्रतिष्ठीत राजे होते. (कारण)
(५) वंशवृद्धी ही समाजाची (व म्हणून धर्माची) प्राथमिक व महत्वाची गरज, इतर गोष्टी नंतर ?

पाचव्या प्रश्नाचे उत्तर "होय." त्या समाजात बाईची आणि गायीची निकड सारखीच असणे असेही एक उत्तर येथे देता येईल. (विशेषतः महाभारतात, प्रत्येक वीराला बैलाच्या विशेषणाने संबोधले जाते, त्याचप्रमाणे बाईकडे गाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन असावा. - हे माझ्याकडील इंग्रजी प्रतिवरून सांगते आहे.) पांडवांप्रमाणेच माधवीची मुलेही सदाचारी आणि प्रतिष्ठितच गणली गेली. पांडवांना तर कुरुवंशात औरसही गणले गेले आहे.

(६) आज असे घडले तर समाजाची (धर्माला कोण विचारतो म्हणा)प्रतिक्रिया काय असेल? असावी?

आज असे घडले तर समाजाची प्रतिक्रिया सद्य नितीमत्तेला धरून असावी. सद्य नितिमत्तेनुसार, गालव, ययाती, विश्वामित्र आणि इतर तीन राजे यांना तुरूंगाची हवा खाऊ लागण्याची शक्यता मला दिसते. ;-)

(७) नीति कल्पना इतकी कालसापेक्ष आहे का ?

होय आणि नीती ही कालसापेक्षच असावी. तीन-चार हजार वर्षांपूर्वीची १००% नीतीमत्ता आजच्या समाजाला लागू असणे केवळ अशक्य आहे. सद्य समाजाला जे अद्यापही चांगले वाटते (जसे, रामाचे एकपत्नीव्रत) ते पालन करण्याचा प्रयत्न तो समाज करतोच आणि जे कालबाह्य होते ते सोडून देतो.

स्त्री सौंदर्याबद्दल आपले मत ?

हर्यश्व राजाने माधवीच्या बाह्यांगावरून तिची परीक्षा केलेली दिसते. स्त्रीसौंदर्याबाबत प्रत्येकाची वैयक्तिक मते असणे योग्य वाटते. ५०-६० च्या दशकात ठेंगण्या, ठुसक्या नायिका सौंदर्यवती मानल्या जात. ७०-८०च्या दशकांत उफाड्याच्या नायिका सौंदर्यवती मानल्या जात तर ९० नंतर बारीक, मरतुकड्या नायिका सौंदर्यवती गणल्या जातात. यावरून सौंदर्याची संकल्पनाही कालानुरूप असते असे मानावे लागेल. बाकी, हर्यश्व राजाचे सौंदर्याबाबतचे निकष इंटरेस्टींग वाटले.

महाभारत

प्रियाली ताई
आपला प्रतिसाद खरोखरच् अप्रतिम आहे.
माझ्या मते आपली किंवा महाभारत वाचणार्‍या खूप जणांची मुख्य अडचण ही असते की आपल्याकडे जुन्या धार्मिक ग्रंथांकडे वस्तूनिष्ठ दृष्टीकोनाने अजिबात बघितले जात नाही.
मी ऋग्वेदाच्या भाषांतराचे थोडेफार वाचन केलेले आहे. काव्य म्हणून हा ग्रंथ सुंदर आहे परंतु त्यातील समाजरचना, चालरिती या सगळ्या सध्याच्या आपल्या रीतीरिवाजांमधे भयानक वाटतात. ( उदा. अश्वमेध यज्ञात बळी दिलेल्या घोड्याबरोबर यज्ञ करणार्‍या राजाच्या राणीने यज्ञ करण्याच्या आधी संबंध ठेवणे किंवा यज्ञात त्या घोड्याचा बळी दिल्यावर त्याच्या मृत शरीराचा कोणता भाग कोणी खाणे याचे नियम.)
हे लक्षात ठेवले पाहिजे की ऋग्वेद काय किंवा महाभारत काय हे दोन्ही ग्रंथ 'नोमॅडिक' (Nomadic) आयुष्य जगणार्‍या टोळीवाल्यांच्या समाजरचनेतले नियम आणि घटना सांगणारे ग्रंथ आहेत. सध्याच्या सामाजिक रीतीभातींच्या निष्कर्षांवर ते पडताळून बघण्यात अर्थ नाही.
दोन्ही काव्ये अप्रतिम आहेत आणि त्यांचा खराखुरा आनंद लुटण्यासाठी, मनातले संदर्भभुज (Reference Axis) सोडून देऊनच त्यांचे वाचन केले पाहिजे.

अवांतर
नवी दिल्ली मधील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मधील एक अभ्यासक श्री मूर्ती यांच्य मताप्रमाणे महाभारत युद्ध कधी झालेच नाही. ऋग्वेदातल्या 'दहा राजांचे युद्ध' या मूळ गोष्टीवरून व्यासांनी ही कवी कल्पना केली आहे. व पिढ्यानुपिढ्या त्यात आणखी गोष्टी लोक मिळवत गेले. यावर जास्त माहिती हवी असल्यास मला व्य.नि पाठवणे मी आपणास दुवा देऊ शकतो.
चन्द्रशेखर

दुवा इकडेही द्या !

>व्यासांनी ही कवी कल्पना केली आहे.
दुर्गाबाई भागवत व्यासपर्वात लिहितात की, ''व्यासकृती ही उघड एकाची कृती नाही. व्यासाने 'जय' लिहिले. वैंशपायनाने 'भारत' व सौतीने 'महाभारत' लिहिले हे सर्वश्रुतच आहे. परंतु व्यासांनी 'जय' च्या रुपाने एक आदर्श निर्माण करुन जो विशाल पट व परिणामे तयार केली. कलावस्तूचा जो घाट तयार केला, त्याची उत्तरोत्तर सांगताच वैंशपायन व सौती यांनी केली. '' कवींनी काही कवीकल्पना केली असावी असावी असे वाटते.

आपण दिलेल्या दुव्यावरुन बरीच माहिती कळते, पण मताचे खंडन-मंडन करावे इतका अभ्यास नाही. एका घटनेच्या निमित्ताने 'महाभारतात' कथानके-उपकथानके, नाट्य, यांचा पसारा वाढला. याचा अर्थ ही एक लहान घटना होती. हे म्हणायला अभ्यासक नसलो तरी तसे म्हणायला जरा कचतोय.

-दिलीप बिरुटे
(वाचक उपक्रमी)

दाशराज युद्ध

दाशराज युद्ध किंवा महाभारत युद्ध या दोन्हीपैकी कोणतीच घटना त्या त्या कालात लहान नव्हती.
चन्द्रशेखर

दाशराज्ञ युद्ध

गेल्या काही दिवसांत दाशराज्ञ युद्धाबाबत फिरून फिरून संदर्भ माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. व्यासांना या युद्धावरून महाभारत सुचले असावे ही कल्पना तार्किक आणि रोचक वाटते. त्यावर अधिक वाचायला निश्चितच आवडेल, तेव्हा अवश्य दुवा द्यावा. चर्चेत दिलात तर माझ्याखेरीज इतरांनाही त्याचा लाभ उठवता येईल. तसे शक्य नसल्यास, व्य. नि.ने पाठवले तरीही चालेल.

दाशराज्ञ युद्धाबाबत इतरांनाही अधिक माहिती असल्यास त्यांनी मला ती कळवावी.

धन्यवाद.

दाशराज युद्ध

दाशराज युद्धाबद्दल श्री मूर्ती यांच्या लेखाचा हा दुवा आहे.
त्यावर मी एक ब्लॉग इंग्रजीतून लिहिला होता. त्याचा दुवा हा आहे.
तसेच ऋग्वेदावर मी जी पुस्तके वाचली आहेत त्यातील 'वेन्डी डॉनिगर ओ'फ्लाहर्टी' या लेखिकेचे पुस्तक मला विशेष आवडते. त्या पुस्तकाचे परीक्षण मी माझ्या एका ब्लॉगमधे (परत इंग्रजी) केले आहे त्याचा हा दुवा. हे पुस्तक वाचायला आपणास नकी आवडेल.
चन्द्रशेखर

धन्यवाद

दुव्यांबद्दल अनेक धन्यवाद. वेळ काढून वाचेनच.

महाभारताच्या काळावरील चर्चाही वेळ मिळाल्यावर वेगळी टाकते.

भटके ?

महाभारत हे भटक्या (Nomadic) लोकाचे नाही. श्री. चंद्रशेखर यांनी हे मत कोणत्या आधारे दिले आहे हे कळत नाही.कृपया त्यांनी संदर्भ दिले तर बरे होईल. मी आज भारताचार्य चिं.वि. वैद्य यांच्या उपसंहारामधील प्रकरणांची फ़क्त यादी देत आहे. त्यातील कोणतीही ४-५ घेऊन त्या त्या विषयापुरते महाभारत भटक्या लोकांची कथा आहे हे श्री. चंद्रशेखर यांनी सिद्ध करून
दाखवावे. त्यांना सांगावयाचे कारण या सर्व प्रकरणांवर थोडक्यात लिहावयाचे तरी फार लांबण लागेल.उलट श्री.चंद्रशेखर यांचा मुद्दा ते ४-५ बाबींबद्दल सिद्ध करू शकले तरी माझ्या ज्ञानात भर पडेल व अभ्यास कुठे करावा तेही कळेल.एक गोष्ट लक्षात ठेवणे उचित की महाभारतात जा कथा पुरातन कथा म्हणून आल्या आहेत त्यांचे संदर्भ देऊ नयेत.

(1)महाभारताचे कर्ते, (२) महाभारताचा काळ, (४) भारती युद्धाचा काळ, (५) इतिहास कोणत्या लोकांचा, (६) वर्ण-आश्रम-शिक्षण, (९) राजकीय परिस्थिति, (१०) सैन्य व युद्ध, (११) व्यवहार व उद्योगधंदे, (१२)भूगोलिक माहिती, (१३) ज्योतिर्विषयक ज्ञान, (१४) वाडमय व शास्त्रे, (१५) धर्म, (१६) तत्वज्ञान, (१७) भिन्न मतांचा इतिहास

एक काळ असा होता की त्या वेळचे पाश्चिमात्य संशोधक येथील कोणत्याच गोष्टीला चांगले म्हणावयास बिचकत होते. तो काळ गेला व संशोधन पूर्वग्रहदूषित राहिले नाही. तेंव्हा संदर्भकर्त्याला कोणी खोडून काढले नाहीना याचीही खात्री करून घ्यावी.

समित्पाणी शरद

भटके

थोडासा गैरसमज होतो आहे. माझ्या सदोष वाक्यरचनेमुळे तो होणे साहजिकच आहे. मला प्रत्यक्षात असे म्हणायचे होते की ऋग्वेदकालीन भटके व टोळीवाले आर्य यांची समाजरचना व पुढील कालात (म्हणजे प्रथम रामायण व नंतर महाभारत) ते जसजसे प्रस्थापित होत गेले त्या कालांच्यातील समाजरचना ही आजच्या समाजाच्या रीतीभातीच्या संदर्भाँवर अभ्यासणे योग्य ठरणार नाही.

आपण दिलेल्या यादीपैकी, (६) वर्ण-आश्रम-शिक्षण, (९) राजकीय परिस्थिति, (१०) सैन्य व युद्ध, (११) व्यवहार व उद्योगधंदे, (१२)भूगोलिक माहिती, (१३) ज्योतिर्विषयक ज्ञान, (१४) वाडमय व शास्त्रे, (१५) धर्म, (१६) तत्वज्ञान,
या विषयांचा अभ्यास ऋग्वेदकालीन भटक्या आर्यांचाही होता. तो पुढे जास्त प्रगल्भ झाला असेल यात शंकाच नाही.
चन्द्रशेखर

महाभारताचा काळ

महाभारताचा नेमका काळ कोणता याविषयी चिं.वि. वैद्य काय लिहितात हे थोडक्यात सांगता येईल का? (विस्तृत सांगितलेत तर अधिकच उत्तम)

महाभारताचा काल

या विषयावर अक्षरशः गेली शंभर वर्षे तरी उलट सुलट चर्चा चालू आहे. आणि हा स्वतंत्र विषय होऊ शकेल असे मला वाटते तरी माझी उपक्रमच्या संपादकांना विनंती की त्यांनी या विषयाचा स्वतंत्र धागा सुरू करावा म्हणजे विस्तृतपणे लिहिता येईल.
चन्द्रशेखर

सापेक्ष

प्रियालीच्या मुद्देसूद प्रतिसादानंतर काही लिहायचे राहिले आहे असे वाटत नाही. इथे दुर्गाबाईंच्या व्यासपर्व या पुस्तकातील काही ओळी द्याव्याश्या वाटतात.*

" व्यासाच्या धर्मावगुंठित कलेचा विशेष हाच की ती लेण्यांतल्या शिल्पाप्रमाणे ज्याला जसे बघण्याची इच्छा असेल, ज्याची जशी पात्रता असेल, तसे त्याला अनुकूल असे आंतरिक विश्व प्रेक्षकात, वाचकांत वा श्रोत्यांत खुले करते. व्यासाची प्रतिभा क्रांतदर्शी आहे ती याच अर्थाने की ती क्षुद्र, संकुचित, सव्यंग, पापपूरित, कुरूप व्यक्ती व घटना यांनाही सरळ आत्मसात करते. केवळ नीती, सौंदर्य, भव्यताच तिला प्रिय आहे असे नाही."

नीती निश्चितच सापेक्ष आहे. यासाठीच पूर्वीच्या काळातही विदुरनीती किंवा चाणक्यनीती असे नीतीचे प्रकार दिसून येतात. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांनी शिकणे हेही आपल्या नीतीत बसत नव्हते मग इतक्या जुन्या काळाबद्दल काय सांगावे?

सौंदर्यांची कल्पनाही सापेक्ष आहे. आमची इथे. :)

*महाभारतावर हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. किंमत तुमच्या युनिटमध्ये सांगायची झाली तर वैशालीमधले दोन वडासांबार. अर्थात ज्यांना वाचनाची आवड असते त्यांना पैशाची (मागधी?) अडचण येत नाही. व्यक्तिशः पैसे नसताना आणि असताना वाचल्या जाणार्‍या पुस्तकांच्या संख्येत फारसा फरक पडल्याचे अढळलेले नाही. (दुसर्‍याकडून नेलेली पुस्तके परत करायला सोईस्करपणे विसरणे याला कुठल्याही नीतीप्रमाणे चोरी म्हणता येईल का?) याउलट एखाद्या पॉश बंगल्यामध्ये काचेच्या कपाटातील अनुक्रमाने लावलेली पुस्तके पाहून त्याबद्दल मोठ्या उत्साहाने यजमानांशी बोलायला जावे तर "कामाच्या रेट्यात फुरसतच नाही हो निवांत वाचन करायला" असे म्हणून यजमान विषय बदलतात.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

छान लेख

वाचतो आहे. अजून येऊ द्या

रोचक कथा

रोचक कथा.. प्रियालीतैचा प्रतिसादही जबरा
प्रियालीताईंच्या प्रतिसादाशी सहमत.. तरी शेवटच्या चार प्रश्नांवर माझे दोन पैसे:

(५) वंशवृद्धी ही समाजाची (व म्हणून धर्माची) प्राथमिक व महत्वाची गरज, इतर गोष्टी नंतर ?

हो. हे असंच होतं पण आताही असंच चालु आहे. वर प्रियालीताईंनी म्हटल्याप्रमाणे सरोगेट मदर वगैरे प्रकार आहेतच शिवाय स्पर्म डोनेशन, टेस्ट्युब बेबी हे देखील वंशवृद्धी ही समाजाची प्राथमिक गरज अजूनहि आहे हे दाखवतो नाहि का? अजूनहि भारतात (प्रगत देशांच्या तुलनेने) मोठ्याप्रमाणावर असलेली स्त्रीभृण हत्या याच गरजेचे विकृत रूप म्हणता येईल

(६) आज असे घडले तर समाजाची (धर्माला कोण विचारतो म्हणा)प्रतिक्रिया काय असेल? असावी?

आजही असे घडले तर पेक्षा "आजहि असे घडलेले उघड झाले" तर / "आजही असे उघडपणे घडले" तर असे तुम्हाला विचारायचे आहे असे गृहीत धरतो. सध्याच्या भारतीय समाजात अश्या गोष्टी कोण करतो यावर उत्तर थोडेफार अवलंबून आहे.
या कथेशी/प्रश्नाशी विसंगत असले तरी आठवले की, नुकतेच एका खेळाडु-नटीचे लागोपाठ २ क्रिकेटपटु व दोन अभिनेत्यांबरोबरच्या (प्रेम)संबंधांच्या बातम्या आल्या होत्या त्या लोकांनी यात काय विषेश म्हणून फक्त चवीने वाचल्या ;)

मात्र् सर्वसाधारण पणे हे समाजास मान्य नसावे असे वाटते. आणि ते(मान्यता नसणे) योग्यच आहे असे माझे मत आहे.

मात्र कायद्याच्या दृष्टीने बघायचं तर, विवाहबाह्य संबंध पतीच्या व "त्या" पुरुषाच्या मर्जीने ठेवल्यास व कोणीही पोलिसात/कोर्टात तक्रार न केल्यास "त्या" एक/अनेक पुरुषांना पोलिस आपणहून अटक करू शकतात का? किंवा कोर्ट पेपरमधील बातम्यांच्या आधारावर जनहीत याचिका दाखल करून घेऊ शकते का? याबद्दल कायद्याचे जाणकार सांगु शकतील. (अर्थात कोणी तक्रार करणार नाहि हे दुर्मिळ आहे तरीही हा प्रश्न डोक्यात आला)

(७) नीति कल्पना इतकी कालसापेक्ष आहे का ?

होय. ती कालसापेक्षच नव्हे तर स्थलसापेक्षदेखील आहे/असावी. मासे देवासमोर ठेवणे अनीतीपूर्ण म्हणणार्‍या हिंदूंमधील एक भाग -बंगाली हिंदु- माश्याचा नैवेद्य दाखवतो :)

स्त्री सौंदर्य

कल्पना रोचक आहेत. मला सुंदर वाटणार्‍या स्त्रीयांच्या (फोटु)बरोबर (शक्य तितक्या) पडताळून पहातो ;)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

सार्वकालिक तत्त्व

चर्चा फार रोचक आहे. वाचतो आहे. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.
महाभारताचे खंड आजोबांकडे आहेत. त्यातले शांतीपर्व हौसेने घरी आणून ठेवले होते. थोडेसेच वाचले. बहुधा तेव्हा त्यात फारसा रस वाटला नव्हता. आता संधी मिळेल तेव्हा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करीन.
नीति कल्पना बदलत असतात असे वाटते. त्यातून काही सार्वकालिक तत्त्व शोधता आले किंवा कुणी असे काही शोधायचा प्रयत्न केला असेल तर जाणून घ्यायला आवडेल.
--लिखाळ.

लेखमाला वाचनीय

ही कथा माझ्या ओळखीची नव्हती.

लेख आणि प्रतिसाद लक्ष देऊन वाचतो आहे. धन्यवाद.

भारताचार्य वैद्यांचे मत

महाभारताचा काल

श्री. प्रियाली यांनी विचारले म्हणून या विषयावरचे श्री, वैद्य यांचे मत देत आहे. साधारणत; १०० वर्षांपूर्वीचे हे लेखन आहे. श्री.चंद्रशेखर यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन मतेही आलेली असणारच. तीही वाचावयास आवडतील.

श्री.वैद्य यांनी कालाबद्दल ५ भिन्नभिन्न मते उद्धृत केली आहेत.
(१) श्री. मोडक ... इ.स.पूर्व ५०००.
(२) स्वत:चे ... (कलियुग प्रारंभ मानून) इ,स,पूर्व ३१०१.
(३) आर्य समाज ... ( वराहमिहिर व कल्हण यांनुसार) इ.स.पूर्व २४४८.
(४) रमेश्चंद्र दत्त व पाश्चात्य पंडित ... इ.स.पूर्व १४०० चा सुमार.
(५) मद्रासी विद्वान विलंडी अय्यर ... इ,स,पूर्व ११९४. ( ते तर तारीखही देतात, १४ ऑक्टोबर !)

श्री.वैद्य यांनी या विषयावर ४९ पाने खर्च केली आहेत. संक्षेप करावयास जाणकारच पाहिजे.तूर्तास भागवून घ्या.
ग्रंथार्गत पूराव्यावरून भारतीय युद्धापासून कलीयुगाला प्रारंभ झाला. सौती याच्या वेळी (इ.स.पूर्व ३००) ही कल्पना पक्की झाली होती. महाभारतकाल श्रीकृष्णाच्या कालाशी निगडीत आहे. चंद्रगुप्ताच्या दरबारी असलेल्या ग्रीक वकीलांनी लिहलेल्या यादींवरून श्रीकृष्णाचा काल इ,स,पूर्व ३०३२ येतो. छांदोग्य उपनिषद एक पुरातन उपनिषद आहे, त्यातील उल्लेखावरूनही हा काल जुळतो.
कलीयुगाचा काल ठरवावयास ज्योतिष्यांची मते व राजवंशावळी यांचा आधार घ्यावा लागतो. ज्योतिषमत म्हणजे काय? तर कोणते ग्रह, कोणत्या काळी, कुठे होते ते गणिताने ठरवता येते. गणिताच्या अचुकपणाने तुम्हाला ठामपणे दिवस-मास सांगता येतो; सुमारे वगैरे अंदाजपंचे नाही. तरीही या पद्धतीने काढलेले वराहमिहिर व गर्ग यांचे नित्कर्ष चुकीचे असू शकतात.कारण त्या काळी ग्रहस्थिती कोणती होती त्याचा विश्वसनीय पुरावा पाहिजे. गर्ग एक कल्पना करणार व वराहमिहिर त्यावरून नित्कर्ष काढणार असे झाले तर सगळेच मुसळ केरात. पाश्चात्य पंडितांची गोची अशी की ते ग्रीक संस्कृतीपूर्वी जगात कुठेही, काहीही उच्च दर्जाचे होते असे मानावयास तयारच नव्हते. त्यामुळे ऋग्वेद इ.स.पूर्व ४००० वर्षे लिहला गेला असेल असे मानावयास ते तयार नव्हते. ओढून ताणून काळ अलिकडे आणावयाचा प्रयत्न केले गेले.त्यामुळे महाभारताचा काल इ.स.पूर्व १४००. ही चूक नंतर दुरुस्त केली.श्री.अय्यर यांचे गणितही अशाच चूकीच्या गृहितावर अवलंबून केल्यामुळे चुकले.आता इ.स.पूर्व ३१०० या कालासंबंधी माहिती घेऊं.

पुराणांत राजघराण्यांची वंशावळ्या दिल्या आहेत. बरीच वर्षे अशी समजूत होती की त्या विश्वसनीय नाहीत. पण हा ग्रह आता कमी झाला आहे.त्या वरून असे कळते की महाभारत व चंद्रगुप्त यांमध्ये १३२राजे होऊन गेले. मेगॅस्थिनीस हा चंद्रगुप्ताच्या दरबारातील ग्रीक वकील. त्याने लिहलेली माहिती आपल्या समोर नाही पण प्लिनीने लिहलेले त्यावरचे उतारे आहेत. त्यावरून एक अंदाज असा बांधता येतो की चंद्रगुप्तापूर्वी १३२ पिढ्या गेले की कृष्णाचा/महाभारताचा काळ येतो. हे गणित पुराणातील गणिताशी जुळते. जागतीक सरासरी अशी की एक राजा २० वर्षे राज्य करतो.ही गणना आपणाला इ.स.पूर्व ३१०० ला घेऊन जाते.वर सांगितल्याप्रमाणे ग्रह-नक्षत्रे यांचे उल्लेख पाहिले तर महाभारतातील कृतिका नक्षत्र ठीक पूर्वेला उगवते या उल्लेखावरून तो काळ ठरविता येतो, तोही इ.स.पूर्व ३१०० मिळतो. या दोन (किंवा तीन) गोष्टी स्वतंत्र रित्या एकच काळ देत असतील तर तो योग्य धरावयास हरकत नाही.

श्री. वैद्य इतर उहापोहही करतात.जा लोकांना खोलात माहिती पाहिजे असेल त्यांनी संपूर्ण लेख वाचणे उचित. श्री. चंद्रशेखर
इतर मतांबद्दल माहिती देतीलच.

शरद

 
^ वर