दरवाजा उघडा आहे!

दरवाजा उघडा आहे!

आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत "दरवाजा उघडा आहे"! असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून प्रवास करायचा म्हटलं की आपल्याला आठवण होते ती रिक्षा, बसची. मुंबईत असाल तर लोकल ट्रेनची सुद्धा!

रिक्षा, बस आणि लोकल ट्रेनला मुंबईच्या "लाईफ लाईन" म्हणून संबोधले जाते.
लोकल ट्रेन, बस आणि रिक्षा यांमधले एक साम्य मला जाणवले आहे. ते म्हणजे 'दरवाजा उघडाच असतो'. बघा तुम्हालाही हे पटते का?

लोकल ट्रेन: स्वस्त आणि लवकर प्रवास करायचा म्ह्टलं की मुंबईची आम जनता लोकल ट्रेनने प्रवास करायचे पसंत करते. लोकल ट्रेन ९ किंवा १२ डब्यांची असते. प्रत्येक डब्याला खिडक्या असतात. प्रवाशांना हे दरवाजे प्रवाशांसाठी नेहमी उघडे असतात. ही दरवाजे नेहमी प्रवाश्यांसाठी उघडे असतात. दरवाजे उघडे असल्यामुळे, दरवाजांत प्रवासी वेळप्रसंगी उभे राहून प्रवास करत असतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रत्येक डब्यातून प्रवास करतात. डब्याची दारे बंद करण्याचा प्रघात नाही. फक्त पाऊस पडत असताना कधी कधी प्रवासी ही दारे बंद करतात. थोडक्यात काय , ' दरवाजा उघडाच आहे! कोणीही या ! आपले ह्या लोकल ट्रेनमध्ये स्वागत आहे.' अशीच ह्या लोकल ट्रेनच्या डब्याची आखणी केलेली आहे. आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ' दार उघडेच आहे! ' असे म्हणून करतो. ही भारतीय रेल्वे सेवेची लोकल ट्रेन आपल्या भारतीय संस्कॄतीचे तसेच दर्शन घडवते.

बस: बस हे प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे अजून एक सार्वजनिक वाहन. ह्या वाहनाकडे बघितले का? ह्या वाहनाला खिडक्या आहेत पण दरवाजे नाहीत!!!. प्रवाशांना आतबाहेर करण्यासाठी मार्ग आहे. प्रवासी क्षमता ४० ते ४५. पण नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दरवाजाला लटकत प्रवास करत असतात.

रिक्षा: लोकल ट्रेन व बसला गर्दी असते म्हणून आणि जवळचा प्रवास करायचा असेल तर रिक्षाने प्रवास करण्याकडे जनतेचा कल असतो. ह्या रिक्षातील प्रवासी क्षमता ३ व्यक्तींची असते. रिक्षाचालकाला स्वतंत्र जागा असते. रिक्षाकडे नीट निरखून पाहा. ह्या रिक्षाला खिडकी नसते. रिक्षाच्या आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग असतो. ह्या वाहनाला दरवाजा नसतो. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी रिक्षात बसू शकतात. थोडक्यात काय तर 'दरवाजा उघडा आहे'!

दरवाजा उघडा आहे! पण प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात म्हणून का ओरडता ? दरवाजा उघडा आहे!!!. आमच्याकडे प्रवास करण्यासाठी लागणारे तिकीटं व पैसा आहे. आम्ही कसाही प्रवास करू.

ह्या दरवाजा उघडा असल्यामुळे मला काही प्रश्न पडलेले आहेत. त्यांतील हे काही प्रश्न:
दरवाजा बंद करण्यासाठी काही व्यवस्था करता येईल का?
ही व्यवस्था खूप खर्चिक होईल का?
दरवाजा बंद कशासाठी करायचा?
प्रवाशांना दरवाज्यात उभे राहून लोंबकळत प्रवास करण्याची हौस असते का?

तुमच्यापैकी कोणाकडे ह्या प्रश्नांची उत्तरे आहे का? की तुम्हालाही अजून काही नवे प्रश्न पडले आहेत?

माझ्या मते नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दारे लावण्याची सोय केल्यास प्रवाशांचा सुरक्षेचा एक प्रश्न मार्गी लागेल. प्रवाशांना दरवाजांत उभे राहून लोंबकळत प्रवास करता येणार नाही. वाहनांमध्ये चढल्याने किंवा उतरल्याने होणार्याा अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे वाटते. आपल्याकडे फक्त वातानूकुलित बसलाच फक्त दार आहे. ते दार उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी एक कळ दाबावी लागते. ही कळ वाहनचालकाच्या समोर असते त्यामुळे त्याला ती कळ दाबायला सोपे जाते. साध्या बसला ही सोय केल्यास खूप चांगले होईल.

Comments

चित्रे

बस:

bus

रिक्षा:

rickshaw

चांगली चर्चा

चर्चेचा विषय आवडला.

काही सार्वजनिक वाहनांना दरवाजे असणे हे गरजेचे आहे परंतु भारतीय जीवनमानाला ते अनुकूल ठरेलच असे सांगता येत नाही. भारताचे हवामान, लोकसंख्या, नोकरदार वर्ग (पर्यायाने इकॉनॉमी) या सर्वांचा विचार करता वहानाच्या क्षमतेएवढी प्रवासी वाहतूक करण्यास आपली यंत्रणा अपुरी आहे हे लक्षात येते. वातानुकूलित बसेस आणि ट्रेन्स यांचे दरवाजे सतत बंद करून घ्यावे लागतात. जर वाहन वातानुकूलित नसेल तर दरवाजापाशी उभे राहणारे प्रवासी गर्दीत गुदमरतील. बसमध्ये अनेकदा सजग कंडक्टरला लोकांना दरवाज्यात उभे राहण्याविषयी मनाई करताना पाहिले आहे.

ट्रेनमध्ये दारात लोंबकळणारे प्रवासी तसेच ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणारे आपला जीव, वेळप्रसंगी इतरांचा जीव आणि बरेचदा इतरांचा खोळंबा करत असतात. येथे 'दरवाजा उघडा आहे' या भारतीय संस्कृतीपेक्षा 'मी कायदा धाब्यावर बसवू शकतो.' हा मुर्दाडपणा जास्त वाटतो.

रिक्शाचा आकार पाहता किंवा रिक्शाचा इतिहास पाहता, रिक्शा हे वाहन चालकाने (माणसाने) ओढून नेण्याचे आहे. पारंपरिक पद्धतीने या वाहनाला बंदिस्तपणा नाही. (फारतर, छत आहे) हल्लीच्या रिक्शाही त्याच धर्तीवर बांधणी केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे दुचाकीवरील माणसाला दरवाजांची गरज नाही त्याप्रमाणे रिक्शालाही नसावी असे मला वाटते. (वेळप्रसंगी, पावसाळ्यात वगैरे रिक्शाला तात्पुरते दरवाजे, पडदे लावण्याची सोय काही रिक्शावाले करतातच.)

अवांतरः गेल्या वेळी माझ्या मुलीला भारतात आल्यावर रिक्शात बसण्याची भयंकर भीती वाटली होती. "शी! ही कसली दरवाजे नसलेली, तीन चाकी, कुठेही कशीही घुसणारी कार." असा तिचा समज झाला होता पण काही दिवसांत तिला रिक्शा आवडू लागली होती. द. मुंबईत गेल्यावर इथे रिक्शा असत्या तर त्यानेच प्रवास केला असता असे तिला वाटत असे.

रिक्षा

रिक्शाचा आकार पाहता किंवा रिक्शाचा इतिहास पाहता, रिक्शा हे वाहन चालकाने (माणसाने) ओढून नेण्याचे आहे

प्रियाली ने ज्या रिक्षाचा संदर्भ दिला आहे तो सायकल रिक्षा नागपुर- अमरावती ह्या विदर्भ भागात पाह्यला मिळतो. ह्या रिक्षात बसायला मलापण खूप भीती वाटते.

मुंबई, नाशिक भागात ऑटोरिक्षाला 'रिक्षा' किंवा 'ऑटो' म्हणून संबोधले जाते.

दिल्लीत्..

दिल्लीत ऑटोरिक्षाला स्कूटर म्हणतात.
रिक्शा या शब्दाचे पूर्णपणे मराठीकरण झाले आहे ज्यांना वाटते, त्यांनी रिक्षा असे लिहावे, बाकीच्यांनी हिंदीत लिहितात तसे रिक्शा. --वाचक्नवी

रिक् आणि कॅब

रिक्शा या शब्दाचे पूर्णपणे मराठीकरण

रिक्षाला अप्पर वरळी (आपले लोअर परेल हो !), पाली हिल, लोखंडवाला इ. ठिकाणी वावरणारे तथाकथित उच्चभ्रू पूर्वी आऊटो म्हणत असत. मात्र आता त्याला रिक् म्हणतात. मात्र टॅक्सीला पूर्वी व आजही कॅबच म्हणतात.

--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

भारतातील वाहने

काही सार्वजनिक वाहनांना दरवाजे असणे हे गरजेचे आहे परंतु भारतीय जीवनमानाला ते अनुकूल ठरेलच असे सांगता येत नाही. भारताचे हवामान, लोकसंख्या, नोकरदार वर्ग (पर्यायाने इकॉनॉमी) या सर्वांचा विचार करता वहानाच्या क्षमतेएवढी प्रवासी वाहतूक करण्यास आपली यंत्रणा अपुरी आहे हे लक्षात येते. वातानुकूलित बसेस आणि ट्रेन्स यांचे दरवाजे सतत बंद करून घ्यावे लागतात. जर वाहन वातानुकूलित नसेल तर दरवाजापाशी उभे राहणारे प्रवासी गर्दीत गुदमरतील. बसमध्ये अनेकदा सजग कंडक्टरला लोकांना दरवाज्यात उभे राहण्याविषयी मनाई करताना पाहिले आहे.
हे एक नेहमीच पुढे करण्यात येणारे कारण आहे. भारत सोडला तर बाकी कुठे उघड्या दाराच्या ट्रेन व बस बघितल्या नाहीत. नसतीलच् असे मी म्हणत नाहीत पण मी बघितल्या नाहीत. वाहने वातानुकूलित करू नये असा कायदा आहे असे मला वाटत नाही.
रिक्षा हे वाहन अत्त्यंत धोकादायक आहे निदान आता तरी ते बंद करून नॅनो गाड्या आणण्याचा विचार केला पाहिजे. सारखे गरीब गरीब करत बसलो तर आपले जीवनमान सुधारणार कधी. ज्यांना खरोखरच परवडत नाही त्त्यांना सरकार सब्सिडी देऊ शकते.
चन्द्रशेखर

कोणते कारण

हे एक नेहमीच पुढे करण्यात येणारे कारण आहे.

कोणते कारण पुढे येणारे आहे? सजग कंडक्टर प्रवाशांना दारात उभे राहण्यावाचून रोखतो हे का वातानुकूलित वाहनांचे दरवाजे बंद करून घ्यावे लागतात हे का आपल्या लोकसंख्येच्या मानाने आपली वाहतूक व्यवस्था अपुरी आहे हे?

यापैकी कोणतेही कारण योग्य नसल्यास ते कसे योग्य नाही हे समजावून सांगावे.

रिक्षा हे वाहन अत्त्यंत धोकादायक आहे निदान आता तरी ते बंद करून नॅनो गाड्या आणण्याचा विचार केला पाहिजे.

रिक्शा धोकादायी असल्यास दुचाकी वाहनेही धोकादायी आहेत का? आणि तीही बंद करावी का? नसल्यास का नाही? रिक्शा धोकादायी का आहे हे देखील समजावून सांगावे.

उघडा दरवाजा (काहीसे अवांतर)

आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत "दरवाजा उघडा आहे"! असे म्हणून करतो.

कोणत्याही गोष्टीचा अर्थ हा बघणार्‍याच्या दृष्टिकोनावर ("पर्स्पेक्टिव") अवलंबून असतो, असे वाटते. जसे, एकाच पेल्याकडे पाहून दोन वेगवेगळे निरीक्षक "पेला अर्धा भरलेला आहे" आणि "पेला अर्धा रिकामा आहे" अशी दोन (परस्परविरोधी भासणारी) अनुमाने काढू शकतात.

आपल्याच भारतीय संस्कृतीत "दरवाजा उघडा आहे" हे विधान "चालते व्हा!" अशा अर्थानेही वापरले गेलेले पाहण्यात आलेले आहे, या बाबीचीही येथे आवर्जून नोंद करावीशी वाटते.

बाकी उर्वरित लेखाबद्दल जमल्यास पुन्हा कधीतरी.

केवळ दरवाजा उघडा होता म्हणून..

एखाद्या विशिष्ट वाहनप्रकारातून प्रवास करणारे किती टक्के प्रवासी , केवळ दरवाजा उघडा होता म्हणून अपघातग्रस्त झाले याचा कुणी अभ्यास केला आहे का? हे प्रमाण जर मिनस्क्यूल(दुर्लक्षणीय) असेल तर? दरवाजे उघडे असण्याचे फायदेतोटे आणि बंद असण्याचे, यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर कदाचित दरवाजे उघडे असण्याचे जास्त फायदे दिसून येतील.
भारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर! --वाचक्‍नवी

दरवाजा उघडा होता म्हणून

केवळ दरवाजा उघडा होता म्हणून अपघातग्रस्त झाले याचा कुणी अभ्यास केला आहे का?

याचबरोबर, दरवाजा उघडा होता म्हणून की श्टंट करण्याचा प्रयत्न उलटून अपघात झाला म्हणून हे ही अभ्यासायला हवे.

शेवटच्या वाक्याविषयी विशेष माहिती नाही पण बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.

शेवटच्या वाक्याविषयी विशेष माहिती नाही

शेवटच्या वाक्याविषयी विशेष माहिती नसणे शक्य आहे, पण संधी मिळाल्यास एकतरी ओवी अनुभवावी या धर्तीवर, एकवार अनुभव घेऊन खात्री करून घ्यावी.
गाडी सुरू होण्याची वाट न पाहता जे फराळाचे डवे उघडतात, ते गुजराथी, हे नक्कीच अनुभवले असेल.
पुणेकराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्याची बाटली आणि काउंटी कॅपशिवाय घराबाहेर पडत नाही. मुलगी असेल तर, काउंटी कॅपऐवजी ती तोंड आणि डोके झाकणारा बुरखा घालते.(त्याला ती टॉप म्हणते. तिच्या मैत्रिणी तिला या टॉपवरून ओळखतात.) मुंबईकर चेरापुंजीच्या रहिवाशाप्रमाणेच(रोज पडे त्याला कोण रडे?) पावसाळ्यात छत्रीशिवायही घराबाहेर पडू शकतो. आपण ऑफ़िसला जायला निघालो आणि पाऊस आला असे किती वेळा होते? फारतर तीनचारदा. तेव्हा टॅक्सी करायची. उगाच छत्रीचे लोढणे कुणी बाळगावे? --वाचक्‍नवी

सहमत

सहमत
माझा गेले काहि महिने वरचेवर मुंबई-पुणे प्रवास चालु आहे. आणि अगदी हाच अनुभव मला येतो. पुणेकरांना सहसा खिडकी बंद करायाची घाई असते ते का ते कळले नाहि. (निरिक्षणावरून असे वाटले की बहुतांश व्यक्ती केस विस्कटणे, धुळ बसणे वगैरे कारणांनी खिडक्या बंद करू पाहतात)
मात्र त्याहून गंमत अशी की पुणेकरांना इतरांनी खिडकी उघडली की देखील त्रास होतो.
गेल्या ४ महिन्यांत माझे जवळजवळ दर अल्टर्नेट प्रवासात खिडकी बंद न केल्यामुळे भांडण/किरकोळ वाद/विनंती यापैकी एक झाले आहेच. तेव्हा श्री. वाचक्नवींच्या म्हणण्यात बराच तथ्यांश आहे हे नक्की (अगदी सरसकटीकरण करता आले नाहि तरी सगळे पुणेकर या ऐवजी बव्हंशी पुणेकर असा बदल करून असे अनुमान काढता यावे :) )

मात्र मला वार्‍याची म्हणा अथवाखिडकी उघडी ठेवण्याची ओढ असण्यामागे माझे मुंबईकरपण आहे हे आजच जाणवले :)
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

अनुमान नव्हे! निरीक्षण!

अगदी सरसकटीकरण करता आले नाहि तरी सगळे पुणेकर या ऐवजी बव्हंशी पुणेकर असा बदल करून असे अनुमान काढता यावे

असे अनुमान काढता येणार नाही. मात्र असे एखाद्याचे निरीक्षण असू शकेलही.

मुंबईकर

खालचा प्रतिसाद मूळ विषयाला अवांतर आहे...

मुंबईकर चेरापुंजीच्या रहिवाशाप्रमाणेच(रोज पडे त्याला कोण रडे?) पावसाळ्यात छत्रीशिवायही घराबाहेर पडू शकतो.

हा मुंबईकर (ठाणेकर) म्हणून असलेला मूळ स्वभाव अमेरिकेत आल्यावर पण गेलेला नाही. आजही खूप पाऊस असताना छत्री घेणे म्हणजे कमीपणाचे वाटते (स्टुडंट असताना पण आणि नंतर गाडी असल्यामुळे काय फरक पडतोय असे वाटते...)

तसेच अजून एक सवय जी नंतर जाणिवेने घालवली: अमेरिकेत आल्यावर प्रथमच विद्यापिठाच्या बसचा (पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा) उपयोग करणार होतो. बस आली, दार उघडले रे उघडले आणि ते पहाताच ताबडतोब आत शिरलो, नंतर वळून पाहीले तर बाकीचे बाहेरील प्रवासी बसमधील प्रवासी उतरण्याची वाट पहात होते, सगळे उतरल्यावर शांतपणे बसमधे चढले...

विपर्यस्त अनुमान

भारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर!

'भारतभर केवळ पुणेकर आणि मुंबईकर प्रवास करतात' किंवा 'भारतात रेल्वेने प्रवास करणार्‍यांपैकी पुणेकर आणि मुंबईकर वगळता बाकीचे सर्व प्रवासी खिडकी अंशतः बंद आणि अंशतः उघडी ठेवतात' यांपैकी किमान एक विधान सत्य असल्याखेरीज वरील अनुमान हे विपर्यस्त आहे असे म्हणावे लागेल. (दोन्ही विधाने सत्य असणे बहुधा अशक्य असावे.)

वरील अनुमान हे गृहीतक मानल्यास आणखीही काही विपर्यस्त अनुमाने काढता येतील. जसे, '(वातानुकूलित डब्यांमध्ये खिडकी उघडणे अशक्य असते, हे लक्षात घेता) वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करतात, ते पुणेकर(च)'.

विनोदाचा भाग सोडल्यास, आपल्या अनुमानातील तथ्य पडताळून पाहण्याचा प्रयत्न करू.

मी पुणे ४११०३०मध्ये वाढलेला, संस्कारक्षम वयातील वर्षे (formative years) बव्हंशी पुण्यात (आणि काही अल्पांशाने हिंदी पट्ट्यात) घालवलेला, मुंबईत जेव्हा जेव्हा राहिलो तेव्हा एक तर पाहुणा म्हणून किंवा उपरा म्हणून राहिलेला असा एक (भूतपूर्व) पुणेकर आहे. किंबहुना जन्म मुंबईत झालेला असणे आणि मुंबईत राहणारे असंख्य मुंबईकर नातेवाईक असणे (त्यात काय, कोणाचेही असू शकतात!) यासारखे काही पूर्णपणे असंबद्ध मुद्दे सोडल्यास, मी कोणत्याही दृष्टिकोनातून स्वतःला 'मुंबईकर' म्हणवणे हे तथ्यास धरून होणार नाही. संस्कारांनी मुंबईकर म्हणवण्याइतका मुंबईचा प्रभाव मुंबईत आजोळी अगणित उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवूनही माझ्यावर पडला आहे असे मला वाटत नाही. मुंबईच्या गर्दीत मी मिसळू शकतो, पण त्या गर्दीचा एक भाग म्हणून मी स्वतःला पाहू शकत नाही. भर गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये फारसे न घाबरता चढायला मला निदान एके काळी, मुंबईशी थोडाफार संबंध असण्याच्या काळात, जमत असे, पण आवडते असे म्हणू शकणार नाही. (तरीही, सर्व त्रुटी लक्षात घेऊनसुद्धा, मुंबईची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था ही पुण्याच्या किंवा एके काळी मी अनुभवलेल्या दिल्लीच्यासुद्धा सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेपेक्षा कित्येक पटीने चांगली आणि विश्वासार्ह आहे, हे मी मानतो. किंबहुना, भारतातल्या सर्वाधिक सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थांमध्ये ती गणता यावी असे मला वाटते. पण हा सर्वतोपरी वेगळा मुद्दा.) आणि पिंडाने मी काही अंशी अजूनही पुणेकर आहे हे निश्चित, आणि उर्वरित अंशी इतर बराच काही असेन, पण मुंबईकर निश्चित नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.

थोडक्यात, आपल्या वरील अनुमानातील तथ्य पडताळून पाहण्याच्या दृष्टीने उदाहरण म्हणून मी पुरेसा पुणेकर आणि निश्चितपणे गैरमुंबईकर आहे. ('पुरेसा पुणेकर' असणे हे जर पुरेसे नसेल, तर मी पुणे तात्पुरते किंवा कायमचे सोडल्यानंतरचे माझे आयुष्य विचारात न घेता, केवळ मी पुण्यात राहत असतानाचे, 'शंभर टक्के पुणेकर' असतानाचे माझे आयुष्य आणि त्या काळातील माझ्या वृत्ती विचारात घेऊ.)

रेल्वेप्रवासाचे - विशेषतः लांब पल्ल्याच्या रेल्वेप्रवासाचे - मला नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. त्यातसुद्धा खिडक्या उघड्या टाकून (आणि कधी तर डब्याचा दरवाजा उघडा टाकून फुटबोर्डावर उभे राहूनसुद्धा), बाहेरची गंमत बघतबघत प्रवास करायला मला लहानपणापासून आवडते. (लहानपणी माझी मुंबईत वाढलेली आई अनेकदा प्रवासात सोबत असताना माझी ही इच्छा पुरी होऊ देत नसे, हा भाग वेगळा.) जेव्हाजेव्हा शक्य होते तेव्हातेव्हा अशा प्रकारे प्रवास करण्याचा आनंद मी मनसोक्त लुटत आलेलो आहे. अगदी प्रौढत्वीसुद्धा. पुण्याहून मुंबईला जाताना खंडाळ्यानंतर ब्रेक तपासण्यासाठी तीन ठिकाणी थांबणे हे सर्वच गाड्यांना अपरिहार्य असते, त्यापैकी 'मंकी हिल' या पहिल्या थांब्यापाशी सकाळच्या न्याहरीच्या वेळी गाडी थांबली, की गाडीपाशी अनेक माकडे (बहुधा काही खायला मिळेल या आशेने, तर क्वचित कधीकधी आपल्या लहानग्यांना 'ती बघ बाळा झुकझुकगाडी!' म्हणून दाखवण्यासाठी) जमतात. गाडीची खिडकी उघडून त्या माकडांशी सलगी साधायला, किमानपक्षी आपल्या त्या बांधवांचे अधिक चांगल्या रीतीने दर्शन घ्यायला मला खरे तर अजूनही आवडते. (वातानुकूलित डब्यांत खिडकी उघडणे शक्य नसल्यामुळे हे जमत नाही, आणि खिडकी उघडत नसल्याकारणाने कोणी काही खायला देण्याची सुतराम् शक्यता नसल्याकारणाने माकडेही वातानुकूलित डबे टाळताना दिसतात. पण सेकंडक्लासाच्या डब्यात छान जमते! आजही त्या बाजूला कधी गेलो आणि तो अनुभव घेण्याचा योग आला, तर तो अनुभव घ्यायला मला निश्चित आवडेल.)

थोडक्यात, आगगाडीची खिडकी उघडी टाकून प्रवास करायला मला आवडते. आणि मी पुणेकर आहे. (निदान, एकेकाळी मी पुणेकर होतो. आणि आगगाडीची खिडकी उघडी टाकून प्रवास करायला मला त्या काळीही आवडत असे.)

एखादा निष्कर्ष योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी केवळ एक किंवा काही उदाहरणे देऊन पुरत नाही. तर तो निष्कर्ष कोणत्याही परिस्थितीत लागू आहे हे तर्काने सिद्ध करावे लागते. उलटपक्षी, एखादा निष्कर्ष योग्य नाही हे दाखवून देण्यासाठी एकच अपवादात्मक उदाहरण प्रस्तुत करणे पुरेसे ठरते.

Quod Erat Demonstrandum!

महत्त्वाचा वाक्यांश

>>बाकीचे सर्व प्रवासी खिडकी अंशतः बंद आणि अंशतः उघडी ठेवतात' <<
पर्स्पेक्टिव्ह यांनी अनुभवावरून काढलेल्या माझ्या निष्कर्षातला महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतलेला दिसत नाही. पुणेकर आणि मुंबईकर जे काही करतात ते गाडी चालू झाल्याझाल्या करतात. इतर प्रवासी काहीही करीत असतील किंवा नसतील, पण ते जे काही करतात किंवा करत नाहीत, ते गाडी सुरू झाल्याझाल्या होत नाही.--वाचक्‍नवी

तरीही...

ठीक. तो वाक्यांशही विचारात घेऊ.

'भारतात पुणेकर आणि मुंबईकर यांव्यतिरिक्त इतर प्रवासीही रेल्वेप्रवास करतात' हे मान्य केल्यास, 'भारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर!' या विधानावरून 'पुणेकर आणि मुंबईकर वगळता बाकीचे सर्व प्रवासी गाडी सुरू झाल्याझाल्या खिडकी उघडी अथवा बंद करत नाहीत' असा निष्कर्ष निघतो.

हे थोडेसे संदिग्ध होते, परंतु याचा अर्थ बहुधा, असे प्रवासी गाडी सुरू झाल्याझाल्या (१) खिडकीचे काहीही करत नाहीत (म्हणजे उघडी, बंद किंवा अर्धवट उघडी जशी कशी असेल तशीच राहू देतात) किंवा (२) खिडकीचे काही केलेच, तर ती पूर्णपणे बंद किंवा पूर्णपणे उघडी राहणार नाही याची खबरदारी घेतात, असा घेता यावा.

यावर वरकरणी विश्वास ठेवणे अवघड वाटते. थोडे अधिक निरीक्षण करावे लागेल.

परंतु तरीही, (१) मी पुणेकर आहे किंवा किमानपक्षी एकेकाळी पुणेकर होतो, आणि (२) मी पुणेकर असताना गाडी सुरू झाल्याझाल्या सहसा खिडकी बंद केलेली नाही (आणि आजही बहुधा करणार नाही) एवढे आपले अनुमान फोल ठरवण्यासाठी पुरेसे ठरावे.

मी कोण्?

परंतु तरीही, (१) मी पुणेकर आहे किंवा किमानपक्षी एकेकाळी पुणेकर होतो, आणि (२) मी पुणेकर असताना गाडी सुरू झाल्याझाल्या सहसा खिडकी बंद केलेली नाही (आणि आजही बहुधा करणार नाही) एवढे आपले अनुमान फोल ठरवण्यासाठी पुरेसे ठरावे.

माझेही असेच् आहे. मी खिडकी बंद करत् नाही. केल्यास् वाद घालण्याकडे भर् असतो.

मी आजही पावसाळ्यात् विनाछत्री, उन्हाळ्यात् विना टोपी कुठल्याही प्रकारची, असाच वावरतो.
-पुणेकर (सध्या पुण्याबाहेर)

अनुमान

वरील अनुमान हे प्रायोगीक संशोधनातुन (experimental research) मांडलेले नसून निरिक्षणात्मक संशोधनातुन ( observational research) मांडलेले आहे. अश्या प्रकारच्या संशोधनात सांख्यिकीचा आधार घेऊन (संख्यात्मक निरिक्षण संशोधन असल्यास) अनुमान मांडले जाते. बहुतांशी पुणेकर लोक (सांख्यिकीच्या गणितासाठी पुरेसे) जर वरील प्रमाणे आचरण करत असतील तर, 'पुणेकर गाडी सुरू झाल्या झाल्या खिडकी बंद करतात (करण्याची शक्यता न करण्यापेक्षा फारच अधिक असते त्यामुळे पुणेकर= खिडकी बंद असे म्हणता यायला वाव आहे.)' हा निष्कर्ष वैध ठरू शकतो. तुम्ही पुणेकर असून आणि खिडकी उघडी ठेवणारे असूनही ह्या निष्कर्षाला अवैध ठरवू शकत नाही.

प्रतिवाद

निरीक्षणात्मक संशोधनात निरीक्षणसंचाच्या निवडीवर अनुमानाची अचूकता अवलंबून असते. आणि निरीक्षणसंच जसजसा व्यापक होत जातो, तसतशी अनुमाने बदलूही शकतात.

सखोल अभ्यासाअभावी ठाम विधान करू शकत नाही, आणि सविस्तर विवेचनही करू शकत नाही, आणि विधानात त्रुटीही असू शकतील, पण न्यूटनीय पदार्थविज्ञान काय किंवा आइनस्टाइनीय पदार्थविज्ञान काय, हे बर्‍याच अंशी उपलब्ध निरीक्षणांवर आणि त्या निरीक्षणांच्या आणि तर्काच्या आधारे काढलेल्या संभाव्य निष्कर्षांवर आधारलेले आहे, असे वाटते. जसजशी निरीक्षणे संशोधित होत गेली, तसतशी विज्ञानाची थियरीही बदलली, आणि आधीची थियरी ही नवीन थियरीच्या प्रकाशात नेमक्या कोणत्या मर्यादांमध्ये समजावून सांगता येण्यासारखी आहे, हेही कळत गेले, असे ऐकलेले आहे. (चूभूद्याघ्या.)

तसेच, निरीक्षणांवरून थेट अनुमानही आपोआप काढता येत नाही. (फार तर हायपॉथेसिस बनवता येऊ शकतो.) अनुमान काढता येण्यासाठी त्या निरीक्षणांवरून त्या निष्कर्षाप्रत पोहोचताना, असे कशा प्रकारे घडू शकत असेल, यामागील मेकॅनिझम काय, याचा खुलासा करण्याचा एक प्रयत्न, एक थियरी, एक मॉडेल, एका प्रकारची तात्विक किंवा तार्किक बैठक लागते, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

शिवाय निरीक्षणांवरून थेट अनुमान काढताना (किंवा अनुमानासाठी निरीक्षणे घेताना म्हणा) 'कन्फर्मेशन बायस' नावाचा प्रकार आड येऊ शकतो, ते वेगळेच. (याबद्दल माहिती देणारा दुवा 'तो .' या सदस्याने इतरत्र कोठेतरी दिलेला आहे, तो शोधून पुन्हा इथे चिकटवण्याचे कष्ट घेत नाही. गरजूंनी विकीशोध घ्यावा.)

केवळ निरीक्षणांवरून कोणत्याही तात्विक किंवा तार्किक बैठकीशिवाय थेट अनुमान काढताना आपल्याला हवा तो - आणि बहुधा चुकीचा - निष्कर्ष निघण्याचा धोका नेहमीच असतो. आणि केवळ सांख्यिकीच्या आधारे काय वाटेल ते सिद्ध करता येऊ शकते. याची पुष्कळ उदाहरणे देता येतील. त्याचे (प्रस्तुत बाबतीत नाही तरी) कधीकधी भयंकर परिणामही होऊ शकतात.

- सोनेरी केस असलेल्या मुली (blondes) या डोक्याने अंमळ कमीच असतात, हे "सांख्यिकी"ने किंवा "निरीक्षणा"ने सिद्ध करता यावे.
- सरदारजी लोकांना डोके कमी असते हे "निरीक्षणा"च्या किंवा "सांख्यिकी"च्या आधारे सिद्ध करता यावे.
- जर्मन आर्यवंश हाच सर्वोच्च असून बाकीचे वंश हे मागासलेले आणि केवळ गुलामगिरीत राहण्याकरिता किंवा काही बाबतींत नष्ट करण्याकरिता योग्य आहेत, हे सांख्यिकीच्या आधारे सिद्ध करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, असे ऐकिवात आहे. (चूभूद्याघ्या.)
- ज्यू हे कसे अनिष्ट आहेत आणि ज्यूंच्या संहार हाच कसा इष्ट आणि योग्य आहे यासाठी आगाऊ justification, पार्श्वभूमी निर्माण करण्याकरिता ज्यूंबद्दल "निरीक्षणे" मांडण्याचे प्रयत्न झालेले आहेत.
- इंग्रज हे मांसभक्षक असल्याने आणि विशेषतः गोमांसभक्षक असल्याने ताकदवान असतात, तर हिंदू हे बहुसंख्येने शाकाहारी असल्यामुळे दुबळे आणि मागासलेले आहेत, असा एक "निरीक्षणावर आधारलेला" समज इंग्रजांमध्ये एके काळी सामान्यतः प्रचलित असल्याचे गांधीजींच्या 'माझे सत्याचे प्रयोग'मध्ये वाचल्याचे अंधुकसे आठवते.
- "ताडन के अधिकारी" हे "निरीक्षणा"वरूनच निश्चित केलेले असावेत असे वाटते.
- "अमक्याअमक्या जातीतील मुलगी करून घेऊ नये, कारण त्या जातीत जावयाला विष घालतात" आणि "अमक्याअमक्या जातीचे लोक घाणेरडे असतात" अशा प्रकारची विधाने त्या जातीतल्या एखाद्या व्यक्तीस विनाकारण आणि "सहज बोलताबोलता" ऐकवण्यात आल्याची उदाहरणे पाहिलेली आहेत. संबंधित व्यक्तीने प्रतिवाद केला असता "मग 'सर्वजण' असे का म्हणतात हो?" असे निरागस उत्तर मिळाले, असे कळते, त्याअर्थी हे निष्कर्ष कधीकाळी "निरीक्षणा"वरूनच निघाले असावेत, असे वाटते.
- एक टोकाचे आणि आत्यंतिक घाणेरडे उदाहरण द्यायचे झाले, तर अमेरिकेतील वर्णद्वेष खूपच अधिक प्रमाणात असण्याच्या काळात, 'कृष्णवर्णीय पुरुषांना मेंदू कमी आणि त्याऐवजी लैंगिक अवयव जास्त असतो' हे "निरीक्षणाने सिद्ध" करण्याकरता काही वर्णद्वेष्ट्यांनी सर्वेक्षणे घेण्याचे प्रकारही घडलेले असल्याबद्दल वाचलेले आहे. (नेमका संदर्भ याक्षणी अचूकपणे सांगू शकत नाही, परंतु बहुधा शोधून सांगू शकेन. पुस्तक - हरवले नसल्यास - माझ्या संग्रही आहे. पुस्तकाचे नाव या क्षणी नक्की आठवत नाही, पण बहुधा 'Racial Healing' असे होते. लेखकाचे नाव या क्षणी आठवत नाही. पुस्तक १९९०ने सुरू झालेल्या दशकात प्रसिद्ध झाले. प्रसंग पुस्तकाच्या लेखकाने स्वतःच्या आठवणींतून वर्णिलेला असून त्याची सत्यासत्यता मी स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही. चूभूद्याघ्या.)
- फार काय, माझा समजा पाच/पन्नास/शंभर/"सांख्यिकीच्या-गणितासाठी-(माझ्या-लेखी)-पुरेश्या" ख्रिस्ती/मुसलमान/हिंदू/ब्राह्मण/चित्पावन/दलित/ओबीसी/पारशी/शीख/पुणेकर/मुंबईकर/वैदर्भीय/अमेरिकन/पाकिस्तानी/कृष्णवर्णीय/समलैंगिक/दाक्षिणात्य/भय्या/बिहारी गाळीव-जागा-हवी-तशी-भरा गटातील लोकांशी संबंध आला असेल, तर त्यांच्याबद्दलच्या पूर्वग्रहाधारित "निरीक्षणां"वरून/निरीक्षणजन्य "सांख्यिकी"वरून मी तो संपूर्ण मनुष्यगट चांगला/वाईट/हलकट/मोकळ्या-मनाचा/संकुचित-मनोवृत्तीचा/लायकी-नसूनही-मिळणारे-फायदे-लाटायला-टपून-बसलेला/बिनडोक/तद्दन-येडा/माथेफिरू/"विकृत"/दांडगट/मवाली/गुन्हेगारी-वृत्तीचा/येथे-हवे-ते-विशेषण-भरा आहे, असा निष्कर्ष काढून मोकळा होऊ शकतो. पैकी कोणतेही विशेषण लागू होऊ शकणार्‍या व्यक्ती कोणत्याही जमातीत सापडू शकतात, हे अशा वेळी सोयिस्करपणे विसरायचे असते. आणि अशी उदाहरणे सापडली, तर त्यांच्याकडे एक तर १. दुर्लक्ष करायचे असते, किंवा २. अपवादात्मक मानायचे असते. (आणि अपवाद मोजायचे नसतात.)

अर्थात अगोदर हवी तशी अनुमाने काढून, त्यात निरीक्षणे बसवून त्यावर वाटेल तशी "तार्किक/तात्त्विक बैठक"ही लादता येते, या दृष्टीने केवळ तात्त्विक/तार्किक बैठक दाखवता येणे हेसुद्धा पुरेसे आहेच, असे नाही, परंतु त्या परिस्थितीत किमानपक्षी ही तात्त्विक/तार्किक बैठक तपासून योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याची सोय तरी असते. आणि तात्त्विक/तार्किक बैठक/मॉडेल चूक ठरल्यास नवीन मॉडेलचा शोध घेता येतो. आणि त्यातून निष्कर्ष कायम राहणे किंवा बदलणे यांपैकी काहीही होऊ शकते.

परंतु तात्त्विक/तार्किक बैठकीअभावी (rationalizing explanationअभावी) केवळ निरीक्षणांआधारे अंतिम निष्कर्ष? मान्य होण्यासारखे नाही.

प्रति-प्रतिवाद

अनुमान काढता येण्यासाठी त्या निरीक्षणांवरून त्या निष्कर्षाप्रत पोहोचताना, असे कशा प्रकारे घडू शकत असेल, यामागील मेकॅनिझम काय, याचा खुलासा करण्याचा एक प्रयत्न, एक थियरी, एक मॉडेल, एका प्रकारची तात्विक किंवा तार्किक बैठक लागते, असे वाटते.

मान्य! असा खुलासा आवश्यक आहे. पुणेरी लोक खिडक्या बंद ठेवतात हे निरिक्षण झाले, नेमके असे का? त्यावर विवेचन देखिल हवे. परंतु प्रत्येक वेळेला असे विवेचन देणे शक्य नसते. उदा कर्करोग होण्याची बहुतांश कारणे ही निरिक्षणात्मक संशोधनात्मक पुढे आलेली आहेत. सिगरेट प्यायल्याने माणसाला कर्करोग होतो हे निव्वळ निरिक्षणातुन सिद्ध झालेले आहे. सिगरेटच्या धुराने पेशींमधे नेमके असे काय बदल होतात ज्यामुळे कर्करोग होतो (यामागील मेकॅनिझम काय) हे अजून तरी समजलेले नाही. तरीही सांख्यीकीच्या आधारे हे अनुमान जगात मान्य केलेले गेले आहेत.

निरिक्षणात्मक संशोधनात असेही घडू शकते की, ज्या लोकांना खिशात माचिस (काड्यापेटी) ठेवायची सवय असते त्यांना कर्क रोग होतो असे दिसुन येईल, म्हणून खिशात माचिस ठेवल्याने कर्करोग होतो असे अनुमान काढल्यास ते तुम्ही म्हणता ते धोके संभवतात (चुकीच्या गोष्टी मनाप्रमाणे सिद्ध करण्याचे) परंतू ते संशोधन परिपुर्ण नसेल कारण खिशात काड्यापेटी ठेवणारे लोक हे जवळ जवळ १००% धुम्रपान करणारे असतात ही घटना इथे दुर्लक्षली गेलेली आहे.

मूळ प्रतिसादातील मुद्दा इतकाच होता की उद्या एखाद्याने, मी हेवी स्मोकर आहे तरीही मला कर्करोग झालेला नाही, म्हणजे धुम्रपानाने कर्करोग होतो हा अनुमान चुकिचा आहे असे म्हणणे चूकीचे आहे. असेच काहीसे आपल्या प्रतिसादात आपण म्हंटल्या सारखे वाटले (मी पुणेकर आहे मी खिडकी उघडी ठेवतो)

अवांतर: वंश, रंग ह्यांचा बुद्धीमत्तेशी थेट संबध ह्यावर संशोधन करणारी शाखा आहे. त्यातुन येणारे निष्कर्ष हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे असू शकतात असा अंदाज असल्याने ही शाखा वादग्रस्त आहे आणि त्यात फारसे संशोधन होत नाही.

तरीही...

सिगरेट प्यायल्याने माणसाला कर्करोग होतो हे निव्वळ निरिक्षणातुन सिद्ध झालेले आहे. सिगरेटच्या धुराने पेशींमधे नेमके असे काय बदल होतात ज्यामुळे कर्करोग होतो (यामागील मेकॅनिझम काय) हे अजून तरी समजलेले नाही. तरीही सांख्यीकीच्या आधारे हे अनुमान जगात मान्य केलेले गेले आहेत.

(वैद्यकशास्त्र याबद्दल नेमके काय आणि कोणत्या शब्दांत म्हणते हे तपासून पहावे लागेल, पण...)

सिगरेट प्यायल्याने कर्करोग होण्याची नेमकी मेकॅनिझम काय, सिगरेट पिणे आणि कर्करोग यांच्यातील नेमकी लिंक काय, हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत याला 'निष्कर्ष' न म्हणता 'हायपॉथेसिस'च म्हणावे लागेल असे वाटते.

अर्थात 'हायपॉथेसिस'प्रमाणे जे शक्य वाटते त्याबद्दल ते केवळ 'सिद्ध' झालेले नाही म्हणून काळजी घेऊ नये, असे काहीही नाही.

आणि माझ्या कल्पनेप्रमाणे, वैद्यकशास्त्र 'सिगरेट प्यायल्याने कर्करोग होतो' असे मानत नसून, 'सिगरेट पिऊन कर्करोग होण्याची शक्यता सिगरेट न पिता कर्करोग होण्याच्या शक्यतेपेक्षा खूपच अधिक आहे', अर्थात 'सिगरेट प्यायल्याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते' (तो एक risk factor आहे - "risk", again, being a probabilistic term) एवढेच म्हणते, असे वाटते. तज्ज्ञांनी खुलासा करावा.

Empirical evidence/Statistical evidence आणि conclusion यांच्यात फरक असावा, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

'मी हेवी स्मोकर आहे पण मला कर्करोग झालेला नाही, म्हणजे धूम्रपानाने कर्करोग होतो हे अनुमान चुकीचे आहे' या विधानाबद्दल बोलायचे झाले, तर एक म्हणजे 'आतापर्यंत झालेला नाही' याचा अर्थ 'उद्या होणारच नाही' असा नाही ही बाब विचारात घेतली गेलेली नाही. दुसरे म्हणजे, 'ओढली सिगरेट की लगेच झाला कर्करोग' अशा प्रकारचा कोणताही प्रत्यक्ष आणि तातडीचा संबंध असण्याचा कोणाचाच दावाही नाही - वैद्यकशास्त्राचाही नाही. त्यामुळे उद्या तो कर्करोग न होता साप चावून मरू शकतो. आणि समजा साप चावला नाही, तरी सिगरेट ओढण्याचा आणि कर्करोग होण्याचा संबंध केवळ 'शक्यता वाढण्या'चा असल्यामुळे, तो कधीही कर्करोग न होता शंभर वर्षे जरी जगला, तरी त्यामुळे कोणत्याही बाजूने काहीही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्याचा निष्कर्ष चूक आहे असे म्हणता येईल. किंवा, म्हटले तर, 'सिगरेट ओढणे आणि कर्करोग यांचा प्रत्यक्ष संबंध' सिद्ध झालेला नसल्याने - किंवा असा 'प्रत्यक्ष संबंध' असण्याबद्दल कोणाचा दावाही नसल्याने - एका अर्थी त्याचे म्हणणे बरोबरही म्हणता येईल.

आता 'मी पुणेकर आहे पण मी खिडकी उघडी ठेवतो' याचा विचार करू. 'पुणेकर खिडकी बंद करतात तर मुंबईकर खिडकी उघडतात' या 'निरीक्षणा'बाबत मला वांदा नाही. एका किंवा अनेक निरीक्षकांचे तसे निरीक्षण असूही शकेल. त्यातून आणि केवळ त्यातून काहीही सिद्ध होत नाही. पण असा 'निष्कर्ष' काढायचा झाला, तर त्याबद्दल rationalizing explanation लागेल. ते तपासावे लागेल. आणि मग मी पुणेकर असूनही खिडकी का बंद करत नाही, माझ्या बाबतीत असे व्हायला इतर पुणेकरांपेक्षा वेगळे असे नेमके कोणते घटक कामी येतात, याचेही rationalizing explanation लागेल. तेही तपासावे लागेल. आणि या दोहोंतही काही त्रुटी न आढळल्यास मगच ते अनुमान म्हणून स्वीकारता येईल; तोपर्यंत नाही.

अवांतर पण रोचक

कारणमीमांसा, सांख्यिकी पुरावा, कन्क्लूजन वगैरे काय आहेत, याबद्दल वेगळा धागा काढावा.

उद्बोधक चर्चा होऊ शकेल असे वाटते.

कार्यकारणभाव म्हणजे नेमके काय असते याच्याशी भौतिकशास्त्रांना फारसे देणेघेणे नसते. त्यामुळे रॅशनलाइझिंग एक्स्प्लॅनेशन (विवेककारक स्पष्टीकरण?) म्हणजे नेमके काय ते मला कळलेले नाही.

बाकी कुठलीही "कारण"कल्पना फारफारतर शक्यताच (रिस्क) वाढवते. गळ्यावर सुरी फिरत असताना जनावराचा मृत्यू त्याच क्षणी हृदयविकाराचा झटका येऊनही होऊ शकतो.

कार्यकारणभाव हा एक जटिल विषय आहे. अत्यंत नेमक्या व्याख्या योजत त्याची चर्चा व्हावी, आणि वेगळ्या धाग्यात व्हावी, ही विनंती.

'रॅशनलायझिंग एक्स्प्लनेशन'संबंधी...

'रॅशनलायझिंग एक्स्प्लनेशन' ही शब्दयोजना 'कारणमीमांसा किंवा कार्यकारणभाव आहे असे वाटत असता तो काय असावा हे दाखवण्याचा अथवा त्याबद्दल अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करणारे स्पष्टीकरण' अशा अर्थी मी योजली होती. थोडक्यात, a theory, a model that seeks to explain away the observations in accordance with the conclusion, in a consistent fashion.

(टू रॅशनलाइझ = टू ट्राय टू रीझन अशा अर्थी.)

बहुधा साधारण शब्दयोजना (standard term) नसावी.

असो. बाकी पुन्हा कधीतरी. (तूर्तास दमलो.)

दहा टक्के हाय हाय! दहा टक्के हाय हाय! दहा टक्के हाय हाय! दहा टक्के हाय हाय! दहा टक्के हाय हाय!

"चालते व्हा!"

आपल्याच भारतीय संस्कृतीत "दरवाजा उघडा आहे" हे विधान "चालते व्हा!" अशा अर्थानेही वापरले गेलेले पाहण्यात आलेले आहे, या बाबीचीही येथे आवर्जून नोंद करावीशी वाटते.

"चालते व्हा!" असा अर्थ मी विचारात घेतला नव्हता. चांगलीच बाजू बघितली. असो...

थोडक्यात काय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पटत नसेलतर ह्या वाहनातून "चालते व्हा!". उगाच आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नावे ठेऊ नका.

आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करा!

अगदी सुरुवातीला लोकलचे दरवाजे

अगदी सुरुवातीला लोकलचे दरवाजे स्टेशन सोडण्यापूर्वी बंद होत, असे कुटुंबातील वडील लोकांकडून ऐकले आहे. पण ते बंद होईनात म्हणून ती पद्धत लवकरच बंद केली गेली. जपानातही असाच प्रकार होता, पण तिथे रेल्वेने प्रवाशांना आतमध्ये ढकलणारे नोकर ठेवले आहेत, आणि दरवाजा बंद झाल्याशिवाय लोकलगाडी सुटत नाही, अशीही गोष्ट ऐकली होती.

बाकी चांगली चर्चा आहे. वाचतो आहे.

ऐकलेली गोष्ट खरीच असावी.

याशिवाय, बंद होताना दरवाजात माणसांचे हातपाय अडकत, म्हणूनही दरवाजांची आपोआप होणारी उघडबंदी रद्द झाली. काही वर्षांपूर्वी मुंबईत विजेवर चालणार्‍या ट्रॉली बसेस चालू केल्या होत्या. बसमध्ये कंडक्टर असे, तरीही प्रवासी आपोआप बंद होणार्‍या बसच्या दारांत अडकत. शेवटी तेही थांबवावे लागले. पुढच्या एखाद्या वर्षात या बसेसही बंद झाल्या. पुढे ट्रेलर बशी आल्या, त्याही रस्त्याची रुंदी अपुरी पडायला लागली म्हणून बंद झाल्या. आता काय, डबल डेकरही संपल्या. पूर्वी प्रमाणे लंडनहून होणारी यांची आयात थांबली आणि भारतीय डबलडेकर बसेसची किंमत परवडेनाशी झाली .
पुण्याच्या जवळ असलेल्या निगडीत अप्पूघर नावाच्या क्रीडाकेन्द्राला जाण्यासाठी आत्ताआत्तापर्यंत एक डबलडेकर होती. तिच्यात मुलांना बसवण्यासाठी त्यांचे आईबाप-आजोबा पुण्याहून निगडीला येत. आता नसावेत. नाशिक रोडला मात्र अजूनही डबलडेकर आहेत.-वाचक्‍नवी

इतिहास

बेस्ट बसच्या संकेत स्थळावर मुंबईच्या सार्वजनिक वाहनांचा इतिहास वाचायला मिळतो.

अधिक माहिती इथे

ढकले अर्थात पुशर्स..

मी आत्ताच खालची मजेदार चित्रफित देणार होतो तितक्यात वरील धनंजयचा त्याच संदर्भातील प्रतिसाद पाहीला म्हणून इथेच चिकटवतो. माणसे इथून तिथे (घुसण्यासाठी) सारखी असे म्हणले तरी कायदे आणि सेफ्टीचे महत्व आणि जिवनाचे मोल वाटणे हे खूप महत्वाचे वाटते.

दरवाजा उघडाच आहे....

सर्व प्रथम हा चर्चा प्रस्ताव सुरु केल्या बद्दल अभिनंदन. चांगला आणि कळीचा विषय आहे. तुम्ही उदाहरण दिलेल्या ३ वाहन प्रकारांबद्दल आपण एक एक करुन विचार करु.

लोकल ट्रेनः
खास करुन फक्त मुंबई = लोकल ट्रेन असा अर्थ घेतला जातो आणि खास करुन तोही मुंबईकरांकडूनच. घाई, गडबड, लोकल ट्रेनच्या वेळा आणि त्याचा वापर करणारे मुंबईचे प्रवासी. आत्ताची सोय या सर्वांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की जे आहे तेच योग्य आहे असे त्यांचे मत. काही प्रमाणात बरोबर असेल सुद्धा. पण सध्याच्या भारतात इतर उदाहरणे आहेत? हो आहेत. दिल्ली मेट्रोचे उदाहरण घ्या. ती सार्वजनीक वाहतुक व्यवस्था तुम्हाला अपेक्षीत आहे तशीच आहे. आता मग मुंबईची व्यवस्था बरोबर की दिल्लीची?

बसः
तुम्ही म्हणत आहात ती बस व्यवस्था परत आज वरची आहे. सवयी आज पर्यंतच्या आहेत. अशा बस आज सुद्धा भारतीय रस्त्यांवर धावतात आणि अनेक जीव जातात. पण सध्या पुणे आणि इतर काही शहरी भागांमध्ये सुरु झालेल्या बीआरटी व्यवस्थेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी सवयी बदलल्या आहेत. बीआरटीसाठी वापरल्या जाणार्‍या बसेस या लो फ्लोअर आणि दरवाजांची उघडझाप होणार्‍या आहेत. हि व्यवस्था कमी वेळात आणि सुरक्षीत प्रवास घडवणारी आहे. सध्याच्या योजनांमधल्या त्रुटी नव्या योजनांमध्ये दूर केल्या जात आहेत.

बीआरटी बस आणि चालक
बीआरटी बस आणि चालक

रिक्षा:
हा भारतातला सर्वात असुरक्षीत आणि वाहतुकीला ताण देणारा वाहन प्रकार आहे. आगोदर तीन आसनी आणि आता ६ आसनी. कशालाच जारे नाहीत. सर्वात प्रदुषणकारी आणि असुरक्षीत. पण राजकीय आश्रयाने यांचा बोलबाला आहे. सध्याचे आशादायक चित्र म्हणजे टाटाची टमटम. याची बांधणी मजबुत आहे तसेच बाजुला आणि मागे दारे आहेत. वाहनाचा वेग सुद्धा चांगला. बाकी इतर ३ चाकी वाहने रहदारीला अडथळा बनतात.

टाटा एस मॅजिक
टाटा एस मॅजिक

आता हे झाले वाहन प्रकार-सध्याचे आशादायक चित्र आणि आजचे भारतीय हि वाहनव्यवस्था आत्मसात करत आहे या बद्दल. तुम्ही ज्या महान भारतीय संस्कृती बद्दल बोलत आहात ती, अनेक शतके पुर्वीची आहे. सध्याची अशा बाबतीतली संस्कृती आंधळे पणाने कॉपी पेस्टची आहे. भारतीयांच्या गरजांनुसारची वाहने आणि वाहन व्यवस्था आत्ता कुठे बनत आहेत. जीप हा वन प्रकार लक्षात घेतला तर महिंद्राने भारतात असेंब्ली सुरु केली. त्या नंतर या प्रकारामध्ये जी काही वाहने आली ती अशीच विनादार वाहने. टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो अशी पुर्ण बंद असणारी जीप प्रकाराची वाहने काही दशकांपुर्वीच रस्त्यावर आली. तोवर टेंपो ट्रॅक्स सारख्या उघड्या वाहनांमधुन अशीच वाहतुक चालत होती. किंबहुना अजुनही चालते.

सुरक्षेसाठी सीट बेल्ट लावणे हे आवश्यक आहे, नव्हे तर लावले नसल्यास दंड होऊ शकतो. पण किती भारतीय सीटबेल्टचा वापर करतात? वाहन - सुरक्षा विषयामध्ये भारतील अत्यंत निष्काळजी आणि बेदरकार आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.






उदाहरणे

तुम्ही दिलेली सचित्र उदाहरणे आवडली.

माझ्या मते त्या त्या गावाचा प्रवासीवर्गच स्वतःच्या सुरेक्षेसाठी आपल्या गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी काय बरोबर आहे हे ठरवेल असे दिसते.

नक्कीच

नक्कीच. मुळात मुंबई इतकी सार्वजनीक वाहतुक व्यवस्था वापरणारे भारतात इतर ठिकाणी कमीच मिळतील. तसेच मुंबई सारखी व्यवस्था काही मोजक्याच शहरात आहे. प्रत्येकजण आपल्या मताचे समर्थन करतोच. समाजाची मानसिकता बदलणे थोडे किचकट काम आहे, पण अशक्य नाही. आणि ती बदलण्याची सुरुवात झाली आहे असे मला वाटते. वर दिलेली चित्रे तेच तर सांगत आहेत.






एक विचारणा

सध्याचे आशादायक चित्र म्हणजे टाटाची टमटम.

मारुती ओम्नी (मागील बाकडी समोरासमोर असणारी) व टाटा मॅजिक ह्यांच्या मधील भेद स्पष्ट करता येतील का? उदा. किंमत, इंधन लागत, प्रति किमी इंधन खपत, उपलब्ध मोकळी जागा इ.इ.

विचारण्याचे कारण की बहुतांशी जाणकार मारुति गाड्यांना टाटा गाड्यांपेक्षा अधिक प्राधान्य देतात. विशेषतः विक्रीपश्चात सेवेसाठी.

--------------------------X--X-------------------------------
कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

हवामान

भारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर!

असे असल्यास त्यामागे हवामान हा घटक असू शकतो. मुंबईतील ह्युमिडीटीचे (आर्द्रता?) प्रमाण बघता मुंबईकर नेहेमी खिडक्या उघड्या ठेवतात याबद्दल आश्चर्य वाटायला नको. त्या मानाने पुण्यात हवामान बदलत असते. हिवाळ्यात थंडीही पडते. (पुणेकर गारठले : सकाळ) कदाचित हेच कारण पावसात भिजण्यामागेही असावे. पुण्यात कधीकधी पावसात भिजल्यावर थंडीही वाजू शकते. व्यक्तिशः मी पुणेकर असूनही खिडकी उघडी ठेवायची की बंद हे त्या त्या वेळच्या तपमान, परिस्थिती आणि मूडवर अवलंबून असते.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

सहमत

मी मुंबईकर नसुन मी अनेकदा खिडकी उघडी ठेवतो, स्वतःच्या गाडीची सुद्धा.






मेक्स् सेन्स्!

अर्थात् मुड्, प्रदुषण इ. गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. पण (मी तरी) माझा प्रतिसाद् 'इतर् सर्व नॉर्मल असताना' ग्राह्य आहे. असो, मुळात एखाद्याच्या अनुभवावरुन तो निष्कर्ष किती महत्त्वाचा होतो हा प्रश्नच आहे. नो ऑफेन्स टुन् एनी-वन.

मोटारीचे दरवाजे-खिडक्या

मोटारीचे दरवाजे किंवा खिडक्या न उघडता आल्याने भारतात गेल्या काही महिन्यात तीनचार मृत्यू झाले.एक, एका तान्ह्या मुलीचा. तिला कारमध्ये ठेऊन तिचे आईवडील मॉलमध्ये गेले होते. मरणाचे कारण गुदमरल्यामुळे. दुसरा मला आठवणारा अपघात असा: हरियाणातील एका गावात दोन शाळकरी मुले वातानुकूलन चालू ठेऊन गाडीत झोपली होती. गाडीत कार्बन मोनॉक्साइड(?) जमल्यामुळे दोन्ही मुले मृत पावली. आणखीही अपघात असतील, त्यांचा शोध घ्यायला हवा. गाडीमधले वातानुकूलन बंद पडण्याचे प्रसंग भारतात अनेकदा घडतात. एकदा मुंबईहून बंगलोरला येताना उद्यान एक्सप्रेसच्या डब्यातील वातानुकूलन बंद असल्याचे सोलापूर आल्यानंतर लक्षात आले. --वाचक्नवी

२००५ मधील पाऊस

असेच प्रसंग २००५ मधील पावसात घडल्याचे आठवते. मीनल नावाच्या एका गुणी मुलीचा मृत्यू कारची लॉक सिस्टीम बंद पडल्याने आणि नंतर खिडकीच्या काचा खाली न करता आल्यामुळे झाला होता असे आठवते.

२६ जुलै २००५

२६ जुलै २००५ चा पाऊस हा मुंबईकरांना बरेच काहि शिकवून गेला. गाड्यांचे आधुनिक तंत्रज्ञान पावसात कसे धोकादायक बनले ह्याचे वर्णन वर्तमान पत्रात वाचले होते आणि ते धक्कादायक होते. पाण्यामुळे गाड्यांची दारे पटकन उघडली नाही. वातानुकूलीत यंत्रनेत बिघाड झाला वैगरे.

थोडे अधिक...

मोटारीचे दरवाजे किंवा खिडक्या न उघडता आल्याने भारतात गेल्या काही महिन्यात तीनचार मृत्यू झाले.एक, एका तान्ह्या मुलीचा. तिला कारमध्ये ठेऊन तिचे आईवडील मॉलमध्ये गेले होते. मरणाचे कारण गुदमरल्यामुळे.

अमेरिकेतही तान्ह्या मुलास गाडीत ठेवून आणि गाडीची खिडक्यादारे बंद करून पालक शॉपिंगला, कामावर किंवा निव्वळ विसरून गेल्याने बंदिस्त गाडीत अडकून राहिलेल्या सूर्याच्या उष्णतेमुळे (trapped heat) मूल भाजून मेल्याची तुरळक उदाहरणे घडलेली आहेत.

मात्र अशा परिस्थितीत अमेरिकेत सहसा अशा पालकास अशा मृत्यूसाठी सर्वस्वी जबाबदार धरले जाऊन त्याच्याविरुद्ध किंवा तिच्याविरुद्ध किमानपक्षी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवला जाऊन त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येते. तसेच, (कायद्याच्या तपशिलांबद्दल नक्की खात्री नाही, परंतु) स्वतःची काळजी घेता येऊ न शकण्याइतक्या लहान मुलास गाडीत किंवा घरात एकटे बंदिस्त ठेवणे हा दखलपात्र गुन्हा होऊ शकतो, असे वाटते.

भारतात सध्या या बाबतीत काय परिस्थिती आहे याबद्दल कल्पना नाही.

हरियाणातील एका गावात दोन शाळकरी मुले वातानुकूलन चालू ठेऊन गाडीत झोपली होती. गाडीत कार्बन मोनॉक्साइड(?) जमल्यामुळे दोन्ही मुले मृत पावली.

बंदिस्त जागी (जसे, गराजमध्ये) पुष्कळ वेळ इंजिन चालू ठेवल्यास (आणि वातानुकूलनासाठी इंजिन चालू ठेवावे लागतेच!) कार्बन मोनॉक्साइड साचण्याचा धोका जवळपास हमखास असतो. आणि कार्बन मोनॉक्साइड हा रंगहीन आणि गंधहीन असल्यामुळे साचल्यास कळत नाही, आणि विषारी असल्याकारणाने मृत्यू होऊ शकतो हे ओघाने आले.

या धोक्याबद्दल पुरेशा सार्वत्रिक माहितीचा अथवा जाणिवेचा अभाव हे अशा अपघातांचे मूळ मानता येईल. लोकशिक्षणाने हा धोका टाळता किंवा बर्‍याच अंशी कमी करता येण्यासारखा आहे. (अमेरिकेत कार्बन मोनॉक्साइड साचण्याच्या धोक्याबाबतीतील सामाजिक जाणीव त्यामानाने खूपच अधिक आहे, असे वाटते. कदाचित घरेही बंदिस्त असणे आणि सार्वजनिक माध्यमांतून आणि बार्बेक्यू करण्याच्या कोळशाच्या शेगडीसारख्या उपकरणांबरोबर येणार्‍या सूचनांतून होणारा माहितीचा भडिमार हे त्यामागील कारण असू शकेल. चूभूद्याघ्या. घरात कार्बन मोनॉक्साइड साचल्यास धोक्याची सूचना देणारे उपकरण घरात बसवणे हे घरात आग लागल्याचा इशारा देणारे उपकरण बसवण्याप्रमाणे अनिवार्य जरी नसले, तरी असे उपकरण बाजारात परवडण्यासारख्या किमतीत उपलब्ध आहे.)

(उलटपक्षी, गाडी मोकळ्या जागी असल्यास कार्बन मोनॉक्साइड साचण्याचे काहीच कारण दिसत नाही. पुन्हा चूभूद्याघ्या.)

सहमत

या धोक्याबद्दल पुरेशा सार्वत्रिक माहितीचा अथवा जाणिवेचा अभाव हे अशा अपघातांचे मूळ मानता येईल. लोकशिक्षणाने हा धोका टाळता किंवा बर्‍याच अंशी कमी करता येण्यासारखा आहे.

लोकशिक्षण महत्वाचे आहे. आपल्याकडच्या गाडी चालकांना 'कार्बन मोनॉक्साइड ' ची माहिती असण्याचे प्रमाण खूप कमी आहे. लोकशिक्षणाने संभाव्य धोके कमी करता येतील.

हलगर्जीपणा

मोटारीचे दरवाजे किंवा खिडक्या न उघडता आल्याने भारतात गेल्या काही महिन्यात तीनचार मृत्यू झाले.एक, एका तान्ह्या मुलीचा. तिला कारमध्ये ठेऊन तिचे आईवडील मॉलमध्ये गेले होते. मरणाचे कारण गुदमरल्यामुळे.

............ मोटारीचे दरवाजे, खिडक्या बंद करून लाहान मुलांना एकटे गाडीत सोडून जाणे हा आईवडिलांचा हलगर्जीपणा आहे.

कबूल तरीही..

आईबापांचा हलगर्जीपणा खरेच, पण कुणाच्या लक्षात आले असते तर खिडकीची काच फोडून मुलीला वाचवता आले असते. स्वयंचलित उघड-बंद होणार्‍या खिडक्या-दरवाज्यांमुळे आतल्या प्रवाशांवर संकट ओढवू शकते, हे लक्षात घेतले तरी पुरसे आहे. --वाचक्नवी

आणखी थोडे

वर उद्धृत केलेल्या उदाहरणांत स्वयंचलितपणे उघडबंद होणार्‍या खिडक्यादरवाज्यांचा संबंध कळला नाही.

स्वयंचलित खिडक्यांच्या काचाही (स्वयंचलित नसलेल्या) सामान्य खिडक्यांच्या काचांप्रमाणे (कोणाच्या लक्षात आल्यास) फोडता याव्यात. (फरक खिडकीच्या उघडबंद करण्याच्या यंत्रणेत आहे; मुळात खिडकीच्या काचेत नाही.) मात्र मुळात कोणाच्या लक्षात येणे महत्त्वाचे.

पुराच्या उदाहरणात गाडीची स्वयंचलित दारेखिडक्यांची यंत्रणा बंद पडणे शक्य आहे हे समजण्यासारखे आहे, आणि त्या परिस्थितीत निदान खिडक्यांच्या बाबतीत तरी खिडकी उघडण्याची (काहीतरी करून खिडकी फोडण्याव्यतिरिक्त) पर्यायी व्यवस्था नाही, हेही मान्य. आतून खिडकी फोडणे हे (अवजारांच्या अभावी) नेहमीच शक्य नाही हेही समजण्यासारखे आहे, आणि त्यामुळे तो धोकाही समजण्यासारखा आहे. परंतु त्याही परिस्थितीत, गाडीच्या दरवाज्यांच्या बाबतीत (स्वयंचलित यंत्रणा बंद पडल्यास) दरवाजाचा खटका हाताने उघडून (अर्थात मॅन्युअल ओव्हरराइड वापरून) दरवाजा उघडणे हे शक्य असतेच. हा हाताने उघडण्यासारखा खटका आपल्या वाहनात नेमका कोठे आहे हे माहीत असणे मात्र अपेक्षित आहे; परंतु तेही अग्निक्षेपकशास्त्र नाही असे सुचवावेसे वाटते. (गरजूंनी आपल्या गाडीचा स्वयंचलित दरवाजा आतून हाताने उघडून खात्री करून घ्यावी. अपवाद एकच: गाडीच्या एखाद्या मागील दरवाजावर चाइल्डलॉक कार्यरत असल्यास तो दरवाजा काहीही करून आतून उघडता येत नाही; बाहेरूनच उघडावा लागतो. याचा दरवाजा उघडण्याची यंत्रणा स्वयंचलित असण्यानसण्याशी काहीही संबंध नाही. चाइल्डलॉक यंत्रणा ही स्वयंचलित नसलेल्या दरवाजांवरही उपलब्ध असू शकते आणि कार्यरत करता येते. मात्र चाइल्डलॉक कार्यरत असल्यास आणि त्यात स्वयंचलित खिडकीही बंद पडल्यास धोका उद्भवू शकतो हे खरेच, परंतु चाइल्डलॉक हे सहसा मागील दरवाजांवरच उपलब्ध असते, आणि पुढचे दरवाजे तरीही हाताने उघडता येतातच, हा आणखी एक भाग.)

परंतु स्वयंचलित खिडक्यांचे इतर काही धोके मात्र आहेत. त्यांवर उपायही उपलब्ध आहेत; अर्थात ते उपाय जागरूकपणे अमलात आणणे महत्त्वाचे.

स्वयंचलित खिडक्यांची उघडझाप करण्याचा खटका हा खिडकीशेजारीच असल्याने, प्रवासात अशा उघड्या खिडकीतून बाहेर डोके काढून गंमत बघणार्‍या लहान मुलाचा अथवा कुत्र्याचा चुकून त्या खटक्यास धक्का लागून त्या मुलाची किंवा कुत्र्याची मान खिडकीबाहेर असताना खिडकी बंद झाल्याने त्या मुलाचा किंवा कुत्र्याचा शब्दशः शिरच्छेद होण्याचा धोका असतो; तसे प्रकार घडल्याचा विदाही उपलब्ध आहे असे कळते. (शिरच्छेद करण्याइतकी ताकद स्वयंचलित खिडकीयंत्रणेतील मोटरीत असते. एखादी काकडी चिरण्याच्या सहजतेने मान चिरली जाऊ शकते, असे ऐकलेले आहे.) याला उपाय म्हणून, ड्रायव्हरजवळ उपलब्ध असलेली एक कळ वापरून ही यंत्रणा ड्रायव्हरच्या खिडकीव्यतिरिक्त इतर खिडक्यांसाठी तात्पुरती निकामी करता येते. म्हणजे, मुलाच्या बाहेर पाहण्याच्या सोयीसाठी स्वयंचलित खिडकी उघडल्यानंतर ही यंत्रणा तात्पुरती निकामी केली, की मग खिडकी बंद करण्याचा खटका वापरून खिडकी उघडता किंवा बंद करता येत नाही. त्यानंतर मग चुकून धक्का लागल्याने खिडकी बंद होण्याचा धोका नाही. मात्र अशी सोय उपलब्ध आहे या बाबीची आणि ती सोय वापरायची कशी याची माहिती असणे आवश्यक आहे.

विकसित होणार्‍या तंत्रज्ञानाबरोबर सोयी जशा वाढतात तसेच त्याचा योग्य वापर करण्याच्या माहितीच्या अभावी धोकेही वाढू शकतात. तसेच, प्रत्येक तंत्रज्ञानाला काही अंगभूत मर्यादाही असू शकतात. अनेकदा त्या मर्यादा लक्षात घेऊन त्यावर उपायही योजता येतात, तर कधी असे उपाय योजणे शक्य नसते. त्यामुळे नवे तंत्रज्ञान अंगीकारण्याबरोबरच त्याच्या योग्य वापराबद्दल माहिती बाळगणे, तसेच त्याच्या मर्यादा आणि शक्य तेथे त्या मर्यादांवरील उपाय यांबद्दलचे ज्ञानही असणे यांना पर्याय नाही. (नवे तंत्रज्ञान नाकारणे हा त्यावर उपाय नाही.)

अनेकदा अशा (प्राथमिक) ज्ञानाच्या अभावी टाळता येण्यासारखे अपघात घडून त्याबद्दल (समजत नसलेल्या) तंत्रज्ञानास दोष देण्याकडे जनसामान्याचा कल होतो, असे वाटते. तसेच, काही परिस्थितींत अपघात टाळणे हे जरी शक्य नसले, तरी अशा अपघातात किंवा त्याच्या परिणामांत एखाद्या विवक्षित तंत्रज्ञानाचा किंवा यंत्रणेचा काहीही हातभार नसला, तरी अनेकदा केवळ अज्ञानामुळे - आणि कशावर तरी खापर फोडायचे म्हणून - अशा एखाद्या यंत्रणेस दोष दिला जाऊ शकतो. यावरून एक किस्सा आठवतो.

श्री. जिमी कार्टर हे अमेरिकेचे अध्यक्ष असतानाची गोष्ट आहे. अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचा भारतदौरा चालू होता. श्री. जिमी कार्टर यांचा किंवा त्यांच्या भारतदौर्‍याचा या घटनेशी काहीही संबंध नाही. मात्र ज्या दिवशी ते भारतात येणार होते, त्याच दिवशी एअर इंडियाच्या दुबईला जाणार्‍या जंबोजेटला झालेल्या अपघातासंबंधीची ही कथा आहे. (श्री. जिमी कार्टर यांच्या दौर्‍याचा उल्लेख केवळ कालनिश्चितीपुरता आहे. प्रस्तुत घटनेत अपघातग्रस्त झालेले 'सम्राट अशोक' हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यातले पहिले जंबोजेट आणि त्या काळी एअर इंडियाच्या ताफ्यातील बहुधा एकमेव जंबोजेट होते, ही आणखी एक अवांतर माहिती. अपघाताबद्दल अधिक माहिती येथे.) उड्डाणानंतर काही मिनिटांच्या आतच हे विमान मुंबईनजीक समुद्रात कोसळले, आणि विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले.

आमच्या पुण्याच्या एका अग्रगण्य मराठी दैनिकात या अपघातासंबंधी आलेल्या वृत्तात, उड्डाणानंतर काही मिनिटांतच हा अपघात झाल्याने प्रवाशांना पोटापाशी आवळलेले पट्टे सोडवण्यासाठीही वेळ न मिळाल्यामुळे बसल्याजागी अडकून झालेल्या त्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल व्यक्त केली गेलेली हळहळ आजही आठवते.

एक तातडीचा उपाय

त्या परिस्थितीत निदान खिडक्यांच्या बाबतीत तरी खिडकी उघडण्याची (काहीतरी करून खिडकी फोडण्याव्यतिरिक्त) पर्यायी व्यवस्था नाही, हेही मान्य

काहि गाड्यांमधे यास उपाय करता येऊ शकेल. गाडीच्या बोनटवर अतिशय जोरात प्रहार केल्यास वा एखाद्या स्कुटरने ठोकल्यास गाडीला ऍक्सिडंट झाला असे गाडी समजते व चालका समोरच्या तसेच त्याच्या शेजारच्या अपघाती पिशव्या फुगतात तसेच दरवाज्याची सारी लॉक उघडली जातात

कित्येकदा चोर या तंत्राचा अवलंब करून चोर्‍या करतात तीच पद्धत आपत्कालीन प्रसंगी जीव वाचवु शकते.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

 
^ वर