विचारमंथन

नमस्कार,

सर्वप्रथम मी सौ. प्राची काशीकर-जोशी, 'उपक्रम' संकेतस्थळाचे मनापासून आभार मानते. वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी अत्यंत अप्रतिम व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिले आहे.

साधारण १ वर्षापूर्वी मी विचारमंथन नावाचे संकेतस्थळ सुरू केले. माझ्या वाचनात / श्रवणात आलेल्या काही गोष्टी आणि अगदी मुंगीएवढ्या चिंतनातून निर्माण झालेले विचार मी केवळ सद्गुरू र्‍कुपेने लिहू शकले आणि ह्यापुढेही लिहू शकेन अशी आशा !

सर्व मराठी रसिकांना विनंती, आपण ह्या संकेतस्थळाला भेट दिल्यास आपल्या प्रतिक्रिया / सूचना जरूर कळवाव्यात.

कळावे.

आपली,
सौ. प्राची.

लेखनविषय: दुवे:

Comments

शुभेच्छा

संस्थळ नेटके आहे. विषय गहन आहे. मराठीतून लेखनासाठी शुभेच्छा

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

असेच म्हणतो

संकेतस्थळ आणि मराठी लेखनाबाबत शुभेच्छा

असेच म्हणतो.

संस्थळ नेटके आहे. उत्तरोत्तर अधिक चांगले होवो.

सुंदर !

आपले संकेतस्थळ खूप आवडले. डॉ. अभ्यंकर यांच्या प्रवचनातील 'गीताजन्माचं रहस्य' याबद्दल आपल्या ब्लॉगवर काही वाचायला मिळाले. थोडाफार धार्मिक असल्यामुळे मला ते खूप आवडले.

डॉ. अभ्यंकरावरुन आठवण झाली. आमच्याकडेही एक श्री. अभ्यंकर आहेत, आमचे ते मित्रही आहेत. शास्त्रीय संगीतावर त्यांचा अभ्यास आहे आणि ते व्यक्तीचित्रही खूप सुंदर लिहितात. त्यांचे मिसळपाव नावाचे एक लोकप्रिय मराठी संकेतस्थळ आहे. ते तुम्हाला माहित आहे का ?

-दिलीप बिरुटे

धन्यवाद्

नमस्कार,

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मिसळपाव संकेतस्थळ खूपच आवडले. आपल्या ओळखीच्या श्री. अभ्यंकरांना मिसळपावद्वारे भेटून आनंद झाला.

आपली,
सौ. प्राची.

विचारमंथन

आपले संकेतस्थळ बघितले. लेआऊट उत्तम आहे.
एक ज्ञानेश्वरी सोडली तर बाकी इतर आध्यात्म, धार्मिकता किंवा या विचाराच्या तत्सम पुस्तकात व विचारमंथनात मला फारसा रस नसल्यामुळे मी आपल्या संकेतस्थळामधील कन्टेन्ट्स बद्दल बोलणे फारसे इष्ट ठरणार नाही. आपल्याला शुभेच्छा.
चन्द्रशेखर

कुमार गंधर्वांच्या आवाजात

कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीराच्या अभंगाचा आपण दिलेला अर्थ वाचल्यावर नीट कळला.
http://kabaadkhaana.blogspot.com/2007/12/blog-post_2075.html

या ब्लॉगचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
"संकेतस्थळ" म्हणून काही वेगळ्या अपेक्षा होत्या! ब्लॉग आणि वेबसाईट यांची मराठीनावे सारखीच आहेत का ते माहीत नाही.

ब्लॉग

नमस्कार,

मलाही अजून ब्लॉग आणि वेबसाईट ह्यांच्या मराठी नावांबद्दल समजलेलं नाही. परंतु लक्शात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. !

आपली,
सौ. प्राची.

सदगुरू

निर्माण झालेले विचार मी केवळ सद्गुरू र्‍कुपेने लिहू शकले
आपल्या गुरूंच्या बद्दल पूर्ण आदर मनात बाळगून मी हे जाणून घेऊ इच्छितो की या वाक्याचा पूर्ण अर्थ काय?
१. आपल्या मनात आलेले विचार आपण कागदावर उतरवले असलेत तर आपल्या गुरुजींचा यात संबंध कुठे येतो?
२. हे विचार आपल्या गुरुजींचे असले आणि आपण ते केवळ कागदावर उतरवले असलेत तर ते आपले विचार होऊ शकत नाहीत.
३. विचार आपले असले व ते गुरुजींनी कागदावर उतरवले असल्रे तर या वाक्याचा अर्थ बरोबर लागतो. पण अशी शक्यता फार कमी वाटते.
४. या वाक्यात आपल्या श्रद्धेचा वगैरे काही कोन (Angle) असला तर या प्रतिसादाला उत्तर देऊ नये. मला आपणास किंवा आपल्या श्रद्धेला दुखावण्याची मनापासून इच्छा नाही. मनात आलेली शक्यता विचारली एवढेच.
चन्द्रशेखर

विचारमंथन

>>१. आपल्या मनात आलेले विचार आपण कागदावर उतरवले असलेत तर आपल्या गुरुजींचा यात संबंध कुठे येतो?

गुरुजींचा संबंध येतो की नै, त्याबद्दल प्राची जोशी विचारमंथन करतील. पण मला असं वाटतं की, आपल्या प्रत्येक कृतीमागे एक अदृष्य शक्ती कार्यरत असते. असे समजणारे जे कोणी असतील त्यांना आपल्या लेखनाची प्रेरणा कोणी अन्य आहे, असे वाटू शकते.

>>२. हे विचार आपल्या गुरुजींचे असले आणि आपण ते केवळ कागदावर उतरवले असलेत तर ते आपले विचार होऊ शकत नाहीत.

बहिणाबाई चौधरी ' माझी माय सरसोती' नावाच्या कवीतेत म्हणतात-

''माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीतं पेरली ! ''

बहिणाबाई म्हणते की, सरसोती शिकवते आणि बोलतेही.त्यामुळे या कवितेचे विचार सरसोतीचे नै होऊ शकत नै का ? का होऊ शकते ?

-दिलीप(कुमार) बिरुटे

विचारमंथन

माझ्या मनात आलेले विचार माझेच असतात असे माझे मत आहे. अदृष्य शक्तीने माझ्या मनामार्फत आपले विचार प्रसारित करायला मी रेडियो किँवा टी व्ही सेट थोडाच आहे.

बहिणाबाईँच्या कल्पना कितीही रम्य असल्या तरी कवी कल्पना आहेत त्यांना प्रत्यक्षाचा दाखला म्हणून वापर करणे मला पटत नाही.

मी माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे या सर्व चर्चेत श्रद्धा हा प्रकार घुसणार असेल तर चर्चा येथेच बंद करणे उचित ठरेल.

चन्द्रशेखर

आणखी एक शक्यता

अदृष्य शक्तीने माझ्या मनामार्फत आपले विचार प्रसारित करायला मी रेडियो किँवा टी व्ही सेट थोडाच आहे.

प्लँचेट विसरलात!

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते...

चंद्रशेखर साहेब, आमच्या सारख्या देवभोळ्या माणसाचं लै अवघड काम असतं. आमचे तुकोबा म्हणतात.

''चाले हे शरीर कोणाचिये सत्ते | कोण बोलविते हरिविण|१|
देखवी ऐकवी एक नारायण |तयाचे भजन चुको नको|२|
मानसाची देव चालवी अहंता | मीचि एक कर्ता म्हणोनिया|३|
वृक्षांचेही पान हाले ज्याचे सत्ता | राहिली अहंता मग कोठे |४|
तुका म्हणे भरला विठोबा सबाही |तया उणें काही चराचरी |५|
(खापरे संकेतस्थळावरुन साभार)

ज्याच्या सत्तेशिवाय शरीर चालत नाही, झाडाचे पान हलत नाही. सर्व चराचर हलवणार्‍याला अनेक गोष्टी करुन घेता येतात, तर विचार प्रसारित करण्याच्या बाबतीत लै शुल्लक गोष्ट असेल त्याच्यासाठी. अहो, माणसाला विचार सुचतात कसे याचे काही वैज्ञानिक कारण असेल. पण आम्ही हरिशिवाय बोलूच शकत नाही असे आम्ही म्हणतो. अहो, चालत्या बोलत्या माणसाचे रेडियो किंवा टी व्ही सेटचा आवाज शुन्य मिनिटात गुल होतो, आणि माणसं म्हणतात आत्ताच तर रेडियो बोलत होता.

>>बहिणाबाईँच्या कल्पना कितीही रम्य असल्या तरी कवी कल्पना आहेत त्यांना प्रत्यक्षाचा दाखला म्हणून वापर करणे मला पटत नाही.

कवी कल्पना आपल्याला वाटेल. पण अशी देणगी ही दैवीच असते असे आम्हाला वाटते.

>>या सर्व चर्चेत श्रद्धा हा प्रकार घुसणार असेल तर चर्चा येथेच बंद करणे उचित ठरेल.

प्रश्न श्रद्धेचा असो की अश्रद्धेचा, देवाचा की विज्ञानाचा, स्त्रीचा की पुरुषाचा, बोलीचा की प्रमाणभाषेचा, र्‍हस्वाचा की दीर्घाचा, गालिबचा की मोमिनचा, अहो, चर्चा बंद कशाला करायच्या..असे केले तर, माहितीपूर्ण विचारांची देवाण-घेवाण कशी व्हायची ?

-दिलीप बिरुटे
(देवभोळा)

जगच्चालक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे म्हणतातः
..."ज्याच्या सत्तेशिवाय शरीर चालत नाही, झाडाचे पान हलत नाही. सर्व चराचर हलवणार्‍याला अनेक गोष्टी करुन घेता येतात, तर विचार प्रसारित करण्याच्या बाबतीत लै शुल्लक गोष्ट असेल त्याच्यासाठी..."
..
हे खरे मानायचे तर निरपराध व्यक्तीवर आतंकवाद्याच्या एके४७ मधून उडणार्‍या गोळ्या त्याच्या सत्तेनेच उडतात, निष्पाप बालिकेवर एखादा नराधम बलात्कार करतो तो त्याच्याच सत्तेने हे खरे मानणे क्रमप्राप्त आहे. प्रा.डॉ.बिरुटे यांना हे मान्य आहे काय?

हाच तर प्रॉब्लेम आहे !

>>निरपराध व्यक्तीवर आतंकवाद्याच्या एके४७ मधून उडणार्‍या गोळ्या त्याच्या सत्तेनेच उडतात, निष्पाप बालिकेवर एखादा नराधम बलात्कार करतो तो त्याच्याच सत्तेने हे खरे मानणे क्रमप्राप्त आहे. प्रा.डॉ.बिरुटे यांना हे मान्य आहे काय?

हम्म, आपल्या प्रश्नांची उत्तरे आहेत खरी अवघड. असाच प्रश्न आम्ही मनातल्या मनात देवालाही विचारतो. पण समाधानकारक उत्तर कुठेच मिळत नाही. देवाने अशा प्रसंगी काही चमत्कार करुन दाखविला पाहिजे असे नास्तिक लोकांबरोबर आम्हा देवभोळ्या लोकांनाही वाटते.
पण ईश्वराने काय केले असावे, त्याची सत्ता सर्वत्र चालत असली तरी. लेकरांना मोकळ्या मैदानात सोडले आहे.(जन्माला घातले) काय वाटेल ती मौजमजा करा, एके४७ मधून गोळ्या उडवा, काही करा. पण माणसाला जन्माचा उद्देश समजतो का ? कोण या गतानुगती जीवनातून सुटू इच्छितो. ईश्वराच्या लिला समजणे हे माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. आपण शुद्र बुद्धीने ज्याने जन्माला घातले त्यालाच विचारतो 'देव कोण आहे' 'देव हे अनाचार का थांबवत नाही'. भगवंताला समजून घेणे ही शुद्र बुद्धीचे काम नाही. अहो, या सृष्टीत अनेक चमत्कार आपण पाहतो. अहो, वैज्ञानिक म्हणायचे जगातील खनिज पदार्थांचा वापर पाहता पेट्रोल, लोखंड, कोळसा, वगैरे वस्तू लवकरच संपणार व मानव पुन्हा अंधार युगात जाणार. परमेश्वराच्या लीलेने अणुशक्ती शोधून काढली. खनिज शक्ती संपेल तेव्हा अणुशक्तीचा उपयोग करता येईल. किंवा प्रकाशाच्या किंवा अन्य कशाच्या तरी साह्याने मोटारी, रेल्वे, चालतील. अणुशक्तीवर संकट येईल तेव्हा भगवंत काहीतरी अन्य मार्ग सुचवेल. अशा प्रचंड शक्ती ईश्वराजवळ आहेत. पण ते आपल्याला समजून घेता आले पाहिजे. काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला नसतील देता येत. पण इतक्या विशाल आणि सुंदर सृष्टीची रचना करणार्‍याला विशाल बुद्धीही असली पाहिजे. तेव्हा त्याचे योग्य नियोजन त्याला नक्कीच करता येत असेल. (हुश्श)

-दिलीप बिरुटे
(देवभोळा)

थोडासा घोळ

आपण शुद्र बुद्धीने ज्याने जन्माला घातले त्यालाच विचारतो 'देव कोण आहे' 'देव हे अनाचार का थांबवत नाही'. भगवंताला समजून घेणे ही शुद्र बुद्धीचे काम नाही.

आपल्या हे म्हणायचे आहे असे वाटते.

ज्या (देवा)ने (आपल्याला) जन्माला घातले त्यालाच आपण "क्षुद्र" बुद्धीने विचारतो "देव कोण आहे?", "देव अनाचार का थांबवत नाही?". भगवंताला समजून घेणे क्षुद्र बुद्धीचे काम नाही.

क्षुद्र - यःकश्चित्, तुच्छ
शूद्र - चार वर्णांपैकी सर्वात कनिष्ठ वर्ण

विनायक

खरी समस्या(प्रॉब्लेम्)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
********************************
प्रा.डॉ. बिरुटे लिहितातः..."हाच तर प्रॉब्लेम् आहे.."..खरी समस्या अशी आहे की बालपणापासून; " देवबाप्पा पाहात असतो. त्याला सगळे दिसते. नमो कर. नाहीतर तो शिक्षा देईल. तोच बुद्धी देतो...." असे आपले पालक सतत सांगत असतात. तुम्ही म्हणाल आईवडील खोट्या गोष्टींचे संस्कार कशाला करतील? कारण असे की त्यांना त्यांच्या आईवडलांनी असेच सांगितलेले असते. माणूस अज्ञानात असल्यापासून तो आजवर पिढ्यानपिढ्या हे असेच चालत आले आहे.बालपणी डोक्यावर चढलेले हे देवाचे भूत उतरवणे अवघड असते.एखादी गोष्ट खोटी आहे हे बुद्धीला पटत असूनही संस्कारांनी तयार झालेल्या पूर्वग्रहामुळे ती खरी मानण्याचा हट्ट म्हणजे श्रद्धा होय. संस्कारांचे गाठोडे डो़ईवरून उतरवून ठेवून शुद्ध तर्क बुद्धीने विचार केला तर श्रद्धा पळून जाईल.

मान्य करावेच लागेल

हेच प्रश्न रावण, दुर्योधन वगैरे खलनायकांच्या दुष्कृत्यांबाबत विचारले गेले होते आणि त्यांची (श्रद्धाळू लोकांना) समर्पक वाटतील अशी उत्तरे दिली गेलेली आहेत. याला 'देवाची लीला' , "ईश्वरेच्छा बलीयसी",' सत्वपरीक्षा पाहणे' वगैरे म्हणत असत.

त्याची सत्ता

नमस्कार,

चांगला मुद्दा आहे. मला खूप वेळा असा प्रश्न पडायचा. ह्याचं उत्तर माझ्या दृष्टीकोनातून असे देता येईल :

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या चांगल्या आणि वाईट घटना तिच्याच पूर्वकर्मातून निर्माण झालेल्या असतात. त्यात जगच्चालकाला दोष देण्यात काहीही अर्थ नाहीये.

बाकी राहिला प्रश्न सद्गुरुंचा, ही माझी वैयक्तिक श्रद्धा आहे !.

आपली,
सौ. प्राची.

त्याची सत्ता

"हे खरे मानायचे तर निरपराध व्यक्तीवर आतंकवाद्याच्या एके४७ मधून उडणार्‍या गोळ्या त्याच्या सत्तेनेच उडतात, निष्पाप बालिकेवर एखादा नराधम बलात्कार करतो तो त्याच्याच सत्तेने हे खरे मानणे क्रमप्राप्त आहे. प्रा.डॉ.बिरुटे यांना हे मान्य आहे काय?" - माझा वरील प्रतिसाद ह्या मुद्द्यावर आहे.

आयुष्यातील घटना

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या चांगल्या आणि वाईट घटना तिच्याच पूर्वकर्मातून निर्माण झालेल्या असतात. त्यात जगच्चालकाला दोष देण्यात काहीही अर्थ नाहीये.
हे जे पूर्वकर्म आहे ते या जन्मातले का पूर्वजन्मातले?

1. या जन्मातले असले तर एखाद्या नवजात अर्भकाला कावीळ होते त्याने कोणते पूर्वकर्म केलेले असते?

2. मागच्या जन्मातले असले तर त्याच्या या जन्मातल्या शरीराला ते लक्षात कसे रहाते? त्याच्या DNA साखळ्यात बदल होऊन का?परंतु असा बदल अजूनतरी चाचण्यात कधीही आढळून आलेला नाही.

3. पूर्वकर्म म्हणजे नेमके काय? आपण काही कर्मे सारखी करतच असतो. उदा. श्वसन, अन्नपचन

यातली कोणती कर्मे पूर्वकर्मे या सदरात घ्यायची?

सद गुरूंवर आपली श्रद्धा आहे हे उत्तम आहे. पण श्रद्धेमुळे आपले सद गुरू आपले विचार कागदावर कसे उतरवतात त्याचे नीटसे आकलन होत नाही. ते विशद करून सांगितल्यास आनंद वाटेल.

या प्रतिसादामुळे आपल्या श्रद्धेला धक्का लावण्याचा किंवा अपमानित करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. शास्त्रीय सत्यतेवर या सगळ्या गोष्टी पडताळून बघण्याचा मी फक्त प्रयत्न करत आहे इतकेच. आपणास कठिण वाटत आसेल तर उत्तर देऊ नये.

चन्द्रशेखर

पूर्वकर्म

हे जे पूर्वकर्म आहे ते या जन्मातले का पूर्वजन्मातले?

1. या जन्मातले असले तर एखाद्या नवजात अर्भकाला कावीळ होते त्याने कोणते पूर्वकर्म केलेले असते?

पूर्वकर्म कोणत्याही जन्मातले असू शकते.

2. मागच्या जन्मातले असले तर त्याच्या या जन्मातल्या शरीराला ते लक्षात कसे रहाते? त्याच्या DNA साखळ्यात बदल होऊन का?परंतु असा बदल अजूनतरी चाचण्यात कधीही आढळून आलेला नाही.

शरीराला काहीही लक्षात राहू शकत नाही. ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला शरीरापलीकडे जायला लागेल. सामान्यांच्या भाषेत तो हिशेब देव ठेवतो. पण हा हिशेब खरोखर कसा ठेवला जातो हे (माझ्या मते) केवळ आत्मप्रचिती आल्यानंतर समजू शकेल.

3. पूर्वकर्म म्हणजे नेमके काय? आपण काही कर्मे सारखी करतच असतो. उदा. श्वसन, अन्नपचन

श्वसन आणि अन्नपचन ही कर्मे आपण ठरवून करता का ? 'चला हं, आता मी श्वास घेतो' असं म्हणून श्वास घेता का ? श्वास घेणं माणसाच्या हातात असतं तर प्रत्येकजण इच्छामरणी झाला असता.

इथे कर्मविपाक समजून घ्यायची आवश्यकता आहे. त्यात ३ संकल्पना येतात - क्रियमाण कर्म, प्रारब्ध, संचित.
क्रियमाण कर्म - आपण ठरवून जी कर्म करता ती. उदा. मी नोकरी करतो, मी अभ्यास करतो, मी काही पुस्तके वाचतो, मी नामस्मरण करतो
ह्यातली काही कर्म लगेच फळाला येतात. उदा. मी नोकरी करतो - मला महिन्याअखेरीस पगार मिळतो.
काही कर्म लगेच फळाला येत नाहीत , ती संचितात जाऊन साठतात आणि प्रारब्धरूपाने फळाला येतात. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात काही अनाकलनीय चांगल्या / वाईट घटना घडतात.

सद गुरूंवर आपली श्रद्धा आहे हे उत्तम आहे. पण श्रद्धेमुळे आपले सद गुरू आपले विचार कागदावर कसे उतरवतात त्याचे नीटसे आकलन होत नाही. ते विशद करून सांगितल्यास आनंद वाटेल.

या प्रतिसादामुळे आपल्या श्रद्धेला धक्का लावण्याचा किंवा अपमानित करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. शास्त्रीय सत्यतेवर या सगळ्या गोष्टी पडताळून बघण्याचा मी फक्त प्रयत्न करत आहे इतकेच. आपणास कठिण वाटत आसेल तर उत्तर देऊ नये.

शास्त्रीय सत्यतेवर आपल्याला ही श्रद्धा पडताळून पाहता येणार नाही. :-)

आपली,
सौ. प्राची.

पर्स्पेक्टिव

प्रा.डॉ. दिलीप बिरुटे म्हणतातः
..."ज्याच्या सत्तेशिवाय शरीर चालत नाही, झाडाचे पान हलत नाही. सर्व चराचर हलवणार्‍याला अनेक गोष्टी करुन घेता येतात, तर विचार प्रसारित करण्याच्या बाबतीत लै शुल्लक गोष्ट असेल त्याच्यासाठी..."
..
हे खरे मानायचे तर निरपराध व्यक्तीवर आतंकवाद्याच्या एके४७ मधून उडणार्‍या गोळ्या त्याच्या सत्तेनेच उडतात, निष्पाप बालिकेवर एखादा नराधम बलात्कार करतो तो त्याच्याच सत्तेने हे खरे मानणे क्रमप्राप्त आहे. प्रा.डॉ.बिरुटे यांना हे मान्य आहे काय?

मुळात ईश्वराची सत्ता सर्वव्यापी आहे हे गृहीतक तपासून पाहणे इष्ट ठरेल. याबद्दल एक कथा ऐकलेली आहे. (कथेचा मूळ स्रोत मला माहीत नाही. कोणाला ठाऊक असल्यास जरूर मांडावा.)

एकदा एक लहान, निरागस मुलगा वडिलांना प्रश्न करतो, "बाबा, बाबा, ईश्वर खरेच सर्वशक्तिमान असतो का हो? त्याला काय पाहिजे ते करू शकतो?"

बाबा "हो" म्हणतात.

"मग बाबा, ईश्वर इतका भला मोठा आणि जड धोंडा बनवू शकेल का, की जो तो स्वतःच हलवू शकणार नाही?"

आता झाली का बाबांची पंचाईत; "बनवू शकतो" म्हटले, तर मग तो हलवू शकत नाही म्हणजे काय पाहिजे ते करू शकत नाही, आणि "बनवू शकत नाही" म्हटले, तर मग बनवू शकत नाही म्हणजेही काय पाहिजे ते करू शकत नाही! आणि "मग सर्वशक्तिमान कसा?" म्हणून मुलाने विचारले, तर त्याला उत्तर काय द्या?

गोष्ट संपली.

पण तरीही ईश्वराची सत्ता सर्वत्र चालते असे घटकाभर मानू या. म्हणजेच, आपल्या दृष्टिकोनातून तो एके४७मधून उडणार्‍या गोळ्या, बलात्कार पाहिजे तर थांबवू शकतो शकतो असे समजू. पण थांबवू शकतो म्हणजे थांबवलेच पाहिजे अशी त्याच्यावर सक्ती थोडीच आहे? ईश्वर कोण आहे, तो की आपण? सर्वत्र चालणारी सत्ता कोणाची आहे, त्याची की आपली? आणि सत्ता जर त्याची आहे, तर त्याला सक्ती करणारे आपण कोण?

आपल्या घरात जर झुरळे किंवा उंदीर झाले, तर आपण त्यांना (झुरळांच्या किंवा उंदराच्या) गोळ्या घालून मारतोच ना? हवे तर झुरळांना किंवा उंदरांना मारणे आपण सहज थांबवू शकतो. तसे थांबवावे अशी सक्ती झुरळे किंवा उंदीर आपल्यावर करतात का? मुळात करू शकतात का?

ईश्वराच्या लेखी आपण त्याच्या घरातली (पक्षी: जगातली) झुरळे किंवा उंदीर नाही कशावरून? त्याला मारायचे तर मारेल, वाचवायचे तर वाचवेल. त्याबद्दल काही म्हणणे असणारे आपण कोण लागून गेलो?

पण हे आपल्याला पटू शकत नाही. कारण आपण स्वतःला ईश्वराने बनवलेल्या सृष्टीतले खास प्राणी समजतो. वास्तविक तसे काहीही नाही. इतर किडामुंगीसारखेच आपणही.

पण हेही आपण मानू शकत नाही. कारण "मानव" म्हणून आपला अहं आड येतो. मग "ईश्वराची लीला अगाध आहे, मर्त्य मानवास ती समजू शकत नाही" वगैरे काहीबाही स्पष्टीकरणे सुरू होतात. (वाच्यार्थ: ईश्वर थोर आहे, म्हणून मानवाला त्याचे काही कळत नाही. गर्भितार्थ: खरे तर मानव थोर आहे, पण त्या ईश्वराचे काही कळत नाही बुवा, म्हणून त्याला मानवापेक्षा थोर म्हणावे लागते. पण काही हरकत नाही. केवळ ईश्वरच आमच्यापेक्षा थोर असू शकतो. पण तो सर्वात थोर असला तरी आम्ही नंबर दोन म्हणजे इथे पृथ्वीवर सर्वात थोर आहोत हे विसरू नका! आणि तसाही ईश्वर कोणी बघितलाय? खरे तर त्याला आम्हीच कल्पनेने बनवला. म्हणजे आम्हीच थोर!)

हे सर्व खोटे आहे; शेवटी "जितनी चाबी भरी राम ने, उतना चले खिलौना" हेच खरे, हे लक्षात ठेवावे, आणि आपले दैनंदिन आयुष्य चालू ठेवावे. ईश्वर काय करतो आणि काय करत नाही याची चिंता करू नये. त्याचा मूड असेल, तर करेल; मूड नसेल, तर करणार नाही. आपल्याला काही करता आले, तर आपण करावे; उगाच त्याला मध्ये आणू नये.

तिसरे म्हणजे, समजा मी ईश्वरभक्त आहे. आणि मी गेलो जंगलात. आणि समोरून आला वाघ. आता वाघाला लागलीये भूक, आणि मी समोर दिसतोय. मला माझ्या जिवाची काळजी आहे, आणि माझ्याजवळ समजा बंदूक आहे. आता वाघ आणि मी दोघेही पडलो ईश्वरभक्त. आणि समजा दोघेही नसलो ईश्वरभक्त, तरी त्याची (आणि केवळ त्याचीच) सत्ता आम्हा दोघांवरही असल्याकारणाने तो दोघांचीही काळजी घेण्यासाठी जबाबदार आहे असे दोघेही मानतो. किमानपक्षी, माझी काळजी घेण्यासाठी तो जबाबदार आहे असे मी मानतो, आणि वाघाची काळजी घेण्यासाठी तो जबाबदार आहे असे वाघ मानतो. मग त्याने नेमके कोणास दुसर्‍याला मारू द्यावे आणि कोणास वाचवावे? कारण कोणासही वाचवले तरी मारला गेलेला बोंब मारणार! बरे, समोरून आयत्या वेळी शेळी आणून वाघाचे लक्ष शेळीकडे वेधावे, जेणेकरून वाघाकडून खाल्ले जाण्यापासून मी वाचेन आणि माझ्याकडून बंदुकीची गोळी खाण्यापासून वाघ वाचेल, असा जर त्याने विचार केला, तर मग शेळीवरही त्याचीच सत्ता असल्याकारणाने शेळीही त्याला आपल्या रक्षणासाठी जबाबदार मानत असल्याकारणाने शेळीही बोंब मारणार. बरे, वाघ शाकाहारी नाही, त्यामुळे केवळ झुडुपे खाऊन जगू शकत नाही. आणि जगू शकत असता, तरी झुडुपेही सजीव असल्याकारणाने तीही त्याला आपल्या रक्षणासाठी जबाबदार मानत असणार, म्हणजे तीही बोंब मारणार. मग बिचार्‍या ईश्वराने करावे तरी काय? आणि अशा परिस्थितीत त्याने "तुम्ही काय वाटेल तो गोंधळ घाला; मी मध्ये पडणार नाही" असे म्हटले, किंवा तसे न म्हणतासुद्धा मध्ये पडण्याचे टाळले, तर त्याला दोष देणारे आपण नेमके कोण?

मुळात ईश्वर आपले रक्षण करण्यासाठी आपल्यास बांधील आहे, आणि त्याने तसे न केल्यास तो आपल्याला किमान एक स्पष्टीकरण देणे लागतो, हे आपण नेमके कशाच्या आधारावर ठरवले?

व्वा !

देवाच्या शक्तीबद्दल, तो आहे किंवा नाही, त्याने काय करावे, न करावे यावर चर्चा होत राहतील. पण मला प्रतिसाद आवडला. एकदम मस्त !

-दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला

नमस्कार,

आपला प्रतिसाद आवडला. स्वामी विवेकानंदांच्या एका पुस्तकातले विवेचन आठवले:
-----------------------------------------
ईश्वर आहे किंवा नाही, ईश्वर काय करतो किंवा करत नाही ह्यावर चर्चा करणारे आणि पुस्तकं लिहीणारे अनेक लोक आहेत. परंतु निर्भयतेने ईश्वराच्या शोधार्थ वाटचाल सुरु करणारे आणि शेवटपर्यंत पोचणारे अनुभवी लोक अश्या चर्चा करणार्या लोकांकडे बघून गालातल्या गालात हसत असतील.

एकदा म्हणे २ समूह आपापसांत भांडत होते. एक समूह म्हणत होता - शिव श्रेष्ठ, दुसरा म्हणत होता - विष्णू श्रेष्ठ. तिकडून एक आचार्य चालले होते. त्या भांडणार्या लोकांना उद्देशून ते म्हणाले - तुम्ही ज्या देवांची नावं घेऊन भांडत आहात त्या देवांना तुम्ही पाहिले आहे काय ? ते लोक म्हणाले - अजून तरी नाही. त्यावर आचार्य म्हणाले - म्हणूनच तुम्ही भांडताय !

-------------------------------------------
ह्यातून कोणाचीही मनं दुखवण्याचा माझा हेतू नाही. मला सुद्धा चर्चेत सहभाग घ्यायला आवडतं.

-सौ. प्राची.

देवभोळा

देवभोळा असणे किंवा नसणे हे माणसाच्या वैयक्तिक प्राधान्यांचा भाग झाला. त्याचा या चर्चेशी सुतरामही संबंध नसावा असे वाटते.
आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे त्याचे आकलन होऊ शकले नाही. नेमक्या दोन ओळीत आपल्याला काय म्हणायचे आहे ते सांगितल्यास माझ्यासारख्यांना, स्वतःचे विचार कुठे कमी पडतात हे कळू शकेल.
चन्द्रशेखर

इन्शाल्ला

उर्दू भाषेतल्या संवादात हा शब्द नेहमी ऐकू येतो. कोणीही त्याचे स्पष्टीकरण मागत नाही.
मनात चांगले विचार येण्यापूर्वी आणि आल्यानंतर ते नेमक्या शब्दात व्यक्त करण्यापासून ते प्रसिद्ध करण्यापर्यंत एक मोठी प्रक्रिया असते. अडथळे न येता किंवा आलेल्या अडचणींवर मात करून हे काम पूर्ण करता आले याचे श्रेय त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेला द्यावे असे प्राचीताईंना वाटले असेल म्हणून त्यांनी ते दिले. कदाचित हा त्यांच्या विनयाचा भाग असावा असे मला वाटते.

'इन्शाल्ला'बद्दल (अवांतर)

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानांत 'इन्शाल्ला आता आपण कराचीच्या कायदेआझम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू' अशा प्रकारच्या घोषणा देतात, असे ऐकून आहे.

इन्शाल्ला

आनंदजी
आपले मत योग्य वाटते.
चन्द्रशेखर

प्रा.डॉ.बिरुटे यांच्या लेखनातील कांही मुद्दे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(बिरुटेसरांचे मुद्दे निळ्यारंगात आहेत)
१)..देवाने काही चमत्कार करुन दाखवावा असे नास्तिक लोकांबरोबर आम्हा देवभोळ्या लोकांनाही वाटते.
**कुठल्याही नास्तिकाला असे मुळीच वाटत नाही. कारण वास्तवात नसलेला देव चमत्कार कसा करणार?.तसेच चमत्कार म्हणजे निसर्गनियमांचे अतिक्रमण(उल्लंघन).ते कोणालाही कदापि शक्य नाही. भोळसट श्रद्धाळूंना गंडवण्यासाठी बुवा,बापू करतात ते हातचलाखीचे प्रयोग!
***
२).. पण माणसाला जन्माचा उद्देश समजतो का ?
**पुनरुत्पादन करणे ही प्रत्येक सजीवाची उपजत ऊर्मी(नॅचरल इन्स्टिंक्ट) आहे.जनुकांचे सातत्य राखणे हाच त्यामागचा हेतू.माणसाच्या जन्माचेही वेगळे काही उद्दिष्ट नसते. मुलाचे जन्मदाते ,तसेच समज आल्यावर ते मूल आपल्या जीवनाची कांही ध्येये ठरविते ते वेगळे."कोsहम्" हा प्रश्न निरर्थक आहे.
**
३)..परमेश्वराच्या लीलेने अणुशक्ती शोधून काढली.
***हे सगळे अनेक वैज्ञानिकांनी सतत प्रयोग करून शोधले आहे. पृथ्वीवरील लक्षावधी प्रजाती नामशेष झाल्या तेव्हा ईश्वराने काही केले नाही.
**
४).. त्याचे योग्य नियोजन त्याला नक्कीच करता येत असेल.
** जंगलांत वणवे लागून वृक्षवेली,पशुपक्षी, कीटक असे लक्षावधी सजीव होरपळून मरतात.अशीच हानी ज्वालामुखीच्या उद्रेकाने होते.हे योग्य नियोजन काय?
खरे तर सारे निसर्ग नियमांनुसार घडत असते. नैसर्गिक घटनांमागे कोणताही हेतू नसतो. निसर्ग पूर्णतया उदासीन असतो.

वाईट वाटले

**पुनरुत्पादन करणे ही प्रत्येक सजीवाची उपजत ऊर्मी(नॅचरल इन्स्टिंक्ट) आहे.जनुकांचे सातत्य राखणे हाच त्यामागचा हेतू.माणसाच्या जन्माचेही वेगळे काही उद्दिष्ट नसते. मुलाचे जन्मदाते ,तसेच समज आल्यावर ते मूल आपल्या जीवनाची कांही ध्येये ठरविते ते वेगळे."कोsहम्" हा प्रश्न निरर्थक आहे.

हेच उद्दिष्ट असेल तर मग माणूस आणि पशू ह्यांत काय फरक राहिला ? मग बुद्धीची काय गरज ?

गृहीतके!

मुळात माणूस आणि पशू यांत फरक आहे, आणि असला तर माणसाच्या बाजूने सकारात्मक आहे, हे कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवले?

आणि मानवाला बुद्धी आहे हे जरी मानले, तरी ती गरज होती म्हणून मिळालेली आहे हे तरी कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवले?

माणूस हा माकडापासून ज्या दिवसापासून उत्क्रांत होऊ लागला, त्या दिवसापासून माकडाचा (आणि पर्यायाने माणसाचा) अधःपात होऊ लागला, असे माझे वैयक्तिक मत आहे. (याला काही आधार आहेच, असे सांगता येणार नाही. ती माझी श्रद्धा आहे. श्रद्धेला आधार लागत नाही.)

आमचे पूर्वज माकड होते. तेव्हा आम्हीही सर्व माकडे आहोत, हे ध्यानात ठेवू. ही श्रद्धाच जगाला तारेल, याची मला पूर्ण खात्री आहे. (पुन्हा, ही वैयक्तिक श्रद्धा आहे. आधार विचारू नयेत.)

ह्यावर मी काय म्हणणार !

आपण स्वतःला माकड समजता ही आपली श्रद्धा आहे. ती आपल्याला तारो अश्या आपल्याला मनापासून शुभेच्छा !

माझे वैयक्तिक मत खालील सुभाषिताशी जुळते:

आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यंएतद् पशुभिर् नराणां ।
धर्मो हि तेषां अधिको विषेशः धर्मेण हीनाः पशुभिस् समानाः ॥

सौ. प्राची.

जनावरांना धर्म नाही हे वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान

फक्त या सुभाषितावरून मिळाले, की अन्यत्रही?

गजेंद्राची पुराण कथा प्रसिद्ध आहे. तशाच प्रकारे अन्य मानवेतर जनावरांच्या धार्मिक कथाही प्रसिद्ध आहेत. इतकेच काय कित्येक देवतांची वाहने आहेत, त्यांच्याबद्दल हृद्य कथासाहित्य उपलब्ध आहे. मानवेतर प्राण्यांमध्ये धर्म नाही हे तथ्य मानण्यात या आत्मप्रौढीशिवाय (?याला सुभाषित म्हणावे? ) वेगळे प्रमाण आहे काय?

पुराणकथा सोडल्या तरी - काही जनावरे आपल्या पिलांना शिकवण देतात, असे दिसून आलेले आहे. हत्तींच्या कळपात माता, मावशा आणि मातामही वागणूक शिकवतात. हत्ती कुटुंबातील जाणते मारल्यास त्यातील पौगंड नर पिसाट वागतात, वगैरे (दुवा).

मानवाने सुयोग्य वागण्यासाठी मानवी सामाजिक संदर्भ पुरे असताना, कित्येक लोक प्राण्यांचा दाखला देतात. जणू काही मानवेतर प्राणी अमुक किंवा तमुक वागणारे सापडले म्हणून मनुष्याचे कर्तव्य बदलते!

असो. वरील संवाद बहुधा खेळकर आहे, आणि लेखिका सद्वर्तनी प्राणी बघितल्यानंतरही आपली सुयोग्य वागणूक बदलणार नाहीत.

अवांतर/कुतूहल

तशाच प्रकारे अन्य मानवेतर जनावरांच्या धार्मिक कथाही प्रसिद्ध आहेत.

इसापनीती/पंचतंत्र/हितोपदेशातील कथांमधील हीरो/हिरॉइनी अनेकदा मानवेतर योनीतील का असतात, याबद्दल मलाही कुतूहल वाटते.

देवाच्या कृपेने

आपली अनुदिनी पाहिली. चांगली आहे. निर्गुणी भजनांबद्दलही चांगले लिहिले आहे.

सद्गुरु कृपेने किंवा देवाच्या कृपेने असे का लिहिले असावे असे श्री चंद्रशेखर विचारतात. लेखिकेने असे काय विचाराने लिहिले आहे ते माहित नाही. पण असे लिहिण्याचा बोलण्याचा जो प्रघात दिसतो त्याबद्दल मला काय वाटते ते लिहितो -
आपण आपले कर्तव्य करावे. पण कर्तव्य करत असताना अहंकार सोडून देण्याची सवय करावी. प्रपंचात राहून शाश्वत सुख मिळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे असे संत सांगतात. मनाला अहंकारापासून दूर ठेवण्यासाठी केलेल्या कामाचे श्रेय आपण घेऊ नये तर ते सोडून द्यावे. आता सोडून द्यावे म्हणजे नक्की कसे? तर मग रामाने केले, सद्गुरुच्या कृपेने झाले असे म्हणावे ही एक सोय आहे असे मला वाटते. यातून माणसाने अहंकारमुक्त व्हावे हा हेतू आहे.

'देवाच्या इच्छेने झाले' असे म्हणण्यामागे असलेला हा 'कर्मयोगातला' हेतू नजरेआड झाला तर देवावर मानवी मनाच्या भावाचे आरोपण केल्या सारखे होते आणि त्यातून उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न निर्माण होतात. देव हेतू बाळगतो, तो नियमन करतो असे म्हटले की त्याला आपण देव न ठेवता आपल्या पेक्षा श्रेष्ठ असा मानवच बनवतो.
--लिखाळ.

सहमत

नमस्कार,

अनुदिनीवरील प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्.

माणसाने अहंकारमुक्त व्हावे हा हेतू आहे.

मी आपल्या मताशी १००% सहमत आहे.

सौ. प्राची.

पूर्वकर्म

प्राची ताई
आपल्याला चर्चा करायला आवडते असे आपण प्रतिपादन केल्यामुळे हा प्रतिसाद देण्याचे धाडस करत आहे,
१.शरीराला काहीही लक्षात राहू शकत नाही. ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला शरीरापलीकडे जायला लागेल. सामान्यांच्या भाषेत तो हिशेब देव ठेवतो. पण हा हिशेब खरोखर कसा ठेवला जातो हे (माझ्या मते) केवळ आत्मप्रचिती आल्यानंतर समजू शकेल.
आपण शरीरात आहात की शरीरापलीकडे? शरीरात असलात तर शरीरापलीकडे काय घडते हे आपणास कसे समजले? आत्मप्रचिती म्हणजे काय्? ती आल्यावर पूर्वकर्मांचा हिशोब कसा ठेवला जातो ते कळते हे आपणास कसे समजले?आपणास आत्मप्रचिती आली आहे का? कशी? व कधी? त्यानंतर आपल्यात काय फरक पडला?
२.इथे कर्मविपाक समजून घ्यायची आवश्यकता आहे. त्यात ३ संकल्पना येतात - क्रियमाण कर्म, प्रारब्ध, संचित.
प्रारब्ध आणि संचित असे काही आहे याला काय पुरावा आहे? या भाकडकल्पना कशावरून नाहीत?
३.आपला प्रतिसाद आवडला. स्वामी विवेकानंदांच्या एका पुस्तकातले विवेचन आठवले:
या गोष्टीतल्या दोन माणसांपैकी एक मी आहे असे मी समजतो. मी देव बघितलेला नाही आणि त्याच्या अस्तित्वाचा कोणताही शास्त्रीय पुरावा मी बघितला नाही. त्यामुळे देव नाही असे माझे मत आहे. आपण देवाचे अस्तित्व आहे अस मानता. आपण देवास बघितले आहे का? नसल्यास आपण त्याचे अस्तित्व का मानता?
४. आपण आपणाला कोणत्याही पशुचे वंशज मानत नाही. आम्ही स्वतःला माकडाचे वंशज मानतो कारण तसा पुरावा आहे. आपण कोणाचे वंशज आहात?
५.माणसाने अहंकारमुक्त व्हावे हा हेतू आहे.
आपल्या एकूण भूमिकेवरून आपल्या श्रध्देचा आपल्याला अहंकार आहे असे आपल्याला वाटत नाही काय? तो घालविण्यासाठी आपण काय उपाय योजता?

वरील सर्व चर्चेसाठी चर्चा या भूमिकेतून लिहिलेले आहे. आपल्याला किंवा आपल्या श्रद्धेला अपमानित करण्याचा कोणतीही हेतू नाही
चन्द्रशेखर

उत्तरे

प्राची ताई
आपल्याला चर्चा करायला आवडते असे आपण प्रतिपादन केल्यामुळे हा प्रतिसाद देण्याचे धाडस करत आहे,

अवश्य.


आपण शरीरात आहात की शरीरापलीकडे? शरीरात असलात तर शरीरापलीकडे काय घडते हे आपणास कसे समजले? आत्मप्रचिती म्हणजे काय्? ती आल्यावर पूर्वकर्मांचा हिशोब कसा ठेवला जातो ते कळते हे आपणास कसे समजले?आपणास आत्मप्रचिती आली आहे का? कशी? व कधी? त्यानंतर आपल्यात काय फरक पडला?

शरीरात आहे. पण शरीरापलीकडे जाण्याचा प्रयत्न सद् गुरू करवून घेत आहेत. मी अजून आत्मप्रचितीचा अनुभव घेतलेला नाही. पण, माझा आप्तवाक्यावर विश्वास आहे. माझा संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा आहे. पूर्वकर्मांच्या हिशेबाबद्दलच नव्हे तर आपल्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला आत्मप्रचितीतून होतं असं अनेक अनुभवी लोकांचं म्हणणं आहे. त्यावर मी विश्वास ठेवते. आता अनुभवी लोक कोण हे मला विचारू नका. आपण ज्ञानेश्वरी वाचता म्हणजे आपल्याला ते माहीत असेल असे मी गृहीत धरते.

प्रारब्ध आणि संचित असे काही आहे याला काय पुरावा आहे? या भाकडकल्पना कशावरून नाहीत?

कर्मविपाक (प्रारब्ध आणि संचित) हा आपल्या पुराणांमध्ये सांगितला आहे. आपण ह्याला पुराणातली वांगी अवश्य म्हणा, पण मी म्हणणार नाही. आपण पुढे विचाराल - मी पुराणं / वेद वाचले आहेत का...आधीच उत्तर देते - नाही, पण डॉ. शंकर अभ्यंकरांनी गीतेवर दिलेल्या प्रवचनात मी कर्मविपाक ऐकला आहे.


या गोष्टीतल्या दोन माणसांपैकी एक मी आहे असे मी समजतो. मी देव बघितलेला नाही आणि त्याच्या अस्तित्वाचा कोणताही शास्त्रीय पुरावा मी बघितला नाही. त्यामुळे देव नाही असे माझे मत आहे. आपण देवाचे अस्तित्व आहे अस मानता. आपण देवास बघितले आहे का? नसल्यास आपण त्याचे अस्तित्व का मानता?

मी सुद्धा देव पाहिलेला नाही. पण मी केवळ शास्रीय पुरावा प्रमाण मानीत नाही. मी देव पाहिलेल्या लोकांवर विश्वास ठेवते आणि ते सांगतील तसं वागायचा प्रयत्न करते.म्हणून मी देवाचं अस्तित्व मानते.

४. आपण आपणाला कोणत्याही पशुचे वंशज मानत नाही. आम्ही स्वतःला माकडाचे वंशज मानतो कारण तसा पुरावा आहे. आपण कोणाचे वंशज आहात?

आपण सर्वच माकडाचे वंशज आहोत. परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे माकडात किंवा कोणत्याही प्राण्यात आणि मानवात धर्माचा फरक आहे. आपल्या आणि माझ्या धर्माच्या व्याख्येत मोठी तफावत आहे.

पुराणकथा सोडल्या तरी - काही जनावरे आपल्या पिलांना शिकवण देतात, असे दिसून आलेले आहे. हत्तींच्या कळपात माता, मावशा आणि मातामही वागणूक शिकवतात. हत्ती कुटुंबातील जाणते मारल्यास त्यातील पौगंड नर पिसाट वागतात,

मान्य आहे. पण केवळ पिलांना शिकवण देईपर्यंत मानवधर्म थांबत नाही. "जो धर्म मानवाला आध्यात्मिक अनुभूती घडवून देतो तो मानवाचा खरा धर्म" अशी स्वामी विवेकानंदांची (ज्यांनी देव पाहिलेला आहे) व्याख्या मला मंजूर आहे.

विवेक-चूडामणि मध्ये आदि शंकराचार्यांनी लिहून ठेवले आहे:

दुर्लभम् त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम् |
मनुष्यत्वम् मुमुक्षत्वम् महापुरुषसंश्रयः ||

(अर्थ: तीन दुर्लभ गोष्टी ज्या फक्त देवाच्या कृपेनेच मिळू शकतात, मानवी देहात जन्म, मोक्ष मिळवण्याची इच्छा आणि महापुरुषाचा म्हणजेच सद्गुरूचा सहवास)

आणि मानवी देहात जन्म मिळाल्याबद्दलचा अहंकार बाळगण्यापेक्शाही त्याचा उपयोग करून घेण्याची माझी इच्छा आहे.

आपल्या एकूण भूमिकेवरून आपल्या श्रध्देचा आपल्याला अहंकार आहे असे आपल्याला वाटत नाही काय? तो घालविण्यासाठी आपण काय उपाय योजता?

अहंकार प्रत्येकात आहे. केवळ आत्मज्ञानी माणूस पूर्णपणे निरहंकारी असू शकतो. उपाय सांगण्यासाठी मी आपल्याला बांधील नाही. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे.

सौ. प्राची.

 
^ वर