कॅमेरा रॉ फाईल्स

कॅमेरा रॉ फ़ाईल्स -२

रॉ फ़ाईल्सची सोय कॅमेर्‍यात असेल तर तो कॅमेरा तुम्हाला प्रोसेस करण्याकरिता लागणार्‍या प्रणालीची सिडी देतो हे बरोबर. खरे म्हणजे तुम्हाला सिल्कीपिक्स वगैरेची गरज पडू नये. परंतू बरेच जण ही सुविधा वापरतच नाहीत म्हणून केवळ रॉचे उपयोग कळल्या नंतर तरी रॉचा वापर वाढावा ही इच्छा. तसे हे सोपे आहे. सिडीमधील सर्व सुविधा वापरल्या पाहिजेतच असेही नाही. नेहमी लागणार्‍या व तेव्हढ्याने भागणार्‍या गोष्टी प्रथम बघू.

(१) कॅमेर्‍यातील रॉ फ़ाईल संगणकावर घेतली की ती प्रणालीत उघडावी. आकार मोठा घ्यावा म्हणजे केलेले बदल झटकन लक्षात येतात.
(२) एक्स्पोजर :कॅमेर्‍यात एक्स्पोजर शटर स्पीड व ऍपर्चर यांच्या संयुक्त उपयोगावर ठरते. सहसा ते स्टेप्समध्ये बदलते. उदा. स्पीड निम्मा-निम्मा किंवा दुप्पट-दुप्पट होत जातो. इथे तुम्ही लहान पायर्‍यांमध्ये (०.१) तो कमी किंवा जास्त करू शकता.किंवा स्लाईडर वापरून स्टेपलेस बदला. आरामात, कॉफ़ी पितपित,बदल करा. "निसटून जाई संधीचा क्षण" ही भीती नाही.
(३) व्हाईट बॅलन्स : पांढरा रंग निरनिराळ्या प्रकाशांत निरनिराळा दिसतो. विजेचा दिवा, ट्युब, दुपारचा सुर्य प्रकाश, संध्याकाळ,
ढगाळ हवा, प्रत्येक वेळी तो बदलत असतो. कॅमेर्‍यात ८-१० सेटिंग असतात. आपण दरवेळी योग्य ते वापरतोच असे नाही. हरकत नाही, इथे काय तो बदल करून घ्या. शिवाय इथे परत स्टेपलेस बदलाची सोय आहेच. कलर टेम्परेचर ३००० ते १०००० या रेंजमध्ये बदलत रहा. श्री. अनुप यांच्या संध्याकाळच्या रंगछटा तुमच्याही छायाचित्रात येऊ द्यात. फोटो चारला काढा, ६चा आभास निर्माण करा.साधारणत: कोणत्या वेळी कोणते टेम्परेचर असते याचे टेबल दिलेले असते. सुरवातीला त्याचा उपयोग करावा पण त्याचे बंधन घालून घेवू नये.आपल्याला काय भावते ते महत्वाचे.
(४) कलर ऍडजस्टमेंट : हे एक महत्वाचे साधन तुम्हाला चित्रातील रंग आपल्याला पाहिजे तसे मिळवावण्याकरिता वापरावयाचे. यातही प्रणालीमध्ये असलेले पूर्व-रचित किंवा स्वत: बदल करून (Mannually) अशा दोन प्रकारांनी वापरून पाहिजे ते खेळ करा.
वापर थोडा थोडा बदल करून पहा.पाहिजे तेथे थांबा. या वेळीच tone मध्ये प्रयोग करा.
(५) शार्पनेस व नॉइज रिडक्शन : ही दोन एकमेकाविरुद्ध काम करतात. शार्पनेस वाढवला तर तर नॉइजही वाढतो व नॉइज कमी केला तर शार्पनेसही कमी होतो. म्हणजे यांचा उपयोग हे Ballancing Act आहे. इथे कॅमेर्‍यावर सर्व गोष्टी सोडण्याऐवजी आपण सुत्रे हातात घेतल्याचा फायदा दिसून येईल. मोठा आकार केल्याचा खरा उपयोग येथे बघा.
(६) सुरवातीला एवढ्या गोष्टी पुरेत. Lens Correction,Vignetting वगैरे बाबी व Development च्या वेळी करता येणारे बदल सावकाश शिकता येतील.
(७) असे तयार केलेले चित्र व कॅमेर्‍याने दिलेले चित्र तुलना करून पहा.आपण इतके दिवस रॉ फ़ाईल्स न वापरल्याबद्दल वाईट वाटेल (ते विसरा).
एक महत्वाची गोष्ट : कॅमेर्‍याविषयी लिहतांना सांगितलेले परत एकदा. मॅन्युअल इतक्यांदा वाचा की ते आंगवळणी पडलेले असेल.

वर दिलेले कशाकरिता लिहले ? शेवटी तुमचे काम तुम्ही स्वत:चे मॅन्युअल वाचूनच करावयाचे आहे.इच्छा एवढीच की जर तुम्ही रॉ फाईल्स वापरावयास सुरवात केलीत तर उपक्रमवर येणारी छायाचित्रे आणखीन जास्त चांगली येतील. एक करून बघा. पुढील छायाचित्र पाठवतांना कॅमेर्‍यावरचे व रॉवर तुम्ही प्रोसेस केलेले दोन्ही द्या. सगळ्यांनाच फरक बघता येईल व इतरही या फंदात पडतील.
एक सांगावयाचे राहिलेच. चित्र घेतांना प्रकाश कमी असेल तर कोणतीच प्रणाली तो पैदा करू शकत नाही. तेंव्हा थोडा over expose फोटोच काम करावयाला ठीक पडतो.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

एक शंका

रॉ फाइल वर व्हाईट बॅलन्स आणि कलर ऍडजस्टमेंट करणे, व
जेपिजी फाइल वर फोटोशॉप (किंवा जिंप) वापरुन ब्राइटनेस/कॉन्ट्रास्ट आणि कलर बॅलन्स करणे

हे एकच का ?

रॉ फ़ाईल्स व फोटोशॉप

रॉ फ़ाईल वर व फोटोशोपवर काम करतांना बर्‍याच कृती सारख्या आढळतात, उदा. एक्स्पोजर,शार्पनिन्ग वगैरे. मुख्य फरक हा की रॉमध्ये तुम्हाला जास्त पिक्झलवर काम करता येते. एकदा कॅमेर्‍याने तुमचे चित्र हाताळले की त्यात पिक्झल कमी होतातच. आणि या गेलेल्या पिक्झल कायमच्याच गेलेल्या असतात. फोटोशॉप किंवा इतर कोणतीही प्रणाली त्या
परत मिळवू शकत नाही. तेंव्हा रॉमध्ये प्राथमिक काम करा, कमाल पिक्झलचे चित्र मिळवा व
पाहिजे तर त्या चित्रावर फोटोशोपमध्ये काम करा. तुम्हाला अनेक गोष्टी नंतर करणे सोयीचे
वाटेल.अनूपच्या चित्रावर फोटोशॉपमध्ये मी बदल केले होतेच की !
शरद

छान माहिती

सुरेख व अत्यंत उपयुक्त माहिती.
चित्र घेतांना प्रकाश कमी असेल तर कोणतीच प्रणाली तो पैदा करू शकत नाही. तेंव्हा थोडा over expose फोटोच काम करावयाला ठीक पडतो
हे एकदम पटले.

धन्यवाद
-
ध्रुव

अवांतर

नव्या सर्व क्यामेरांमधे (डीएसएलआर किंवा कंझ्यूमर) छायाचित्र काढल्यानंतर त्याचा हिस्टोग्राम बघायची सोय असते. या हिस्टोग्रामवरून फोटो बरोबर एक्स्पोझ झालाय की नाही ते जास्त चांगले कळते. कारण क्यामेराच्या लहानश्या २-३ इंचाच्या स्क्रीनवर कधीकधी नीट एक्सपोझ न झालेले फोटोसुद्धा चांगले दिसतात. शिवाय आजूबाजूच्या प्रकाशाचाही त्या स्क्रीनवर दिसणार्‍या छायाचित्रावर परिणाम होतो. याबाबत एक चांगला लेख (विंग्रजीतून) येथे वाचता येईल. या लेखाच्या लेखकाच्या मते हिस्टोग्राम थोडासा उजवीकडे झुकणारा असणे जास्त चांगले, जेणेकरून नंतर त्या फोटोवर काम करताना डायनामिक रेंज जास्त मिळते. वर ध्रुव यांनीही हेच म्हटले आहे. डिजिटल तंत्रज्ञान जिंदाबाद.

छान दुवा

मुळ् लेख माहितीपूर्ण आहेच
मला मा.ठ.विद्यार्थी यांनी दिलेला दुवादेखील उपयुक्त वाटला

श्री. शरद व श्री. मा.ठ.विद्यार्थी यांचे अनेक आभार
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

वा वा!

आपण इतके दिवस रॉ फ़ाईल्स न वापरल्याबद्दल वाईट वाटेल (ते विसरा). :-)

मॅन्युअल इतक्यांदा वाचा की ते आंगवळणी पडलेले असेल. - सगळ्यात जास्त महत्वाचे....

तेंव्हा थोडा over expose फोटोच काम करावयाला ठीक पडतो. या माहितीसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. :-)

रॉ वरचा आधीचाही लेख वाचला. आवडला. धन्यवाद!

-सौरभ.

==================

 
^ वर