मेघालय

स्वातंत्र्य् प्राप्तीच्या वेळी 'मेघालय' राज्य म्हणजे आसाम राज्यातील दोन जिल्हे होते. १९४७ साली त्या दोन जिल्ह्यात् केवळ १७% ख्रिश्चन् होते. काही वर्षातच त्यांनी अधिक अधिकार आपल्या हाती यावेत व मतांतरण अधिक सुलभ व्हावे म्हणुन स्वायत्त जिल्हा परिषदेची मागणी केली. ती पूर्ण झाल्यावर मतांतरणास गती मिळाली व १९७० साली ३५% ख्रिश्चन झालेल्या मेघालयाने स्वतंत्र राज्याची मागणी केली.२१ जानेवारी १९७१ रोजी मेघालय राज्याची निर्मीती झाली. चर्चेस् मधे घंटानाद करुन त्याचे स्वागत झाले. अधिकाधिक अधिकार ख्रिश्चनिटीच्या हातात आल्यामुळे मतांतरणाने वेग घेतला व आज बहुसंख्याक म्हणजेच ७०.३% ख्रिश्चन असलेल्या मेघालयाच्या भिंतीवर 'Stop treating us like an Indian Colony" व we are khasis by blood, 'Indians by accident" इत्यादी घोषणा लिहिलेल्या दिसतात. मेघालयातील ख्रिश्चनिटीच्या क्रमशः झालेल्या वाढीबरोबर बदलत्या मागण्यावरुन ख्रिश्चनिटी मतांतरणाचा उपयोग राष्ट्रांतरणासाठी करत असल्याचे दिसून येते.

लेखनविषय: दुवे:

Comments

धर्मांतर

धर्मांतरामुळे या देशाचे अत्यंत नुकसान झाले आहे हि गोष्ट खरिच आहे परंतु याला ९० टक्के आपणच जबाबदार आहोत॥ एखादे समाजाला दिलेली वागणूक तसेच आर्थीक कारण व पूर्वी एखाद्याने कोणाकडे काहि अभक्ष (?) भक्षण जाणून अथवा अजाणतेपणी केले तरि त्या कुटुंबालाच बहिष्कॄत करणे वगैरे अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपल्या देशाचे व धर्माचे नुकसान करण्यासाठी आपले धर्मीयच जबाबदार आहेत॥ अर्थात आपण एक असतो तर समुद्रमार्गे हजारो मैलावरुन येवून परकियानी या देशावर राज्यच केले नसते॥ आता व्यर्थ आक्रोश करुन काय फायदा॥
सदानंद ठाकूर
आम्हाला येथे भेट द्या http://www.mutualfundconsultantindia.com

चुका

आपला कदाचित चुकांतुन शिकण्याला विरोध नसावा. पण ते कुठे लिहिलेले दिसले नाही म्हणुन मी लिहितो आहे
आपण यांचा आक्रोश व्यर्थ जाऊ नये म्हनुन काही करु शकत असाल तर करा.

तुलना / काही स्वैर विचार / चॅरिटी बिगिन्स ऍट...

अधिकाधिक अधिकार ख्रिश्चनिटीच्या हातात आल्यामुळे मतांतरणाने वेग घेतला व आज बहुसंख्याक म्हणजेच ७०.३% ख्रिश्चन असलेल्या मेघालयाच्या भिंतीवर 'Stop treating us like an Indian Colony" व we are khasis by blood, 'Indians by accident" इत्यादी घोषणा लिहिलेल्या दिसतात. मेघालयातील ख्रिश्चनिटीच्या क्रमशः झालेल्या वाढीबरोबर बदलत्या मागण्यावरुन ख्रिश्चनिटी मतांतरणाचा उपयोग राष्ट्रांतरणासाठी करत असल्याचे दिसून येते.

या प्रश्नाचा विचार करताना भारतातील ख्रिस्तीबहुल नाही तरी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या गोवा, केरळ वगैरे राज्यांतील याबाबतचा अनुभव काय आहे, याचा अभ्यास करून तेथील वस्तुस्थितीची मेघालयातील वस्तुस्थितीशी तुलना करावी लागेल, असे वाटते.

तसेच मुळात ब्रिटिशांच्या काळापासून केवळ ब्रिटिश हिंदुस्थानाचा भाग असल्यामुळे 'आपण हिंदुस्थानी आहोत' अशी काही भावना या लोकांच्या मनात रुजलेली होती का, आणि केवळ धर्मांतरणामुळे ती नष्ट झाली का, की रोजच्या आयुष्याच्या मारामारीत 'राष्ट्रीयत्व' हा मुद्दा या लोकांच्या लेखी आजपावेतो गौण होता, आणि काल हे लोक ब्रिटिश हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली होते, त्याजागी केवळ हस्तांतरणाने स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली आले, एवढाच फरक त्यांच्या लेखी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीमुळे पडला, याचाही अभ्यास आणि विचार करावा लागेल.

ब्रिटिशांच्या काळापासून हा प्रदेश प्रशासकीयदृष्ट्या हिंदुस्थानचा भाग होता खरा, परंतु या प्रदेशातील लोकांना उर्वरित हिंदुस्थानवासीयांबद्दल आणि उर्वरित हिंदुस्थानवासीयांना या प्रदेशातील लोकांबद्दल देशबंधुत्वाची भावना होती का, की केवळ एकाच प्रशासनाशी जोडले गेल्याने केवळ (असलीच तर) 'एकाधिपत्या'ची भावना होती, याचाही विचार करावा लागेल. (हा शेवटचा मुद्दा तथाकथित 'मेनस्ट्रीम' भारतातील विविध प्रदेशांतील लोकांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांनाही खरे तर लागू आहे; तेथे त्याची संहती किंचित प्रमाणात कमी होते, इतकेच.)

अवांतर: स्वतःच्याच अनुभवाबद्दल बोलायचे झाले, तर पुण्यात राहत असेपर्यंत 'सारा भारत एक आहे, भारताच्या सर्व प्रदेशांचे रहिवासी आपले बांधव आहेत, आपण सर्व एक आहोत, समान आहोत, बांधव आहोत, एकाच भारतमातेची लेकरे आहोत' वगैरे 'उदात्त' आणि 'राष्ट्रवादी' इ. विचार होते. तरीसुद्धा एस.पी.त नाहीतर फर्ग्युसनमध्ये वसतिगृहात राहणारे, वसतिगृहाबाहेर सहसा आपल्याच घोळक्यात वावरणारे, वेगळी भाषा बोलणारे आणि चेहरेपट्टीची वेगळी ठेवण असलेले ईशान्य भारतातून आलेले तुरळक विद्यार्थी कॉलेजात दिसत, परंतु अगदी क्वचित आणि अगदी जुजबी आणि कामापुरते संभाषण वगळल्यास त्यांच्याशी आपण होऊन संभाषण साधायला जावे अशी भावना सहसा होत नसे. (किंबहुना ईशान्येकडील नेमक्या कोणत्या राज्यातून हे विद्यार्थी आले आहेत हेही जाणून घेण्याची फारशी उत्सुकता नसे.) त्यांच्याबद्दल द्वेषभावना नसली तरी विशेष आपुलकीची भावना जागृत झाल्याचे आठवत नाही. फार तर 'चाललेत बिचारे आपल्या रस्त्याने, तर जाऊ देत' इतपत 'सहिष्णुते'ची, आणि निश्चितच एका प्रकारच्या 'वेगळेपणा'ची, भावना असल्याचे आठवते. मात्र अशी 'वेगळेपणा'च्या भावनेची जाणीव कॉलेजातील (उदाहरणादाखल) तमिळ अथवा बंगाली विद्यार्थ्यांबद्दल झाल्याचे, किंवा कॉलेजातील तमिळ अथवा बंगाली विद्यार्थ्यांशी संभाषण साधताना अशी काही मानसिक आडकाठी आल्याचे आठवत नाही. तर हा (कदाचित वरील मुद्द्यांना अधोरेखित करणारा) एक भाग.

त्या ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांशी आपण होऊन आणि कामाशिवाय (आणि तेही जुजबी वगळता) फारसे कोणी बोलायला जात नसल्यामुळे त्यांनाही आपल्याच घोळक्यात वावरण्याव्यतिरिक्त फारसा पर्याय नसावा, असे आता वाटते. हा दुसरा भाग.

तर ते एक असो. पण एरवी, अशी 'मेनस्ट्रीम' असण्याबद्दलची प्रतिमा ज्यांच्याबद्दल मनात येत नसे असे भारतीय वगळल्यास, उर्वरित भारतीयांबद्दल 'राष्ट्रीय एकात्मते'ची वगैरे भावना होती. (किंवा ती तशी आहे अशी स्वतःचीच समजूत होती.) हे सर्व पुण्यात राहत असेपर्यंत.

पुढे भारताच्या हिंदीभाषक पट्ट्यात, आणि तेही वसतिगृहावर, काही वर्षे राहण्याचा योग आला. भारताच्या विविध भागांतून येणारे विद्यार्थी आणि त्यांच्या एकमेकांबद्दलच्या धारणा जवळून पाहण्याची संधी लाभली. त्यातून, आणि त्यातसुद्धा हिंदीभाषक पट्ट्यातील - आणि विशेषतः दिल्लीहून येणार्‍या - विद्यार्थ्यांच्या, उर्वरित भारतातून येणार्‍या बिगरहिंदीभाषक - आणि त्यातसुद्धा दाक्षिणात्य - विद्यार्थ्यांबद्दलच्या प्रवृत्ती पाहून, ही आपली 'राष्ट्रीय एकात्मते'ची भावना किती डळमळीत पायावर उभी राहिलेली आहे, याची थोडीथोडी कल्पना येऊ लागली. दक्षिण भारतातून येणार्‍या एखाद्या विद्यार्थ्याने, हिंदी येत असूनसुद्धा, केवळ इंग्रजीशी अधिक चांगला परिचय असल्याकारणाने रॅगिंगदरम्यान एखाद्या दिल्लीकर सीनियरच्या हिंदीतून विचारलेल्या प्रश्नास इंग्रजीतून उत्तर दिल्यास, त्यास त्याच्या आईच्या पोटापाण्याच्या व्यवसायाबद्दल शंका व्यक्त करणारी शिवी हासडली जाऊ शकते, हेही प्रत्यक्ष पाहिले. अर्थात हे टोकाचे उदाहरण झाले, आणि सर्वच दिल्लीकर विद्यार्थी असे नसत, काही चांगले नमुनेही भेटले आणि काही त्या काळी मित्रसुद्धा बनले, हेही आवर्जून सांगावेसे वाटते, परंतु एकंदर अनेक दिल्लीवासीयांच्या मनात उर्वरित भारतवासीयांबद्दल एका प्रकारच्या वर्चस्वाची, जणू काही उर्वरित भारत ही पूर्वी ब्रिटिशांची तर आता दिल्लीची वसाहत असल्यासारखी, भावना असावी अशी काहीशी धारणा होऊ लागली होती, असे आठवते. आणि 'मग आपणच मूर्खासारखी एकराष्ट्रीयत्वाची भावना का बाळगतो?' असाही एक प्रश्न पडत असे. आणि दिल्लीच्या स्थानिक बसेसमधली 'भारत की सभी भाषाऍं हमारी अपनी भाषाऍं हैं|' वगैरे 'सरकारी बोधवाक्ये' वाचून आणखीच चिडचीड होत असे.

अर्थात त्या काळची माझी ही धारणा टोकाची आणि काही थोड्या नगांच्या अनुभवाच्या सरसकटीकरणातून झालेली असू शकते, असे नग सर्वच समाजांत असतात आणि त्यावरून कोणतीही सरसकट अनुमाने काढू नयेत, सर्वच मनुष्यसमूहांत काही चांगले तर काही वाईट नमुने सापडतात, पैकी वाईट नमुने (विशेषतः त्यांच्या उदाहरणांसाठी मुद्दाम शोध घेत असल्यास) सहज उठून दिसतात, तर चांगले नमुने विशेष प्रयत्न केल्याशिवाय सापडत नाहीत किंवा दिसले तरी (शोधाचे लक्ष्य नसल्याकारणाने) नजरेत न भरल्यामुळे दुर्लक्षिले जातात, प्रत्यक्षात माझ्या स्वतःच्या धारणाही नेहमीच पवित्र किंवा तर्कसुसंगत नसू शकतील... वगैरे अक्कल पुढे बर्‍याच उशिराने आणि हळूहळू येऊ लागली, हा प्रस्तुत चर्चाविषयाच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळा आणि असंबद्ध मुद्दा. तर तेही एक असो.

पण यातून विचार करण्यासारखा प्रश्न असा, की केवळ काही वर्षे काही दिल्लीवासीय दृष्टिक्षेपात येण्यासारख्या वातावरणात राहून जर माझ्यासारख्या तथाकथित 'मेनस्ट्रीम' भारतातून येणार्‍या व्यक्तीला 'दिल्लीकरांना माझी भूमी (आणि उर्वरित भारत) ही दिल्लीची वसाहत आहे असे वाटते' अशी भावना (तात्पुरती का होईना, पण) होऊ शकते, तर भारताच्या 'मेनस्ट्रीम'मध्ये कधीच मानल्या न गेलेल्या या ईशान्यभारतीय लोकांना उर्वरित आणि तथाकथित 'मेनस्ट्रीम' म्हणवणार्‍या भारताबद्दल अशा किंवा याहूनही तीव्र स्वरूपाच्या काही भावना निर्माण होत असतील, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का? माझ्यासारख्याच्या मनात जर 'Stop treating me like a colonial native subject of Delhi' किंवा 'I am God-alone-knows-what(-I-am) by blood, (but I am an) Indian only by (an) accident (of history)' अशासारखी - अगोदर नसलेली - भावना निर्माण होऊ शकत असेल, तर या लोकांना 'Stop treating us like an Indian colony' किंवा 'We are Khasis by blood, Indians only by accident' असे वाटण्यात अनैसर्गिक असे नेमके काय आहे? (अर्थात, याचा अर्थ या लोकांनी भारतापासून वेगळे व्हावे, त्यात आणि केवळ त्यातच त्यांचे भले आहे, असे मला मु़ळीच वाटत नाही हे येथे स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र या प्रश्नाचा विचार करताना थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून, आणि कदाचित त्या लोकांच्या दृष्टिकोनातूनही, विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.)

दुसरे म्हणजे, ख्रिस्ती धर्मप्रसारकांना दोष देऊन काही साध्य होण्यासारखे आहे का, किंवा असा दोष देणे कितपत योग्य आहे? त्यांनी फक्त त्यांच्या 'कार्या'साठी संधी पाहिली, तर त्यात त्यांचे नेमके काय चुकले? त्यांना मुळात संधी उपलब्ध कशी झाली? मुळात जर 'एक'पणाची भावनाच नसली, तर 'वेगळे'पणाची भावना रुजवण्यासाठी वेगळे किंवा खास असे काय प्रयत्न करावे लागतात?

तिसरी गोष्ट, ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी जे काही केले तसे काही करून या लोकांच्या मनात भारतीयत्वाची भावना 'रुजवली' जाऊ शकते का? मुळात एकीची भावना ही वटहुकुमाने किंवा 'आम्ही म्हणतो तुम्ही आमचे आहात' असा काही प्रचार करून, किंवा धर्मप्रसार करून, होऊ शकते का? अशा प्रयत्नांतून केवळ वेगळेपणाची, दुहीची भावना रुजवली जाऊ शकते. हे तर मिशनर्‍यांचे - मग ते कोणत्याही धर्माचे असोत आणि कशाही प्रकारचे कार्य करत असोत - कामच नव्हे. (यापुढील भागात 'मिशनरी' हा शब्द 'ख्रिस्ती मिशनरी' या अर्थाने वापरलेला नसून, सामान्यतः ढोबळ अर्थाने आणि विशेष करून 'भारतीयत्वाचे मिशनरी' अशा अर्थाने वापरला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. 'मिशनरी' या शब्दाचा 'ध्येयप्रेरित', people with a mission असा अर्थ घ्यावा.) या लोकांत जर भारतीयत्वाची भावना रुजवायची असेल, तर त्यांना मुळात 'आपण भारतीय आहोत' असे वाटावयास पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्याला आपलेसे करण्याअगोदर आपण त्यांना (खर्‍या अर्थाने) आपलेसे करायला पाहिजे. म्हणजे (शिक्क्याने) 'देशबांधव' किंवा (धर्मांतराने किंवा तथाकथित पुनर्धर्मांतरांने) 'धर्मबांधव' म्हणून नव्हे, तर त्यांची जी असेल ती जीवनपद्धती मान्य करून, तिला धक्का न पोहोचवतासुद्धा, हे इतर चारचौघांसारखे आपलेच लोक आहेत, आपलेच बांधव आहेत, कोणी वेगळे लोक नव्हेत, ही भावना प्रथम आपल्याच मनात रुजवली पाहिजे. या लोकांना त्यांच्या प्रदेशात विकासाच्या संधी स्वतःच कशा निर्माण करता येतील, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शिवाय या लोकांना पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी (इतर सर्वसाधारण भारतीयांसारखे) भारताच्या इतर प्रदेशांत जावे लागल्यास तेथे ते भावनिकदृष्ट्या कोणत्याही सर्वसाधारण भारतीयासारखेच गणले जातील असे वातावरण निर्माण झाले पाहिजे.

पैकी विकासाच्या संधी निर्माण होण्यात हातभार हे काम कदाचित भारत सरकार आणि या प्रदेशातले किंवा उर्वरित भारतातले खाजगी उद्योजक (या लोकांच्या स्वत्वभावनेला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने) करू शकतात; (काही प्रमाणात काही अत्यावश्यक मूलभूत सेवा पुरवणे वगळल्यास) 'मिशनर्‍यां'च्या अखत्यारीतले हे काम नसावे असे वाटते. (अत्यावश्यक मूलभूत सेवा पुरवणे हे आवश्यक आहे हे खरे, आणि 'मिशनरी' आणि समाजसेवक/समाजसेवी संस्था ते सक्षमपणे पार पाडू शकतात हेही खरे. परंतु आपलेपणाची, भारतीयत्वाची भावना रुजवण्यासाठी तेवढे पुरेसे आहे असे वाटत नाही.) मात्र उर्वरित भारतीयांत या लोकांबद्दल आपलेपणाची भावना रुजवणे हे खरे मोठे काम आहे, आणि तेथे 'मिशनर्‍यां'चे मोठे योगदान होऊ शकते, असे वाटते. मात्र याकरिता अशा मिशनर्‍यांनी या लोकांना आणि त्यांची जीवनपद्धती, चालीरीती वगैरेंना समजून घेण्यासाठी जो काही वेळ लागेल तेवढा वगळल्यास उरलेला वेळ (आणि एकंदर अधिकतर वेळ) या प्रदेशांत घालवण्याऐवजी उर्वरित ('मेनस्ट्रीम') भारतात जनजागृती करण्यात, उर्वरित भारतवासीयांच्या मनात या लोकांसंबंधी आपलेपणाची भावना रुजवण्यासाठी लागतील ते प्रयत्न करण्यात, 'मेनस्ट्रीम' भारतीयांचा 'मेनस्ट्रीम' भारतभूमीतच या लोकांशी जवळचा आणि वारंवार संपर्क येण्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात खर्ची करावा, असे सुचवावेसे वाटते. त्याने कदाचित उभयपक्षी आपुलकीची, भारतीयत्वाची भावना रुजू शकेल असे वाटते.

एकत्वाची भावना ही लादता येत नाही (तथाकथित 'पुनर्धर्मांतरा'ने तर ती मुळीच लादता येणार नाही), ती आतून निर्माण व्हावी लागते; आणि त्यासाठी पोषक असे वातावरण, पार्श्वभूमी निर्माण होणे आवश्यक असते. अशी पार्श्वभूमी निर्माण होण्याच्या दृष्टीने या प्रदेशांऐवजी या प्रदेशांच्या बाहेर बरेच मोठे कार्य, बरेच मोठे प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे वाटते. ते झाल्याशिवाय या प्रदेशांत कितीही कार्य केले, तरी त्याचा फारसा दूरगामी फायदा होणे नाही, असे वाटते. चूभूद्याघ्या.

सहमत - गोव्यातील अनुभव

गोव्यातील माझ्या ख्रिस्ती मित्रांकडून आणि ख्रिस्ती शिक्षकांकडून (यात काही पाद्री आणि सिस्टरी होत्या) भारताविरुद्ध कधी काही ऐकले नाही, आणि भारताबद्दल प्रेमाचे उद्गार पुष्कळ (म्हणजे बाकी लोकांइतकेच - सारखे-सारखे नाही - अधूनमधून) ऐकले.

पूर्वाञ्चल यांचा खालील प्रतिसाद भावनेच्या दृष्टीने प्रामाणिक आहे, असे वाटते. पण तथ्यांशाच्या दृष्टीने मर्यादित आहे. अशा ज्वलंत भावना असलेले लोक असतात, हीच काय त्यातील माहिती.

बराचसा सहमत मात्र..

बराचसा सहमत.

त्या ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांशी आपण होऊन आणि कामाशिवाय (आणि तेही जुजबी वगळता) फारसे कोणी बोलायला जात नसल्यामुळे त्यांनाही आपल्याच घोळक्यात वावरण्याव्यतिरिक्त फारसा पर्याय नसावा, असे आता वाटते. हा दुसरा भाग.

असहमती इतकीच की जसे मेनस्ट्रीममधील लोक (पक्षी: मी देखील)आपण होऊन बोलायला जात नाहि तसेच "ते" (पक्षी: इशान्यवासी) देखील आपणहून मैत्री वाढवू इच्छित नाहित.

यंदा ट्रेकिंगच्या निमित्ताने माझी तेथील काहि मुला-मुलींशी ओळख झाली.
माझा अनुभव असा.. की जरी तुम्ही त्यांच्याशी मैत्री/ठराविक मर्यादेपेक्षा अधिक ओळख करून घ्यायचा प्रयत्न केल्यास त्यांचा कंपु तसे होउ देत नाहि. ते एकेकटे असतानाही त्यांना आकर्षण असते मात्र एकप्रकारचा अव्हेर (रिलक्टन्स) जाणवतो. त्यांच्याशी बोलताना काहिसा न्यूनगंड-बुजलेपणाही एकीकडे जाणवतो तर एकीकडे काहिसा द्वेषही..

मात्र इशान्येकडील मुलींबाबत माझा अनुभव अत्यंत वेगळा आहे. त्या बोलायला चांगल्या, (मेनस्ट्रीम मुलींच्या मानाने ;) ) तर्कशुद्ध विचार करणार्‍या, सरळ-स्पष्ट बोलणार्‍या वाटल्या. माझी त्यांच्याबरोबर या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्यांच्यामते, "आम्हाला तुझ्यासारखे भारतीय म्हणून जगायला आवडेल मात्र आमची मूळ ओळख पुसता जाता कामा नये.. मेन स्ट्रीम मधून अनेकांचे मदतीचे, मैत्रीचे हात येतात पण ते स्वीकारताना आपली संस्कॄती गमावू ही तीव्र भीती समाजात आहे. म्हणून ते जाणीवपूर्वक असे करायचे (फार मिसळणे वगैरे) टाळतात / तसे टाळायला त्यांच्या समाजात प्रोत्साहन मिळते."

समांतर अवांतरः
इशान्येला राष्ट्रीय सयंसेवक संघाचे फार मोलाचे काम आहे असे ऐकून होतो. तेथील लोकांना त्यांच्यामबद्दल विचारले असता ते अत्यंत रा.स्व.संबद्दल आदरपूर्वक बोलतात. त्यांच्यामते "जर ते नसते तर अख्खा इशान्य भागाला इशान्य "भारत" म्हणता येणे मुष्कील झाले असते. आमच्यावर बदलण्याची बळजबरी न करता आम्हाला सोयी पुरविणारे फक्त तेच आहेत. भारत सरकारला आम्ही आचाराने भारतीय व्हायला हवे आहोत तर मिशनर्‍यांना आम्ही ख्रिश्चन!"

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

पुर्वांचल - ख्रिश्चन मिशनरी आणि त्याच्या कारवाया

भारतामध्ये काम करत असलेले जे विदेशी मिशनरी आहेत ते या देशात सेवा वा उपासना पंथांपेक्षा अधिक राजकारणामधे व त्यातही राष्ट्रविघातक कारवायांमध्ये व्यस्त असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असूनही आमचे सरकार त्यांना येथे प्रोत्साहन कोणत्या आधारावर देते? केवळ त्या पाश्चात्य देशांकडून आपल्याला आर्थिक मदत मिळते व त्याच्या मोबदल्यात या मिशनर्‍यांच्या कारवायांना संरक्षण देण्याची हमी घेतली जाते म्हणुन कोणतेही स्वाभिमानी राष्ट्र या कारवाया खपवून घेणार नाही, आणि म्हणुनच भारतातील सर्व विदेशी मिशनरी व त्याच्या संस्थांना तत्काल प्रतिबंधित केले पाहिजे. आपल्या देशातील समाजाच्या उध्दारासाठी कार्य करणारे विदेशी मिशनरी म्हणजे या राष्ट्राचा अवमान आहे. काही वर्षांपूर्वी चीन मध्ये झालेल्या भयंकर भुकंपाच्या वेळेस चीनने बाहेरची सर्व प्रकारची मदत नाकारली व 'स्वसमाज व स्वजवाबदारीवर' आम्ही या संकटाचा सामना करु असे म्हटले होते. तो आदर्श अवलंबिणे गरजेचे आहे.

या देशात ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या कारवायांचे देखिल सरकारने सूक्ष्म अवलोकन केले पाहिजे. त्याना बाहेरील देशांमधून मिळणारी कोट्यावधी डॉलर्सची आर्थिक मदत एकतर पूर्णपणे बंद करावी वा त्याची देवाण सरकारच्या द्वारे व्हावी व त्याच्या व्ययाचा पूर्णपणे पारदर्शी हिशोब सरकारने घ्यावा.

जबरदस्तीने वा लालूच दाखवून केलेल्या मतांतरणाला केंद्र सरकारने बंदी घालणेच योग्य्. सेवेचा उपयोग जरी मतांतरणाला केला गेला तरी त्यावर कठोर कारवाई करण्याची कायद्यात तजवीज असावी.

अशा प्रकारचा कायदा 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट' या नावाने अमेरिकेत देखील १७८६ मध्ये बनविण्यात आला होता. जर इजिप्त, सौदी अरेबिया व अनेक राष्ट्रे इस्लाममधून अन्य उपासनांमध्ये होणार्‍या मतांतरणाला पूर्णपणे बंदी घालतात, तर त्या देशांतुन भारतात मतांतरणासाठी येणारा पैसा आपण का म्हणुन चालू द्यावा? दुर्दैवाने नागालैंड्, मिझोराम व मेघालयांसारख्या 'ख्रिश्चन बहुसंख्य राज्यांमध्ये' ईस्कॉन सारख्या धार्मिक हिंदू संस्थांना बंदी घालण्यात आलेली आहे. हे जर या 'धर्मनिरपेक्ष' देशात चालू शकते तर बहूसंख्य हिंदू असलेल्या राज्यांमध्ये ख्रिश्चन संस्थांवर बंदी कां घालता येऊ नये? तेंव्हा केंन्द्र सरकारने अशा प्रकारच्या विषमतेच्या दुहेरी नीतीची धूळफेक बंद करावी आणि अल्पसंख्य म्हणून कोणाचेही चोचले न पुरवता सर्वांसाठी समान कायदा लागू करावा.

पूर्वांचलातील फुटीरतेचे बीज ब्रिटिशांच्या काळातच रोवले गेले . आज ज्या फुटीरतेने उग्र स्वरुप धारण केले आहे त्याची पाळेमुळे अत्यंत खोलवर पसरलेली आहेत. या समस्यांवर उपाय शोधणे म्हणजेच त्यांना मुळापासून उखडून टाकले पाहिजे. आजच्या परिस्थितीत ते अवघड वाटत असले तरी अशक्य मात्र निश्चितच नाही. अर्थातच हे उपाय व्हावेत ही प्रामाणिक इच्छा राजकिय पुढारी तसेच उर्वरित भारतातील समाज या दोहोंमध्ये निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. उर्वरित भारतातील लोकांनी एकत्रितपणे मदतीचा हात जर पुढे केला तर मनाने विशाल असलेले पूर्वांचलातील बांधव निश्चितच त्याला प्रतिसाद देतील. सर्वांनी मिळून एकत्रितपणे सतत १० वर्षे जर कठोर परिश्रम केले तर पूर्वांचल इतर् राज्यांप्रमाणेच शांत झालेला दिसेल. स्वर्गाहून सुंदर अशा पूर्वांचलाला शांत्, विकसित व आनंदी स्थितीत पाहणे हे आजचे स्वप्न व उद्याचे वास्तव असले पाहिजे.

अमेरिकेतील 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट'संबंधी: गैरसमज की दिशाभूल?

जबरदस्तीने वा लालूच दाखवून केलेल्या मतांतरणाला केंद्र सरकारने बंदी घालणेच योग्य्. सेवेचा उपयोग जरी मतांतरणाला केला गेला तरी त्यावर कठोर कारवाई करण्याची कायद्यात तजवीज असावी.

अशा प्रकारचा कायदा 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट' या नावाने अमेरिकेत देखील १७८६ मध्ये बनविण्यात आला होता.

वरील अधोरेखित विधान हे गैरसमजातून उद्भवलेले आहे की दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, हे कळावयास मार्ग नाही.

उपरोल्लेखित 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट' अथवा 'अमेरिकन इंडियन रिलीजियस फ्रीडम ऍक्ट - १९७८'बद्दल जुजबी माहिती या दुव्यावर पहावी. या कायद्याचे संपूर्ण विधान (text) या दुव्यावर पहावे.

या कायद्यान्वये केवळ अमेरिकेतील स्थानिक आदिम जमातींच्या (नेटिव अमेरिकन्स अथवा अमेरिकन इंडियन्स) पारंपरिक धार्मिक श्रद्धा आणि चालीरीती पाळण्याच्या मूलभूत अधिकाराचे जतन केले गेले आहे. नेटिव अमेरिकनांना त्यांच्या पारंपरिक धार्मिक श्रद्धा आणि चालीरीती पाळण्यास कायद्याची आडकाठी येऊ नये (जी आडकाठी हा कायदा संमत होण्यापूर्वी विविध कायद्यांद्वारे येत असे), तसेच त्यांच्या धार्मिक स्थळांवर सरकारकडून कायद्याच्या आधारे (जसे, सार्वजनिक बांधकामांसाठी वगैरे) अतिक्रमण होऊ नये, एवढीच या कायद्याची (मर्यादित) कार्यकक्षा आहे.

अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीच्या अन्वये प्रत्येक व्यक्तीस हवा तो धर्म पाळण्याचे (किंवा कोणताही धर्म न पाळण्याचे) स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य अमेरिकन घटनेनुसार व्यक्तीच्या मूलभूत हक्कांपैकी मानले जाते. मात्र नेटिव अमेरिकनांच्या धार्मिक श्रद्धा आणि चालीरीती यांना 'धर्म' म्हणून उर्वरित समाजाने न पाहिल्यामुळे अशा चालीरीतींवर अनेकदा (गैरसमजाने आणि अन्यायाने) कायद्याने बंदी आणली गेली. तसेच अनेकदा त्यांची धार्मिक स्थळे आणि मृतदेह पुरण्याच्या पारंपरिक जागा वगैरे ही 'सार्वजनिक जमिनी' या सदराखाली मोडल्या जाणार्‍या जमिनींमध्ये गेल्याने, अशा जमिनींच्या सरकारकडून सार्वजनिक कामांसाठी वापरामुळे (जसे, हमरस्ते, शाळा किंवा राष्ट्रीय उद्याने बांधण्यासाठी) नेटिव अमेरिकनांना त्यांच्या धार्मिक स्थळांपासून वंचित व्हावे लागले. किंवा अनेकदा एखादा कायदा करताना, नेटिव अमेरिकनांच्या धार्मिक श्रद्धांबद्दल आणि चालीरीतींबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे अशा कायद्यांचा नेटिव अमेरिकनांच्या धर्मस्वातंत्र्यावर होणार्‍या परिणामांचा फारसा विचार केला गेला नाही. या सर्व बाबींच्या निवारणाकरिता 'अमेरिकन इंडियन रिलीजियस फ्रीडम ऍक्ट' बनवला आणि अमलात आणला गेला.

थोडक्यात, या कायद्यान्वये नेटिव अमेरिकनांच्या आपल्या धर्माच्या चालीरीती पाळण्याच्या अधिकारात सरकारकडून कोणतीही ढवळाढवळ होणार नाही याची खात्री करणे, एवढेच या कायद्याचे मर्यादित उद्दिष्ट आहे. खाजगी संस्थांनी केलेली धर्मांतरे या कायद्याच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहेत; किंबहुना खाजगी धर्मांतरांचा या कायद्याशी काहीही - दूरान्वयानेसुद्धा - संबंध नाही.

किंबहुना, कोणत्याही प्रकारच्या धर्मांतरांना बंदी आणणारा कोणताही कायदा करणे हे अमेरिकन घटनेच्या तरतुदींचा सरळसरळ भंग करणारे असल्यामुळे, धर्मांतरांवर बंदी घालणारा कायदा बनवणे हे अमेरिकन घटनेनुसार अशक्य आहे. (किंवा, असा कायदा यदाकदाचित बनवला गेल्यास, त्याविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागणे - आणि न्यायालयाने तो 'घटनाविरोधी' म्हणून रद्दबातल ठरवणे - शक्य आहे.) आधी म्हटल्याप्रमाणे, अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीच्या अन्वये प्रत्येक व्यक्तीस हवा तो धर्म पाळण्याचे (किंवा कोणताही धर्म न पाळण्याचे) स्वातंत्र्य आहे. नव्हे, तो मूलभूत हक्क आहे. (धर्म - किंवा धर्महीनता अथवा नास्तिकवाद - पाळण्याबरोबरच धर्माचा - किंवा धर्महीनतेचा अथवा नास्तिकवादाचा - पुरस्कार अथवा प्रसार करणेही या मूलभूत अधिकारात अंतर्भूत आहे.) घटनेप्रमाणे अमेरिकन सरकार हे कोणत्याही धर्माची (किंवा धर्महीनतेची अथवा नास्तिकवादाची) अधिकृत धर्म म्हणून प्रतिष्ठापना करू शकत नाही, कोणत्याही धर्मास (किंवा धर्महीनतेस अथवा नास्तिकवादास) प्राधान्य देऊ शकत नाही आणि कोणत्याही धर्माचा (किंवा धर्महीनतेचा अथवा नास्तिकवादाचा) प्रसार अथवा पुरस्कार करू शकत नाही. मात्र खाजगी व्यक्तींना आणि खाजगी संस्थांना हवा तो धर्म (किंवा धर्महीनता अथवा नास्तिकवाद) पाळण्याचे आणि हव्या त्या धर्माचा (किंवा धर्महीनतेचा अथवा नास्तिकवादाचा) पुरस्कार आणि प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, आणि त्यावर कायद्याने बंदी आणणे हे घटनेच्या मूलतत्त्वांविरुद्ध आहे. धर्मांतर हा धर्मांतर करणारी संस्था आणि ज्या व्यक्तीचे धर्मांतर करावयाचे ती व्यक्ती यांमधील संपूर्णपणे खाजगी मामला आहे. धर्मांतर करणार्‍या संस्थेस आपल्या धर्माच्या प्रसारासाठी असे धर्मांतर करण्याचे आणि ज्या व्यक्तीचे धर्मांतर करायचे त्या व्यक्तीस असे धर्मांतर स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे अमेरिकन घटनेनुसार संपूर्ण स्वातंत्र्य आहे, आणि 'अमेरिकन इंडियन रिलीजियस फ्रीडम ऍक्ट - १९७८' या किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये अमेरिकेत कोणाच्याही कोठल्याही प्रकारे धर्मांतरांवर बंदी आणली गेलेली नाही, हे कृपया स्पष्ट व्हावे.

त्यामुळे अशा प्रकारचा कायदा जर भारतात केला आणि राबवला गेला, तर त्यातून कोणत्याही प्रकारच्या ख्रिस्ती धर्मप्रसारावर कोणत्याही प्रकारे बंदी आणता येणार नाही. मात्र त्याचबरोबर, अशी बंदी इतर धर्मांच्या प्रसारावर घातली गेल्यास अशी बंदीही अवैध ठरेल, इतकेच.

 
^ वर