गमभन फायरफॉक्स एक्स्टेंशन

नुकत्याच ओंकार जोशी यांच्याकडून हाती आलेल्या बातमीनुसार गमभन या लोकप्रिय टंकलेखन प्रणालीसाठीचे फायरफॉक्स एक्स्टेंशन आता उपलब्ध आहे.

दुवाः http://www.gamabhana.com/?q=node/32

फायदेः

फायरफॉक्स वापरकर्त्यांना गमभनचे फायरफॉक्स एक्टेंशन वापरुन विंडोज-उबुंटू-मॅकवर कुठेही गमभनची कळयोजना वापरुन मराठी टंकलेखन करणे सहजशक्य होईल. उदा. उपक्रमावर मराठीसाठी गमभन आणि जीमेल-जीटॉक मध्ये मराठीसाठी बरहा अशी कसरत करण्याची गरज नाही. जीमेल, ब्लॉग, गूगल सर्चसह जिथेजिथे टेक्स्ट खिडकी असेल तिथे गमभनची कळयोजना काम करेल.

नव्या वापरकर्त्यांना हे एक्स्टेंशन वापरण्यात काही अडचण आली तर त्याला आपण सर्व जण मदत करुया.

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा!

अरे वा! मस्तच!
कर्णाचे बातमी बद्दलआभार
आणि ओंकार यांचे अभिनंदन! :)

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

टंकलेखन प्रणालीतच शुद्धलेखन चिकित्सा

टंकलेखन प्रणालीतच शुद्धलेखन चिकित्सादेखील अंतर्भूत करता आली तर ती खूपच उपयोगी गोष्ट ठरेल. उदाहरण द्यायचे तर अंकुर बांग्ला या समूहाने तयार केलेले बांग्ला भाषेसाठीचे शुद्धलेखन एक्स्टेंशन येथे उपलब्ध आहे.

http://www.ankur.org.bd/downloads/spell_check/mozilla/bn-BD_dictionary_0...

प्रताधिकार संकेतांचा भंग होत नसेल तर हे एक्स्टेंशन यात मिळवून गमभन (प्रो) बनवता येईल का? सध्याचे एक्स्टेंशन गमभन (लाईट) म्हणून प्रकाशित करता येईल.
शब्दसंपदा समूह मराठीसाठी काम करीत आहे. हिंदीतही अशी वर्ड लिस्ट उपलब्ध आहेच. असे केले तर भविष्यात सर्व भारतीय भाषांत शुद्धलेखन चिकित्सेसह टंकलेखनासाठी एकच एक्स्टिंशन वापरता येईल.

सूचना चांगली आहे.

सूचना फार चांगली आहे. गमभनच्या तांत्रिक भागाचे मला पुरेसे ज्ञान नाही. ओंकार याबाबत योग्य ते मत व्यक्त करु शकेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कसरत?

उपक्रमावर मराठीसाठी गमभन आणि जीमेल-जीटॉक मध्ये मराठीसाठी बरहा अशी कसरत करण्याची गरज नाही.
अशी कसरत करावीच लागत नाही. उपक्रमावर एकदा गमभन वापरून दाखल झालो की लिखाणाचा इंग्रजी हा पर्याय निवडायचा. नंतर आपण बरहातून लिहायला मोकळे होतो. बरहात लिपीबदल करण्यासाठी तळाला आयकॉन असतो. त्यासाठी पानाच्या वरच्या भागात यावे लागत नाही. गमभनमध्ये अकारान्‍त शब्दातले शेवटचे अक्षर पूर्ण करायला 'अ' दाबावा लागतो, त्यामुळे करंगळी दुखायला लागते. हा त्रास बरहात नाही.--वाचक्‍नवी

बरहा

मुळात बरहा वापरणे हीच एक कसरत आहे. अक्षरांवरील चंद्र, र्‍य , क्ष, ज्ञ ही अक्षरे बरहात टंकायला प्रचंड त्रास होतो. त्यामानाने गमभन बरेच युजर फ्रेंडली वाटते.

होय

बरहा आणि गमभन यामध्ये मूलभूत फरक हाच आहे की बरहा हे अमराठी भाषकाने बनवलेले असल्याने त्याला या अक्षरांना सोयीच्या बटणांवर आणणे महत्त्वाचे वाटले नसावे जे गमभनमध्ये झाले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मूलभूत फरक

>> बरहा आणि गमभन यामध्ये मूलभूत फरक हाच आहे की...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी खाली दिलेल्या प्रतिसादातील हे दोन बरहा मधून लिहिलेले शब्द पाहा...
"स्लॆश फायरफॊक्स " हे शब्द वास्तविक "स्लेश फायरफोक्स" असे लिहायला हवे होते कारण बिरुटेसाहेबांनी वापरलेले ॆ व ॊ हे पंजाबी भाषेतले एकार आहेत. मराठी देवनागरी युनिकोडसाठी े व ो वापरायला हवे होते. दोन्हीची युनिकोड ओळख खाली दिलेल्यासारखी वेगवेगळी आहे.

मराठी
http://tinyurl.com/lrtgq3

पंजाबी
http://tinyurl.com/nzfu3y

बरहा हे खर्‍या अर्थाने बहुभाषिक (मल्टी लिंग्वल) सॉफ्टवेअर असल्यामुळे असा लिपीसंकर खूप मोठ्या प्रमाणात होऊ देतो. त्याचा तोटा म्हणजे जेव्हा शोध यंत्रांना भाषा ओळखण्यास शिकवायची वेळ येईल तेंव्हा हे काम देवनागरीसाठी खूप कठीण होऊन बसेल. दुसरे म्हणजे गुगलमध्ये अपेक्षित पाने मिळणार नाहीत.

वरील मजकुराचे स्पेल चेक करताना "स्लॆश" हा शब्द "इग्नोर ऑल" केला पण पुन्हा स्लेश हा शब्द देखील "इग्नोर" करावा लागला. हे सर्व लहान लहान व गौण मुद्दे आहेत खरे पण भविष्यात ते मोठे मोठे मुद्दे बनू शकतात.

पंजाबी ओकार?

शंतनु म्हणतात ते ऒकार पंजाबी आहेत की नाही ते माहीत नाही, पण कन्नड, तेलुगू, मलयालम्‌ आणि तमिळ या चारही भाषात र्‍हस्व ए आणि र्‍हस्व ऒ आहेत. ते देवनागरीत लिहिताना उलट्या मात्रेने दाखवले जातात. मलयालममध्ये तर अति र्‍हस्व 'उ' आहे. (तो उ वर चन्द्रकोर काढून लिहितात.) र्‍हस्व एकार वापरलेला स्लॆश आणि र्‍हस्व ऒकार वापरलेला फ़ॊक्स असे लिखाण बरहात करता येते, ते 'गमभन'त येत नाही. बरहात स्लॅश आणि फ़ॉक्सही लिहिता येते. गमभनमध्ये नुक्तावाल्या अक्षरांची बाराखडी टंकता येत नाही, अशी माझी कल्पना आहे. तसेच नैर्‌ऋत्य हा शब्द ऋवर रफार देऊन उमटवता येत नाही. 'अ'ची बाराखडीसुद्धा येत नसावी. बरहातले फायदे वेगळे आणि गमभन मधले वेगळे.--वाचक्‍नवी

अडचण

फायरफॉक्समधे गमभनचे एक्टेंशन टाकून पाहिले पण काही जमेना असे वाटत आहे.
आपण दिलेल्या दुव्यात क्रमांक सहा वर जशी नवीन खिडकीत गमभन उघडलेले दिसते, तसे इथे काही होत नाही असे वाटते ?

टूल्स मधे Attach gamabhana वर क्लीक करुन पाहिले काहीच हालचाल नाही. :(

-दिलीप बिरुटे

चाचणीसाठी

Attach Gamabhana केल्यानंतर चाचणी म्हणून फायरफॉक्सच्या खिडकीत खालच्या पट्टीवर गमभन ही अक्षरे दिसतात का हे पाहा. त्या अक्षरांवर टिचकी मारुन वरील गमभन हा मेनू दिसतो का तेही पाहा.

नंतर गूगल डॉट कॉम सुरू करा व शोधण्याच्या खिडकीत कर्सर नेऊन Ctrl + \ दाबून अक्षरे टाईप करुन भाषाबदल होतो का ते पाहा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

या सोबत

या सोबत कंट्रोल+एम करुन सुद्धा पहा.
मला हि सोय खुप आवडली. खरतर वाटच पहात होतो. ॐकार चे अभिनंदन.


वापरुन पाहिले का?

वापरुन पाहिले का? कसा अनुभव आहे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद!

आजानुकर्ण,
माहितीबद्दल धन्यवाद! उपयुक्त एक्स्टेन्शन आहे.
एक निरीक्षण - ctrl + \ करून भाषा बदलल्यावर उपक्रमावर (किंवा गमभन वापरणार्‍या इतर कोणत्याही संकेतस्थळावर) टाईप करायचा प्रयत्न केल्यास एकदा टाईप केलेले अक्षर २ वेळा छापले जात आहे. (म्हणजे a दाबल्यास अअ असे दिसते)
बाकी कोणाला असा अनुभव आहे का?

अमित

तसे होणारच

उपक्रमवर आधीच गमभन लावलेले आहे त्यामुळे तुम्ही कीबोर्डचे कोणतेही बटण दाबले की फायरफॉक्सचे प्लगिन व उपक्रमावरील गमभन दोघेही ते अक्षर छापतात. त्यामुळे असे होत आहे. लिहिण्याची पद्धत इंग्रजी निवडल्यास तसे होणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वापरतो आहे

हो, वापरतो आहे. मला गमभनची सवय असल्याने मला आवडते/आवडले. तसेच उपक्रमावर जुने गमभन आहे त्यामुळे अ चा वापर जास्त करावा लागतो. पण हे एक्स्टेंशन मला चांगले वाटते. खास करुन जीमेल मध्ये चॅट करताना जास्त आनंद होतो. काही सुचवण्या आहेत.

१. या एक्स्टेंशन च्या पर्यायामध्येच फक्त गमभन टंकलेखन प्रणाली सुरु करण्यासाठी पर्याय हवा. म्हणजे संकेतस्थळांवर एक्स्टेंशन वापरा. आपले वेगळे लेखन करायचे असल्यास एक कळ दाबून नवा टॅब सुरु होऊन त्यात गमभन वेगळे सुरु होईल. जेणे करुन फक्त लेखन करणे सुद्धा शक्य होईल.
२. शक्य असल्यास तात्पुरते सेव्ह करण्याची सोय. अर्थात यासाठी काय करायचे ते ॐकारच ठरवू शकेल. पण असे काही करता आल्यास गमभन वापरुन कुठे ही टंकताना लेखन वाचवण्याची सोय होउन जाईल.
३. असे काही ऍडऑन इतर न्याहळकांसाठी करता येईल का?

गमभन/बरहा या पैकी काय हि प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे. पण बरहा पेक्षा गमभन ने मला वेगळे सॉफ्टवेअर टाकावे लागत नाही. तसेच गमभन संगणकाचे इतर कोणतेच स्त्रोत फारसे वापरत नसावे असे वाटत असल्याने माझा संगणक जास्त चांगला चालू शकतो. (थेंबे थेंबे रॅम वाचे :) ).


करेक्ट...

>>आपले वेगळे लेखन करायचे असल्यास एक कळ दाबून नवा टॅब सुरु होऊन त्यात गमभन वेगळे सुरु होईल. जेणे करुन फक्त लेखन करणे सुद्धा शक्य होईल.

अगदी अशीच अपेक्षा मला गमभनच्या एक्टेंशन जोडतांना होती.
असो, चालायचेच नाही का ?

>>गमभन/बरहा या पैकी काय हि प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे.
सोयीचे जे असेल ते सर्वांना आवडते असे वाटते.

-दिलीप बिरुटे

विंडोज

विंडोजमध्ये बर्‍याच गोष्टी गैरसोयीच्या आहेत. पण ते आवडवुन घेण्याशिवाय पर्याय नसतो.


चालू द्या !

>>विंडोजमध्ये बर्‍याच गोष्टी गैरसोयीच्या आहेत. पण ते आवडवुन घेण्याशिवाय पर्याय नसतो.
गमभनचे एक्स्टेंशन उपयोगाचे नाही() असे माझे वयक्तीक मत आहे.
तुम्हाला आवडते तर तुम्ही वापरा, इतके कशाला मनाला लावून घेता.

-दिलीप बिरुटे

अडचण काय आहे?

या चर्चाप्रस्तावाचा उपयोग कदाचित ओंकार यांना पुढील आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी होईल.

बिरुटे सरांना हे प्लगिन वापरणे गैरसोयीचे का वाटते याची कारणे कळाली तर नेमक्या सुधारणा करणे शक्य होईल.

बरहाचे काय फायदे आहेत जे या प्लगिनमध्ये नाहीत? या प्लगिनमधल्या कोणत्या गोष्टी युजर फ्रेंडली वाटत नाहीत? या व अशा इतर प्रश्नांची उत्तरे कळाली तर ओंकारला ते कळवता येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मनाला लागते

गमभन मनाला लागते, बरहा लागत नाही. :)


गैरसोयीचे का वाटते !

१) गमभन स्थापित केल्यानंतर भाषा निवड करुन कंट्रोल एम ची कळ दाबूनही मराठीच टंकतोय याची कोणतीही खूण गमभन वर किंवा न्याहळकावर दिसत नाही.
२)गमभन एक्स्टेंशन ऒफलाइन मराठी टंकन्याची सुविधा देत नाही.
३) न्याहळकाच्या तळाशी 'बरहा' वापरणा-याला कोणती भाषा वापरतोय ते दिसत असते. त्याचबरोबर एफ ११/ एफ १२ ची कळ दाबून भाषेचे पर्याय सहजपणे निवडता येतात. गमभन च्या तळाशी गमभन वर क्लीक करा, पर्यायाची निवड करा, मग भाषा निवडा. आणि योग्य भाषेची निवड केली आहे की नाही ते पाहण्यासाठी थेट उपयोग करण्याआधी त्याच्या खात्रीबाबत चाचपणी करा. कंट्रोल एम /कंट्रोल स्लॆश, भाषा बदलण्यासाठी दोन वेगवेगळ्या कळांचा वापर करणे वेळखावू वाटते. एकाच कळेवर हे करता आले पाहिजे.
४)गमभनचे एक्स्टेंशन उपयोग फक्त मोझीला फायरफॊक्स न्याहळक वापरणा-यालाच करता येतो. आइ. वापरण्याला त्याचा उपयोग नाही. बरहा कोणत्याही न्याहळकाला चालते.

अवांतर : ओंकारला, जर काही योग्य-अयोग्य सुचना पाठवाल तेव्हा, त्याची एक प्रत मला माहीतीस्तव नक्की पाठवा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही

सर,
काही गोष्टी अगदी अचूक आहेत!

१) गमभन स्थापित केल्यानंतर भाषा निवड करुन कंट्रोल एम ची कळ दाबूनही मराठीच टंकतोय याची कोणतीही खूण गमभन वर किंवा न्याहळकावर दिसत नाही.

सहमत आहे!
(परंतु ही पहिलीच आवृत्ती आहे यानंतर सुधारणा होत राहतील असे वाटते.)

४)गमभनचे एक्स्टेंशन उपयोग फक्त मोझीला फायरफॊक्स न्याहळक वापरणा-यालाच करता येतो. आइ. वापरण्याला त्याचा उपयोग नाही. बरहा कोणत्याही न्याहळकाला चालते.

हा मुद्दाही योग्य आहे. सगळेच काही कोल्हा प्रेमी नसतील.
मुख्यतः आय ई वर ते येणे महत्त्वाचे ठरावे.

आपला
सरांशी सहमत!
गुंडोपंत

अडचणींबाबत

१) गमभन स्थापित केल्यानंतर भाषा निवड करुन कंट्रोल एम ची कळ दाबूनही मराठीच टंकतोय याची कोणतीही खूण गमभन वर किंवा न्याहळकावर दिसत नाही.

ओंकारला मीदेखील पहिलीच सूचना ही केली होती. :) कोणती भाषा टंकतोय हे दिसले की महत्त्वाचा प्रश्न सुटेल.

२)गमभन एक्स्टेंशन ऒफलाइन मराठी टंकन्याची सुविधा देत नाही.

ही सूचना मला वाटते चुकीची आहे. हे प्लगिन ब्राऊजरचे एक्स्टेंशन आहे आणि ब्राऊजरचा उपयोग ऑनलाईन असतानाच होतो. हे असले तरी, ब्राऊजर चालू केल्यावर ऑफलाईन मोडमध्येही तुम्हाला मराठी टंकता येईल. प्लगिनचा तुमच्या ऑनलाईन ऑफलाईन असण्याशी काही संबंध नाही. पण ऑफलाईन मोडमध्ये तुम्ही ब्राऊजर सुरु केल्यानंतर टाईप करण्यासाठी टेक्स्टबॉक्स कोठून आणणार?

३) न्याहळकाच्या तळाशी 'बरहा' वापरणा-याला कोणती भाषा वापरतोय ते दिसत असते. त्याचबरोबर एफ ११/ एफ १२ ची कळ दाबून भाषेचे पर्याय सहजपणे निवडता येतात. गमभन च्या तळाशी गमभन वर क्लीक करा, पर्यायाची निवड करा, मग भाषा निवडा. आणि योग्य भाषेची निवड केली आहे की नाही ते पाहण्यासाठी थेट उपयोग करण्याआधी त्याच्या खात्रीबाबत चाचपणी करा. कंट्रोल एम /कंट्रोल स्लॆश, भाषा बदलण्यासाठी दोन वेगवेगळ्या कळांचा वापर करणे वेळखावू वाटते. एकाच कळेवर हे करता आले पाहिजे.

कंट्रोल एमचा उपयोग हे एक्स्टेंशन activate/deactivate करण्यासाठी होतो. खरे तर अनेक प्लगिनमध्ये ही सोय दिली जात नाही. ओंकारने ही का दिली आहे हे कळले नाही. एकदा प्लगिन टाकले की ते आपोआपच activate होते. जर तुम्हाला ते नको असेल तर add on मेनू मधून त्याला डिसेबल करावे लागते. जर ही activate/deactivate ची सोय द्यायचीच असेल तर गमभन active आहे की inactive हे दर्शवण्यासाठी गमभनच्या आयकॉनचा रंग बदलावा. (यालाच मदतीसाठी बोट दिले की हात मागायचा असे म्हणतात :) )

भाषा बदलासाठी कंट्रोल स्लॅश हेच पुरेसे आहे. एकदा कंट्रोल एम करुन प्लगिन activate केल्यावर कंट्रोल स्लॅशने भाषा बदलता याव्यात. पहिल्या सूचनेच्या अंमलबजावणीनंतर ही अडचण दूर व्हावी. (अर्थात कंट्रोल स्लॅशपेक्षा इंडिक इनपुट प्लगिनचे कंट्रोल स्पेस अधिक सोयीचे वाटते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. )

४)गमभनचे एक्स्टेंशन उपयोग फक्त मोझीला फायरफॊक्स न्याहळक वापरणा-यालाच करता येतो. आइ. वापरण्याला त्याचा उपयोग नाही. बरहा कोणत्याही न्याहळकाला चालते.

आयईमध्ये एक्स्टेंशनची पद्धत नाही. तुम्हाला फायरफॉक्स असताना आयई वापरायची गरजच काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आयई वापरायची गरज

मी नेहमीच फायरफॉक्स वापरतो. पण काही वेळा आयई वापरावेच लागते असे दिसते.

मुंबईतील ११ वी चे प्रवेश यंदा ऑनलाईन होणार आहेत.
त्या संकेतस्थळावर जाण्यासाठी आयई लागते. फायरफॉक्स मधून मी तीथे जाऊ शकलो नाही.

http://fyjc.org.in/mumbai

गमभन स्क्रिप्ट आणि एक्सटेन्शन

कर्णराव,
तुम्ही जर "फीडबॅक" देणारच असाल तर आमची सूचनाही देऊन पहाल का? म्हणजे ज्या वेब-पेजवर गमभन स्क्रिप्ट आणि एक्सटेन्शन दोन्ही उपलब्ध असतील तिथे अक्षरे दोनदा उमटणे टाळता आले तर बरे होईल.

अमित

मला वाटते हे करता येणे शक्य असावे.

दुसरे म्हणजे उपक्रमवाल्यांनी मराठीब्लॉग्ज साईटच्या धर्तीवर हा रोमन/इंग्रजी लिपीबदल नेहमी पानावर दिसेल अशा पद्धतीने हलवत ठेवावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:) असेच म्हणतो...

:) असेच म्हणतो...
तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही वापरु नका, इतके कशाला मनाला लावून घेता. :) (पण तुम्हालाही वापरावे लागत आहे. या स्थळांवर नाही का? )


गमभन आणि बराहा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या संदर्भात मी प्रा. दिलीपे बिरुटे यांच्याशी सहमत आहे. त्यांच्या शब्दांत किंचित् बदल करून मी म्हणतो:
...गमभनचे एक्स्टेंशन मला उपयोगाचे नाही: (च) असे माझे मत आहे.
* उपक्रमावर मी इथले गमभनच वापरतो.मात्र जिथे देवनागरी टंकाची सोय नसते तिथे ,तसेच ई-मेल लिहिताना बराहा वापरतो. या दोन प्रणालींत ९५%< साम्यच आहे. थोडे काही भेद आहेत.बराहा वापरून कोणतेही देवनागरी अक्षर लिहिणे अवघड नाही.अर्धचंद्रही सहज काढता येतो." action" शब्दाचे पहिले अक्षर जसे आपण हाताने लिहितो तसे कुठल्याही उच्चारानुवर्ती लेखनप्रणालीत संगणकावर लिहिता येत नसावे असे मला वाटते. ’क्ष' हे अक्षर गमभत लिहिणे सोपे आहे हे खरे.बराहात ^ या कळीने दोन व्यंजने जोडता येतात. जसे dar^ya=दर्‍या,t^ta=त्‍न...j~ja=ज्ञ

गमभन/बरहा!

मी गमभन आणि बरहा दोन्हीही वापरतो.
गमभनमध्ये लिहीणे जास्त सोपे आहे मात्र त्यात काही अडचणीही आहेत. लिहीतांना एखादी चूक झाल्यास ती पुसण्यासाठी बॅकस्पेस दाबले तर भलतीच अक्षरे उमटतात. एक अक्षर मिटवताना दोनतीन वेळा बॅकस्पेस दाबावे लागते.
प्रत्येक अक्षरानंतर अ दाबावा लागतो...हेही टाळता येणार नाही काय?
आयईमध्ये लिहीण्यासाठी गमभनमध्ये काय सोय आहे...म्हणजे जसे अग्निकोल्ह्यासाठी शेपूट जोडलंय तसे आयईला नाही का जोडता येणार?

ह्या काही अडचणींमुळे मी बरहा वापरतो. ह्यात काही अक्षरे लिहीतांना थोडी कसरत जरूर करावी लागते तरीही सद्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही देवनागरी लेखन प्रणालीच्या तुलनेत ते वापरकर्त्यांसाठी जास्त सोयिस्कर आहे असे वाटते(हे माझे वैयक्तिक मत आहे).
गमभन मधील काही त्रुटी दूर केल्या जाऊन ते बरहासदृश सोयिस्कर झाले तर मी नक्कीच बरहाऐवजी गमभनचा सर्रास वापर करेन. पण त्यासाठी काही गोष्टी गमभनमध्ये अंतर्भूत व्हायला हव्यात......१) आयई अथवा इतर कोणत्याही न्याहाळकामध्ये सहज टंकलेखन करता येणे. २) बरहा पॅडसारखेच गमभन पॅड बनवल्यास ऑफ-लाईन टंकलेखन करता येणे आणि लेखन साठवता येणे. ३) कोणत्याही प्रकारच्या संवादकात(मेसेंजर) थेट तिथेच लिहीता येणे...इत्यादि सुधारणा केल्यास मला वाटते गमभन हे बरहापेक्षा नक्कीच सरस होईल.
बरहा पॅड=गमभन पॅड
बरहा डायरेक्ट किंवा बरहा आयएमई= गमभन डायरेक्ट-आयएमई असे काही बनवता येणार नाही काय की ज्यामुळे ते कोणत्याही न्याहाळकात सहजपणे वापरता येईल; तसेच त्यात केवळ एक कळ दाबून भाषाबदल करता यायला हवा.

अपेक्षा भरपूर आहेत पण त्या कितपत पूर्ण करण्यालायक आहेत हे मला माहीत नाही. पण त्या व्यक्त केल्याने जर संशोधनाला काही चालना मिळणार असेल तर त्या मी इथे व्यक्त केल्याने मदतच होईल असे वाटते.

ॐकार आणि त्याच्या सहकार्‍यांनी आजवर मेहनत घेऊन निर्माण केलेली 'गमभन' ही देवनागरी लेखनप्रणाली आणि त्यात ते सातत्याने करत असलेले वापरकर्त्याभिमुख संशोधन हे सर्व लक्षात घेता एक दिवस ही प्रणाली सर्वांग परिपूर्ण होईल ह्याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.

ॐकार आणि त्याच्या सहकार्‍यांचे अभिनंदन आणि भावी कार्यासाठी अनंत शुभेच्छा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मस्त

प्रतिसाद आवडला.
या चर्चेत, गमभन एकनिष्ठ आणि बरहा एकनिष्ठ असा थोडा सुर सुद्धा दिसुन आला. जो अपेक्षीत आहे. :)
बरहा आणि गमभन या दोन गोष्टींमध्ये एक मुलभुत फरक आहे की तुम्हाला गमभनचे वेगळे संस्करण करावे लागत नाही. मला वाटते की आयई मध्ये गमभनचा दुवा करता येऊ शकतो. हे फायरफॉक्सच्या एक्स्टेंशन सारखे नक्कीच नाही. पण गमभन आधी पासुनच वापरत असाल तर हे करुन पाहता येईल. बरहा असो, वा गमभन, या प्रणाल्या शुन्यातुन बनवायला खरेच खुप बौद्धीक श्रम आहेत आणि त्या बद्दल या दोन्ही प्रणालीकर्त्यांचे करावे थोडे कौतुक कमीच आहे. हा, आम्हाला गमभनचे जास्त कौतुक आहे कारण आम्ही ते बनताना पाहिले आहे, त्याचे टप्पे पाहिले आहेत आणि या चर्चे प्रमाणेच आपण अनेकांनी गमभनच्या जडणघडणीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. गमभनचे वर्डप्रेस प्लगीन सुद्धा उपलब्ध आहे आहे हे काहींना माहित असेलच.

या विषयावर चर्चा होत राहणार असेल तर दुसरा भाग सुरु करावा काय? :)


गमभन आणि बरहा - सूचनांची अंमलबजावणी

दोन सूचना प्रामुख्याने लक्षात आल्या त्या अशा
- बरहा पॅड सारखे गमभन पॅड
- आयई न्याहाळकात गमभन वापरणे

माझ्या तोकड्या माहितीनुसार ह्या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करणे शक्य आहे.
गमभन हा जावास्क्रिप्ट् मधे बनविला गेला असल्यामुळे एक जर साधे HTML पान बनवले ज्याच्यात् "गमभन" टेक्स्ट्बॉक्स जावास्क्रिप्ट् ने 'जोडलेला' असेल तर हीच 'सुविधा' वरील् दोन्ही कृती करु शकेल.
म्हणजे - HTML बनवून त्याचा 'शॉर्टकट' आयई मधे उघडेल असे बनवायचे की 'विनाजोडणी' काम करता येउ शकेल.

(जर ओंकार व्यस्त असेल तर थोड्या प्रयत्नांती मी बहुधा हे बनवू शकेन)

क्या बात है !

- बरहा पॅड सारखे गमभन पॅड
- आयई न्याहाळकात गमभन वापरणे
माझ्या तोकड्या माहितीनुसार ह्या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करणे शक्य आहे.

अरे वा ! बेष्ट लक.

-दिलीप बिरुटे

गमभन पॅड चा दुवा

वरील सूचनांप्रमाणे एक् छोटासा प्रयत्न् केला आहे.
गमभन पॅड चा दुवा
ह्या दुव्यावरुन झिप फाईल उतरवून घ्या. तुमच्या संगणकावर 'अनझिप' केल्यावर तुम्हाला 'gpad.htm नावाची फाईल आणि gamabhana_js नावाचा फोल्डर मिळेल. आता ही फाईल आयई मधे उघडल्यावर (डबल क्लिक करुन) तुमचे गमभन पॅड तयार आहे. ह्यात लिहिलेला मजकूर मग मायक्रोसॉफ्ट वर्ड मधे साठवून ठेवता येउ शकतो. मग वर्ड मधेच 'बोल्ड, फाँट बदल' असे संस्करणही करता येईल.

विशेष सूचना: ही फाईल "गमभन" च्या संकेतस्थळावर असलेल्या 'डेमो' चा आधार घेउनच बनविलेली आहे त्यामुळे संपूर्ण श्रेय 'ओंकारचेच' आहे.

दुवे बरोबर आहेत का ?

वाचक, आपण दिलेले दुवे 'मेगाशेअरवर डॉट कॉमवर' जात आहेत.
तिथे काही कळत नाही, कोणती फाईल डाऊनलोड करायची :(

-दिलीप बिरुटे

मेगा शेअर

तिथे तुम्हाला 'फ्री' अशा बटणावर क्लिक केल्यावर फाईल डाउनलोड होणे सुरु होईल.

वि. सू: ह्यासाठी लागणारा 'पासवर्ड' up असा आहे - आधी साफ् विसरून गेलो होतो पासवर्ड बद्दल - श्री शंतनू ह्यांचे अनेक आभार

ऑफलाईन टंकलेखन पर्याय

वाचक यांनी बनवलेल्या गमभन पॅड चा दुवा
छहरी हा नेपाळी तज्ज्ञांचा प्रयोग येथून उतरवून घेता येईल.

अरे वा!

गमभन पॅड बनवल्याबद्दल वाचक ह्यांना धन्यवाद.
आता गमभनचे संवादकात थेट टंकन करण्याचे साधता येईल असे काही करा ही विनंती. हे नवे तंत्र आयई,फाफॉ वगैरे सर्व न्याहाळकात तितक्याच व्यवस्थितपणे चालावे तसेच ते एक्सपी/विस्टामध्येही सहजगत्या चालावे असे काही केल्यास अधिक आनंद होईल.
तसे झाल्यास बरहाला रामराम ठोकून गमभनचा वापर निश्चितपणे वाढेल ह्याबाबत मी नि:शंक आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

छाहरी

छहरी हा नेपाळी तज्ज्ञांचा प्रयोग येथून उतरवून घेता येईल.

मी गेली ८-१० वर्षे छाहरी वापरत आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याचे फायदे १) तो १०००+ पूर्वटंकित शब्द लक्षात ठेवतो. सवयीचे झाले की पहिले अक्षर दाबले की दर्शविलेल्या शब्दांवर पटकन् माऊस तिथे नेऊन आपल्याला हव्या त्या शब्दावर टिचकी मारायची २) ध, झ इ. अक्षरे "एच" न दाबता केवळ शिफ्ट दाबून येतात. त्याने बराच वेळ व श्रम वाचतात. ३) 'a' ही कळ सतत टंकावी लागत नाही. ४) कुठेही डकविले तरी अक्षराचा आकार व रूप बदलत नाही. ५) कोणतेही अक्षर टंकताच खाली बाराखडी येते. त्यामुळे नवशिक्याला कोणते अक्षर कसे टंकायचे ते कळते. स्पेस ही कळ दाबताच कळफलकाचा नकाशा दिसतो. एकूणच छाहरी वापरायला छान आहे. गमभन वापरताना छाहरीची सुलभता अधिकच जाणवते. असो. गमभन सुद्धा निरंतर प्रगती करत आहेच. गमभन च्या पु.वा.शु.

तोटा - 'ऍ' व 'ऑ' ही अक्षरे नेपाळी भाषेत नसल्यामुळे उपलब्ध नाहीत.
--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

नुसती आवड की गरज?

>>गमभन/बरहा या पैकी काय हि प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे.<<
असे मला मुळीच वाटत नाही. जे गमभनमध्ये टंकणे शक्य नाही त्यासाठी बरहा किंवा अन्य काहीतरी वापरावेच लागते. --वाचक्‍नवी

नॉट युजर फ्रेंडली !

अशा प्रकल्पावर काम करणारे मोठ्या मेहनतीने काम करतात, त्यांच्या मेहनतीचे कौतुक नक्कीच आहे. पण, गमभनचे फायरफॉक्स एक्टेंशन पेक्षा, बरहा मला अधिक सहज सोपे वाटते.

-दिलीप बिरुटे

हम्म्म्..

चालायचेच.
प्राध्यापक शिकवतो चांगला पण माणूस म्हणून चांगला नाही. माणूस चांगला आहे बघा. पण शिकवता येत नाही. अर्थात मनुष्य आणि शिक्षक यांना माणुसकी आणि शिकवणी यासाठी जे काही करावे लागते याचे कौतुकच आहे. आम्हाला शिकताना चांगले शिकवणारा शिक्षकच जास्त आवडतो. माणूस कसा का असेना.


गमभन आणि डॉट नेट

कोणी "गमभन" डॉट नेट ह्या प्रणालीत वापरुन पाहिले आहे का ?
मी 'मराठी संकेतस्थळे' बनवण्यासाठी एका "संकेतस्थळ निर्मात्या' वर काम करतो आहे. इतर बरेच काम झाले आहे. पण सध्या मजकूरासाठी जो संपादक वापरत आहे त्यात मराठीची सोय अर्थातच नाहीये आणि "गमभन" जर जोडता आला तर सोन्याहून पिवळे.

दुसरा (कष्टाचा आणि वेळखाउ) पर्याय म्हणजे "गमभन" च्या सोर्स कोड मधे बघून डॉट नेट मधे परत 'बनविणे' - पण हा प्रथम पसंतीचा पर्याय नाही.

(पण फायरफॉक्स 'अधिक्या' करता ओंकारचे मनःपूर्वक अभिनंदन)

अवांतर

मी ह्यापूर्वी देवनागरी टंकनासाठी www.chhahari.com/unicode हे संकेतस्थळ उपयोगात आणत होते. तिथे पूर्ण अक्षरासाठी ती कळ आणि जर ते अक्षर हलन्त असेल तरच ती कळ व त्यापुढे / दाबायला लागायचा. त्यामानाने गमभन मध्ये पुष्कळ जास्त कळा टंकाव्या लागतात.

तसेच त्यांनी स्मरण सुविधा सुद्धा दिलेली होती. सर्वसाधारणतः नुकतेच टंकलेले १००० शब्द तो ब्राऊझर लक्षात ठेवीत असे आणि त्या ठिकाणी पहिले अक्षर टंकले की तो ब्राऊझर आपोआप त्या अक्षराने चालू होणारे पूर्वी टंकलेले शब्द एका खिडकीत दाखवीत असे. मग माऊस तिथे नेऊन फक्त टिचकी मारायची. ही सुविधा फारच छान होती.

आता एप्रिलपासून हे संकेतस्थळ ऑनलाईन अस्तित्वात नाही पण आजही मी ते ऑफलाईन वापरते. देवनागरी टंकलेखनासाठी ते एक आदर्श संकेतस्थळ होते.

--------------------------X--X-------------------------------
अरे मानसा मानसा, तुझी नियत बेकार |
तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर ||
मतलबासाठी मान मानुस डोलये |
इनामाच्यासाठी कुत्रा शेपुट हालये ||

मला वाटते

मला वाटते गमभनच्या प्लगिनमध्ये नवी आवृत्ती जोडलेली आहे त्यात ही हलन्ताची अडचण नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मिळेल का?

फाइल मिळेल का?

अवांतर

हो, झिप फाईल http://www.4shared.com/file/113234015/d2a72712/unicode.html इथे उपलब्ध आहे. त्यातल्या इंडेक्स.एचटीएमएल वर दोनदा टिचकी मारावी.

जाता जाता : जिथे अंतरजाल उपलब्ध झालेले नसते अश्या संगणकात एक्सपी असेल तर इनबिल्ट लॅंग्वेज सॉफ्टवेअर असते. त्यामुळे युनिकोड सहज टंकता येते.
--------------------------X--X-------------------------------
आला पह्यला पाऊस,
शिपडली भूई सारी,
धरत्रीचा परमय,
माझं मन गेलं भरी ।।

मदत

अरे मला जमतच नाही आहे. :(
वरील दुव्यावरील फाईल उतरवली ती झिप फाईल आहे.. त्यात एक्स्.पी.आय्. फाईल नाहीच आहे.. काय करायचे पुढे?

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

आभार!

आभार .. मात्र त्यातही तीच झिप फाईल डाऊनलोड होते आहे :)

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

अरेच्चा

त्या दुव्यावर 'उंदिर' नेलात तर एक्स् पी आय चाच पत्ता दिसेल - नाही दिसत का ?
(मी तुम्हाला व्य नि ने पाठवू शकतो) कळवा

 
^ वर