गांधी आणि मायावती
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कु. मायावती यांनी गांधींविरोधात काही वादग्रस्त विधाने केली आहेत. गांधी हे नाटकी होते. दलितांप्रती त्यांचे धोरण हे भोंदूपणाचे होते. मोहनदास गांधींसोबतच राहुल गांधींनाही या वादात त्यांनी ओढले आहे. (ज्याचे प्रयोजन पूर्णपणे समजले नसले तरी ते राजकीय असावे असा अंदाज कोणालाही येईल.)
काँग्रेस-भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी याचा निषेध केला असला तरी मायावतींचे हे मत मला वावगे वाटलेले नाही. किंबहुना डॉ. आंबेडकरांनीही गांधींना नेमक्या ह्याच शेलक्या विशेषणांनी गौरवलेले आहे.
गांधी आणि आंबेडकर यांमधील मतभेदांची थोडी पार्श्वभूमी अशीः १९२१ मध्ये गांधींनी नवजीवन या गुजराती नियतकालिकात हिंदूधर्मातील जातीव्यवस्थेबाबत आपले मत व्यक्त केले होते. त्यांच्या मतांचे सार साधारण याप्रमाणेः
१. हिंदू समाज इतकी वर्षे टिकून आहे याचे कारण जातीव्यवस्था हेच आहे.
२. स्वराज्याचे बीज हे जातीव्यवस्थेत सापडते. प्रत्येक जात ही सैन्यदलातील वेगळ्या तुकडीप्रमाणे असते, जिचे काम नेमून दिलेले असते. अर्थात सर्व जाती परस्परपूरक आणि संपूर्ण समाजाच्या हिताचेच काम करतात.
३. जो समाज जातीव्यवस्था निर्माण करु शकतो त्या समाजामध्ये अपूर्व संघटनशक्ती आहे हे मान्य केलेच पाहिजे.
४. जातीव्यवस्थेमुळे आपोआपच शिक्षणाची सोय होते! प्रत्येक जात आपल्या समूहातील मुलांना आवश्यक ते शिक्षण देण्याची व्यवस्था करतेच.
५. आंतरजातीविवाह आणि आंतरजातीभोजने यासारख्या निरर्थक उपायांनी जातीजातींमध्ये बंधुभाव निर्माण होणार नाही.
भोजन करणे हे एखादा मलमूत्रविसर्जनादी नैसर्गिक विधी करण्याइतके घाणेरडे काम आहे. नैसर्गिक विधी केल्याने आपल्याला थोडे हलके वाटते मात्र भोजन केल्याने जड! अनेक कुटुंबांमध्ये बायकांना नवऱ्यांसोबत भोजन करण्याची परवानगी नसते. मात्र तरीही नवराबायकोमध्ये प्रेम असतेच ना?
भारतामध्ये दोन भावांची मुलेमुली आपापसांत विवाह करत नाहीत. मात्र तरीही त्यांच्यामध्ये बंधुभाव टिकून असतोच ना? मग दोन जातींमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी विवाहाची काय गरज आहे.
६. जातीव्यवस्था हे नियंत्रणाचे प्रतीक आहे. जातीव्यवस्थेमुळे लोक आपल्या मर्यादा ओलांडत नाहीत!
७. जातीव्यवस्थेचा त्याग करणे म्हणजे हिंदूंनी आपले परंपरागत व्यवसाय सोडून देणे हे आहे. असे केल्यास समाजात अनाचार माजेल.
८. जातीव्यवस्था ही नैसर्गिक समाजव्यवस्था आहे. जी प्रत्येकच देशामध्ये असते. हिंदू धर्माने तिला धार्मिक परिमाण देऊन अधिक परिणामकारक बनवले आहे.
१९२५ मध्ये गांधींनी थोडी 'माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढता' टाईप शाब्दिक कसरत करुन 'मला येथे जातीव्यवस्था अभिप्रेत नसून वर्णव्यवस्था अभिप्रेत आहे' अशी मखलाशी केली.
जाती/वर्ण व्यवस्थेसंबंधी अशी आचरट विधाने केल्याने गांधी हे अर्थातच आंबेडकरांच्या रोषास पात्र ठरले. 'रानडे, गांधी आणि जिना' या लेखामध्ये आंबेडकरांनी रानडेंच्या सुधारणावादी पुरोगामी समाजकारणाला खीळ घालण्याचे काम गांधी आणि जीना या रानडेंनंतर आलेल्या राजकारण्यांनी कसे केले हे विस्तृतपणे विवेचन केले आहे.
यानिमित्ताने गांधींच्या दलितांप्रती असणाऱ्या धोरणांवर थोडा प्रकाश उपक्रमींनीही टाकावा असे वाटते.
जिज्ञासूंनी या दुव्यावर जाऊन आंबेडकरांचे काही लेख मुळातूनच वाचावेत
Comments
गांधी - आंबेडकर तीन मुलाखती
या नावाचे एक पुस्तक मी वाचले होते. लेखक स्वतः बाबासाहेब आंबेडकर. १९३२ च्या गोलमेज परिषदेत मध्ये ब्रिटिश पंतप्तधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी दलितांना राखीव मतदारसंघ देऊ केले. आंबेडकर अर्थातच खुष होते. पण महात्मा गांधींनी त्याला विरोध दर्शवला. कारण त्याने समाजात दुफळी माजेल. सर्व पुढार्यांचे एकमत झाल्याशिवाय योजना लागू होऊ शकत नव्हती. त्या पार्श्वभूमीवर गांधी - आंबेडकरांच्या तीन भेटी झाल्या त्याचा साद्यंत वृत्तांत या पुस्तकात दिला आहे. आंबेडकरांनी लिहिलेला हा वृत्तांत त्याच वेळी "जनता" साप्ताहिकात इंग्रजीतून प्रसिद्ध झाला होता, १९८० - ८५ च्या सुमारास त्याचा रत्नाकर गणवीर यांनी केलेला मराठी अनुवाद मी वाचला.
आंबेडकरांचे म्हणणे थोडक्यात असे:
या योजनेने दलितांना राजकीय हक्क मिळत आहेत म्हणून माझा या योजनेला पाठिंबा आहे. यामुळे समाजात दुफळी माजेल असे गांधींना वाटत असेल तर या हक्काच्या तोडीचे दुसरे काही महात्मा गांधींनी दलितांना द्यावे. उदा. कॉंग्रेसने ५% दलित उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचे आश्वासन द्यावे. गांधींनी ते दिले नाही. आंबेडकरांचे दुसरे मत असे होते की मुसलमानांना, शीखांना, ऍंग्लो- इंडियन लोकांना राखीव मतदारसंघ दिल्याने समाजात फूट पडत नाही तर मग फक्त दलितांना दिल्यानेच कशी माजते? यावर गांधींकडे उत्तर नव्हते. आंबेडकरांचा आणखी एक मुद्दा असा होता की मुसलमान, शीख, एंग्लो - इंडियन वगैरे जमाती दलितांपेक्षा राजकीय दृष्ट्या बर्याच पुढारलेल्या होत्या आणि राखीव मतदारसंघांची खरी गरज असलीच तर या सर्वांपेक्षा दलितांना जास्त होती.
त्या सर्व युक्तिवादाचे सार असे की ब्रिटिश पंतप्रधानांनी दलितांना दिलेल्या राखीव जागा मान्य नसतील तर त्याच्या तोडीचे दुसरे काही हक्क द्या मी राखीव जागांची मागणी सोडतो. महात्मा गांधीना काहीच आश्वासन द्यायचे नव्हते त्यामुळे आंबेडकर राखीव जागांचा हट्ट सोडेनात. आणखी कहर गांधींजी असे म्हणाले "आपण आपल्या जमातीचे प्रतिनिधित्व करत नाही." अर्थ - दलित असूनही दलित समाजाचे खरे प्रतिनिधी तुम्ही नाही, मीच आहे. यावर आंबेडकर भयंकर संतापले. भारतातून गांधींना हजारो तारा गेल्या "आंबेडकरच आमचे खरे प्रतिनिधी आहेत तुम्ही नाही." पुढे आंबेडकरांवर दबाव वाढवण्यासाठी म्हणून गांधींनी येरवडा तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले, सुरूवातीला आंबेडकरांची प्रतिक्रिया होती "म्हातारा मेला तरी काही बिघडत नाही."पुढे अनेकांच्या मध्यस्थीने पुणे करार झाला. पण आंबेडकरांच्या मनात गांधींबद्दल कायमची अढी बसली.
एका भाषणात ते म्हणाले होते "लोकमान्य टिळकांचे सामाजिक विचार मला मान्य नसले तरी त्यांचा देशाकरता केलेला स्वार्थत्याग, सोसलेले कष्ट, हाल अपेष्टा सर्वांबद्दल मला आदर आहे. आजकाल पराकोटीचा नीचपणा लपवण्यासाठी काही लोक राजकारणात घुसले आहेत आणि स्वतःला महात्मा म्हणवून घेत आहेत." आणखी एके ठिकाणी ते म्हणाले होते "आजकाल कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी अनेक ठिकाणी असते तसा मला महात्म्यांपासून सावध रहा अशा इशारा लोकांना द्यावासा वाटतो."
मला असे वाटते की गांधींची इतर जमातीच्या पुढार्यांचे महत्त्व अमान्य करून आपणच सर्व जमातींचे एकमेव पुढारी असल्याची भावना ही पुढे फाळणीस कारण ठरली. लोकमान्य टिळकांनी जीनांचे मुसलमानांचे पुढारी म्हणून मान्य केलेले महत्त्व गांधींनी अमान्य केले, त्यांना कॉंग्रेसमधून काढले यात फाळणीची बीजे होती. केवळ विचार मान्य नाहीत म्हणून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सुभाषचंद्र बोसांकडून राजीनामा घेणे हे काही स्पृहणीय नव्हते.
असो. या संबंधात जितके वाचले आणि लक्षात राहिले ते लिहिले आहे.
विनायक
सहमत
मी सध्या Collected works of Dr. Ambedkar हे Valerian Rodriguez यांनी संपादित केलेले पुस्तक वाचत आहे. त्यात वरील प्रसंगांचा उल्लेख आहे. वर्तमानपत्रांतून होणारा गांधी-जीना या नावांचा सहेतुक होणारा उदोउदो आणि एकंदर मीडियाला मॅनेज करण्यात गांधी-जीना कसे पटाईत होते यावरही आंबेडकरांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
दृष्टिकोन
(भूमिका: डॉ. आंबेडकरांचे लेखन वाचण्याचा योग मला आजवर आलेला नाही, आणि महात्मा गांधींचे लेखनही कधी वाचले असेलच, तर ते वाचन फारच त्रोटक आणि अनेक वर्षांपूर्वी झाल्याने बरेचसे विस्मरणात गेलेले आहे. उपरलिखित प्रतिसादात वर्णिलेल्या प्रसंगांबद्दल किंवा त्यांच्या तपशिलांबद्दल मला माहिती नाही. मात्र कोणत्याही घटनेकडे पाहण्याच्या विविध व्यक्तिगत दृष्टिकोनांमुळे एकाच घटनेतून विविध अर्थ - interpretations - विविध व्यक्तींस अभिप्रेत होऊ शकतात, या विश्वासातून, उपरलिखित प्रतिसादातील वर्णन हे संपूर्ण उपलब्ध साक्ष मानून, त्याव्यतिरिक्त या प्रत्यक्ष घटनांशी संबंधित असे त्या प्रतिसादाबाहेरचे कोणत्याही साक्षीपुरावे लक्षात न घेता, केवळ सादर केलेल्या केसच्या आधारे ज्यूरीच्या एका सदस्याच्या भूमिकेतून यातील काही घटनांतून सरकारी पक्षाच्या धारणेव्यतिरिक्त (contention) इतरही काही संभाव्य निष्कर्ष निष्पन्न होऊ शकतात का, याचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न आहे.
सादर केलेल्या पुराव्यावरून, डॉ. आंबेडकरांच्या पादत्राणांत स्वतःस उभे केले असता, त्यांची भूमिका व त्यांच्या भावना समजण्यासारख्या आहेत. मात्र महात्मा गांधींची भूमिका त्यांच्या दृष्टिकोनातून मांडणारा त्यांच्या बाजूचा कोणताही पुरावा ज्यूरीसमोर सादर केला गेलेला नाही. या कारणास्तव, कोणाचीही बाजू योग्य अथवा अयोग्य हे ठरवण्यास प्रस्तुत ज्यूरी असमर्थ असून, तसे ठरवणे हे प्रस्तुत ज्यूरीच्या कार्यकक्षेतही नाही. कोणत्याही पक्षाची बाजू न घेता, केवळ सादर केलेल्या पुराव्यावरून, कोणताही अंतिम निष्कर्ष न काढता केवळ शक्य तेथे त्यातील विविध घटनांचे अथवा विधानांचे विविध संभाव्य अर्थ - interpretations - प्रकाशात आणणे, ज्यायोगे सुजाण निष्कर्षासाठी विविध आयाम उपलब्ध व्हावेत, एवढेच या ज्यूरीपुढील उद्दिष्ट आहे.
So help me God!)
याचे दोन भाग आहेत: (१) ५% दलित उमेदवार उभे करण्याचे आश्वासन आणि (२) ५% दलित उमेदवारांस उभे केल्यावर त्यांना निवडून आणण्याचे आश्वासन.
दोन्ही भागांचे विविध अर्थ लावता येतील.
५% दलित उमेदवार उभे करण्याच्या आश्वासनाबद्दल:
(१) कदाचित दलित किंवा कोणत्याही समाजातील कोणताही उमेदवार त्यात्या समाजाचा खरा नेता म्हणून पुढे येऊन आपला प्रतिस्पर्धी म्हणून निर्माण होऊ नये अशी श्री. गांधी यांची सुप्त अथवा उघड इच्छा असावी, त्यामु़ळे तसे आश्वासन देण्याची त्यांची इच्छा नसावी.
(२) कदाचित केवळ अमूक इतके टक्के दलित उमेदवार उभे करण्यातून दलित समाज, उर्वरित समाज अथवा एकंदर संपूर्ण समाज यांपैकी कोणाचाही काहीही फायदा होणार नाही अथवा यांपैकी कोणत्याही समाजाचा कोणताही प्रश्न सुटणार नाही, असे श्री. गांधी यांना वाटत असावे, त्यामु़ळे तसे आश्वासन देणे त्यांना योग्य वाटले नसावे.
(१) कदाचित दलितांचे राजकीय हक्क दलितांना नाकारण्याची आणि आपले प्रतिस्पर्धी निर्माण न करण्याची सुप्त इच्छा श्री. गांधी यांना असल्याकारणाने, दलित उमेदवार निवडून आणणे हे श्री. गांधी यांच्या राजकीय स्वार्थाविरुद्ध असावे, आणि या कारणास्तव तसे आश्वासन देण्याची त्यांची इच्छा नसावी.
(२) कदाचित उभा राहिलेला कोणताही उमेदवार - मग तो दलित असो अथवा दलितेतर - हा एक तर निवडून येऊ शकतो किंवा पडू शकतो, याची श्री. गांधी यांना कल्पना असल्याकारणाने, ५% (अथवा अधिक) दलित (किंवा कोणतेही) उमेदवार उभे केल्यानंतर ते निवडून येतील अशा दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणे हे जरी शक्य असले, तरी कोणत्याही उमेदवारास हमखास निवडून 'आणण्या'ची हमी देण्याची इच्छा श्री. गांधी यांना नसावी, या कारणास्तव तसे आश्वासन देणे त्यांना योग्य वाटले नसावे.
दोन्ही बाबतींत श्री. गांधी यांचा यांपैकी नेमका कोणता उद्देश होता, याचा उचित निवाडा करण्यास पुरेसा असा पुरावा प्रस्तुत ज्यूरीसमोर सादर करण्यात आलेला नाही.
'मुसलमानांना, शिखांना, अँग्लोइंडियन लोकांना राखीव मतदारसंघ दिल्याने समाजात फूट पडत नाही' हे गृहीतक पुन्हा एकदा तपासून पाहणे आवश्यक आहे.
'मुसलमानांना, शिखांना, अँग्लोइंडियन लोकांना राखीव मतदारसंघ दिले गेले त्याला आक्षेप का घेतला गेला नाही' हा एक वेगळा (आणि तार्किकदृष्ट्या आणि तत्त्वतः रास्त) प्रश्न होऊ शकतो. त्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करणे हे प्रस्तुत ज्यूरीच्या कक्षेत नाही. परंतु असा अभ्यास करायचा झाल्यास, कदाचित या विविध इतर समाजांना राखीव मतदारसंघ देण्याला आक्षेप घेण्यामागील राजकीय व्यवहार्यता, आक्षेप घेण्यातील किंमत-मूल्य तुलना, आक्षेप न घेण्याने होणार्या नुकसानाचे परिमाण, भिन्न समाजांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणार्या राजकीय नेतृत्वांचे तुलनात्मक उपद्रवमूल्य आणि त्यातून विरोधाला प्रत्युत्तर म्हणून होणारे दुष्परिणाम, या आणि यासारख्या इतर व्यवहार्य घटकांचा विचार केला गेला असण्याची आणि त्यातून निर्माण होऊ शकणार्या राजकीय अपरिहार्यतेची शक्यता विचारात घेणे इष्ट ठरेल. तसेच, कदाचित या इतर समाजांना दिले गेलेले राखीव मतदारसंघ आणि दलितांना दिले गेलेले राखीव मतदारसंघ यांत 'अगोदरपासून असलेली फूट अथवा वेगळेपणाची भावना' आणि 'नव्याने पाडू घातलेली फूट अथवा वेगळेपणाची भावना' असाही भेद केला गेला असण्याची शक्यता विचारात घ्यावी लागेल.
या शक्यता विचारात घेण्याच्या अनुषंगाने कोणताही पुरावा प्रस्तुत ज्यूरीस सादर केला गेलेला नाही. तसेही हा प्रश्न प्रस्तुत ज्यूरीच्या कक्षेत नाही.
उपरोल्लेखित अथवा तत्सम घटकांचा विचार असा आक्षेप न घेण्यामागे यदाकदाचित केला गेला असल्यास, पाहणार्याच्या दृष्टिकोनाप्रमाणे असा विचार करणे हे समर्थनीय अथवा असमर्थनीय ठरू शकेल. त्याचा निवाडा करणे हेही प्रस्तुत ज्यूरीच्या कक्षेत नाही. प्रस्तुत ज्यूरीचे उद्दिष्ट हे केवळ तपासून पाहण्यायोग्य विविध शक्यता उजेडात आणणे एवढ्यापुरते मर्यादित आहे.
या विधानातूनसुद्धा विविध व्यक्तींस व्यक्तिगत दृष्टिकोनाप्रमाणे विविध प्रकारचे अर्थबोध होणे शक्य आहे. या विधानातून घेणे शक्य आहे असे काही अर्थ असे:
(१) "दलित असूनही दलित समाजाचे खरे प्रतिनिधी तुम्ही नाही, मीच आहे. किंबहुना सर्वच जमातींचा एकमेवाद्वितीय प्रतिनिधी मीच आहे."
(२) "आपण (मी काय किंवा तुम्ही काय) संपूर्ण समाजाचे घटक असून संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करतो, केवळ त्यातील एका घटकाचे नव्हे. 'फक्त दलित उमेदवारच दलितांचे प्रतिनिधित्व करू शकतो' आणि 'दलित उमेदवार फक्त दलितांचेच प्रतिनिधित्व करू शकतो' ही दोन्ही गृहीतके मान्य होण्यासारखी नाहीत." (थोडक्यात, "Think Big!")
(३) "आपण शेवटी आपल्या विचारांचे आणि धारणांचे प्रतिनिधित्व करतो, समाजाचे किंवा जमातीचे नव्हे. आपले विचार हे कधी समाजाच्या (किंवा जमातीच्या) विचारांशी मिळतेजुळते असू शकतात, तर कधी त्यांच्या विरोधातही जाऊ शकतात. फक्त आपल्या विचारांचा उपयोग आपण प्रतिनिधित्व करायचे ठरवलेल्या गटास जास्तीत जास्त कसा होऊ शकेल, हे आपण पाहत असतो, एवढेच. तो गट किती लहान (जमात) किंवा किती मोठा (व्यापक समाज) याने त्यात काहीही फरक पडत नाही." (थोडक्यात, "Think Small, so that You May Think Big.")
यांपैकी नेमका कोणता अर्थ श्री. गांधी यांना अभिप्रेत होता, याबद्दल कोणताही निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा असा कोणताही पुरावा प्रस्तुत ज्यूरीसमोर सादर केला गेलेला नाही.
परिशिष्ट:
'दलितांचे राजकीय अधिकार' या संज्ञेचीही व्याख्या निश्चित करणे या क्षणी इष्ट ठरेल. तूर्तास या संज्ञेतून पुढीलप्रमाणे अनेक अर्थ विविध व्यक्तींस अभिप्रेत होणे शक्य आहे.
(१) कोणत्याही दलित व्यक्तीस (इतर कोणत्याही सामान्य नागरिकाप्रमाणे) एक सामान्य समाजघटक म्हणून विविध पातळीवरील प्रतिनिधीमंडळांत त्याच्या सामान्य आणि (एक दलित व्यक्ती म्हणून असणार्या) विशेष समस्या समजू शकणार्या आणि त्या प्रभावीपणे मांडणार्या (कोणत्याही सामाजिक समूहात जन्माला आलेल्या परंतु स्थानिक) सामायिक राजकीय प्रतिनिधीद्वारा प्रतिनिधित्व.
(२) कोणत्याही दलित व्यक्तीचे एक वेगळा समाजघटक म्हणून राखीव मतदारसंघातून, अपरिहार्य तत्त्वावर केवळ दलित समाजातील व्यक्तीद्वारा प्रतिनिधित्व.
उत्तरे
केवळ सादर केलेल्या पुराव्यावरून,
मी दिलेला पुरावा सबंध काय अर्धा पण नाही. अर्धा पुरावा पाहिजे असल्यास त्यांचे मूळ पुस्तक वाचले पाहिजे. माझ्या हातून संक्षेपात लिहिताना काही मुद्दे गाळले जाणे, क्वचित् शब्द बदलले जाणे शक्य आहे हेही लक्षात घ्यावे. तरीपण काही स्पष्टीकरणे देतो.
(२) कदाचित केवळ अमूक इतके टक्के दलित उमेदवार उभे करण्यातून दलित समाज, उर्वरित समाज अथवा एकंदर संपूर्ण समाज यांपैकी कोणाचाही काहीही फायदा होणार नाही अथवा यांपैकी कोणत्याही समाजाचा कोणताही प्रश्न सुटणार नाही, असे श्री. गांधी यांना वाटत असावे, त्यामु़ळे तसे आश्वासन देणे त्यांना योग्य वाटले नसावे.
केवळ अमुक टक्के दलित उमेदवार उभे करण्यातून प्रश्न सुटणार नाहीत असे गांधीजींना वाटत असले तर याचे दोन अर्थ संभवतात. १. दलित उमेदवार उभे करणे ही आवश्यक असली तरी पुरेशी नाही. २. दलित उमेदवार उभे करणे हीच मुळात चुकीची गोष्ट आहे.
पहिली शक्यता धरली तर दलित उमेदवार उभे करण्याला विरोध करणे तर्काला धरून नाही. त्यापेक्षाही जास्त काही केले पाहिजे जे खरे आहे पण किमान एवढी एक गोष्ट केली पाहिजे. गांधीजींनी विरोध केला यावरून त्यांची भूमिका क्रमांक २ ची असावी. तसे असेल तर तशी का आहे याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण त्यांनी द्यायल हवे होते. ते दिलेले नाही. कदाचित पक्षातले सवर्ण लोक नाराज होतील अशी वास्तवाला धरून असणारी शक्यता असावी. किंवा आपण ज्या दोन शक्यता सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली खरी असावी.
कदाचित उभा राहिलेला कोणताही उमेदवार - मग तो दलित असो अथवा दलितेतर - हा एक तर निवडून येऊ शकतो किंवा पडू शकतो, याची श्री. गांधी यांना कल्पना असल्याकारणाने, ५% (अथवा अधिक) दलित (किंवा कोणतेही) उमेदवार उभे केल्यानंतर ते निवडून येतील अशा दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणे हे जरी शक्य असले, तरी कोणत्याही उमेदवारास हमखास निवडून 'आणण्या'ची हमी देण्याची इच्छा श्री. गांधी यांना नसावी, या कारणास्तव तसे आश्वासन देणे त्यांना योग्य वाटले नसावे.
कोणताही उमेदवार निवडून तरी येऊ शकतो किंवा पडू शकतो याची कल्पना श्री. गांधींप्रमाणेच श्रीं. आंबेडकरांनाही असावी असे समजण्यास प्रत्यवाय नसावा. तरीपण त्यांनी अशी मागणी केली याचा अर्थ दलित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन अपेक्षित असावे. निदान इतकेही आश्वासन श्री. गांधींनी का देऊ नये? अर्थात् श्री. गांधींनी आश्वासन दिले तरी सामान्य कार्यकर्ते आपली इच्छा डावलून अशा उमेदवाराला पराभूत करतील आणि मग आपली नाचक्की होईल असे वाटले असेल काय ? ( अलिकडे श्री. रामदास आठवले यांचा शिर्डी मतदारसंघातून झालेला पराभव आठवतो). अर्थात् गांधीजी म्हणजे शरद पवार किंवा अशोक चव्हाण नाहीत की ज्यांची इच्छा मोडून कार्यकर्ते दलित उमेदवाराला पराभूत करतील. त्यामुळे इथेही आपण दिलेल्यापैकी क्रमांक १ ची शक्यता जास्त वाटते.
'मुसलमानांना, शिखांना, अँग्लोइंडियन लोकांना राखीव मतदारसंघ दिले गेले त्याला आक्षेप का घेतला गेला नाही' हा एक वेगळा (आणि तार्किकदृष्ट्या आणि तत्त्वतः रास्त) प्रश्न होऊ शकतो.
असाच प्रश्न आंबेडकरांनी विचारला होता आणि त्याला गांधीजींनी काही उत्तर दिले नाही (असे अर्थात् आंबेडकर लिहितात)
>(२) "आपण (मी काय किंवा तुम्ही काय) संपूर्ण समाजाचे घटक असून संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करतो, केवळ त्यातील एका घटकाचे नव्हे. 'फक्त दलित उमेदवारच दलितांचे प्रतिनिधित्व करू शकतो' आणि 'दलित उमेदवार फक्त दलितांचेच प्रतिनिधित्व करू शकतो' ही दोन्ही गृहीतके मान्य होण्यासारखी नाहीत." (थोडक्यात, "Think Big!")
गोलमेज परिषदेला आंबेडकर हे दलित समाजाचे (त्याच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार महारांचे) अधिकृत प्रतिनिधी म्हणूनच गेले होते.
>(३) "आपण शेवटी आपल्या विचारांचे आणि धारणांचे प्रतिनिधित्व करतो, समाजाचे किंवा जमातीचे नव्हे. आपले विचार हे कधी समाजाच्या (किंवा जमातीच्या) विचारांशी मिळतेजुळते असू शकतात, तर कधी त्यांच्या विरोधातही जाऊ शकतात. फक्त आपल्या विचारांचा उपयोग आपण प्रतिनिधित्व करायचे ठरवलेल्या गटास जास्तीत जास्त कसा होऊ शकेल, हे आपण पाहत असतो, एवढेच. तो गट किती लहान (जमात) किंवा किती मोठा (व्यापक समाज) याने त्यात काहीही फरक पडत नाही." (थोडक्यात, "Think Small, so that You May Think Big.")
आंबेडकर स्वत:ला कायम "मी महारांचा प्रतिनिधी "असेच म्हणायचे.
इथेही आपण लिहिलेली क्रमांक १ ची शक्यता जास्त वाटते.
परिशिष्ट:
'दलितांचे राजकीय अधिकार' या संज्ञेचीही व्याख्या निश्चित करणे या क्षणी इष्ट ठरेल. तूर्तास या संज्ञेतून पुढीलप्रमाणे अनेक अर्थ विविध व्यक्तींस अभिप्रेत होणे शक्य आहे.
(१) कोणत्याही दलित व्यक्तीस (इतर कोणत्याही सामान्य नागरिकाप्रमाणे) एक सामान्य समाजघटक म्हणून विविध पातळीवरील प्रतिनिधीमंडळांत त्याच्या सामान्य आणि (एक दलित व्यक्ती म्हणून असणार्या) विशेष समस्या समजू शकणार्या आणि त्या प्रभावीपणे मांडणार्या (कोणत्याही सामाजिक समूहात जन्माला आलेल्या परंतु स्थानिक) सामायिक राजकीय प्रतिनिधीद्वारा प्रतिनिधित्व.
(२) कोणत्याही दलित व्यक्तीचे एक वेगळा समाजघटक म्हणून राखीव मतदारसंघातून, अपरिहार्य तत्त्वावर केवळ दलित समाजातील व्यक्तीद्वारा प्रतिनिधित्व.
दलित समाजात जन्म झालेली व्यक्ती त्या समाजाची सुखदु:खे चांगली समजू शकते आणि त्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू शकते हे गृहीतक आहे. आंबेडकरांसारख्या व्यक्तीबद्दल हे खरे पण आहे. नंतर जे दलित पुढारी झाले, आमदार खासदार झाले त्यांनी दलित समाजाचे प्रश्न सोडवायला किती मदत केली हा संधोधनाचा मुद्दा आहे. पण दलित पुढारी नालायक निघतील म्हणून दलित समाजातले प्रतिनिधीच नकोत त्यापेक्षा दलित नसलेले पण त्यांचे प्रश्न चांगले सोडवू शकतील (अशी केवळ शक्यता तेही प्रश्न सोडवतीलच याची खात्री नाही) असे प्रतिनिधी घ्या असे म्हणणे म्हणजे त्यांचे न्याय्य हक्क डावलण्यासारखेच आहे.
विनायक
राखीव मतदारसंघ: एक विचार
(भूमिका: स्वतःची.)
'समाजातील दुफळी' या कारणाचा विचार केला नाही, तरीसुद्धा एक हंगामी योजना म्हणून 'राखीव मतदारसंघ' ही कल्पना वरकरणी कितीही आकर्षक वाटली, तरी ज्या समाजघटकाच्या तथाकथित फायद्यासाठी म्हणून अशी योजना राबवायची, त्या समाजघटकाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा ती अंतिमतः हितकारक नसून, अशा समाजघटकाचा त्यातून कोणताही फायदा तर होत नाहीच, झाला तर तोटाच होतो, आणि फक्त शोषणव्यवस्था कायम होते असे दिसते. याची काही ढळढळीत उदाहरणे देता येतील.
जनरल झिया उल-हक यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानात संयुक्त मतदारसंघ मोडीत काढून पाकिस्तानातील हिंदू, ख्रिस्ती, अनुसूचित जाती-जमाती यांसारख्या अल्पसंख्याक घटकांसाठी त्यात्या समाजांच्या आकाराप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ स्थापण्यात आले. याचा परिणाम (एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून) तेथील हिंदू समाजावर कसा झाला ते पाहणे उद्बोधक ठरावे.
पाकिस्तानातील हिंदूसमाज हा बर्याच अंशी विखुरलेला आहे. सिंधमध्ये आणि कदाचित काही प्रमाणात पंजाबच्या काही भागांत तो थोडाफार एकवटलेला असावा, परंतु इतर भागांत तो खूपच विरळ आहे. (परंतु नाही असेही नाही.)
आता इतक्याइतक्या माणसांगणिक एक मतदारसंघ या हिशेबात बलुचिस्तानसारख्या प्रांतांत (जेथे हिंदूंची लोकसंख्या खूपच विरळ आहे पण नाही असेही नाही) हिंदूंचा एक सलग असा मतदारसंघ बनवणे अशक्य. त्यामुळे मोठ्या भूप्रदेशावर विखुरलेल्या तुरळक लोकांचा एक मतदारसंघ कसाबसा जुळवला जातो. त्यामुळे बलुचिस्तानच्या कुठल्यातरी कोपर्यात राहणार्या हिंदू नागरिकाचा प्रतिनिधी दूरवर कोठेतरी पंजाबात नाहीतर पेशावरमध्ये राहणारा, त्या नागरिकाचा प्रदेश आणि त्याच्या समस्या न समजणारा आणि त्यांच्याबद्दल सोयरसुतक नसणारा भलताच कोणीतरी (पण हिंदू!) असू शकतो. त्यापेक्षा पूर्वीच्या संयुक्त मतदारसंघात त्या हिंदू नागरिकाचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार मुसलमान का होईना, पण स्थानिक असल्यामुळे त्या नागरिकाच्या समस्या त्या उमेदवारास समजण्याची आणि त्याबद्दल तो उदासीन न राहता काहीतरी करण्याची शक्यता थोडी का होईना, पण अधिक असे, असे कळते.
दुसरे उदाहरण दक्षिण आफ्रिकेतल्या पूर्वीच्या विभिन्न-वर्ण-स्वतंत्र-विकास-वादी (apartheid) राज्यव्यवस्थेचे. यात गौरवर्णीय, मिश्रवर्णीय आणि भारतवर्णीय यांना स्वतंत्र मतदारसंघच नव्हे, त्यांचे विधीमंडळात स्वतंत्र कक्षसुद्धा होते. (बहुसंख्याक असलेल्या कृष्णवर्णीयांस कोणतेही राजकीय अधिकार नव्हते.) कृष्णवर्णीयांची गोष्टच सोडा, पण राखीव मतदारसंघांद्वारा राजकीय अधिकार असलेल्या गौरवर्णीयेतर समाजघटकांनासुद्धा या व्यवस्थेचा कोणताही फायदा नव्हता. गौरवर्णीयांचे वर्चस्व आणि सामाजिक चातुर्वर्ण्यव्यवस्था कायम राखणे यापलीकडे या राज्यव्यवस्थेतून काहीही साध्य झाले नाही, साध्य होण्यासारखे नव्हते आणि साध्य व्हावे हे त्यामागचे उद्दिष्टही नव्हते. ही राज्यव्यवस्था चळवळ करून मोडकळीस आणली गेल्यावर कोठे सामाजिक समतेकडे अल्पगतीने का होईना, परंतु वाटचाल सुरू झाली.
अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामीतून स्वातंत्र्याकडे, नंतर separate-but-equalकडून सामाजिक समतेकडे लढ्याचा अभ्यासही या अनुषंगाने रोचक आणि उद्बोधक ठरावा.
(टीप: प्रस्तुत विवेचन हे केवळ राजकीय हक्कांच्या दृष्टिकोनातून राखीव मतदारसंघांबद्दल आहे. आरक्षण, affirmative action वगैरे त्यासमान भासणार्या विषयांशी याचा काहीही संबंध नाही. ते काहीसे वेगळे आयाम असलेले स्वतंत्र विषय आहेत. हे विवेचन त्याबद्दल नाही.)
अधिक माहिती हवी
आता इतक्याइतक्या माणसांगणिक एक मतदारसंघ या हिशेबात बलुचिस्तानसारख्या प्रांतांत (जेथे हिंदूंची लोकसंख्या खूपच विरळ आहे पण नाही असेही नाही) हिंदूंचा एक सलग असा मतदारसंघ बनवणे अशक्य. त्यामुळे मोठ्या भूप्रदेशावर विखुरलेल्या तुरळक लोकांचा एक मतदारसंघ कसाबसा जुळवला जातो. त्यामुळे बलुचिस्तानच्या कुठल्यातरी कोपर्यात राहणार्या हिंदू नागरिकाचा प्रतिनिधी दूरवर कोठेतरी पंजाबात नाहीतर पेशावरमध्ये राहणारा, त्या नागरिकाचा प्रदेश आणि त्याच्या समस्या न समजणारा आणि त्यांच्याबद्दल सोयरसुतक नसणारा भलताच कोणीतरी (पण हिंदू!) असू शकतो. त्यापेक्षा पूर्वीच्या संयुक्त मतदारसंघात त्या हिंदू नागरिकाचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार मुसलमान का होईना, पण स्थानिक असल्यामुळे त्या नागरिकाच्या समस्या त्या उमेदवारास समजण्याची आणि त्याबद्दल तो उदासीन न राहता काहीतरी करण्याची शक्यता थोडी का होईना, पण अधिक असे, असे कळते.
याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल. मला तरी असे वाटते की हिंदू म्हणून होणारा अन्याय राखीव मतदारसंघातला हिंदू प्रतिनिधी संयुक्त मतदारसंघातल्या मुसलमान प्रतिनिधीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल. स्थानिक प्रश्न कदाचित् संयुक्त मतदारसंघातला मुसलमान प्रतिनिधी दूरच्या हिंदू प्रतिनिधीपेक्षा जास्त चांगला समजू शकेल. अर्थात् ही सगळी जर - तर ची भाषा झाली. नेमकी स्थिती काय आहे हे मूळ संदर्भ वाचल्याशिवाय किंवा आपन त्याबद्दल संक्षेपात माहिती दिल्याशिवाय समजणार नाही.
विनायक
अधिक माहितीचा प्रयत्न
याबद्दल येथे देता येऊ शकण्यासारखा संकलित संदर्भदुवा या क्षणी माझ्याजवळ नाही, परंतु 'डॉन' या इंग्रजी भाषेतील अग्रगण्य पाकिस्तानी वृत्तपत्रातील नियमित स्तंभलेखकांच्या लेखनातून ही माहिती पूर्वी कधीतरी वाचल्याचे स्मरते. (माझी स्मृती मला दगा देत नसेल तर बहुधा श्री. अयाझ अमीर यांचा तो स्तंभ असावा. काही काळापूर्वी पाकिस्तानी राष्ट्रीय प्रतिनिधीसभेच्या निवडणुकीस उभे राहून निवडून आल्यापासून या सद्गृहस्थांनी तूर्तास कार्यबाहुल्यापोटी स्तंभलेखनातून निवृत्ती घेतली आहे. निवडणुकीस उभे राहण्यापूर्वीच त्यांनी हा स्तंभलेखनातून निवृत्तीचा निर्णय घोषित केला होता. ही निवृत्ती तात्पुरती असावी असे वाटते, परंतु खात्री नाही. परंतु हा एक स्वतंत्र विचार करून बर्यापैकी संतुलितपणे लिहिणारा स्तंभलेखक होता असे आठवते.)
केवळ हिंदू म्हणून दूरस्थ हिंदू नागरिकाचे प्रतिनिधित्व करणार्या हिंदू प्रतिनिधीच्या बाबतीत, उमेदवार स्थानिक नसल्याकारणाने आणि त्यामुळे नागरिकास उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षित उत्तरदायित्वाची अंमलबजावणी करण्याचा कोणताही मार्ग नसल्याने, थोडक्यात नागरिकाचे उमेदवारावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण अथवा वचक नसल्यामुळे, आणि त्यातूनसुद्धा तसेही संभाव्य उमेदवारांचे पर्याय खूपच कमी असल्याकारणाने अल्पसंख्य मतदारास काहीही झाले तरी पुढच्या वेळेस त्याच उमेदवारास निवडून देणे अथवा मतदान न करणे यावाचून पर्याय राहत नसल्याने, अशा उमेदवारास एकदा निवडून आल्यानंतर मतदाराचे प्रभावी प्रतिनिधित्व करण्यात काहीही स्वारस्य नसे, असा अनुभव असल्याबद्दल काहीसा तो मुद्दा होता असे आठवते. म्हणजे थोडक्यात उमेदवार स्थानिक नसल्यामुळे सामान्य स्थानिक बाबतींतही प्रभावी प्रतिनिधित्व नाही, आणि हिंदू म्हणून असलेल्या विशेष समस्यांच्या बाबतीतही उमेदवारास मतदाराबद्दल अनास्था असल्याने अथवा त्याचे प्रभावी प्रतिनिधित्व करण्यात विशेष स्वारस्य नसल्याने त्याही बाबतीत प्रभावी प्रतिनिधित्व नाही, म्हणजे परिणामी राजकीय अधिकार दाखवायला असले तरी प्रत्यक्षात असून नसल्यासारखेच, असा दुहेरी तोटा होत असे.
हिंदू मतदारांस स्थानिक बाबींसाठी स्थानिक प्रतिनिधी आणि हिंदू समस्यांसाठी हिंदू प्रतिनिधी असा पर्याय नसून सर्वच बाबींसाठी एकच हिंदू - आणि बहुधा दूरस्थ - प्रतिनिधी असा हा प्रकार होता, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
स्थानिक उमेदवाराच्या बाबतीत निदान उद्या मत मागयला परत येण्याची आवश्यकता असल्याने आणि पर्याय त्यामानाने भरपूर असल्याने अशा प्रतिनिधीस प्रभावी प्रतिनिधित्व करण्याचा, प्रश्न समजून घेण्याचा किमान प्रयत्न करण्याची आस्था किंचित का होईना, परंतु अधिक असण्याची शक्यता त्या मानाने जास्त असावी.
उलटपक्षी राखीव मतदारसंघ ही हिंदू नागरिकाची सोय न होता परिणामी हिंदू उमेदवारासाठी राखीव आणि हमखास जागा या अर्थी केवळ हिंदू उमेदवाराची सोय होत असावी.
(थोडक्यात, राजकीय हक्क हिंदू नागरिकासाठी की हिंदू उमेदवारासाठी, असा हा प्रश्न आहे. आणि फरक प्रभावी प्रतिनिधित्व करण्याच्या पात्रतेचा नसून इच्छेचा आहे.)
गांधी - आंबेडकर आणखी थोडे
या भेटींमध्ये गांधींजी आपण दलितांसाठी काय केले हे सांगत होते "तुमच्या (आंबेडकरांच्या) जन्माच्या आधीपासून मी दलितांसाठी कार्य करत आहे. कॉंग्रेसने दलितांसाठी २०, ००० रुपये खर्च केले आहेत."
त्यावर आंबेडकरांचे उत्तर असे होते. "तुमचा वयाचा मुद्दा मान्य आहे. पण माझ्या हातात २०,००० रुपये असते तर आज मी तुम्हाला भेटायला येण्याऐवजीतुम्ही मला भेटायला आला असतात . दलितांसाठी इतके काही केल्याच्या गोष्टी करता पण कोंग्रेस कार्यकर्त्याकडून खाजगी आयुष्यात अस्पृश्यता पाळणार नाही असे लेखी आश्वासन का घेतले नाही."
गांधीजी "इतकी मोठी संघटना चालवायची म्हणजे अश्या गोष्टी करून चालत नाही."
आंबेडकर " हे मलाही मान्य आहे पण मग दलितांसाठी बरेच काही केल्याच्या आणी तत्त्वावर आधारित संघटना चालवल्याच्या गप्पा मारू नयेत."
विनायक
मालवीय यांचे उदाहरण
या संदर्भातले वारंवार उल्लेख केला जाणारे उदाहरण म्हणजे मदनमोहन मालवीय यांचे. गांधींचे दलितांबाबत काय धोरण असेल ते सार्वजनिक ठिकाणी. मात्र आमच्या घरात दलितांना प्रवेश द्यावा असे जर ते म्हणत असतील तर ते चालणार नाही. अशा अर्थाचे मालवीय यांचे वाक्य सुप्रसिद्ध आहे. अर्थात गांधींनीही अशा पुढाऱ्यांना या बाबतीत कधी समज दिली नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
गांधी - आंबेडकर
गांधी - आंबेडकर वाद हे प्रसिद्ध आहेतच. घटना बनविताना त्याचे रुपांतर नेहरू-आंबेडकरांमधील शीतयुद्धात झाले होते (कारण गांधीजी घटना समितीत नसल्याने प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना नव्हता.. म्हणून ते नेहरूंकरवी प्रश्न पुढे करत होते असे म्हटले जाते)
बाकी वर श्री. विनायक यांनी दिलेल्या वक्तव्यांतील काहि वक्तव्ये माहित होती.. मात्र बरीचशी नवीन आहेत.. पुस्तक शोधायला हवे... नव्या माहितीबद्दल व पुस्तकाच्या संदर्भाबद्दल श्री. विनायक यांचे आभार
मात्र कर्ण म्हणतो त्याप्रमाणे गांधी वर्णव्यवस्थेचे कट्टार पुरस्कर्ते होते हे खरे. माझ्याकडे गांधींवरील काहि पुस्तके आहेत.. त्यात त्यांची बाजू शोधता आली तर २-३ दिवसांत पाहतो
प्रश्न राहिला मायवतींचा.. कांशीराम यांच्यावर हुकुमत गाजवून आधी पार्टी बळकावली व पुढे त्या स्वतःला दलित समाजाच्या सर्वेसर्वा म्हणू लागल्या.. अश्या स्वयंघोषित दलित नेतृत्त्वाची वक्तव्ये बरोबर की चूक यापेक्षा त्यांनी ती गांधींसारख्या व्यक्तीबाबत केल्यास किती महत्त्व द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
नेहरु
नेहरु आणि आंबेडकरांमधील वाद सुप्रसिद्ध आहेच. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत हे एक विज्ञानवादी राष्ट्र असेल असे एक तात्काळ स्वप्न नेहरुंनी दाखवले. मात्र पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी काशीला जाऊन मुहूर्त शोधून तिथे अभिषेक व यज्ञ केला. नंतर तेथील उपाध्यायांना सालंकृत सवत्स धेनू दान केली. त्यावेळी दलितांना त्या मंदिरात सुखासुखी प्रवेश मिळत नव्हता. (पेरियार यांना मंदिरप्रवेशावरुन झालेली मारहाणही याच मंदिरातली). या यज्ञ प्रसंगाचा कडवट उल्लेख आंबेडकरांनी अनेकदा केला आहे. धोरणात्मक बाबी ठरवण्यात नेहरुंचा पाठिंबा मिळत नसल्याने घटनासमितीच्या कामकाजानंतर आंबेडकरांनी लवकरच नेहरुंचे मंत्रीमंडळ सोडले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अमरसिंग
हे तोंडाळ म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी एका सभेत मायावती विषयी म्हटले, "यह दलित की बेटी नही दौलत की बेटी है।" अर्थातच त्यांचा रोख मायावतीच्या दौलत प्रेमाविषयी होता :)
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात.
जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था
पुढील वाक्य विचारार्ह आहे, पण मला कोड्यात पाडते आहे :
(येथे मला जाड ठशातील वाक्याबद्दल विचारायचे आहे.)
ही वर्णव्यवस्था म्हणजे नेमके काय असते. ही "गुण-कर्म-विभागा"ने होते, असे काही लोक स्पष्टीकरण देतात.
या गुणांचा आणि कर्माचा विभाग नेमका कधी होतो. म्हणजे वयाच्या ५व्या, १२व्या, २१व्या वर्षी, कधी? "वर्णव्यवस्था" या प्रकाराचे (जातीव्यवस्थेवेगळे) जगात (विशेषतः हिंदू समाजात) उदाहरण आहे काय? व्याख्या आहे काय? कारण तसे नसल्यास हा फरक करणे निरर्थक वाटते.
वर्ण-जात
सहमत.
आपण कुरुंदकरांचे मनु:स्मृतीवरील पुस्तक वाचले आहे काय?
वर्ण, जाती आणि कुरूंदकर
कुरूंदकरांनी मनुस्मृतीच्या परखड विश्लेषणाबद्दल इथे लिहायचे नाही तर त्यांच्या दुसर्या एका लेखाबद्दल लिहायचे आहे.
त्या लेखात त्यांनी जरासा क्रांतिकारक विचार मांडला आहे. त्यांच्या मते भारतात वर्णव्यवस्था अस्तित्त्वात नव्हती, फक्त जाती होत्या. वर्णव्यवस्था असल्याचा भास होतो कारण ब्राह्मण ही जातही आहे आणि वर्णही. श्रमविभागणी आणि कर्मानुसार वर्ण ही कल्पना काटेकोरपणे अंमलात आणणे हे कठीण होते. उदाहरणार्थ एक छोटा शेतकरी आहे. अगदी एखादा एकर शेती असलेला. हा शेतात काम करतो म्हणून शूद्र आहे. शेतात तयार झालेला माल बाजारात विकतो म्हणून वैश्य आहे, घर - शेतावर कोणी हल्ला केला तर त्याचा प्रतिकार करतो म्हणून क्षत्रिय पण आहे. मग याला कोणत्या वर्णात समाविष्ट करणार? त्यामुळे जातीव्यवस्था हीच खरी. पुढे त्यांची कागदोपत्री व्यवस्था लावण्यासाठी असलेल्या जातींना निरनिराळ्या वर्णात कोंबण्यात आले (हे बहुधा ऋग्वेदकाळात झाले असावे, कारण पुरूषसूक्तात ब्राह्मणो अस्य मुखम् आसीत् वगैरे मध्ये चार वर्णांची स्थाने सांगितली आहेत. त्यातले पद्भ्याम् शूद्रो अजायत हे वादग्रस्त समजले जाते - कंसातले सर्व माझे मत). अजूनही समाजात आपल्या जातीबद्दल जितका अभिमान दिसतो तितका वर्णाबद्दल दिसत नाही. खरे तर वर्णांचे अस्तित्त्व समाजात जाणवतही नाही फक्त जातींचे जाणवते यावरून कुरूंदकरांचे मत बरोबर असावे असे वाटते.
लेख बर्याच वर्षांपूर्वी वाचलेला असल्याने मुद्दे तितक्या प्रभावीपणे मांडता आले नाहीत पण साधारण गोषवारा सांगायचा प्रयत्न केला आहे.
विनायक
गांधींच्या वर्णव्यवस्थेची वैशिष्ट्ये
१. वर्णव्यवस्थेची विभागणी ही जन्माधिष्ठित आहे.
२. वर्णव्यवस्थेमध्ये शूद्रांनी शिक्षण घेऊ नये किंवा क्षत्रियांनी सेवा करु नये असे म्हटलेले नाही. मात्र शूद्रांनी आपल्या जगण्याची सोय म्हणून शिक्षणाकडे पाहू नये किंवा क्षत्रियांनी पोटापाण्यासाठी समाजाची सेवा करु नये.
३. वरील मुद्द्यात स्पष्ट केल्यानुसार वर्णव्यवस्थेचा उद्देश हा पोटापाण्याच्या व्यवस्थेपुरताच मर्यादित आहे. शूद्रांनी शिक्षण घ्यावे किंवा दुसऱ्या वर्णासाठी राखीव असलेले ज्ञानही प्राप्त करावे मात्र त्याचा उपयोग स्वतःच्या उपजीविकेसाठी करु नये. प्रत्येक वर्णाने स्वतःच्या उपजीविकेसाठी पारंपरिक व्यवसायच करावेत. (ब्राम्हणांनी भिक्षुकी, क्षत्रियांनी सैन्यदल वगैरे, वैश्यांनी व्यापार आणि शूद्रांनी समाजाची सेवा)
४. वर्णव्यवस्थेचा उद्देश समाजातील वेगवेगळ्य़ा घटकांमधील स्पर्धा टाळणे हा असून जेणेकरुन वर्गसंघर्ष होणार नाही.
५. वर्ण म्हणजे एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या जन्मापूर्वीच ठरवला जाणे.
६. वर्णव्यवस्थेमध्ये कोणत्याही माणसाला स्वतःच्या उपजीविकेचा व्यवसाय ठरवण्याचे स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाने आपापला पारंपरिक व्यवसायच केला पाहिजे.
७. आपल्या समाजाने पाश्चात्य समाजाचे अनुकरण थांबवले पाहिजे. पाश्चात्त्य समाजव्यवस्था ही सैतानाने निर्मिलेली आहे.
वरील ओळी या आंबेडकरांच्या लेखनातून घेतल्या असून त्यातील नोंदींनुसार हे लेखन १९२५ मध्ये गांधींनी वर्णव्यवस्था नामक एका गुजराती पुस्तकात समाविष्ट केलेले आहे .
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
काही प्रश्न
प्रस्तुत धागा वाचताना असे दिसते की आंबेडकरांनी काढून दिलेल्या काही संदर्भाना प्रमाण धरून गांधींच्या जातिव्यवस्थेवरच्या मतांवर इथे टीका करण्यात आलेली आहे. प्रस्तुत संदर्भ १९२१ सालचा दिसतो. आणि तोही अर्थातच , आंबेडकरांनी दिलेला.
गांधींनी एकूण बरेच लिखाण केलेले आहे. जातीव्यवस्थेबद्दलचे त्यांचे १९२१ मधले मत हे अखेरचे आहे असे धरून चालायला कितपत वाव आहे ? खुद्द गांधींनी "माझ्या अधीच्या मतात नि आता काही फरक , विसंगती वाटल्यास , माझे आताचे मत ग्राह्य धरावे. कारण मी माझी मते सतत तपासत असतो. काही नवे शिकल्यावर काही मते बदलणे स्वाभाविक आहे." अशा स्वरूपाचे विधान केल्याचे स्मरते.
त्यांची काही इतर विधाने पाहू.
१. Hinduism dies if untouchabillity lives, and untouchability has to die if Hinduism has to live. : "Mahatma" by D G Tendulkar Volume 3 , page 322
२. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी केलेले उपोषण. तत्रैव , page 252, 229.
३. Untouchability has supped the very foundations of the whole nation. तत्रैव. page 223.
बोलणे आणि वागणे
गांधींचे बोलणे आणि वागणे यात तफावत होती. १९२१ मध्ये व्यक्त केलेले मत (आणि १९२५ मध्ये त्याला जोडलेली पुस्ती) हे १९३५-३६ मध्येही कायमच होते. पुणे कराराच्या वेळी ही बाब स्पष्टपणे दिसून आली.
हिंदुत्त्व आणि अस्पृश्यता याबाबत गांधींनी व्यक्त केलेली मते अशी की, अस्पृश्यांना देवानेच त्या स्थानासाठी निवडलेले आहे. त्या जागेवर असल्यास त्यांना स्वतःच्या सहनशक्तीचा व आत्म्याचा विकास करता येईल. इतरांनी केलेला अन्याय सहन करत गेल्यास एक दिवस अन्याय करणाऱ्याच्या मनात अपराधी भावना जागृत होऊन त्याच्याही आत्म्याची उन्नती होईल. वगैरे वगैरे.
विनायक यांनी खाली चवदार तळ्याचे उदाहरण दिलेच आहे. गांधींसह काँग्रेसच्या अनेक पुढाऱ्यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला विरोधच केला होता.
आंबेडकरांनी ठासून मांडलेली दुसरी महत्त्वाची बाब अशी की गांधींचे राजकारण हे नेहमी काँग्रेसला मदत करणाऱ्या ब्राम्हण-बनिया वगैरे उद्योगपतींच्याच हिताचे राहिले. दलित आणि बहुजन समाजातील कामगारांनी अन्यायी मालकांविरोधात निषेधाचे किंवा रागाचे प्रदर्शन करु नये असे त्यांनी वारंवार सांगितले. मालकांनी आपली कंपनी जनक राजाप्रमाणे एखाद्या ट्रस्ट सारखी चालवावी ज्याचे हे कामगार हिस्सेदार असतील. कामगारांनी मालकांच्या मनावरील ताणतणावांची कल्पना करावी व आपल्या पोटापाण्याला आधार देणाऱ्या मालकाला विरोध करु नये. असे अजब तत्त्वज्ञान गांधींनी अनेकदा मांडले आहे.
याचे विश्लेषण करताना यामागील विशिष्ट जातींच्या हिताच्या राजकारणाबरोबरच काँग्रेसला पैसा पुरवणाऱ्या उद्योगपतींना जगात त्यावेळी सुरु झालेल्या कामगार चळवळींपासून कमीत कमी त्रास कसा होईल याकडे गांधींचे नेमके लक्ष होते असा आंबेडकरांचा मुद्दा आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
याबद्दल काय?
आंबेडकरांनी केलेला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, सावरकरांनी सुरू केलेली सहभोजने, दलितांनाही प्रवेश असावा म्हणून बांधलेले पतितपावन मंदिर, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरूजींनी केलेले उपोषण (ही घटना साधारण १९४५ ची असावी) या सर्व चळवळींबद्दल गांधीजींचे मत अनुकूल होते का? त्यांनी या चळवळींना मनापासून (किंवा मनाविरूद्धही) पाठिंबा दिला का? स्वतः होऊन एखादी मंदिरप्रवेशाची किंवा एक पाणवठ्याची किंवा सहभोजनाची किंवा आणखी कसली चळवळ सुरू केली का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची इच्छा आहे. माझ्या अल्प माहितीनुसार या सर्व चळवळींबद्दल त्यांचे प्रतिकूल मत होते. इतकेच नव्हे तर साने गुरूजींना त्यांनीच उपोषण मागे घ्यायचा सल्ला दिला आणि गुरूजींनी गुरूची आज्ञा म्हणून काही वाद न घालता मान्य केला. बाकी दलितांच्या राजकीय हक्कांबद्दल जे राजकारण केले त्याबद्दल वर लिहिलेच आहे.
विनायक
जाती
गुजरातीत जाती शब्दाची व्याख्या थोडी अघळपघळ दिसते.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
जातीबाबत
आंबेडकरांनी उल्लेख केलेले सर्व परिच्छेद हे गुजराती पुस्तकांच्या अधिकृत इंग्लिश अनुवादांतून घेतलेले आहेत. याउप्पर आंबेडकर स्वतः सयाजीराव गायकवाडांकडे बडोदा संस्थानात नोकरीला होते. त्यांना गुजराती भाषा उत्तम प्रकारे अवगत होती.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नाती
थोडी चौकशी करता गुजराथीत आंतरजातीय विवाहाला 'परनाती विवाह' म्हणतात असे कळाले. ज्ञ्याती >न्याती >नाती असा काहीसा प्रवास असावा. (नाती अर्थातच अपभ्रंश आहे, योग्य शब्द न्याती सांगितला जातो.)
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
नवजीवन
भोजन करणे ... विवाहाची काय गरज आहे.
हे मत गांधीजींचे आहे का?
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
होय
हे मत गांधीजींचेच आहे. येथे मुद्दा पाच आणि सहा पाहा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
गांधीजींचे धोरण...
''गांधी हे जातीभेदाचे व हिंदू धर्माचे ते कट्टर पुरस्कर्ते होते'' असे डॉ.आंबेडकरांनी म्हटले होते. अस्पृश्यांना सामाजिक आणि आर्थिक समानता मिळवून देणे हे गांधीजींचे उद्दीष्टे कधीच नव्हते असे म्हटल्या जाते. कारण ते पुराणमतवादीच नव्हे तर पुराणमताभिमानी होते. ''हिंदुधर्म व त्यातील जातीभेद पद्धती कायम राहावी..त्याचबरोबर हरिजन सेवक संघ हे त्यांच्या अनेक तंत्रापैकी एक तंत्र असुन त्यामुळे त्यांना यशस्वी रितीने भंपकगिरी करता येते'' असेही डॉ.आंबेडकर म्हणतात.
संदर्भ :गांधीच्या मगर मिठीतून अस्पृश्य समाजाची सुटका : डॉ.आंबेडकर पृ.क्र. ४५/४६
(Mr.Gandhi and Emancioation of untochables या प्रबंधातील काही विचार वरील पुस्तकात आहेत)
अवांतर : इतिहासातील मोठ्या व्यक्तींवर संदर्भाच्या आधारे भले-बुरे लिहू नये,असेही वाटते !
-दिलीप बिरुटे
समजले नाही
अवांतर : इतिहासातील मोठ्या व्यक्तींवर संदर्भाच्या आधारे भले-बुरे लिहू नये,असेही वाटते !
मला वाटते आपण हे वाक्य गांधींच्या संदर्भात म्हटले आहे. वेगवेगळे संदर्भ तपासून पाहून त्याआधारे चर्चा करण्यात काहीच वाईट नाही असे वाटते. संदर्भाविना लिहिले तर ते आक्षेपार्ह असेल मात्र संदर्भाच्या आधारे लिहिण्यात अडचण नसावी.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत आहे. (मला वाटते...
...बहुधा 'एकाच संदर्भाच्या आधारे इतिहासातल्या मोठ्या व्यक्तींबद्दल मत बनवू नये' असे बिरुटेसरांना सुचवायचे असावे.
त्यांचे म्हणणे समजण्यासारखे आहे. परंतु तुलना करण्याकरिता विविध संदर्भ किंवा मतप्रवाह प्रकाशात आणण्यासाठी चर्चा सुरू करतेवेळी उपलब्ध असणारा एकमेव, महत्त्वाचा किंवा प्रचलित मतप्रवाहापेक्षा थोडा वेगळा संदर्भ पुढे आणून त्यातील मुद्द्यांच्या आधारे चर्चा सुरू करून, इतर संदर्भ जसजसे पुढे येतील तसतसे तपासत जाऊन आणि गरज पडल्यास तसे ते पुढे आणण्याचे आवाहन करून चर्चा पुढे नेण्यात काही अडचण नसावी.
तूर्तास एवढेच. चर्चेवर लक्ष ठेवून आहे. उपलब्ध होणार्या माहितीचे आणि विचारप्रवाहांचे ग्रहण करीत आहे. मांडण्यासारखे काही सुचल्यास मांडेनच.)
थोडी माहिती....
मागे अत्र्यांचे 'ही ईश्वराची दया' हे लेखसंग्रहवजा पुस्तक वाचले होते. दुर्दैवाने ते आत्ता जवळ नाही. पाने दिली असती. त्यातले 'भीमज्योती' आणि 'आम्ही महार असतो तर' हे खास अत्रे ष्टाईल लेख ठळकपणे आठवतात. त्यात आंबेडकरांचे गांधींबद्दलचे Mahatmas like fleeting phantoms raise dust but raise no level हे मत आठवते. कुणाजवळ पुस्तक असल्यास अजून संदर्भ द्यावेत. मी मिळते का बघतो.
-सौरभदा
==================
उत्तम चर्चा
आपल्या इतिहासांतील धूर्त आणि महालबाड व्यक्तींचा दंभस्फोट अशा चर्चांमधून होतो. वर्तमानपत्रांच्या आधारे लिहिल्या जात असलेल्या इतिहासांतून कधीकधी हातीं काहीच लागत नाही मात्र नोटांवर यांची चित्रे दिसू लागतात. क्वचितच अशा चर्चांमधून विश्लेषणाचे नवनीत बघावयास मिळतें.
श्रीयुत नेहरु, सी. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन, प्र.के. अत्रे, यशवंतराव चव्हाण अशा प्रघातानेच मोठ्या मानल्यां जात असलेल्या महाभयंकर जातीयवादी नेत्यांकडेही थोडे वळून पाहण्यांस हरकत नसावीं.
आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!
बापूंची पत्रे
माझ्या घरी असलेल्या काहि पुस्तकांत गांधीची भुमिका सापडते का हे बघत होतो. मात्र माझ्याकडील बहुतांश पुस्तकाच्या लेखकांना गांधी-नेहरू प्रेम, गांधी-पटेल दुरावा, गांधी-जीना संवाद, संघ आणि गांधी , आफ्रीकेतील गांधी हे विषय प्रिय आहेत.. इतर पुस्तके शोधली पाहिजेत..
मात्र गांधीजींनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह "पत्रगुच्छ" नावाने माझ्याकडे आहे. त्यात या विषयाच्या जवळ जाणारी दोन पत्रे मिळतात. तीही विषयाला पुसटशी स्पर्शून जातात.. (पैकी पहिले त्या विषयासंबंधी नाहिच म्हटले तरी चालेल) यावरून फार काहि निष्कर्ष काढता येणार नाहित असे वाटते.. तरीही दुसर्या बाजूच अदमास येतो.. ती पत्रे इथे जशीच्या तशी देत आहे
संगर्भः पत्रगुच्छ (महाराष्ट्र गांधी स्मारक निधी प्रकाशन)
------------------------
१५ फेब्रुवारी, १९३३
प्रिय जवाहरलाल,
आमचा सारा वेळ अस्पृश्यतेच्या कार्यात जात आहे. येथून जाणार्या पत्रासाठी लागणारी सारी पाकीटे सरदार वल्लभभाई परवित आहेत. ते वृत्तपत्रांचे दक्ष वाचक आहेत. ते अस्पृश्यतेच्या आणि इतरही सर्व वार्ता वृत्तपत्रांतून उकरून काढतात. आनंदाचा अक्षय पुरवठा करणारा कारखाना म्हणजे वल्लभभाई. तपासणीचा दिवस हा त्यांना दुसर्या कोणत्याहि दिवसासारखा वाटतो. कोणतीही विनंती त्यांना करायची नसते. आणि विनंती करायची नाहि असा कोणताही दिवस माझा जात नाही. यापैकी अधिक सुखाचे काय हे मला माहित नहि. मात्र जर तोंड आंबट न करता नकार देऊ शकत असेन, तर मी त्यांच्याइतका सुखी का असणार नाहि?
------------------------------
२ मे, १९३३
प्रिय जवाहरलाल,
आगामी उपोषणाच्या कल्पनेशी मी झगडत असताना, तुम्ही जणू कांही साक्षात् माझ्यापुढे उभे होतां. माझे उपोषण अत्यंत आवश्यक आहे, हे आपल्याला कळावे, अशी माझी फार इच्छा आहे. हरिजनांची चळवळ ही केवळ बौद्धिक प्रयत्नांनी चालणारी नव्हे. ती फार मोठी आहे. मी धर्माचा -- आणि म्हणून हिंदु धर्माचा -- त्याग करू शकत नाही. हिंदु-धर्माने मला दगा दिला तर माझे जीवित मला भारभूत होईल. मी खिस्ती धर्म, इस्लाम धर्म आणि दूसरे पुष्कळ धर्म यांच्यावर प्रेम करतो, ते हिंदु-धर्माच्या द्वारे. माझ्यातून हिंदु धर्म काढून घ्या म्हणजे शिल्लक शुन्य राहील. मात्र, उच्चनीचभाव दाखवणारी अस्पृश्यता मी सहन करू शकत नाही. या रूढीवर हिंदूधर्मांत एक श्रेष्ठ उपाय आहे. तो मी अंमलात आणला आहे. मी या उपोषणातुन जिवंत राहिलो, तरी ठिक आणि जिवंत राहण्याचे प्रयत्न केले असूनही हे शरीर पंचत्वांत विलीन झाले तरी ठीक. हे शरीर म्हणजे काय? काचेच्या भंगूर चिमणीपेक्षाही अधिक नाशवंत आहे. काचेची चिमणी तुम्ही दहा हजार वर्षे जतन करून ठेऊ शकाल, पण शरीर एक मिनीटही नाहि. आणि खरे पाहता, मृत्यु म्हणजे काही सर्व प्रयत्नांचा अंत नव्हे. योग्य तर्हेने तोंड दिल्यास मृत्यु म्हणजे काही प्रयत्नांचा प्रारंभ ठरेल. स्वयंप्रेरणेने तुम्हाला हे सत्य उमगले नाही, तर मी ते युक्तिवादाने पटवून देणार नाही. माझ्या उपोषणाला आपली मान्यता मी मिळवू शकलो नाही तरी, उपोषणाच्या काळात तुमचे बहुमोल प्रेम मी मनांत बाळगीन
आम्हा सर्वांचे प्रेमपूर्वक प्रणाम
----------------------------
(प्रताधिकारात बसत नसल्यास संपादक मंडळाने उडवली तरी चालतील)
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका