माझ्या संग्रहातील पुस्तके -८ मिरासदारी
द. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही. मिरासदारांचा विनोद टाळ्या खूप घेतो, पण तो 'टंग इन चीक' च्या मर्यादा क्वचितच ओलांडतो. बर्याच वेळा मिरासदारांचे लिखाण हे शाळकरी मुलांनी शाळकरी मुलांसाठी केलेले, बाळबोध वाटते. शारिरीक व्यंगे, हाणामारी, आळशीपणा, झोप अशा विषयांवरील मिरासदारांचा विनोद प्राथमिक अवस्थेत अडकून राहिल्यासारखा वाटतो. मिरासदारांच्या कथांमधील व्यक्ती गंमतीदार, तर्हेवाईक आणि विविधरंगी असल्या तरी त्या कचकड्याच्या वाटतात. भोकरवाडी आणि तिथले ग्रामस्थ यांच्याविषयीच्या मिरासदारांच्या कथा वाचताना क्वचित हसू येते, पण दीर्घकाळ स्मरणात राहाणारा आणि केवळ स्मरणानेही आनंद देणारा विनोद मिरासदारांच्या हातून क्वचितच लिहिला गेला आहे.
अर्थात वरील नकारात्मक विधाने ही मिरासदारांच्या सर्वच लिखाणाला लागू नाहीत. मिरासदारांचे बरेचसे विनोदी लेखन (मला) कमअस्सल वाटत असले तरी मिरासदारांनी काही अगदी जिवंत, खरोखर गंमत आणणार्या आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गंभीर आणि हृदयस्पर्शी अशा कथा लिहिल्या आहेत. एक लेखक म्हणून आवश्यक असणारे सगळे गुण - उत्तम निरिक्षणशक्ती, शब्दांवरील पकड आणि लेखनाची रचना करण्यासाठी गरजेची ती कुसर - क्राफ्ट - हे मिरासदारांकडे आहेत याचा पुरावा देणार्याच या कथा. दुर्दैवाने मिरासदारांनी विनोदनिर्मिती करण्यासाठी अतिशयोक्ति, अतिरंजन हे साधन प्रामुख्याने निवडले; आणि म्हणून त्यांच्या कथा या तिखटामिठाच्या लाह्यांसारख्या तडतडीत झाल्या आहेत. खमंग, तोंडात असताना बर्या लागणार्या, पण भूक फक्त चाळवणार्या. मराठी वाचकाची भूक भागवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात अभावानेच आढळते.
'मिरासदारी' या मिरासदारांच्या निवडक कथांच्या संग्रहात मिरासदरांच्या अशा गर्दीखेचक कथांबरोबरच त्यांच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवून देणार्या काही सुंदर कथाही आहेत. खेड्यातली शाळा या विषयावर मिरासदारांनी पुष्कळ कथा लिहिल्या आहेत. 'शिवाजीचे हस्ताक्षर', 'शाळेतील समारंभ', 'माझ्या बापाची पेंड', 'ड्रॉइंग मास्तरांचा तास' या त्यातल्या काही कथा. यातल्या काही कथांमधला नायक हा शाळेत जाणारा लहान मुलगा आहे; त्यामुळे त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी सरळ, साफ आहे. आणि त्याच्या आसपासची मंडळी बाकी तयार, बेरकी आहेत. या विसंगतीमुळे काही विनोदी प्रकार घडतात. गावाकडची तर्हेवाईक मंडळी आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमती यावर मिरासदरांनी लिहिलेल्या 'भुताचा जन्म', 'धडपडणारी मुले', 'व्यंकूची शिकवणी', 'नदीकाठचा प्रकार', 'निरोप', 'झोप' वगैरे कथाही माफक विनोदनिर्मिती करतात, पण त्या वाचताना नकळत (आणि तसे करणे योग्य नाही हे माहिती असूनही) अशा प्रसंगांवर व्यंकटेश माडगूळकरांनी केलेले अस्सल देशी आणि कसदार लिखाण आठवते. असे बरेवाईट करणे योग्य नव्हे, हे खरे, पण तशी तुलना होते खरी ; आणि मग तिथे मिरासदार काहीसे फिके पडल्यासारखे वाटतात. पण मिरासदारांचे लिखाण इतके विपुल आहे, की त्यांच्या खरोखर दर्जेदार कथा तुलनेने कमी असूनही बर्याच आहेत.'नव्व्याण्णवबादची एक सफर', 'कोणे एके काळी' 'विरंगुळा', 'गवत', 'पाऊस', 'साक्षीदार' 'स्पर्श' या प्रस्तुत संग्रहातील अशा काही कथा. (मिरासदारांच्या या संग्रहात नसलेल्या 'हुबेहूब' वगैरे इतर काही कथाही या निमित्ताने आठवतात.)
'नव्व्याण्णवबादची एक सफर' ही गावातल्या थापाड्या नाना घोडक्याची कथा. खेड्यातल्या रुक्ष, आशाहीन जीवनात गावकर्यांना नानाच्या थापांचाच विरंगुळा आहे. त्या लोणकढ्या आहेत हे जसे नानाला ठाऊक आहे, तसे गावकर्यांनाही. तरीही नाना तर्हेतर्हेच्या गोष्टी सांगतो आहे आणि गावकरीही त्या ऐकून घेताहेत. आपले लग्न व्हावे ही सुप्त आशा ठेऊन असलेल्या नानाला एक देवऋषी खोटे बोलू नको, मग मार्गशीर्षापर्यंत तुझे लग्न होईल असे सांगतो. त्याप्रमाणे नाना त्याच्या अद्भुत कथा सांगणे बंद करतो. मग हळूहळू त्याची लोकप्रियताही ओसरते. रोजच्या, तुमच्या आमच्यासारख्या अळणी आयुष्यात कुणाला रस असणार? मार्गशीर्ष येतो आणि जातो, पण बिचार्या नानाचे लग्न काही होत नाही. जिवाला कंटाळलेला नाना जीव द्यायला पाण्यात उडी घेतो, पण गावकर्यांपैकी कुणीतरी त्याला वाचवते. भानावर आलेल्या नानाला ओळखीचे चेहरे दिसतात, त्याला सगळे आठवते, आणि आपल्या आयुष्यात आता हिरवळ येणार नाही हे पचवलेला नाना परत एक फर्मास गोष्ट सांगायला लागतो. मिरासदार लिहितात,'.. आणि मग संध्याकाळच्या त्या शांत, उदास वेळेला नानाच्या आयुष्याला पुन्हा एकदा अर्थ आला. तो गोष्ट सांगत राहिला, माणसे तन्मय होऊन ऐकत राहिली आणि ते रुक्ष, भकास वातावरण पुन्हा एकदा अद्भुततेने भरुन गेले.'
'कोणे एके काळी ' ही मिरासदारांच्या पोतडीतून निघालेली एक वेगळी चीज आहे. एका राजाच्या पदरी असलेल्या एका सामान्य रुपाच्या पण बुद्धीमान विदूषकाची ही कथा मिरासदारांनी जुन्या, संस्कृतप्रचुर भाषेत लिहिली आहे. भाषेचा बाज राखण्यात थोडेसे कमी पडलेले मिरासदार कसदार कथानकाने ही कसर भरुन काढतात. प्रथमपुरुषी निवेदनात्मक शैलीने लिहिलेल्या या कथेत काही वाक्ये विलक्षण चटका लावणारी आहेत. 'अभिसाराला आलेली ती सुंदर चतुर तरुणी मोठ्या उत्कंठेने अंतर्गृहात गेली - माझ्या दृष्टीसमोर गेली - आणि एखाद्या तपस्व्यासारखी शुष्क मुद्रा धारण करुन मी तेथेच उभा राहिलो. वज्रासारखे अंगावर पडणारे चांदणे मोठ्या धैर्याने सहन करीते एकटाच उभा राहिलो..'
'विरंगुळा' ही निर्विवादपणे मिरासदारांच्या सर्वश्रेष्ठ कथांपैकी एक ठरावी असे मला वाटते. कोर्टातल्या गरीब कारकुनाची ही कथा वाचकाला हळवी करणारी आहे. आयुष्यात कसलीच उमेद नसलेल्या तात्यांचा विरंगुळाही भेसूर, जगावेगळा आहे. कुणी मेले की त्याच्या मर्तिकाची व्यवस्था करण्यापासून त्याची महायात्रा संपवून येणे हाच तात्यांचा छंद आहे. त्यात एकदा गुंतले की एरवी गरीबीने, परिस्थितीने पिचलेले, गांजलेले तात्या उत्तेजित होतात, त्यांच्या अंगात काहीतरी वेगळे संचारते. मग तिथे त्यांच्या शब्दांना किंमत असते, त्यांना मान असतो, त्या जगात ते सांगतात आणि इतर सगळे ऐकतात... पण एकदा का ते सगळे आटोपले आणि तात्या घरी आले की परत डोळ्यांसमोर ते भीषण दारिद्र्य उभे राहाते. ते बकाल घर, घरातल्या कधी न संपणार्या मागण्या आणि चार पैशाचा हट्ट पुरवला न गेलेली, आईच्या हातचा मार खाऊन, गालावर अश्रूंचे ओघळ घेऊन मुसमुसत झोपी गेलेली लहान मुले...
मिरासदारांच्या प्रतिभेविषयी जर कुणाला शंका येत असेल तर ती नि:संशयपणे नाहीशी करणारी त्यांची कथा म्हणजे 'स्पर्श'. ही कथा म्हणजे कधीकधी साहित्यीक आपल्या नैसर्गिक पिंडाला संपूर्ण छेद देणारे काही लिहून जातो, तसे आहे. अगदी सर्वमान्य उदाहरण द्यायचे तर 'नंदा प्रधान' सारखे. कुटुंबातल्या वृद्ध स्त्रीच्या निधनानंतर तिच्या दहाव्याला आलेले नातेवाईक. त्या स्त्रीच्या आठवणी. पुन्हापुन्हा भरुन येणारे डोळे. पिंडाला न शिवता घिरट्या घालणारा कावळा. अस्वस्थ झालेले भटजी आणि या सगळ्यांतून काही भेदक अर्थ काढणारी मने. मध्यमवर्गीय, संस्कारजड, भाबडी मने. या सगळ्या वैराग्यवातावरणाबाबत मिरासदार काही जबरदस्त वाक्ये लिहून जातात. 'पिंड उन्हात चमकत होता. झाडावर कावळे उगीच बसून राहिले होते. एखादा मध्येच कावकाव करत होता. काही तरी गूढ, न कळणारे समोर उभे होते. एकदा ते चित्र निरर्थक वाटत होते आणि मग त्यात फारच गहन तत्व भरलेले दिसत होते. मृत्यूची महानदी, काळेभोर अथांग पाणी, ऐलतीरावरची जिवंत माणसे आणि पैलतीरावरील धूसर वातावरण - सरळ साधा व्यवहार आणि अगम्य गोष्टी यांचे नाते जोडण्याची धडपड. यत्न आणि कर्मफळ यांचे लागेबांधे. उजेडातून अंधाराकडे पाहण्याची कोशीस... सुन्न मनात विचाराची मोहोळे उठत होती. असले काहीतरी जाणवत होते आणि तरी ते फार अस्पष्ट होते'
असले लिहू शकणार्या मिरासदारांनी विनोदी (म्हणून जे काही लिहिले आहे ते) साहित्य लिहिले नसते तरी चालले असते, असे वाटते.
असल्या काही अरभाट आणि काही चिल्लर कथांचे 'मिरासदारी' हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
मिरासदारी
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
३६५ पृष्ठे
किंमत १०० रुपये
Comments
सरस
वाह!
मिरासदारांची फारच थोडी पुस्तके वाचून नंतर त्यांची पुस्तके शक्यतो टाळण्याकडे माझा कल होता. मात्र हे परीक्षण वाचून त्यांच्या पुस्तकांची मिरासवारी पुन्हा करावी असे वाटत आहे. अत्यंत जमलेले पुस्तकपरीक्षण. येऊ द्या आणखी. आम्ही पुस्तकांची तहान सध्यापुरती तुमच्या लेखनावर भागवू.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बेस्ट् ऑफ द बेस्ट्
"मिरासदारी" म्हणजे मिरासदारांच्या सर्वोत्कृष्ट निर्मिती होत हे मला पटते. परीक्षण वाचताना एकेका कथेचा आस्वाद घेता आला.
मात्र त्यांचे अन्य साहित्यही मी (जमेल , मिळेल तितपत) वाचत आलेलो आहे. "भोकरवाडी"चे नाना चेंगट , बाबू पैलवान सारखे अनेक लोक प्रचंड आवडतात. मला असे वाटते की एखादा कलाकार , एखादा गायक , एखादा लेखक आवडणे याला , प्रसंगी गुणवत्तेखेरीज व्यक्तिगत आवडनिवडीचाही भाग हा असतोच. विविधभारतीवर दिवसातले अनेक तास गाणी लागायची. सर्वच गाणी मास्टरपीसेस् अर्थातच नसायची. पण गाणी ऐकली जायची. अंतर्मनात झिरपत रहायची. अबोध मनात रुजायची. लेखन-वाचन वेव्हाराचेही काहीसे असेच. सहवास होत रहातो. त्यात काही बरवे, काही गाळसाळ असणे चालायचेच. मिरासदारांचा हा असा सहवास - त्यांच्या विपुल लिखाणामुळे - खूप मिळाला. त्यांच्याबरोबर "बार्शी लाईट्" किंवा "सिद्धेश्वर" पकडून आडगावाला उतरून भोकरवाडीसारख्या गावंढळ गावात जाऊन येण्याचा अस्सल आनंद त्यांनी खूप खूप दिला.
दमामि
मुक्तसुनितांशी सहमत.
दमामिंनी पंढरपूरचे केलेले वर्णन ' या गावात घर कमी, देवळ जास्त, रस्ते कमी गल्लीबोळ जास्त, साध्या दिवसांपेक्षा यात्रेचे दिवस जास्त,
गावातल्या माणसांपेक्षा गावाबाहेरचे जास्त' हे वर्णन मी एकदा माझ्या पंढरपूरच्या मित्राला ऐकवल्यावर तो हसतच सुटला. अगदी खरं अगदी खरं म्हणत राहीला.
त्यांचे असेच एक मला वाचनीय वाटाणारे पुस्तक म्हणजे 'नावेतील तीन प्रवासी'. एका ईंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आपल्या मराठी वातावरणात चपखल उतरवलेला आहे.
आपला,
गणा मास्तर,
भोकरवाडी बुद्रुक
अवांतरः- प्रतिसाद लिहुन संपल्यावर लक्षात आले की मी माझे इथले नाव पण त्यांच्या भोकरवाडीतल्या एका व्यक्तीरेखेवरुन घेतलेले आहे.
वाह!..
मिरासदारी हे पुस्तक जेव्हा वाचले होते तेव्हा आवडले होते.. वाचनाची आवड लागतानाच्या वयात हातात पडले होते.. काहि प्रमाणात शाळकरी भाषा हे वर्णन पटते (शाळकरी वयातहि बरेचसे विनोद कळले होते आणि म्हणूनच पुस्तक आवडले होते). त्यातहि 'माझ्या बापाची पेंड' आणि 'ड्रॉइंग मास्तराचा तास' तर फारच मजेशीर कथा...
मिरासदारीसारखे जाड विनोदी पुस्तक मी वाचले आहे अश्या चारचौघात बढाया मारण्याचे शालेय दिवस आठवले :-)
काहिश्या विस्मरणात गेलेल्या पुस्तकाच्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्द्ल धन्यु!
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका