शिवाजी महाराजांचे गुरू

शिवाजी महाराजांचे गुरू

नाही, नाही, दादोजी किंवा समर्थांच्या वादात मला पडावयाचे नाही. प्रत्येकाला गुरूकडून शिकायचे असतेच व थोर व्यक्तींना जास्त शिकायचे असल्याने त्यांना (जास्त) गुरूंची गरज असते. आपण किरकोळ माणसे, बोकिल-जाधव बाईंकडून शिकलेले आपणास पुरते. महाराजांचे तसे नव्हते. त्या लाखांच्या पोशिंद्याला, अनंत अवधाने सांभाळवयाची होती. त्याला इतिहास, भुगोल, युद्धशास्त्र,लश्करी डावपेच, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गड बांधणी, गलबते बांधणी, शस्त्रे मिळवणे, धान्य मिळवणे व साठवणे, माणसे जोडणे व त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे काम देणे, त्यांना धन्याकरिता, धर्माकरिता,राष्ट्राकरिता प्राण देण्यास तयार करणे, अशा नानाविध गोष्टी शिकावयाच्या होत्या, नव्हे बारकाईने आत्मसात करावयाच्या होत्या. त्यांच्या पत्रांवरून व तत्कालीन लेखकांनी लिहलेल्या लिखाणावरून दिसून येते की त्यात ते यशस्वी झाले होते. गलबत बांधणीकरिता सागवान कोठून आणावयाचा, सिंधूदूर्गाच्या तटांकरिता शिसे कुठे मिळवावयाचे, उंदरांकडून उपद्रव पोचू नये म्हणून कोणती काळजी घ्यावयाची, वडिलांना पातशहाने अटकेत टाकले तर मोंगलांशी संधान कसे बांधावयाचे, ...... सगळे त्यांना ज्ञात होते. या सगळ्या गोष्टी काय फक्त आई, वडील, दादोजी व समर्थांनी शिकवल्या? अरे, दत्ताला २४ गुरू करावे लागले, आणि महाराजांना इतके कमी? माझी खात्री आहे की त्यांनी अनेकांकडून कणाकणाने विद्या गोळा केली असली पाहिजे व देवदत्त गुणांनी त्याचे चीज केले असले पाहिजे. त्यांच्या महान कार्यामागे अनेकांची, भले चमचा चमचा असेल, शिकवण असणारच व ते सर्व त्यांचे गुरूच! अज्ञात, पण गुरूच!

आज अशाच एका अज्ञात गुरूंची ओळख करून द्यावयाची आहे. दंतकथाच आहे पण वाटते की हे शक्य आहे, नव्हे सत्यच असावे. महाराज तरूण असतांना, तरुणाईच्या उत्साहात, अनेक गड काबीज करावयाचा छंदच लागला.साम-दाम-दंड-भेदाचा उपयोग करून आज हा गड मिळवला,त्यावर चार माणसे ठेवून, दोन-तीन दिवसात दुसर्‍या गडाकडे मोर्चा. तमाम मराठ्मोळ्या लोकांना महाराजांची ओळख होऊ लागली होती. उस्ताद महाराज, वेष पालटून, दोन तीन माणसेच बरोबर घेवून, खेड्यापाड्यातून हिंडून माहिती गोळा करत असत. गडावर शिबंदी किती, वाटा चोरवाटा कोठे आहेत, कुणाशी संधान बांधावयाचे,कुणाची मदत होवू
शकेल, ही सर्व माहिती मिळाली की काम फत्ते होणारच. तर असेच एका दिवशी, संध्याकाळी, एका खेड्यात पोचले. लहानश्या झोपडीतल्या म्हातारीला विचारले " मावशी, आम्हा तिघांच्या जेवणाची सोय होईल का?" म्हातारी होय म्हणाली म्हणून तेथेच मुक्काम टाकला. रात्री जेवावयाला बसल्यावर भाकरी झाली व म्हातारीने भात वाढला व ताक दिले. भाताच्या ढीगावर महाराजांनी ताक ओतले,झाले, ते सैरभैर पत्रावळीत पसरू लागले. आवरता आवरता महाराजांची पुरेवाट.म्हातारी हसून म्हणाली," तू तर शिवबाच दिसतोस !" महाराज चकीत झाले. अनोळखी म्हातारीने पहिल्याच भेटीत आपल्याला ओळखले ? त्यांच्या प्रश्नांकित
चेहर्‍याकडे बघत म्हातारी हसतहसत म्हणाली " अर, तो बी तुझ्यासारखाच हाय. आता ताक सांभाळयाचे तर भाताचे आळ करून त्यात वतायला हव की नाय? नाय तर ते टिकेल काय? तो बी तसाच! आज हा गड घेतला उद्या ती चवकी. संबाळायची काळजी घेतली नाय तर काय उपेग? टिकणार हाय व्हय?" महाराज चमकले. घेणे जितके महत्वाचे त्याहून जास्त टिकवणे.
महाराज हा धडा आयुष्यभर विसरले नाहीत. मिळालेला पैसा त्यांनी गड बांधण्यात खर्च केला. सुरतहून लूट आणली पण ती राजमहाल बांधण्यात खर्च झाली नाही, पैसा गेला कोकणात सिंधूदुर्ग रचण्यात. महाराज गेल्यावरही औरंगजेबाला २५ वर्षे खर्च करून, आपली कबर महाराष्ट्रात बांधूनही हा चिमुकला प्रांत जिंकता आला नाही. कारण महाराजांना धडा शिकवणारी म्हातारी!
असे अनेक गुरू महाराजांनी केले असले पाहिजेत. त्यांच्याकडून मिळालेल्या कणाचा मण करणे ही प्रतिभा नि:संशय महाराजांची. हा गुरू होता की नव्हता हा वाद घालणारे करंटे आपण.

असो. आपल्या दुर्दैवाने पेशवाईत अशी म्हातारी नव्हती किंवा राजकर्ते तीला भेटले नाहीत. तो भाग पुढच्या लेखात.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

शंभर टक्के सहमत

त्यांनी अनेकांकडून कणाकणाने विद्या गोळा केली असली पाहिजे व देवदत्त गुणांनी त्याचे चीज केले असले पाहिजे. त्यांच्या महान कार्यामागे अनेकांची, भले चमचा चमचा असेल, शिकवण असणारच व ते सर्व त्यांचे गुरूच! अज्ञात, पण गुरूच!

मिळालेल्या कणाचा मण करणे ही प्रतिभा नि:संशय महाराजांची. हा गुरू होता की नव्हता हा वाद घालणारे करंटे आपण.

छत्रपती शिवाजी महाराजच काय पण कुण्याही मोठ्या व्यक्तीचा अमुक एक गुरू असा दावा ठामपणे करता येत नाही. महाराजांनी कणाकणाचा मण केला,भलेही कुणाकडून कणा ऐवजी चमचा भरून गुण घेतले असतील. पण कुणा एकानेच सगळी गुणांची पोतडी महाराजांच्या हवाली केली असला भंपक दावा टाळला तर वादच उरणार नाही.

भारी

मस्त लिहले आहे.

श्रीमान योगीतील गोष्ट

ही श्रीमान योगीतील गोष्ट आहे असे वाटते. चू. भू. दे. घे.

त्यांनी अनेकांकडून कणाकणाने विद्या गोळा केली असली पाहिजे व देवदत्त गुणांनी त्याचे चीज केले असले पाहिजे. त्यांच्या महान कार्यामागे अनेकांची, भले चमचा चमचा असेल, शिकवण असणारच व ते सर्व त्यांचे गुरूच!

हे खरेच. खालील कथा/ दंतकथातील व्यक्तीही राजांचे गुरूच.

कडा उतरून जाणारी हिरकणी शिकवून जाते की गडावरील चढ उतरण्यासाठी अशक्य वाटणार्‍या जागाही हिम्मत असल्यास सामान्य व्यक्ती सर करू शकते.

राजांचा सर्वात मोठा गुरू परिस्थिती. जर परिस्थीती नसती तर राजे निर्माण झाले असते का याबाबत थोडीशी शंका वाटते. खचलेला महाराष्ट्र, मोगलाई, दख्खनमधील अनेक मराठा घराण्यांची स्वार्थी वृत्ती, त्यातून आपली पोळी भाजणारे स्वकीय-परकीय राज्यकर्ते, पिचलेली जनता, उध्वस्त गावे, आपल्या पित्याची स्थैर्यासाठी झालेली वणवण वगैरे परिस्थिती राजांना जे शिकवून गेली असेल ते मानवी शिकवणीपेक्षा फार मोठे असावे.

सुरत

लेख आवडला. नेमका, आणि नेमक्या वेळी.

आवांतर-
आपण सुरतेहून आणलेल्या लूटीचा संदर्भ दिला आहे. ते वाचून आठवले.
जदुनाथ सरकारांच्या एका पुस्तकात असा उल्लेख आला आहे की,
सुरतेच्या लूटीतील इंग्रज सरकारचा भाग परत मिळावा या साठी इंग्रजांनी वारंवार व चिकटपणे प्रयत्न केले.
तेंव्हा राजे त्यांच्या कडून नवनवीन तंत्र्ज्ञान मागत होते. त्या वेळी इंग्रजांनी धूर्तपणे ते त्यांना मिळो दिले नाही. मोगलांना दुखवेल असे काहीहे करायचे नाही पण राजांना संदिग्धतेत ठेवा असा ब्रिटिशांचा कावा होता. आणि राजेही त्यांना वाटघांटीं मध्ये गुंतवत राहिले आणि इंग्रजांच्या तोंडाला पाने पुसत राहिले.

-निनाद

मस्त

कथा आवडली.

आपल्या दुर्दैवाने पेशवाईत अशी म्हातारी नव्हती किंवा राजकर्ते तीला भेटले नाहीत. तो भाग पुढच्या लेखात.

अहो पेशव्यांनी घरातच जेवणावळी केल्या. त्यांना बाहेर जाऊन जेवायची वेळच आली नाही त्यामुळे असे झाले. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

खरे आहे!

अहो पेशव्यांनी घरातच जेवणावळी केल्या. त्यांना बाहेर जाऊन जेवायची वेळच आली नाही

खरे आहे. पुण्याहून पानिपतास आणि अटकेपारपर्यंतसुद्धा रोजच्यारोज, वेळच्या वेळी जेवणा(वळी)चे डबे पोहोचते करून देणार्‍या डबेवाल्यांच्या यंत्रणेची कार्यक्षमता वाखाणावी तेवढी थोडीच.

मुंबईच्या डबेवाल्यांच्या यंत्रणेचे विनाकारण कौतुक केले जाते. पुण्याच्या पेशवेकालीन डबेवाल्यांच्या मानाने त्यांची कार्यकक्षा खरे तर काहीच नाही.

सहमत

पुण्याच्या पेशवेकालीन डबेवाल्यांच्या मानाने त्यांची कार्यकक्षा खरे तर काहीच नाही.

सहमत. दुर्दैवाने संभाजी ब्रिगेड व तत्सम संघटनांच्या काळात पेशवेकालीन डबेवाल्यांचा गौरव होणे शक्य नाही याचा खेद वाटतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काही सवाल

खरे आहे. पुण्याहून पानिपतास आणि अटकेपारपर्यंतसुद्धा रोजच्यारोज, वेळच्या वेळी जेवणा(वळी)चे डबे पोहोचते करून देणार्‍या डबेवाल्यांच्या यंत्रणेची कार्यक्षमता वाखाणावी तेवढी थोडीच.

अतिशय वाखाणण्याजोगा प्रतिसाद. टाळ्या. ह्यावर अधिक संशोधन व्हायला हवे. मनात काही सवाल पैदा झाले आहेत. पेशव्यांनी अटकेत जाऊन तिथले प्रसिद्ध कबाबबिबाब खाल्ले असतील काय? बाजीराव आपला डब्बा सहकाऱ्यांसोबत शेअर करत असे की घोड्याच्या पाठीवर बसून एकटाच खात असे?

निरसनाचा प्रयत्न

पेशव्यांनी अटकेत जाऊन तिथले प्रसिद्ध कबाबबिबाब खाल्ले असतील काय?

बहुधा नसावेत. पुण्याहून रोज डबा येत असल्याकारणाने स्थानिक पाककृती चाखण्याची संधी त्यांना फारशी मिळाली नसावी.

मात्र तेथील एखाद्या स्थानिक आचार्‍यास पकडून, त्यास जबरदस्तीने आपल्या डब्यातील कांदेपोहे भरवून, त्यास ती पाककृती जबरदस्तीने शिकवून आणि त्याच्याकडून त्या पाककृतीचा प्रसार करवून, त्याद्वारे त्यास आणि सर्व स्थानिक प्रजेस बाटवून कोंकणस्थ ब्राह्मण बनवण्याचा पेशव्यांचा मनसुबा त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही, याची मात्र पेशव्यांना कायम हुरहूर लागून राहिली, असे कळते.

पुढे त्यांच्या अतृप्त कामनापूर्तीचा प्रयत्न एकविसाव्या शतकात 'मिलिंद' नामक एका बल्लवाचार्याने (आडनाव आठवत नाही) 'झी टीव्ही' नामक एका प्रसारमाध्यमाद्वारे 'हरदिल लजी़ज़' नामक आपल्या कार्यक्रमातून कांदेपोहे, थालीपीठ आणि इतर अस्सल मराठमोळ्या पाककृती अस्खलित उर्दूतून सादर करून केला, असेही कळते.

बाजीराव आपला डब्बा सहकाऱ्यांसोबत शेअर करत असे की घोड्याच्या पाठीवर बसून एकटाच खात असे?

नक्की खात्री नाही. परंतु सदर डबा बनवण्यात मस्तानीचा यदाकदाचित काही हात असल्यास बहुधा असा डबा तो सहकार्‍यांबरोबर वाटून खात नसावा, हे तर्कास धरून आहे.

मस्तानीचा डबा

मस्तानीला खुद्द पेशव्यांच्या मुदपाकगृहात प्रवेश मिळाला असेल वाटत नाही. मात्र मस्तानीने स्वतःच्याच घरी बनवलेले काही स्वादिष्ट पदार्थ बाजीरावाला खिलवले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आपला,
(बाजीरावप्रेमी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मुदपाकखान्यात प्रवेशाची आवश्यकता नाही

मस्तानीला स्वतः घरी बनवलेला डबा डबेवाल्यामार्फत पाठवण्यास कोणी प्रतिबंध केला असेल असे वाटत नाही. (इतिहासाच्या तपशिलांबाबत आणि कालरेषेबाबत - इतिहासाचा हौशी किंवा व्यावसायिक अभ्यासक नसल्याकारणाने - माझ्या मनात प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे पहिल्या बाजीरावाच्या काळात नाना फडणवीस कार्यरत होता की नाही, याबद्दल मला निश्चित कल्पना नाही.)

कदाचित बाजीरावास पेशव्यांच्या मुदपाकखान्यातून एक (अधिकृत) आणि मस्तानीकडून दुसरा (खाजगी) डबा येत असण्याचीही शक्यता आहे. त्या परिस्थितीत बाजीराव मस्तानीकडून आलेला डबा स्वतः खात असण्याची आणि सरकारी डबा सहकार्‍यांस संपवण्यासाठी देत असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. (किंवा कदाचित याउलटही करत असणे शक्य आहे. पेशव्यांच्या मुदपाकखान्यातील आचारी आणि मस्तानी यांच्या तौलनिक पाककौशल्यावर बरेचसे अवलंबून आहे. त्याबद्दलचे तपशील तूर्तास ज्ञात नाहीत.)

मस्तानी लोहार?

कविसाव्या शतकात 'मिलिंद' नामक एका बल्लवाचार्याने (आडनाव आठवत नाही) 'झी टीव्ही' नामक एका प्रसारमाध्यमाद्वारे 'हरदिल लजी़ज़' नामक आपल्या कार्यक्रमातून कांदेपोहे, थालीपीठ आणि इतर अस्सल मराठमोळ्या पाककृती अस्खलित उर्दूतून सादर करून केला, असेही कळते.

हा बल्लवाचार्य मिलिंद सोवनी तर नव्हे

परंतु सदर डबा बनवण्यात मस्तानीचा यदाकदाचित काही हात असल्यास

यदाकदाचित असे असल्यास हा नवीन शोध आहे. म्हणजे मस्तानी लोहाराची असावी. किंवा मस्तानीने लोहारकाम शिकले असावे. चूभूद्याघ्या.

तोच असावा / कल्पना नाही

हा बल्लवाचार्य मिलिंद सोवनी तर नव्हे

तोच असावा. चेहरा ओळखीचा वाटतो. (पण त्या कार्यक्रमात त्या मानाने खूपच तरुण वाटला होता. असो. कार्यक्रम पाहूनही बरीच वर्षे लोटली.)

म्हणजे मस्तानी लोहाराची असावी.

कल्पना नाही. असूही शकेल. मस्तानीच्या जातीशी खुद्द बाजीरावास देणेघेणे नसल्यामुळे मी त्याची दखल घेण्याची गरज निदान मला तरी वाटली नाही. असो.

(('मियाँ-बीवी राजी़, तो क्या करेगा काजी़' या न्यायाने) बाजीराव-मस्तानीचा निकाह लावून देणार्‍या काजी़ला जेथे मस्तानीच्या जातीची फि़क्र नसावी, तेथे दख्ल्-अंदाजी़ची गुस्ताखी़ करून कबाब-में-हड्डी बनू पाहणारा मी बापडा कोण लागून गेलो?)

ते जाऊ द्या.

बाजीराव-मस्तानीची अजब प्रेमकहाणी हा लेख वाचा. वाचनीय आहे.
तो ब्राह्मणी आचार पाळीत नसे. मांसाहार, मद्यपान, धूम्रपान यात त्याला पाप दिसले नाही.

का दिसावे?

?

परिस्थिती

श्री. प्रियाली यांचे विचार अजिबात पटत नाहीत. महाराष्ट्रात महाराजांच्या आधी किमान १००
वर्षे अशीच परिस्थिती होती." राजा कालस्य कारणं " हेच या ठिकाणी जास्त लागू होते.
शरद

सहमत आहे !

>> श्री. प्रियाली यांचे विचार अजिबात पटत नाहीत.

सहमत आहे ! परिस्थितीतुन माणूस शहाणा होतो हे खरे आहे, पण माणसाच्या जडणघडणीत कोणाच्या तरी अनुभवाचा,शिक्षणाचा,संस्काराचा वाटा असतो. त्यामुळे इतिहासात महाराजांचे गुरु कोण याबद्दल पुरावे सापडत नसले तरी त्यांनी कणाकणाने विद्या गोळा केली असली पाहिजे व देवदत्त गुणांनी त्याचे चीज केले असले पाहिजे. हा शरदरावांचा विचार पटण्यासारखा आहे.

-दिलीप बिरुटे

१०० वर्षे

१०० वर्षे हा कालावधी फार कमी आहे हो. :-)

परिस्थिती निर्माण झाल्यावर लगोलग राजा बनत नसतो. राजा बनण्यासाठी अनेक पोषक गोष्टींची आवश्यकता असते. शहाजीराजांचे राजकारण, महाराष्ट्राची दुर्दशा, महाराजांच्या शिकवणीसाठी असणारी मंडळी, आई, प्रजा यासर्वांवर आलेल्या परिस्थितीमुळेच राजांचे अनुभवविश्व वाढले आणि शिवाजीराजे घडले असे मला वाटते.

परिस्थिती शेकडो माणसांना शहाणे करते पण एखाद्यालाच कर्ता करते. नाहीतर, सर्वच राजे व्हायचे. परिस्थिती निर्माण झाली म्हणून तिचा फायदा उठवणारा एखादाच असतो. बाकी सर्व निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अजिबात न पटण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही.

असो.

अनेक मान्यवर बिझनेस स्कूलमधून पदव्या प्राप्त करणारे, गुणीजनांच्या शिकवण्या लावणारे अनेक गुणवान विद्यार्थी आहेत म्हणून धीरूभाई अंबानी अशा बिझनेस स्कूलच्या वाट्याला न जाताही यशस्वी उद्योजक बनतात ही केवळ त्यांनी अनुभवलेली परिस्थिती, जिद्द आणि परिस्थितीचा फायदा उठवण्याची ताकद यांतून. नाहीतर, अंबानी बनण्यास पोषक परिस्थितीही अनेक वर्षे होती आणि पुढील अनेक वर्षे राहील पण सगळेच अंबानी बनतील असे नाही.

बिरूटे म्हणतात,

पण माणसाच्या जडणघडणीत कोणाच्या तरी अनुभवाचा,शिक्षणाचा,संस्काराचा वाटा असतो.

पोषक परिस्थिती नसेल तर अनुभव कसे येणार? उत्तमोत्तम शिक्षण देऊन राजे घडत नसतात. :-)

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

>>उत्तमोत्तम शिक्षण देऊन राजे घडत नसतात.

परिस्थिती असली काय अन् नसली काय ज्याच्या नशिबात 'राजे' होणे लिहिलेले असते ते होतातच.
मग तिथे परिस्थिती,शिक्षण,अनुभव असे काहीही आडवे येत नाही. अनेक लोक अनेक वेळेस जिद्दीने काम करतात तेव्हा सर्वच काही 'अंबानी' होत नाही. परिस्थिती निर्माण झाली म्हणून तिचा फायदा उठवणारा एखादाच असतो च्या ऐवजी एखाद्यालाच असा त्या परिस्थितीत असा 'टच' होतो की त्या परिस्थितीत तोच कर्ता होतो.

असो, विषयांतरामुळे थांबतो ! :)

-दिलीप बिरुटे

याचाच अर्थ

परिस्थिती असली काय अन् नसली काय ज्याच्या नशिबात 'राजे' होणे लिहिलेले असते ते होतातच.

याचाच अर्थ राजांना कोणत्याच गुरूची आवश्यकता नाही असा होतो. मग म्हातारी, दादोजी, जिजाबाई असल्या काय आणि नसल्या काय राजे त्यांच्या नशिबाने घडले असतेच.

आता पुस्तकांतून गुरू काढले काय आणि ठेवले काय, काय फरक पडतो. ;-) राजांना नशिबाने राजे बनवले असे मानले की झाले. :-)

:)

>>याचाच अर्थ राजांना कोणत्याच गुरूची आवश्यकता नाही असा होतो. मग म्हातारी, दादोजी, जिजाबाई असल्या काय आणि नसल्या काय राजे त्यांच्या नशिबाने घडले असतेच.

हम्म, त्याच्यासाठी थोडे प्रयत्नही करायला हवेत, मग दैवी स्पर्शाची मदत होते. नुसते नशिबावर विसंबून चालत नाही. :)

>>पुस्तकांतून गुरू काढले काय आणि ठेवले काय, काय फरक पडतो. ;-) राजांना नशिबाने राजे बनवले असे मानले की झाले. :-)

तसे नाही, राजेंचे जे विधीलिखित होते तेच झाले, होणार आहे. :)

-दिलीप बिरुटे
(गोची झालेला )

धिरूभाई अंबानी

धन्यवाद प्रियालीताई. परिस्थिती एकच असतांना एखादेच धिरूभाई निघतात हे निदर्शनास
आणून देवून तुम्ही परत राजा कालस्य कारणं हे दाखवून दिले आहे.
शरद

परिस्थिती एकच?

ढोबळ मानाने परिस्थिती एकच मानू पण वैयक्तिक परिस्थिती सर्वांसाठी एकच नसते.

शहाजीराजांची वणवण, त्यांची मानहानी, त्यातून घडलेले त्यांचे व्यक्तिमत्व, शहाजी-जिजाबाईंची ताटातूट वगैरे परिस्थिती सर्वच समकालीन मराठी सरदारांमध्ये होती असे मला वाटत नाही.

याचप्रमाणे, ज्यांच्यावर अन्याय होत होते त्या सर्वांकडे जहागिरी वसवण्याची, शाह्या बदलण्याचे राजकारण करण्याची, उत्तम शिक्षक उत्पन्न करण्याची, जिजाबाईंसारखी महत्त्वाकांक्षी खमकी आई असण्याची परिस्थिती असेलच असे नाही.

धीरूभाईंचे उदाहरणही यासाठी आले की -

फारा वर्षांपूर्वी मला सांगितली गेलेली गोष्ट आहे. दंतकथा नाही, खरी आहे पण तपशील माझ्या लक्षात नाहीत.

मी ज्या टेक्स्टाईल मशिनरी बनवणार्‍या कंपनीसाठी प्रोजेक्ट करत असे तेथील एका अकाउंट ऑफिसरने सांगितलेला लहानसा किस्सा आहे. तो असा की ज्यावेळेस (कित्येक वर्षांपूर्वी) या कंपनीचे मालक एका मोठ्या टेक्स्टाईल कंपनीत मानाने मिटिंगा करण्यासाठी जात (नेमके आठवत नाही. बॉम्बे डाईंग वगैरे असावी) त्यावेळेस धीरूभाई स्कूटरवर धाग्यांची रिळे बांधून कंपनीच्या आवारात ताटकळत उभे राहात. त्यांना विचारणारेही कोणी नसे. आज सुस्थितीतून वर आलेले आमचे मालक तेथेच आहेत कारण ते आधीच सुस्थितीत होते यापेक्षा मोठे होण्याची महत्त्वाकांक्षाच नाही. फक्त आपला बिझनेस सांभाळत बसले परंतु धीरूभाई बघा कोठे पोहोचले.

तेव्हा, दोघांसाठी ढोबळ परिस्थिती तिच असली तरी वैयक्तिक परिस्थिती फार वेगळी असते आणि ती परिस्थिती अनेक गोष्टी शिकवून जाते.

बाकी, राजा कालस्य कारणम् याचा अर्थ माझ्या संस्कृताच्या अत्यल्प ज्ञानावरून असा वाटतो की राजा हाच (चांगल्या/ वाईट) काळाला कारण/कारणीभूत असतो. याचा शिवाजी घडण्यासाठीचा नेमका संबंध कोणता ते कळले नाही. शिवाजी राजा बनल्यावर त्याच्या शासनासाठी हे वाक्य लागू ठरेल कदाचित्.

अवांतरः राजा कालस्य कारणम् हे वाक्य महाभारतातील आहे आणि ते वेगळ्या संदर्भात येते असे वाटते.

युधिष्ठीर चिंतेने भीष्माला विचारतो की दुर्योधनाच्या राज्यात प्रजेची स्थिती कशी आहे? दुर्योधनासारखा दुष्ट शासनकर्ता लाभल्याने पिडीत आहे की हा काळच वाईट सुरू आहे. त्यावर भीष्म पितामह वरील वाक्य उच्चारतात आणि युधिष्ठिराला सांगतात की काळ (चांगल्या/वाईट) राजाला कारण आहे की राजा (चांगल्या/वाईट) काळाला कारण आहे याबाबत शंकित होऊ नकोस. काळ वाईट असेल आणि म्हणून राजा वाईट बनला तर याबाबत काहीच करता येणे नाही कारण काळ आपल्या हातात नाही पण (वाईट) राजाच (वाईट) काळाला काराण असतो हेच खरे आहे आणि यावरच तू विश्वास ठेव.

चू. भू. द्या. घ्या.

जुने जाऊंद्या मरणालागुनी|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद् यांनी"शिवाजी महाराजांचे गुरू"हा चर्चाप्रस्ताव चांगल्या पद्धतीने मांडला आहे.वाचनीय आहे. शिवाजिराजे अनुभव आणि निरीक्षण यांतून शिकले.त्यांचे अनेक गुरु होते.हे सगळे खरे.पण श्रीराम,श्रीकृष्ण, तसेच पांडव यांनासुद्धा लहानपणी शिकविणारे गुरु होते.शिवाजी राजे हे सरदारपुत्र होते.तेव्हा लहानपणी तरी त्यांना शिकविण्यासाठी नियुक्त केलेले कोणी एक गुरु असणार हे निश्चित. वृत्तपत्रात आलेली बातमी या गुरूविषयी आहे. मात्र या गुरूची जात कोणती यावर खल करणे हा करंटेपणा आहे हे मान्य.
खरेतर इतिहासात गढून जाणे हे निरर्थक आहे.कवि केशवसुत म्हणतातः
.....जुने जाऊंद्या मरणालागुनी|
.....जाळुनी किंवा पुरुनी टाका |
.....सडत न एका ठायी ठाका|
.....सावध ऐका पुढल्या हाका|
..खांद्यास चला खांदा भिडवुनी||
"आमचे पूर्वज महापराक्रमी होते.आम्हाला तेजस्वी इतिहास आहे.इतरांना केवळ भूगोल आहे.जय तानाजी!जय जय बाजी (पासलकर)!! असे म्हणत इतिहासात गुंगून राहाणे म्हणजे एका जागी सडत ठाकणे.प्रगतीसाठी भविष्याचा वेध घ्यायला हवा.(सावध ऐका पुढल्या हाका).समाज एकसंध हवा.(खांद्यास चला खांदा भिडवुनी|) जातीयवादाने दशखंडित झालेले राष्ट्र प्रगती करू शकत नाही.[कवीचा द्रष्टेपणा आणि त्याची अचूक अभिव्यक्ती यांनी मी अचंबित होतो.]

उत्तम

उत्तम लेख लिहिल्याबद्दल शरदरावांचे अभिनंदन.
समजा एखाद्या श्रीमंत वा राजघराण्यातील मुलाला घरी शिकवणी लावली. शिक्ष़क घरी येउन शिकवु लागले. समजा वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळे शिक्षक. शिक्षकांना मानधन मिळाले.पुढे हा मुलगा आपल्या कर्तुत्वावर् यशस्वी झाला.त्याच्या पुढील अनेक गुरुंपैकी त्याला बालपणीचे गुरु एका कार्यक्रमात भेटले. त्याने गुरुंना नमस्कार केला.बातचीत केली. तो प्रसंग मिडियाने टिपला. त्याचे गुरु म्हणुन पुढील इतिहासात नोंद झाली.

@प्रियाली

राजांचा सर्वात मोठा गुरू परिस्थिती. जर परिस्थीती नसती तर राजे निर्माण झाले असते का याबाबत थोडीशी शंका वाटते.

अगदी जुळे मुलांचे उदाहरण घेतले. राम और शाम.जन्मकुंडली जवळजवळ सारखीच १५ मिनिटांचा फरक. निर्माण झालेली सामाजिक,कौटुंबिक,आर्थिक परिस्थिती समानच.परिस्थितीमुळे येणारी संधी समानच. एक यशस्वी होतो दुसरा सर्वसाधारणच राहतो.
ज्योतिर्प्रकाश घाटपांडे

पटले नाही.

अगदी जुळे मुलांचे उदाहरण घेतले. राम और शाम.जन्मकुंडली जवळजवळ सारखीच १५ मिनिटांचा फरक. निर्माण झालेली सामाजिक,कौटुंबिक,आर्थिक परिस्थिती समानच.परिस्थितीमुळे येणारी संधी समानच. एक यशस्वी होतो दुसरा सर्वसाधारणच राहतो.

याचा संबंध गुरूशी कसा? एकाच वर्गात एकाच वयाची आणि एकच गुरू ज्यांना शिकवतो अशी ५० मुले पकडा. त्यातील एखादाच प्राविण्य मिळवून पहिला येण्याची शक्यता असते कारण त्याने आपली वैयक्तिक उन्नती कशी साधली हे त्या व्यक्तिवर अवलंबून असते. जुळ्या मुलांच्याबाबतही हेच. त्यांना समान गुरू मिळाले. समान विद्या मिळाली म्हणून दोघे यशस्वी होतीलच असे नाही.

साक्षात परमेश्वरही परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय भूमीवर अवतरत नाहीत असे म्हटले जाते. ;-)

 
^ वर