माझ्या संग्रहातील पुस्तके - ७ कुसुमगुंजा

जी.ए.कुलकर्णींच्या काहीशा अपरिचित पुस्तकांपैकी एक म्हणजे १९८९ साली प्रकाशित झालेले 'कुसुमगुंजा' हे पुस्तक. या पुस्तकाची रचना व त्याचे नाव जी.एंनी आपल्या हयातीत ठरवले होते, मात्र या पुस्तकावर शेवटचा हात फिरवण्याइतका वेळ बाकी त्यांना मिळाला नाही. जी.एं च्या 'माणसे - अरभाट आणि चिल्लर' या पुस्तकाबाबतीतही असेच झाले आहे. पण 'माणसे' प्रमाणेच 'कुसुमगुंजा' हे पुस्तकही अपूर्ण किंवा कच्चे वाटत नाही.
'कुसुमगुंजा' हा जी.एंनी त्यांच्या हयातीतल्या वेगवेगळ्या टप्प्यांत लिहिलेल्या छोट्या कथांचा संग्रह आहे. यातल्या सर्व कथा जी.एंच्या नेहमीच्या कथांच्या तुलनेत अगदी लहान आहेत. 'एक मित्र - एक कथा' ही लेखसदृश कथा ही या संग्रहातील सर्वात मोठी. पण अस्सल प्रतिभावंताला वातावरणनिर्मितीसाठी भारंभार लिहावे लागत नाही, हा दृष्टांत देणार्‍याच जणू या कथा आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुरुषोत्तम धाक्रस म्हणतात,'ज्याच्या लिखाणातील शब्द काढता येत नाही किंवा काढताना दहा वेळा विचार करावा लागतो तो लेखक महान - या पट्टीने मोजून घ्यावा असा हा लेखक असल्याचे इथे सतत जाणवते.' 'कुसुमगुंजा' तील कथाकथांवर जी.एंची अशी एक न पुसली जाणारी स्वाक्षरी आहे. अर्थात अट्टल जी.ए.प्रेमींना 'काजळमाया' किंवा 'पिंगळावेळ' च्या तुलनेत 'कुसुमगुंजा' मधील काही कथा किंचित खांडेकरी छापाच्या आणि बाळबोध (बालीश हा शब्द लिहायला हात कचरतो!) वाटण्याची शक्यता आहे (अगदी 'सोनपावले' मधल्या कथांइतक्या नसल्या तरी!) जी.एंना गूढकथा व काहीशा रहस्यमय छापाच्या कथांचेही आकर्षण होते हे एक, आणि आरंभीच्या काळात जी.एंच्या कथांवरील चेकॉव्हचा प्रभाव हे दुसरे लक्षात घेतले तर 'क्षुद्र', 'देवपूजा', 'लिरा', काळी आजी' या कथांमधून हळूहळू स्वतःच्या वाटेला जाणारे जी.ए. दिसू लागतात. जी.एंच्या पश्चात त्यांच्या काही हस्तलिखितांवरुन आणि ध्वनीफितींवरुन घेतलेल्या 'तपकिरी बी', 'कधी तरी','पिवळा पक्षी' वगैरे कथाही या संग्रहाची पाने वाढवण्यासाठी परचुरेंनी घातलेले पाणी आहे की काय असे वाटू लागते. पण या पुस्तकाच्या मध्यात असलेल्या 'चैत्र', 'लग्न', बारसे', ' फेड', ' सिनेमा', 'ग्रहण', 'गार्‍हाणे','होळी', 'एक मित्र-एक कथा' या कथा बाकी चोख बावनकशी आहेत. यातली 'अंधार' ही कथा खरे तर 'सांजशकुन' मध्ये कशी काय आली नाही याचे नवल वाटते. जी.एंच्या काही अप्रतिम दृष्टांतकथांपैकी ही एक. रखरखत्या उन्हातून प्रवास करणारे दोन प्रवासी. पैकी एक अंध. त्यांच्या वाटेत आलेला एक भव्य रुद्र तेजस्वी पुरुष.अंधाला प्रकाश म्हणजे काय ते माहीत नाही, तर त्या भव्य पुरुषाला अंधार म्हणजे काय हे माहीत नाही. त्याला प्रकाशाचा चिरंतन शाप आहे. हे एकदोनदा ऐकून त्या अंधाचा सहप्रवासी विचारतो,
"मनुष्याच्या वाट्याला दु:ख आलं, पण रात्रीच्या शांत विश्रांतीची देणगीही आली. ती सम्राटापासून दरिद्री माणसापर्यंत सगळ्यांना मिळते. हा अंध आहे. त्याला चांदण्याचं वैभव माहीत नाही, पाण्यावरील जरतारी नक्षी ठाऊक नाही. पण तोदेखील स्वतःच्या दु:खापासून स्वतःला अंधारात हरवतो. मग आपणंच असं का म्हणता?"
तो भव्य पुरुष किंचित हसला. ते हसणे आर्त होते. त्याचा आवाज भोवती पसरलेल्या उन्हाप्रमाणे धगधगीत होता.
"पण माझ्या वाट्याला मात्र चिरंतन प्रकाशाचा शाप आला. तू मानव असून भाग्यवान आहेस. हे मानवा, मी सूर्य आहे."
'चैत्र', 'लग्न', 'बारसे', 'फेड', 'सिनेमा' या कथा लहान मुलांभोवती फिरतात. यातल्या
विषयी मी पूर्वी लिहिले होते. 'फेड' हीसुद्धा अशीच एक सुरेख कथा. (गेल्या वर्षी एका कार्यक्रमात 'फेड' आणि 'पराभव' या जी.एंच्या कथांचे दूरदर्शनसाठी केलेले रुपांतर पाहिले होते आणि असले काही जी.एंच्या हयातीत झाले नाही याचेच समाधान वाटले होते!) 'ग्रहण' हीसुद्धा अशीच एक खास जीएस्पर्श असलेली कथा. पावसात भिजत ग्रहणाचे दान मागायला आलेल्या म्हातारीच्या कटकटीला कंटाळून दादूभट एक फाटका सदरा देतो खरा, पण काही उनाड टाळकी हिसकाहिसकी करुन त्या सदर्‍याचा एक हातच फाडून पळवून नेतात. त्या पोरांवर चिडलेल्या दादूभटाकडे बघून म्हातारी हसत म्हणते,"हेच तर बेस झालं दादा. म्हातारीची कटकट र्‍हायली नव्हं! नाही तर बघा, डोळे फोडून घेत म्हातारीलाच उसवत बसावं लागलं असतं सगळं किचकट्ट! पोरांनी उपकारच केला की डोंगराएवढा. अवो, आता काय सांगायचं नशीब? माझ्या पोरग्याला पुरा उजवा हातच नाही वो दादा!"
'गार्‍हाणे' ही तसे विशेष काही कथासूत्र नसलेली पण उत्तम कथा. संततीसौख्याला पारख्या झालेल्या रमाकाकूंचे ते एक व्यक्तिचित्रच. पण जी.एंचा स्पर्श या व्यक्तिचित्राला विलक्षण उंची देऊन जातो. तसलेच एक व्यक्तिचित्र 'एक मित्र-एक कथा' मध्ये आहे आणि इथे बाकी हा माणूस हयात असता तर आपण त्याला भेटायला गेलो असतो असे मला वाटून गेले. जी.एंसारखेच पराकोटीचे पूर्वग्रह आणि इसाळ बाळगून असलेला हा तर्कटी डोक्याचा खरखरीत माणूस पण साबणाच्या वड्यांसारख्या एकसारख्या एक दिसणार्‍या मऊ बुळबुळीत माणसांमध्ये हा आणूस एक उग्र ओरखडा काढून गेला असावा असे वाटले. याच कथेत एका जहाजावरील गर्भार मांजरी व बुशमास्टर साप यांच्याविषयी 'अर्गसी' मासिकात प्रकाशित झालेल्या एका कथेचा उल्लेख आहे. या कथेचे भाषांतर करण्याचे मनात असूनही ते जी.एंकडून झाले नाही याची जी.एंना चुटपूट लागलेली दिसते. तशी ती आपल्यालाही लागते.
आणि या संग्रहाचाचा शेवट करणारे ते दीड पानाचे व्याकूळ टिपण - 'निरोप'. आपल्या शर्तींवर ताठ मानेने जगून, लेखन, वाचन, चित्रे, चहा, पुस्तके, सिगारेटी यांच्यात शांत गावात रमून आणि जनांच्या गलबल्यातून सतत दूर राहून कुणाच्या नकळत पलीकडे निघून गेलेल्या एक तपस्व्याचा निरोप. 'माझे हात रिकामे दिसले तरी ते रिते नाहीत' असे दिंडी उघडणार्‍या द्वारपालांना सांगणारा निरोप. धुळीने भरलेल्या अनवाणी पण रोख पावलांनी घेतलेला निरोप.आणि या निरोपाचीही जी ए याचना करत नाहीत, तर पुस्तक वाचताना पान उलटावे तितक्या सहजपणाने हातातले हात सोडवून घेऊन अंधारात निघून जातात. 'काही झाले तरी माझ्या आयुष्यभर तू सांगाती सहप्रवास केलास. आता आपले मार्ग निराळे होत आहेत. अशा या अंतिम क्षणी तू मला मुक्त मनाने निरोप दे. कारण आता मी निघालो आहे. मला स्वच्छ निरंजन मनाने निरोप दे' हे वाचताना काळा चष्मा लावलेला, मधोमध भांग पाडलेला, तपकिरी रंगाचा कोट घातलेला हा माणूस हळूहळू दिसेनासा होतो. त्याच्या हातातील जळत्या सिगारेटचे टोक काही काळ अंधारात चमकत राहाते. नंतर तेही दिसेनासे होते. आपले पुस्तक वाचून संपलेले असते.
जेमतेम सव्वाशे पानांचे पण विलक्षण अनमोल असे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
कुसुमगुंजा
परचुरे प्रकाशन मंदिर
आवृत्ती पहिली १० जुलै १९८९
मूल्य १२५ रुपये

Comments

पुस्तक परिचय आवडला

वाचून संग्रह वाचण्याबद्दल उत्सूकता निर्माण झाली आहे.

अंध-सूर्याच्या दृष्टांतकथेतील उतारा, "निरोप" कथेचे वर्णन सर्वच पुरेशी माहिती देऊनही उत्कंठा जागृत ठेवते.

पुस्तक परिचय आवडला.

माझ्याही

हे पुस्तक माझ्याही संग्रहात आहे. पुस्तक परिचय विशेषतः शेवटचा परिच्छेद फार आवडला. या पुस्तकातील 'एक मित्र एक कथा' ही तर जीएंचीच आत्मचरित्रपर कथा वाटते. एखादा सुरेख चित्रपट पाहिल्याचा अनुभव ही कथा वाचताना येतो.

दुर्दैवाने पुस्तक हाताशी नसल्याने चुटपुट लागून राहिली. (फेड ही कथा मी ब्लॉगवर छापली आहे.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चैत्र

वर उल्लेख केलेल्या 'चैत्र' या कथेविषयीचे लिखाण इथे आहे.

सन्जोप राव
काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद.

परीक्षण

आवडले, 'सांजशकुन'मधल्या रूपककथांवर स्वतंत्र लेख याच मालिकेत कधी लिहिलात तर वाचायला नक्कीच आवडेल. या पुस्तकाचे नाव 'कुसुम्बगुंजा' ठेवावे असे जीएंच्या मनात होते असा उल्लेख 'सोनपावले'त वाचल्याचा आठवतो.

किंचित अवांतर - अर्गसी मासिक हेच असावे काय?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सांजशकुन आणि कुसुंबगुंजा

या पुस्तकाचे नाव 'कुसुम्बगुंजा' ठेवावे असे जीएंच्या मनात होते असा उल्लेख 'सोनपावले'त वाचल्याचा आठवतो
खरे आहे. 'कुसुमगुंजा' याला काहीच अर्थ नाही. 'कुसुंबगुंजा' म्हणजे कुसुंबाच्या (छोट्या) गुंजा असा अर्थ (शांता शेळकेंनी) सांगितला होता, असे काहीसे वाचल्याचे आठवते.
'सांजशकुन' वर लिहिणे ही कल्पना आकर्षक असली तरी सद्यस्थितीत न पेलवणारी आहे. हे धनुष्य दुसर्‍या कुणी उचलले तर त्याचे स्वागत.
अर्गसी मासिक दुव्यात दिलेले तेच असावे. अमेरिकन साहित्याविषयीचा जीएंचा घाऊक तिटकारा ध्यानात घेता हे जरा नवलाचे आहे, पण अर्गसीचा उल्लेख 'एक मित्र -एक कथा' मध्ये जी.एं च्या मित्राने केला आहे, हे मी विसरत होतो...
सन्जोप राव
काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद.

पुस्तकओळख

पुस्तकओळख आवडली. अधुन मधुन दिलेली काही वाक्यं वाचुन खास जिए वाचनानंतरचा फील येतो, खरंखरं जग समोर आणुन ठेवल्यासारखा.

वाचायला हवे

हे वाचून कुसुमगुंजा वाचायला हवे असे वाटले.

जी.एंच्या पश्चात त्यांच्या काही हस्तलिखितांवरुन आणि ध्वनीफितींवरुन घेतलेल्या 'तपकिरी बी', 'कधी तरी','पिवळा पक्षी' वगैरे कथाही

जी. ए. कथा ध्वनीमुद्रीत करून ठेवत असत?
हे वाचून नवल वाटले. असा उल्लेख मी वाचला नव्हता.

कुणाकडे त्यांचे ध्वनिमुद्रण असेल तर ऐकायला आवडेल.

आपला
गुंडोपंत

ह्म्म्

>>हे वाचून कुसुमगुंजा वाचायला हवे असे वाटले.

कुसुमगुंजाच नव्हे, जीएंची सर्वच पुस्तके वाचायला हवीत, इतके हॅमरिंग मराठी संकेतस्थळावर जीएंबद्दल झाले आहे. पुस्तकाची ओळख (नेहमीच्याच पठडीत) करुन दिल्याबद्दल...धन्यू....!

-दिलीप बिरुटे
(खोडसाळ)

ध्वनीमुद्रण

जी.एंनी त्यांच्या कथांचे काही सरसकट ध्वनीमुद्रण केले नाही. मुग्धा व मनीषा या त्यांच्या भाच्यांसाठी त्यांनी काही कथा ध्वनीमुद्रण करुन पाठवल्या होत्या. मी त्यातले काही वाचले आहे पण ते जी.एंचे लिखाण मला तरी काही खास वाटत नाही.

सन्जोप राव
काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद.

घातक विधान

<<अस्सल प्रतिभावंताला वातावरणनिर्मितीसाठी भारंभार लिहावे लागत नाही, हा दृष्टांत देणार्‍याच जणू या कथा आहेत>>

ह्या वाक्याच्या संदर्भात जी. एंनी लिहीलेल्या (बहुतांशी) दीर्घ कथांचे समर्थन कसे करावे?

असली घातक समर्थने इतरही क्षेत्रात केली जातातः

उदा. १. अमुकतमुक संगीतकाराने कधी दोन अथवा तीनपेक्षा जास्त वाद्ये वापरली नाहीत (बहुधा त्याची ती आर्थिक ऐपत नव्हती, अथवा/आणि मोठा ऑर्केस्ट्रा संभाळण्यास तो/ती समर्थ नव्हता(ती)).
उदा. २. अमुकतमक संगीतकाराने फारच जपून कामे घेतली, स्वतःला हवे तसे काम करता यावे म्हणून (बहुधा त्याला वैविध्य हाताळता येत नव्हते). मग साडेतीन चित्रपटांच्या गाण्याच्या बळावर तो रसिकांनी मानवलेला संगीतकार झाला आहे.

आणि ती पोकळ असतात.

जी. एंनी लघुकथांचा प्रांतही तितक्याच समर्थपणे हाताळला, असे म्हणणे रास्त ठरावे.

मला असे वाटते

<<अस्सल प्रतिभावंताला वातावरणनिर्मितीसाठी भारंभार लिहावे लागत नाही, हा दृष्टांत देणार्‍याच जणू या कथा आहेत>>

>>ह्या वाक्याच्या संदर्भात जी. एंनी लिहीलेल्या (बहुतांशी) दीर्घ कथांचे समर्थन कसे करावे?

मराठी लेखकात केवळ जीएच एक तितके (वातावरणनिर्मितीच्या बाबतीत) प्रतिभावंत आहेत, दुसरे कोणीच नाही. इतकाच त्या वाक्याचा अर्थ असावा असे वाटते.

-दिलीप बिरुटे

'ठिक ठिक'

पुस्तक वाचले आहे. पुस्तक आणि परिक्षण दोन्ही 'ठिक ठिक' वाटले.
(गुळाची चव नसणारा) ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

धन्यवाद.

पुस्तक आणि परिक्षण दोन्ही 'ठिक ठिक' वाटले.
'ठीक ठीक' वाटले असते तर अधिक बरे वाटले असते. असो.
सन्जोप राव
काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद.

धन्यु!

अपेक्षेनुसार चुका (जाहिरपणे) दाखवल्याबद्दल धन्यु!

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

प्रतिक्रिया

पुस्तकपरीक्षण आणि एकूणच हा उपक्रम आवडला.

"कुसुमगुंजा" मागे वाचलेलेच होते. आज परत त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. परीक्षणकर्त्याने लिहिलेल्या पुस्तकाबद्दलच्या बहुतांश मतांशी सहमत आहे. परीक्षणाची संयत् शैली विशेष आवडली. जीएंच्या धीरगंभीर , अर्थसंपृक्त लिखाणाला न्याय देणारे परीक्षण.

"कुसुमगुंजा" हे जरी काही झाले तरी जीएंचेच् लिखाण असले , तरी या कथासंग्रहाला काजळमाया , रमलखुणा, पिंगळावेळ , हिरवे रावे , पारवा , रक्तचंदन यांच्या पंक्तीत मी मनोमन बसवत नाही. साहित्यात असला पंक्तिप्रपंच करणे वगैरे काहीसे बालीश असले तरी , मनात काही खूणगाठी आपण बांधतो त्यातली एक. उपरोल्लेखित कथासंग्रहातल्या एकूण एक कथांमधे जीएंची सर्व शक्ती पणास लागल्यासारखे वाटते. एखाद्या कलावंताला सूर्याची उपमा द्यायचीच झाली तर् , या कथासंग्रहांच्न्या काळात जीए तळपत होते. पॉप्युलरची छपाई , गोरे आणि अवचट यांच्या मुखपृष्ठांपासून , द भि कुलकर्णींच्या ब्लर्ब पर्यंत , सर्व काही "श्रीमत्" वाटते. त्यामानाने , परचुर्‍यांची छपाई , शाम जोशींची चित्रे आणि खुद्द जीएंच्या जुन्या, अविकसित काळातल्या ऐवजाला एकत्र बांधणे हा काहीसा लाईट्-वेट् कारभार झाला.

मात्र एक गोष्ट अधोरेखित करायला हवी : हे जे काही उत्खनन-वजा काम आहे तेसुद्धा महत्त्वाचे आहे. पाश्चात्य देशांत अनेक थोर लेखकांच्या अप्रकाशित साहित्याचा शोध लागल्यावर अभ्यासकांना घबाड हाती लागल्यासारखे वाटते. लेखकाची जडणघडण कशी झाली याच्यावर हे असे प्रयत्न अनमोल प्रकाश जरूर टाकतात. but they certainly cannot be termed as an artist's "crowning glory".

जी.एं चे मतभेद

पॉप्युलरची छपाई , गोरे आणि अवचट यांच्या मुखपृष्ठांपासून , द भि कुलकर्णींच्या ब्लर्ब पर्यंत , सर्व काही "श्रीमत्" वाटते. त्यामानाने , परचुर्‍यांची छपाई , शाम जोशींची चित्रे आणि खुद्द जीएंच्या जुन्या, अविकसित काळातल्या ऐवजाला एकत्र बांधणे हा काहीसा लाईट्-वेट् कारभार झाला.

आपल्या पुस्तकाची छपाई, मुखपृष्ठ वगैरे बाबतीत जी.ए. फार काटेकोर होते.मुखपृष्ठाबाबत त्यांचे नंतर (पुण्यात आल्यानंतर) अवचटांशीही खूप मतभेद झाले. द.भिं. चे ब्लर्ब तर माझ्या माहितीनुसार जी.एं च्या निधनानंतरच त्यांच्या पुस्तकांवर दिसू लागले. एरवी अगदी सुरवातीला जी.ए. आणि द.भि.यांनी एकमेकांविरुद्ध अगदी चिडून लिहिले आहे.
लेखकाची जडणघडण कशी झाली याच्यावर हे असे प्रयत्न अनमोल प्रकाश जरूर टाकतात
खरे आहे. 'कुसुमगुंजा' मधल्या साधारण अर्ध्याअधिक कथा जी.एं च्या धडपडण्याच्या काळातल्या आहेत. इतर अर्ध्या मात्र खर्‍याखुर्‍या जी.ए. ठशाच्या आहेत.
एकूणच हा उपक्रम आवडला
आभारी आहे. वाचकांनी आपापल्या परीने यात भर घालून हा 'डेटाबेस' वाढवावा, असे (पुन्हा एकदा) आवाहन करावेसे वाटते.
सन्जोप राव
काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद.

 
^ वर