भारतातील मंदिरे-६
भारतातील देवालये-६
आजच्या शेवटच्या भागात निरनिराळ्या " शैलीं"ची माहिती घेवू. कोणतीही दोन देवळे सारखी नसतात, नव्हे, ती सारखी असू शकत नाहीत. कारण ती कुठल्यातरी कारखान्यात तयार झालेली नसतात. निरनिराळ्या कलाकारांनी, निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वेळी त्यांची निर्मिती केलेली असते. त्यामुळे प्रत्येक देऊळ "एकमेव"च असते. तरीही प्रत्येक देवळात काही गोष्टी समान असणारच, उदा. गाभारा, विमान, मंडप इत्यादी सर्व देवळात आढळणारच. तसेच कलाकारांची "घराणी" असतात व त्यातील प्रत्येक कलाकाराच्या कृतीत साम्य असणारच.पण या साम्यांमुळे "शैली" निर्माण होत नाही. त्याकरता पाहिजे "स्थपति". (Architect and Chief Engineer). याच्या डोळ्यासमोर देवळाचा आराखडा तयार होतो व त्याप्रमाणे पुढे काही वर्षात देऊळ तयार होते. असे देऊळ पाहिल्यानंतर पुढच्या स्थपतीला ती कल्पना आवडली तर तो त्या प्रमाणे (तोच नव्हे) दुसरा आराखडा तयार करतो, देऊळ बांधतो. हळुहळु नवीन "शैली" जन्म घेते. उत्तर हिंदूस्थानात हिमालय होता, स्थपतीला तो भावला, त्याने गगनचुंबी, उत्तुंग विमान असलेले देऊळ बांधले. तो मुख्य आदर्श समोर ठेवून तयार झालेल्या देवळांना "नागर शैली"ची असे नाव पडले. दक्षिणेत उंची ऐवजी ऐसपैस लांबी-रुंदी असलेली देवळे प्रसारात आली, त्यांना "द्राविड शैली" म्हणू लागले. संमिश्र प्रकार करून पाहिला, तो लोकप्रिय झाला नाही,मागे पडला, नाहिसा झाला. सर्वसाधारणपणे देवळे चौकोनी असतात, पण काही गोलाकारही बांधली गेली (केरळ,कर्नाटक).ती झाली "वेसर" शैली.
तर अशा या तीन प्रमुख शैली. ओरिसा, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्तान, गुजराथ येथे मुख्यत्वे करून नागर शैली प्रसारात होती. मुख्यत्वे म्हणावयाचे कारण उत्तर हिंदुस्थानातही द्राविड शैलीची देवालये आहेत. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू व केरळात द्राविड शैली आढळते. पण पट्टडकलला नागरी देवालये आहेतच.
वर सांगितल्या प्रमाणॆ कोठल्याही शैलीत copy हा प्रकार नव्हता. त्यामुळे या प्रमुख शैलींमध्ये उपशैली निर्माण होऊं लागल्या. यांना नावे देतांना राजघराण्यांची नावे देण्यात आली.उदा. साळुंकी, चालुक्य,होळसाळ, इत्यादी. या शिवाय स्थानिक नावे आहेतच.उदा. काश्मीरी,ओडिसी वगैरे. आता सर्व शैली-उपशैलींची सविस्तर माहिती देणे तर शक्य नाही.( हे अगदीच खरे नाही पण तांत्रिक माहितीत फ़ारच थोड्यांना रस असतो). थोडक्यात बघू.
नागर शैली : गाभारा,समोर लंब चौकोन मंडप,गाभारा व मंडप यांच्यामध्ये अंतराळ,मंडपात प्रवेश करवयाला अर्धमंडप हे मुख्य भाग. गर्भगृहावर निमुळते होत जाणारे उंच शिखर.प्रांगण असेल तर त्यात छोटी उपमंदिरे, मंदिराच्या इतर भागावर मुख्य शिखरा-पेक्षा कमी उंचीची शिखरे. गया येथील बुद्ध मंदिर,
काश्मीर उपशैली : गोथिक शैलीचा मोठा प्रभाव.दगडी भिंती, खांब, त्रिकोणी वा अर्धगोलाकृती कमानी, छप्पर व घुमट. सर्व दगडाचे.स्तंभ हेलेनिक,छप्पर पिरॅमिड पद्धतीचे. देवगड येथील मार्तंड मंदिर.
कलिंग (ओरिसा) उपशैली : एकापुढे एक चार दालने : अर्पणगृह, नृत्यशाला, प्रार्थनागृह व गाभारा. यांनाच भोगमंदिर, नटमंदिर, जगमोहन आणि देऊळ असेही म्हणतात. भोवती तट व त्यात लहान लहान मंदिरे.गाभाऱ्यावर उंच शिखर, इतर तीनांवर कमी उंचीची शिखरे.. बाह्यांगावर नक्षीकाम, आंतरभागात नाही. बहुधा खांब नाहीत. भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर.
चंदेल(बुंदेलखंडी) उपशैली : कलिंग पेक्षा फ़रक म्हणजे दालने वेगळी नाहीत तर एकमेकांना जोडलेली. अर्धमंडप,मंडप व महामंडप अशी तीन दालने सर्वांना शिखरे, सर्वत्र, शब्दश: सगळीकडे, छपरावर, भिंतींवर, खांबांवर , दरवाज्यावर मूर्ती कोरलेल्या. प्रवेशद्वारावर अलंकृत तोरण. चार कोपऱ्यात चार उपमंदिरे. खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिर.
चालुक्य व सोळंकी (राजस्थान-गुजराथ) उपशैली : मुख्य गाभारा व पुढे सभामंडप अशी दोनच दालने. शिखर खजुराहो पद्धतीचे व दालनाचे छप्पर घुमटाकृती. ( मुस्लिम वर्चस्वाचा प्रभाव ?) पाया कोनाकृती व नक्षीदार खांब, मोढेराचे सूर्यमंदिर. दिलवाडा येथील जैन मंदिरे.
द्राविड शैली :यात देवळाचा खालचा भाग चौकोनी असला तरी वरचा भाग (शिखराजवळ) अष्टकोनी वा बहुकोनी असू शकतो. या पद्धतीच्या देवालयाचे मुख्य चार भाग असे.
(१) गोपुर : प्रवेशद्वारावर उभारलेले अनेक मजली उत्तुंग शिल्प. याचे शिखर कळसासारखे नसते तर बैलाच्या डोक्यासारखे रुंद व शृंगयुक्त असते. गोपुर एक असेल किंवा अनेक असतील.
(२) मंडप : गोपुरातून आत आल्यावर देवाकडे जाण्याच्या मार्गात उभारलेले ,अलंकृत स्तंभ असलेले शिल्प.
(३) विमान : गाभारा व शिखर मिळून मुख्य देऊळ होते. त्याला विमान म्हणतात.
(४) छत्र्या किंवा घुमट्या असलेल्या वेदिका.
गाभाऱ्यावर लांबी-रुंदी-उंची कमी कमी होत गेलेल्या मजल्यांचे निमुळते शिखर असते.प्राकारात तळी, विहिरी, अग्रशालाही आढळतात. गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळात बांधल्या गेलेल्या देवळांवरून ही पद्धती सुरू झाली असावी, अंतर्बाह्य सजावट आणि टोलेजंगपणा वाढत गेला. सातवे शतक ते सोळावे शतक या काळात ह्या शैलीची भरभराट झाली. गुहामंदिरे व एकपाषाणी देवळे (रथ) हेही या काळातलेच. मग गुहामंदिरे व रथ मागे पडले व त्यांच्या सारखीच विशाल मंदिरे निर्माण करावयास सुरवात झाली. कांचीपुरम येथील कैलास व वैकुन्ठ पेरुमल मंदिर.
वेसर शैली : ही देवळे वर्तुळाकृती किंवा लंबवर्तुळाकृती असतात. नागर व द्राविड शैलींच्या मिश्रणातून ही निर्माण झाली.
चालुक्यांच्या कारकिर्दीत उगम झालेल्या या शैलीत नागरर्पेक्षा द्राविड शैलीची छाप जास्त दिसते. विमान व मंडप असे दोनच भाग असतात. . लक्कुंडी, इट्टगी येथील देवालये या शैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत.
.
होयसाळ शैली :. चालुक्य शैली पासून निघालेल्याया होयसाळ राजवटीतल्या मंदिरांचा पाया बहुकोनाकृती असतो. शिखरे द्राविड शैलीचीच असतात. फ़क्त कळस तेवढा घुमटाकार असतो व त्यावर एक छत्र असते.उंची लांबी-रुंदीच्या मानाने कमी असते. आराखडा फ़ार देखणा म्हणता येणार नाही पण ही कमतरता मूर्तीकामाने भरून काढलेली असते. अप्रतिम मूर्तीकामासाठी पहा : हळेबिड, बेलुर व सोमनाथपुर
विजयनगर शैली : होयसाळ वळण कायम ठेवून त्यात पुन्हा द्राविड शैली मिसळली की विजयनगरची शैली तयार होते.
या शैलीची सुंदर मंदिरे आपणास पहावयास मिळतील : हंपी, वेलोर, कांची, कुम्भकोणम व श्रीरंगम येथे.
इथे थांबू. विसाव्या शतकात बांधलेली मंदिरे आपणास माहीत असतीलच. मला विचारावयाचे आहे की महाराष्ट्रातील पुढील मंदिरे किती जणांनी पाहिली आहेत ? सिन्नरचे गोडेश्वर,लोणारचे दैत्यसूदन, अंबरनाथचे...
लेखमाला लिहावयाचा उद्देश आपल्या प्राचीन देशाच्या वैभवशाली परंपरेची ओळ्ख करून देणे. त्यामुळे पंढरपुर, तिरुपती,काशी, नाशिक, इत्यादी तीर्थस्थानांना जागा दिलेली नाही. तोही आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. कोणीतरी त्यावरही लिहावे.
श्री. चित्रा, धनंजय आदींनी दिलेल्या छायाचित्रांनी लेखमाला चित्ताकर्षक झाली. धन्यवाद.
शरद
Comments
चित्रांचे दुवे ..
शरद यांनी व्यनिमधून विनंती केल्यामुळे त्यांच्या लेखातील काही मंदिरांची काही चित्रे शोधून लावत आहे, काहींचे दुवे देत आहे.
काश्मीर येथील मार्तंड मंदिर
आणि अजून एक मार्तंड मंदिराचे छायाचित्र
भुवनेश्वर -लिंगराज (विकीवरील छायाचित्र)
आणि त्यावरील एक शिल्प (भुवनेश्वर)
खंदरिया महादेव मंदिर (आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) -
तेथील काजळ घालणारी स्त्री -
कांचीपूरम येथील दुवा १ आणि २
अजून एक दुवा
केशव मंदिर - सोमनाथपूर (विकीचा दुवा)
चांगली लेखमाला
सहाही भाग वाचनीय आहेत. लेखमाला उत्तम झाली. धन्यवाद.
+१
असेच म्हणतो.
सहाही भाग छान जमले आहेत. आवडले.
विद्याधर
हेमाडपंथी
हे नाव लहानपणापासून ऐकत आलो आहे. ती एकादी उपशैली आहे का?