फोर्थ डायमेन्शन ११
अतिप्रगत अवकाश तंत्रज्ञानामुळे अंतराळ प्रवासासंबधीच्या सर्व तांत्रिक व जैविक अडचणीवर मात करून सुरक्षित प्रवास करत इतर ग्रह व उपग्रहांना भेट देणे आता सहज शक्य झाले आहे. वेगवेगळया ग्रह-उपग्रहावर प्रवासी म्हणून जाणे हे आता नित्याचीच बाब झाली आहे. असा प्रवास घडवून आणण्यासाठी अनेक प्रवासी कंपन्या एकमेकाशी स्पर्धा करत असतात. वेबसाइटवर क्लिक केल्यास स्पेस टूरिझमची हजारो संकेत स्थळांची यादी, त्यांची आकर्षक जाहिरातींची लाखो पाने, व या कंपन्या देत असलेल्या प्रचंड प्रमाणातील सोई-सुविधा, खर्चातील सूट, व बरेच आणखी काही... हे सर्व वाचताना ग्राहक भांबावून जातो.
अशाच एका प्रवासी कंपन्याफ्की जयंताच्या मालकीची टेलिट्रान्सपोर्टेशन ही कंपनी नावाजलेली आहे. अती जलद व सुखकर प्रवास हे या कंपनीचे वैशिष्टय आहे. पृथ्वीवरून मंगळ ग्रहावर जाण्यासाठी एकेकाळी अनेक वर्ष लागत होती व तो प्रवासही तितकासा सुखकर नव्हता. दाटीवाटीने एका यानात बसणे, अनेक जीवघेण्या चाचण्या, खाण्या-पिण्यासंबंधीच्या जाचक अटी इत्यादीमुळे प्रवास नकोसा वाटे. शिवाय सुरक्षित प्रवासाची व परत मूळ मुक्कामी पोचण्याची हमी त्यात नव्हती. आता मात्र टेलिट्रान्सपोर्टर एक्सप्रेसच्या बूथमधून केलेला प्रवास हा प्रवास असा वाटतच नव्हता. पृथ्वीवर झोपायचे व मंगळावर उठायचे... काही तासाचा हा प्रवास अत्यंत बिनधोक होता.
जयंता नेहमीच या बूथमधून ठिकठिकाणी प्रवास करत असे. टेलिट्रान्सपोर्टर एक्सप्रेसमधून हजारो प्रवासी मंगळ ग्रहावर जावून आले होते. आज मात्र त्याच्या कंपनीवर एका असंतुष्ट प्रवाश्यानी सदोष मनुष्यवधाचा खटला भरला होता. ही कंपनी प्रवासाच्या काळात प्रवाश्यांचे खून करते व फक्त त्यांच्या क्लोन्सना तेथे पाठवते, असा त्याच्यावर आरोप होता. जयंताला प्रथम हे काय चालले आहे तेच कळेनासे झाले होते.
मुळात टेलिट्रान्सपोर्टेशन तंत्रज्ञानाबद्दलच फिर्यादीचा आक्षेप होता. टेलिट्रान्सपोर्ट तंत्रज्ञान तसे फार सोपे होते. या तंत्रज्ञानात अंतरिक्ष प्रवासासाठी एका विशिष्ट प्रकारच्या बूथची रचना केलेली असते. प्रवासी बूथमध्ये गेल्यानंतर मेंदूसकट शरीरातील प्रत्येक अवयवाच्या पेशींचे स्कॅनिंग करून प्रवाश्याची संपूर्ण जनुकीय माहिती गोळा केली जाते. त्यानंतर प्रत्येक अवयवाचे पेशीमध्ये विघटन करून या पेशींना निद्रितावस्थेत ढकलले जाते. या मृतसदृश (!) पेशींची मोट बांधून प्रकाश शलाकामधून प्रकाशवेगाच्या अनेक पटीने मुक्कामाच्या ठिकाणी पाठवले जाते. इष्ट ठिकाणी पोचल्यानंतर त्या पेशींना जिवंत केले जाते. अगोदरच्या जनुकीय माहितीनुसार पेशींची जोडणी केली जाते व शरीर व मेंदूना पूर्ववत आणले जाते. परग्रहावर जिवंत झालेल्या या प्रवाश्यांच्या भावना, बुध्दी, संवेदना, आठवणी, गुणविशेष, शारीरिक जडण-घडण, चेहरापट्टी इ.इ. सर्व हुबेहूब मूळ प्रवाश्यासारखेच असतात. त्याच्या शरीर रचनेत तिळमात्र फरक दिसणार नाही. त्यामुळे अस्सल काय व नक्कल काय हा प्रश्नच उद्भवत नाही. तरीसुध्दा त्याच्यावर खटला भरल्याबद्दल जयंताला आश्चर्य वाटत आहे. खटला भरणाऱ्याच्या मते जयंताची कंपनी खून करते व खुनी माणसाच्या क्लोन्सला प्रवासाला पाठवते.
जयंताला यात काहीतरी घोटाळा आहे असे वाटते. तो स्वत:च अनेक वेळा टेलिट्रान्सपोर्टरमधून प्रवास करून आलेला आहे. त्याला प्रवासामुळे आपल्यात काही बदल झाला आहे याची थोडीसुध्दा शंका नाही. शंकेचे निरसन करण्यासाठी म्हणून जयंता पुन्हा एकदा समोर उभ्या असलेल्या बूथमध्ये चढून स्कॅनिंगच्या बटनापाशी बोट ठेवतो... व त्याच क्षणी आपण आत्महत्या तर करत नाही ना? .... आत्महत्या...
(Source: Reasons and Persons, Derek Parfit (OUP) -1984)
आपल्या जगण्यातील सातत्य कशावर अवलंबून असते? साधारणपणे आपल्या शारीरिक हालचाली-वरून अपण अजून जिवंत आहोत ही भावना आपल्यात असते. शारीरिक अवयवांचे चलनवलन हे जिवंतपणाचे लक्षण असे रूढ अर्थाने समजले जाते. परंतु आजकाल शरीरातील कुठलेही अवयव कृत्रिमपणे तयार करणे शक्य झाले असून त्याच्या हालचालीचे स्वतंत्रपणे निरीक्षण करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे निव्वळ अवयवांच्या हालचालीवरूनच आपण जगतो अशी समजूत करून घेत असल्यास ते योग्य वाटत नाही.
आपल्याला जिवंत असण्याची जाणीव मनामध्ये होत असते म्हणून आपण जिवंत असतो का? असाही प्रश्न विचारता येईल. ज्या दिवशी माणूस स्वत:च्या आठवणी, भविष्यकालीन योजना, व्यक्तिमत्त्वातील सर्व तपशील व इतर अनेक बारीक सारीक खाणाखुणा विसरू लागतो वा हरवून बसतो त्या दिवशी तो मेला असे म्हणण्यास हरकत नसावी. म्हणूनच आजकाल डॉक्टर्स ब्रेन डेड होईपर्यंत उपचार करत राहतात. हार्ट डेड हे मृत्युचे लक्षण ठरत नाही. कारण ह्रदयाचे स्पंदन वर्षानुवर्षे कृत्रिमरित्या व्हेंटिलेटरच्या सहा!याने (परवडत असल्यास!) चालू ठेवणे सहज शक्य आहे. परंतु मेंदू मृत झाल्यास काहीही करता येत नाही.
व्यक्तीची खरी ओळख म्हणून आत्मभान, जाणीवा, संवेदना यातील सातत्य हा सिध्दांत चटकन भावणारा आहे. त्यामुळे या नश्वर शरीराला काही महत्व द्यायचे कारण नाही. कदाचित आपण आपले मानवी शरीर फेकून देऊन एखाद्या प्राण्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो ही कल्पनाच भन्नाट वाटेल. कथा कादंबऱ्या, पुराण कथा याच्यामधून अशा प्रकारच्या परकायप्रवेशाची वर्णन वाचताना आपण रोमांचित होत असतो. प्राणी कुठलाही असो.. बेडूक, मांजर, घोडा, हत्ती....परकाय प्रवेश केलेली ती विशिष्ट व्यक्ती त्या अनोळख्या शरीरात आहे याबद्दल आपल्याला कधीच संशय येणार नाही. परंतु असे करताना त्या त्या प्राण्याच्या शारीर धर्माला अनुसरून वागणे याला पर्याय नाही. कुत्र्यासारखे भुंकावे लागेल, हत्तीसारखे सोंड हलवावे लागेल. त्यामुळे परकायप्रवेशित प्राणी व इतर प्राणी यातील फरकच कधी कळू शकणार नाही.
टेलिट्रान्सपोर्टेशन तंत्रज्ञानात आपली जाणीवही शाबूत राहते. त्याचबरोबर आपल्या शरीराची हुबेहूब प्रतिकृती पण तयार होते. क्लोनिंगचे तंत्रज्ञान वापरून (मेंदूसकट) आपली प्रतिमा तयार केली आहे हे कधीच उमजणार नाही. क्लोन वा प्रतिकृतीमध्ये मूळ व्यक्ती नसते. एकाच साच्यामधून काढलेल्या वस्तूप्रमाणे क्लोन्स दिसत असतात. त्यांच्यामधील सारखेपणात कुठलीही चूक सापडणार नाही. ती एक हुबेहूब प्रतिमा असते. दोघेही समोरासमोर आल्यास अस्सल कोण व नक्कल (क्लोन) कोण हे कळण्यास काही मार्ग नाही. त्यातील एखाद्याचा तुकडा उडाल्यास दुसऱ्याला काही इजा होणार नाही. त्यावरून एकमेकामधील फरक लक्षात येईल. परंतु क्लोन कोण हे कधीच लक्षात येणार नाही.
टेलिट्रान्सपोर्टर मधील बूथ कसे काम करते याची पूर्ण कल्पना जयंताला आहे. हे यंत्र प्रत्येकाला प्रवासाच्या वेळी क्लोन करून पाठवते हेही खरे आहे. परंतु याचे खरे पाहता दु:ख व्हायचे काहीही कारण नाही. या क्लोनमध्ये मूळ व्यक्तीच्या सर्वच्या सर्व जाणीवा शाबूत आहेत. शरीरात काहीही बदल नाही. त्यामुळे मूळ व्यक्तीच हवे हा अट्टाहास कशापायी? प्रवासाच्या मधल्या काळात जी प्रव्रि।या घडते याच्याशी आपले काही देणे घेणे नाही. बूथमधून सहिसलामत बाहेर पडून पाऊल ठेवतो यात संशयास्पद तर काहीच नाही.
हा तर्क सुसंगत आहे असे वाटत असल्यास आपल्याला अजून एका शक्यतेचा विचार करावा लागेल. तुम्ही झोपेत असताना टेलिट्रान्सपोर्टरमधून तुमचे अपहरण करून काही तासात परत तुम्हाला तुमच्या बिछान्यावर आणून सोडल्यास या मधल्या काळात नेमके काय घडले हे कधीच कळणार नाही. आता तुम्ही मूळ व्यक्ती आहात का क्लोन हेसुध्दा कळणार नाही. तुमच्या जाणीवा शाबूत आहेत. तुमचे शरीर आहे तसे आहे. चेहरापट्टीत अजिबात बदल नाही. टेलिट्रान्सपोर्टेशनमुळे तुमच्या जीवाला व तुमच्या जगाला थोडासासुद्ा धक्का पोचला नाही. जर असेच घडत असल्यास क्लोन म्हणून भुई सपाटण्यात काही अर्थ नाही.
यावरून आता समोर उभा असलेला जयंता खरा की खोटा हा प्रश्नच अत्यंत चुकीचा ठरेल. प्रश्नच विचारायचे असल्यास त्याच्या भूतकाळाविषयी प्रश्न विचारू शकता. भविष्यातील योजनांची चर्चा करू शकता. यावरून त्याच्या मानसिक सातत्यात काही बदल घडलेत का याचा अंदाज घेवू शकता. त्यामुळे आपला त्याच्या मानसिक सातत्याशीच फक्त संबंध राहील, शारीरिक सातत्याशी नव्हे!
Comments
मस्त!
खुप दिवसांनी झकास काही तरी वाचायला मिळाले.
धन्यवाद!
हा तर्क सुसंगत आहे असे वाटत असल्यास आपल्याला अजून एका शक्यतेचा विचार करावा लागेल. तुम्ही झोपेत असताना टेलिट्रान्सपोर्टरमधून तुमचे अपहरण करून काही तासात परत तुम्हाला तुमच्या बिछान्यावर आणून सोडल्यास या मधल्या काळात नेमके काय घडले हे कधीच कळणार नाही. आता तुम्ही मूळ व्यक्ती आहात का क्लोन हेसुध्दा कळणार नाही.
या विचाराने गुंगच झालो!
नक्की कोणत्या कल्पनेतून कशी मुक्ती मिळून मोक्ष मिळवायचा हा आता भलताच मोठा आणि वेगळा प्रश्न बनत चालला आहे. :)
आपला
गुंडोपंत
वा!
वा! वेगळं काहितरी वाचून फ्रेश वाटलं..
रॉबिन कुकची कादंबरी घेतली की काय असं वाटु लागलं :)
अजून येऊ दे
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
गमतीदार धागा
व्यक्तीची (आणि वस्तूची) अस्मिता नेमकी कशात असते? या प्रश्नाबद्दल विचार करायला लावणारा लेख आहे.
यावरून तीन कथा आठवल्या -
१. एक चित्रपटाची "द प्रेस्टीज"
या चित्रपटात दोन जादूचे प्रयोग करणार्या कलाकारांमधली स्पर्धा दाखवली आहे. पैकी त्यांच्यातील स्पर्धा हे महत्त्वाचे कथानक बाजूला ठेवू. पण एकाला वरील लेखात सांगितली ती क्लोनची पद्धत सापडते, पण आपला क्लोन दुसरीकडे पोचला, की तो आपला आदला अवतार अक्षरशः ठार मारवायचा.
२. तशीच कथा "द फ्लाय" यात एका वैज्ञानिकाला हे विघटन-संघटन करून प्रवासाचे यंत्र बनवण्यात यश मिळते. पण त्याची चाचणी तो स्वतःवरती करतो. पण चाचणीच्या वेळेला तो+एक माशी प्रवास करतात, आणि दुसर्या बाजूला संघटित होताना दोन्ही प्राणी मिसळून एकच होऊन बाहेर पडतात. मग पुढे भयकथा.
३. तिसरी कथा एक विचारप्रयोग आहे - (थॉट एक्स्पेरिमेंट) - द स्टोरी ऑफ अ ब्रेन. लेखक - आर्नोल्ड झुबॉफ.
यात एक श्रीमंत मनुष्य एका दुर्धर रोगाने मरण पावत असतो, पण त्याच्या मेंदूवर रोगाचा काहीच परिणाम झालेला नसतो. तो विचार करतो: हे शरीर म्हणजे काही नाही. "मी" म्हणजे माझ्या मेंदू-मज्जासंस्थेत कुठेतरी आहे. तर मेंदू जर शाबूत ठेवला, मज्जातंतूंना विजेच्या तारांनी चेतवले, तर "मी" शाबूत राहीन. म्हणून तो डॉक्टरांकडून तसे करवतो.
पुढे लोक विचार करतात, की मेंदूतील वेगवेगळ्या भागांना जोडणारे तर मज्जातंतूच आहेत. मग मेंदूचे सोयीस्कर भाग करून प्रत्येक भागाला विजेच्या तारांनी चेतवतात. असे करत करत मेंदूच्या प्रत्येक पेशीला वेगळे करून विजेच्या तारांनी चेतवतात. या कोटी-कोटी पेशी कुठल्याकुठे असतात. मग हा मेंदू, त्यातला "मी" अजून शाबूत राहिला आहे का?
- - -
वरील दुव्यात दोन अन्य तत्त्वज्ञ (डग्लस हॉफ्स्टॅड्टर आणि डॅनियल डेनेट) या विचारप्रयोगावर टीका टिप्पणी करतात.
या लेखाच्या संदर्भात वरील प्रयोग आठवायचे कारण असे - मूळ व्यक्तीचे विघटन झाल्यानंतर पण क्लोनची रचना पूर्ण होईपर्यंत व्यक्तीचे भाग विस्कळित असतात - तेव्हा "मी" कुठे असतो? कुठेतरी असतो का?