आधी कळस मग पाया
आधी कळस मग पाया ("गिरिशिल्प"ची पुरवणी)
चाळीसएक वर्षांपूर्वी पहिल्यांदा वेरुळला गेलो होतो तेंव्हा कैलासला वरून सुरवात केली हे ऐकून फ़ार आश्चर्य वाटले होते. नंतर वेरुळच्या वाऱ्या झाल्या, थोडेफ़ार वाचन झाले.आज कौतक वाटते, आश्चर्य नाही. छपरापासून सुरवात करावयाची, मग पाया पुरा करावयाचा ही परंपरा आहे व ती "कैलास"च्या आधी किमान ५०० वर्षे पूर्वीपासूनची आहे हे समजल्यावर कलाकृतीचे कौतक शिल्लक राहिले, पद्धतीचे आश्चर्य नाही. ही परंपरा कोणती ?
परंपरा कोणती हे बघण्या आधी गिरिशिल्प व मैदानातील मंदिर यांच्या बांधणीतला महत्वाचा फ़रक लक्षात घेतला पाहिजे. मंदिर बांधतांना तुमच्या समोर उघडे मैदान असते व तुम्हाला आकाशाकडे जाणारी इमारत बांधावयाची असते. पीठ, खांब-भिंत, छप्पर हे याच क्रमाने बांधावे लागतात. हे "जोडणीचे" काम आहे. निरनिराळ्या गोष्टी बाहेरून आणून एकत्र जुळवावयाच्या आहेत.छप्पर जागेवर रहावे म्हणून भिंत पाहिजे, भिंत उभी रहावी म्हणून पीठ पाहिजे. म्हणजे क्रम ठरला. नागर शैली घ्या, द्राविड शैली घ्या. क्रमात फ़रक नाही.
गिरिशिल्पाच्या बाबतीत जबरदस्त फ़रक पडतो. येथे काम "जोडणीचे" नाही, "कोरणीचे" आहे. येथे बाहेरून आणून काहीही जोडावयाचे नाही. जमीनीपासून आकाशापर्यंत असलेला "गिरि" आयता तयार आहे. तुम्हाला त्यात काहीही मिळवावयाचे नाही. शिल्पकाराला एकाने विचारले " तुम्ही मूर्ती कशी घडवली"? तो म्हणाला " मी मूर्ती घडवली नाही, ती पूर्वीच दगडात होती.
मी फ़क्त मूर्ती भोवतीचा दगड काढून टाकला". गिरिशिल्पात कलाकाराला हेच बघावयाचे असते, करावयाचे असते. नैसर्गीक गुहेत त्याला चैत्य-विहार-मंदिर निर्माण करावयाचे आहेत. तो पहिल्यांदी छप्परच करणार.वरून पडणारे दगड बाहेर फ़ेकून देणार, मग भिंती तयार करणार, पडलेले दगड बाहेर फ़ेकणार व शेवटी जमीन करणार. अगदी साधी खोली तयार करावयाची तरी पद्धत हीच. दोन-दोन, तीन-तीन, चार-चार मजली गुंफ़ा तयार केल्या. त्या वेळीही पद्धत ही वापरली. सर्वात वरचा मजला पहिल्यांदी, त्या नंतर त्या खालचा, सर्वात शेवटी तळमजला. काम करावयास सोपे, लाकडी टेकूंची गरज कमी, फ़ोडलेले दगड बाहेर भिरकावणे कमी त्रासाचे. ही पद्धत इसवी सनापूर्वी पासून वापरली जात होती. वर ५०० वर्षे म्हटले, ८०० च म्हणा.
वेरुळ येथील काम गिरिशिल्प असल्याने या पारंपारिक पद्धतीने केले गेले तर फ़ार आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. तीन बाजूंनी चर खणून मिळालेल्या महाकाय दगडात केले असल्याने गुहेत करण्यापेक्षा थोडे सोपेच झाले असावे.वेरूळचे काम शंभरएक वर्षे चालले होते म्हणतात.म्हणजे कलाकारांच्या चार पिढ्या,आश्चर्य याचेच वाटते की इतक्या दीर्घ कालावधीतही कलेचे सातत्य टिकून राहिले.धन्य ते कलाकार कीं ज्यांची श्रद्धा, जी या महान कलाकृतीमागची प्रेरणा होती, इतकी वर्षे टिकून राहिली!
दिलेला वेरुळाचा फ़ोटो फ़ार चांगला नाही पण चर दिसावेत म्हणूनच दिला आहे. पुढील शेवटच्या लेखात निरनिराळ्या शैलींची थोडक्यात ओळख करून घेऊ.
शरद
Comments
धन्यवाद !
वेरुळप्रमाणे अशी गिरीशिल्प अजून कुठे आहेत का ? काही फोटो बिटो आहेत का कुठे ?
'गिरिशिल्प' च्या पुरवणीबद्दल धन्यू....!
>>पुढील शेवटच्या लेखात निरनिराळ्या शैलींची थोडक्यात ओळख करून घेऊ.
हे म्हणजे 'आधी कळस मग पाया' असे झाले ! :)
-दिलीप बिरुटे
वेरुळचा फ़ोटो
कृपया वेरुळचा फ़ोटो भारतातील मंदिरे-५ मधला बघावा.
शरद
धन्यू...
वेरुळचे माहीत आहे, पण इतरत्र देशभर (जगभर) अशी कुठे गिरीशिल्पे आहेत का, असे म्हणतोय !
-दिलीप बिरुटे
आहेत
हे इजिप्तमधील उदाहरण :
लेखाची शैली आवडली. पण लेख त्रोटक वाटला. (अर्थात एक लेख लिहायला वेळ केवढा लागतो याची कल्पना आहे, त्यामुळे ही टीका समजू नये, केवळ अधिक लिहीता आले असते असे वाटले).
लेख आवडला
छान! लेख आवडला.
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)