माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ३

माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य
भाग ३

तेरा काम हो जाएगा

अगस्त्य नाडीमधील ९व्या कांडातून मला एका पौर्णिमेला पांडेचरीच्या अरविंद आश्रमात जाऊन तेथे ध्यानाला बसावे असा आदेश आला. त्या प्रमाणे मी तेथे बुद्धपौर्णिमेला गेलो. नंतरच्या आदेशाप्रमाणे योगी रामसूरत कुमारांच्या तिरुवन्नमलाईच्या आश्रमात गेलो. योगी रामसुरत कुमार मुळचे उत्तरभारतीय असून ते कित्येक वर्षे तमिळनाडूत राहिल्याने तेथिलच एक बनले होते. ते कोणाशीही न बोलता फेऱ्या मारत. जमलेल्यांना हाताच्या इशाऱ्याने आशीर्वाद देत. असे ते करत असताना त्या दिवशी त्यांनी ‘तेरा काम हो जाएगा’ असे हिंदीतून जोरात ओरडून म्हटले होते. जमलेले सर्व भविक लोक तमिळ भाषी असल्याने त्यांना उद्देशून हिंदीतून असे म्हटलेले वाक्य अचंभ्यात टाकणारे होते. ते बोल माझ्यासाठी होते असे मला नंतर जाणवले. याबाबतचे माझे विचार माझ्या एका लेखातून (नाडी भविष्य आवृत्ती १ पान ३४ ते ३६) प्रकाशित झालेले असल्याने त्याचा उल्लेख मी इथे टाळत आहे.
मध्यंतरीच्या काळात पुन्हा पांडेचरी व तिरुवन्नमलाईच्या आश्रमांना भेट करावी म्हणून ठरवले. सौ. अलका व मी पांडेचरीच्या बसमधे चढलो. संध्याकाळची वेळ. सुसाट वेगात बस चाललेली. त्यात गप्पांना रंग आलेला. होता-होता दिंडीवनम् गाव आले. आणि आम्ही दुसऱ्या बसमधे चढलो. पुन्हा गप्पा चालू झाल्या. पांडेचरीला काय खरेदी करायचे वगैरे ठरत होते. अचानक मी ट्रान्समधे गेल्या्प्रमाणे बोलू लागलो, ‘ते पुस्तक असेल पण मासिकाच्या आकारात, किंमत १०-१२ पर्यंत असेल, वर महर्षींचा फोटो, ५०-६० पाने असतील’. मधेच असे तुटक तुटक बोलणे तिला कळेना. मी मात्र विचारात इतक रंगलो की नंतरची खरेदी, हॉटेलात खाणे, राहणे हे माझ्या लेखी काही नव्हतेच. शेवटी ‘आता थांबणार का?’ असा सौंकडून पुकारा झाला. तेंव्हा ती २-३ तासांची तंद्री हळू हळू कमी झाली. त्यानंतर योगी रामसूरत कुमारांच्या आश्रमात घडलेल्या विलक्षण घटनेचा तपशीलवार उल्लेख पुस्तकात केला गेला आहे. त्या दिवशी आम्ही घरी परतलो. तेंव्हा मध्यरात्र झाली असताना देखील माझ्या फाईल मधून मीच माझ्या हाताने नवव्या कांडातील वर्णनाची टेपचालवून मराठीत भाषांतर केलेल्या मजकुराचा कागद पत्नीच्या हातात दिला. त्यात लिहिलेले होते, ‘एका अमावास्येला योगी राम सूरत कुमारांच्या आश्रमात जाणे होईल. सोबत एक व्यक्ती असेल. त्यावेळी जमलेल्या लोकांसमक्ष योगी त्याला कृपा आशीर्वाद देतील तेंव्हा उपस्थित सर्वांना चकीत व्हायला होईल.
भिंतीवरील कालनिर्णय दिनदर्शिकेतील ७ ऑगस्ट १९९४ तारखेचे वर्णन ‘अमावास्या’ असे होते ते पत्नीला दाखवले. तेंव्हा तीही त्या दिवशी आश्रमात घडलेला अदभूत प्रकार आठवून थक्क झाली.
त्या दिवशी सकाळी बसच्या प्रवासात अचानक मी हिंदीतून एक चिठ्ठी बनवली. त्यात मी म्हटले होते – ‘अगस्त्य महर्षींच्या नाडी ग्रंथ भविष्यातील ९व्या कांडातील आदेशाप्रमाणे हा जीव आपल्या समोर प्रस्तूत आहे . – शशिकांत ’. योगींच्या भेटीला सर्वांना रांगेने आत सोडायला लागल्यावर मी ओळ मोडून तडक आत गेलो व योगींच्या अगदी जवळ जाऊन त्यांच्या पायापाशी ती हिंदीतून लिहिलेली चिठ्ठी व पेन ठेवले व योगींच्या फेरी मारण्याच्या वाटेवर फतकल मारुन बसलो. योगी रामसूरत कुमार कोणाशीही बोलत नसत. स्त्रिया व पुरुषांच्या वेगवेगळ्या भागात विभागणी केलेल्या चिंचोळ्या वाटेत ते अधुन-मधून फिरत व उपस्थितांना आशीर्वाद दिल्यासारखा हाताने इशारा करत असत. त्यांच्याशी संवाद साधणे एरव्ही शक्य नव्हते. अशा परिस्थितीत तेथल्या व्यवस्थापनाची शिस्त मोडली गेल्याने बराच हंगामा झाला. आधीच्या भेटीत ओळखीचे झालेले मॅनेजर धावले. त्यांनी ती चिठ्ठी व पेन उचलून आपल्या खिशात टाकले. मला उद्धेशून म्हणाले, ‘हीच का एअरफोर्सची शिस्त?’ मी वरमलो. पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. असा पाणउतारा कोणी केला नसल्याने तिला ते सहन झाले नव्हते. नंतर ती चिठ्ठी त्यांनी परत योगींच्या पुढ्यात ठेवली. त्यांची सेवा करणाऱया पट्टशिष्या माँ देवकी यांनीही ती चिठ्ठी पाहिली. हिंदीतील असल्याचे पाहून परत योगींच्यापाशी दिली. ती चिठ्ठी योगींनी चष्मा घालून वाचल्याचे सर्वांनी पाहिले. नंतर योगींच्या शिष्यगणांनी भजनाला आरंभ केला. कडाक्याचे भजन चालू असताना योगी उठले व फेऱ्या मारत असताना अचानक माझ्या जवळ येऊन बसले. माझे हात हातात घेऊन कुरवाळत माझ्याशी बोलले. नंतर आपल्या जवळ बसायला सांगितले. एका अमेरिकन शिष्याने त्यांच्यावर केलेल्या कवितासंग्रहाचे पुस्तक मला भेट म्हणून देत त्यावर व माझ्या मराठी पुस्तकावर, ‘ओंम शशिकान्त’ असे देवनागरीत लिहून मला परत दिले. मला वेळोवेळी जवळ बोलाऊन हात हातात घेऊन, ते काही पुटपुटत त्यांनी मला कृपा आशीर्वाद देऊन उपकृत केले. जणू काही मंत्रोच्चार करून ते शिष्यत्व देत होते. ते सर्व आठवून पत्नीला भारावून गेल्यासारखे झाले. तिची नाडी भविष्याकडे व माझ्या कार्याकडे पहायची दृष्टी बदलली. असो.
नाडीवरील मराठीतील पहिले पुस्तक कसे तयार झाले याचा किस्सा पुढे वाचा.

Comments

वाचतोय !

नाडीभविष्याबद्दलच्या काही आठवणी वाचतोय, मागे एकदा घाटपांडेसाहेबांनी 'नाडी भविष्य- एक चिकित्सा' केली होती तेव्हापासून अशा गोष्टी म्हणजे थोतांडे आहेत, अशी ओळख झाली. असे असले तरी, आपला हा विषय वाचायला आवडतो. आपले नाडी भविष्यावरील पहिले पुस्तक कसे तयार झाले,ते वाचण्यासही उत्सूक आहे. अजून येऊ द्या असेच माहितीपूर्ण लेखन !

अवांतर : माधवनगर एक टूमदार गाव असे आपले लेखन 'उपक्रमवरुन' उडवल्या गेले. (खरे तर याही लेखनाचे स्वरुप तसेच आहे) नाडीपट्टीवरुन ते लेखन 'उपक्रमवर' राहील की नाही, ते आपल्या लक्षात यायला हवे होते.( हलकेच घ्या ) :)

-दिलीप बिरुटे

ऐकावे ते नवेच

अगस्त्य नाडीमधील ९व्या कांडातून मला एका पौर्णिमेला पांडेचरीच्या अरविंद आश्रमात जाऊन तेथे ध्यानाला बसावे असा आदेश आला

हे काय नवे?
नाड्या आदेशही देतात?!!.. मला वाटलं होतं फक्त काय होईल ते सांगतात असाच दावा आहे..

ऋषिकेश
------------------
आदेश आला की अधिकार आला.. अधिकार आला की त्याचा गैरवापर आणि धंदा ह्या गोष्टी होणारच

विनंती

आपल्या लेखाचे तिन्ही भाग वाचले. हा विषय मला सर्वस्वी नवीन असून अजुन ह्या विषयात मला विशेष गती आलेली नाही. म्हणून ह्या लेखमालेवर प्रतिसाद टाकला नाही. असो.

तरी आपणांस विनंती की आपण "गोमय अकारण क्षेपकांकडे" पूर्ण दुर्लक्ष करून आपण लिखाण असेच चालू ठेवावे. मनाचा हिरमोड होऊ देऊ नये.
.
.
.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज. “
“संतोष. परम संतोष.

 
^ वर