भारतातील मंदिरे-५

गिरिशिल्पे
ऊन-पाऊस व जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी मानवाने गुहेचा उपयोग केला. नंतर मैदानात घरे बांधावयास सुरवात केल्यावरही त्याने गुहा अजिबात सोडून दिली असे नाही. भारतात ऋषिमुनींनी,तपस्व्यांनी चिंतनाकरिता गुहाच योग्य मानली.तर ही गुहा चैत्य-विहार-मंदिरे बांधावयास चांगली आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी इसविसन पूर्व ३००-४०० वर्षे आधी पासूनच असा वापर सुरू केला. पण नैसर्गिक गुहेला लांबी-रुंदी-उंची यांच्या मर्यादा असल्याने सुरवातीला त्या फ़क्त मोठ्या केल्या; त्यांना आयताकृती-चापाकृती आकार दिला.

त्यानंतरचा भाग म्हणजे गुहेचे तोंड, मुखदर्शन, सुशोभित करणे व आत गाभारा, ओवऱ्या, मंडप,स्तंभ, मजले आदींची भर घालावयास सुरवात करणे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरवातीला लाकडी घरच डोळ्य़ासमोर होते. पुढे विटा, चुन्याचा गिलावा वगैरेचा उपयोग केला व शेवटी पत्थराचा.गुहेत सुरवातीपासून सुशोभन केले. प्रथम चित्रे काढली, मग पाने-फ़ुले-वेलबुट्टी, व उथळ उठावाची चित्रे कोरली, रुपकांचा उपयोग केला, त्यानंतर पूर्ण उठाव व शेवटी मूर्ती. नुसती चित्रे काढलेल्या गुहा हजारो वर्षांपूर्वीच्या आहेत. कोरीव नक्षी
काम ते मूर्तीपर्यंत पोचावयाला ७००-८०० वर्षे लागली.या पद्धतीने संपूर्ण देवळेच या पद्धतीने केल्याची प्रसिद्ध उदाहरणे म्हणजे वेरुळचे "कैलास मंदिर" व महाबलीपुरमचे "रथ". किरकोळ अपवाद सोडले तर आठव्या शतकापासून गिरिशिल्पे निर्माण होणे बंद झाले. आपण जवळ जवळ एक हजार वर्षांचा इतिहास बघणार आहोत. (इ.स.पूर्व३०० ते इ.स.७००). तसेच हालेख "मंदिरे" या लेखमालिकेतील असला तरी चैत्य-विहार यांचा विचार अपरिहार्य आहे.

गिरिशिल्पांची ओळख शास्त्रीय पद्धतीने करून घ्यावयाची तर ती (१) काल, (२) धर्म व (३) स्थळ (प्रदेश) या तीन प्रकरणात विभागून करून घेणे उचित. पण इतक्या खोलात न जाता थोडक्यात माहिती हा एकच निकष ठरवणॆ जास्त सोपे. शेवटी ही माहिती आनंद मिळवण्यासाठीच आहे.तर सुरवात करू या भारतातील पहिल्या सुशोभित गुहांपासून.

गुहेत आदीमानवाने काढलेली चित्रे आढळतात.जगभरातील अशा चित्रांप्रमाणे ही पशू, त्यांची शिकार अशा विषयांवर आहेत. सर्वात पुरातन कला म्हणून त्यांचे मह्त्व. भारतात अशा गुहा आसेतुहिमालय आढळतात.बिल्लासुरगम,वायनाड,भलदरिआ,घोडामांगर, सिंधनपुर,जोगिमार,मिर्ज़ापुर, रायगड,छोटा नागपुर, कर्नूल इत्यादी ठिकाणी अशी गुहाचित्रे आढळली आहेत. आजही
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा येथील आदिवासी काढत असलेली चित्रे या गुहाचित्रांशी नाळ टिकवून आहेत. पुढे दिलेले चित्र व वारली चित्रकला ताडून पहा.(१)

भारतातील गिरिशिल्पांचा अभ्यास करतांना एक गूढ गोष्ट समोर येते. अशोकानंतरच्या काळातील अनेक गुंफ़ा ज्ञात आहेत, या काळाच्या आधीच्या नाहीत. आणि या ज्ञात गुंफ़ा उच्च श्रेणीच्या आहेत. म्हणजे कोणत्याही कलेच्या आरंभी दिसून यावे असे "शिकावू", चुकत माकत केलेले, काम दिसून येत नाही. तुम्ही सुरवात केली आणि भाजे-कार्ले सारख्या श्रेष्ट दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यात हे उमगण्यास अवघड जाते. अभ्यासकांच्या मते याचा संबंध भारताबाहेर ईजिप्त,भुमध्य सागरानजिकचा आशियाचा भाग येथील गिरिशिल्पांशी जोडला पाहिजे.(नक्श-इ-रुस्तुम येथील शिल्पगृह). अशोकाच्या काळातील कलासंप्रदायावर इराणी कलासंप्रदायाची छाप पडली होती हे मान्य. पण स्तंभ व स्तंभशिरे सोडली तर येतील सर्व गिरिशिल्पे शंभर टक्के भारतीय आहेत. कोडे सुटण्यास अवघड आहे. गर्वाने म्हणावयाचे असेल तर म्हणा की भारतीय कलाकार एवढे श्रेष्ट होते की त्यांनी तेथील कल्पना उचलली आणि शंभर टक्के भारतीय बीजे त्यात रुजवली.न चुकता, न अडखळता ! असो. इतिहास समुदायाच्या सभासदांनी यावर झोत टाकावा.

तर आता सुरवात करू या इ.स.पूर्व २०० पासूनच्या गिरिशिल्पांपासून.योग्य दगड असलेली जागा सर्वत्र मिळेलच असे नाही. त्यामुळे महाराष्ट्र,ओरिसा, बिहार, आंध्र अशा मोजक्या जागीच ही कला बहरली.नागार्जुनी टेकड्या, सितामढी, राजगीर येथील शैलगृहे मौर्यकालीन. यात निरनिरळ्या प्रकारची विधाने आढळतात.(२)सुरवातीला खोली कमी व रुंदी जास्त असे.

लगेचच महाराष्ट्रात हे लोण पोचले. येथील दगड या कामाला फ़ार सोयिस्कर.भाजे (इ.स.पूर्व २०० ते १५०), कोंडाणे, पितळ्खोरे, अजिंठा, बेडसे, नाशिक, जुन्नर,कान्हेरी, औरंगाबाद व कार्ले (इ.स.५० ते १००) ही त्यातील महत्वाची (३).

ओरिसात हाथीगुंफ़ा, व्याघ्रगुंफ़ा, राणीगुंफ़ा या नोंद घेण्यासारख्या.इ.स.च्या सुरवातीला येथील कलाकार दक्षिणेला आंध्रमध्ये गेले.

उदयगिरी(मध्यभारत), वेरूळ(महाराष्ट्र], बदामी(कर्नाटक) व महाबलीपुरम(आंध्र) ही हिंदू-जैन गिरिशिल्पांची प्रमुख केंद्रे.ही सगळीच इ.स.च्या तिसऱ्या-चवथ्या शतकानंतरची आहेत.आठव्या शतकानंतर लेणी खोदणे बंद झाले.

मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील उदयगिरी येतील गिरिशिल्पे म्हणजे मंदिरांच्या, डोंगरात कोरलेल्या, प्रतिकृतीच आहेत.तेथे एक गुंफ़ा एकपाषाणी मंदिरच आहे.

वेरुळच्या लेण्यांचे कालदृष्ट्या दोन भाग पडतात.पहिल्या भागातील लेणी बुद्ध विहारांसारखी(४) आहेत तर दुसऱ्या भागातील वेगवेगळ्या "मंदिर" कल्पनांचा आविष्कार.पहिला कालखंड इ.स.५०० च्या आसपास सुरू होतो तर दुसरा ७०० च्या. दोनही भागात चापाकर विधान टाळले आहे.सर्वात बाहेर ओसरी,आत मंडप,त्याच्या तीनही बाजूंना चौरस दालनाच्या ओळी व मागच्या भिंतीतील मधल्या दालनात गाभारा. हा आराखडा विहाराच्या पदविन्यासा सारखा आहे.

सर्वप्रख्यात "कैलास मंदिर" तयार करतांना प्रथम डोंगरात दरडीला काटकोन करून दोन चर खणण्यात आले. त्यांची लांबी ६३मिटर. मग या चरांच्या डोंगरातील टोकांना मिळवणारा ४५ मिटर लांबीचा तीसरा चर खणला. एक प्रचंड पाषाण निराळा केला गेला. या पाषाणात मंदिर कोरले. खरे म्हणजे हे गिरिशिल्प नव्हे, एकपाषाणी मंदिर आहे. नजरेसमोर पट्टडकलचे "विरुपाक्ष मंदिर ठेवून केलेले. (वेरुळ येथीलच "छोटा कैलास" हेही असेच एकपाषाणी मंदिर, "कैलास" च्या निम्मे व कलागुणांनी कनिष्ठ.) महाराष्ट्रातील द्राविड शैलीच्या या मंदिराच्या कामाला सुरवात इ.स.७६० च्या सुमारास झाली व काम शंभर वर्षे तरी चालले होते.(५)

कर्नाटकातील गिरिशिल्पे बदामी येथे पहावयास मिळतात. मुख्य "विष्णू मंदिर" इ.स.५७८ मध्ये खोदून पुरे झाले.अतिशय प्रेक्षणीय वास्तू. (६)

आंध्र-तामिळनाडूतही अनेक शैलगृहे आहेत. सुरवातीची बौद्ध व नंतरची हिंदू. विजयवाड्यानजीक "अनंतशायीगुडी" गुंफ़ा चार मजली आहे. डोंगराच्या उतारावर खोदकाम असल्याने एकामागे एक असे सरकून खोदले आहे असा भास होतो. (७)

तामिळनाडूत चेन्नाई पासून अवघ्या ४० कि.मि. अंतरावर महाबलिपुरम (आता ममलापुर) येथे अप्रतीम शिल्पे पहावयास मिळतात. मंदिरे, एकपाषाण मंदिरे ( यांना "रथ" म्हणतात), गुहाशिल्प व डोंगराच्या उतारावरील कोरीव काम, सर्व काही एका ठिकाणी.(८) तेथे बाजारात आजही कलाकार मूर्ती घडवतांना दिसतात. असे दृष्य फ़क्त येथे व ओरिसात पहावयास मिळाले.

किती लिहणार ? तांत्रिक माहिती कंटाळवाणी होते व आस्वाद घेण्याकरिता लिहावयाचे तर प्रत्येक स्थळावर दोन लेख होतील ! तेंव्हा असे लेख वाट दाखवण्यापुरते. पुस्तकांत व विशेषत:
जालावर भरपूर माहिती व छायाचित्रे मिळतील.
(१) आदमगड येथील शैलचित्र
AADAMAGAD ROCK PAINTING

(२) लोमश गुंफ़ा, मुखदर्शन
lomash -3
(३)भाजे
bhaje-2
कार्ले
karla
(४)वेरुळ,बुद्ध लेणे
VERUL-1
(५) वेरुळ, कैलास लेणॆ. चित्रात डोंगराचा कापलेला भाग दिसेल
VERUL-1
(६) बदामी

badami-caves-3
(७) उंडवल्लि, आंध्र
undavallicaves_11580

(८) महाबलिपुरम,तामिळनाडू
undavallicaves_11580

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

पांडवलेणे

छान आहे, पण अचानकच संपला. मला अजून काही तरी वाचायला मिळेल असे वाटत होते.
साधारण अशाच शैलीतील नाशिक येथे पांडवलेणे नावाची एक टेकडी आहे.
त्यातील एक चित्र .
या गुहांविषयी अधिक माहिती विकिवर आहेच.

आपला
गुंडोपंत

पांडवलेणे

सुरेख फ़ोटो व माहिती. माझ्या लेखात नाशिकचा उल्लेख केला होताच पण आधीच लेख लांबला असल्याने जास्त माहिती देता आली नाही.
हा लेख सर्व भारतातील गिरिशिल्पांवर असल्यामुळे केवळ दिग्दर्शन एवढाच उद्देश ठेवून मर्यादित माहिती देता आली.
शरद

दुरुस्ती

(५) आणि (८) हे फ़ोटो चुकून परत पडले आहेत. ते पुढीलप्रमाणे पहावेत.

(५)verul-2

(८)mahabalipuram

शरद

वा!

वा! छान लेख.. आवडला!
लेखात चित्र आकडे दिल्याने कोणते चित्र पहावे तेहि कळले. मनापासून धन्यु!

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

वा - चित्रे, माहिती, सगळे

सगळे आवडले.

इथे बादामी येथील दुसर्‍या लेणीच्या द्वाराशी असलेले नटराजाचे भित्तिशिल्प :

बादामी येथील दुसर्‍या लेणीच्या द्वाराशी असलेले नटराजाचे भित्तिशिल्प
बादामी येथील दुसर्‍या लेणीच्या द्वाराशी असलेले नटराजाचे भित्तिशिल्प

हे भित्तिशिल्प बघण्यासाठी वेगळीच दृष्टी आमच्या मार्गदर्शकाने दिली - या नटराजाचा कुठलाही एक डावीकडचा हात निवडावा, आणि कुठलाही एक उजवीकडचा हात निवडावा, आणि त्यांच्याकडेच लक्ष देऊन मूर्तीकडे बघावे. एक पूर्णपणे पटणारी मनुष्य-नर्तकाला शक्य असलेली आकृती दिसते. अशा प्रकारे ९ गुणिले ९ = ८१ मुद्रा (?योग्य शब्द?) या एका मूर्तीत एकटावल्या आहेत, प्रत्येक मनुष्यास शक्य अशी, आणि भावपूर्ण आहे.

(आदमगढ़ वगैरे ठिकाणची भित्तिचित्रे वेगळी, म्हणून वेगळा लेख लिहायला हवा होते असे वाटते. पण शरद उदार मनाने ही लेखमाला पाच भागांत लिहीत आहेत, आणि आम्ही आनखी लिहा म्हणून ढोपराने खणतो आहोत...)

शरद यांना लेखमालेबाबत धन्यवाद द्यावे तितके कमीच.

छान

भरपूर माहिती असलेला लेख झाला आहे. जरी एकदम लेखमालिका थांबवल्यासारखे वाटले तरी प्रत्येक लेख वेगळा करायचा तर खूपच लेख होतील याच्याशी सहमत. म्हणून या सुरेख मालिकेबद्दल शरद यांचे आभार.

कार्ले/भाजे येथील लेण्यांवरून अधिक लिहायला हवे होते असे मात्र वाटते.

धन्यवाद

अतिशय माहितीपूर्ण मालिका उपक्रमावर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

कैलास मंदिर केवळ एकपाषाणीच नाही तर दरडीत चर खोदून कळसापासून पायापर्यंत बांधत नेलेले शिल्प आहे असे वाटते.

हा लेख दोन भागात लिहावा. पांडव लेणे, कार्ले-भाजे आणि महाराष्ट्रातील गिरीशिल्पे यावर एक स्वतंत्र लिहिता येईल आणि आम्हाला यावर अधिक वाचता येईल.

असेच म्हणतो !

>>अतिशय माहितीपूर्ण मालिका उपक्रमावर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
असेच म्हणतो !
>>कैलास मंदिर केवळ एकपाषाणीच नाही तर दरडीत चर खोदून कळसापासून पायापर्यंत बांधत नेलेले शिल्प आहे असे वाटते.
असेच म्हणतो !

उपक्रमवर डिलीट होणारे प्रतिसादांचे प्रमाण पाहता, टंकण्याचे सुद्धा कष्ट घ्यावे वाटत नाही
 
^ वर