रोजच चंद्र दिसतो नवा

रात्रीच्या काळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशमान चंद्र उठून दिसतो, त्याचा प्रकाश दाहक नसल्यामुळे त्याच्याकडे टक लावून पाहता येते, त्याचा आकार रोजच्या रोज बदलतो, त्याच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या वेळा बदलतात आणि त्याच्या आजूबाजूला रोज वेगळे तारकापुंज दिसतात. अशा कारणांमुळे प्राचीन काळापासून मानवाला चंद्राविषयी आकर्षण आणि कुतूहल वाटत आले आहे. विशेषतः त्याचा आकार रोज कां बदलतो यासंबंधी विविध तर्क करण्यात आले. कांही हुषार विद्वानांनी तत्कालिन समाजाला पटतील असे तर्क मांडले. चंद्राने केलेल्या आगळिकीबद्दल गणपतीने त्याला शिक्षा केल्याची कहाणी कोणी सांगितली तर दक्ष प्रजापती आणि त्याच्या सत्तावील कन्यका यांचे सुरस आख्यान रचून त्यातून कृपाळू प्रभू सोमनाथाच्या लीलामृताचे वर्णन कोणी केले. अशा प्रकारच्या मनोरंजक गोष्टी परदेशातील मायथॉलॉजी आणि लोककथांमध्येसुध्दा असतील.

शाप, उःशाप, वरदान वगैरे दैवी चमत्कारांचा आधार न घेता विविध घटनांच्या मागील कारणमीमांसा जाणून घेण्याचे प्रयत्न कांही लोकांनी केले, त्यात त्यांना मिळत गेलेल्या यशातून वैज्ञानिक प्रगती झाली. तेजःपुंज दिसणार्‍या आणि सगळीकडे पिठूर चांदणे पसरवणार्‍या चंद्रावरून येणारा प्रकाश हा मुळात त्याचा नसून तो खरे तर सूर्याचा असावा ही कल्पना चंद्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने एक खूप मोठी झेप होती. पण अशा धक्कादायक कल्पना सहजपणे स्वीकारल्या जात नाहीत. रात्री जेंव्हा सूर्यनारायण स्वतः गायब झालेला असतो तेंव्हा त्याचे ऊन चंद्रावर कसे पडू शकेल असा प्रश्न विचारून ती कल्पना मांडणार्‍याला निरुत्तर केले गेले असेल किंवा त्याला सरळ वेड्यात काढले गेले असणार. पण अशा प्रकारच्या नव्या विचारात तथ्य आहे असे कांही लोकांना वाटले आणि त्यांना पोषक असे तर्क किंवा पुरावा मिळवण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यांना ते मिळून त्यांची स्वतःची खात्री पटल्यानंतर त्यांनी ते विचार इतरांना समजावून सांगायला सुरुवात केली. पण सर्वसामान्य लोकांना अशा बाबतीत रस नसतो आणि त्यांची तेवढी कुवत नसते. बाबावाक्यम् प्रमाणम् मानणार्‍या दुड्ढाचार्यांची नवे विचार ऐकून घेण्याची तयारी नव्हती आणि यातून ज्यांच्या स्वार्थाला धोका होता त्यांनी त्यांची टिंगल, टवाळी आणि विरोध केला, प्रसंगी ते मांडणार्‍याचा छळसुध्दा केला. पण कांही लोक हे सारे सहन करून आपल्या मतांना चिकटून राहिले एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांचा हिरीरीने आणि चिकाटीने प्रचार केला. हळूहळू अनेक लोकांना त्यांचे सांगणे पटत गेले आणि अशा प्रकारे ते विचार सर्वमान्य झाले.

सू्र्याच्या उन्हात चंद्र नहात असल्यामुळे सूर्याचे किरण चंद्रावरून परावर्तित होऊन पृथ्यीवर येतात आणि त्यातून आपल्याला चंद्राचे दर्शन होते या सांगण्यात तथ्य आहे असे वाटल्यानंतर त्यासंबंधी विचारांना चालना मिळाली. मावळलेला सूर्य सुध्दा आपल्या नजरेआड तासाला सुमारे पंधरा अंश या अँग्युलर गतीने सरकत असला तर सूर्यास्तानंतर अमूक इतक्या वेळानंतर तो कुठल्या बाजूला असावा याचा अंदाज घेता येतो. त्या क्षणी आभाळात दिसणारा चंद्र क्षितिजापासून किती अंश वर आहे हे मोजता येते. या दोन्हींच्या आधाराने सूर्यापासून सरळ रेषेत येणा-या किरणांचा प्रकाश चंद्राच्या कोणत्या भागावर पडेल आणि या प्रकाशित भागाचा कोणता भाग त्यावेळी पृथ्वीवरून दिसेल याचे निदान करता येते. अशा प्रकारे गणिताने केलेले निदान आणि प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारा चंद्रकोरीचा आकार हे तंतोतंत जुळल्यामुळे चंद्राच्या कोरींचे रहस्य उलगडले आणि सूर्याच्या उन्हात उजळून निघत असल्यामुळेच आपल्याला चंद्राचे दर्शन घडते हे निर्विवादपणे सिध्द झाले.

Discoveries

विज्ञानाच्या जगातल्या कांही महत्वाच्या शोधांशी चंद्राचा निकटचा संबंध आहे. पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे याचा चक्षुर्वैसत्यम् असा पुरावासुध्दा चंद्रावर मिळाला. म्हणजे त्या काळी कोणी एकाद्या यानात बसून किंवा सूक्ष्मरूप वगैरे धारण करून पृथ्वीचे रूप पहायला चंद्रावर प्रत्यक्ष गेला नाही. चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्याला इथूनच चंद्राचे जे आकार दिसतात ते चंद्राच्या एरवी दिसणार्‍या कलांपेक्षा वेगळे असतात. एक अजस्र काळी छाया चंद्राला झाकून पुढे सरकत असावी असे त्या वेळी दिसते. ही सावली इतर कोणाची नसून पृथ्वीचीच आहे हे मान्य झाल्यावर त्या छायेचा आकार नेहमीच वक्राकार असतो या अर्थी पृथ्वी वर्तुळाकार आहे हे सिध्द झाले. त्याचप्रमाणे विपुला पृथ्वीचे आकारमान अमर्याद नसून तिचा व्यास चंद्राच्या व्यासाच्या सुमारे चौपट एवढा असावा असा अंदाज करता आला. झाडावरून निसटलेले सफरचंद वेगाने खाली जमीनीवर येऊन पडते पण त्या झाडामागे असलेला चंद्र मात्र तसा सरळ जमीनीवर येऊन न पडता हळूहळू खाली येत येत क्षितिजाच्या पलीकडे अस्ताला जातो आणि दुसरे दिवशी पुन्हा उगवतो. या दोन्हीमधला फरक जाणून घेण्याचा विचार न्यूटनने केला आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत कसा मांडला हे मी यापूर्वी सांगितले आहे. अशा प्रकारे मध्ययुगात युरोपात विज्ञानाचा जो विकास झाला त्यात चंद्राला खूप महत्वाचे स्थान आहे.

Phases

शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा आकार कलेकलेने वाढतो आणि वद्य पक्षात तो तसाच लहान लहान होत जातो. पण या कलेचा आकारसुध्दा पृथ्वीच्या पाठीवरील निरनिराळ्या भागात वेगवेगळा दिसतो. महाराष्ट्राचे अधिदैवत असलेल्या भालचंद्र गजाननाच्या कपाळावर रेखलेली चंद्रकोर आडवी असते, चेहेर्‍याच्या सिमेट्रीसाठी ती चांगली दिसते हे खरे असले तरी या भागातल्या आभाळात चंद्राची कोर प्रत्यक्षात अशी दिसते. कैलासराणा चंद्रमौळी शिवाच्या जटांमध्ये खोचून ठेवलेली चंद्रकोर नेहमी तिरपी दाखवतात. हिमालयाच्या परिसरात चंद्राची कोर अशीच दिसते. युरोपियन चित्रकारांच्या चित्रातली कोर बहुतेक वेळा उभी दिसते, त्याचे कारणसुध्दा त्यांनी ती तशीच पाहिलेली असते. हा फरक कशामुळे पडत असेल ?

रोज सकाळी पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि सायंकाळी तो पश्चिमेला मावळतो असे आपण ढोबळपणे म्हणतो. पण रोज सकाळी होणारा सूर्योदय एकाच विवक्षित स्थानावरून बारकाईने लक्ष देऊन पाहिला तर क्षितिजावरील ज्या ठिकाणी सूर्य जमीनीखालून वर येतांना दिसतो तो बिंदू वर्षातले सहा महिने रोज किंचित उत्तरेकडे आणि सहा महिने किंचित दक्षिणेकडे सरकतांना दिसतो. अशाच प्रकारे संध्याकाळी मावळणारा सूर्य रोज किचित वेगळ्या बिंदूवर क्षितिजाला टेकतांना दिसतो. विषुववृत्तापासून जसजसे आपण दूर जाऊ तसतसा हा फरक वाढत जातो. ध्रुवप्रदेशात पूर्व, पश्चिम वगैरे दिशाच नसतात. तिथे सूर्य रोज उगवतही नाही किंवा मावळतही नाही. वर्षातले सहा महिने तो क्षितिजाच्या किंचित वर क्षितिजाशी जवळजवळ समांतर राहून चकरा मारत राहतो आणि सहा महिने क्षितिजाच्या किंचित खाली राहून फिरत असतो त्यावेळी तिथे रात्र असते. इतर ठिकाणी दिसणारा सूर्याचा आकाशातला प्रवास देखील एकाच चाकोरीतून घडत नसतो. त्याचा मार्ग रोज किंचित बदलत असतो. चंद्राचा मार्ग सूर्यापेक्षा वेगळा असल्यामुळे त्याचा उदय आणि अस्तसुध्दा सू्र्योदय आणि सूर्यास्त जिथे होतो त्या क्षितिजावरील बिंदूंवर न होता थोडा आजूबाजूला वेगळ्या बिंदूंपाशी होतो. या गोष्टी ध्यानात घेतल्यानंतर नुकताच मावळलेला सूर्य क्षितिजाखाली जिथे असेल आणि मावळायला आलेला चंद्र क्षितिजाच्या वर जिथे असेल त्यांच्या स्थानानुसार चंद्रकोरीचा आकार ठरतो हे लक्षात येईल. तो कसा वेगवेगळा असतो हे चित्रात दाखवले आहे,

खग्रास सूर्यग्रहण होते त्या क्षणी सूर्य आणि चंद्र आकाशात बरोबर एकाच जागेवर आलेले असतात. त्या अमावास्येनंतर एक दोन दिवस त्यांचे मार्ग अजून एकमेकांच्या जवळ असतात. त्यामुळे ज्या बिंदूपाशी सूर्य मावळतो त्याच्या बरोबर वरच्या बाजूला आकाशातला चंद्र येतो आणि त्यामुळे त्याची कोर आडवी दिसते. पुढे जसजसे सूर्य आणि चंद्र यांचे मार्ग दूर होत जातात तसतशी चंद्राची कोर उजव्या किंवा डाव्या बाजूला कललेली दिसू लागते. ध्रुव प्रदेशातल्या दीर्घ रात्रीत चंद्रसुध्दा क्षितिजापासून फारसा वर चढत नाही आणि सूर्य क्षितिजापाशीच असतो. अशा प्रकारे चंद्र नेहमी सूर्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला असल्यामुळे त्याची कोर उभी दिसते.

पौर्णिमेला दिसणारा पूर्णचंद्र देखील प्रत्येक महिन्यात एकसारखा दिसत नाही. पृथ्वीचे सूर्याभोवती आणि चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे लंबवर्तुळाकार कक्षेत होत असल्यामुळे त्यांच्या दरम्यानचे अंतर कमी जास्त होत असते. चंद्र ज्या वेळेस पृथ्वीपासून जवळ येतो तेंव्हा त्याचे बिंब थोडे मोठे दिसते आणि दूर जातो तेंव्हा त्याचा आकार जरासा लहान होतो. पृथ्वीसह चंद्रही जेंव्हा सूर्याच्या निकट जातो तेंव्हा त्याच्यावर पडणारा सूर्याचा प्रकाश वाढतो आणि तो दूर जातो तेंव्हा तो कमी होतो. यामुळे ही दोन्ही अंतरे ज्या वेळी सर्वात कमी असतील त्या पौर्णिमेला चंद्र सर्वाधिक प्रकाशमान होतो आणि जेंव्हा ही दोन्ही अंतरे सर्वाधिक होतील तेंव्हा निरभ्र आकाश असूनसुध्दा चंद्र थोडा फिकट वाटतो. याच कारणामुळे जेंव्हा चंद्राचे बिंब सूर्याला संपूर्ण झाकण्याइतके मोठे होते तेंव्हा खग्रास सूर्यग्रहण होते, तर ज्या वेळी ते आकाराने लहान असल्यामुळे सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही तेंव्हा कंकणाकृती ग्रहण लागते.

चंद्राचा पृष्ठभाग पॉलिश केलेल्या कांचेच्या गोळ्यासारखा गुळगुळीत नाही. त्यावर अनेक डोंगर, दर्‍या, विवरे वगैरे आहेत. अशा जागी पडलेला सूर्यप्रकाश कमी प्रमाणात परावर्तित होतो किंवा होतच नाही. यामुळे आपल्याला चंद्रावर अनेक काळे डाग दिसतात. हे सर्व डाग एकमेकांना जोडल्यावर एक सशासारखी आकृती तयार होते. ही आकृती ओळखता यावी म्हणून मी चित्रात ती उभी दाखवली आहे. (मूळ चित्रात ती आडवी होती. ) प्रत्यक्षात आपण उगवत्या चंद्राला पूर्वेकडे तोंड करून पाहतो तर मावळत्या चंद्राला पश्चिमेकडे. आकाशात वर चढत असलेला चंद्र आग्नेय किंवा ईशान्येला दिसतो, माथ्यावर आलेला उत्तर किंवा दक्षिणेला आणि खाली उतरू लागलेला नैऋत्य किंवा वायव्येकडे दिसतो. यातही युरोपमध्ये चंद्र पूर्वेकडे उगवत असतो तेंव्हा चीनमध्ये तो मावळतीकडे गेलेला असतो . उत्तर आणि दक्षिण गोलार्धात तो वेगवेगळ्या प्रमाणात दक्षिण किंवा उत्तरेकडे झुकलेला दिसतो. अशा प्रकारे चंद्राचे दर्शन घेणार्या माणसांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतात. एका लहानशा गोल टेबलावर चंद्राचे चित्र ठेवले आणि त्या टेबलाच्या सर्व बाजूंनी उभे राहिलेल्या लोकांनी ते पाहिले तर ज्याचे तोंड ज्या दिशेला असेल त्यानुसार हा ससा कोणाला उभा, कोणाला आडवा, कोणाला तिरपा आणि उलटा किंवा सुलटा अशा निरनिराळ्या ओरिएंटेशनमध्ये दिसतो. त्याप्रमाणे आकाशातला चंद्र सुध्दा दिसावा असे मला वाटते. याखेरीज सशाच्या डोलण्याबद्दल मी पूर्वीच्या लेखात लिहिले आहेच.

अशा प्रकारे अनादी कालापासून चंद्रात कसलाही बदल झाला नसला तरी आपल्याला मात्र तो वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी वेगळा दिसतो. प्रियेचा हात हातात धरल्यामुळे धुंद झालेल्या एका कवीला एकादे दिवशीच "रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा" असे वाटत असेल, पण आकाशातल्या चंद्राकडे लक्ष देऊन पाहिले तर हा चंद्र सर्वांसाठीच रोज वेगवेगळ्या रूपात दिसतो आणि खरोखरच नवा असतो हे लक्षात येईल.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी खगोलशास्त्राचा अभ्यासक नाही. माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात या शास्त्राशी माझा दूरान्वयानेही कधी संबंध आला नाही. निव्वळ अवांतर वाचनातून मला चंद्रासंबंधी ज्या मनोरंजक गोष्टी समजल्या त्या मी माझ्या ब्ल़ॉगवर कांहीशा विस्कळीत स्वरूपाच्या बत्तीस भागात लिहिल्या होत्या. त्यातल्या विज्ञानाशी संबंधित असलेल्या भागांचे एकत्र संकलन, पुनर्लेखन आणि वेगळी मांडणी करून उपक्रमासाठी मी ही मालिका तयार केली. वाचकांनी दिलेल्या प्रतिसादांचा विचार करून कांही जास्तीची माहिती आणि चित्रांची भर त्यात टाकली. या मालिकेला उपक्रमावर स्थान दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. वाचकांनी दिलेल्या प्रतिसादांमधून मिळालेल्या प्रोत्साहनासाठी त्यांचे आभार. विचारले गेलेले कांही प्रश्न त्या त्या लेखाच्या व्याप्तीच्या किंचित बाहेर होते. त्यांची उत्तरे देण्यासाठी मला थोडा विचार किंवा अभ्यास करावा लागला असता. पण माझे मित्र श्री.धनंजय यांनी वेळोवेळी त्या प्रश्नांची तर्कशुध्द आणि समर्पक उत्तरे तत्काल देऊन या लेखांत मोलाची भर घातली याचा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

रोजच

रोजच लेख दिसतो नवा!
;))
आपला
गुंडोपंत

ही मालिका

आता संपली. हुश्श.......

अभ्यासपूर्ण मालिका !

घारे साहेब, एका अभ्यासपूर्ण लेखमालिकेबद्दल आपले अभिनंदन !
आम्ही वाचक आपले आभारी आहोत.

डिलीट होणारे प्रतिसादांचे प्रमाण पाहता, टंकण्याचे सुद्धा कष्ट घ्यावे वाटत नाही

एक शंका

उत्तर गोलार्धामध्ये सूर्य उन्हाळ्यात, पूर्वेऐवजी किंचित उत्तरेला(ईस्ट-नॉर्थ-ईस्ट) उगवतो. तो कुठल्या दिशेला मावळतो ते भूगोलाच्या पुस्तकांत कधीच दिलेले नसते. आनंद घारेंच्या लेखातही या गोष्टीचा उल्लेख नाही. पण जर, उन्हाळ्यात सूर्य पश्चिमेच्या उत्तरेला(वेस्ट-नॉर्थ-वेस्ट) मावळत असेल. तर त्याच्या आकाशातल्या एका दिवसाच्या वाटचालीची लांबी आखुड असली पाहिजे. म्हणजे दिवस लहान असायला पाहिजे. असे असूनही उन्हाळ्यात दिवस मोठा का असतो? शिवाय डोक्यावरून न गेल्याने उन्हाची तीव्रता कमी असायला हवी. बरे, उन्हाळ्यात सूर्य पृथ्वीच्या अधिक जवळ असतो अशातलाही प्रकार नाही. २१ मार्चपेक्षा, २२ जूनला सूर्य पृथ्वीपासून अधिक अंतरावर असतो, अशी माझी कल्पना आहे. मग त्या काळाला उन्हाळा का म्हणायचे?--वाचक्‍नवी

उत्तम वैचारिक प्रयोग

हाच प्रश्न मला मागे त्रास देत असे.

तुमचा पुढील विचार संमिती (सिमेट्री) प्रमाणे अपरिहार्यच आहे :
> उत्तर-गोलार्धात उन्हाळ्यात सूर्य पश्चिमेच्या उत्तरेला(कुठेतरी) मावळ(तो)

पण यात सूर्याचा आकाशातील मार्ग लहान आहे की मोठा आहे हे निश्चित सांगता येत नाही.

आता दिल्लीमध्ये जाऊया - कर्कवृत्ताच्या उत्तरेला. येथे वर्षभरात कधी मध्याह्नीचा सूर्य कधी माथ्यावर येत नाही. तो मध्याह्नी नेहमीच माथ्यावरच्या बिंदूच्या दक्षिणेला असतो.

उगवतो पूर्वेपेक्षा उत्तरेला, मावळतो पश्चिमेपेक्षा उत्तरेला, मध्याह्नी मात्र माथ्यावरच्या बिंदूच्या दक्षिणेला. आता आपल्याला सहज जाणवेल की सूर्याच्या दिनमार्ग-वर्तुळाचा अर्ध्याहून अधिक भाग आपल्या दृश्य आकाशात होत असतो. (आता उन्हाळ्यात दिवस २४च्या अर्ध्या १२ तासांपेक्षा लांब असणार हे आलेच.)

अर्थात दिल्ली, कर्कवृत्त वगैरे उदाहरण घ्यायची काहीएक गरज नव्हती. कन्याकुमारीलाही हीच गत - पण "कर्कवृत्ताच्या उत्तरेला सूर्य नेहमीच मध्याह्नी माथ्यावरील बिंदूच्या दक्षिणेला असतो" हे शाळेत शिकल्याचे आठवले, म्हणून एक अधिक विदाबिंदू खुद्द निरीक्षण न करता मिळाला. वैचारिक प्रयोग सोपा गेला. कन्याकुमारीला उन्हाळ्यात कुठल्या तारखेला मध्याह्नीचा सूर्य नेमका कुठे, हे सांगायला गणित किचकट ठरले असते.

दिल्लीचा सूर्योदय-सूर्यास्त.

दिल्लीला सूर्य कधीच पूर्वेला उगवत नसला पाहिजे. तो नेहमीच पूर्वेच्या दक्षिणेला उगवून पश्चिमेच्या दक्षिणेला मावळत असला पाहिजे. उन्हाळ्यात तो कमी दक्षिणेला उगवेल/मावळेल एवढेच. डोक्यावर येईल तेव्हाही तो आकाशमध्याच्या दक्षिणेलाच असेल. केवळ त्यावरून त्याचा आकाशातला मार्ग अधिक लांबीचा असेल असे म्हणता येणार नाही. अर्थात क्षितिजाला टेकताना तो तिरपा टेकत असेल तर गोष्ट वेगळी. --वाचक्‍नवी

तिरपा

तो तिरपाच टेकतो. एक सफरचंद घेऊन त्याला सरळ उभा छेद न देता वेगवेगळे तिरपे छेद दिल्यानंतर त्या छेदांचे जे परीघ दिसतील त्यांवरून सूर्याच्या आकाशमार्गाची कल्पना आपणास येईल.

गंमत आहे - म्हणजे निरीक्षण करणे अपरिहार्य

अरेच्चा - मी समजलो की शाळेत शिकवतात की उत्तरायणात पृथ्वीवर कुठेही सूर्य ठीक-पूर्वेपेक्षा उत्तरेकडे कुठेतरी उगवतो, म्हणून ते गृहीतक घेतले. तसे शिकवत नसल्यास तुम्हाला निरीक्षण करून नोंद घेणे अपरिहार्य होते. (म्हणजे निरीक्षण नेहमीच अपरिहार्य असते म्हणा.)

माझे सध्याचे वास्तव्य कर्कवृत्तापेक्षा उत्तरेला आहे, आणि माझ्या शेजघराची खिडकी पूर्वेच्या दिशेला आहे. शिवाय खिडकीतून दिसणारे काही रस्ते ठीक पूर्व-पश्चिम! म्हणून वैयक्तिक बोलावे तर मला हे निरीक्षण करणे खूपच सोपे जाते. या सगळ्या सोयी नसलेल्या व्यक्तीला मात्र हे निरीक्षण असे आयते जमून येणार नाही. :-(

(वर जे म्हटले आहे "दिल्लीला सूर्य कधीच पूर्वेला उगवत नसला पाहिजे. तो नेहमीच पूर्वेच्या दक्षिणेला उगवून पश्चिमेच्या दक्षिणेला मावळत असला पाहिजे," ते बरोबर नाही. पृथ्वीवर सर्वत्रच संपाताच्या [एक्विनॉक्सच्या] दिवशी सूर्य ठीक पूर्वेला उगवतो, आणि ठीक पश्चिमेला मावळतो.)

धन्यवाद.

माहिती होती, तरी प्रतिसाद लिहिताना वसंत संपात आणि शरद संपाताच्या वेळची स्थिती लक्षातच घेतली नव्हती. विचारतली चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.--वाचक्नवी

उन्हाळा कसा होतो?

सूर्यकिरण

सूर्यकिरणांमधून आपल्याला मिळणारी ऊर्जा दर चौरस मीटर एवढ्या क्षेत्रात किती किरण येतात आणि किती वेळ येत राहतात यांच्या प्रमाणात असते. त्याशिवाय वातावरणातून जमीनीवर येईपर्यंत त्यात जी घट होते ती जेवढ्या जाडीच्या वातावरणाच्या थरातून ते किरण आरपार जातात त्या प्रमाणात बदलते. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी सूर्य क्षितिजापासून जास्त वर चढतो त्यामुळे सूर्यकिरणांची घनता वाढते आणि वातावरणातली घट कमी होऊन जास्त सूर्यकिरण जमीनीपर्यंत पोचतात. त्याबरोबरच दिवसाचा कालावधी मोठा असल्यामुळे जास्त वेळ त्यातली ऊर्जा आपल्याला मिळत राहते. हिवाळ्यात याच्या उलट झाल्यामुळे थंडी वाढते.

नेहमीसारखा वाचनीय

आणि चित्रांमुळे समजायला सोपा.

चंद्र उभा-आडवा दिसण्यात अक्षांशांशी (लॅटिट्यूडशी) काही संबंध आहे, याबाबत असहमत. अमुक तारखेला सूर्य जर 'क्ष' दिशेला उगवतो, ती "क्ष" कोन-दिशा प्रत्येक अक्षांशावर वेगळी असते खरी. पण त्या तारखेला चंद्र जो 'क्ष+य' दिशेला उगवतो त्यातील 'य' सर्व अक्षांशांसाठी त्या 'अमुक' तारखेला एकच असतो. चंद्राचा उभे-आडवेपणा (म्हणजे जवळात-जवळच्या क्षितिजाशी होणारा कोन) हा पूर्णपणे 'य' संख्येवर अवलंबून असतो. अशा प्रकारे कुठल्याही विशिष्ट तारखेला, कुठल्याही अक्षांशावर उभ्या निरीक्षकाला चंद्र तितकाच उभा-आडवा जाणवेल. उत्तर गोलार्धात/दक्षिण गोलार्धात; किंवा उत्तरेकडील देशांत/भारतात फरक पडणार नाही. भारतात उभे-आडवेपणाचा कोन बदलण्याच्या ज्या मर्यादा आहेत, त्याच मर्यादा रशियामध्ये सुद्धा तंतोतंत आहेत.

चंद्रकोरीचा आकार

सूर्यास्तानंतर

आपण वर दिलेल्या उत्तरानुसार सूर्याचा आकाशातला (दिवसातला) मार्ग क्षितिजाला काटकोनात नसतो. त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतरसुध्दा तो नसतो. तसेच पृथ्वीवरील वेगवेगळ्या
जागी तो भिन्न असतो हे चित्रात दाखवले आहे. त्यामुळे अक्षांशानुसार चंद्राच्या कोरीचा आकार बदलायला हवा. क्ष + य आकड्यांची साधी बेरीज बीजगणितात होते, पण त्रिकोणमितीमध्ये अंशात्मक संख्या पिच, यॉ आणि रोल या तीन प्रकारात विभागून त्यांची विशिष्ट पध्दतीने बेरीज केल्यावर त्याचे उत्तर वेगळे येते.
कॅनडामध्ये सुद्धा कधीतरी आकाशातला चंद्र जमीनीखालील सूर्याच्या बरोबर वरती येत असेल, पण ती द्वितिया किंवा तृतिया नसल्यामुळे ती रेखीव आकाराची कोर नसेल. त्या कोरीचा बेसबॉल झाल्यानंतर तिचा तिरकेपणा जाणवत नाही.

गुंतागुंतीचा विचार

वरील चित्राबद्दल धन्यवाद. ही कुठल्या विशिष्ट तारखेला त्या दोन निरीक्षकांसाठी स्थिती चितारली आहे का? गंमत म्हणजे दोघांना सूर्यास्तबिंदू जुळवलेला आहे, म्हणजे हे नेमके पश्चिमाभिमुख चित्र नसून प्रत्येक देशात वेगळ्या दिशेने बघणारे चित्र आहे. (हे ठीकच आहे.)

अक्षांशाचा काही संबंध आहे, हे पटण्यासारखे आहे. पण तुम्ही म्हणता तो अवश्यसंबंध नसावा.

चंद्र सूर्याच्या ५डिग्री उत्तरेला किंवा दक्षिणेला उगवू मावळू शकतो. (हे वाक्य ढोबळ आहे. बरोबर वाक्य "चंद्राचा दृश्य आकाशमार्गातील मध्यबिंदू हा सूर्याच्या मध्याह्नबिंदूशी +/-५ डिग्री कोनीय अंतर ठेवू शकतो.) त्यामुळे प्रतिपदेची चंद्रकोर ही सूर्याच्या मार्गाने न जाता, थोड्या बाजूच्या मार्गाने गेली, की सूर्यास्ताच्या वेळेला ती क्षितिजसमांतरही असू शकते (त्रिकोणमितीचा विचार करता) आणि कधी अधिक उभीसुद्धा असू शकते.

मात्र जरा अधिक विचार करतो आहे. हा वैचारिक प्रयोग बघूया - ६७ डिग्री उत्तर अक्षांशावर २१ जूनच्या दिवशी ठीक उत्तरेला उगवतो आणि ठीक उत्तरेला मावळतो. या दिनांकाला कुठल्या वर्षी प्रतिपदा जरूर असू शकेल. चंद्र +/- ५ डिग्री अलीकडे पलीकडे असू शकतो. या दिवशी कुठल्या वर्षी क्षितिजाच्या खालीही असू शकेल किंवा दुसर्‍या कुठल्या क्षितिजाच्या वरही असू शकेल. किंवा एखाद्या सूर्यग्रहणानंतरच्या प्रतिपदेला सूर्याच्या मार्गाचा पाठलाग करत ठीक उत्तरेला उगवू मावळू शकेल. तर या विचारप्रयोगातून असे दिसते की जर २१ जूनला प्रतिपदा असली तर चंद्र आडवा (किंवा उपडा क्षितिजाखाली) किंवा उभा कसाही दिसू शकतो. (बरोबर आडवा आणि बरोबर उपडा हा अमावास्या-युति-मुहूर्त असेल, पण त्याच वेळी सूर्योदय झाल्यामुळे त्याला प्रतिपदासुद्धा म्हणता येईल.)

विषुववृत्तावर कधीकधी आडवा दिसू शकतो हे तर वरच्या तुमच्या चित्रात उदाहरण दिसतेच आहे. म्हणजे प्रतिपदेचा चंद्र कुठल्याही अक्षांशावर क्षितिजसमांतर आडवा होऊ शकतो.

क्षितिजावर पूर्णपणे काटकोनात उभा चंद्र मात्र बहुधा फार उत्तरेकडच्या आणि फार दक्षिणेकडच्या अक्षांशावरच अधिक प्रमाणात दिसू शकेल, असे वाटते, तुमचे म्हणणे पटू लागले आहे. विषुववृत्तावर ६० डिग्री उभा दिसू शकेल असा माझा कच्चा हिशोब होता.

सुधारणा

श्री.धनंजय यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करून सुधारलेले चित्र खाली दिले आहे. या मुद्द्यावर आता वाद उरलेला नाही. फक्त रेकॉर्डसाठी ही सुधारलेली आवृत्ती देत आहे.

सूर्यास्तानंतर चंद्र

शून्य सावली क्षण

आताच एक मजेशीर बातमी टीव्हीवर पाहिली. काल दुपारी साडेबारा वाजता पुण्याला सूर्य बरोबर माथ्यावर आला होता. (तसा तो वर्षातून दोनदा येतो, काल आला होता हे बातमीमुळे समजले.) एका गोलावर एक टाचणी उभी करून तिची सावली तिच्या पायथ्याशी पडून जवळ जवळ अदृष्य झालेली दाखवली गेली.

उगवतीचा चंद्र - माझी चित्रे

क्षमस्व - या संगणकावर मराठी टंक चित्रांवर मला काढता येत नाही.

चंद्राचे उत्तरायण दक्षिणायन दर महिन्याला होते, म्हणून चंद्र सूर्याच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला उगवू-मावळू शकतो. आकाशातील चंद्रसूर्यांचा मार्ग आकाशीय अक्षांशांवरती असतो. म्हणजे ध्रुवबिंदूला [उदाहरणार्थ उत्तरेकडे ध्रुवतार्‍याला] केंद्र धरून त्याच्या भोवती काढलेले वर्तुळ. ही वर्तुळे क्षितिजाला छेद देतात किंवा देत नाहीत. (उदाहरणार्थ भारतात कुठेही उभे राहून ध्रुवतार्‍याभोवती इटुकले-पिटुकले वर्तुळ कल्पनेने चितारावे - ते क्षितिजरेषेला छेद देणार नाही. जसे-जसे आपण अधिक-अधिक उत्तरेला जातो, ध्रुवतारा हळूहळू डोक्यावरती येऊ लागतो, आणि ध्रुवतार्‍याभोवती भली मोठी वर्तुळे काढता येतात, जी क्षितिजाला छेद देत नाहीत.

सूर्य फारफारतर २३.५ डिग्रीच्या नभ-अक्षावर फिरतो. जगात बहुतेक ठिकाणी हे वर्तुळ क्षितिजरेषेला छेद देते. पण ६६.५ डिग्रीच्या उत्तरेला, ध्रुवाभोवती हे एवढे मोठे वर्तुळही क्षितिजाच्या वरती मावते. म्हणूनच या वर्तुळावर सूर्य फिरत असताना, ६६.५ डिग्री अक्षांशाच्या उत्तरेला तो दिवसभर क्षितिजावरती दिसतो - मध्यरात्रीचा सूर्य वगैरे आपल्याला ठाऊकच आहे.

खालील चित्रे ६६.५ डिग्रीइतकी दूर नाहीत. सूर्य, चंद्र दोघांचे आकाशमार्ग क्षितिजरेषेला छेद देतात. क्षितिजाचा थोडाच भाग चितारला आहे. म्हणजे नभोमंडल गोल असून सपाट कागदावर आदमासे ठीक बाहिजे, इतपत लहान भाग. म्हणूनच चंद्राचा मार्ग सूर्याच्या मार्गाला समांतर दिसतो आहे. विषुववृत्तावरती चंद्र आणि सूर्य उगवताना क्षितिजाशी आदमासे काटकोनात दाखवले आहे (ते तसे बरोबरच आहे.) खूप उत्तरेकडे हे मार्ग चंद्रमार्ग कधी सूर्यमार्गाच्या उत्तरेकडे असतो, तर कधी दक्षिणेकडे. सूर्यग्रहणाच्या महिन्यात चंद्रमार्ग सूर्यमार्गाच्या वर तंतोतंत बेतलेला असतो. त्या तीन्ही स्थिती दोन स्थानांसाठी खाली चितारल्या आहेत.
आकृती १: विषुववृत्ताजवळची स्थिती:

विषुववृत्ताजवळची स्थिती
विषुववृत्ताजवळची स्थिती

आकृती २: खूप उत्तरेकडची स्थिती:

खूप उत्तरेकडची स्थिती
खूप उत्तरेकडची स्थिती

हे लक्षात असू द्यावे, की सूर्य आणि चंद्र यांच्यामधले कोनीय अंतर ~५२ डिग्री इतके जास्त असू शकते. म्हणजे वरील चित्रांपेक्षा खूप अधिक अंतर जाणवू शकते.

धन्यवाद

अक्षांशानुसार चंद्राची कोर एकाच दिवशी वेगवेगळी का दिसू शकेल हे मला चित्रामधून दाखवायचे होते. अर्थातच ही एक स्थिती आहे. या चित्रातसुध्दा सूर्याच्या चार जागा दाखवल्या असल्या तरी त्यानुसार चंद्राच्या वेगवेगळ्या जागा दाखवल्या नाहीत कारण त्या वेगवेगळ्या असू शकतात. या चर्चेतून विचाराला खूप खाद्य मिळत आहे.

माझ्या विधानात दुरुस्ती

खूप उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेल्यास चंद्राची कोर आडवी तेएका बाजूने उभी यामध्ये कशीही दिसू शकते हे आपण दिलेल्या चित्रावरून स्पष्ट होते. विषुववृत्ताजवळ मात्र ती आडवी किंवा दोन्ही बाजूंना थोडी तिरकी दिसेल. महाराष्ट्रात मी तिला अशीच पाहिली आहे.

स्पष्टीकरण

हे लक्षात असू द्यावे, की सूर्य आणि चंद्र यांच्यामधले कोनीय अंतर ~५२ डिग्री इतके जास्त असू शकते
कसे ते कृपया स्पष्ट करावे.

चंद्राचे दक्षिणायन दर महिन्यात, उन्हाळ्यातसुद्धा

चंद्राचे उत्तर-दक्षिणायन दर महिन्यात होते. सूर्याचे उत्तरायण चालू असतानाही चंद्राचे उत्तरायण-दक्षिणायन एका महिन्यात होते. चंद्राचे दक्षिणायन किती मर्यादेपर्यंत दक्षिणेला जाते, हे १८.५ वर्शांच्या चक्राने बदलते (याबाबत लेखमालेत मागच्या भागात उल्लेख आलेला आहे).
यात सर्वाधिक दक्षिण-अयन -२८.५ डिग्री (म्हणजे २८.५ डिग्री दक्षिण) नभ-अक्षांशावर होऊ शकते. हे सूर्याच्या सर्वाधिक उत्तरायणा (जून-जुलै) दरम्यान झाले, तर सूर्याची स्थिती +२३.५ डिग्री (उत्तर) येथे असेल. त्यामुळे अशा अमावास्येला (म्हणजे त्रिमिती त्रिकोणमितीचा - ३-डी-ट्रिगोनोमेट्रीचा फरक पडणार नाही) +२३.५-(-२८.५) = ५२ डिग्री इतके कोनीय अंतर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये निरीक्षकाला दिसेल. प्रतिपदेला थोडाच फरक त्रिमिती त्रिकोणमितीचा पडेल, पण सुलभीकरण बरेच निकटवर्ती आहे.

योग्य वाक्य "सूर्याच्या मार्गाचे चंद्राच्या मार्गापर्यंत सर्वाधिक कोनीय अंतर ५२ डिग्री इतके कमाल असू शकते." (किमान अर्थातच ० डिग्री असू शकते - सूर्यग्रहणाच्या महिन्यात.)

या सर्व विचारांत पृथ्वी-मध्य पृथ्वीस्थिर भाषा सोयीची जाते, आणि तसा पृथ्वी-मध्य पृथ्वीस्थिर विचारही बहुधा सोपा जातो, ही गंमत लक्षात येईल.

~५२ ?

२३.५+२३.५+५=५२? पण का? खरे तर कमाल कोनीय अंतर सूर्य कर्कवृत्तावर आणि चंद्र विषुववृत्ताच्या ५ अंश वरखाली असेल तर २३.५ -/+५ =१८.५ ते २८.५ इतके असायला पाहिजे. असेच सूर्य मकरवृत्तावर असेल तर. किमान अर्थात शून्य!--वाचक्‍नवी

सूर्य कर्कवृत्तावर, चंद्र मकरवृतापेक्षा ५ डिग्री दक्षिणेला

चंद्र त्याच्या कमाल दक्षिणायनात मकरवृत्ताच्याही ५ डिग्री दक्षिणेला जातो. केवळ विषुववृत्ताच्या ५ डिग्री दक्षिणेला नव्हे. :-) अशा परिस्थितीत जर सूर्य कर्कवृत्तावर असला तर ~५२ डिग्री कोनीय अंतर अमावास्येला असेल.

गुंतागुंत

चंद्र सूर्याच्या ५डिग्री उत्तरेला किंवा दक्षिणेला उगवू मावळू शकतो. (हे वाक्य ढोबळ आहे. बरोबर वाक्य "चंद्राचा दृश्य आकाशमार्गातील मध्यबिंदू हा सूर्याच्या मध्याह्नबिंदूशी +/-५ डिग्री कोनीय अंतर ठेवू शकतो.)

आपल्या वर दिलेल्या प्रतिसादात असे विधान आहे. माझीही समजूत अशीच आहे. (दोन बिंदूंमध्ये अंतर असते, कोन असत नाही. या विशिष्ट उदाहरणात हे दोन्ही बिंदू आणि पृथ्वीवरील निरीक्षकाचे स्थान यांना जोडणार्‍या रेषांमधील कोन असे कांही तरी म्हणावे लागेल.)

पुढील प्रतिसादात असे वाक्य आहे.

हे लक्षात असू द्यावे, की सूर्य आणि चंद्र यांच्यामधले कोनीय अंतर ~५२ डिग्री इतके जास्त असू शकते.

ही दोन विधाने मला सुसंगत वाटली नाहीत. यामुळे मी स्पष्टीकरण मागितले. पण आपण दिलेले स्पष्टीकरण मला वरील पहिल्या विधानाशी सुसंगत वाटत नाही. माझ्या आकलनानुसार चंद्र आणि सूर्य यांचे आकाशातील दृष्य मार्ग हे दोन रेखांशांप्रमाणे असावेत. पृथ्वीचे सारे रेखांश धृवांपाशी एकमेकांना भेटतात, हे मार्ग आकाशात कुठेही भेटतील. (त्या बिंदूंना राहू केतू म्हणतात असे वाचले आहे) एवढा फरक आहे. तसा विचार केला तर सूर्याचा मार्ग उभा, आडवा, तिरपा कसाही असला तरी चंद्राचा मार्ग त्यापासून ५ अंशाने कलताच राहील. त्यामुळे या मार्गांशी काटकोनात चंद्र सूर्यापासून फार दूर जाऊ शकणार नाही. ग्रीनिचच्या दोन्ही बाजूंना ५ अंशावरील रेखांशांनी सीमित झालेला पृथ्वीचा संत्र्याच्या फोडीसारखा भाग नजरेसमोर आणला तर दृष्य आकाशातील चंद्र व सूर्य यांचे मार्ग तेवढ्या तुकड्यात दिसतील. चंद्र व सूर्य यांच्या भ्रमणाच्या दिशेने त्यात ० ते ३६० अंश यातील कोठलीही संख्या आली तरी काटकोनात ती ५ अंशाच्या वर जाणार नाही, चंद्राचे उत्तरायण आणि दक्षिणायन या १० अंशामध्येच सीमित असावे, असे मला अजूनही वाटते.

या विषयाचा मी शास्त्रोक्त अभ्यास केलेला नाही आणि माझ्या सध्याच्या घराच्या चारी बाजूंनी उंच इमारती असल्यामुळे त्यातून अगदीच इवलेसे आभाळ मला दिसते, त्यात पुरेसे निरीक्षण करता येत नाही. त्यामुळे तर्काचा आधार घ्यावा लागतो.

पैकी माझे पहिले विधान चुकलेले आहे

चंद्राच्या (पृथ्वीभोवतीच्या) भ्रमणकक्षेचे प्रतल आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणकक्षेचे प्रतल हे ५ डिग्रीने कललेले आहे.
वरील दोन परस्परविरोधी विधानांपैकी

चंद्र सूर्याच्या ५डिग्री उत्तरेला किंवा दक्षिणेला उगवू मावळू शकतो. (हे वाक्य ढोबळ आहे. बरोबर वाक्य "चंद्राचा दृश्य आकाशमार्गातील मध्यबिंदू हा सूर्याच्या मध्याह्नबिंदूशी +/-५ डिग्री कोनीय अंतर ठेवू शकतो.)

माझे हे विधान चुकीचा अर्थ सांगते. (कारण त्यात "कमाल" शब्द अध्याहृत असावासा वाटतो. अर्थातच तो नाही.)

हे लक्षात असू द्यावे, की सूर्य आणि चंद्र यांच्यामधले कोनीय अंतर ~५२ डिग्री इतके जास्त असू शकते.

हे विधान "कमाल" ("इतके जास्त") सांगते.

याबाबत अधिक विचार करायचा असेल तर "मेजर लूनर स्टांडस्टिल" आणि "मायनर लूनर स्टँडस्टिल" या संकल्पनांबद्दल अधिक वाचावे.

"मेजर लूनर स्टँडस्टिल" मध्ये चंद्र एका महिन्यात २८.५ डिग्री उत्तर ते २८.५ डिग्री दक्षिण असे उत्तर-दक्षिणायन (एका महिन्यात) करतो. "मायनर लूनर स्टँडस्टिल" मध्ये चंद्र केवळ १८.५ डिग्री उत्तर ते १८.५ डिग्री दक्षिण असे उत्तर-दक्षिणायन एका महिन्यात करतो.

पुनश्च : पृथ्वी-चंद्र मार्गांच्या प्रतलांबद्दलचा ५ डिग्री उल्लेख चुकीने "उगवतीच्या कोनीय अंतरांबद्दल" सांगितलेला आहे. नजरचुकीबद्दल क्षमस्व.

चंद्राच्या उगवतीचा तक्ता

१९९०-२००८ साल. विषुववृत्तावर (ग्रिनीच ० रेखांशावर) उगवतीचा आकाशीय अक्षांश
चंद्राच्या उगवतीचा तक्ता
प्रत्येक सालातली डिसेंबर २२ तारीख :
साल :::: ध्रुवतार्‍यापासून पूर्वेकडचा कोन :::: उगवतीचा आकाशीय अक्षांश (- दक्षिण, + उत्तर)::::
१९९०:::: 99.7 :::: -९.७
१९९१:::: 68.9 :::: +२१.१
१९९२:::: 112.9 :::: -२२.९
१९९३:::: 79.5 :::: +१०.५
१९९४:::: 81.7 :::: +८.३
१९९५:::: 108.7 :::: -१८.७
१९९६:::: 73.1 :::: +१६.९
१९९७:::: 89.1 :::: +०.९
१९९८:::: 106.6 :::: -१६.६
१९९९:::: 69.4 :::: +२०.६
२०००:::: 103.6 :::: -१३.६
२००१:::: 96.2 :::: -६.२
२००२:::: 67.3 :::: +२२.७
२००३:::: 114.4 :::: -२४.४
२००४:::: 71.7 :::: +१८.३
२००५:::: 85.5 :::: +४.५
२००६:::: 115.8 :::: -२५.८
२००७:::: 62.9 :::: +२७.१
२००८:::: 106.7 :::: -१६.७

या सर्व दिवशी सूर्याचा आकाशीय अक्षांश आदमासे -२३.५ डिग्री इतका होता (२२ डिसेंबर म्हणून). म्हणजे २००७च्या २२ डिसेंबरला सूर्य मकरवृत्तावर डोक्यावर होता (-२३.५ डिग्री, दक्षिण) तर चंद्र +२७.१ डिग्री उत्तर अक्षांशावर, म्हणजे कर्कवृत्ताच्याही उत्तरेकडे डोक्यावर होता. (परंतु ही प्रतिपदा नव्हती. प्रतिपदेला +/- ५ डिग्रीच असेल काय? हा मुद्दा विचार करण्यालायक आहे.)

हे तक्ते उतरवून घेण्यासाठी दुवा.

२००६ साली काही चतुर्दशींना उगवणारा चंद्र आणि सूर्य - अक्षांश

सर्व तारखा ~चतुर्दशीच्या ६-१०% प्रकाशित चंद्रकोरीच्या
तारीख::::चंद्रोदय अक्षांश::::सूर्योदय अक्षांश::::कोनीय अंतर
23-Jun :::: 24.6 :::: 23.4 :::: 1.2
22-Jul :::: 28.4 :::: 20.3 :::: 8.1
21-Aug :::: 24.7 :::: 12.2 :::: 12.5
19-Sep :::: 17.8 :::: 1.5 :::: 16.3
19-Oct :::: 3.3 :::: -9.9 :::: 13.2
18-Nov :::: -11.9:::: -19.2:::: 7.3
18-Dec :::: -24 :::: -23.4:::: -0.6

तर चतुर्दशीला (म्हणजे जवळच्या प्रतिपदेलाही) हे कोनीय अंतर +/- ५ डिग्रीपेक्षा अधिक असू शकते. पण ५२ डिग्री असे कुठल्या अन्य वर्षी असू शकेल काय? प्रश्न गुंतागुंतीचा आहे.

धन्यवाद

सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद. इतकी माहिती आपल्या करांगुलीच्या अग्रावर कशी असू शकते याचा मला अचंभा वाटतो. ती समजून घेण्यासाठी मला बराच वेळ लागेल.

५२ डिग्री बद्दल आणखी एक गंमत

काही साधासुधा विचार करून मी म्हटले होते की प्रतिपदेला चंद्र-सूर्य यांच्यातील कोनीय अंतर जास्तीतजासत ५२ डिग्री असेल. आणि अशी परिस्थिती सूर्याच्या कमाल दक्षिणायनात (चंद्र त्याच्या कमाल उत्तरायणात), किंवा सूर्याच्या कमाल उत्तरायणात (चंद्र त्याच्या कमाल दक्षिणायनात) असताना येईल.

चंद्र-सूर्याच्या आकाशमार्गातील स्थितीचा विदा वरील तक्ते बनवताना वरवर बघितला. माझ्या लक्षात आले, की अशी स्थिती गेल्या १०० वर्षांत प्रतिपदेला आलेली नाही! सूर्य कमाल दक्षिणायनात, चंद्र कमाल उत्तरायणात, असे असताना नेहमी आपली पूर्णिमाच (किंवा आसपास)!

मग लक्षात आले, की याचेही चक्र आहे ~२५००० वर्षांचे. (त्या काळात पृथ्वीचा मेरुदंड वेगवेगळ्या ध्रुवतार्‍यांकडे बोट दाखवत एक गिरकी घेतो. वसंत संपात सर्व नक्षत्रांमधून एकदा फिरून येतो). म्हणजे सूर्याचे दक्षिणायन-चंद्राचे उत्तरायण अशी परिस्थिती प्रतिपदेला यायला या चक्रात ~१३००० वर्षांची वाट बघावी लागेल. आपल्या तीन-चार पिढ्यांच्या आयुष्यमर्यादेत चंद्र आणि सूर्य यांचे प्रतिपदेला कमाल कोनीय अंतर २०-३० डिग्री इतपतच दिसणार आहे - तेही संपात [एक्विनॉक्स]च्या आसपास.

मात्र पूर्णिमेला सूर्य कमाल दक्षिणायनात, चंद्र कमाल उत्तरायणात अशी ~५२ डिग्री दूरची स्थिती आपल्या पिढीला बघायला मिळते, ती काही हजार वर्षांपूर्वीच्या ऋषींना कधी बघायला मिळाली नाही!

म्हणजे कमाल ~५२ डिग्री हा माझा विचार अजून सार्वकालिक दृष्टीने ठीकच आहे, पण आपल्या पिढीच्या निरीक्षणासाठी, चंद्रकोरीसाठी, गैरलागू आहे. या बाबतीत इतका सुक्ष्म विचार मी याआधी केला नव्हता.

पण चंद्र ही आकाशातली रूपवान ज्योती कितीतरी रंजक विचारांना चालना देऊ शकतो. अशी चालना दिल्याबद्दल आनंद घारे यांना पुनश्च धन्यवाद.

(आणि विदा मिळण्याबाबत... जय महाजाल! खरोखरच आता वाटेल ती माहिती आधी बघितली नसली तरी आपल्या टंकणार्‍या बोटांच्या अगदी जवळ आहे.)

आभार!

चंद्र ही आकाशातली रूपवान ज्योती कितीतरी रंजक विचारांना चालना देऊ शकते. अशी चालना दिल्याबद्दल आनंद घारे यांना पुनश्च धन्यवाद. माझेही धन्यवाद. आणि, सकृद्दर्शनी अनाकलनीय कल्पना आणि त्यांसंबंधित किचकट वाटू शकणारी गणिते सोपी करून मनातल्या अनेक वर्षांच्या शंका दूर करण्यासाठी धनंजयांचेदेखील आभार.

माझ्या माहितीप्रमाणे, आपला ध्रुवतारा खरी उत्तर दिशा दाखवणार्‍या बिंदूभोवती साधारण १२ तासात एक प्रदक्षिणा करतो. वेधशाळांमध्ये ध्रुवाची रात्रभर निरीक्षणे करून, खर्‍या उत्तरबिंदूची निश्चिती करण्यात येते, आणि त्यावरून परिसरातल्या इमारतीवरील एखाद्या स्थिर बिंदूच्या कोनीय अंतराची. आकाशात ध्रुव नसला तरी त्या डेटम पॉइन्टच्या या ज्ञात कोनात्मक दिशेला दुर्बिणीच्या भिंगाचा मध्यबिंदू करून तीवर ते कोनीय माप सिद्ध केले की दैनंदिन कामासाठी कोणतीही अडचण येत नाही. ध्रुवतार्‍याची ही निरीक्षणे कशी करायची याबद्दल नॉटिकल अल्मानक नामक बृहत्‌ पंचांगात ऊहापोह केलेला असतो.
सध्याचा ध्रुवतारा हा कायमचा नाही हे माहीत होते पण त्याच्या बदलाचे फक्त ~२५००० वर्षांचे चक्र असते हे माहीत नव्हते. हा काळ अंतराळशास्त्रातील कालमापनांच्या तुलनेने क्षुल्लकच म्हणायला पाहिजे.--वाचक्‍नवी

...

~२५००० (testking) ह्मग लक्षात आले, की याचेही चक्र आहे ~२५००० वर्षांचे. (त्या काळात पृथ्वीचा मेरुदंड वेगवेगळ्या ध्रुवतार्‍यांकडे बोट दाखवत एक गिरकी घेतो. वसंत संपात सर्व नक्षत्रांमधून एकदा फिरून येतो). म्हणजे सूर्याचे दक्षिणायन-चंद्राचे उत्तरायण अशी परिस्थिती प्रतिपदेला यायला या चक्रात ~१३००० वर्षांची वाट बघावी लागेल. आपल्या तीन-चार पिढ्यांच्या आयुष्यमर्यादेत चंद्र आणि सूर्य यांचे प्रतिपदेला कमाल कोनीय अंतर २०-३० डिग्री इतपतच दिसणार आहे - तेही संपात [एक्विनॉक्स]च्या आसपास.

वरील दुवा

"टेस्ट्-किंग डॉट कॉम" हा दुवा अवांतर वाटतो. उपक्रमाला कोणीतरी स्पॅमते आहे काय?

 
^ वर