चंद्रावरचा डोलणारा ससा

पृथ्वीभोंवती चंद्र जेवढ्या वेळात एक प्रदक्षिणा घालतो तेवढ्याच वेळात तो स्वतःभोंवती फिरत असल्यामुळे आपल्याला त्याची एकच बाजू दिसते. हे वाक्य शाळेत शिकतांना परीक्षेत अर्धा किंवा एक मार्क मिळवण्यापुरते पाठ केले होते आणि नंतर ते सोडून दिले होते. चंद्राला दुसरी बाजू असेल असा विचारसुध्दा कदाचित त्या वयात मनात आला नसेल. पुढे अमेरिकेच्या अपोलो मोहिमेतून मिळालेली चंद्राविषयी विविध प्रकारची माहिती प्रसिध्द व्हायला सुरुवात झाली तेंव्हा माझे चंद्राविषयीचे कुतूहल जागे झाले.

स्वतःभोवती फिरणे म्हंटल्यावर भोवरा, टकळी किंवा भिंगरी या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पूजाविधीच्या अखेरच्या भागात "यानिकानिचपापानी ... " म्हणत 'प्रदक्षिणे पदे पदे' करणारा माणूस आठवतो. पृथ्वीचे स्वतःभोंवती फिरणे याच प्रकारचे असते, पण चंद्राचे फिरणे मात्र वेगळ्या प्रकारचे असते.

"पृथ्वी आणि चंद्र हे अवकाशात फुगडी खेळत असतात" असे मी गंमतीने मागील भागात लिहिले होते. फुगडी घालणा-या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांचे हात क्रॉस करून पकडलेले असतात. त्यामुळे ते दोघे फिरत असतांना त्यांचे खांदे एकमेकांना समांतर राहतात आणि चेहेरे नेहमी एकमेकांसमोर राहतात. पृथ्वी आणि चंद्ग यांच्या बाबतीत अंशतः तसे नसते. पृथ्वी एका वेगळ्याच अक्षाभोंवती स्वतःच्या वेगळ्या जलद गतीने फिरत असते. त्यामुळे कधी तिचा चेहेरा, कधी पाठ, कधी बाजू चंद्रासमोर येतात. तिला सर्व बाजूंनी असंख्य हात असावेत आणि क्षणाक्षणाला वेगवेगळ्या हातांनी ती चंद्राचे हात पकडत असावी अशी कल्पना करता येईल. च्ंद्र मात्र इमाने इतबारे पृथ्वीकडे नजर ठेऊन तिच्यासोबत फुगडी खेळत असतो.

आपण एकाद्या देवळाच्या चौकोनी गाभा-याला प्रदक्षिणा घालतो तेंव्हा त्याच्या प्रत्येक कोपर्‍याशी स्वतःभोंवती काटकोणात वळतो आणि अशा प्रकारे प्रदक्षिणा पूर्ण होईतो स्वतःभोंवती ३६० अंशातून फिरतो. वर्तुळाकृती स्तूपाभोंवती प्रदक्षिणा घालतांना आपण प्रत्येक पावलागणिक थोडे थोडे वळत जातो. चंद्राचे स्वतःभोंवती फिरणे हे अशा प्रकारचे असते.

Joker

चन्द्राची पृथ्वीप्रदक्षिणा आणि स्वतःभोवती फिरणं हे तंतोतंत सारख्याच वेळांत होणं हा एक निव्वळ योगायोग असू शकेल असे माझ्या मनाला कधीच पटलं नव्हतं. या दोन्हीमधील समानतेचं कारण शोधायला फारसे कष्ट पडले नाहीत. गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारा 'टाइडल कपलिंग' नांवाचा एका प्रभाव याला कारणीभूत आहे. चन्द्राच्या व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्राचे पाणी वर उचलले जाते व त्यामुळे तात्पुरती भरती ओहोटी येते हे आपल्याला माहीत आहे. पण पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने चन्द्राच्या पृथ्वीकडील बाजूलाच एक कायमचा फुगीरपणा आणला आहे. कदाचित चंद्रामधील वजनदार मूलद्रव्यांचे कण पृथ्वीकडच्या बाजूला अधिक प्रमाणात जमा झाले असतील. यामुळे जड बुडाचा विदूषक जसा नेहमी सरळ उभा राहतो तसंच कांहीसं चन्द्राचं झालं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर चन्द्राच्या अणुरेणूंना पृथ्वीच्या अणुरेणूंनी सर्व बाजूंनी असे कांही जखडून ठेवले आहे की ते हूं का चूं करू शकत नाहीत आणि चन्द्राची अवस्था घाण्याला बांधलेल्या बैलासारखी झालेली आहे. घाण्याभोवती फिरतांना बैल सुध्दा सतत दिशा बदलत असतो. त्यामुळे तो जसा आणि जितका स्वतःभोवती फिरतो तितकाच चन्द्रही फिरतो. चन्द्र स्वतःभोवती फिरतो म्हणजे भोवर्‍यासारखी गिरकी घेतो असे कदाचित वाटेल. पण प्रत्यक्षात वेगळेच घडते.

या टाइडल इफेक्टमुळे चन्द्राचा जो चेहरा आपण अगदी लहानपणापासून पाहिला आहे तो जसाच्या तसा आजही दिसतो. हजारो वर्षापूर्वी संस्कृत कवींनी त्याला शशांक म्हटलेले आहे त्यांनाही त्यावर सशाचीच आकृति दिसली होती म्हणूनच. चन्द्र रोजच्या रोज कलेकलेने वाढत किंवा लहान होत असला तरी दर पौर्णिमेला दिसणारे त्याचे पूर्ण बिंब जसेच्या तसेच असते असे सर्वसामान्य माणसांना वाटते. पण चिकित्सक लोकांना सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यातला फरक जाणवायला लागला.

शास्त्रज्ञांनी जेंव्हा पौर्णिमेच्या चंद्राचे फोटो बारकाईने पाहिले तेंव्हा त्यांना त्यावरील सशाचा आकारही थोडा थोडा वेगवेगळा वाटायला लागला. त्यांनी ते फोटो एकमेका पाठोपाठ प्रोजेक्ट केले तेंव्हा तो ससा चक्क डुगडुगायला लागला. याचे अॅनिमेशन इथे पाहता येईल.

आता हा काय प्रकार आहे याचा विचार केल्यावर लक्षात आले की पृथ्वीची कक्षा व चन्द्राची कक्षा या एका सपाट प्रतलामध्ये नसून त्यामध्ये पांच अंशांचा कोण आहे. त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेच्या प्रतलाशी तुलना करतां चन्द्र त्याच्या थोडा वरखाली होत असतो. शिवाय पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोंवती फिरण्यामुळे तिच्या पृष्ठभागावर राहणारे आपणसुध्दा रोजच या प्रतलाच्या वरखाली करत असतो. खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या चेहे-याचा फोटो आपण खाली बसून घेतला तर त्याच्या हनुवटीखालचा भाग त्यात येईल आणि उभे राहून घेतला तर डोक्यावरील केसांचा जास्त भाग दिसेल. डाव्या किंवा उजव्या बाजूने फोटो काठल्यास त्या त्या बाजूचा भाग जास्त दिसेल आणि उलट दिशेचा कमी दिसेल. याचप्रमाणे पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या दिवशी पाहिल्यास आपल्याला चन्द्राचा थोडासा वरचा, खालचा आणि दोन्ही बाजूंचा जास्तीचा भाग दिसू शकतो. एका वेळी चंद्राचा फक्त अर्धा भागच दिसत असला तरी या सर्वांची गोळाबेरीज करून आपल्याला पृथ्वीवरून चन्द्राचा जवळ जवळ ५८-५९ टक्के भाग दिसतो. त्यामुळे त्याचा फक्त अर्धाच भाग दिसतो असे म्हणणे हे अर्धसत्य होईल. उरलेल्या ४१-४२ टक्क्याचे दर्शन घेण्यासाठी मात्र रॉकेटमध्ये बसून चन्द्राच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

खुप छान

सगळी मालीका रोचक होत आहे. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक.

उत्तम

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख. आकृतीमुळे समजायला सोपा. हि लेखमाला मुखपृष्ठावर असायला हवी.


डोलणार्‍या सशाचे चलचित्र

मी हल्लीच बघितले होते - ते येथे (दुवा)

लेख आवडला.

लेख आवडला !

लेखातील आकृत्या, डोलणार्‍या सशाचे चलचित्र आणि समजेल असे विवेचन !
केवळ सुंदर लेख !!!

+१

हेच म्हणतो.

उत्कृष्ठ विवेचन.

उत्कृष्ठ विवेचन.

सुंदर, अतिशय रोचक लेखन.

(अवांतर - घारे साहेब, तुम्ही ही चित्रे कोणत्या प्रणालीत काढून इथे डकवता?)

चतुरंग

लेख आवडला

नेहमीचा चंद्र, आणि ओळखीची पृथ्वी. पण तुमचा लेख (खरे तर ही लेखमालाच) या दोन्हींकडे बघायला वेगळे परिमाण देत आहे.

धन्यु

अप्रतिम लेख! :) बरीच नवी माहिती मिळाली. मनापासून धन्यु!.

एक बाळबोध प्रश्नः पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातूनहि चंद्र असाच दिसतो का? का ससा उलटा दिसतो?

उपक्रमराव,
लेखमाला पहिल्या पानावर हवी या चाणक्यांच्या मताशी सहमत

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

विचार करण्यालायक प्रश्न

"पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावरून ससा असाच दिसेल का?"

मला वाटते, टप्प्याटप्प्याने विचार करता याचे उत्तर आपोआप समजू शकेल. विषुववृत्तावरून हा ससा कसा दिसत असेल? किंवा दिल्लीहून बेंगळूरुला गेल्यावर (विषुववृत्ताकडे जाताना) कसा फरक पडतो? आणि आजवर तसे सुक्ष्म लक्ष दिले नसेल, तर मनातल्या मनात विचार करावा - काय फरक पडत असेल?

जर काही फरक असेलच तर तो अक्षांशाबरोबर थोडाथोडा पडत असेल असा सुरुवातीचा विचारमार्ग मला दिसतो.

याबाबत विचार करताना आणखी एक पायरी अशी :
ससा उगवतीच्या क्षितिजावर कसा दिसतो आणि मावळतीच्या क्षितिजावर कसा दिसतो? एकीकडे खाली-डोके-वर-पाय असतो का? "वर" आणि "खाली" हे आपण कसे ठरवतो? हा उभा-उलटेपणा चंद्रात असतो की बघणार्‍यात? (जपानमध्ये चंद्र मावळतीला असताना त्याच वेळी इंग्लंडमध्ये चंद्र उगवतीला असतो हे लक्षात ठेवावे.) पूर्व/उगवतीची दिशा, पश्चिम/मावळतीची दिशा आपण कशी ठरवतो? वगैरे.

उगवती-मावळती चंद्रकोर.

उगवती चंद्रकोर आपण सहसा पाहत नाही, कारण ती असते अगदी पहाटे आणि अमावास्येच्या एकदोन दिवस आधी. ती अर्थात् पूर्वेला आणि उलटी असावी. आपल्या परिचयाची सुलटी चंद्रकोर पश्चिमेला आपल्याला फक्त् मावळताना दिसते.
पोर्णिमेच्या चंद्रावरचा ससा चंद्र मावळताना उलटा होतो हे नक्की.
कुठल्याही अक्षांशावरून ससा उभ्याचा आडवा झाला तरी अंतिमतः सारखाच दिसत असला पाहिजे. कारण ससा वरखाली होत असता तर चंद्राच्या न दिसणार्‍या भागाचा अंश आपल्याला दक्षिण गोलार्धातून दिसला असता. --वाचक्‍नवी

उगवती चंद्रकोर

चंद्रकोर उगवतानाही सुलटीच दिसायला हवी (म्हणजे टोके वरती असलेली). कारण त्याही वेळी सूर्य क्षितिजाच्या खाली असतो. त्यामुळे चंद्राचा खालचाच भाग प्रकाशित दिसणार. म्हणून चन्द्रकोरपण सुलटीच दिसणार.

पटले.

अमावास्येच्या अगोदरच्या दिवसात पहाटे उगवणारी चंद्रकोर सुलटीच दिसणार हे पटले. जी कोर अमावास्येनंतर म्हणजे शुक्ल पक्षात उगवणारी असेल ती उलटी असेल. पण ती आपण कधीच पाहू शकणार नाही, कारण ती सूर्योदयानंतर सूर्यापाठोपाठ पूर्व क्षितिजावर उगवत असेल. --वाचक्‍नवी

उलटी कोर

बरोबर आहे. बघायला पाहिजे.

अगदी प्रतिपदेची नाही तरी पंचमी - षष्ठीची कोर् उलटी दिसते का ते. दिसतच असेल.

नाही दिसणार :-)

पंचमी षष्ठी म्हणजे चंद्रोदयाच्या वेळेला उन्ह चांगले १०:३०-११:००चे झाले असणार!

आणि खग्रास सूर्यग्रहण नाही कारण अमावास्या नाही :-)

त्रयोदशीची चंद्रकोर

तीन वर्षांपूर्वी एकदा वद्य त्रयोदशीच्या दिवशी मॉर्निंग वॉकला गेलो असतांना मी अत्यंत रेखीव आणि मनमोहक अशी उगवती चंद्रकोर (अर्थातच सुलटी) आकाशात पाहिली आणि तिच्यावरून मला चंद्राविषयी माहिती जमा करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच या मालिकेची निर्मिती झाली.

पुढील भागात

कदाचित या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मिळेल. कृपया वाट पहावी.

 
^ वर