भारतातील मंदिरे-३

भारतातील मंदिरे-३

देवळांचा पहिल्यांदा नजरेत भरणारा भाग म्हणजे त्याचे शिखर किंवा छप्पर.सर्वसाधारणपणे हे कोनाकृती असते. आपण पाहिले आहे की सुरवातीच्या देवळांची छप्परे सपाट होती. त्या ऐवजी हा त्रिकोणी आकार कसा आला ? एक विचार असा की सुरवातीला देवळे ही गिरिशिल्पे होती. म्हणजे नैसर्गिक गुहा मोठी करून त्यात देऊळ तयार केले वा डोंगर खोदून, गुहा निर्माण करून,त्यात देऊळ निर्माण केले. कसेही असले तरी लांबून हे देऊळ पहातांना, तुम्हाला त्याचे छप्पर म्हणून डोंगरच दिसतो; बरेचदा निमुळता होत गेलेला त्रिकोणी डोंगर. आता तुम्ही मैदानात देऊळ बांधले तर हा डोंगराचा भास निर्माण करावयाला डोंगर कोठून आणणार? तर त्या ऐवजी छप्परच निमुळते केले गेले. पणहे एकदम झाले नाही.

सपाट छप्पर करणे तसे सोपे. भिंती उभ्या करा, त्यांवर वासे टाका, वाश्यांवर फ़रशा टाका. काम खलास. जो पर्यंत आकार लहान होता तो पर्यंत हे लिहण्यासारखेच सोपे होते. ३०-४० फ़ूट लांबीच्या, इमारती लाकडाच्या तुळया आसेतूहिमालय सर्वत्र मिळत होत्या. देवळाचा आकार वाढल्यावर दगडी छप्परांचे वजन इतके वाढले की त्यांचा भार लाकडी तुळयांना झेपणे अशक्य झाले. दगडी तुळयांना भार झेपला असता पण एवढ्या लांब दगडी तुळया मिळणे शक्यच नव्हते.या करिता काय उपाय शोधले गेले ते पहाण्या आधी सपाट छपारातील एक बदल (Veriation) पाहू.

या प्रकारच्या छप्पराला नाव आहे "गजपृष्ट". नाव मजेदार वाटते पण आहे मात्र एकदम चपखल. सपाट छपराचा एक मोठा तोटा म्हणजे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास जागा नसे. उपाय सोपा असल्याने लगेच अमलात आणला गेला. आयताकृती छप्पराच्या समोरासमोरच्या दोन बाजू उतरत्या केल्या म्हणजे पाणी साचत नाही. आणि असे छ्प्पर हुबेहुब हत्तीला मागून पाहिले तर त्याच्या दिसणाऱ्या पाठीसारखे दिसते. द्राविड शैलीच्या देवळांची छप्परे अशीच असतात.

आता उपाय बघू. पहिला उपाय म्हणजे मधे खांब उभे करणे. हे "कॉलम" म्हणून काम करतात आणि "बीम"ची लांबी एकदम कमी होते. ४० फ़ूट X ४० फ़ूट च्या मोठ्या दालनात दहा दहा फ़ूटावर नऊ खांब उभे केलेत तर तुळईची लांबी दहा फ़ूटावर येते. आणि जर हे खांब सुशोभित केले तर ते कशाकरिता बांधले हे ही लक्षात येत नाही. उलट " या देवळाचे खांब मोजता येत नाहीत " अशीच प्रशंसा केली जाते!".अबब म्हणावयाचे आहे? श्रीरंगम्च्या विष्णुमंदिरातील एका मंडपाचे नाव आहे "हजारीमंडप" लांबी १७५ मी. व रुंदी ५० मी.यात
फ़क्त ९५३ खांब आहेत! बाजूचे स्तंभ साडे तीन मीटर उंच आहेत, आतले त्याच्या दुप्पट.सगळे दगडी आणि बारकाईने कोरलेले ! आता बोला.

पण स्तपतींना पूर्ण कल्पना होती की हे खांब अडचण आहेत. नृत्यमंडपात, कल्याणमंडपात त्यांना जागा नाही. त्यांनी कमानीची कल्पना छप्पर बांधण्याकरिता वापरली.छोटे दगड किंवा वीटा कमानी व तत्जन्य घुमट उभारण्याकरिता वापरले गेले. वापर वीटांचा आहे व उदाहरणेही फ़ार नाहीत. पण घुमट आहे म्हणून त्यांना Indo-sarsenik म्हणावयाचे कारण नाही. आणि एक मार्ग म्हणजे दगडांचे एकावर एक असे थर बसावयाचे की मधल्या उघड्या भागाचा आकार कमी कमी होत जाईल व शेवटी सर्वात वर एवढाच आकार राहील की तो एकाच दगडाने झाकता येईल.या बांधणीमुळे छपराला "पायऱ्या" किंवा "मजले" निर्माण होतात. अर्थातच अशा छप्परांचा भार प्रचंड असल्याने भिंती भक्कम, जाडजूड लागतात. वरच्या पायरीचा प्रत्येक दगड खालच्या पायरी़च्या थोडासा पुढे झुकलेला दिसतो. हे काम फ़रशा भिंतीला समांतर मांडून करता येईल वा चौकानाचे कोन छेदले जातील अशा प्रकारे फ़रशा मांडून करता येईल.उतरंडीच्या छप्पराच्या या पायऱ्या सलग एका रेषेत असतील तर ती नागरी शैली; मजले स्पष्ट दिसत असतील तर द्राविड शैली. पण हे मजले वेगळे आहेत याची जाणीव ठेवण्याकरिता त्यांना "भूमि" म्हणतात.

भिंतींचे सुशोभन करण्यासाठी वापरावयाचे सर्व साधने येथेही वापरण्यात आली आहेत.कलष, मूर्ती, स्तंभ, कोनाडे, पाने-फ़ुले, मिथुने, रत्नहार इत्यादी सर्वांचा उपयोग केला गेला. सगळ्यात जास्त गमतीचा भाग म्हणजे ही शिखरे गाभारा-मंडप यांच्यावरून खाली उतरून देवळासमोर गोपुरे म्हणूनही आली. काही फ़ोटो बघू. खांबांचा एक फ़ोटो चित्रा यांनी मागील लेखात दिला आहेच.
आणि देवळांच्या प्रयेक फ़ोटोत छप्परे दिसतातच.

१. पट्टडकल
Pattadakal-3

२. तंजावुर
Bruhadesvar Tanjavur

३.ग्वाल्हेर
Teli kaa maNdir

४.सोमनाथपुर
somanathpur

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख लेखमाला

मंदिरांच्या रचनांबद्दल खूप छान माहिती या मालिकेत मिळत आहे. ती सचित्र असल्यामुळे घरबसल्या तीर्थयात्रा केल्यासारखे वाटते. तंजावूर येथील मंदिराच्या शिखरावरचा दगड कित्येक टन वजनाचा आहे. तो तेथपर्यंत ढकलत नेण्यासाठी खूप लांब उतरंड बांधली होती अशी माहिती तेथे मिळाली.

गजपृष्ट

हा भाग देखील माहितीपूर्ण आहे. आवडला. चित्रे सुरेख आहेत.

मंदिराच्या पायर्‍या पायर्‍यांच्या कळसाला गजपृष्ठ म्हणतात हे माहित नव्हते. गजपृष्ट, कूर्मपृष्ट, सर्पपृष्ट असे काही प्रकार वास्तुशास्त्रात येतात असे वाटते. जमिनीच्या उंचवट्यावरून ती जमीन लाभणार किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्यांचा वापर होतो.

माथ्यावरची शीळा आणि गजपृष्ट

१. देवळाच्या माथ्यावरील शिळेचे वजन ८३ टन आहे.
२.गजपृष्टाबद्दल गैरसमज झालेला दिसतो. सपाट छप्पराच्या दोन बाजू उतरत्या केल्या म्हणजे ते छप्पर गजपृष्टासारखे दिसते.
शरद

लेख आवडला

लेख आवडला.. उत्तम चालु आहे.

मात्र या लेखात चित्रे आणि माहिती यांचा मेळ लागला नाहि. कोणते चित्र कशासाठी आहे हे कळले नाहि. म्हणजे गजपृष्ट कोणत्या चित्रात आहे? नागरी शैली, द्राविड शैलीसाठी दिलेल्या चित्रांपैकी कोणते चित्र पहावे?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

उत्तरी आणि द्राविडी शैली

यांचे स्थापत्य-शिल्पकारांनी केलेले सरावाचे प्रयोग पट्टदकल्लु (कर्नाटक) येथे दिसतात.

येथे उत्तर भारतीय (?नागर?) शैलीचे एक छोटे देऊळ :

पट्टदकल्लु-१

इथे द्राविड शैलीतले एक देऊळ (उत्तर भारतीय शैलीतले वरील देऊळ पार्श्वभूमीत डावीकडे दिसत आहे):

पट्टदकल्लु-२

बरोबर का ?

शरदरावांचे तिन्ही भाग वाचलेत थोडे-थोडे समजतही आहे. पण समजून घेण्यासाठी अजून वेळ दिला पाहिजे असे वाटते. कोणते मंदिर कोणत्या शैलीचे आहे, हे जर कोणी अधिक स्पष्ट करुन दिले तर आम्हा वाचकांना या लेख मालिकेचा अधिक आनंद घेता येईल.

जसे पहिले चित्र हे नागरशैलीचे आहे आणि अशा मंदिराचे वैशिष्टे असे की मंदिराचे शिखर सर्वात उठून दिसणारा भाग किंवा शिखराकडील भाग निमूळता असतो. मध्यभागी जरासे फुगीर आणि त्याचा पाया गोलाकार असा असावा (अशा बाह्य भागावर काही शिल्प कोरलेली असतात ) आणि ज्यावर हे टेकलेले असते ते चौकोनी छतावर असते ( असावे) आणि त्याच्याखाली सभामंडप असे ज्याचे स्वरुप ती नागरशैलीचे मी समजतो. बरोबर आहे का ?

अवांतर : खरं म्हणजे , चालूक्य शैली, विजयनगरशैली, पल्लव शैली, ओरिसा शैली, हेमांडपंथी मंदिराची शैली, खजूराहो शैली, आणि त्यांच्या मंदिराचे स्वरुप असे-असे असते, (मंदिर विकासाचा कालक्रमानुसार आढावा ) असे जर कोणी समजावून सांगितले तर या लेखाचा अधिक आनंद घेता आला असता असेही वाटत आहे. चुभुदेघे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गजपृष्ठ इथे देते

मला वाटते, गजपृष्ठ हे असावे.

http://www.hinduonnet.com/fline/fl2424/images/20071221505406511.jpg

गजपृष्ठ

मंदिराच्या कळसाच्या भागाकडील आकाराला गजपृष्ठ म्हणत असावे, हा आकार पूर्वीच्या चैत्यगृहावरुन आलेले असावेत.
शिखरावर असा गजपृष्ठाकार असणे हे वासर किंवा वेसर मंदिर शैलीचे ते एक वैशिष्टे असावे आणि अशा मंदिराचे उदाहरण म्हणून लेखात सोमनाथपूरचे केशव मंदिराचे दिले आहे, पण मंदिराचे शिखर इथे तर नागर शैलीचे दिसत आहेत :(

अवांतर : छ्या उगाच भानगडीत पडलो मंदिर शैलीच्या असे वाटत आहे, वाचक म्हणून परवडते अशा चर्चेत.

-दिलीप बिरुटे

लेख आवडला

लेख आवडला.

वर चित्रा यांनी गजपृष्ठाबद्दल शंकानिरसन केलेलेच आहे, तरी ऐहोळेच्या दुर्ग-मंदिराची (मला पूर्वी वाटायची तशी दुर्गा नव्हे!) दोन चित्रे द्यायचा मोह होतोच आहे.

ऐहोळेचे दुर्गमंदिर, दुरून गजपृष्ठासारखे छत दिसते.

ऐहोळेचे दुर्गमंदिर-१

मंदिराच्या शेजारी गोलाकार "आमलका"चा दगड पडलेला आहे, ते खुद्द दुर्ग मंदिराचे आमलक नव्हे, असे मार्गदर्शकाने आम्हाला सांगितले.

ऐहोळेच्या दुर्गमंदिराच्या छताचे जरा जवळून काढलेले चित्र

दुर्गमंदिराचे छत

वेगवेगळ्या थरांनी छत बनवलेले दिसते.

आणखी एक शंका : दुर्ग मंदिराच्या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालायचा मार्ग छताखालीच आहे. देवळाची वास्तू (प्रदक्षिणामार्गासकट) एकाच चौथर्‍यावर बांधलेली दिसते. म्हणजे याला फक्त पीठच आहे, हे बरोबर, ना? (उपपीठ नाही, या अर्थी प्रश्न.)

फोटो थोडा मोठा करता येईल का?

उजवीकडच्या ३ खांबांवर चित्रे दिसतात, बाकीचे खांब तसे नाहीत. ही चित्रे नंतरची आहेत का? का मधल्या एकदोन खांबांच्या मधली जागा आहे तेथे पूर्वी काही असावे?

फोटोचा दुवा

हा फोटोचा दुवा.

(खूप रुंद फोटोच इथे डकवला तर मलाच पान एकसंध वाचायला त्रास होतो :-)

मंदिर पुरातत्त्व खात्याने पुन्हा उभारले आहे असे मार्गदर्शकाने सांगितले. पूर्वी हे मंदिर तटबंदीजवळ (म्हणून "दुर्ग") होते. बरेचसे दगड म्हणजे बरेचसे खांब पूर्वीचे मिळाले नसतील. (भित्तिशिल्पे पूर्वीची मिळाली तरच लावायची, नवीन बसवलेले दगड "नवीन डागडुजी" म्हणून ओळखता आले पाहिजे, असे बहुधा नम्र धोरण असावे.)

याचा शेजारीसुद्धा एक छोटेसे देऊळ पुन्हा उभारत होते. पडझड झालेले दगड होते, खडूने लिहिलेले आकडे दगडांवर दिसत होते. पण मी फोटो काढलेला नाही.

आभारी आहे

फोटो चांगला आला आहे.

भारतीय पुरातत्व खात्याचे काम सोपे नसावे.

आणखी एक गजपृष्ठिका

(महाजालावर सापडले)
मामल्लपुरम् येथील नकुल-सहदेव मंदिर (पाठीमागून). शेजारीच एका हत्तीचे शिल्प असल्यामुळे "गजपृष्ठ" शब्दाचा अर्थ अधिकच स्पष्ट होतो. (देवळाचा आणि हत्तीच्या पाठीचा आकार तुळावा.)

मामल्लपुरम् येथील नकुल-सहदेव मंदिर (पाठीमागून)

छायाचित्रे व पीठ

ऋषिकेश : (हेच चार फ़ोटो का ?)

सुरवातीच्या लेखात पीठ व जंघा ( भिंतीचा मधला भाग ) पहाता यावेत असे फ़ोटो दिले होते. हे चार फ़ोटो छप्परांचे फ़रक दाखविणारे आहेत, पण त्यांचा उल्लेख पुढील भागात येणार आहे. दोन प्रधान शैली, नागर व द्राविड यांचा परिचय करून देतांना ह्या फ़ोटोंचा उपयोग होईल. ग्वाल्हेर (नागर), सोमनाथपुर व तंजावुर (द्राविड) व पट्टडकल-एहोळी-बदामी ( प्रायोगिक : नागरी-द्राविड ) अशी उपयोजना होती. काय झाले आहे की चित्रा-धनंजय आदींचा प्रतिसाद "चित्रमय" असल्याने माझे ओझे बरेच कमी झाले आहे. लेखाला पूरक फ़ोटो ते पुरवत असल्याने मी टिपणी दिली नव्हती. ते राहू देत. छप्परे निरनिराळी आहेत ना ?. शैलींच्या वेळी त्यांचा विचार करू.

धनंजय : फ़क्त पीठ आहे का ?

नाही. बाहेरील खांब पीठावरचे आहेत. देऊळ सांधार पद्धतीचे आहे. म्हणजे प्रदक्षिणामार्ग आच्छादित आहे. आपण दिलेल्या फ़ोटोत आतले खांब दिसतात. ते देवळाचे खांब. त्यांच्या खाली उपपीठ दिसते. छायाचित्र स्पष्ट असल्याने बघणे सहज झाले आहे.

सुरवातीला माझा विचार लेखमाला चार भागांत संपवावी असा होता. अजून गिरिशिल्पे, शैली-उपशैली, महत्वाची प्रातिनिधीक देवळे, ( आणि झालेच तर बौद्ध कलेचा हिंदू देवळांवरील पगडा व देवळांमधील मूर्तीकला ) राहिलेच आहे. पण माझ्या आवडीचा पट्टडकल हा विषय फ़ार चांगल्या छायाचित्रांनी येत असल्याने मोह टाळत नाही. सुरवातीच्या विचारामधील एखाददुसऱ्याला दांडी देउं. पुढचा लेख पट्टडकल व विशेषत: दुर्गा मंदिर. ( आधी सांगावयाचे कारण छायाचित्रे तयार रहातील.)

शरद

 
^ वर