फोर्थ डायमेन्शन १०

मायावी जग!

या जगात एखादी तरी अशी गोष्ट आहे का की तिच्याबद्दल आपण तिळमात्र संशय व्यक्त करू शकणार नाही? आपण जगत असलेले हे संपूर्ण आयुष्यच एखादं स्वप्न का असू नये? आपण सर्व एखाद्या परग्रहावरील माणसांची त्रिमिती सावली आहोत असे म्हटल्यास चुकते कोठे? आपण सर्व जण एखाद्या महासंगणकांच्या आज्ञेप्रमाणे वागणारे रोबो नाहीत हे कशावरून? हे जगच पूर्णपणे काल्पनिक का असू नये? असले प्रश्न भन्नाट आहेत असे वाटत असले तरी विचारलेल्या प्रश्नामधून या जगाविषयी शंका घेणे अगदीच चुकीचे ठरणार नाही.

काही गोष्टी मात्र इतके स्पष्ट असतात की कुठेही केव्हाही त्याबद्दल विचार केल्यास त्यात थोडासुध्दा बदल करता येणार नाही. तुम्ही झोपेत असा की जागेपणी, वास्तव जगात आहात की काल्पनिक विश्वात, दोन अधिक दोन याचे उत्तर चारच असणार. त्रिकोनाला तीनच बाजू असणार. परंतु कर्ता करविता परमेश्वर किंवा एखादी मायावी शक्ती आपल्याला याबाबतीतसुध्दा फसवत तर नसेल ना? खऱ्याला खोटे व खोटयाला खरे म्हणण्यास भाग पाडत नसेल ना? मुळात तांबूस असलेला रंग आपल्याला हिरवा वाटावा अशी काही तजवीज केली असेल का? आपल्यासमोर दिसत असलेले दृष्य चकवा वा दृष्टीभ्रम नसेल हे कशावरून? संमोहनाचे प्रयोग करणारे आपल्याकडून आचरट अंगविक्षेप करण्यास भाग पाडतच असतात. काहीही बडबड करायला लावतात. एक ते दहापर्यंत आकडे मोजत असताना सात हा आकडा गाळूनच पाच, सहा, आठ असे म्हणण्यास भाग पाडतात. झोपेत असलेल्याला पहाटेचे चारचे ठोके पडले तरी आता एकच वाजला असून घडयाळ बिघडलेले असल्यामुळे एकाऐवजी चार ठोके पडले असे म्हणणाऱ्यास आपल्यापाशी उत्तर नाही. याच प्रकारे आपला कर्ता करविता परमेश्वर असले अचरट प्रयोग आपल्याकडून घेत नसेल याची खात्री देता येईल का?

जगात एखादी मायावी शक्ती सुप्तपणे वास्तव करत असल्यास येथे काहिही घडण्याची शक्यता आहे. म्हणूनच या जगातील प्रत्येक गोष्टीबद्दल संशय घेण्यास नक्कीच वाव आहे.

(Source: The first Meditation from Meditation, Rene Descartes - 1601)

तत्त्वज्ञांची ( व वैज्ञानिकांचीसुध्दा!) नेहमीचीच एक जुनी खोड आहे. ज्या गोष्टी सामान्यांच्या बुध्दीच्या कुवतीच्या असतात, त्यांच्याबद्दलच नको त्या शंका घेण्यास भाग पाडतात. आपल्या समोरील दृष्य जग, परमेश्वर, चांगुलपणा, निसर्ग-नियम, आकाश, न्याय, सत्य, वेळ-काळ, इत्यादी अनेक गोष्टीबद्दल काही तरी खुसपट काढत, शंका-कुशंका काढत, आपल्या प्रस्थापित विचारांना धक्का देत असतात. मनात नको त्या गोष्टी भरवत असतात. अज्ञानातील सुख अनुभवू देत नाहीत.

एक मात्र खरे की अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीकडे संशयाने बघणाऱ्या तत्त्वज्ञाला स्वत:च्या तर्कयुक्त विचार करण्याच्या क्षमतेबद्दलच संशय घेणे परवडणार नाही. त्याची वैचारिक क्षमता प्रबल असल्यामुळेच जगातील यच्चयावत संकल्पनाबद्दल तो संशय व्यक्त करू शकतो. त्यामुळे सर्व सामान्यांना त्यानी मांडलेले शंका रास्त आहेत असे म्हणण्यावाचून गत्यंतर उरत नाही. परंतु त्याची संशयक्षमताच खोटी निघाल्यास त्याच्या विधानांना काही अर्थ राहत नाही.

परंतु संपूर्ण जग म्हणजे एक प्रचंड मायाजाल आहे, एका मायावी शक्तीचे कुटिल कारस्थान आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल व ते तर्कविसंगतही असेल. आदी शंकराचार्यापसून सतराव्या शतकातील रेने देकार्तेपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना या मायावी शक्तीने मोहित केले होते. काही वेळा या गोष्टी स्वयंसिध्द आहेत अशी मांडणी पण केली. संमोहित व्यक्तीला सहाच्या आकडयानंतर आठचाच आकडा आहे याची पूर्ण खात्री असते. झोपेत असलेला पहाटेचे चार वाजले तरी घडयाळ नादुरुस्त असून रात्रीचा एक वाजला आहे असे शपथेपूर्वक सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपण सर्व संमोहित झालेले असून सत्य काय आहे हेच आपल्याला अजून माहित नाही. व सत्य उमगून न देणे हेच मायावी शक्तीचे बलस्थान आहे.

कदाचित मायावी शक्तीचा प्रभाव अतिशयोक्तीचा वाटत असल्यास आपण याच तर्कपध्दतीला आधुनिक स्वरूप देवू शकतो. आपण सर्व मनोरुग्ण वा ठार वेडे असून हा वेडसरपणा आपल्याला सत्य स्थितीचे नीट आकलन करू देत नसेल. किंवा उत्क्रांतीच्या काळातच आपल्या मेंदूतील रचनेत फेरफार झाल्यामुळे तर्कशुध्द विचार करण्याची क्षमताच कुंठित झाली असेल. किंवा हा खोटेपणाच आपल्या अस्तित्वाच्या लढाईला पूरक ठरल्यामुळे यालाच आपण खरे मानत आलो आहोत. किंवा ही मायावी शक्ती आपल्या जनुकामध्येच घर करून बसली असेल.

अशा प्रकारच्या विचार प्रयोगामधून निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी आपल्याजवळ फक्त तार्किक विचार हेच एकमेव हत्यार आहे. आपली विचार करण्याची क्षमता योग्य की अयोग्य याचाच विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मुळातच आपण आपल्यापासून दूर राहून तटस्थपणे विचार करू शकत नाही. त्यामुळे आपले विचार वा तर्कसंगती योग्य की अयोग्य हे आपल्याला कधीच कळणार नाही. एखादे वजन बरोबर आहे की नाही याची चाचणी तेच वजन वापरून करता येत नाही. त्यासाठी प्रमाणीकृत वजनाबरोबर या वजनाची तुलना केल्याशिवाय वजनाचे मापन योग्य की अयोग्य हे लक्षात येणार नाही. आपल्याकडे तुलनेसाठी प्रमाणित वजन नसल्यामुळे गोंधळात भर पडत आहे.

कदाचित या विचार प्रयोगाची फलश्रुती जास्त खोलात जावून विचार करणे हेसुध्दा असू शकेल. विचार करणे हेच मूळ असून मायावी जगाच्या मागे धावत, आपण आपल्या वैचारिक क्षमतेवरच घाला घालणे योग्य ठरणार नाही. आपण आपल्या वैचारिक क्षमतेविषयीच संशय व्यक्त करू लागल्यास मग त्याला अंत नाही. फार फार तर ही (बिघडलेली! ) वैचारिक क्षमता आपल्याला दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी आहे, असे म्हणू शकू. कारण यातच खरा विवेक आहे व तेच शहाणपणाचे ठरेल!

लेखनविषय: दुवे:

Comments

श्रद्धावाद

आपण आपल्या वैचारिक क्षमतेविषयीच संशय व्यक्त करू लागल्यास मग त्याला अंत नाही. फार फार तर ही (बिघडलेली! )

हीच बाब श्रद्धाळु लोकांना श्रद्धा जोपासण्यास मदत करते.
प्रकाश घाटपांडे

कृतक विचार

मुळात तांबूस असलेला रंग आपल्याला हिरवा वाटावा अशी काही तजवीज केली असेल का?

अशा स्वरूपाची विधाने म्हणजे कृतक विचार म्हणावे लागेल्. ज्या व्याख्या मुळातून् माणसानेच् केल्या आहेत् त्यांच्याविषयी संशय् कसा घेणार? अमूक एक् रंग म्हणजे आपणच हिरवा असे ठरवले आहे. एकदा पॅरिसच्या कुठल्याशा हंडीखाली ठेवलेली दांडी म्हणजे १ मीटर असे आपणच् ठरवल्यावर् ती दांडी खरेच् १ मीटर् आहे की नाही असा प्रश्नच चुकीचा आहे.

आवडले

गोडेलच्या अपूर्णतेच्या सिद्धांताची आठवण झाली.

विचार करणे

म्हणजे नेमके काय असते? आपली पांच ज्ञानेंद्रिये करत असलेल्या असंख्य विसंगत निरीक्षणातून सुसंगती शोधणे आणि त्यातून सुसंगत अशी मालिका निर्माण करणे. ती निर्माण झाली तर त्याला आपण सत्य म्हणतो आणि नाही झाली तर गोंधळतो. ती करण्यात चूक झाली आणि ती नंतर लक्षात आली तर त्याला माया असे नाव देतो. ती चूक मान्य करण्याची मनाची तयारी नसेल तर दुसर्‍या कोणाला त्याचा दोष देतो. मनाशी प्रामाणिक राहणे हाच त्यावर उपाय आहे असे मला वाटते.

रोचक

विषय रोचक आहे, त्याचबरोबर त्याची व्याप्ती (अबब!) प्रचंड आहे. गेल्या दोन हजार वर्षांमधील तत्वज्ञ यातील काही प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला जे जग दिसते त्याचे अस्तित्व तसेच आहे हे सिद्ध करणे हा तत्वज्ञांचा आवडता प्रश्न आहे. विज्ञानातदेखील मूलभूत प्रश्न विचारल्यावर सध्याच्या स्थितीमध्येतरी विज्ञान तत्वज्ञानाकडे जाताना दिसते. याच्याशी निगडीत प्रश्न म्हणजे माझी जाणीव आणि तुमची जाणीव यात फरक आहे का? असल्यास तो मला कसा कळणार? मुळात जाणीव म्हणजे काय? प्रिमॉर्डिअल सूपमधून डिएनए-जंतू इ. प्रवास सुरू झाल्यावर नेमक्या कुठल्या बिंदूला जाणीवेने प्रवेश केला?
प्लांकचा स्थिरांक नेमक्या त्याच किमतीचा का आहे? एका थिअरीप्रमाणे संपूर्ण विश्वातील मूलभूत स्थिरांकांच्या किमती फारच अचूक तर्‍हेने फाइन-ट्युन केलेल्या आहेत. असे नसते तर विश्वाची निर्मिती अशक्य होती. स्थिरांक नेमके स्थिरांक आहेत की त्यांच्या किमती बदलत आहेत हा ही रोचक प्रश्न आहे. बिग-बँगच्या आधी स्थल-कालाचे स्वरूप कसे होते? किंबहुना स्थलकाल अस्तित्वात होता का? एकच विश्व आहे की अनंत विश्वे आहेत?

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

थोडासा आवडला

पण शब्दजालामध्ये फसणारा वाटल्यामुळे तितका आवडला नाही.

काही काही मूलभूत विधाने संदिग्ध अर्थाची असल्यामुळे गडबड होते. "जगात खूप काही संदिग्ध आहे/नाही" अशी विधाने करणार्‍या लेखकाने जास्तीत जास्त असंदिग्ध असायच प्रयत्न करावा लागतो. हा विरोधाभास असला तरी त्या लेखकासाठी अपरिहार्य आहे.

काही गोष्टी मात्र इतके स्पष्ट असतात की कुठेही केव्हाही त्याबद्दल विचार केल्यास त्यात थोडासुध्दा बदल करता येणार नाही. तुम्ही झोपेत असा की जागेपणी, वास्तव जगात आहात की काल्पनिक विश्वात, दोन अधिक दोन याचे उत्तर चारच असणार.

ही वादाची एक बाजू आहे, की सिद्धांताचे कथन?

जगात एखादी मायावी शक्ती सुप्तपणे वास्तव करत असल्यास येथे काहिही घडण्याची शक्यता आहे.

जगात मायावी शक्ती सुप्तपणे नसली तरीही काहीही घडण्याची शक्यता आहे. (मुळात "मायावी शक्ती" म्हणजे काय हेच मला कळलेले नाही.)

जर खरे आणि खोटे या कल्पनांचाच मूलभूत प्रश्न विचारायच असेल तर

किंवा ही मायावी शक्ती आपल्या जनुकामध्येच घर करून बसली असेल.

असल्या वाक्यांचे काय करावे तेच कळत नाही. जर खरे/खोटे यांचेच विमर्शन चालू आहे, तर "जनुके" वगैरे व्याज कल्पनांचे काय काम?

विचार करणे हेच मूळ असून मायावी जगाच्या मागे धावत, आपण आपल्या वैचारिक क्षमतेवरच घाला घालणे योग्य ठरणार नाही.

हे मला पटणारे विधान आहे. पण लेखातील युक्तिवाद मला या निष्कर्षापर्यंत आणण्यात असफल ठरला आहे. (या निष्कर्षापर्यंत मी कसा पोचलो, ते मी अन्यत्र मोठ्या लेखात सांगितलेले आहे. ते इथे नको.)

 
^ वर