माझ्या संग्रहातील पुस्तके -६

आमदार निवास रुम नं. १७५६

पुरुषोत्तम बोरकर हे नाव मराठी वाचकांना अपरिचित नसावे. 'मेड इन इंडिया' हे त्यांचे पहिले पुस्तक गाजले होते. या लेखकाचे सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले' आमदार निवास रुम नं. १७५६' हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. शहाऐंशी पानांची ही कादंबरी आहे, असे लेखकाचे म्हणणे आहे, पण तेही तितकेसे खरे नाही.मुंबईतल्या आमदार निवासात (अर्थातच बेकायदेशीरपणे) राहून आपल्या लोकसंग्रहावर - 'कॉन्टॅक्टस्' वर लोकांची कसलीही कामे करुन देणार्‍या एका मध्यस्थाने - दलालाने - स्वतःशीच केलेला हा संवाद आहे. राजकारण, राजकारणी, सरकारी यंत्रणा यांना पैशापासून ते मांस, मदिरा, मदिराक्षी या तीन 'म' अस्त्रांचा वापर करुन वेठीला धरणार्‍या एका उंदराची ही कथा आहे. सिंहाच्या पाठीवर बसलेला उंदीर हे या पुस्तकाचे फडणीसांनी काढलेले मुखपृष्ठ बोलके आहे.
हा उंदीर - पोपटराव - स्वतः अत्यंत निर्ढावलेला अट्टल सौदेबाज आहे. विवेक, बरेवाईट, सहानुभूती, सामाजिक जाणीव या सगळ्यांपासून हा कैक योजने दूर आहे. मुंबईत राहिला की माणूस जरा अंतर्बाह्य निर्ढावतो, तसा हा पूर्ण स्वार्थी, आपमतलबी आणि फक्त पैशाशी प्रामाणिक झालेला आहे. कोणत्याही गोष्टीची, माणसाची पैशाने खरेदी करता येते यावर त्याचा गाढ विश्वास बसलेला आहे. याच्या जोडीला त्याच्याकडे जबरदस्त 'नेटवर्किंग' ची क्षमता आहे, गोड बोलण्याची कला आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, आणि व्यसने आहेत. झाले, यशस्वी व्हायला माणसाला आणखी काय लागते?
या पोपटरावाला मुंबईत हरतर्‍हेची माणसे भेटतात. त्यात 'बहुजन समाजानेआम्हा ब्राह्मणांना शेकडो वर्षे मद्य आणि मांस यांच्यापासून वंचित ठेवले, त्याचा मी बॅकलॉग भरुन काढतोय असे म्हणणारा पत्रकार रघुवीर जोशी आहे, खानदेशातील पोपटरावाच्या गिर्‍हाईकांचा ठेका सांभाळणारे बाबासाहेब तुपटाकळीकर आहेत, एक प्रोफेशनल डान्सर ते रेव पार्ट्यांमधला मेल स्ट्रिपर ते जिग्लो ते ड्रग ऍडिक्ट असा रसातळाला जाणारा प्रवास करणारा रॉकी आहे आणि किन्नरी तारापोरवाला आहे.
किन्नरी तारापोरवाला ही राजकारणात वावरणारी मोकळीढाकळी दिलखेचक मालमत्ता आहे. आपल्याकडे काय आहे आणि त्याचा वापर करुन आपल्याला काय मिळवायचे आहे याबाबत अजिबात संभ्रम नसलेल्या काही स्त्रिया जशा समाजातल्या सगळ्या वर्तुळांत आढळतात, तशीच एक ही किन्नरी. तिचे वर्णन करतांना बोरकरांची लेखणी तिरके दंश करत सुटते. ते म्हणतात, ' गच्च शरीरी बिलगलेला घट्ट पंजाबी ड्रेस, लिपस्टिक, बॉबकट, कोरीव भिवया आणि मालमत्ता दाखवत पुनःपुन्हा घसरणारी लागट ओढणी! आणि या सगळ्या गोष्टींना घेरुन असणारा तिचा अनैतिक मोकळेपणा! मारु अदाकारी पापण्यांची! पापासाठी उद्युक्त करणारी! किन्नरीचं नाव कांताबाई तारफडकर असू शकते मुळात! समजा आहेच्! तर मग बिघडलं कुठे आणि आपल्याला नावाशी काय करायचं राव असा इथल्या तमाम सेक्सप्रियर्सचा आपल्यालाच उलट सवाल? खांद्यावर शबनम लटकावून किन्नरी सदैव या आमदाराकडून त्या आमदाराकडे फिरत, घुसळत रहायची. मंत्रीपदावरचे गंधर्व तिला भाव द्यायचे नाहीत फारसे! कारण त्यांच्या अप्सरा कायम गोपनीय! ते कांडी कुठं झटकून टाकतात ते रयतेला कधीच कळणार नाही.
... आणि माझे तर असे स्वच्छ मत आहे, की किन्नरीझम कधीच फोफावू नये यासाठी गव्हर्मेंटनेच असा एक जीआर काढावा आणि समस्त आमदारांना मुंबईत सपत्निक रहाणे अनिवार्य करावे. ब्रह्मचारी आमदारांना तळवलकर जिममध्ये झोपणे सक्तीचे करावे. पण सालं इथं कुणाच्या झोपण्याची कुणीच फिकीर करत नाही. संपूर्ण स्वार्थी हे गाव!
... चल म्हटल्यावर ती उठली. कोपर्‍यातली सँडल पायात घालताना समस्त कार्यकर्त्यांसमोर ती अशा पोजमध्ये ओणवी झाली की त्या विश्वरुपदर्शनाने निरोपाचा हादरा खोलीला बसलाच.
कॉरीडॉरमधून लिफ्टपर्यंत ती माझ्यापुढे चालत होती. आपल्या खजुराहो पुठ्ठ्यांचा मारा भवतीच्या समस्त नरांवर दिलदारपणे करत होती.
.... टॅक्सी धावते आहे. माझ्या डाव्या बाजूला अरबी समुद्र, तर टॅक्सीत बाजूला चरबी समुद्र! खालची सोडली सईल तर वरची कितीक लेईल असा पारदर्शी कारभार असल्यावर बोलायचं कामच नाय! त्यातही किन्नरी अविवाहित पण ब्रह्मचारिणी नाय! हे म्हणजे आपल्या त्या सर्वोच्च ह्यांच्यासारखेच! हुबेहूब! ( या पुस्तकाचा काळ लक्षात घेतला तर ते 'सर्वोच्च हे' कोण हे लगेच कळेल!)

तर असा हा पोपटराव आणि अशी ही त्याची कथा. या पोपटरावाकडे हरतर्हेची कामे घेऊन येणारे लोक आणि पोपटरावाने चुटकीसरशी त्यांचा लावलेला निकाल. छोट्या आणि बड्या बापूची देवाणघेवाण, ताजच्या मागच्या गल्लीत झालेले सुरापान, चिकन टिक्का आणि रोट्या, सिग्रेट शिलगावत एखाद्या डान्सबारमध्ये किंवा आंटीच्या अड्ड्यावर घालवलेली रात्र आणि दुसर्‍या दिवशी नव्या गिर्‍हाईकाच्या शोधात असलेला डीओडरंटसारखा ताजातवाना पोपटराव. सेरेनेगेटीमधल्या विल्डरबीस्टच्या स्थलांतराची आठवण यावी अशा झुंडीबाज मुंबईत कडक इस्त्रीचे कपडे घालून ओठात नित्यनवी सिग्रेट चेतवणारा हा हसतमुख यशस्वी पोपटराव.

म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या अडचणींवर मात करणारा पोपटराव हा एक उड्डाणपूलच आहे. पोपटरावाकडे या ना त्या कारणाने येणार्‍या अशिलांची, गिर्‍हाईकांची गर्दी असते. यात कुणाला अर्जंट एखादी आश्रमशाळा पाहिजे आहे, कुणाला बदली तर कुणाला आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याची नांगी ठेचण्यासाठी एखादे वर्तमानपत्र काढण्याची परवानगी...' अखबार अब निकलते है रोटी के वास्ते, जैसे कुत्ते लडाये है रोटी के वास्ते, मजहब के नाम पे लडाये जाते है, कभी दाढी के वास्ते, कभी चोटी के वास्ते, कभी चिल्लर के वास्ते, कभी नोटों के वास्ते..'आणि हे सगळे करण्यासाठी आमदारसाहेबांनी तोंडातून 'बा' हे अक्षर काढले की ताबडतोब 'ई' आणि 'टली' ची सोय करण्यात पोपटराव वाकबगार आहे. 'शराब इतनी शरीफाना चीज है आदम, के पी के आदमी सच बोलता है सुबहशाम'. दुसर्‍या सोयीसाठी तर आश्रमशाळेच्या गिर्‍हाईकाने येतानाच बरोबर मुलींच्या वसतीगृहाची वॉर्डन बरोबर आणली आहे आणि तो म्हणतो की गरज पडल्यास देवाण घेवाणीत तिचाही वापर करण्यास हरकत नाही. त्या बाईची पोपटराव मुदाम ओळख करुन घेतो ' बाई गच्च, भव्य, भरदार आणि चहुअंगानी उतू चाललेली! काम पडल्यास साहेब तिला परमनंटही ठेवून घेतील, इतकी झवदार!पुढारी गेल्यावर आपणही एकदा चव चाखूच्!'

या सगळ्या धंद्यात बेरकी झालेला पोपटराव या सगळ्याकडे बघून एकदा तिरकसपणे हसतो.राजकारणी आणि त्यांचे बगलबच्चे यांच्यासाठी भडवेगिरी करताकरता त्याला हसू फुटते. तो हसतो आणि एक सिग्रेट चेतवतो.. 'जिंदगी भी कितनी हरामजादी है' म्हणणार्‍या डॅनीसारखे, किंवा मंत्रीमंडळाचा विस्तार ऐकून हसत सुटणार्‍या दिगू टिपणीससारखे.... सबने पहने है बडे शौकसे कागजके लिबास, किस कदर लोग है ये बारीशमें नहानेवाले.. ही सिग्रेट चेतवतानाही त्याला वाटते की या शहरात सिग्रेटसारखी सोबत नाही. हाक दिली की सांत्वनासाठी हजर!मरगळलेल्या मनाला उभारी देण्यासाठी सदैव तत्पर!मनाच्या उंचसखल विभ्रमात याची गरज अनिवार्य! आणि मुख्य म्हणजे इट इज अ कॉज ऑफ कॅन्सर!
इथे पोपटराव इतर दलालांपासून वेगळा पडतो. मुंबईकडे बघताना त्याला विंदांच्या ओळी आठवतात,' छे, नगर नव्हे हे - हिंदभूमीच्या शरिरी, वाटते जाहले जखम भायंकर जहरी...' आमदार निवासाच्या खिडकीशी उभं राहून सिग्रेट पिताना त्याला खालच्या प्रांगणातली झुंड गर्दी अस्वस्थ करते. पान-सिग्रेट- वडापाव- फ्रुटसलाद- चाय-कॉफी- सँडविच- दोसा- नारियलपानी- पेप्सी- थम्सप सर्व ठिकाणी बेदम झुंड गर्दी- एक मनोविकास प्रकाशनाचा स्टॉल सुनासुना - पुस्तक वाचणे आणि त्यातही विकत घेऊन वाचणे? उभ्या महाराष्ट्राला जी गोष्ट रुचत नाही, ती या आडव्या गर्दीला कशी रुचणार?
भटकळांच्या पुस्तकातला उतारा आठवत असताना आपणही सध्या कमिशनची बीन वाजवत असेच गवती साप पकडतो आहोत, असे त्याला वाटते. दोस्तोवस्कीला जे सापडले, ते उग्र, जहरी भीषण सर्प आपल्या हाती कुठून यायला? अशा सर्पांना तर कमांडोची सिक्युरिटी असते इथे. याबाबतीत आपण साले दर्जेदार गांडू! आणि माझ्यासारखे लाखो, करोडो या देशात... शर्म आती है की उस शहर में हम है कि जहां, न मिले भीख तो लाखों का गुजारा ही न हो....

आमदार निवास मध्ये बोरकरांनी भाषा आणि तिचा वापर याविषयी अनेक प्रयोग केले आहेत. 'मेड इन इंडिया' मध्ये संपूर्ण वर्‍हाडी भाषेचा वापर करत असतानाच बोरकरांनी अधूनमधून हिंदी गाण्याच्या ओळी, अमिताब बच्चन असे जाणीवपूर्वक केलेले उच्चार आणि गावाकडचा माणूस जसा बोलण्यात इंग्रजी शब्द वापरण्यासाठी धडपडत असतो तशी धडपड करुन घातलेले इंग्रजी शब्द असे काही केले होते. 'आमदार निवास' मध्ये बोरकरांनी हिंदी आणि उर्दू शेरांचा मुक्तहस्ताने वापर केला आहे. ह् शेर म्हणजे या पोपटरावाने स्वतःशीच केलेले संभाषण आहे. ते वेगळ्या भाषेत असूनही तसे वाटत नाहीत, ते वाचताना अडकल्यासारखे होत नाही, हे एक वैशिष्ट्य. क्रियापदे आणि विशेषणे वापरताना बोरकरांनी बर्‍याच गमती केल्या आहेत. खूप वेळ बाथ्रुम अडवून आंघोळ करणार्‍या तुपटाकळीकरांचे वर्णन करताना ' तुपटाकळीकर शेवटी बाथ्रुमला रतिक्लांत करुन आले आणि लगोलग खादीशुभ्र झाले' असे बोरकर लिहितात.खग्रास सूर्यभेदी या क्रांतिकारक कवीला मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन आणि मुकुट या सहा मकारांची आराधना करणार्‍या राजकारण्यांचे आकर्षण कसे वाटू लागले हे लिहिताना ते गमतीत येतात. सामाजिक आशयाच्या पोकळ रोजगारहमी कविता आणि त्या करणारे बिगारी कवी यांच्यावर तर बोरकरांनी अंगारजाळ शब्दांत लिहिले आहे.
'खुर्चीवर बसता बसताच जनमहाकवींनी व्हिस्की आणि चिकन चिलीची ऑर्डर दिली. आम्ही चिकनलेगसह मग त्यात सामिल झालो. कवितेचा धबधबा मग थोड्याच वेळात धबाधब कोसळू लागला. कवित संपवली की कवी वेटरला 'रिपीट' एवढेच सांगायचे. वेटरने आणलेला नवा पेग प्राशिला, की नवी कविता ऐकवायचे. कडव्यांमध्ये जिथे धृपदाच्या दोन चरणरेषा येतात, तेथे थांबून चिकनलेगचा तुकडा तोडायचे. अशा तर्‍हेने दलित, शोषित, विद्रोही, तळागाळातल्या पिचलेल्या माणसांच्या, दारिद्र्यरेषेखालील चिणलेल्या दु:खाच्या कविता त्यांनी ऍपेटायझरसारख्या आम्हाला ऐकवल्या...'
पंचतारांकित हॉटेलांचे, स्कॉच व्हिस्कीचे, जीनचे आणि बियरचे, चिकन फ्राय आणि मालवणी मटनताटाचे, देताळ्या बायांचे आणि घेताळ्या बाप्यांचे, सिग्रेटींचे आणि डान्सबारचे, पैशाचे, आणखी पैशाचे आणि त्याहून आणखी पैशाचे आणि मुख्य म्हणजे मुंबईचे - एखाद्या राक्षसी श्वापदासारख्या लसलसत्या जिभेच्या मुंबईचे असे हे पुस्तक आहे.
आणि यापैकी कशाचेही नसलेले असेही हे पुस्तक आहे.

आमदार निवास रुम नं. १७५६
पुरुषोत्तम बोरकर
श्रीविद्य प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती: डिसेंबर १९९९
पाने ८६, किंमत ७५ रुपये.

Comments

उत्तम

पुस्तकाचे शैलीदार परीक्षण आवडले. मात्र सिंहासन/मुंबई दिनांक नंतर अशा कादंबर्‍यांचे धक्कामूल्य कमी झाले असावे असे वाटते. 'रतिक्लांत'वरून गदिमांची जोगिया ही कविता आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक

सुंदर परिचय. आमदार निवास म्हणल्यावर आम्हाला श्रावण मोडकांच्या राजे ची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे

हे तर राजेच...

हे पुस्तक वाचावे लागेल. हे राजेच दिसताहेत. मोठी आवृत्ती असावी कदाचित. अशीही शक्यता आहे की, राजेंमधले 'रावसाहेब' असू शकतात.

असेच म्हणतो

राजेंची आठवण आली.

छान

वेग्ळेच पुस्तक (चांगल्या अर्थाने) दिसतय हे. ओळख/परिचय आवडली/आवडला.

>>पंचतारांकित हॉटेलांचे, स्कॉच व्हिस्कीचे, जीनचे आणि बियरचे, चिकन फ्राय आणि मालवणी मटनताटाचे, देताळ्या बायांचे आणि घेताळ्या बाप्यांचे, सिग्रेटींचे आणि डान्सबारचे, पैशाचे, आणखी पैशाचे आणि त्याहून आणखी पैशाचे आणि मुख्य म्हणजे मुंबईचे - एखाद्या राक्षसी श्वापदासारख्या लसलसत्या जिभेच्या मुंबईचे असे हे पुस्तक आहे.<<

मराठी आंतरजालावर देखिल काही लोकांचे लेखन ह्याच विषयांवर (उबग येईपर्यंत) घुटमळताना दिसते आणि वर त्यातुन जीवन विषयक मुल्ये/तत्वे ह्यावर चालणारे भाष्य त्रासदायक असते.

(वाचक) बेसनलाडू

प्रतिसाद संपादित.

सुंदर्

सुंदर पुस्तकपरिचय. छोटेखानी लेख आवडला.

धन्यु

छोटेखानी पुस्तकपरिचय आवडला. अजून येऊ द्या.. पुस्तकाच्या ओळखीबद्दल धन्यु!


मुंबईत राहिला की माणूस जरा अंतर्बाह्य निर्ढावतो

हे मत पुस्तकातील आहे का या लेखाच्या लेखकाचे? कोणाचेही असले तरी मत विनाकरण पूर्वग्रहदुषित आणि कलुषित वाटले.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

निर्ढावणे

वरील मत पुस्तकात अगदी स्पष्टपणे व्यक्त केले नसले तरी लेखकाला तसेच म्हणायचे असावे असे वाटते.
मला तरी हे 'स्वीपिंग स्टेटमेंट' वाटत नाही. अर्थात याबाबत मतभेद असणे अगदी शक्य आहे.
सन्जोप राव

आवडले

उत्तम पुस्तकपरीक्षण. पुरुषोत्तम बोरकर हे नाव मी याआधी फक्त ऐकल्याचे आठवते. मात्र त्यांच्या कोणत्याही पुस्तकाबाबत काही वाचले नव्हते. या निमित्ताने पुस्तकाची व लेखकाची चांगली ओळख झाली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर