भारतातील मंदिरे
भारतातील देवळे -२
(देवळे ह्या इमारती आहेत. आज ह्या इमारतींच्या प्रमुख भागांची,जोते(पीठ), दरवाजा, भिंत आणि छप्पर यांची माहिती घेऊं)
देवळांची उत्क्रांती कशी झाली याचा मागोवा घेण्याआधी सुरवातीला काय होते ते बघू. देवळाच्या अत्यंत गरजेच्या गोष्टी तीन.मूर्तीकरता जागा म्हणजे गाभारा. लोकांना (म्हणजे भक्तांना/पुजाऱ्याला) जागा, त्याला मंडप म्हणू आणि प्रदक्षिणॆकरिता जागा. कोणत्याही इमारतीला भिंती,दरवाजा व छप्पर लागणारच. लहान-मोठा आकार व सुशोभन हे नंतर.
सुदैवाने श्री. विसूनाना यांनी तिगवा मंदिराचा फ़ोटो दिला असल्याने तेथून सुरवात करू. भिंती दगडाच्या, साध्या दिसतात.; गाभाऱ्यावर आणि मंडपावर सपाट छप्पर आहे. प्रदक्षिणा मार्ग इमारतीच्या बाहेर व तो आच्छादित नाही. आच्छादित असेल तर त्याला "सांधार" म्हणतात, नसेल तर "निरंधार". येथे निरंधार. आत थोडे सुशोभन केले आहे.आकारही तसा लहानच म्हणावयास हरकत नाही. ही झाली सुरवात.
देवळांचे दोन प्रकार. पहिला उघड्यावरील देवळॆ. दुसरा प्रकार म्हणजे डोंगर कोरून केलेली गिरिशिल्पे. काल गणनेने गिरिशिल्पे आधीची.पण आपण त्यांचा विचार नंतर करू.
देऊळ म्हणजे इमारतच. तर आता या ठिकाणीच इमारतींच्या भागांचा विचार करू.
पीठ :
पीठ म्हणजे जोते. इमारतीच्या मजबूतीसाठी जोते पाहिजेच. शिवाय ते जमीनीपासून उंचही पाहिजे. तेवढेही पुरेसे वाटले नाही तर त्याच्यावर उपपीठ किंवा चौथरा. पीठ/उपपीठ जर प्रशस्त असेल तर देवळाभोवती प्रदक्षीणेला जागा मिळते. पीठ उंच असल्यास त्याच्या थरामध्ये निरनिराळ्या प्राण्यांच्या आकृती दाखवता येतात. उदा. खाली हती,त्यावर घोडे वगैरे.
पाया मजबूत असला की इमारतीला मजबूती मिळते हे झालेच पण पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून बचाव व मंदिर लांबवरून दिसते हेही महत्वाचे फ़ायदे..
निरनिराळ्या कालखंडातील पीठाची छायाचित्रे देत आहे.
पीठ-१.....भुवनेश्वर. सोय केलेली होती पण मूर्ती दिसत नाहित.
पीठ-२......पीठ्व उपपीठ दोन्ही दिसतात.
द्वारशाखा :
द्वारशाखा म्हणजे प्रवेश करावयाची जागा.कडी-कोयंडा-कुलुप लावून बंद करावयाचा घराचा दरवाजा नव्हे. बऱ्याच ठिकाणी बंद करावयाचा दरवाजा नसतोच. द्वारशाखा समोरून तसेच बाजूंनीही असातात. चौकट एक असते किंवा अनेक. काही वेळा चौकट नसतेही. दोन बाजूंच्या भिंतीच ते काम करतात. चौकट (किंवा चौकटी) करावयास व सुशोभनास सोप्या. दोनही बाजूला गंगा-यमुना किंवा द्वारपाल उभे केले की एकदम उठाव येतो. रुंदी व उंची आटोपशीर असल्याने नाजूक कोरीव कामास आदर्श. देवळात प्रवेश करण्या आधीच तुमचे मन उल्हसित होऊन जाते. या पुढे जेंव्हा कुठल्याही देवळाला भेट द्याल तेंव्हा दारापाशी थांबा.दोन्ही बाजूचे द्वारपाल बघा. चौकट एक आहे की अनेक आहेत, त्यांवर वेल-पताकांचे न्क्षीकाम आहे की लहान मूर्ती आहेत, वरपर्यंत एकच थर आहे की अनेक, अनेक असतील तर त्यांत काही योजना दिसते का, वरची गणेशपट्टी दरवाजाच्या किती बाहेर गेली आहे, त्यावरील कोरीव काम कसे आहे, वर कीर्तिमुख वगैरे काय काय आहे हे सर्व बघून मगच आत पाऊल टाका.( फ़ोटो काढावयाची सुरवात येथून होते.घरच्या माणसांचे/मित्रांचे छान फ़ोटो येथेच येतात.जास्त वेळ थांबणार असाल तर उन्हाचा अंदाज घेऊन फ़ोटो केंव्हा काढावयाचे तेही ठरवा.)
येथे काही द्वारशाखांची छायाचित्रे देत आहे. ती एका कालखंडातील नसली तरी सुरवातीपासून दरवाजे कसे नटवले जात याची कल्पना येईल.
द्वारशाखा-१...... पापनाथ मम्दिर, पडक्कल
द्वारशाखा-२..... वळसाणे.
द्वारशाखा-४.....हळेबिड. चौकट दिसत नाही.
भिंत :
इमारतीचा दुसरा भाग भिंत. खोली बंदिस्त करणे ही महत्वाची गोष्ट. पण आणखी दोन उपयोग म्हणजे सुशोभन आणि छपराला आधार देणे. तिगवाच्या देवळाच्या भिंती साध्या आहेत. छपराला आधार देणे हे महत्वाचे काम. पण पुढे सुशोभन एवढे महत्वाचे झाले की हळेबिड-बेलूर येथील देवळांच्या भिंती दिसतच नाहित. दिसतात मूर्ती, मूर्ती आणि परत मूर्तीच. हां,भिंती छपराला आधार देतात, पण जणू नाइलाजाने. अंगभर दागिने घालून,रेशमी शालू नेसून, सुहास्य वदनाने पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या वधूमातेने थोडा वेळ नवऱ्या
बरोबर कन्यादानाला बसावे तसे! लक्षात राहते ती पहिली प्रतिमा, दुसरी नव्हे. खरे म्हणजे या भिंती चांगल्या जाडजूड असतात. मोठे वजन पेलण्याकरताच त्यांची योजना असते. शिवाय सुरवातीच्या गिरिशिल्पात, थोडक्यात गुहेत, गेल्यावर जसे गार व काळोखलेले वाटेल तसे वाटावे हीही एक मनोकामना होती.( प्राग-ऐतिहासिक काळात उघड्यापेक्षा गुहेत माणसाला जास्त सुरक्षित वाटत असावे. त्याचा तर हा परिणाम नाही ना?) . माणूस नवे निर्माण करतांना " जूने जाऊ द्या मरणालागूनी" असे फ़ार वेळी म्हणत नाही. मागच्यातले चांगले घेऊन त्यात भर घातली जाते. मग ते शास्त्र असो, कला असो, सामाजिक नीतीनियम असोत. अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते. असो. या भिंतीना आतील व विशेषत: बाहेरच्या बाजूंनी नटवतांना निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. रथ, थर, देवादिकांच्या मूर्ती, रामायण-महाभारतातील कथा, रुपके, फ़ुले-वेली, मिथूने, जे जे कलाकाराला योग्य वाटेल, त्याचा उपयोग केला गेला आहे. नंतरच्या काळात या भिंती शक्यतो एका सरळ रेषेत येत नाहीत ना इकडे लक्ष दिले गेले. बघणाऱ्याची नजर सावकाशपणे फ़िरेल, त्याला छायाप्रकाशाचा खेळ बघावयाला वेळ मिळेल याची काळजी घेतली गेली. काही छायाचित्रे पहा.
भिंत-१....... कोणार्क. भिंत शोधा.
छप्पर :
हा इमारतीचा भाग केवळ शिल्पीच्या आवाक्यातला नव्हता. आता गरज होती वास्तूशास्त्रज्ञाची. (Architect & Engineer). खऱ्या अडचणींना इथे सुरवात झाली. हा महत्वाचा भाग अनेक शैलींमुळेही जास्त जागा घेणारा आहे. त्याची चर्चा पुढील भागात करू.
या वेळची छायाचित्रे काही मनाजोगती नाहीत. उपक्रमवासींना नम्र विनंती की त्यांनी योग्य, संबंधित छायाचित्रे उपलब्ध करून द्यावित.
शरद
Comments
उत्तम
लेख आवडला. लेखमाला वाचत आहे. एकदोन दिवसात वेळ झाला की चित्रे लावण्याचा प्रयत्न करते.
भारतातील देवळात गेल्यावर अंधारे गाभारे आणि गारवा जाणवतो या दोन गोष्टी लक्षात येतात, हे चांगले निरीक्षण आहे.
सुंदर
अतिशय सुंदर लेख!
फार आवडला.
अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते.
अगदी खरे हो.
मग देवघराचे स्वरूपही कसे असावे यावर काही विवेचन?
आपला
गुंडोपंत
मस्तच!!!
वाह काल घाईत लेख चाळला होता. तेव्हाच आवडला होता.
आता पूर्ण लेख वाचला.. खूप म्हणजे खूपच आवडला.. बरीच नवी माहिती कळली.. मंदीरांमधे काय बघायचे हे कळल्यावर मंदीरांकडे बघायची दृष्टीच बदलेल हे निश्चित.
मी काढलेल्या छा. चित्राची स्क्यान चांगली येत नसल्याने जालावरून फोटो साभार घेत आहे.
इथे केवळ पीठ आहे.. उपपीठ नाहि हे निरिक्षण बरोबर आहे का ते सांगाल का?
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
अवांतर
अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते.
सहज आठवल्या पुढील ओळी....
नवलाख तळपती दीप विजेचे येथ,
उतरली तारकादळे जणू नगरात,
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा,
त्या माजघरातील मंद दिव्याची वात!
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
काही चित्रे....
भिंती शोधा. सूर्यमंदिर
सूर्यमंदिर - चौकट
जोतं सूर्यमंदिर
मुक्तेश्वर - भुवनेश्वर - लेखातल्या पहिल्या चित्राचाच समोरुन फोटो.
-सौरभ.
==================
वा!
वा! सौरभदाच्या चित्रांमुळे समजणे अधिक सोपे झालेय. धन्यु!
त्यामुळे अधिक प्रश्न डोक्यात आले :)
१. जोतं म्हणजे पीठ की उपपीठ?
२. शेवटच्या चित्रांत कमानींवर गरगॉयल्स दिसताहेत त्याचं प्रयोजन काय असावं? फक्त सौदर्यदृष्टीने? कारण कमानीला पाणी जाण्याचा प्रश्न येत नाहि.
अवांतरः सूर्यमंदिरांचे द्वार बुजवले का आहे?
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
छायाचित्रे प्रतिसाद
आता कसे, छान छायाचित्रे असली की लेख समजावयाला सोपा जातो की नाही? धन्यवाद, सौरभदा.
शरद
फारच छान
माहिती कळत आहे, आणि चित्रांमुळे स्पष्ट समजते आहे.
आता देवळांच्या स्थापत्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेन.
पीठ-उपपीठ,गॉर्गाईल्स आणि सूर्य मंदिर
१) महालक्ष्मी मंदिराला उपपीठ नाही हे निरिक्षण बरोबर.
२) पीठ म्हणजे जोते. ते पाहिजेच. उपपीठ म्हणजे जोत्यावरील लहान जोते. ते असेल किंवा नसेल. काय होते की बहुदा जोत्यावरून लोक चालतात. साधारणत; चालतांना आपले लक्ष जमिनीजवळच्या एक-दोन फ़ूट उंचीकडील कामाकडे जात नाही. वाकून किंवा बसून कोण बघणार ? तो भाग बहूदा दुर्लक्षित रहातो. कलाकाराची कला फ़ुकटच जाते. उपपीठामुळे मुख्य भिंतीकडे तुम्ही खालपासून वर पर्यंत सगळे बघता. उपपीठाची उंची तीन एक फ़ूटांपेक्षा जास्त नसते याचे कारण हेच असावे.
३) ही गॉर्गाईल्स नाहीत. आपल्याकडे कपोत म्हणून एक तत्सम प्रकार असतो, पण येथे नव्हे.
४) आपण म्हणता त्याप्रमाणे दरवाजा बंद करण्याचा तो पूरातत्व विभागाचा एक सौंदर्यहीन प्रयत्न. देवळांना हानी मुसलमानांनीच पोचवली असे नाही ते काम या विभागाच्या अज्ञपणाने आजही चालू आहे. महाराष्ट्रातील ढळढळीत उदाहरण म्हणजे सिंधूदुर्गची तटबंदी. ती ढासळली तरी चालेल पण खाते स्वत; काही करणार नाही तुम्हालाही काही करू देणार नाही. कोणार्कला आज काय हेळसांड चालली आहे हे आठवले तरी अंगाची लाहीलाही होते. तीही माहिती देईन म्हणतो.
शरद
सुरेख लेखमाला
हा भागही वाचनीय झाला आहे. चित्रांमुळे शोभा वाढली.
सौरभदा यांनी लावलेली चित्रेही आवडली.
माहिती...
ऋषिकेश, सूर्यमंदिर अगदी ढासळण्याच्या बेतात आले होते तेव्हा ब्रिटिशांच्या काळात, वरती एक छिद्र पाडून आणि सर्व दरवाजे बंद करुन आतून वाळूने पूर्ण भरुन टाकण्यात आले आहे. मात्र हे मंदिर आता परत आतून बघता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता मंदिराला असलेला सांगाडा त्याच कामाचा भाग असावा. स्टीलचे रुळ ड्रिलिंग करुन आत घालून संपूर्ण मंदिराला आधार देणार आहेत मग आतली वाळू परत काढून मंदिर आतून देखील बघता येईल. इथे बघ. इथे अजून एक
कामाचे स्वरुप कसे असणार आहे त्या बातमीचा देखील दुवा माझ्याकडे होता. पण तो आता चालत नाही. :-(
कोणार्कची काही जुनी छायाचित्रे इथे. या पानावरील प्रत्येक निळ्या दुव्यावर टिचकी मारुन वेगवेगळी चित्रे बघता येतील.
मागे मनोगतावरही ओरिसाबद्दल मी बरेच काही लिहले होते. :-)
शरद, आपण कोणार्कची माहिती जरुर द्या. वेगळी माहिती वाचायला आवडेल.
==================
हळेबिड /बेलूर
हळेबिड येथील देवळाचा मंडपातले खांब दिसत आहेत.
जिथे भिंती/छत जोडले आहे ,तिथला सांधा लपवण्यासाठी शिल्पांचा वापर (कदाचित) केलेला आहे असे वाटले.
हळेबिड येथील शंकर-पार्वती आणि विष्णू-लक्ष्मी यांच्या जोड्या चटकन लक्षात येत आहेत त्या नंदी आणि कमळामुळे. गरूड काही पटकन दिसला नाही.
बेलूरची दर्पणसुंदरी.