मोक्षपट

मोक्षपट सापडला

आनंदाची बातमी म्हणजे श्री. गुण्डोपंत यांना पाहिजे असलेला मोक्षपट माझ्या अडगळीच्या सामानात सापडला. ही अडगळ बरीच जूनी असल्याने पटाच्या काळाबद्दल
सांगणे अवघड आहे. तसेच तो श्री. घाटपांडॆ यांच्या पटाशी जुळेलच अशीही खात्री देता येत नाही. पट पाहिल्या नंतर त्यावरील संज्ञा सर्वांच्या परिचित असतीलच असेही
नाही. त्यामुळे काहींची थोडक्यात ओळख करून द्यावी हे उचित.

खेळ साप-शिडी सारखाच दिसतो. म्हणजे फ़ासे टाकून,दानाप्रमाणॆ पुढे सरकायचे. शिडी असेल तर वर जायचे, साप असेल तर खाली घसरायचे. १०० हे घर मोक्ष असल्याने प्रत्येक साप-शिडीला
सांकेतिक नावे दिली आहेत.मोक्षाकडे जाण्याकरिता मदत करण्याऱ्या गोष्टी उदा. यम-नियम, गुरुकृपा तर खाली ढकलणाऱ्या काम-क्रोध वगैरे. या निवडतांना गंमत केलेली आहे आपल्याकडे मोक्षाकडे जाणारे मार्ग अनेक आहेत.उदा. पातंजली योग, अद्वैत सिद्धांत, भक्तीमार्ग इत्यादी; त्या सर्वांमधील संज्ञा वापरण्यात आल्या आहेत. काही पाहू.

१. यम-नियम :- अष्टांग योगातील सुरवातीच्या पायऱ्या. यम-- अहिंसा,सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. नियम -- शौच(सुचित्व),संतोष,तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान .

२. नैष्कर्म :- एक श्रेयस्कर मानसिक अवस्था. कर्मे तर कराविच लागतात. सत्कर्माचेही फ़ल चुकत नाही. ते चुकवण्याकरिता निष्काम बुद्धीने काम करावे. त्याला नैष्कर्म म्हणाटाआट.

३. शक्तीपात :- सद्गुरु अत्यंत थोड्या वेळात स्पर्शाने, वाणीने, दृष्टीक्षेपाने सद्शिष्याला आपल्याकडील सगळे ज्ञान देवू शकतो. वामन पंडितांना असे ज्ञान एका यतीकडून अर्ध्या घटकेत
मिळाले असे ते म्हणतात. थोडक्यात, गुरु शिष्याला अत्यंत कमी वेळात मोक्षाच्या जवळ नेवून ठेवतो.

४. कुंडलिनी जागृती :- व्यक्तीत चैतन्य रूपाने असलेली शक्ती म्हणजे कुंडलिनी. ही नेहमी निद्रेत असते. योगक्रियांनी किंवा शक्तीपाताने ही जागृत झाली व ब्रह्मरंध्रापर्यंत चढवली
म्हणजे योगी मुक्त होतो.

५. अहंकार :- व्यावहारिक भाषेत अहंकार म्हणजे गर्व किंवा ताठा.सांख्यदर्शनातील आठ मूलघटकातील तिसरा घटक अहंकार. वेदांतात त्याची अंत:करण पंचकात गणना केली आहे.
आत्मसमर्पणाने ईश्वराला शरण जावे, म्हणजे मोक्ष मिळतो असे म्हटले तर मोक्षाकरिता अहंकाराचा लोप अत्यावक्षक ठरतो.

६. सिद्धी :- माणसाला सिद्धी प्राप्त झाल्या तर तो त्यांच्यातच अडकून रहाण्याचा संभव असतो. म्हणून मोक्षमार्गातील एक मोठी अडचण असेच त्यांचे वर्णन केलेले आढळते.

७. विघ्न चतुष्टय :- निर्विकल्प समाधीच्या मार्गात लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद ही चार विघ्ने येतात.

८. भ्रम :- दृष्टीभ्रम वा बुद्धीभ्रम या शब्दांमध्ये आपण भ्रम याचा अर्थ भ्रांती अथवा भरकटणे असा घेतो. तसाच अर्थ इथेही घेतला आहे. भ्रम म्हणजे विपरीत ज्ञान. स; अहं
हे ज्ञान प्राप्त झाले की माणसाचे अज्ञान किंवा भ्रम नाहिसा होतो.

९. अष्टपाश :- आशा, भय, लज्जा, चिंता, कंटाळा, काम, क्रोध आणि अतिलोभ हे आठ पाश.यांनी बद्ध तो "जीव" व यांपासून मुक्त तो "सदाशिव".

यातील काही परतपरत आलेले दिसतात. तसेच काहींच्या जागाही पटत नाहीत. परंतु आपल्या हातात काय आहे? असो.

आता श्री. गुंडोपंत "मोक्ष" केंव्हा मिळवतात व ते कोठे घसरले, सहाय्य कुणाकुणाचे मिळाले हे त्यांच्याकडून कळेलच.

हा खरे म्हणजे वाचू आनंदे वरील प्रतिसादावरील "अती अवांतर" प्रतिसाद. मूळ लेखाशी काहीच संबंध नसल्याने स्वतंत्रपणे देत आहे.

शरद
Mokshapat

लेखनविषय: दुवे:

Comments

वा वा वा!

काय योगायोग घडत असतात या जगात! गुंडोपंत उल्लेख करतात काय तुमच्याकडे मोक्षपट मिळतो काय...... सगळे अद्भूतच आहे. मोक्षपट नावही छान आहे. चित्रपटासारखे....

बारीक निरीक्षणावरुन असे दिसले की स्वाध्याय आणि गुरुकृपा सगळ्यात ताकदवान मार्ग आहेत (इच्छुकांनी नोंद घ्यावी आणि नंतर लाभ घ्यावा)
आणि सिद्धी, अहंकार आणि अष्टपाशवर आले की मग संपलेच सगळे... सगळे परत करावे लागणार.....

काम करुन माणूस खाली का जातो बुवा? एवढी कामं करा, तरीही खाली जा.... अरेरे... :-)

-सौरभ.

==================

मस्त

मजेशीर संकल्पना वापरल्या आहेत खेळात. तुम्हाला हा मोक्षपट मिळाला हे खरेच चांगले झाले. लेख वाचायच्या आधी पटाकडे नजर टाकली असता, शक्तिपाताला शिडी कशी मिळू शकते असा प्रश्न पडला होता. :-) तो लेख वाचून सुटला.

सापशिडीचे आद्य स्वरूप हा खेळ असणार.

शक्तिपात

आमच्याही वाड्यात मोक्षपट होता, पण तो तो साधा, अधिक चिन्हाच्या आकाराचा. आणि त्यात सापशिड्या नव्हत्या. आम्ही तो कवड्यांनी खेळत असू.
शक्तिपात या शब्दाने खरेच घोटाळ्यात पडल्यासारखे झाले होते. पण तो तांत्रिक शब्द असल्याने त्याच्यावर चर्चा करता येत नाही. त्या शब्दाऐवजी 'शक्तिनिवेश' हा शब्द त्याच्या प्रचलित अर्थानुसार जास्त शोभला असता.--वाचक्‍नवी

अजुन एक

लहान मुलांच्या खेळातली सापशिडी पाहिल्यावर या मोक्षपटात व सापशिडीत एक विलक्षण "साम्य" यात दिसुन येते. यात काहीतरी रहस्य दडलेले असावे.
प्रकाश घाटपांडे

मोक्षपट : आणखी एका प्रकारचा

खालील साईटवरील लेखक ते खेळत असलेल्या द्यूत-सदृष खेळालाही मोक्षपटच म्हणतो.

अस्सल मराठी /भारतीय खेळ

मोक्षपटाची संकल्पना खुद्द ज्ञानेश्वर महाराजांची आहे असे ऐकले होते. आमच्या घरी कापडावर रंगवलेला (की भरलेला) असा अतीशय जुनाट पट होता. आता ते घरच राहिले नाही त्यात त्या पटाचे काय झाले कोणास ठाऊक?
चित्रामधील सोंगट्यांचा खेळ मी लहानपणी खेळलो आहे. फासे टाकण्याच्या ऐवजी कवड्यांचा उपयोग केला जाई. ल्युडो या खेळातल्याप्रमाणे पटावरील सर्व जागा फिरून जेंव्हा सोंगटी पटाच्या मध्यभागी असलेल्या घरात जाऊन पोचते तेंव्हा तिला मोक्ष मिळाला असे म्हणत असू. ज्या खेळाडूच्या चारही सोंगट्यांना सर्वात आधी मोक्ष मिळेल तो जिंकला.

ल्यूडो - भारतीय खेळ

गंमत म्हणजे माझ्या स्पॅनिश मित्रांचे असेच म्हणणे आहे - ते ल्यूडोला "पार्चीसी" म्हणतात, आणि हा खेळ भारतीय आहे, असे त्यांनी मला सांगितले.

काचाकवड्या?

तुम्ही म्हणत आहात त्या खेळाचे नाव काचाकवड्या का? फारच मजा यायची त्यात. त्यात तुरुंग वगैरे ष्ट्रॅटेजी करुन एखाद्या खेळाडूला लटकवता येत होते. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चौरस

काल इंडिया टि.वी. ह्या वाहिनीवर ओंमकारेश्वराच्या मंदिरात रोज रात्री चौरस हा खेळ खेळ्यायला माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ येतात हे दाखवत होते.

मोक्षपट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांच्या संग्रही असलेला मोक्षपट सुरेखच आहे. त्यांतील वेगवेगळ्या संज्ञांचे विवरण श्री.शरद यांनी उत्तम प्रकारे दिले आहे.
मात्र त्यांत मोक्षाप्रत नेणार्‍या अनेक मार्गांची सरमिसळ दिसते.भक्तिमार्ग आहे(गुरुकृपा,शक्तिपात,भक्ती इ.),ज्ञानमार्ग आहे(विवेक,स्वाध्याय,इ.)तसेच आत्मसंयमन--समाधियोग (यम,नियम,कुंडलिनी जागृती,शम दम इ.) ही आहे.खरेतर एका मोक्षपटात कोणता तरी एकच मार्ग असणे योग्य झाले असते. पण पटाची विक्री व्हावी म्हणून इथे विविध मार्गांचा समन्वय साधला असावा.

 
^ वर