फोर्थ डायमेन्शन ८

' ब्र' एक मुलुखावेगळी कादंबरी

कविता महाजन यांची ' ब्र' कादंबरी वाचताना मनामध्ये अनेक गोष्टी घर करून बसतात. संपूर्ण कादंबरीभर आदिवासी पाडयात घडणारे व त्यांच्या जीवनाचा वेध घेणारे अनेक प्रसंग असल्यामुळे ही एक मुलुखावेगळी कादंबरी आहे याची जाणीव होते. पुस्तक वाचून संपवल्यानंतर एका अत्यंत वेगळया अनुभवातून आपण गेलो होतो हे लक्षात येते. मुळात ही कादंबरीग प्रफुल्ला या मध्यमवर्गीय, शहरी साच्यातील एका मनस्वी स्त्रीची कहाणी आहे की, अंशत: लेखिकेचे आत्मकथन आहे की आजकालच्या सामाजिक कार्याविषयीच्या गुणदोषावर भाष्य करण्यासाठी वापरलेले तंत्र आहे हे शेवटपर्यंत कळत नाही.

कादंबरी म्हणून बघण्याचे ठरवल्यास ही एक अफलातली कादंबरी आहे याबद्दल शंका नाही. चाकोरीच्या बाहेर जाऊन कादंबरीचा विषय व आशय निवडणे हे नेहमीच त्रासदायक असते. व त्या विषयाला योग्य न्याय देणे हे त्याहूनही अवघड ठरू शकते. परंतु लेखिकेला ही भट्टी चांगल्याफ्की जमलेली आहे. कादंबरीतील प्रत्येक पात्राविषयी वाचकाला काही ठाम भूमिका घेण्यास भाग पाडते. प्रत्येक प्रसंगाचे विश्लेषण करण्यास उद्युक्त करते. 'फुलाबाई', तिचा नवरा, तिचा मुलगा, तिची बहीण, सुमेध यासारख्या व्यक्तिरेखा जगात असू शकतात का असा प्रश्न विचारावासा वाटतो. परंतु सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असू शकते हेच खरे असल्यास हा समाज कसा व कधी बदलणार याची काळजी वाटू लागते.

कदाचित या पुस्तकात चितरलेली कथा लेखिकेच्या खडतर जीवनातील अनुभवावर बेतलेली असल्यास असले भोग कुणाच्याही वाटेला येऊ नयेत असे म्हणावे लागेल. एखाद्या थरारक चित्रपटातील प्रसंगमालिकेप्रमाणे घटनेमागून घटना घडत जातात व असेच का व कसे याचा विचार करण्यासाठीसुध्दा उसंत मिळत नाही. पुढे काय घडणार, प्रफुल्लाची गाडी रुळावर कधी येणार, तिचे भोग कधी संपणार यांची उत्कंठा वाटू लागते. व पुस्तक वाचून हातावेगळे केंव्हा होते हेच कळत नाही. परंतु पुस्तक वाचताना लेखिकेने मांडलेला हा कल्पनेतला खेळ आहे असे न वाटता तिच्या स्वत:च्या अनुभवांचेच कथन आहे असे वाटू लागते. याप्रकारे वाचकांना संमोहित करण्यास लेखिका यशस्वी झाली आहे.

पुस्तकाचे कथानक निमित्त मात्र असून आपल्या देशातील व विशेषकरून महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांचा लेखाजोखा वाचकासमोर ठेवण्याचा उद्देश असल्यास, व हे सर्व खरे असल्यास, या समाजाची पुढील वाटचाल कशी असेल याविषयी चिंता वाटू लागते. कशावर कितपत विश्वास ठेवावा हेच कळेनासे होते. या क्षेत्रात तरी असे काही घडू नये असे मनापासून वाटू लागते. परंतु लेखिकेने केलेली टीका वा भाष्य रास्त आहे असेच म्हणण्याची परिस्थिती आता आहे. अशा सामाजिक संघटनांचे बरबटलेले हात पाहून यानंतर कुणी विवेकी माणूस सामाजिक कार्याच्या फंदात पडायचे की नाही याचा हजार वेळा विचार करेल.

एकंदरीत या कादंबरीने आपले डोळे उघडले. शेवटच्या काही घटनांचा अपवाद वगळल्यास लेखिवे।ने कथानकाचा वेग फार छान ठेवला आहे. शेवटी शेवटी मात्र एकामागून एक घटना अत्यल्प काळात घडत गेल्यामुळे कादंबरीला गालबोट लागल्यासारखे वाटते. कदाचित शेवट धक्कादायक करण्याच्या प्रयत्नामुळे तसे झाले असावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

छे छे!!

छे हो प्रभाकर पंत,
ती महाजन बाई उगाच आपल्या सहानु'भीती'चा वापर करून कादंबर्‍यांची बुंदी पाडते आहे.
मला तर ती एक अत्यंत रडकी कादंबरी वाटली!

असो,
अंदाज अपना अपना.

आपला
गुंडोपंत तेजा

ओळख

कादंबरी घटना-दुर्घटनांनी भरगच्च आहे, आणि सामाजिक भाष्य करणारी आहे असे कळते.

सामाजिक संघटनांचे व्यवहार गैर आहेत असे कादंबरीचे एक कथासूत्र आहे, असे परीक्षणावरून दिसते. कादंबरीच्या धक्कातंत्राचा विरस होऊ नये म्हणून प्रभाकर नानावटी यांनी हात नेमके कसे बरबटले आहेत, हे सांगितलेले नसावे.

अशा सामाजिक संघटनांचे बरबटलेले हात पाहून यानंतर कुणी विवेकी माणूस सामाजिक कार्याच्या फंदात पडायचे की नाही याचा हजार वेळा विचार करेल.

पण हे वाक्य समजण्यासाठी थोडे तरी तपशील सांगावेत.

(वाचायला घ्यायच्या पुस्तकांची यादी वाढतच चालली आहे!)

सामाजिक संघटना

जवळ जवळ वर्षापूर्वी ही कादंबरी वाचलेली व त्याबद्दलची टिप्पणी लिहिलेली असल्यामुळे नेमके कुठे खटकले हे आता आठवत नाही. परंतु संघटनेतील व्यवहारात पारदर्शिकतेचा अभाव, मुख्यस्थांची अरेरावी, अधिकाराचा दुरुपयोग, दुसर्‍यांच्या अडचणीचा गॅरफायदा घेणॅ, इत्यादी अनेक गोष्टी अधोरेखित झालेले असावेत. चू.भू.दे.घे.
ही लेखिका नंतर पाट्या टाकल्यासारखॅ लिहित असल्यास काही कमेंट्स न केलेले बरे.

 
^ वर