लोकगीते - पळणे -३ (श्रीकृष्णाचा पाळणा - तुका)

- - -
श्रीकृष्णाचा पाळणा
- - -
जोजोजोजो रे निज कृष्णा ॥ नेत्र झाकी कन्हा ॥ जोगी आला रे मनमोहना ॥ कैलासीचा राणा ॥ धृ ॥
उभा आंगणी घननीळ ॥ पाहुं आला बाळ ॥ निज बा कान्हया निर्मळा ॥ रडूं नये गोपाळा ॥ १ ॥
नेईल धरूनिया तुजला ॥ न कळे तयाची लीला ॥ म्हणसी कोण आहे वेल्हाळा ॥ कंठ जयाचा नीळा ॥ २ ॥
विभूति लाउनिया सर्वांगी ॥ पार्वती अर्धांगी ॥ दाही भुजाचा तो जोगी ॥ ध्यानी ध्याती योगी ॥ ३ ॥
कंठाभूषणे वासूकी ॥ सुनीळ आंगजोगी ॥ कंठी पंचवदन त्या शशिभाळीं ॥ अगम्य लीला अंगीं ॥ ४ ॥
दिसतो साजिरा सुंदरा ॥ (?)
आसन हे व्याघ्रांबर ॥ गजचर्माचे परिकर ॥ प्रावर्ण पांघरे सर्पभूषणें आगोचर ॥ लावण्य मनोहर ॥ ६ ॥
व्यक्त चांगला घननीळ ॥ त्रिलोचनभाळ ॥ मस्तकीं गंगा हें झुळझुळा ॥ निर्मळ वाहे जळ ॥ ७ ॥
भोंवतें मंडळ ॥ गण उभें सकळ ॥ हातीं आयुधें त्रिशूळ ॥ शंखघंटाघोळ ॥ ८ ॥ जोजो०
वृषभीं रूढला पशुपती ॥ वाजवीं डमरू हातीं ॥ मुखे वर्णितसे बहुश्रूती ॥ श्रीरामाची कीर्ती ॥ ९ ॥
तुजला भेटवीन श्रीपती ॥ वाचें गाई प्रीती ॥ तुका जोडून यां दो हाती ॥ करीतसे वीनंती ॥ १० ॥ जो०
- - -

मागच्या पाळण्याप्रमाणे या पाळण्यातही एका देवाला (येथे कृष्णाला) निजवताना मुख्य वर्णन दुसर्‍याच देवाचे (शंकराचे) केलेले आहे. यात विशेष म्हणजे श्रीकृष्णाला भीती घातली आहे "नेईल धरूनिया तुजला". असा एके ठिकाणी बागूलबुवा केलेला आहे.
-
माझ्याकडील हस्तलिखित पुस्तकात सर्व ओळी एकापाठोपाठ एक लिहिल्या आहेत, आणि मध्ये-मध्ये १-४पर्यंत आकडे आहेत. मी मात्र येथे चार-चार ओळींनंतर यमके बदलली आहेत, तशी कडवी वेगळी केलेली आहेत. एके ठिकाणी एका ओळीचे यमक पुढे किंवा मागे जुळत नाही. मला वाटते लेखनिकाच्या कडून थोडा तरी घोटाळा झाला आहे. "कंठी पंचवदन त्या शशिभाळीं" - इथे यमक जुळत नाही. "मस्तकीं गंगा हें झुळझुळा" इथे बहुधा "झुळझुळ" असे यमक हवे होते.
-
या पाळण्याखाली "तुका" असे नाव आहे, पण हा पाळणा खरेच तुकारामाची रचना आहे का? यातील भाषा तुकारामाची भासते का? असा प्रश्न माझ्या मनात येतो आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

तुका म्हणजे तुला

या पाळण्याखाली "तुका" असे नाव आहे, पण हा पाळणा खरेच तुकारामाची रचना आहे का? यातील भाषा तुकारामाची भासते का? असा प्रश्न माझ्या मनात येतो आहे.

तुजला भेटवीन श्रीपती ॥ वाचें गाई प्रीती ॥ तुका जोडून यां दो हाती ॥ करीतसे वीनंती ॥
या ओळींमध्ये तुला दोन्ही हात जोडून विनंती करते असा अर्थ आहे. तुकारामांशी या पाळण्याचा संबंध नसण्याचीच शक्यता अधिक.

प्रक्षिप्त

या ओळींमध्ये तुला दोन्ही हात जोडून विनंती करते असा अर्थ आहे.

तुका माका मधला तुका व्हय. तू का? मी का नाही असा श्लेष साधुन अर्थ काढला तर विडबंनाला निमंत्रण मिळेल.

प्रकाश घाटपांडे

छान

शंकराच्या वर्णनाचे प्रचलित शंकराच्या आरतीशी असलेले साधर्म्य पाहून गंमत वाटली.

शंकराची आरती -

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ।। वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।।
लावण्य सुंदर मस्तकी बाळा। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १ ।।

जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळूं तूज कर्पुरगौरा ।। धृ ।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।।
विभुतीचे उधळण शितकंठ निळा ।। ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा।। २ धृ ।।

देवी दैत्यप सागर मंथन पै केले ।। त्यामाजी अवचित हळाहळ सापडलें।।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।। नीळकंठ नाम प्रसिध्द झाले ।। ३ धृ ।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।। पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी।।
शतकोटी बिज वाचे उच्चारी ।। रघुकुळाटिळक रामदासा अंतरी।। जय ।। ४ धृ ।।
(आरती इथून उचलली आहे)

वाटत नाही

तुकारामांचे बाळक्रिडेचे अभंगात कृष्णाविषयी काही अभंग असावेत पण पळण्याचे ;) सॉरी पाळण्याचे अभंग नाहीच, नसावे.
तुकारामांच्या काही रचना पाहता, वरील रचनाही तुकारामाची नसावी असे वाटते. भाषाही तुकारामाची वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

 
^ वर