फोर्थ डायमेन्शन ७

बिझिनेस स्कूल्समधून प्रशिक्षित होणारे (तथाकथित!) तज्ञ

या जगाच्या पाठीवर दुष्कृत्य करणाऱ्यांना जबरदस्त शिक्षा देणारा खरोखरच एखादा चित्रगुप्त आकाशात असल्यास, ज्यांच्या नावापुढे MBA ही तीन अक्षरे आहेत त्यांचीच नावे चित्रगुप्ताच्या यादीत आता झळकले असते. ज्या प्रकारे या व्यवस्थापन तज्ञांनी गेली 10-15 वर्षे धुमाकूळ घातला त्याला तोड नाही. केवळ शब्दांचे बुडबुडे उठवणारे, सर्व नीती-नियमांना गुंडाळून ठेवणारे, खाल्ल्या अन्नाला न जगणारे हे तथाकथित व्यवस्थापन तज्ञ व तज्ञ सल्लागार, इतर कुठल्याही क्षेत्रातील तज्ञापेक्षा आपल्यासमोर आर्थिक मंदीचे अरिष्ट उभे करण्यास जवाबदार आहेत. बिझिनेस मॅनेजमेंटची पदवी म्हणजे गलेलट्ठ पगार देणारा, नको तेवढया सोई -सवलतींची लयलूट करणारा, ऐषारामी व चैनीच्या जीवनशैलीसाठी मिळालेला मुक्त परवानाच अशी समजूत करून घेतलेल्यांनी जागतिक आर्थिक घडीची वाट लावली. इतर उद्योगातील हजारो- लाखो तरुणांना कफल्लक करून टाकले. त्यांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारी वाढली. उत्पादन व्यवस्थेला खीळ बसली. बांधकाम व्यवसाय खड्डयात रुतून बसली. करोडोंचा रोजगार बुडाला. त्यामुळे या आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी जगातील सर्व देशांना जबरदस्त किंमत द्यावी लागत आहे. ज्यांच्या बुध्दीमत्तेवर विश्वास ठेवला ती बुध्दीमत्ताच अत्यंत तकलादू व बिनभरवश्याची निघाली. MBA म्हणजे Master of Business Administration नसून ते Mediocre But Arrogant वा Mighty Big Attitude किंवा Management By Accident असे म्हणण्याची पाळी आली आहे. संपूर्ण औद्योगिक व्यवहारांना रसातळाला नेऊन ठेवलेल्या या महाभागांना जगात आजपर्यंत प्रचलित वा अप्रचलित असलेली अत्यंत व्रू।र शिक्षा दिली तरी ती अपुरी ठरेल!
मेरिल लिंच या आर्थिक व्यवहाराच्या कंपनीचे सर्वेसर्वा स्टॅन ओ नील, जॉन थाइन व ऍंडी हॉर्न हे संचालक जगप्रसिध्द हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे विद्यार्थी होते. याच स्कूलमधून पदवी घेऊन उच्चपदापर्यंत पोचले होते. परंतु स्वत:च्या कंपनीचीच त्यांनी संगनमताने विल्हेवाट लावली. जगाला वेगळेपण देणाऱ्या नेतृत्त्वाला प्रशिक्षित करणारी (To educate leaders who make a difference in the world) असे बोधवाक्य मिरवणारी हार्वर्ड बिझिनेस स्कूल कुठल्या वेगळेपणाची भाषा करत आहे कोण जाणे? मुळातच अशा व्यवस्थापन शिक्षण संस्थांना आपापल्या देशात काय घडत आहे याच्याशी सुतराम संबंध नसतो. सामाजिक बांधिलकी नसती. कार्पोरेट व्यवस्थापनांच्या नावाखाली कार्पोरेटचाच फक्त फायदा बघावा (व स्वत:ची तुंबडी भरावी), यासाठी कुठलेही गैरमार्ग वापरले तरी चालतील हेच शिक्षण इथे दिले जात असावे. शेवटी कार्पोरेट व्यवस्थेलाच गिळंकृत करण्यापर्यंत त्यांची मजल गेली व इतर सर्वावर अरिष्ट कोसळले व ज्यांच्यामुळे हे झाले ते सर्व नामानिराळे राहिले.
1990च्या सुमारास ही स्कूल एन्रॉन या कुप्रसिध्द कंपनीची भरपूर स्तुती करत होती. एन्रॉनमध्ये त्याकाळी मुख्य कार्यकारी संचालक, जेफ स्किलिंगपासून खालपर्यंतचे सर्व मॅनेजर्स हार्वर्ड स्कूलमधूनच प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले होते. एन्रॉन व्यवस्थापनाला वस्तुपाठ म्हणून पाठयव्र।मामध्ये समावेश केला होता. एन्रॉन अधोगतीच्या मार्गावर जात आहे याची पुसटशी कल्पना या स्कूलला आली नाही. पाठयव्र।मात एन्रॉनला उच्च स्थान देत असताना या कंपनीच्या नीतीबाहृ धोरणांच्याबद्दल या स्कूलला ना खेद ना खंत! सर्व बाजूनी कीड लागलेल्या एन्रॉनच्या अध:पतनानंतर जणू काहीच घडले नव्हते या तोऱ्यात सर्व पाठ्यक्रम बदलून स्कूल मोकळी झाली.
रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड (RBS) ला बुडवण्यात याच स्कूलच्या मॅनेजर्सचा हात होता. संघटन कौशल्य व वर्तणूक हे विषय शिकवणारे जोल पोडोनी या तज्ञ प्राध्यापकाला RBSमधील त्याचे सहकारी फ्रेड गुडविनबद्दल गर्व होता. RBSचे उद्योग प्ररूप हे एकमेवाद्वितिय असेच ते उल्लेख करत. 2003 च्या स्कूलच्या नियतकालिकेत याविषयी केस स्टडीचा लेख लिहून RBSची वारेमाप स्तुती केली. परिश्रम, शिस्त, फोकस, ग्राहकहित यावर भर देत RBSच्या चौकटीत या गोष्टीकडे सातत्याने कसे लक्ष दिले जाते याची भलावण केली होती. RBS जेव्हा नॅटवेस्ट या बँकेला गैरमार्गाने गिळंकृत करत होती तेव्हा हे एक उत्कृष्ट पाऊल असे उद्गार काढले. गुडविन तर याच्याही पुढे जाऊन नेतृत्त्वाने ग्राहकांच्या मनावर व हृदयावर कब्जा करू शकणारी मूल्य व्यवस्था निर्माण करावी असे विधान केले होते. RBS ने काही केले तरी त्याचे उधो उधो करणारे लेख छापून येत होते. वेबसाइटवर अभिनंदनांचा धो धो पाऊस पडत होता. हे सर्व आता वाचताना चीड येते. RBS ची तरफदारी करताना बँकेची विश्वासार्हता, रोकडपत, भांडवली रचना, नीती-नियमांची चाड रसातळाला जात होत्या. तरीसुध्दा या तज्ञ म्हणविणाऱ्यांना त्याचे काही वाटले नाही? प्रत्येक गोष्टीची नको तितकी कीस काढत बसणारी ही तज्ञ मंडळी याच प्रसंगात मूग गिळून का बसली, हे कोडे सुटत नाही. वाचकांची दिशाभूल करताना लेखणी का अडखळली नाही?
या गोष्टी आताच घडत आहेत का? नाही. याला पण एक दीर्घ परंपरा आहे. 1980मधील घटनांची उजळणी केल्यास हे घातक चक्र पुन्हा मूळपदावर आलेले लक्षात येईल. हार्वर्डमधून शिकून आलेले मॅनेजर्सच अंतर्गतरित्या परस्परामध्ये समभाग विकून गब्बर होत होते. वाल स्ट्रीट व स्टॉक एक्स्चेंजला सळो की पळो करून ठेवत होते. म्हणूनच शिकाऊ मॅनेजर्सना औद्योगिक नीतीमूल्यांचे धडे द्यावेत म्हणून अनेक उद्योजकांनी या स्कूलला करोडो डॉलर्सची देणगी दिली. परंतु परिस्थितीत अजिबात बदल नाही.
दर वर्षी केवळ 900 मॅनेजर्सना पदवी देणाऱ्या या संस्थेला अलिकडेच शंभर वर्षे पूर्ण झाली. हार्वर्ड स्कूलचे डीन, जो लाइट, यानी यानिमित्ताने आयोजित केलेल्या एका समारंभात जगावर कोसळलेल्या आर्थिक संकटाशी आपला काही संबंध नाही याच थाटात भाषण दिले. गेल्या 15 वर्षात बदलत असलेली व दिवसे न दिवस नाजूक होत चाललेली आर्थिक स्थिती, संकट कोळल्यास राजकीय परिस्थिती मात करू शकेल हा भाबडेपणा, आर्थिक सुरक्षा, त्याची बाजारपेठ व आर्थिक संघ-संस्था यांच्यातील निर्नायकी अवस्था इत्यादींचा उल्लेख करताना आपल्याकडूनही चूक झाली याचा लवलेशही त्यांच्या भाषणात नव्हता. जागतिक अर्थव्यवस्था भरकटत जात आहे, भांडवली व्यवस्थेचे आधारस्तंभ भराभर कोसळत आहेत, एकमेकावर दोषारोप करण्यातच सर्व मग्न आहेत, इत्यादी गोष्टीं माहीत असूनसुध्दा आपण त्या गावचेच नाही असा आविर्भाव त्यांच्या भाषणात होता. झाल्या गोष्टीेंची जवाबदारी स्वीकारण्याएवढा समंजसपणा त्यांच्यात नव्हता. भाषण वाचताना MBA नी घातलेला आतापर्यंतचा गोंधळ पुरेसा नाही का असे वाटू लागते.
डॉक्टर्स वा इंजिनियर्सनी अशा प्रकारच्या घोडचुका केल्या असत्या तर संपूर्ण समाज व शासन व्यवस्था त्याच्यामागे हात धुवून लागल्या असत्या. मेडिकल व इंजिनियरिंग शिक्षणसंस्थाना टाळे ठोकले असते. परंतु MBA मॅनेजर्सनी केलेली चूक मात्र क्षम्य ठरते. आर्थिक अरिष्टानंतर तरी सर्व संबंधितांचे डोळे उघडतील का याबद्दल अजूनही शंका आहे. आपल्या देशातील बिझिनेसचे धडे देणारे IIM या संस्था जागतिक घडामोडीमधून काही शिकले का, हे अजून गुलदस्त्यातच आहे. अजून काहीच घडले नाही या तोऱ्यातच त्यांच्या प्रवेश परीक्षा जोमाने चालू आहेत. भरमसाठ फिया घेतच आहेत. या संस्थाच्या आवारात कँपस इंटरव्यूसाठी कुणीही येत नसले तरी काही फरक पडत नाही असे प्रेस स्टेटमेंट देवून ते मोकळे होत आहेत.
मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, गूगलचे लॅरी पेज व सर्जी ब्रिन, डेल कंपनीचे मायकेल डेल, रिचर्ड ब्रॉन्सन, (आपले खास!) लक्ष्मी मित्तल इत्यादी उद्योजकांनी विसावे शतक घडविले. आश्चर्य म्हणजे याफ्की कुणाकडेही MBA ही पदवी नाही. तरीसुध्दा अजूनही MBA पदवीचे वेड गेले नाही. बिझिनेस शिकवू पाहणाऱ्या शिक्षणसंस्थेत अजूनही भर पडत आहे. दरवर्षी सुमारे 5 लाख MBA पदवीधरांचे पीक एकटया अमेरिकेतच येते.
हे सर्व पाहता अशा वेळी बिझिनेस शिक्षण हे केवळ वेळेचा अपव्यय, एवढेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला लागलेली कीड असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या प्रकारच्या संस्थाकडून लाखो तरुणांच्या भविष्याशी जीव-घेणा खेळ खेळला जात आहे. नीतीमत्ता उधळली जात आहे. यातून आपण काहीच शिकणार नाही का?

लेखनविषय: दुवे:

Comments

कमालीचा एकांगी लेख

कमालीचा एकांगी लेख यापेक्षा दुसरा शब्द सुचत नाही.अमेरिकेतील ’सबप्राईम क्रायसिस’ मध्ये CDO आणि Credit Default Swap या प्रकाराचा पूर्ण विचका करण्यात आला.CDO या प्रकाराचा विचका होण्यात स्थानिक बॅंकांचाही मोठा वाटा आहे.लेहमन ब्रदर्स सारखी इन्व्हेस्टमेंट बॅंक स्थानिक बॅंकांनी घरासाठी दिलेली कर्जे विकत घेत असे आणि कर्जे घेतलेल्या लोकांनी भरलेल्या मासिक हप्त्यातही स्थानिक बॅंकांना स्वत:चे कमिशन मिळत असे म्हणून त्यांना कोण कर्ज घेत आहे याचे फारसे काही सोयरसुतक नव्हते. आला ग्राहक की द्या कर्ज, भले त्याचा क्रेडिट स्कोर कमी असू दे, भले त्या ग्राहकाची मोठे हप्ते भरायची क्षमता असू दे वा नसू दे, स्थानिक बँका त्याला कर्जे देतच होत्या.कारण त्यात त्यांचे फारसे काही बिघडत नव्हते. अधिक माहिती इथे .तेव्हा वॉल स्ट्रीटवरच्या एम.बी.ए प्रमाणेच स्थानिक बँकांमधील अधिकारीही काही प्रमाणावर दोषी नाहीत का?

>>मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, गूगलचे लॅरी पेज व सर्जी ब्रिन, डेल कंपनीचे मायकेल डेल, रिचर्ड ब्रॉन्सन, (आपले खास!) लक्ष्मी मित्तल इत्यादी >>उद्योजकांनी विसावे शतक घडविले. आश्चर्य म्हणजे याफ्की कुणाकडेही MBA ही पदवी नाही.

मान्य.Enterpreuner होण्यासाठी MBA पदवीची गरज नाही.पण याच मोठ्या Enterpreuner ने चालू केलेल्या कंपन्या चालवणारे लोकांमध्ये एम.बी.ए मोठ्या प्रमाणावर आहेत. भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर कुमारमंगलम बिर्ला हे लंडन बिझनेस स्कूलचे एम.बी.ए, रेडिफ चे चेअरमन अजित बालाकृष्णन हे तर IIM कलकत्ता या संस्थेचे चेअरमन आहेत. मुकेश अंबानींनी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एम.बी.ए चे पहिले वर्ष पूर्ण केले.हावर्ड बिझनेस स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये राहूल बजाज, कॉन्टिनेन्टल एअरलाइन्स चे अध्यक्ष,अमेरिकन एअरलाईन्स, बर्गर किंग,डेल कॉम्प्युटर, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक यासारख्या नामांकित संस्थांमध्ये मोठ्या पदावर काम केलेली मंडळी हावर्डचेच विद्यार्थी होते. जरा हे वाचा. ही सगळी मंडळी अप्रामाणिक आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा हा मनुष्य कोणत्या संस्थेत शिकला यावर अजिबात अवलंबून नसतो. आणि बिझनेस स्कूलमध्ये अप्रामाणिकपणाचे शिक्षण दिले जाते आणि बिझिनेस शिक्षण हे केवळ वेळेचा अपव्यय, एवढेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला लागलेली कीड असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे.

मोठ्या शास्त्रज्ञांमध्ये (एडिसन, आईनस्टाईन सारखे) फार थोडे पी.एच.डी होते. मग त्याच न्यायाने पी.एच.डी ही पदवी पण टाकावू झाली का?

एम.बी.ए मंडळी गलेलठ्ठ पगार घेतात म्हणून सगळे त्यांच्यावर जळतात पण त्यांना किती जबाबदारीचे काम करावे लागते, वयाच्या ४० व्या वर्षीपासूनच कामाच्या ताणामुळे वेगवेगळ्या व्याधी कशा त्यांना जडतात याकडे कोणीही लक्ष देत नाही. बिझनेस शिक्षण टाकाऊ असे म्हणण्यापूर्वी बिझनेस स्कूलमध्ये जाऊन नक्की काय चालते ते बघा, अशा एखाद्या जागतिक किर्तीच्या संस्थेत प्रवेश मिळवून दाखवा आणि मगच असले दावे करा. नाहीतर आपल्या दाव्यांना एक बाष्कळ बडबड सोडून फारसे महत्व कोणीही देणार नाही आणि देऊही नये.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

बाष्कळ?

बिझनेस शिक्षण टाकाऊ असे म्हणण्यापूर्वी बिझनेस स्कूलमध्ये जाऊन नक्की काय चालते ते बघा, अशा एखाद्या जागतिक किर्तीच्या संस्थेत प्रवेश मिळवून दाखवा आणि मगच असले दावे करा.

सदर लेख हा बराचसा ह्या मूळ लेखावर आधारित दिसतो. ह्या मूळ लेखाचे लेखक हे स्वतः हार्वर्ड बी स्कूल मधले पदवीधर आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली टीका एकांगी वाटू शकते पण त्याला सरसकट् बाष्कळ बडबड असे मी तरी म्हणणार नाही.

उथळ पाण्याला खळखळा्ट फार

कमालीचा एकांगी लेख यापेक्षा दुसरा शब्द सुचत नाही.अमेरिकेतील ’सबप्राईम क्रायसिस’ मध्ये CDO आणि Credit Default Swap या प्रकाराचा पूर्ण विचका करण्यात आला.CDO या प्रकाराचा विचका होण्यात स्थानिक बॅंकांचाही मोठा वाटा आहे.लेहमन ब्रदर्स सारखी इन्व्हेस्टमेंट बॅंक स्थानिक बॅंकांनी घरासाठी दिलेली कर्जे विकत घेत असे आणि कर्जे घेतलेल्या लोकांनी भरलेल्या मासिक हप्त्यातही स्थानिक बॅंकांना स्वत:चे कमिशन मिळत असे म्हणून त्यांना कोण कर्ज घेत आहे याचे फारसे काही सोयरसुतक नव्हते. आला ग्राहक की द्या कर्ज, भले त्याचा क्रेडिट स्कोर कमी असू दे, भले त्या ग्राहकाची मोठे हप्ते भरायची क्षमता असू दे वा नसू दे, स्थानिक बँका त्याला कर्जे देतच होत्या.कारण त्यात त्यांचे फारसे काही बिघडत नव्हते. अधिक माहिती इथे .तेव्हा वॉल स्ट्रीटवरच्या एम.बी.ए प्रमाणेच स्थानिक बँकांमधील अधिकारीही काही प्रमाणावर दोषी नाहीत का?

स्थानिक बँकांमधील हे अधिकारीही एम.बी.ए च असतात.

मान्य.Enterpreuner होण्यासाठी MBA पदवीची गरज नाही.पण याच मोठ्या Enterpreuner ने चालू केलेल्या कंपन्या चालवणारे लोकांमध्ये एम.बी.ए मोठ्या प्रमाणावर आहेत. भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर कुमारमंगलम बिर्ला हे लंडन बिझनेस स्कूलचे एम.बी.ए, रेडिफ चे चेअरमन अजित बालाकृष्णन हे तर IIM कलकत्ता या संस्थेचे चेअरमन आहेत. मुकेश अंबानींनी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एम.बी.ए चे पहिले वर्ष पूर्ण केले.हावर्ड बिझनेस स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये राहूल बजाज, कॉन्टिनेन्टल एअरलाइन्स चे अध्यक्ष,अमेरिकन एअरलाईन्स, बर्गर किंग,डेल कॉम्प्युटर, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक यासारख्या नामांकित संस्थांमध्ये मोठ्या पदावर काम केलेली मंडळी हावर्डचेच विद्यार्थी होते. जरा हे वाचा. ही सगळी मंडळी अप्रामाणिक आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

मुकेश अंबानी, राहूल बजाज आणि कुमारमंगलम बिर्ला यांच्या यशात व्यवस्थापन शिक्षणाचा वाटा किती आणि त्यांच्या कुटूंबाचा वाटा किती हे ठरवणे अवघड आहे.

एम.बी.ए मंडळी गलेलठ्ठ पगार घेतात म्हणून सगळे त्यांच्यावर जळतात पण त्यांना किती जबाबदारीचे काम करावे लागते, वयाच्या ४० व्या वर्षीपासूनच कामाच्या ताणामुळे वेगवेगळ्या व्याधी कशा त्यांना जडतात याकडे कोणीही लक्ष देत नाही.

असे विधान पूराव्याशिवाय कसे करू शकता?

बिझनेस शिक्षण टाकाऊ असे म्हणण्यापूर्वी बिझनेस स्कूलमध्ये जाऊन नक्की काय चालते ते बघा, अशा एखाद्या जागतिक किर्तीच्या संस्थेत प्रवेश मिळवून दाखवा आणि मगच असले दावे करा. नाहीतर आपल्या दाव्यांना एक बाष्कळ बडबड सोडून फारसे महत्व कोणीही देणार नाही आणि देऊही नये.

मी बिझनेस स्कूलमध्ये शिकवत होतो. वरवरचे शिक्षण, जेणेकरून पोपटपंची करता येईल हे व्यवस्थापन संस्थांचे वैशिष्ट्य नमुद करावेसे वाटते.

एकांगी - थोडाफार सहमत

क्लिंटन यांच्या वरील मताशी थोडाफार सहमत आहे.

लेखाच्या मागच्या भावनेशी काही प्रमाणात सहमत असल्यामुळे खंडनाशी "थोडीफार सहमती"च व्यक्त केली आहे.

विस्तृत प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.

नवजाती

आहे खरा एकांगी लेख... धनंजयने वर म्हणल्याप्रमाणे क्लिंटनशी सहमत मात्र त्याच वेळेस अशी भावना का तयार होते याचा पण विचार करायला हवा असे वाटते.

मात्र एमबीए, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सीए, इत्यादी या नवीन व्यावसायीक जाती आहेत असे मला वाटते.

इथे प्रश्न फक्त एमबीएज् ना जास्त पैसे मिळण्याचा नाही आहे. बर्‍याचदा ज्याप्रकारचे अनुभव येतात त्यातून अशा प्रतिमा तयार होतात. वरील लेखात डॉक्टर्स-इंजिनियर्सबाबत म्हणले आहे. मला वाटते त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या व्यवसायात आपणच कसे शहाणे आहोत हे सातत्याने दाखवून एकप्रकारे स्वतःची विहीर डुंबायला तयार केली असे वाटले. परीणामी नंतर त्यात विकास न होता एकप्रकारचा कोते पणा येत गेला. (मी स्वतः इंजिनियरच आहे, तरी देखील मला असे वाटते - निव्वळ भारतातच नाही तर अगदी अमेरिकेतपण असेच पाहीले आहे). जे त्या कोत्या वृत्तीत अडकत नाहीत ते अर्थातच वैविध्यपूर्ण जीवन जगतात आणि काहीतरी वेगळे करतात.

बर्‍याचदा एमबीएज् चा म्हणून एक अहंकार (सुपिरिऍरीटी कॉम्प्लेक्स) असतो तर कधी कधी त्यांना शिकवण्यात आलेल्या पद्धतीत आणि व्यावसायीक वागणूकीतून जडणघडण झालेली असते.

तीच कथा सॉफ्टवेअर्सची आणि तीच सीएज् ची. इतकेच कशाला आयएसएस वगैरे काही कमी नसतातच...

तरी देखील वरील लेखात जे खटकले ते एकाच मापाने सर्वांना तोलून एका विशिष्ठ शिक्षित वर्गाला नावे ठेवायची. हा प्रकार एखाद्या जातीस, धर्मास नावे ठेवण्यापेक्षा वेगळा वाटत नाही. जर अशीच नावे एखाद्या हिंदूने मुसलमानास ठेवली का तर "त्यांच्यात" ओसामा बीन लेडन पासून दाऊद आहेत् म्हणून तर आपण काय म्हणाल? हिंदू मूलतत्ववादी, हिंदू दहशतवादी, फंडामेंटालीस्ट वगैरे वगैरेच ना? मग आता असे जेंव्हा एखाद्या "व्यावसायाधारीत नवजातीस" म्हणले जाते तेंव्हा अशा बुद्धीवादास काय म्हणता येईल?

म्हणून यातील लिखाण खटकले.

सहमती/असहमती/मत

केवळ शब्दांचे बुडबुडे उठवणारे, सर्व नीती-नियमांना गुंडाळून ठेवणारे, खाल्ल्या अन्नाला न जगणारे हे तथाकथित व्यवस्थापन तज्ञ व तज्ञ सल्लागार, इतर कुठल्याही क्षेत्रातील तज्ञापेक्षा आपल्यासमोर आर्थिक मंदीचे अरिष्ट उभे करण्यास जवाबदार आहेत. बिझिनेस मॅनेजमेंटची पदवी म्हणजे गलेलट्ठ पगार देणारा, नको तेवढया सोई -सवलतींची लयलूट करणारा, ऐषारामी व चैनीच्या जीवनशैलीसाठी मिळालेला मुक्त परवानाच अशी समजूत करून घेतलेल्यांनी जागतिक आर्थिक घडीची वाट लावली.

मूळ लेखात ही विखारी टीका/दोषारोपण आहे. परंतु असे दिसते की अनेक ठिकाणी एम्बीए नसलेले आंत्रेप्रूनर्स् (उद्योजक व्यावसायिक) आपल्या संस्थांमध्ये मोठमोठ्या मॅनेजमेंट स्कूलमधून एम्बीए झालेले बिझनेस् कन्सल्टंट नेमतात. याचे कारण त्या उद्योजकांनी केलेल्या आर्थिक गैरकृत्यांना बिझनेस स्ट्रॅटेजीचा शाब्दिक मुलामा चढवण्यासाठी आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांना बोलके पंडित (बोलके पोपटच्या चालीवर) हवे असतात. 'नवे बिझनेस मॉडेल' हा प्रकार संशयास्पद आहे. अशावेळी या मोठ्या पदांवर 'नेमले गेलेले' एम्बीए लोक आपल्या मालकाच्या दावणीला बांधलेले असल्याने फसव्या योजनांना पुरस्कृत करतात.
टाळी एका हाताने वाजत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळेवर उल्लेखलेले 'बिझनेस फ्रॉड्स्' /व्यावसायिक-आर्थिक घोटाळे याच 'एम्बीए - आन्त्रेप्रूनर्स्' यांच्या परस्पर संगनमताने होत आहेत.
बिझनेस कन्सल्टंटस् ची चूक ही आहे की ते शिटी वाजवणार्‍याचे (व्हिसल ब्लोअर्स) काम करत नाहीत. एम्बीए स्कूल्समधून शिकवलेले बिझनेस एथिक्स ते धाब्यावर बसवतात.

क्लिंटन यांच्या प्रतिसादात -

बिझनेस शिक्षण टाकाऊ असे म्हणण्यापूर्वी बिझनेस स्कूलमध्ये जाऊन नक्की काय चालते ते बघा, अशा एखाद्या जागतिक किर्तीच्या संस्थेत प्रवेश मिळवून दाखवा आणि मगच असले दावे करा.

असे म्हटले आहे.
इथे एक स्पष्ट करावे लागेल की अनेक अवघड चाचण्यातून गाळून घेतलेले (प्रवेश परीक्षा व तत्सम) समाजातील सर्वोच्च व्यवहारी बुद्धीमत्ता असणारे विद्यार्थी या बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे मुळात त्यांच्याकडे ही बुद्धीमत्तेची देणगी असतेच. परंतु त्यांची व्यावसायिक जगतातील गरज काय? या 'बिझनेस ऍडमिन' शिक्षणाच्या मूळ हेतूकडे शैक्षणिक अभ्यासक्रमात डोळेझाक होते आणि त्यांना केवळ वेगवेगळ्या अर्थतांत्रिक शब्दांना ( एम्बीए मंबोजंबो ) योग्य जागी वापरण्याचा गुरुमंत्र मिळतो की काय अशी रास्त शंका येते. (असेच इतर अनेक व्यावसायिक प्रशिक्षणांबाबत - विशेषतः चार्टर्ड अकाऊंटंट आणि डॉक्टर्स् बद्दल म्हणावे लागते.)

थोडक्यात, वरचा लेख अचानक उद्भवलेल्या आर्थिक मंदीमुळे तीव्रप्रतिक्रियावश लिहिला गेला असावा. पण या आर्थिक संकटाच्या मुळाशी आहे -समाजमानसात फोफावलेला 'हाव' हा दुर्गुण! केवळ एम्बीए लोकांपुरताच तो मर्यादित नाही. तसेच केवळ 'एम्बीए ऍडमिनिस्टर्ड' व्यवसायांसच तो लागू होत नाही हे ध्यानात घ्यावे लागेल.

व्यवसायाला योग्य ती व्यावहारिक/आर्थिक शिस्त लावण्याचे महत्त्वाचे काम करण्यासाठी बुद्धीमान एम्बीए आणि सीए लोकांची गरज आहे. त्यासाठी त्यांनी मालकाच्या ताटाखालचे मांजर न होता प्रसंगी मालकांशी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

छान लेख

लेख बराचसा ह्या लेखावर आधारीत असला तरी आवडला.

आर्थिक मंदी आणि त्याचे दुषपरीणाम इतके भिषण आहेत की त्यामुळे त्यासाठी कोणत्याही प्रकारे कारणीभूत असणार्‍यांवर विखारी टीका होणारच. ह्याच आशयाचा हा आणखी एक वाचनीय लेख.

शहाणचोट यम्बीयेवाले

किराणा-भुसार माल विकणार्‍या भुसार्‍याला जेवढे कळते त्यापेक्षा काय वेगळी अक्कल असते एम्बीए केलेल्या शहाणचोटांना, हे कळत नाही. किंबहुना ह्या शहाणचोटांपेक्षा पुड्या बनवून विकणार्‍यांना जास्त अक्कल असावी. ह्या पोपटांना इंग्रजी बोलता येते (तीही किती जण व्यवस्थित बोलतात हा आणखी एक चर्चेचा विषय आहे) एवढेच! असे काय दिवे लावतात हे यमबीये? कुणी सांगेल का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नुसत्याच एमबीए लोकांना नव्हे

तर ते घडविणार्‍या शिक्षणसंस्थांना पण दोष दिला आहे.
एकांगी किंवा कसे - पण ह्या गोष्टीला दोन बाजू आहेत.
एक म्हणजे - MBA झालेल्यांचा(च) ह्यात काही दोष आहे असे मानायचे कारण नाही. वर लिहिल्याप्रमाणे वाढती 'हाव', भ्रष्टाचार आणि सत्ताधार्‍यांची सोयिस्कर डोळेझाक ह्या प्रकाराला कारणीभूत आहे. ह्या अवाढव्य यंत्रातल्या एकाच छोट्या भागाला दोषी ठरविण्यात फारसा अर्थ नाही.

दुसरी बाजू म्हणजे - काही विपर्यस्त धोरणांचे अत्यंत चलाखिने समर्थन करायला MBA लोकांची बुद्धी वापरली गेली ही गोष्ट खरीच. आता ह्यातल्या किती जणांना 'सत्य परिस्थितीची पूर्ण' कल्पना होती आणि कितिजणांना नव्हती हे कधीच उघड होणार नाही, पण त्यांच्या बुध्दीचातुर्यामुळे हा घोटाळा किंवा घोटाळ्याचा इरादा लपविण्यात गुन्हेगार यशस्वी झाले एवढे मात्र खरे.

वैयक्तिक मतः
वरील लेख हे म्हणजे - एखाद्या हॅकरने साईट हॅक करुन धुमाकूळ घातल्यावर प्रोग्रॅमिंगचे शिक्षण देणार्‍या संस्थेला दोषी ठरविण्यासारखे आहे. :)

बुद्धिजीवी खोजे/हिजडे

दुसरी बाजू म्हणजे - काही विपर्यस्त धोरणांचे अत्यंत चलाखिने समर्थन करायला MBA लोकांची बुद्धी वापरली गेली ही गोष्ट खरीच.

असे असल्यास अशांना बुद्धिजीवी खोजे/हिजडे ( हिजडे/खोजे फारच हार्श वाटत असल्यास इंटलेक्च्युअल यूनक्स बरं वाटेल का. इंग्लिशमधली शिवी फार गोड लागते असं म्हणतात.) म्हणायला हवे. ह्यातले सगळेच एमबीएच असतात असेही नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर