फोर्थ डायमेन्शन ६


जग बदलू शकलेली पुस्तकं!

पुस्तकामुळे जग बदलू शकते, हे कदाचित अनेकांना खुळचटपणाचे वाटू शकेल. लाखो वर्षापूर्वी लघुग्रहांच्या माऱ्यापुढे डायनासॉरसारखे प्रचंडकाय प्राणी निर्वंश झाले व जगाचा चेहरामोहरा बदलला, हे आपण समजू शकतो. कारण त्यामुळे मनुष्यप्राण्यासकट इतर सस्तनी प्राण्यांना जिवंत राहाण्यासाठी अवकाश मिळाला. प्रचंड प्रमाणात हिमवर्षाव झाल्यामुळे जग बदलले असेल याची आपण कल्पना करू शकतो. जागतिक तापमानवाढीमुळे जगाचे व्यवहार बदलू शकतील याची आपल्याला समज आहे. अमेरिका, फ्रान्स, रशिया, क्यूबा, चीन इत्यादी देशातील रक्तक्रांतीमुळे जगरहाटीत बदल झाला याची आपल्याला जाणीव आहे. पहिल्य व दुसऱ्या जागतिक युध्दानंतर विश्वशांतीसाठी प्रयत्न होत आहेत व युध्द नको ही मानसिकता मूळ धरू पाहत आहे, याची पण आपल्याला जाण आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसांचे आयुष्य वाढले आहे, उपभोगवाद उच्चांक गाठत आहे, खेडी ओस पडत आहेत, शहरं बकाल होत आहेत, इत्यादी अनेक गोष्टींचे आकलन सोपे आहे. परंतु पुस्तकामुळे जगाचा चेहरामोहरा पालटला, किंवा पालटू शकतो, पुस्तकं जग बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, पुस्तक उत्प्रेरकाची (कॅटलिस्टची) भूमिका बजावू शकतात, लिखित/मुद्रित शब्दांमध्ये एवढी ताकद असू शकते, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असू शकतील.

आपल्यासारख्या चोखंदळ ग्रंथप्रेमींना मात्र पुस्तकं हे प्रेरणास्रोत आहेत, याबद्दल तिळमात्र संशय नाही. जगाविषयीच्या जाणीवा रुंदावण्यासाठी पुस्तकं वाचकासमोर नेमक्या माहितीचा डोंगरच उभे करू शकतात, पुस्तकं आपल्या अभिरुचीची गुणवत्ता वाढवतात, आपल्यात सुधारणा घडवून आणू शकतात, आपल्याला संवेदनशील बनवू शकतात, विवेकी बनवू शकतात, प्रसंगी हसवतात, रडवतात, भावनावश करतात, मनोरंजन करतात, जगण्यासाठी बळ देतात, उत्कंठा वाढवतात, विचार करायला लावतात, वर्तणुकीत बदल घडवतात, एकटेपणात मित्राची भूमिका वठवतात, मार्गदर्शी होतात, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करू शकतात व (काही वेळा!) नीतीचे, उपदेशाचे डोस पण पाजतात. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर पुस्तकांचे ॠण फेडणे अशक्यातली गोष्ट ठरेल. त्याच वेळी अजून थोडयाशा खोलात जावून विचार करू लागल्यास मानवतेला आकार देणारे, मानवी वंशाची पुनर्रचना करणारे, मानवी प्राण्याचे उन्नयन करणारे व मानवतेच्या श्रध्दा-सिध्दांतांचे कर्ते करवते पण पुस्तकच आहेत.

परंतु जग बदलू शकलेल्या निवडक पुस्तकांची सर्वसंमत यादी करणे फार जिकिरीचे ठरू शकेल. परिस्थितीचा रेटा व कालमान स्थिती-गतीमुळे प्रत्येक समाजगटाचे प्रश्न व अग्रक्रम बदलत जातात. एका समाजगटाला अत्यंत निकडीच्या वाटणाऱ्या समस्या व त्या समस्यांचे साधक बाधक विश्लेषण करणारी पुस्तकं दुसऱ्या गटाला तितके महत्वाचे वाटणार नाहीत. भाषा, भौगोलिक परिस्थिती, जोपासलेली संस्कृती, रूढी-परंपरा इत्यादीमुळे जग वैविध्यपूर्ण आहे व याच विविधतेमुळे अस्मितेचा प्रश्न मूळ धरू पाहत आहे. माणसा-माणसात भेद करणाऱ्या अनेक संकल्पना जगभर पसरलेल्या आहेत व अशा संकल्पनांशी टक्कर देणे तितके सोपे नाही. तरीसुध्दा जगभरातील अनेक दूरदर्शी तत्ववेत्त्यांनी वेळोवेळी समाजाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न केले आहेत व त्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत.
एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावरून मागे वळून पाहताना अखंड जगाला समावून घेतलेल्या व जग बदलू पाहणाऱ्या अशा काही तत्त्वज्ञांनी लिहिलेलीपुस्तकं नक्कीच उद्बोधक ठरतील:
1. प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (1687)
आयझॅक न्यूटन (1642-1727)
2. ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज (1859)
चार्ल्स डार्विन (1809-1882)
3. एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी (3 खंडात: 1839,1844,1855)
मायकेल फॅरडे (1791-1867)
4. ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड (1789)
विलियम विल्बरफोर्स (1759-1833)
5. ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन (1792)
मेरी वोलस्टोनव्रॅच्फ्ट (1759-1797)
6. मॅग्नाकार्टा -1215
7. वेल्थ ऑफ नेशन्स (1776)
ऍडम स्मिथ (1723-1790)
8. पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइटस् स्पिन्निंग (1769)
रिचर्ड आर्कराइट (1733-1792)
9. दास कॅपिटल (3 खंडात: 1867,1885, 1894)
कार्ल मार्क्स (1818-1883)
10. वाट इज लाइफ?(1943)
एर्विन स्क्रोडिंजर (1887-1961)
आपले जीवन समृध्द करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या पुस्तकांचा फार मोठा सहभाग आहे. आपण वापरत असलेले तंत्रज्ञान (फॅरडे, न्यूटन) उत्पादन, समाज व अर्थ व्यवस्था (आर्कराइट, ऍडम स्मिथ व कार्ल मार्क्स) आपण भोगत असलेले स्वातंत्र्य व लोकशाही (मॅग्नाकार्टा, वोलस्टोनव्रॅच्फ्ट) आपल्याला मिळालेले दीर्घायुष्य (स्क्रोडिंजर) बराक ओबामासारख्यांना मिळालेले उच्चपद (विल्बरफोर्स) मानवीवंशाबद्दलच्या कल्पना आणि ईश्वर व धर्माच्या जंजाळातून सुटका (डार्विन) यासाठी आपण या तज्ञांच्या पुस्तकांना चिरॠणी आहोत.

Comments

छान यादी - बहुतेक इंग्रज लेखक

बहुतेक इंग्रज लेखक असलेली (म्हणून सीमित) तरी महत्त्वाच्या पुस्तकांची यादी आहे.

(कार्ल मार्क्स याची कर्मभूमी इंग्लंडच होती.)

एर्विन श्रडिंगेर याच्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी वाचले नव्हते. यादीतील उल्लेख बघून त्याबद्दल वाचले. धन्यवाद! या पुस्तकात तर्कशुद्ध द्रष्टेपणा दिसतो. (तरी ते पुस्तक "जग बदलणारे" असे मी म्हणणार नाही.)

सुंदर

सुंदर यादी. पैकी श्रडींगरचे पुस्तक मिळवण्याचा बराच प्रयत्न केला होता. नंतर राहून गेले.
विज्ञानात असे काही निबंध आहेत ज्यांनी जगाचा चेहेरामोहरा पालटला आहे.

  • सापेक्षता सिद्धांत. आइनस्टाइन. १९०५
  • ट्रान्झिस्टरचा शोध. बार्डीन, ब्रेटन, शॉकले. १९४७
  • डीएनएची मांडणी. वॅटसन, क्रिक. १९५३

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

हेच म्हणतो.

मूळ लेख आणि आतापर्यंतचे प्रतिसाद आवडले. धन्यवाद.

उत्तम

यादी. दीडशे वर्षांपूर्वी गुलामगिरीच्या विरोधात लिहिले गेलेले 'अंकल टॉम्स् केबिन'ही कदाचित या यादीत बसावे. बहुतांश पुस्तकांचा कालखंड हा १८व्या शतकाचा उत्तरार्ध आणि १९व्या शतकाचा पूर्वार्ध असा आहे - ज्याला 'एज ऑफ रीझन/एन्लायटनमेंट' म्हणून संज्ञा आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

एक प्रश्न

लेखात (आणि प्रतिसादात) उल्लेखिलेल्या पुस्तकांचा एकूण कल हा ज्ञानमार्गावरचा दिसतो.

एक शंका : ज्या न्यायाने वरील सर्व पुस्तकांमुळे जगाची विचारसरणी बदलली असे म्हणता येईल त्या न्यायाने "बायबल" चा समावेश का करता येणार नाही ? "बायबल" सारख्या ग्रंथांमधे नवे ज्ञान असेल/नसेल , परंतु हा ग्रंथ जगातले कोट्यावधी लोक नेमाने वाचतात/त्यावर विचार करतात/त्या नुसार वागतात हे नाकारता येणार नाही. आणि हे गेली दोनेक हजार वर्षे चालू आहे. तर मग "बायबल" कुठल्या अर्थाने "जग बदलवणार्‍या/घडवणार्‍या" पुस्तकांत येऊ शकत नाही ?

डिस्क्लेमर : मी ख्रिश्चनही नव्हे आणि धार्मिक वृत्तीचाही नव्हे. तरीदेखील जो प्रश्न पडला तो विचारत आहे.

दास कापिताल सारखे, होय

दास कापिताल या पुस्तकाचे नन्हे, पण त्या काळातल्या कम्युनिस्ट विचारसरणीचे वर्णन बर्ट्रंड रसेल यांनी प्रतिबायबल असे केले आहे. (नावडून! रसेल हे सुद्धा ख्रिस्तधर्मपरायण नव्हते, नास्तिक होते.)

त्यामुळे बायबल बहुधा यावे. पण कदाचित नाही.

रोमन सत्तेने ख्रिस्ती धर्म अधिकृतपणे स्वीकारल्यानंतर एका समितीकडून बायबलची जुळवाजुळव केली. त्यामुळे मूळ खिस्तीधर्म-प्रसारासाठी बायबलपेक्षा पौल याची पत्रे ही "जग बदलवणारी" ठरावीत. या पत्रांपैकी काही हल्लीच्या बायबलात आढळतात.

औद्योगिक क्रांतीच्या काळात मात्र जो धर्मप्रसार झाला त्यात बायबलने लोकांना झपाटले हे खरे आहे. तर मग कदाचित बायबल या यादीत घालायलाच पाहिजे...

सुंदर प्रास्ताविक !

दास कॅपीटल सोडले तर बाकीच्या पुस्तकांची नावे पहिल्यांदाच ऐकतो आहे. ( कशाला थापा मारायच्या उगाच)
पुस्तकाचे जाऊ द्या ! मला आपल्या लेखाचे प्रास्ताविक / विवेचन खूप आवडले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हमालबंधूंच्या उन्नतीसाठी

आमच्या हमालबंधूंच्या उन्नतीसाठी त्यांनी यातील कुठली पुस्तके वाचावीत ? (आनि मराठीत असलीत तर सांगा. आमच्यातील बर्‍याच बंधूंना इंग्रजी वाचता येत नाही. पन हल्ली इन्फोसिस, विप्रो सोडून काही बंधू स्टेशनावर हमाल झाले आहेत, त्यांना उन्नतीपर इंग्रजी पुस्तके सुचवा.)

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

हे राहिलेच

१९६८ साली मॅकमिलन प्रकाशनाने भक्तिवेदान्त स्वामीन्नी लिहिलेली भगवत् गीता - जशी आहे तशी (ईन्ग्लिश मधे 'ऍज् ईट् ईज्' ) प्रकाशित केली.
तेन्व्हा पासुन या पुस्तकाने जगभर धुमाकूळ घातला आहे.
जगभर याची ८० हून् अधिक भाषान्मधे भाषान्तरे झाली आहेत. कोट्यवधी प्रतिन्चे वितरण झाले.
राधा-कृष्णाची शेकडो मन्दिरे उभी राहिली. हे सारे इतके झाले की आपल्यालाच लाज वाटावी इतके काम पश्च्यात्य लोकान्नी केले.
तीन एक वर्षान्पूर्वी टाईम्स् मधे अग्रलेख ही आला होता, भारतामधून सर्वात् अधिक प्रमाणात निर्यात झालेली गोष्ट कोणती? - उत्तर : कृष्ण.
अगदी आफ्रिका, ऍमेझोन वगेरे दुर्गम क्षेत्रात ही हे पुस्तक जाउन पोहोचले.
एकट्या मराठीत २० लाखान्हुन अधिक प्रति खपल्या आहेत (मागे सकाळ की लोकमत मधे सरासरी ३ पैकी १ घरात ही गीता असल्याचे वाचले होते)

आणि प्रभाव म्हणताल तर निश्चितच पडला आहे जगावर : हजारो लोक (लाखो लोक खरे तर) देवाचे नाव घेवू लागले. बीफ् आणि हॅम् खणारे शाकाहारी झाले आणि इतेरान्ना ही तसे प्रचार करू लागले. (ही chain reaction असल्याने प्रभाव वाढतच आहे)

कलियुगतील सुवर्ण काळ आला म्हणायचा (शास्त्रात उल्लेख आहे म्हणे). हरिनाम १० हजार वर्षे गाजत राहिल असे भाकित आहे. मग
most promising entry म्हणूनही हे पुस्तक चालून जाईल.

आपला नम्र

 
^ वर