प्लाथ आणि आत्महत्या : दुर्दैवी मालिका

अलिकडेच बिपीन यांच्या लेखाद्वारे आपल्याला काही पाश्चात्य लेखकांच्या उत्तमोत्तम लिखाणाबद्दल लिहिलेल्या "पश्चिमप्रभा" या पुस्तकाची ओळख करून मिळाली. या अंतर्गत सिल्विया प्लाथ या कवियत्रीच्या/लेखिकेच्या लिखाणाबद्दल आणि तिने केलेल्या आत्महत्येबद्दल एलकुंचवारांनी केलेले विवेचन मी उधृत केलेले होते.
बिपिनच्या उपक्रमावरील टिपणाचा दुवा.

कालपरवाच वाचलेल्या एका दु:खद बातमीनुसार , निकलस ह्युजेस् , या प्लाथ यांच्या ४७ वर्षीय मुलाने काही दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली.
ह्युजेस् यांच्या आत्महत्येबद्दलचे काही दुवे :

दुवा १
दुवा २

या घटनेनिमित्ताने , काही प्रश्न ( नव्याने) विचारले जात आहेत : एखाद्या कुटुंबात आत्महत्या करण्याची ही जी मालिका आहे त्याला काही जनुकीय आधार आहे का ? की इतर काही स्पष्टीकरणे देता येतील ?

निकलस ह्युजेस् यांना मानसिक खिन्नतेने ( क्लिनिकल् डिप्रेशन्) ग्रासलेले होते. ते अविवाहित होते. कदाचित डिप्रेशनला काहीएक जनुकीय स्पष्टीकरण असण्याची शक्यता वर्तवता येते असे दिसते.

आज उपक्रमावर "मला पडलेला प्रश्न" असा धागा वाचला आणि प्रस्तुत धागा निर्माण करण्याचे धैर्य आले. उपरोल्लेखित बातमी , त्याच्याशी संबंधित अशा प्रश्नांबद्दलची अस्वस्थता मला येथील मित्रांबरोबर वाटून घेता येईल असे वाटले म्हणून या धाग्याचा प्रपंच.

लेखनविषय: दुवे:

Comments

माझे मत

मनातील सगळेच विचार काही ना काही रासायनिक क्रियांद्वारे 'तयार होत असतात'. या रासायनिक क्रिया अंतिमतः जनुकांवर अवलंबून असतात. त्यामुळे आत्महत्येच्या विचाराचा थेट एखाद्या जनुकाशी संबंध लावण्याचा प्रयत्न सतत चाललेला आहे. (अजून यश नाही हे वरच्या पहिल्या दुव्यात दिले आहे.)

माझे मत थोडे वेगळे आहे. सहसा जगण्याचे प्रयोजन संपले की जीव मृत्युमुखी पडतात. साधारणपणे सगळ्या जीवांत हे प्रयोजन म्हणजे प्रजननक्षम पुढची पिढी तयार करणे. आता ही पुढची पिढी नक्की तयार झाली आहे का, नक्की प्रजननक्षम आहे का ह्याची खात्री होण्यासारखी परिस्थिती नसेल तर होता होईल तो प्रयत्न करत राहणे इतके जीवांच्या हातात राहते. उत्क्रांतीदृष्ट्या बघितले तर प्रत्येक प्राण्याचा जीवनकाळ हा ही पुढची पिढी तयार करायला लागेल इतपत (ऑप्टिमम) आढळतो.

माणसाच्या बाबतीत नैसर्गिकरित्या आयुष्याचे प्रयोजन जरी इतर प्राण्यांसारखेच असले तरी प्राप्त मोठा मेंदू स्वतःसाठी इतर काही प्रयोजने शोधू शकतो. हे लहानपणीच्या संस्कारातून, वाचनातून, विचारांतून घडते किंवा ( उदा. आत्मघाती दहशतवाद्यांच्या बाबतीत ) घडवले जाते. अतीव बुद्धीमान माणसांचा (कवी, शास्त्रज्ञ, चित्रकार ...) कधी कधी या प्रयोजनाच्या शोधातून दारूण अपेक्षाभंग होत असावा, त्यात ती निराश होत असावीत. त्यातून आत्महत्येच्या चक्रव्यूही विचारात वाहवत जात असावीत. बुद्धिमत्ता जनुकांतून पुढे पुढे जाते, त्यामुळे हा अपेक्षाभंग दरेक पिढीत वेगवेगळ्या रितीने घडून आत्महत्या या एकाच भावनेत दृग्गोचर होत असावा.

हा माझा प्रतिसाद पुन्हा वाचून माझे मलाच काय ते सांगता आले नाही असे वाटते आहे.

आनुवांशिकता

गुणसुत्रांच्या प्रभावावर भाष्य करणारा, या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहिला गेलेला हा लेख या संदर्भात वाचण्यासारखा आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनुवांशिकता आणि परिस्थितिप्रियता

व्यक्तीचे किती गुण (आणि त्यावर गुदरणार्‍या घटना) कितपत आनुवांशिक आणि कितपत परिस्थितिजन्य हा वाद गेले शकतभर गाजत आहे.

या बाबतीत वरील न्यूयॉर्क टाइम्स लेखात एक वेगळा विचार (किंवा वेगळा दृष्टिकोन) मांडला आहे.

व्यक्तीचा स्वभावाचा उपजत कल त्याला विशिष्ट परिस्थितीकडे आकर्षित करतो, आणि परिस्थिती मग त्याच्या जीवनातली घटना घडवते. अशा तर्‍हेने घटना उपजतही आणि परिस्थितिजन्यही असतात, वगैरे.

सिल्व्हिया प्लॅथच्या पुत्राच्या आत्महत्येचा संदर्भ देऊन हा लेख आला होता. म्हणून हा चर्चाविषय वाचून लगेच मला तो लेख आठवला. लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद नंदन.

थोडे हेही

यासंदर्भात थोडे हेही वाचता येईल. पहिला दुवा विकीचा आहे. दुसरा डर्कहैम (उच्चार चुकीचा असू शकेल) यांच्यावरील वेबसाईटचा. स्युसाईड या शीर्षकाखाली त्यांचा अभ्यास प्रसिद्ध झालेला आहे. त्यात त्यांनी आत्महत्यांच्या प्रकारांचे विवेचन केले आहे.

जुना वाद

नेचर वि. नर्चर हा वाद जुना आणि लोकप्रिय आहे. अजून काही दशके तरी चालू राहील यात शंका नाही. शिवाय इथे मानसशास्त्राचाही संबंध असल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे. यावर बरेच संशोधन झाले आहे आणि होत आहे पण त्यातून ठाम निष्कर्ष आत्तापर्यंत निघालेले नाहीत.

मानसशास्त्र हे अचूक शास्त्र नाही त्यामुळे अमुक परिस्थितीमध्ये अमुक व्यक्ती अशाच प्रकारे वागेल अशी खात्री देता येत नाही. त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार वागणुकीबद्दल अंदाज बांधता येतात. पण यातही मानसशास्त्राच्या विविध शाखांमध्ये आणि निदान व उपचारपद्धतीमध्ये बरेच मतभेद आहेत. खिन्नतेने ग्रासलेल्या माणसाला सर्व जग निराशावादीच दिसते. हा दृष्टीकोन अर्थातच बरोबर नाही. पण फ्रॉइडच्या मते रूग्णाच्या भावना 'व्हॅलिड' असतात आणि म्हणूनच त्याचा निराशावादी दृष्टीकोनही बरोबर आहे [१]. म्हणून खिन्नतेवर फ्रॉइडीयन पद्धतीने उपचार केल्यास यश मिळतेच असे नाही. याउलट बिहेविअरल थेरपी किंवा कॉग्निटीव्ह थेरपी खिन्नतेवर अधिक परिणामकारक ठरतात.

काही माणसांमध्ये परिस्थिती कितीही बिकट असली तरी तोल जाऊ न देण्याचे 'स्पिरिट' (प्रतिशब्द?) कायम असते. एक साधे उदाहरण. सर्वसाधारणपणे आपण आपल्या घराला गृहित धरतो, त्यामुळे घर नसले तर काय होईल ही कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही. पण अशीही माणसे आहेत की ज्यांनी विचारपूर्वक बेघर होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या परिस्थितीत ती माणसे समाधानी आहेत. त्यामुळे परिस्थिती माणसाला आत्महत्येला कारणीभूत बनवते असे नसून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा त्या परिस्थितीला काय प्रतिसाद असतो हा कळीचा मुद्दा आहे असे वाटते. हे स्पिरिट कुठून येते? यात जनुकीय भाग किती आणि संगोपनाचा भाग किती? उत्क्रांतीचा एक परिणाम म्हणून अस्तित्वात आलेल्या होमो सेपियन सेपियन या प्रजातीमध्ये इदी अमिन आणि मदर टेरेसा ही दोन टोके ठळकपणे दिसतात. यांची सूसूत्रपणे सांगड कशी घालायची?

-------
[१] फिलिंग गुड, डेव्हिड बर्न्स

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

स्पिरीट

उर्मी?

 
^ वर