पुस्तक ओळख - पश्चिमप्रभा

जवळजवळ दर भारतभेटीत काही ना काही पुस्तकं विकत घ्यायचा प्रयत्न असतो. तिथे गेल्यावर वेळ थोडा असतो, त्यामुळे जायच्या आधीच काही पुस्तकांची यादी तयार करून सुसज्जच जावे लागते. तीन - चार महिन्यांपूर्वी असाच योग आला. काही पुस्तकांची नावं सुचव असं कळवल्यावर मुक्तसुनीतनी महेश एलकुंचवारांच्या 'पश्चिमप्रभा' या पुस्तकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं. त्यामुळे पुस्तक घेतलेच.

हे पुस्तक, एलकुंचवारांनी 'लोकमत' मधे २००४-०५ साली साधारणपणे वर्षभर पाश्चिमात्य साहित्याची तोंडओळख मराठी सामान्य वाचकाला व्हावी अशा हेतूने चालवला होता. यामधे इंग्रजी बरोबरीनेच इतर युरोपिय भाषामधल्या काही उत्कृष्ट कलाकृतींचाही अतिशय धावती पण नेमकी अशी ओळख करून दिली आहे. वृत्तपत्रिय स्तंभलेखन या स्वरूपातले हे लेख अगदी छोटेखानी आहेत आणि ते त्या कलाकृतीची केवळ ओळख करून देणे एवढ्याच पुरते मर्यादित आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर एलकुंचवारांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. ते म्हणतात,

".... गेली पन्नास वर्षे मी पाश्चात्य वाङ्मय वाचत आहे. त्याबद्दल बोलावे, त्याच्याबद्दल ऐकावे असा योग सहसा येत नाही. त्यामुळे.... मला विशेष आवडलेल्या पुस्तकांची... तोंडओळख वाचकांना करून द्यावी असे मला वाटले.

हे छोटे लेख टिपणवजा आहेत. ते समीक्षा नव्हेत. ते फार विवेचकही नाहीत.

.... ही सर्वच पुस्तके इतकी मोठी व अभिजात आहेत की एकेका छोट्याशा टिपणात त्यांना गवसणी घालणे शक्य नाही. पण ज्यांनी ती वाचलेली नाहीत त्यांना ती वाचावीशी वाटावीत व ज्यांनी ती वाचलेली आहेत त्यांना पुनःप्रत्यय मिळावा एवढाच मर्यादित हेतू हा स्तंभ लिहिताना मी मनाशी वागवला होता."

खरं म्हणजे लिहिणारे एलकुंचवार, विषय त्यांना आवडलेल्या साहित्यकृती आणि त्याही अभिजात वगैरे, तेव्हा इतक्या छोट्या टिपणवजा लेखांतून त्या त्या कलाकृतींचे समग्र दर्शन घडवणे ही एक तारेवरचीच कसरत होती. पण त्यांनी ती यशस्वीपणे निभावून नेली आहे. पुस्तकात जागोजागी प्रत्येक कलाकृतीतलं नेमकेपण टिपण्याचा त्यांचा गुण जाणवतो.
हेन्री मिलर, व्हॅन गॉफ, चेकोव, मॉम, टी. एस. एलियट, ग्रॅहॅम ग्रीन, पिरांदेलो, इब्सेन अशी बरेच वेळा कानावर पडलेली नावं तर त्यात आहेतच. पण रँबो, सोग्याल रिंपोचे, वॉल्ट व्हिटमन, लोर्का, ज्याँ जेने, सिल्विया प्लाथ अशी माझ्या सारख्याला कधीच माहित नसलेली नावं पण आहेतच. यातले काही लेखक तर रूढार्थाने साहित्यिकही नाहीत. उदाहरणार्थ तिबेटन लामा सोग्याल रिंपोचे हे धर्मगुरू. त्यांच्या 'तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग अँड डायिंग' बद्दल खूप छान ओळख आहे. तसेच दाग हामरस्कोल्ड, हे गृहस्थ तर युनोचे सरचिटणीस. राजनयिक. पण त्यांचे 'मार्किंग्ज' हे काय जबरदस्त ताकदीचे असावे हे त्यांच्यावरचा लेख वाचताना जाणवते. पॉल ब्रंटनचे 'अ सर्च इन सिक्रेट इंडिया' हे एकमेव पुस्तक असे की जे मी आधी वाचले होते, आणि पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळाला.

पुस्तकात जागोजागी एलकुंचवाराच्या चौफेर वाचनाची कल्पना येते. रिंपोचेंच्या पुस्तकाच्या ओळखीत ते लिहितात, "गुरू रिंपोचे सांगतात ते भारतीय माणसाला नवीन नाही. योगसूत्रातला समाधीपाद आणि साधनपाद वाचलेल्या माणसाला तर नाहीच नाही." !!! तर बरेच ठिकाणी पाश्चात्य कलाकृतीशी समांतर अशी भारतीय किंवा मराठी साहित्यातली उदाहरणं ते देतात. ललित, कादंबरी, कविता, नाटक असे सगळेच साहित्यप्रकार हाताळले आहेत. शेवटी, "या माणसाने आयुष्यात फक्त वाचनच केले आहे का?" असे वाटायला लागते.

पण हे साधारण तीसेक लेखांचे पुस्तक वाचल्यावर माझी मात्र गोची झाली आहे. 'एकदा तरी वाचायची आहेत' या यादीत एकदम इतक्या पुस्तकांची भर पडली आहे. म्हणजे, एकंदरीत पुस्तकाचा मूळ उद्देश नक्कीच साध्य झाला आहे.

***

पश्चिमप्रभा
महेश एलकुंचवार

पहिली आवृत्ती (२००६)
चक्षू प्रकाशन, औरंगाबाद.

मूल्य : रू. १४०/-

Comments

वा..

उपक्रमावर स्वागत. एलकुंचवारांचे मौनराग वगळता दुसरे पुस्तक वाचलेले नाही. पश्चिमप्रभाची ओळख आवडली.

या माणसाने आयुष्यात फक्त वाचनच केले आहे का?

काय मजा येईल असे करता आले तर :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हाहाहा!!!

काय मजा येईल असे करता आले तर :)

अवचटांनी अरूण देशपांडे या वल्लीबद्दल एक लेख लिहिला आहे. सोलापूरजवळ खूप चांगलं काम केलं आहे त्यांनी. त्यात त्यांनी असं म्हणलं आहे, "अरूणचं स्वप्न आहे की, मस्त पैकी खिडकीजवळ वाचत बसायचं. खिडकीबाहेर काकडी, द्राक्षं वगैरे वेल लागले आहेत. वाचता वाचता हात लांब करून काय पाहिजे ते तोडून घ्यायचं आणि खायचं. परत पुस्तकाकडे लक्ष."

तेव्हा पासून मलाही या कल्पनेने वेडं केलं आहे. :)

बिपिन कार्यकर्ते

चार्लीचे स्वप्न?

चार्लीच्या एक चित्रपटात असेच स्वप्न आहे...
त्यात गाय घरी येते आणि दूध देवून जाते वगैरे...

खिडकीतून द्राक्षांचे घोस लटकत असतात, चार्ली ते खातो.

आपला
गुंडोपंत

+१

थोरो

पश्चिमप्रभाची ओळख आवडली.

या माणसाने आयुष्यात फक्त वाचनच केले आहे का?

काय मजा येईल असे करता आले तर :)

होय. उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळाली तर मी माळ्यावरचा कोळीही होईन असे थोरो म्हणतो (असे माडगूळकर म्हणतात)

सन्जोप राव

सिल्व्हिया प्लाथ

उत्तम ओळख.
"पश्चिमप्रभे"तले एक छोटेसे उदाहरण म्हणून , दिवंगत कवियत्री सिल्व्हिया प्लाथ यांच्याबद्दल लेखक काय म्हणतो त्याचे उदाहरण देतो :

"का केली तिने आत्महत्या? किंवा कुणीही का म्हणून करते स्वत:चा जीवनांत? याला आपण काहीतरी उत्तरें शोधतो हे खरे, पण ती आपल्याच समाधानाकरतां असतात. त्यामुळे सत्यावर प्रकाश पडतोच असेही नाही, व आत्महत्येसारख्या गंभीर कृतीमागे एकच काही कारण असते असेही नाही. अनेक ज्ञात व अज्ञात कारणांचा, प्रेरणांचा, विकारांचा अविश्लेषणीय संकर होऊनच त्याच्या रेट्यामुळे कलावंत या गोष्टीकडे ढकलले जातात असे दिसते...."

"....प्लाथचे दु:ख नेमके काय आहे? त्याबद्दल ती मुग्ध रहाते. पण ते आहे आणि अटळपणें आहे हे तिच्या शब्दाशब्दातून आपल्याला जाणवत राहते. कधी वाटते की ती स्वत:च्या दु:खाबद्दल बोलते आहे की एका कल्पित व्यक्तिच्या दु:खाबद्दल बोलते आहे ? "फीवर" ही कविता म्हण्टले तर एका खूप ताप आलेल्या अवस्थेतील impressions आहेत. पण त्यांच्यात खदखदत असलेले दुसरेही काही आहे. शरीराचे भोग व त्याचवेळी त्या शरीराबद्दल असलेली परात्मता. वरवर कामचलाऊ, उथळ वाटणारी घटना एकदम प्रगाढ भावनेचा हुंकार तिच्या नकळत आपल्याला ऐकवते. "

आणि "मौनराग" चा विषय निघालाच आहे म्हणून "मौनरागा"चा एक उतारा :

कलावंताचे काय किंवा इतरांचे काय मौन हे बरेचदा शब्दांपेक्षा जास्त बोलके व अर्थबहुल असते. श्रेष्ठ कलाकृती कधी कधी हळू हळू आपल्याभोवतीचा स्तब्धतेचा परिघ विस्तारताना दिसतात. कधी कधी त्यातच विसर्जित होतानाही अनुभवता येतात. आणि कधी तर कलावंत स्वत्:च मौन होऊन आपले आविष्कारमाध्यम आपल्यातच मिटवून टाकतो. कधी त्याचा त्याग करतो.
आतले काही सापडले किंवा काही सापडत नाही ह्याची खात्री पटली की आविष्काराच्या माध्यमाची गरजच राहत नाही. त्याचे उलट ओझे होते. फ़्रेंच कवी रॅंबो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या विशीतच कविता लिहिणे त्याने समारंभपूर्वक सोडले.
अनुभव व्यक्त करत असताना अनुभवाचे, तंत्राचे व माध्यमाचेही संक्षिप्तीकरण करण्याची निकड! अनुभवाच्या जहराचा थेंब फक्त जिभेवर हवा, इतर फापटपसारा नको असे वाटू लागले की कलावंताला ही निकड वाटते. ह्या संक्षिप्तीकरणाचीच अखेरची पायरी म्हणजे पूर्ण स्तब्धता, आपल्या माध्यमाचा त्याग असे काही रॅंबोच्या बाबतीत घडले का? लिहिणे थांबवल्यावर रॅंबोने स्वत्:ची जी आत्मविनाशी फरपट करुन घेतली ती पाहिली की आतली सघन स्तब्धता त्याला सापडली होतीसे वाटत नाही. Adieu mariage, adieu famille, adieu avenir! ma vie est pass'ee. हाय! संपले माझे आयुष्य, गेले, म्हणणार्‍या रॅंबोला साध्या सरळसूत आयुष्याचीच ओढ होतीसे वाटते. तेही मिळेना, कविता अपुरी पडली, म्हणून स्वत्:जवळचे अतीव मोलाचे असे होते ते तुटके खेळणे फेकावे तसे त्याने फेकून दिले. आत स्तब्धता नाही, फक्त पोकळी आहे, आणि बाहेर तर त्याच अर्थहीन पोकळीचे दृश्यरुप. आतबाहेर तेच आहे, लिहिण्याने काही फरक पडत नाही असे वाटून ह्या कोवळ्या तरुणाने न लिहिण्याचा धाडसी निर्णय घेतला व स्वत्:चे आयुष्य बेदरकारपणे उधळून दिले हेच खरे. आणि व्हॅनगॉफ़. चक्राकार, सळसळत वर जाणार्‍या त्याच्या रेषांनाही त्याची तडफ़ड पेलवेना तेव्हा त्याने आधी वेडात व नंतर कपाळावर टेकलेल्या पिस्तुलाच्या थंडगार नळीत ही स्तब्धता शोधली. त्याने मृत्यू स्वीकारुन स्वत्:ला मौन केले. रॅंबोनेही तेच. त्यांच्या मौनाचा रुपाकार मला एक पाय कापलेला रॅंबो मध्यपूर्वेच्या वाळवंटात कुबडीच्या साहाय्याने वणवणताना असा कधी दिसतो. कधी कपाळावर टेकलेले पिस्तूल असा.
रॅंबोने काय किंवा एमिलीने काय, बुद्ध्या स्वीकारलेली ही जरब बसवणारी स्तब्धता. ती अस्वस्थ करते. पण ती दुसर्‍यांची जीवने. अस्वस्थ करणारी असली तरी ती तटस्थ कलात्मकतेनेच अनुभवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण अशी स्तब्धता आपल्याच माणसाकडून आपल्यावर दरड कोसळावी तशी कोसळते तेव्हा आपण काय करतो?

मौनरंगमधील

मौनरंगमधील हिंदूंच्या अंत्ययात्रेसंदर्भातला लेख मला स्पष्टपणे आठवतो. तोदेखील फार सुरेख होता.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

'सिल्व्हिया प्लाथ' परत...

मुक्तसुनीतच्या प्रतिसादानंतर 'सिल्व्हिया प्लाथ' परत वाचलं. अतिशय चपखल उपमा वापरण्याचं एलकुंचवारांच्या लेखणीचं सामर्थ्य खालच्या परिच्छेदात एकदम जाणवलं...

'सिल्व्हिया प्लाथ'च्या सर्व काव्यात एक विलक्षण अंतर्गत ताण आहे. व्यक्त आणि अव्यक्त या दोन ध्रुवांवर तिची कविता व्हायोलिनच्या ताणलेल्या तारेसारखी खेचून बसवली आहे. सिल्व्हियाने काही गोष्टी, भावभावना दडपल्या तरी त्यांच्या आवेगी सामर्थ्याचे हुंकार व्यक्त झालेल्या आशयाला हादरवत असतात. तिने व्यक्त केलेले अगदी 'जाहीरनामा' (डिक्लरेशन) म्हणावे इतके उघड आहे. हे उघडेपण दुसरे काहीतरी लपवण्याचा / दडपून टाकण्याचा प्रयत्न तर नव्हे?

हे वाचल्यावर अजून एक वाटलं, एखादवेळेस एलकुंचवारांइतकं वाचन जमेलही, पण त्यांच्यासारखं वाचणं जमेल का? शब्द केवळ ज्याला व्यक्त स्वरूप देतात, 'ते' शब्दांच्या आतल्या बाजूला जाऊन वाचता येईल?

बिपिन कार्यकर्ते

अवतरणचिन्हांचा

"का केली तिने आत्महत्या? किंवा कुणीही का म्हणून करते स्वत:चा जीवनांत? याला आपण काहीतरी उत्तरें शोधतो हे खरे, पण ती आपल्याच समाधानाकरतां असतात. त्यामुळे सत्यावर प्रकाश पडतोच असेही नाही, व आत्महत्येसारख्या गंभीर कृतीमागे एकच काही कारण असते असेही नाही. अनेक ज्ञात व अज्ञात कारणांचा, प्रेरणांचा, विकारांचा अविश्लेषणीय संकर होऊनच त्याच्या रेट्यामुळे कलावंत या गोष्टीकडे ढकलले जातात असे दिसते...."

"....प्लाथचे दु:ख नेमके काय आहे? त्याबद्दल ती मुग्ध रहाते. पण ते आहे आणि अटळपणें आहे हे तिच्या शब्दाशब्दातून आपल्याला जाणवत राहते. कधी वाटते की ती स्वत:च्या दु:खाबद्दल बोलते आहे की एका कल्पित व्यक्तिच्या दु:खाबद्दल बोलते आहे ? "फीवर" ही कविता म्हण्टले तर एका खूप ताप आलेल्या अवस्थेतील impressions आहेत. पण त्यांच्यात खदखदत असलेले दुसरेही काही आहे. शरीराचे भोग व त्याचवेळी त्या शरीराबद्दल असलेली परात्मता. वरवर कामचलाऊ, उथळ वाटणारी घटना एकदम प्रगाढ भावनेचा हुंकार तिच्या नकळत आपल्याला ऐकवते. "

अरे वा. दोन्ही उतार्‍यांत अवतरणचिन्हांचा वापर सुरेख केला आहे तुम्ही. अनेकदा अनेक लेखकाकडून राहून जातो. अभिनंदन. सिल्वियाबद्दल तुमची मते वाचायला आवडतील.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आमची काय मते असणार ?

आमची काय शिळीपाकी मते असायची ? ज्यांना ताजीतवानी मते देता येतात त्यांनी ती द्यावीत असेच आम्हाला वाटते बॉ. ;-)

वा!

उपक्रमावर स्वागत. पहिल्याच चेंडूवर सिक्सर! :)
पुस्तकाची सुंदर ओळख. हे वाचायच्या यादीत टाकले की त्यातली सर्व पुस्तकेही यादीत येतीलच.

परत प्रश्न पडतो की एका आयुष्यात करायचे तरी काय काय?

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

असेच म्हणतो

वाचावेसे वाटते.

(पुस्तकांच्या यादीत घातलेले हे पुस्तक वाचायचे तरी कधी)

अजुन येऊ द्या!

स्वागत!!
ओळख आवडली.. वाचायच्या पुस्तकांची यादि आता इतकी वाढली आहे .. आणि तुमच्यासारख्यांच्या कृपेने वाढत आहे की ती पुर्ण करायला आमचाहि अरूण देशपांडे व्हावा लागेल..
;)

असो.. अजून येऊ द्या :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

पश्चिमप्रभाविषयी आणखी काही

प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे या पुस्तकातील टिपणवजा छोटे लेख लेखकाला आवडलेल्या पुस्तकांची नुसती तोंडओळख आहे. यात उल्लेख केलेली सर्व पुस्तकं अभिजात वर्गातली असून त्यांचा आवाका फार मोठा आहे. एक दोन पानातून त्यांची ओळख करून देणे ही तारेवरची कसरत ठरेल. परंतु स्तंभलेखक प्रतिभाशाली असल्यामुळे थोडक्यात आशय पोचवण्याची कसब त्यांना जमली आहे. त्यामुळे सर्व लेख आपल्याला समाधान देवू शकतात. ज्यानी पुस्तकं वाचली नाहीत त्याना ती वाचाविशी वाटतील. चित्रपट-नाटकं बघाविशी वाटतील. व ज्यानी पुस्तक वाचली/सिनेमा-नाटक बघितली आहेत त्यांच्या आठवणी उजळून निघतील. यातील बहुतेक पुस्तक मी वाचलेली असल्यामुळे यातील सर्व लेख मला आवडले. नाटक-सिनेमाविषयी मी जास्त लिहू शकणार नाही.
एलकुंचवार लेख लिहिताना ते स्वतः नाटककार आहेत हे विसरू शकत नाहीत हे मात्र पुस्तक वाचताना जाणवते.

वा

वा !!
पुस्तकाची ओळख छान करुन दिली आहेत. प्रतिसाद सुद्धा छान. बरीच नवी माहिती मिळाली.

--लिखाळ.
नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :) -(वार्‍यावरची वरात)

 
^ वर