नॅनोच्या निमित्ताने...

अखेर एकदा(ची) नॅनो प्रकट झाली. एका लाखात कार देण्याचे वचन पूर्ण करण्यात टाटांना यश मिळाले. या नॅनोसाठी अनेक राजकीय घडामोडी तर झाल्याच पण त्याच बरोबर तांत्रिक, सामाजिक घमोडीहि पुढे आल्या - येतील. आता नॅनो रस्त्यावर धावतील, मुळातच कमी वेगाच्या या गाडीला शहरात फिरवणे अजिबात कठीण नाहि कारण शहरात वाहतुकीचा वेग कमीच आहे. मात्र काहि काळाने जर प्रत्येकाकडे मोटार दिसु लागली तर त्यासाठी लागणारे रस्ते आपल्याकडे आहेत का? तर ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारात्मक आहे.

वाढती वाहने, वाढते प्रदुषण, वाढता इंधनाचा वापर, त्यामुळे खर्च होणारी क्रयशक्ती यांचा विचार केला तर ह्या वाढत्या मोटारी हे प्रगतीचे लक्षण समजावे का विनाशाचे? जर आपण भरपूर मोटारी असणारे अमेरिकेसारखे देश बघितले, की असे दिसते की तिथे रस्ते अतिशय उत्तम आहेत. मात्र जर त्यांच्या इतिहासात डोकावले तर असे दिसून येते की ही परिस्थिती आधी नव्हती. अगदी अमेरिकेतही उत्तम रस्तेबांधणीवर खर्च करावा की लोहमार्गांवर याबद्दल अनेक विवाद झालेले आढळतात. अमेरिकेत हे रस्त्यांचे जाळे प्रत्यक्षात यायला ह्या मोटार "लॉबी"चे मोठे योगदान/दबाव आहे. आपल्या मोटारींच्या अखंड विक्रीची खात्री करण्यासाठी त्यांनी सरकारवर रस्त्यांचे असे जाळे करण्यासाठी मोठा दबाव आणला होता. हा दबाव इतका होता की चांगले रस्ते बनविण्यासाठी इतर पायाभुत सुविधांचा पैसा रस्त्यांकडे वळवला गेला. यामुळे आता अमेरिकेत परिस्थिती अशी आहे की बर्‍याच शहरांतून दुसर्‍या शहरांत जाण्यासाठी स्वतःची गाडी असणे अथवा विमानभाडे परवडणे हे दोनच पर्याय राहिले आहेत.

अमेरिकेसारख्या तुलनेने कमी लोकसंख्येच्या श्रीमंत देशाला कदाचित हे परवडु शकेल. मात्र भारतातहि "प्रगती"चे मोजमाप हेच हवे का? लांब पल्ल्यांचे उत्तम रस्ते हा पायाभुत सुविधेचा महत्त्वाचा भाग आहे हे नक्की पण रस्ते वाहतुक सुधारण्यासाठी जर रेल्वेच्या वाटणीचे पैसे वापरले जाणार असतील तर ते कितपत योग्य आहे? भारतात अजुन तरी रस्त्याची स्थिती चांगली नाहि. तसेच रेल्वे बजेट अजूनहि भरपूर आहे आणि दरवर्षी वाढत आहे. मात्र हे असेच राहिल असे वाटते का?

आता नॅनोसारख्या मोटारींच्या बाजारात येण्याने वाढणार्‍या स्पर्धेत मोटार उद्योगाला कमी किमतीत कार विकणे प्राप्त आहे. अश्या परिस्थितीत किंमत कमी असल्याने फायदा कमावण्यासाठी मोटार कंपन्यांना अधिकाधिक मोटारी विकणे प्राप्त आहे. लोक मोटारी तेव्हाच घेणार जेव्हा त्या चालवायला रस्ते, ठेवायला जागा आणि मुबलक इंधन असेल. म्हणजे अश्या मोटारी येण्याने रस्ते चांगले करण्यासाठी सरकारवर दबाव येईल हि चांगली गोष्ट आहे. मात्र रस्तेबांधणी ही फुकटात होत नाहि. तेव्हा सरकार कोणत्या पैशाने ही बांधणी करेल ह्याकडेहि लक्ष देणे गरजेचे आहे. जर हा पैसा रेल्वे, संरक्षण, आरोग्य अश्या खात्यांतून घेतला जाणार आसेल आणि चांगले रस्ते बांधले जाणार असतील तर ते कितपत फायदेशीर आहे?

तुम्हाला याबद्दल काय वाटते? भारतासारख्या भरपुर लोकसंख्या असलेल्या देशात नॅनोसारख्या स्वस्त व छोट्या गाड्या येण्याने सर्वसाधारण फायदा आहे की त्यामुळे उलट अधिक बिकट प्रश्न निर्माण होतील? अश्या गाड्या येणे हे प्रगतीचे लक्षण वाटते का?

लेखनविषय: दुवे:

Comments

विचारपूर्ण लेख

वाहनचालकाला मिळणारा स्वातंत्र्याचा सुखद अनुभव एकीकडे, रस्तेबांधणीमुळे सार्वजनिक खर्च रेल्वे/एस्टीकडून वळणे हे दुसरीकडे. खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय ही रस्सीखेच लोकशाही राज्यांमध्ये ताण उत्पन्न करणारी आहे. पण अपरिहार्य आहे.

माझे मत सार्वजनिक दळणवळण व्यवस्था मुबलक आणि सोयिस्कर व्हावी, असे आहे. वाटेल तेव्हा लवकर मिळणारी लोकलगाडी असेल, आणि (खचाखच न भरलेली) बस असेल तर घराबाहेर वाटेल तेव्हा मी पडू शकतो - वैयक्तिक हालचालीचे माझे स्वातंत्र्य शाबूत राहाते. अशा प्रकारे खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय असा विरोध काही राहातच नाही.

पण असे होण्यासाठी बाजार तयार करणे कठिण आहे. तस्मात् मुबलक गाड्या->वाहातुक ठप्प->वाहनचालकांचा रोष->रेल्वेऐवजी रस्ते अंदाजपत्रकात अधिक असा क्रम होण्याची शक्यता अधिक आहे.

कर्बवायू नियंत्रित ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर तह-कायदा होईल (जर), (तर) कर्बवायू-नियंत्रणासाठी खनिज-इंधनांची किंमत वाढवावी लागेल->गाड्या कमी चालतील->कामावर पोचण्यासाठी लोक बोंब करू लागतील->रेल्वे बांधणी होईल असाही क्रम असू शकतो. पण ही मुक्त बाजारपेठ नसून सरकारी धोरणाने बदललेली अर्ध-मुक्त बाजारपेठ आहे.

रेल्वेबांधणीला ५-१० वर्षे लागतात त्यामुळे हा क्रम आचकेविचके देत बारगळूही शकेल. त्या ५-१० वर्षांत आंदोलनांमुळे कर्बवायू नियंत्रण करायचेच सरकार सोडून देईल, असेही होऊ शकेल.

(आजही जगातील सर्व "भांडवलशाही" देशात अन्नधान्याची बाजारपेठ सरकारी धोरणाने अर्धमुक्त असते. त्यामुळे सरकारी नियंत्रण मान्य करणे-न-करणे लोकांना जाचक वाटते की गौरवाचे वाटते, याबद्दल नियम नाही.)

खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय

खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय या रस्सीखेचा(ची?)शी सहमत आहे. भारतातील सध्याच्या आणि होऊ घातलेल्या महानगरांमध्ये लोकांना हवी असूनही सार्वजनिक सोय पुरी पडत नाही. जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे (उदा. मुंबई) तिथे तिला आणखी वाढवण्याचे, अधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न तितक्या जोमाने होत नाहीत. आणि जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावापुरतीच आहे (उदा. पुणे) तिथे ती सुधारण्याचे किंवा नवीन साधने (उदा. मेट्रो, लोकल इ.) निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे खाजगी स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सोय याबरोबरच सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता आणि इच्छाशक्ती हा एक निर्णायक फॅक्टर आहे.

एक लाखात नॅनो

एक लाखात नॅनो हा चाणक्यने विषय मांडला होता त्याच चर्चेचा हा पुढील भाग आहे. सुनिल ने त्यावेळी एक गोम मांडली होती.

माझे मत सार्वजनिक दळणवळण व्यवस्था मुबलक आणि सोयिस्कर व्हावी, असे आहे. वाटेल तेव्हा लवकर मिळणारी लोकलगाडी असेल, आणि (खचाखच न भरलेली) बस असेल तर घराबाहेर वाटेल तेव्हा मी पडू शकतो - वैयक्तिक हालचालीचे माझे स्वातंत्र्य शाबूत राहाते. अशा प्रकारे खाजगी स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक सोय असा विरोध काही राहातच नाही.

धनंजयने व्यक्त केलेले मत हे बहुसंख्यांचे (पुण्यातल्या) मत आहे. एका वाहनव्यवसायतील परिचिताला मी नॅनोमुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतील असे सांगितल्यावर त्याने सांगितले की शासनाने खालील उपाय करावे.
१) पार्किंग चार्जेस वाढवावेत
२) पंधरा वर्षावरील गाड्या बाद कराव्यात
म्हणजे एखाद्या गोष्टीची उपलब्धता सहज ठेवायची पण उपयुक्तता कठीण करायची असा पर्याय.
मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत असताना देखील हा व्यवसाय तोट्यात? कसा जातो हे काही गणित? समजत नाही ब्वॉ!

प्रकाश घाटपांडे

सार्वजनिक वाहातुक व्यवस्थेत मागणी-पुरवठा

ही नियंत्रित बाजारपेठ असल्यामुळे हा प्रकार दिसतो :

मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत असताना देखील हा व्यवसाय तोट्यात?

अनियंत्रित बाजारपेठेत किंमत वाढते, किंवा घटते. किंमत वाढली तर मागणी घटते, किंमत कमी झाली तर पुरवठा घटतो, अशा प्रकारे समतोल साधला जातो.

मागणी जास्त व पुरवठा कमी असे असल्यामुळे अनियंत्रित बाजारपेठेत सार्वजनिक वाहातुकीची तिकिटे वाढतील.

(उदाहरणार्थ - मुंबईत प्रथम श्रेणीच्या लोकलच्या डब्यातही खूप गर्दी असते. मागणी बघून रेल्वे विभाग पहिल्या वर्गाचे सर्व डबे असलेली लोकल सोडू लागेल, किंवा लोकलची तिकिटे भरमसाठ वाढवेल - म्हणजे लोकल भरभरून जाईल इतक्या लोकांना परवडेल, बाकीच्यांना परवडली नाही तर चालेल, इतकी तिकिटे वाढवेल. ज्यांना तिकिटे परवडणार नाही, ते लोक अंथरूण पाहून पाय पसरायला शिकतील, आणि लोकलमध्ये बसायलाच जाणार नाहीत - मागणी कमी होऊन पुरवठ्याशी समतोल होईल. शिवाय रेल्वे महामंडळ फायद्यात जाईल.)

परंतु सरकारला काही कारणासाठी (घटनेने सांगितलेली जबाबदारी म्हणून) सार्वजनिक वाहातुक इतकी महाग करायची नाही. त्यामुळे तिकिटाच्या किमतीवर नियंत्रण राहाते, आणि तिकीट स्वस्त राहाते. मग मागणीचा पुरवठ्याशी समतोल राखण्यासाठी किंमतीचा पासंग राहात नाही, आणि रेल्वे महामंडळही तोट्यात राहाते. तुम्ही म्हणता तसा असमतोल दिसतो. गणित हे असे आहे.

फायद्यातील रेल्वे, तोट्यातील यस्ट्या

मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत असताना देखील हा व्यवसाय तोट्यात? कसा जातो हे काही गणित? समजत नाही ब्वॉ!

दुर्दैवाने हे गुणोत्तर सर्वत्र नसलं तरी बर्‍याच ठिकाणी आहे. मात्र गेले चार वर्षे रेल्वे फायद्यात आहेच की.

शासनाने खालील उपाय करावे.
१) पार्किंग चार्जेस वाढवावेत
२) पंधरा वर्षावरील गाड्या बाद कराव्यात

वरील उपाय म्हणजे लोकांना गाड्या घेऊ द्यायच्या मात्र वापरू द्यायच्या नहित असे झाले. त्यापेक्षा शासनाने रस्ते सुधारले, तिथे खर्च केला तरी चालेल असे वाटते. :-) चर्चा विषयात म्हटल्याप्रमाणे रस्ते सुधारणे हि गरजच आहे. मात्र ती गरज कशाच्या जोरावर भागवली जात आहे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अजुनहि भारतात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरली जाते. सार्वजनिक व्यवस्था सुधारली पाहिजे का? की आता स्वस्तातील गाड्या आल्याने त्याची गरज नाहि असे सरकारला वाटेल?

खाली चाणक्य म्हणतात तसे जर गावातील मंडळी जर ती हळुहळु यस्टीची वाट बघायच्या ऐवजी गाड्या घेऊन जाऊ लागली तर त्यांचा वेळ नक्कीच वाचेल मात्र ते एकुणच समाज ढवळणारे ठरेल. यातुन सामाजिक प्रश्न निर्माण होतील का प्रश्नांना उत्तरे मिळतील?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

रेल्वेसंबंधी

>>दुर्दैवाने हे गुणोत्तर सर्वत्र नसलं तरी बर्‍याच ठिकाणी आहे. मात्र गेले चार वर्षे रेल्वे फायद्यात आहेच की.

भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा कायमच तोट्यात राहिली आहे. रेल्वेस जो काही नफा होतो तो संपूर्णपणे मालवाहतूकीतून होतो. त्या नफ्याचा वापर प्रवासी तिकिटांत सबसिडी देण्यासाठी होतो. म्हणून भारतात रेल्वे प्रवास स्वस्त आहे. गेले ४ वर्षं रेल्वे फायद्यात असण्याची कारणे वेगळी आहेत. लालूप्रसाद यादवांनी मालवाहतूकीमध्ये एका व्यागनमधे वजन वाहून नेण्यावर जी मर्यादा होती, ती वाढवली. कारण असंही बेकायदीशीर रीत्या व्यागन्समध्ये मर्यादेपेक्षाजास्त वजन भरलं जातच असे. आता निदान रेल्वेला त्याचे पैसे तरी मिळतात. पण हे सर्व करताना ब्रिटिशकालीन पूल हे वाढलेले लोड घेऊ शकतील की नाही, तसेच सध्या अस्तित्वात असलेले एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर ह्या वाढलेल्या लोडपुढे किती काळ टिकणार ही शंकाच आहे. तज्ञांच्या मते हा फक्त पायापुढचं पाहाण्याचा प्रकार आहे. याचा रेल्वेच्या सुरक्षिततेवर भविष्यकाळात विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु तोट्यात रेल्वे चालवण्यापेक्षा नफ्यातला पैसा वापरून सध्याचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे/नवीन उभारणे हे अधिक बरे असेही काही लोक म्हणतात. कसेही असले तरी रेल्वे मंत्र्यांनी सुरू केलेल्या काही योजना खरोखरच उत्तम आहेत. उदा. वर म्हटल्याप्रमाणे मालवाहतूकीची क्षमता वाढवणे, मालवाहतूकीचा वेग वाढवण्यासाठी तसेच नाशवंत मालाची वाहतूक लवकर व्हावी यासाठी प्रयत्न, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा, रेल्वे मालवाहतूकीसाठी खासगी कंपन्यांना परवानगी (ही आधी अर्थातच सरकारची आणि नंतर कॉन्कॉर या सरकारी कंपनीची मक्तेदारी होती) प्यासिंजरांसाठी गरीब-रथ (याच्याकडे भारतातील सर्व प्रवासी रेल्वे वाहातूक एयर-कंडिशन करण्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रयोग म्हणून पाहिलं जातं) वगैरे.

नॅनोमुळे येणार्‍या मेगा समस्या

शंभर कोटी लोकसंख्येच्या देशात दर वर्षी कांही लाख जास्तीच्या गाड्या आल्याने लगेच अमेरिकेतल्याप्रमाणे प्रत्येक माणसाकडे गाडी येणार नाही. नॅनो असो किंवा नसो, वाहतूक वाढतच जाणार आहे आणि त्यातून नव्या समस्या निर्माण होणार आहेतच. त्यातून जो तो आपापल्या परीने मार्ग काढत राहील. रस्त्यांवर होणारा खर्च सार्वजनिक तिजोरीतूनच होतो ही कल्पना आता जुनी झाली. युरोप अमेरिकेत बिल्ड, ऑपरेट, ट्रान्स्फर या तत्वावरच बहुतेक नवे रस्ते बांधले जातात. त्याची सुरुवात भारतात झाली आहे. तिला आधिक वेग येईल. संसाधने अमेरिकेतल्याप्रमाणे मुबलक असोत किंवा भारतातल्याप्रमाणे तुटपुंजी असोत, त्यांचा उपयोग कशासाठी करावयाचा यातली रस्सीखेच सगळीकडे चाललेली असते आणि दुर्दैवाने त्यात 'बळी तो कान पिळी' ही म्हण खरी ठरते. याच्याविरोधात लढे चालतात आणि त्या लढ्यात पुन्हा 'बळी तो कान पिळी' या म्हणीची वेगळी प्रचीती येते. हे असेच चालत राहणार आहे, नॅनोमुळे एकदम काही मोठा फरक पडणार आहे असे मला वाटत नाही.

बी ओ टी

बी ओ टी तत्त्वावर बांधले गेलेले रस्ते, सध्यातरी तोट्यातच आहेत्. म्हणजे मुंबई पुणे हायवे हा सध्या जेवढा टोल घेतला जातो त्यात तोट्यातच् जातो. तो नफ्यात जाईल एवढा टोल लावला तर वाहनांची संख्या रोडावेल.

विचारप्रवर्तक लेख

नॅनो हे प्रगतीचे लक्षण आहे पण ते टाटाच्या तंत्रज्ञांसाठी. त्यांनी जे करून दाखवले ते निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र भारतातील सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने यात फारसे काही आहे असे वाटत नाही.
मी जन्मल्यापासून पुण्यात आहे. तेव्हाच्या पुण्याच्या तुलनेत आता पुण्याला बकाल स्वरूप आले आहे. सर्व दिशांनी शहर वाढते आहे पण या वाढीला आवश्यक असणारी इन्प्फ्रस्ट्रक्चरल ग्रोथ जवळजवळ शून्य आहे. सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अर्थात पिएमटीने प्रवास करायचा म्हटला तरी अंगावर काटा येतो.
मागच्या वर्षी अमेरिकेची निवडणूक पाहिली, यावर्षी आपली बघतो आहे. दोन्हींमधील मूलभूत फरक धक्कादायक आहे. नेहेमीप्रमाणेच आपल्या कुठल्याही पक्षाने देशाला भेडसावणारे प्रश्न मांडलेले नाहीत. आणि आपल्याला भेडसावणार्‍या प्रश्नांची यादी मोठी आहे. लहान असताना गरिबी हटाव ची घोषणा ऐकली होती. गरीबी हटली पण ती घोषणा देणार्‍या नेत्यांची.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

हितसंबंधीय

सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अर्थात पिएमटीने प्रवास करायचा म्हटला तरी अंगावर काटा येतो.

पुण्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वाईट रहावी म्हणून हितसंबंधीय विशेष प्रयत्न करीत असण्याची शक्यता बरीच आहे.

खराटा

याबाबत ऐकीव माहिती

याबाबत ऐकीव माहिती अशी की साई सर्विसचे मालक व सध्याचे एक खासदारकीचे उमेदवार आणि बजाज ऑटो या कंपनीत काही हितसंबंध गुंतलेले विद्यमान क्रिकेटमंत्री यांनी आपले हितसंबंध शाबूत राहावेत यासाठी गेली कित्येक वर्षे विशेष प्रयत्न केले आहेत.

पुण्यातील रस्त्यांवर बजाजच्या सहा सीटरना परवानगी देणे... आणि दुचाक्यांचा, चारचाक्यांचा खप वाढवण्यासाठी बससर्विसची वाट लावणे ही अशा प्रयत्नांची उदाहरणे म्हणता येतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विचारात टाकणारा लेख

लहानपणी ९०% गाड्या फियाट किंवा एम्बॅसेडर असायच्या मग जीप. बाकी काँटेसा, एम्पाला, गॅझेल, हर्बी गोज बनानाज् (वोक्सवॅगन), मर्सेडीज, टोयोटा अगदी तुरळक इ इ की अश्या गाड्या दिसल्या की घरी किंवा मित्रांना सांगायची गोष्ट असायची अरे आज मी मर्सेडीज् पाहीली.

मग आली मारुती.

मग आली खुली आर्थीक व्यवस्था व अनेक प्रकारच्या गाड्या.. पैसा दिसायला लागला म्हणुन आपण प्रगती म्हणू लागलो.

आता त्यात एक नॅनो. टाटांनी स्वस्तातील गाडी केली म्हणून नक्की कौतुक आहे पण नॅनोला प्रगती म्हणता येईल असे वाटत नाही. जर वाहतूक व्यवस्था सुधारली म्हणजे रस्ते, सुरळीत वाहतूक, सुसज्ज सार्वजनीक व्यवस्था, कमी प्रदुषण, अपघाताच्या संख्येत घट झाली तरच प्रगती म्हणता येईल.

सरकारकडे आधीच पैसा कमी आहे त्यामुळे इकडचा निधी सध्या तिकडे असे त्या त्या भागातील मतदारांकडे पाहून होईल :-( रस्ते विकास, उर्जानिर्मीती, पिण्याचे पाणी याकडे बराच निधी जाईल.

रोड टॅक्स, वाहन नोंदणी शुल्क, वाहतूक परवाना इ इ सर्व शुल्क वाढवणे, सार्वजनीक वाहतूक व्यवस्था फायद्याची (चालवायला व लोकांना वापरायला दोन्ही दृष्ट्या) पर्याय लोकांना दिला तर कदाचित लोकं तिकडे वळतील.

बाकी नॅनो चे दरवाजे काढून मागील सीट बदलून नव्या रुपात रिक्षा येतील का? :-)

रस्तेबांधणी वगैरे

गेल्या काही वर्षांत मुंबईचे ट्रॅफिक इतके वाढले आहे की इमारतीखालील मोकळ्या जागांत जेथे मुले खेळत तेथे गाड्या खचाखच भरलेल्या दिसतात. कमी किंमतीत येणारी गाडी हे म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारी गाडी इतके ढोबळ वाक्य नसून एका कुटुंबाला एकाहून अधिक गाड्या परवडणे हे देखील आहे. अमेरिकन कुटुंबात सुमारे २-३ गाड्या सहज दिसून येतात कारण वाहतूकीची दुसरी सुविधा नसणे, चालण्याच्या अंतरात कामांची ठिकाणे नसणे आणि पर्यायी सुविधेची वाट बघण्याजोगे किंवा चालण्याजोगे हवामान नसणे इ. आहे.

अमेरिकेत रस्तेबांधणी करताना रस्त्यांच्या मध्यभागी आणि दोन्ही बाजूंना मुबलक जागा ठेवलेली आढळते. भविष्यात रस्ते वाढवण्याची वेळ आली तर पंचाईत होऊ नये म्हणून ही सुविधा असते. भारतात इतका विचार करून रस्तेबांधणी केल्याचे सहसा दिसत नाही. (नवीन हायवेंवर असे होणे शक्य आहे.) याखेरीज, रस्त्यांच्या बाजूंनी वाढत जाणार्‍या टपर्‍या, झोपड्या इ. रस्तेबांधणी, रस्ते-रुंदीकरणाला अटकाव करतात असे दिसते.

अमेरिकेत नवे रस्ते बांधायला घेतले की बर्‍याचदा रस्त्यांवर टोल लावून रस्त्याच्या वापराचे शुल्क भरावे लागते. सार्वजनिक तिजोरीतून रस्त्यांवर सतत खर्च करणे भारतात सरकारला झेपण्यासारखे आहे असे वाटत नाही.

नॅनो आल्याने लगेच फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही परंतु नॅनो येण्याआधीच अनेक वर्षे फरक पडायला सुरूवात झाली आहे असे वाटते.

असो, चर्चा आवडली.

रस्तेबांधणी वगैरे

रस्तेबांधणी नियोजनपूर्वक केली जावी यासाठी पुरेशी मार्गदर्शनपरच नव्हे तर बंधनकारक मानके भारतात उपल्ब्ध व लागू आहेत.

खेरीज, रस्त्यांच्या बाजूंनी वाढत जाणार्‍या टपर्‍या, झोपड्या इ. रस्तेबांधणी, रस्ते-रुंदीकरणाला अटकाव करतात असे दिसते.
हे निरीक्षण चपखल आहे.

शिवाय सार्वजनिक तिजोरीतून रस्त्यांवर सतत खर्च करणे भारतात सरकारला झेपण्यासारखे आहे असे वाटत नाही.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजमार्गावरील सारे प्रकल्प बांधा - वापरा - हस्तांतरित करा याच आधारावर दिले जातात. कोल्हापुर शहरातील सारे रस्ते देखील देखरेख व रखरखावासाठी खाजगी कंपनीला तिजोरीवर प्रत्यक्ष ताण न पडता देवू करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा भारतातला हा पहिलाच प्रयोग असावा.

शब्द..

रखरखाव आवडला. मस्त आहे, पण हा हिंदी की मराठी?
माहितीसाठी विचारले! गैरसमज नको. :-)

-सौरभ.

==================

अनुसंरक्षण

'देखभाल', 'निगा राखणे' टाळून वापरलेला 'रखरखाव' मराठी मानायला हरकत नसावी. हिन्दीत रेल्वेचा 'अनुसंरक्षण' हा गोड पर्याय आहे.

अनुनिगा-अभिनिगा

ब्रेकडाऊन मेंटेनंस साठी अनुनिगा व् प्रिव्हेंटीव्ह मेंटेनंससाठी अभिनिगा असे शब्द सुचताहेत.

बांधा-वापरा-हस्तांतरीत करा

बांधा-वापरा-हस्तांतरीत करा ही एक वेगळी दिशा होती हे नक्की. पण सध्याची परिस्थिती बघता रस्तेबांधणी सरकारकडून असरकारी संस्थेकडे गेल्याने रस्त्यांची परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा व्यक्त झाली होती तसे झालेले दिसत नाहि. बिगर-सरकारी कंपन्यांनी बाधलेल्या रस्त्यांची देखरेख जवळपास शुन्य आहे. प्रचंड भ्रष्टाचार आहेच. ह्या कंपन्या आल्याने रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नसताना टोल मात्र नेमाने घेतले जातात.

काहिसे अवांतरः यात अजून एक प्रश्न म्हणजे जबरदस्तीचा. समजा मला मुंबईबाहेर पडायचे आहे तर टोल न भरता जाता येईल असा एकहि रस्ता नाहि. किंबहुना बर्‍याच मार्गांवर विविध कारणांसाठी एकापेक्षा अधिक टोल आहेत. अमेरिकेसारख्या ठिकाणी देखील तुम्हाला टोल-फ्री मार्ग निवडायचा पर्याय असतो.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

तुलना

अमेरिका आणि भारत यांची तुलना पटत नाही बॉ. प्रत्येक ठिकाणी कशा हवी हि तुलना? हे दोन देश, तिथल्या देशवासियांच्या गरजा आणि सामाजिक जबाबदारीचे भान यात जमीन-आसमानाचा फरक आहे. तुलना बरोबरीच्यांसोबत सुद्धा हवी. पाकिस्तान सोबत करु, अमेरिका त्यांना जेवढी आर्थिक मदत देते तेवढी भारताला मिळते का?
मुद्दा अवांतर आहे. पण तुलेनेचे मुद्दे पटले नाहीत. मला टोल योग्यच वाटतात. भारतीयांची मानसिकता पाहता, जे फुकट मिळेल ते हवे आहेच. किंबहुना अमेरिकेतल्या अनेक दुकानांमधल्या एखादी गोष्ट काही दिवस वापरुन आवडली नाही म्हणून परत देण्याच्या योजनेचा नको तसा वापर करणारे भारतीय सुद्धा अनेक आहेत. वर आणि भारतात येऊन तेच लोक बढाया मारतात की आम्ही बघा बिझीनेस व्हिसावर गेलो होतो. सोनीचा नवा टिव्ही फुकट घेऊन पाहिला आणि येताना आवडला नाही म्हणून परत दिला. :)

तशा तर भारतात न पटणार्‍या अनेक गोष्टी आहेत. नोकरदारांच्या खिशातुन कर रुपाने पैसा घेऊन हजारो कोटी रुपये एकवेळच्या कर्जमाफीसाठी करिता वापरणे हे बरोबर आहे? अशाने लोकांना कर्ज बुडवण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे असे वाटत नाही?






टोल..

बिगरसरकारी कंपन्यांनी बांधलेल्या रस्त्यांची देखरेख जवळपास शून्य आहे हे विधान पटत नाही. थोडाफार टोल दिला तरी चालेल पण वाहतुकीसाठी चांगला रस्ता मिळणे मला महत्त्वाचे वाटते. नुकताच पुणे नगर प्रवास चारचाकीने केला. जवळजवळ ९५ टक्के रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. (चौपदरीकरण होण्यापूर्वी हा पूर्ण प्रवास जीव मुठीत धरुन करावा लागला होता. रात्रीच्या अंधारात तर कल्पनाही करायला नको. पुणे सोलापूर रस्त्याचे देखील चौपदरीकरण लवकर होणे गरजेचे आहे. सर्वाधिक अपघात सध्या या रस्त्यावर होतात.) आणि यासाठी चाळीस, पन्नास रु. टोल भरावा लागत असला तरी तो परवडतो. त्याचे फायदे असे...

  1. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित वाहतूक. चौपदरी रस्त्यामुळे केवळ आपल्या बाजूच्याच वाहनांकडे लक्ष द्यावे लागते. चालकाचे काम खूपच सोपे होते.
  2. भरपूर वेळ वाचतो. वेगवान प्रवास शक्य होतो.
  3. चांगल्या रस्त्यामुळे एकसलग वेग शक्य होतो. वाहनाकडून उत्तम मायलेज मिळते. इंधनाचा कार्यक्षम वापर होतो.

एवढे फायदा असताना टोल का मान्य होऊ नये? सरकारने टोल जरुर वसूल करावा असे मला वाटते. भारतासारख्या खंडप्राय देशात रस्त्यांचे चांगले जाळे उपलब्ध करुन देणे खर्चिक काम आहे. लोक जेव्हा चांगल्या रस्त्यांची अपेक्षा करतात तेव्हा त्यासाठी थोडेफार मूल्य देण्यास त्यांनी काकू करु नये असे वाटते.

याबाबतीत अमेरिकेशी तुलना नको या चाणक्यांच्या विधानाशीही सहमत. अमेरिकेत टोल नसलेल्या मार्गाचा पर्याय उपलब्ध असतो शिवाय काही ठिकाणी जास्त व्यक्ती प्रवास करत असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिकाही असतात. कित्येक गावात अजून रस्ते पोहोचले देखील नसताना अशा सुविधा भारतात देणे शक्य नसावे.

-सौरभ.

==================

पुणे-सोलापूर

पुणे सोलापूर रस्त्याचे देखील चौपदरीकरण लवकर होणे गरजेचे आहे.

याचे चौपदरीकरण लवकरच (येत्या ऑक्टोबरपासून?) सुरू होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे याचे (सवलतधारी)विकासक 'टाटा'च आहेत.

धन्यवाद..

माहितीबद्दल.....

==================

टोल

भारतात कदाचित टोल हा एकमेव असा प्रकार असावा जिथे दिलेल्या रोख रकमेची पावती नक्की दिली जाते. त्यामुळे एक प्रकारे टोल वसुलीच्या कारणाने ज्यांची सुटका पगाराच्या करातुन होते ते ही अप्रत्यक्षपणे कर देतात आणि उपभोग सुद्धा घेतात. खास करुन शेतकरी. सर्वात महत्वाचे म्हणजे हा सर्व व्यवहार पांढरा आहे.

पुणे-मुंबई मार्ग हा कदाचित करणे अनिवार्य होते. पण आता पुणे कोल्हापूर हे अंतर (जवळपास २५० कि मी) कापायला स्वतःच्या गाडीने कमीत ३ तास लागतात जे पुर्वी कमीत कमी ५-६ तास होते. जाण्यायेण्याचा वाचणारा वेळ हा एकवेळच्या एका दिशेच्या प्रवासा इतका आहे. अर्थात याचे श्रेय नक्कीच वाजपेयींना आहे. पण विषयांतर टाळण्यासाठी तो मुद्दा विस्तारा विना इथेच थांबवतो आहे.

असाच आणखी एक प्रश्न : गावाच्या कमीचा खर्च गावकरी गावातील एका रस्त्यावर सुद्धा करु शकतात. पण तसे होते का?






बां-वा-ह

आजही बां-वा-ह हीच रस्तेबांधणीची दिशा आहे. याकडून पुन्हा जुन्याच पद्धतीने रस्तेबांधणी कडे वळण्याचा निर्णय होण आजही बाकी आहे. या साठी करावी लागणारी गुंतवणूक सरकारी तिजोरीतून करणे म्हणजे पुन्हा करदात्यांचा पैसा वापरणे आहे. सरसकट करदात्यांच्या पैशाऐवजी रस्त्याचा वापर करणार्‍यांकडून टोल घेणे जास्त रास्त वाटते.

बिगर-सरकारी कंपन्यांनी बाधलेल्या रस्त्यांची देखरेख जवळपास शुन्य आहे.

कोणती सरकारी कंपनी रस्ते बांधते? (राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण बनवत नाही, सुमारे ९८% वाहतूक यांच्याच अखत्यारित येत असलेल्या रस्त्यांवरून होते.). 'सरकार' रस्तेबांधणे करीत नसल्याने या-न-त्या मार्गाने कंत्राटदारच रस्तेबांधणी करत आले आहेत. बां-वा-ह मुळे किरकोळ कंत्राटदार या स्पर्धेतून बाहेर पडून मोठेच कंत्राटदार पात्र ठरतात. शिवाय पूर्वीदेखील देखरेखीची कंत्राटेच दिली जात असे वाटते.

टोल मात्र नेमाने घेतले जातात.

काही कारणांनी रस्ता वापरायोग्य नसल्यास कंत्राटदाराला त्याच प्रमाणात दंड भरावा लागतो असे वाटते.

अजून एक प्रश्न म्हणजे जबरदस्तीचा.

कुठल्याही परिस्थितीत पैसा करदात्याचा किंवा वापर करणार्‍याचाच असणार आहे. खाजगी रस्ते नसल्याने ही एक प्रकारे जबरदस्ती आहे हे मान्य.

विविध कारणांसाठी एकापेक्षा अधिक टोल आहेत.

ठोबळमानाने राजमार्गांवर (पुलांचा अपवाद वगळता) ७५ किमी नंतर टोलनाके असतात . कुठे* टोलनाका असावा, टोल किती असावा यावर सरकारी नियंत्रण असून ते दिल्या जाणार्‍या सुविधेच्या प्रमाणात ठरतात.

* नाका 'नक्की' कुठे असावा हे सरकार/सरकारी संस्था ठरवत नाही, त्याची 'अप्रत्यक्ष' अनुमती मात्र देते.

विशेषाधिकार

सवलतधारी ऐवजी विशेषाधिकार प्राप्त व्यक्ती व टोल ऐवजी शुल्क वाचावे.

:)

नॅनोमुळे अनेकांना देशहिताचे आणि देशाला भेडसावणार्‍या प्रश्नांचे विचार येत आहेत हे पाहून समाधान वाटते आहे. श्री. फोर्ड यांच्या पासून ते श्री. रतन टाटा यांच्या पर्यंत अनेकांनी जनमानसासाठी चारचाकी बनवण्याचे यशस्वी/अयशस्वी प्रयत्न केले आहेत. पण नॅनो इतके सामाजिक प्रश्नांची गांभिर्य कोणत्याच गाडीने निर्माण केले नाही. मला हे नॅनोचे यश वाटते.
मला सुद्धा काही प्रश्न पडतात.

  1. टाटा मोटर्स म्हणजेच पुर्वाश्रमीची टाटा मोटर्स अँड लोकोमोटिव्ह लिमिटेड या कंपनीने वाहतूक व्यवस्थेसाठी सर्व प्रकारची वाहने बनवली आहेत. पण आज बस बनवण्याचा धंदा कोणत्याच कंपनीचा फारसा फायदेशीर चालत नाहीये. का? सार्वजनीक वाहतूक व्यवस्था चांगली बनवण्याचे कर्तव्य कोणाचे? भारतात सर्व समावेशक सार्वजनीक वाहतूक व्यवस्था खरच शक्य आहे का? गाव तिथे एसटी हे ब्रीदवाक्य आजच्या घडीला खरे आहे का?
  2. एका वर्षात फक्त ५०००० नॅनो भारतासाठी बनणार आहेत जोवर गुजरातचा प्रकल्प सुरु होत नाही तोवर. याच वेळेला नॅनो व्यतिरिक्त इतर किती गाड्या एका वर्षात बनतील आणि विकल्या जातील? त्या आजवर सुद्धा बनत आल्या आहेत आणि विकल्या गेल्या आहेत. त्या बद्दल कोणीच काहीच काळजी का व्यक्त करत नाही?
  3. नॅनोची किंमत आता जाहिर झाली आहेच. त्याच किंमतीमध्ये सेकंड हँड चारचाक्या (नॅनो पेक्षा मोठ्या आणि जास्त प्रदुषण करणार्‍या) विकल्या जातात. मग ज्यांची एवढी किंमत देण्याची तयारी आहे ते नॅनोच घेतील का?

मला अमेरिकेसोबत तुलना आत्ता तरी पटत नाही. हि गाडी जेंव्हा म्हणजेच २०११ ला अमेरिकेत जाईल तेंव्हा ते प्रश्न चर्चिले जाणे योग्य वाटते.

ऋषिकेशने विचारलेले प्रश्न पत्रकारांनी रतन टाटांना विचारले होते आणि ते प्रातिनिधीक प्रश्नच आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे येथे मी देतो आहे.

  1. वाहतुकीचा प्रश्न: हा प्रश्न मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये बिकट होणे सहाजिक आहे. पण त्याच सोबत या मोठ्या शहरातल्या मोठ्या गाड्यांची जागा नॅनोने घेतल्यास अधिक जागा सहजच उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ठरवल्यास नॅनोमुळे जागा तयार होऊ शकते. निमशहरी भाग आणि ग्रामिण भाग, जिथे ही गाडे लोकांना घेणे आता शक्य आहे, आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुक नाहीये, तिथे नॅनो हे वरदान आहे. विचार करा, महाराष्ट्रातल्या अथवा भारतातल्या कोणत्याही ग्रामिण भागात जिथे लोकं दिवसातुन एका बसची वाट पाहतात, तिथे नॅनो गेली तर हे वरदान नाही का? कि मुंबई पुणे एवढाच भारत, भारताची लोकसंख्या आणि सार्वजनीक वाहतुकव्यवस्था हा प्रश्न आहे?
  2. प्रदुषण : परत तोच मुद्दा. जुन्या गाड्या बदला आणि नॅनो घ्या. प्रदुषण कमी करा. इंधन जास्त वापरा. पर्यायाने इंधनाची बचत आणि कमी प्रदुषण.

मला नॅनोचा फायदा दिसतो तो म्हणजे भविष्यात भारताला मिळणारे परकिय चलन आणि जागतिक पातळीवर, जगातले सर्वात चांगले आणि तरीही स्वस्त उत्पादन भारतीय बनवू शकतात हा जगभर पोहोचवलेला संदेश असे वाटते. बाकी येणारा काळ या सगळ्याची उत्तरे देईलच.






संदेश

जागतिक पातळीवर, जगातले सर्वात चांगले आणि तरीही स्वस्त उत्पादन भारतीय बनवू शकतात हा जगभर पोहोचवलेला संदेश

सहमत.

बाकी भारतात रुंद रस्ते बनण्याची प्रक्रिया सुरू झालीच आहे; तिला वेग आला तरी बरेच आहे.

:)

श्री. फोर्ड यांच्या पासून ते श्री. रतन टाटा यांच्या पर्यंत अनेकांनी... पण नॅनो इतके सामाजिक प्रश्नांची गांभिर्य कोणत्याच गाडीने निर्माण केले नाही. मला हे नॅनोचे यश वाटते.

असे नसावे. त्या प्रत्येक परिस्थितीत असेच प्रश्न उपस्थित झाले होते, असे वाटते. त्या सर्वांचेच यश म्हटल्यास म्हणावे.

आणि प्रत्येक वेळा एखादे तंत्रज्ञान अतिशय स्वस्त होऊ घातले, (आणि बाकी तंत्रज्ञाने त्याच्या सापेक्ष महाग वाटू लागली) तर समाजात उलथापालथ होते.

वाफेच्या बळावर चालणारी इंजिने जेम्स वॉटपूर्वीही होती, पण वॉटने ती त्या मानाने स्वस्त बनवली; शोभेची दारू आधीपासून होती पण मध्ये त्यापासून जड गोळे उडवायचे तंत्रज्ञान एका काळात त्या मानाने स्वस्त झाले (राजेराजवाड्यांना तरी), आणि खुद्द मॉडेल-टी फोर्ड - या सर्व तंत्रज्ञानाच्या किमती बदलल्याने समाजात खूप फरक पडला. फरक पडल्याचा इतिहास असल्यामुळे असे प्रश्न उपस्थित होणे रास्त आहे, असे मला वाटते.

प्रश्न

प्रश्न केवळ प्रदुषणाचा, इंधनाचा नाहिच. ते अनेक प्रश्नांपैकी एक आहेतच. नॅनो आल्याने त्यात काहि प्रमाणात वाढ होईल इतकेच. प्रश्न असा आहे की अश्या स्वस्तातील गाड्या आल्यावर सरकार सार्वजनिक वाहतुकीकडे / व्यवस्थेकडे दुर्लक्ष करू लागेल का? आणि असल्यास ते कितपत योग्य वाटते हा आहे.


महाराष्ट्रातल्या अथवा भारतातल्या कोणत्याही ग्रामिण भागात जिथे लोकं दिवसातुन एका बसची वाट पाहतात, तिथे नॅनो गेली तर हे वरदान नाही का?

हं यातून त्या लोकांचा वेळ वाचेल. मात्र गावातील दिनक्रमाचा वेग बघता खरोखर माणशी १ अथवा कुटुंबात १ अश्या गाड्या गावागावात असण्याची गरज आहे का? यात खरेच वरदान असण्यासारखे मला काहि वाटले नाहि. त्यापेक्षा दिवसात चार यस्ट्या पोचणे अधिक फायद्याचे वाटते.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

असे का?

हं यातून त्या लोकांचा वेळ वाचेल. मात्र गावातील दिनक्रमाचा वेग बघता खरोखर माणशी १ अथवा कुटुंबात १ अश्या गाड्या गावागावात असण्याची गरज आहे का? यात खरेच वरदान असण्यासारखे मला काहि वाटले नाहि. त्यापेक्षा दिवसात चार यस्ट्या पोचणे अधिक फायद्याचे वाटते.

असे का? किंबहुना असे ठरवणारे आपण कोण? आणि दिवसाला ४ यस्ट्या पोहोचवायला कोणी सामान्य माणसाने अथवा कोण्या उद्योगपती विरोध केलेले ऐकले/वाचले नाही. तसेच ज्या दुर्गम गावात (लोकसंख्या फार कमी) तिथे यस्ट्या पाठवणे आणि त्यासाठी नोकरदार ठेवणे यस्टीला सुद्धा परवडले नाहीच. वर तो यांनी कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल लिहिले आहे. कोल्हापूर सारखे शहर/गाव, जिथे दरडोई उत्पन्न हे दशातल्या सर्वात जास्त उत्पन्नांपैकी आहे, भरपूर जागा उपलब्ध आहे आणि नव्याने तयार होणार्‍या पायाभुत सुविधा आहेत, अशा लोकांना जर हव्या त्या किंमतीत चांगले उत्पादन मिळाले तर विरोध का करायचा?

जाता जाता एक प्रश्न : बेसुमार संगणकांमुळे जो इलेक्ट्रॉनिक कचरा होतो आहे, सेलफोनच्या बॅटर्‍यांमुळे जो कचरा निर्माण होतो आहे, त्यामुळे जे प्रश्न निर्माण होत आहेत, होणार आहेत त्याची माहिती - चर्चा करुयात का?

नॅनोच्या काही माहित्यांपैकी एक माहिती अशी आहे की एका घरात एकच नॅनो घेतली जाईल याची काळजी घेतली जाणार आहे.






इलेक्ट्रॉनिक कचरा - उत्तम चर्चाप्रस्ताव

हा उत्तम चर्चाप्रस्ताव आहे. यावर वेगळा धागा सुरू करून अधिक चर्चा व्हावी.
या प्रस्तावाला माझे समर्थन आहे.

+१

चर्चाविषय रोचक आहे. येऊ देत प्रस्ताव :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

म्हन्जे

नॅनोच्या काही माहित्यांपैकी एक माहिती अशी आहे की एका घरात एकच नॅनो घेतली जाईल याची काळजी घेतली जाणार आहे.

म्हन्जे टाटा अजून जुन्या म्हन्जे ब्रेझनेव्हच्या युगात आहेत का ?

त्या काळात हमालांनी २ रुपयापेक्शा जास्त मागू नये, असे इंदिराजी म्हनत होत्या. मनमोहनसिंगांनी नरसिंहरावाच्या कृपेने हमालीचा रेट अनलिमिटेड केला.

आमचा एक हमाल बंधू आजकाल दोन नॅनो घेऊन एक स्वतःसाठी आनि एक फ्यामिलीसाटी वापरू शकतो. त्याच्य अभिव्यकतीवर गदा आननारे हे कोन ?

काळजी घेतात म्हने. रजनीशकडे ४० मर्सिडीज होत्या त्यावेळी कचर्‍याची समश्या सुचली नाही. आमच्या हमाल बंधूंकडे एकापेक्षा अधिक नॅनो आल्यातर चालले रेशनिंग करायला.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

गेल्या आठवड्यात

मूळच्या युक्रेनमधील मुलीशी बोलण्याचा प्रसंग आला.

ती सांगत होती, की युरोपमध्ये ती जेव्हा फिरली तेव्हा तेथली सार्वजनिक वाहतूकव्यवस्था इतकी चांगली होती, आणि स्टेशने चकचकीत, अगदी संगमरवर बसवलेली अशीही असतात आणि अत्यंत सुंदर. स्वच्छ ठेवतात. त्यामुळे तेथे सार्वजनिक वाहनांमधून जाताना अस्वच्छ असे वाटत नाही आणि त्यामुळे जायला काही वाटत नाही. (ती हे अमेरिकेच्या तुलनेत म्हणत होती).

अमेरिकेतही आमच्या गावात सबवे आहे, पण तीही खूप स्वच्छ असतेच असे नाही.

जेव्हा सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते, तेव्हा समाजाला वेगळा संदेश जातो - "सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष केले तरी चालेल", असा काही. शिवाय ज्याला आपल्याकडे नवीन रस्ते किंवा रस्त्यांचे रूंदीकरण असे संबोधले जाते, त्यासंबंधी माझ्या मनात तीव्र भावना आहेत. माझ्या मते सामान्य माणसाला पूर्णपणे किंवा अतिशय अंधारात ठेवून आज आपल्याकडे प्रकल्प केले जात आहेत. नॅनो नक्कीच यावी, तिची गरज आहे, समाजाच्या एका वर्गाला नॅनो नक्कीच हवी आहे आणि इतरांकडे लक्ष देताना ह्या वर्गाकडे दुर्लक्ष करू नये हे मान्य आहे. पण ते करीत असताना सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी अतिशय वाईट ठेवून नक्की काय साधले जात आहे हे कळत नाही.

सहमत

चित्राताई,

जेव्हा सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते, तेव्हा समाजाला वेगळा संदेश जातो - "सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष केले तरी चालेल", असा काही.

अगदी पटले..
एकुणच प्रतिसाद आवडला.


ती हे अमेरिकेच्या तुलनेत म्हणत होती

बाकी युक्रेनियन लोक भारतात पर्यटन कमी करतात वाटते ;)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

समजले नाही

सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते म्हणजे नक्की काय? या सार्वजनिक सोयी कोणत्या? हे नवे रस्ते कोणते? हे समजले नाही.

नवे रस्ते

सार्वजनिक सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी होते

माझे वाक्य चुकले आहे - ते असे वाचावे: सार्वजनिक वाहतुकींच्या सोयींकडे दुर्लक्ष होऊन नवीन रस्त्यांची बांधणी किंवा रस्त्यांचे रूंदीकरण ..

माझा नवीन रस्त्यांवर सरळ सरळ आक्षेप नसेल, हे तुम्हाला बहुतेक पटावे. त्याच रस्त्यांवरून बस, एस्ट्या आदी वाहने जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना नुसताच विरोध करण्याचा प्रश्न येत नाही.

पण जेव्हा शहरांमध्ये वाहने अधिक झाली म्हणून रस्ते रूंद केले जातात, त्या नावाखाली आहे त्या शहरांचे काँक्रिटीकरण अधिक केले जाते, पादचारी मार्ग (फुटपाथ) उठवले जातात, सलग फुटपाथ एकही आढळत नाही, असतील त्यांची उंची ही बाकीच्या रस्त्याहून अधिक असते, हे नवीन घडत असताना शहरवासीयांना अंधारात ठेवले जाते, किंवा समाजातील एका विवक्षित घटकाचीच सोय लावल्याचे दिसते तेव्हा नक्की प्रश्न पडतो की हे सर्व काय चालले आहे. नवीन रस्त्यांबाबतीतही तेच. शहरांत नवीन रस्त्यांचे (विशेषतः महामार्गांचे) जाळे हवेच असते. पण ठाणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये जेव्हा ट्रेनने येणारे लोक बहुसंख्य आहेत तेव्हा त्यातील गाड्या आरामदायी करणे, स्टेशने सुधारणे इत्यादी कामांकडे पॉलिसी म्हणून अधिक लक्ष पुरवले जात नाही असे दिसते.

आक्षेप

हे नवीन घडत असताना शहरवासीयांना अंधारात ठेवले जाते.

या वाक्याला आक्षेप आहे. बहुतेकदा, सार्वजनीक वाहतुकीच्या अथवा अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी नियोजन होत असताना नागरिकांकडून हरकती मागवल्या जातात. असे किती नागरिक आहेत जे हरकती नोंदवतात? लता मंगेशकर एक आहेत. पण का ते ही जगजाहीर आहे.
शहरवासीय अंधारात असतात हे अमान्य आहे. कदाचित ते दुर्लक्ष करतात असे म्हणा हवे तर. नाहीतर जोवर स्वतःच्या घराची जागा जात नाही अथवा स्वत:वर येत नाही तोवर झोपलेलेच असतात. फारतर सरकारला ४ शिव्या हासडतात. ज्यासाठी त्यांनी मतदान सुद्धा केलेले नसते.






बरोबर

या वाक्याला आक्षेप आहे.
आक्षेप बर्‍याच अंशी योग्य आहे. पण ही हरकत घेण्याची प्रक्रिया किती लोकाभिमुख असते किंवा त्याचा वापर कसा होतो याची कल्पना कोणास असली तर त्यांनी इथे द्यावी.

शिवाय इथे माझ्या माहितीप्रमाणे नॅनोला विरोध केलेला नाही आणि नवीन शहरीकरणालाही सरधोपटपणे नाही. टाटांचे कौशल्य आणि व्यापारी दृष्टीची तर दादच द्यायला हवी. विरोध असल्यास तो बोटचेप्या किंवा तात्पुरत्या सोयी लावण्याच्या धोरणांनाच आहे. आणि अशी धोरणे लांबच्या पल्ल्यात योग्य न ठरणे याची जबाबदारी शेवटी कोण घेणार? का तीही नागरिकांवरच तेव्हा टाकली जाणार?

हरकती

पुण्यामध्ये मागील वर्षी नवीन नगर विकास आराखडा तयार केला होता..त्यावर जवळपास १५, ००० हरकती नोंदविल्या गेल्या होत्या. ही माहिती सकाळमधील बातम्यांवर आधारित आहे. त्या हरकती निकालात कशा काढल्या हे माहित नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

सार्वजनिक वहातूक व्यवस्था

सार्वजनिक वहातूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून 'नॅनो' आणि इतर गाड्या रस्त्यांवर याव्यात हे फक्त काही लोकांच्याच फायद्याचं असेल. ऋषिकेशशी या मुद्द्यावर सहमत. निम्न-उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी सायकल आज खूप महाग झाली आहे, आणि त्यावर मात्र सवलतींचा वर्षाव होत नाही, अशी चर्चा अधूनमधून त्याच गटातल्या लोकांकडून कानावर येतं.
साधारण याच विषयावर मटामधे ही बातमी वाचली.

अदिती

भरपूर जागा

वृत्तपत्रातील बातम्यांनुसार आता मारुती ८०० आणि ओम्नी व्हॅनचे उत्पादन बंद होत आहे. बंद होण्याचे कारण या गाड्या प्रदुषणाचे पुढचे निकष पुर्ण करु शकत नाहीत. मारुती ८०० आज पर्यंत (गेली २५ वर्षे) सामान्य लोकांची गाडी होती. गेल्या २५ वर्षात २७ लाख मारुती ८०० विकल्या गेल्या आहेत आणि ओम्नीचा आकडा सुद्धा काही लाखच असेल. अगदी आपण ३ लाख पकडू. म्हणजे पर्यावरणाला हानीकारक, नॅनोपेक्षा जास्त जागा व्यापणार्‍या अशा ३० लाख गाड्या भारतीय रस्त्यांवर आहेत. प्रदुषणाचे कारण देऊन या गाड्या निकालात काढल्या (आता पर्याय आहे म्हणून) तर किती जागा तयार होईल, किती प्रदुषण कमी होईल? आणि नव्या गाड्या घ्यायच्या झाल्या तर अर्थ व्यवस्थेला चालना मिळेल.






उत्तराने निर्माण होणारे प्रश्न

प्रदुषणाचे कारण देऊन या गाड्या निकालात काढल्या

असे झाले की या चर्चेमधे इथे धनंजय म्हणतात ते निर्माण होणारे प्रश्न आहेतच .. तेव्हा निकालात काढल्या म्हणजे जागा झाली असे म्हणता येईल का? त्या ३० लाख गाड्याची विल्हेवाट कशी लावली जाणार आहे तेहि तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रदुषणहि कमी होईल ते वायु प्रदुषण.. अश्यावेळी वायुप्रदुषण कमी केले हा दावा करताना भुप्रदुषण वाढले त्याकडे सरकार लक्ष देत नाहि .. म्हणजेच एक प्रश्न निस्तरताना दुसरा निर्माण होणार नाहि हे सरकार बघत नाहि..
मला मुळ चर्चेत हेच म्हणायचे होते की गाडी अवश्य यावी.. मात्र त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर परिणाम होणार नाहि याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

प्रश्न तर आहेतच...

प्रश्न तर आहेतच... आणि त्या चर्चेत उत्पादन करणार्‍या कंपन्यांनीच विल्हेवाटीची जबाबदारी घ्यायला हवी असा सुद्धा सुर आहेच. गंमत हिच आहे की या आणि अशाच प्रकारच्या लाखो गाड्यांचे उत्पादन होताना, नॅनो येताना जे प्रश्न पडले आहेत ते का नाहीत पडत? प्रदूषण करणार्‍या ३० लाख गाड्यांचे सुटे भाग कालांतराने मिळणे बंद होईलच. त्यावेळी काय? कदाचित मारुती सुझुकी त्यांची नवी स्वस्तातली गाडी काढताना याच गाड्या परत घेऊन हे प्रश्न निकाली काढेल? म्हणजे पर्यावरणाच मुद्दा निकाली आणि धंदा सुद्धा...

सगळी काळजी सरकारने करावी हा मुद्दा पटत नाही बॉ. मुळात सरकार तयार करणार्‍या जनसामान्यांच्या निष्काळजी दृष्टीकोनामुळे आज असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. पण या सगळ्यात बदल करावा असे फक्त मुठभर लोकांना वाटते. जिथल्या लोकशाहीत क्रांतिकारकांना दहशवादी म्हटले जाते, तिथे काय अपेक्षा करणार? प्रत्येकाला आपापले मतपेट्यांचे राजकारण करायचे आहे. काळजी त्या मतपेट्यांची असते.

अवांतरः दाभोळ प्रकल्पाच्या बातम्या ऐकतो त्यावेळी सुद्धा असाच प्रश्न येतो, कि हा प्रकल्प वीज निर्मिती करतो की प्रश्न निर्मिती? आता ऐन उन्हाळ्यात विमा नाही म्हणून विद्युत संच बंद आहेत. हा योगायोग म्हणावा की निवडणुकीचा परिणाम? दाभोळ = राजकारण हे तर उघड आहे.






वरदान?

विचार करा, महाराष्ट्रातल्या अथवा भारतातल्या कोणत्याही ग्रामिण भागात जिथे लोकं दिवसातुन एका बसची वाट पाहतात, तिथे नॅनो गेली तर हे वरदान नाही का?

ब्रेड मिळत नाही तर हे लोक केक का खात नाहीत? या फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी इतिहासात कुठेतरी वाचल्याचे आठवते. नॅनोचा ग्राहक वर्ग कुठला आहे? तिची कार्यक्षमता कुठल्या भुभागावर टिकणार आहे? खेड्यातील रस्ते कसे? नॅनोची प्रकृती काय?
प्रकाश घाटपांडे

केक

लोकांकडे कर्ज काढून गाड्या घ्यायला पैसे एकवेळ असतात हो पण पेट्रोल कर्ज काढून कुठे मिळतं? पेट्रोल, गाडीचं सर्विसिंग, मेटेन्सन्स याचा खर्च नॅनो झाली म्हणून कमी होणार का? आणि समजा झाला तरी इतका सगळा खर्च सार्वजनिक वाहतूक सोयीपेक्षा कमी असणार का?

केक रोज खाता आला तरी पचायला नको का?

-राजीव.

:)

केक रोज खाता आला तरी पचायला नको का?

हाच तरा खरा मुद्दा आहे. गाडी लाखाला आहे म्हणून घेतली असे किती जण करतील? लाखात गाडी उपलब्ध आहे हीच सोय. बाकी नखरे हे नेहमी प्रमाणेच असणार आहेत. ते ज्याला परवडणार तोच गाडी घ्यायचा विचार करणार. उगाच आहेत लाख म्हणून घ्या नॅनो असे थोडेच होणार आहे? बाजारात एक स्वस्त आणि चांगला पर्याय उपलब्ध झाला हे सत्य आहे. याचा अर्थ प्रत्येकजण गरजा सोडून गाडी घेईल असे नाही.
सार्वजनीक वाहतुकीच्या आनंदी आनंदाने दुचाकी हा परवडणारा, कमी जागा व्यापणारा पर्याय ही गरज बनली आहे. चारचाकी अजुन सुद्धा भारतात गरज नाहीये.






 
^ वर