फोर्थ डायमेन्शन ५
पंचविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद.
"पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून हातोडा का लपवून ठेवता?"
"त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे."
"पपा सांगा की ती गोष्ट मला"
"विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक प्रगत समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला. सर्व काही हातोडामय झाले.
मागणी तसा पुरवठा या तत्त्वाप्रमाणे काही चाणाक्ष उद्योजकं, लोकांची आवड ओळखून वेगवेगळया प्रकारचे हातोडे बाजारात आणू लागले. घडीचे हातोडे, क्षणात उघडणारे हातोडे, उघड-झाप हातोडे, लांब हातोडे, आखूड हातोडे, नक्षी काम केलेले हातोडे, बॅटरीवर चालणारे हातोडे, रबराचे हातोडे, प्लॅस्टिकचे हातोडे, सोन्याचे हातोडे, सोन्याची मूठ असलेले हातोडे, जोराने मार बसणारे हातोडे, मार न बसणारे हातोडे, पाळण्यातल्या बाळासाठी हातोडे, रांगणाऱ्या बाळासाठी हातोडे, मुलींसाठी हातोडे, बायकांसाठी हातोडे, म्हाताऱ्यांसाठी हातोडे, सुशिक्षितांसाठी हातोडे, अशिक्षितांसाठी हातोडे, तरुणांसाठी हातोडे, तरुणींसाठी कोमल हातोडे, असे विविध प्रकारचे, विविध प्रसंगासाठी, विविध वयोगटांसाठी, विविध मानसिकतेसाठी हातोडयांचे उत्पादन, वितरण व विक्री व्यवस्था रूढ झाली.
हातोडे बनवण्यासाठी लागणाऱ्या लोखंड, लाकूड, रबर, प्लॅस्टिक इत्यादी कच्च्यामालांचा पुरवठा करणाऱ्यात चढाओढ लागली. काही भूवैज्ञानिक व धातुशास्त्रज्ञ नवीन प्रकारच्या धातूसाठी संशोधन करू लागले. हातोडयांचे वर्गीकरण व प्रमाणीकरण करण्यात आले. इतर अनेक वैज्ञानिक हातोडा मारण्याच्या व मारून घेण्याच्या सिध्दांतावर मूलभूत संशोधन करू लागले. हातोडा कसा मारावा, कुठे मारावा, का मारावा, केव्हा मारावा याचे विश्लेषण करून एक सर्व मान्य आचारसंहिता बनवण्यात आली. अशा प्रकारच्या शोधनिबंधांची मागणी वाढली. प्रयोगशाळेत मोठया प्रमाणात संशोधक प्रयोग करू लागले. लोकांच्या ज्ञानात भर पडू लागली. या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून हा विषय शाळेत शिकवू लागले. हातोडयासंबंधीचे टयूशन क्लासेस धंदा करू लागल्या. पाठयपुस्तकात याबद्दलची माहिती देण्यात आली. हातोडा-मारच्या परिणामांची गणीतीय समीकरणात मांडणी करण्यात आली. सूक्ष्मात सूक्ष्म व महाकाय हातोडयांच्या इष्ट परिणामासंबंधी चर्चा, शिबिरं, कार्यशाळा, संमेलनं भरविण्यात येवू लागल्या. संपूर्ण शिक्षण व संशोधन पध्दती हातोडयास केंद्रबिंदू समजून विकसित करण्यात आल्या.
याच सुमारास हातोडयापासून रक्षण करून घेण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे हेल्मेट्स पण बाजारात येऊ लागले. संरक्षक कवचांची मोठया प्रमाणात विक्री होऊ लागली. हेल्मेट्सचा आकार, वजन, बनवण्याची प्रक्रिया त्याचे प्रमाणीकरण इत्यादीवर संशोधन होऊ लागले. हेल्मेट्सची विक्री जोरदार होवू लागली. काही जण हातोडा मार संबंधीचे क्रीडा आयोजन करू लागले. खुल्या मैदानात, बंदिस्त हॉलमध्ये मुलं-मुली , तरुण-तरुणी, सराव करू लागले. फुटबॉल-क्रिकेट स्पर्धेप्रमाणे एक तास, एक दिवस, पाच दिवसाचे हातोडा-मारचे सामने होऊ लागले. प्रेक्षकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळू लागला. हातोडा-मार यासंबंधी कथा, कादंबऱ्या, कविता, चारोळया, गझल, दीर्घ कविता, वैचारिक लेखन, वैज्ञानिक लेखन, शब्दकोश, ज्ञानकोश, संदर्भग्रंथ प्रसिध्द होऊ लागले. अशा साहित्याला प्रचंड मागणी होती. हातोडयाची चित्रकला, शिल्पकला विकसित झाली. वर्षातून दोन -चार वेळा हातोडयाचा सार्वजनिक उत्सव साजरा होऊ लागला. हातोडयांचे सवलतीच्या दरातील विक्री व प्रदर्शन भरविण्यात येऊ लागले. साहित्यिक व कलावंतांना पैसा मिळू लागला. त्याच पैशातून ते हातोडयांची खरेदी करू लागले. व ही संस्व्रृच्ती चांगलीच मूळ धरली.
हातोडा-मार संस्कृतीचे काही उपदुष्परिणाम पण जाणवू लागले. हातोडयाचा मार बसल्यामुळे काही जणांना दुखापत झाली. डोक्याला, डोळयाना मार बसू लागला. त्यांच्यावर उपचार करणारे स्पेशालिटी हॉस्पिटल्स निघाले. उपचार करणाऱ्या विशेषज्ञांची फौज उभारली. रुग्ण डोकेदुखी, पाठदुखी, डोळयांची आग आग होणे, आपस्मार, रक्तस्राव, मेंदूज्वर, ताण तणाव इत्यादींच्या तकरारीवर इलाज करून घेऊ लागले. काहींच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे, ते बरळू लागले. हातोडा-मार उपचारासाठी वेगवेगळया उपचार पध्दती रूढ झाल्या. काहींना पाला पाचोळा, काहींना ऊद भस्म, व इतर काहींना साबुदाण्याच्या गोळया घेतल्यामुळे बरे वाटू लागले. आपल्याकडेच जास्त रुग्ण यावेत यासाठी त्यांच्या आपापसात चढाओढ सुरु झाली. परंतु रुग्ण निमूटपणे उपचार घेत होते. पूर्ण बरे झाल्यानंतर हातात हातोडा घेवून मारत होते किंवा मारून घेत होते. हातोडयाच्याविरोधात बोलायची हिंमत कुणातही नव्हती. बहुतांश लोकांना हातोडा मार संस्कृतीमुळे भरपूर त्रास होत आहे हे जाणवत होते. परंतु मूठभर लोकांच्या हातोडा-मार संस्कृतीच्या उदात्तीकरणाच्या जाहिरातबाजीमुळे, खरोखरच यात काहीतरी तथ्य असावे म्हणून सहन करत होते. हातोडा-मार संस्कृतीतून भरपूर काही मिळणार आहे यासाठी आपण दिलेली ही छोटी किंमत म्हणून त्रास सहन करत होते. नेमके काय मिळणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. याविषयी विचार करणेच लोकांनी सोडून दिले. शेजारचा करतोय ना मग आपण पण करावे हीच वृत्ती जोपासली जात होती.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. समाजाच्या परिघाबाहेर असलेले काही सुज्ञ हताशपणे हे सर्व बघत होते. अधोगतीला चाललेल्या समाजाला सावध करावे या हेतूने हातोडा संस्कृती विरुद्ध ते आवाज उठवू लागले. परंतु गुंडागर्दी करून दडपशाही करून त्यांचा आवाज दडपला. त्यातील काही सुज्ञ चिवटपणाने ही हातोडा-संस्कृती समाजघातक व बेकायदेशीर आहे म्हणून आंदोलन करू लागले. समाजातील इतर त्यांना वेडे म्हणून हिणवू लागले. आमच्या मुलाबाळावर या वेडयांच्या वक्तव्याचा वाईट परिणाम होईल म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवावे किंवा तडीपार करावे ही मागणी जोर धरू लागली. व्यापारी व उत्पादक धंदा कमी होईल या भीतीने ते विरोध करु लागले. या मूठभर हातोडा-विरोधकाविरुध्द वैद्यकीय तज्ञ, संशोधक, वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ आरडा ओरडा करू लागले. हातोडा-मार अर्थव्यवस्थेला धक्का लावणाऱ्यांचा निषेध होऊ लागला. स्त्रियांना नोकऱ्या मिळणार नाहीत, राजकीय पुढऱ्यांना मतं मिळणार नाहीत, म्हणून हातोडा-मार विरोधकांची हकालपट्टी करावी त्यांना कडक शासन करावे, या मागणीला जोरदार पाठिंबा मिळू लागला. लोकमतापुढे मान झुकवून विरोधक गप्प झाले. तो क्षीण आवाज दडपला गेला. हातोडा-मार संस्कृती रक्षकांची सरशी झाली. आता तर हातोडा-मार संस्कृती शिवाय दुसरे कुठलेच विचार सुचेनासे झाले. जळी-स्थळी-पाषाणी फक्त हातोडा-मार. यामुळे हळू हळू हा समाज विनाशाकडे जावू लागला व एके दिवशी पूर्ण अस्तंगत झाला. उरलेल्या विरोधकांनी कुठे तरी लांब जावून एक नवा समाज निर्माण केला. व आपण त्या नव्या समाजाचे वंशज आहोत. हा समाज मात्र विचारपूर्वकपणे हातोडा मार संस्कृतीच्या अवशेषापासून दूर राहिला. या समाजात हातोडयाला अजिबात स्थान नव्हते. हातोडयावर बंदी घालण्यात आली. म्हणून मी तुला हातोडयांना हात लावू देत नाही."
मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या व्रेच्झी कल्पनांचा बळी झालेला होता हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोडयापासून चार हात दूर राहणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली.
सुज्ञास सांगणे न लगे!
Comments
गमतीदार रूपककथा
हे विशेष.
पण तेच वाक्य वेगळेही लिहिता येते, म्हणजे प्रत्येक मुद्द्याच्या उलट भडक मुद्दाही जोडता येतो :
त्यामुळे ही रूपककथा बहुधा कोणीही स्वतःच्या "सौम्य" मताला/वागण्याला लावणार नाही, आणि प्रतिस्पर्ध्याच्या "टोकाच्या" मताला/वागण्याला लावेल. :-(
"अतिरेक वाईट" हे आपल्याला सर्वांना कळते, पण वळत नाही.
आणखी थोडीशी अवांतर गंमत : इस्रायलमध्ये एका राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने तरुण मंडळी फोम-प्लास्टिकचे हलकेफुलके हतोडे एकमेकांच्या अंगावर मारतात. हा विनोदी सोहळा अधिकृत नाही, त्याचा कुठला रूपक-अर्थही कोणाला ठाऊक नाही, पण गमती-जमतीची रूढीच झाला आहे, असे माझ्या एका तेथील मित्राने मला सांगितले.
प्रशंसक
मी तर बुवा तुमच्या टिकातंत्राचा (रिव्ह्यू) प्रशंसक आहे.
तुमचे हे तंत्र किंवा थॉट प्रोसेस समजावून् घ्यायला आवडेल्.
कथा चांगली आहे
"अतिरेक वाईट" हे आपल्याला सर्वांना कळते, पण वळत नाही.
या प्रतिसादातले हे विशेष आवडले.
सहमत
सहमत आहे.
असे वाचतो
"अतिरेक / कमतरता वाईट" हे आपल्याला सर्वांना कळते, पण वळत नाही.
प्रकाश घाटपांडे
पंच
कथेतला पंच आवडला.
छान लेख
लेख आवडला.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
रुपक आवडले.
कथा आणि योजलेले रुपक आवडले.
सगळे जण हाफिसात एकमेकांना आल्या आल्या हातोडा मारून अभिवादन करत आहेत अश्या कल्पनेने हसु आले.
(हातोड्यांपासून दूर ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
ह्म्...
रुपक कथा छान आहे. हसून मुरकुंडी वळली.
हे बघा हातोडा संस्कृतीच्या उपासकांचे चित्र जालावर मिळाले.
-सौरभ.
==================
आँ
चित्र कुठे गेले बुवा?
==================
आधीपासूनच दिसत नव्हते
चित्र आधीही दिसत नव्हते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
इथे
इथे
धन्यवाद.
पण मला तर प्रतिसाद पाठवताना दिसत होते. पाठवल्यावरही दिसत होते. हातोडास्तानातल्या लोकांचा हात असावा:-) (चित्राचे संपादन वगैरे झाले की काय असे मला आधी वाटले ;-)
सावध सौरभ.
==================
मु.रा ची चूक
"अठ्ठाविसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे.
ऍवजी
विसाव्या शतकात घडलेली..... असे हवे.
-लेखकाने सुचविल्याप्रमाणे दुरुस्ती केली आहेः संपादक
हातोडा संस्कृतीच्या विकासाची कथा
फारच छान फुलवली आहे. ओबेलिक्सच्या मेनहरांची आठवण झाली.
दोन गोष्टींची नीट सुसंगती लागत नाही. त्यांची कांही पटण्याजोगी कारणे टाकली तर अजून छान वाटेल.
१. हातोड्यावर बंदी असलेल्या समाजात लपवण्यासाठी तरी हातोडा कुठून आला?
२. ही लाट अशी अचानक कशी उठली?
मस्त...
अतिशय सुंदर रूपक कल्पना आणि ती खूपच छान फुलवली आहे.
बिपिन कार्यकर्ते
गोष्ट आवडली.
या हातोड्यांच्या जगात ऑलिंपिक्समधे हातोडा-फेक सोडून कोणकोणते खेळ असतील का असा एक विचार आला.
गोष्ट आवडली आणि दिलेला संदेशही. आता धनंजय म्हणतात तसं कळतंय, वळेल कधी पाहू या.