श्री.भालचंद्र पेंढारकर
नटवर्य,गायक, नाट्यसंस्थासंचालक आदि अनेकविध भूमिकांमधून आयुष्यभर रंगदेवतेच्या सेवेत मग्न असलेले श्री.भालचंद्र पेंढारकर ऊर्फ अण्णा यांना गतवर्षीचा महाराष्ट्र राज्य जीवनगौरव पुरस्कार एका देखण्या सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला. नटश्रेष्ठ श्री.प्रभाकर पणशीकर यांच्या नांवाने हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दर वर्षी नाट्यक्षेत्रातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला दिला जातो. रविवार दि.१५ मार्चला माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. नटश्रेष्ठ श्री.प्रभाकर पणशीकर, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द गायक श्री.रामदास कामत, मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ.बाळ भालेराव आणि ज्येष्ठ संगीतकार व कवी श्री यशवंत देव या प्रसंगी उपस्थित होते. निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे सांस्कृतिक खात्याचे मंत्री श्री.हर्षवर्धन पाटील हे कार्यस्थळी येऊनसुध्दा रंगमंचावर येऊ शकले नाहीत. पडद्यामागेच अण्णांना मानाचा फेटा बांधून ते चालले गेले असे सांगण्यात आले.
दीपप्रज्वलनाचा औपचारिक भाग झाल्यानंतर अण्णांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे दर्शवणारी एक चित्रफीत पडद्यावर दाखवली गेली. भालचंद्र पेंढारकर म्हणजेच ललितकलादर्श असे समीकरण झालेले असल्यामुळे अर्थातच त्यात ललितकलादर्शच्या कार्याचा आढावा आला. ही संस्था संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे सुरू केली. संगीत सौभद्र, शारदा, शहाशिवाजी, हाच मुलाचा बाप, मानापमान, संन्याशाचा संसार इत्यादी नाटके त्या संस्थेने दिमाखात सादर करून त्या नाटकांनाही अमाप लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर कै.बापूराव पेंढारकर यांनी ललितकलादर्शची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुध्द, श्री, सोन्याचा कळस आदि नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली. पण त्यांच्या अकाली निधनानंतर ललितकलादर्श पोरके झाले. त्या सुमारास आलेल्या बोलपटांच्या लाटेमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती. संस्थेची आर्थिक परिस्थिती एवढी भक्कम राहिली नसल्यामुळे कांही काळ ती संस्थगित झाली होती. पण बापूरावांचे सुपुत्र श्री.भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकवीसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. सुरुवातीला त्यांनी बापूरावांची जुनी नाटकेच नव्या संचात सादर केली, पण त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करताकरता नवी नाटके रंगमंचावर आणली. एका बाजूला खर्च आंवाक्यात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि दुसर्या बाजूला उत्पन्न वाढवण्यासाठी प्रेक्षकांना आकर्षक वाटावेत असे नवनवे प्रयोग यांची तारेवरली कसरत सांभाळत त्यांनी ललितकलादर्शला ऊर्जितावस्थेत आणण्यात यश मिळवले. त्यांनी सादर केलेली दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर आदि नाटके गाजली. दुरितांचे तिमिर जावो नाटकातील त्यांनी गायिलेली "आई तुझी आठवण येते" आणि "तू जपून टाक पाऊल जरा " ही गाणी अजरामर झाली.
एका काळी अतीशय गाजलेल्या पण कालांतराने मरगळ आलेल्या संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय अण्णा पेंढारकर, अण्णा (विद्याधर) गोखले आणि संगीतकार वसंत देसाई या त्रयीला जाते. त्यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकांने अभूतपूर्व असा नांवलौकिक मिळवल्यानंतर मंदारमाला, सुवर्णतुला, जय जय गौरीशंकर, मदनाची मंजिरी आदी अनेक नवी संगीत नाटके पडद्यावर आली आणि त्यानंतर पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताने नटलेल्या मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला हे सर्वश्रुतच आहे. हे थोडे विषयांतर झाले.
श्री.भालचंद्र पेंढारकर हे नाटकाच्या सर्व अंगांकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत असत. नेपथ्य, ध्वनिसंयोजन, प्रकाशयोजना वगैरेंमध्ये नवनवे कल्पक प्रयोग करून त्यांनी नाट्यकृतींना आकर्षक बनवले. कडक शिस्त आणि वक्तशीरपणा यांसाठी ते नांवाजले गेले होते. समोर प्रेक्षकवर्ग जमलेला असो वा नसो, ठरलेल्या वेळेला तिसरी घंटा वाजून पडदा वर गेलाच पाहिजे असा त्यांचा दंडक असल्यामुळे ललितकलादर्शच्या नाटकांना प्रेक्षकसुध्दा वेळेच्या आधी हजर होत असत. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी एकदा भारतयात्रा काढली. त्यासाठी रेल्वेची एक बोगीच आरक्षित करून त्यात त्यांनी ललितकलादर्शचा तात्पुरता संसार थाटला होता आणि ती बोगी वेगवेगळ्या गाड्यांना जोडून त्यांनी भारतभ्रमण केले आणि महाराष्ट्राबाहेरील रसिक प्रेक्षकांना आपले नाट्याविष्कार दाखवून तृप्त केले. दिल्ली मुक्कामी खुद्द पंतप्रधान पंडित नेहरू त्यांचा नाट्यप्रयोग पहायला आले होते. पण त्यांना यायला अवकाश होता म्हणून त्यांच्यासाठीसुध्दा न थांबता अण्णांनी आपला प्रयोग वेळेवर सुरू केला असे आवर्जून सांगितले गेले.
अभिनेता, गायक, संगीत दिग्दर्शक, संस्थेचे चालक वगैरे भूमिकांमधून श्री.भालचंद्र पेंढारकर यांना सर्वांनी पाहिले आहे आणि त्यांची प्रशंसा केली आहे. याशिवाय त्यांचे एक वेगळे रूप या लघुचित्रात पहायला मिळाले. ते म्हणजे त्यांनी स्वखर्चाने सुमारे तीनशे जुन्या नाटकांचे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे.तसेच जुन्या नाटकांच्या छायाचित्रांचा प्रचंड संग्रह केला आहे. ध्वनिफितींच्या त्यांच्याकडे असलेल्या या संग्रहातून त्यांचे रूपांतर ते आता नव्या तंत्राने दाखवता येण्याजोग्या टेप व सीडी वगैरेमध्ये करीत आहेत. यासाठी त्यांना साहित्य संघ मंदिरात एक खोली दिली असून त्यात हे काम गेली अनेक वर्षे चालले आहे.
त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. नटश्रेष्ठ श्री.प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या नांवाने हा पुरस्कार कशाला देतात असा प्रश्न विचारून श्री.भालचंद्र पेंढारकर यांना हा दिल्यामुळे त्यात आपला गौरव झाल्याचे सांगून हा पुरस्कार देण्यासाठी आपण केलेल्या खटपटीबद्दल माहिती दिली. गेल्या वर्षीच आपण चार पांच वयोवृध्द नाट्यकर्मींना एकसाथ हा पुरस्कार देण्याची सूचना केली होती, पण आता त्यातले कांही लोक आपल्याला सोडून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच आजच्या काळात जीवनगौरव म्हणून फक्त एक लाख रुपये देण्यात काय अर्थ आहे असे विचारून एक कुस्ती मारल्यावर पहिलवानाला पंचवीस लाख रुपये मिळतात अशी पुस्ती जोडली. सरकारतर्फे अर्थातच कोणी प्रत्युत्तर दिले नाही, पण सरकार तरी कुठकुठल्या क्षेत्रातल्या किती लोकांना किती पुरस्कार प्रदान करू शकेल हा ही एक प्रश्न आहेच. श्री.रामदास कामत, डॉ.बाळ भालेराव आणि श्री यशवंत देव यांनी प्रसंगोचित छोट्या भाषणांतून अण्णांबद्दल गौरवोद्गार काढले. शासनातर्फे श्री.अंबेकर यांनी केलेल्या गौरवपूर्ण भाषणात श्री.पेंढारकर यांनी संकलित केलेल्या जुन्या नाटकांच्या अमूल्य ठेव्याचा उपयोग शासनातर्फे तो लोकांना दाखवण्यासाठी करू द्यावा अशी याचना केली. डॉ.भालेरावांनी साहित्य संघातर्फे ती तत्परतेने तत्वतः मान्य केली. श्री.भालचंद्र पेंढारकर हे गेली सहासष्ठ वर्षे अव्याहतपणे ललितकलादर्श ही संस्था चालवत आहेत आणि अजून ती कार्यरत आहे हे सांगितले गेले, पण आज या संस्थेची कोणकोणती नाटके रंगभूमीवर पहायला मिळतात याचा मात्र कोणीच उल्लेख केला नाही.
एके काळी गाण्यातल्या प्रत्येक अक्षरावर जोर देऊन ते म्हणणारे आणि जुन्या नाटकांतले पल्लेदार संवाद एका दमात बोलणारे श्री.भालचंद्र पेंढारकर या सत्काराला उत्तर देण्याइतपतसुध्दा सुदृढ राहिले नव्हते हे पाहून वाईट वाटले. त्यांनी लिहून आणलेले उत्तरादाखल भाषण श्री.दाजी पणशीकर यांनी वाचून दाखवले. त्यांच्या जीवनात ज्या ज्या लोकांचे सहाय्य आणि मार्गदर्शन त्यांना प्राप्त झाले त्या सर्वांचे आणि मायबाप प्रेक्षकांचे आभार त्यात त्यांनी व्यक्त केले. श्री.सुधीर गाडगीळ यांनी सभेचे सूत्रसंचालन केले आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव श्री.पेंढारकरांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले.
जीवनगौरव पुरस्काराचा समारंभ झाल्यानंतर स्व.विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या आणि श्री.यशवंत देव यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या संगीत बावनखणी या नाटकाचा नेटका प्रयोग झाला. अण्णांचे सुपुत्र ज्ञानेश पेंढारकर, स्नुषा नीलाक्षी, कन्या गिरिजा काटदरे, गायक अरविंद पिळगावकार, अभिनेत्री नयना आपटे, नृत्यांगना माया जाधव, विनोदमूर्ती चंदू डेग्वेकर आदी कलाकांरांनी यात भाग घेतला. यातील कांही कलाकारांनी दोन किंवा तीन भूमिका साकार केल्या हे एक या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. यातील गाणी प्रसंगोचित आणि त्यावेळी ऐकायला गोड वाटत असली तरी ती फारशी प्रसिध्द झाली नाहीत आणि फार काळ लक्षात राहिली नाहीत. श्री.मकरंद कुंडले यांनी ऑर्गनवर आणि श्री.धनंजय पुराणिक यांनी तबल्यावर सराईतपणे साथसंगत केली. वेगळ्या कालखंडातले आणि वेगळ्या अनोळखी पार्श्वभूमीवरले हे नाटक आजच्या युगातल्या प्रेक्षकांना अपील करण्यासारखे नाही, तरी अखेरपर्यंत हॉल भरलेला होता हे त्याच्या सुंदर सादरीकरणाचे यश मानावे लागेल.
Comments
सुरेख परिचय
समारंभाचा सुरेख परिचय. आज महाराष्ट्रात पुरस्कार उदंड झाले असले तरी गुणी कलाकाराचा उचित सत्कार मनाला आनंदित करतोच.
एक सुचना कराविशी वाटते की याच लेखात श्री. पेंढारकरांचा वैयक्तिक परिचयही आला असता तर मणिकांचन योग जमला असता. आपल्या पुढील लेखांत अवष्य विचार करावा.
शरद
भालचंद्र पेंढारकर - गुणी कलाकर
आतिशय सुन्दर लेख ! जीभ टाल्याला लाउन त्यान्ची नाट्यगीते सादर करण्याची कला जबरदस्त !
शब्द लीहीता येउ नयेत हे आमचे दुर्भाग्य
धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह
चांगला लेख
समारंभाचा वृत्तांत आवडला.
सहज शोधताना भालचंद्रपेंढारकर.कॉम हे मराठी संकेतस्थळ मिळाले. भालचंद्र पेंढारकरांबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.
आभार
लेख लिहिण्याच्या आधी मी अशाच एका संकेतस्थळाचा शोध घेत होतो पण मला हे स्थळ सापडले नव्हते. त्यामुळे मुख्यत्वे आठवणीच्या आधाराने लिहावा लागला.
सुरेख परिचय
समारंभाचा सुरेख परिचय. आज महाराष्ट्रात पुरस्कार उदंड झाले असले तरी गुणी कलाकाराचा उचित सत्कार मनाला आनंदित करतोच.
सहमत आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वृत्तांत आवडला
त्या निमित्ताने पेंढारकरांबद्दल थोडी माहितीसुद्धा समजली.
उत्तम वृत्तांत
कार्यक्रमाचा वृत्तांत छान लिहिला आहे.
भालचंद्र पेंढारकर हे नाव घेतले की 'आई तुझी आठवण येते' हे त्यांचे गाणे काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी म्हणलेले आठवते. सगळ्या अडचणींवर मात करत ६६ वर्षं एखादी नाट्यसंस्था चालवायची म्हणजे एक विक्रमच आहे.
अवांतर: हे असे जीवनगौरव प्रकारचे पुरस्कार बहुतेक वेळा, ती व्यक्ती अगदी प्रवाहाबाहेर फेकली गेली किंवा अगदी गलितगात्र झाली की मगच का दिले जातात?
बिपिन कार्यकर्ते
जालावरून मिळालेली माहिती
जन्म २५ नोव्हेंबर १९२१ हैद्राबाद (दक्षिण)- म्हणजेच आपले आंध्रप्रदेशातील
संगीतातील गुरू: रामकृष्णबुवा वझे
नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२, पहिली भूमिका सत्तेचे गुलाम या नाटकातील वैकुंठ
चित्रपटातील भूमिका १९५२, अमर भूपाळी
पेंढारकरांची प्रमुख नवीन संगीत नाटके
स्वामिनी : पु.भा. भावे
दुरितांचे तिमिर जावो : बाळ कोल्हटकर
पंडितराज जगन्नाथ : विद्याधर गोखले
जय जय गौरीशंकर : विद्याधर गोखले
वेगळ्या थाटाची नाटके
आनंदी गोपाळ, रक्त नको मज प्रेम हवे, झाला अनंत हनुमंत
पेंढारकरांना मिळालेले पुरस्कार
१९६८ नागरी सत्कार
१९७३ विष्णुदास भावे पुरस्कात
१९८३ बालगंधर्व सुवर्णपदक
१९९० केशवराव भोसले पुरस्कार
१९९६ जागतिक मराठी परिषद इस्राइल
१९९९ महेंद्र पुरस्कार
२००२ अल्फा जीवन गौरव पुरस्कार
२००४ संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पारितोषिक
२००५ तन्वीर पुरस्कार
२००६ चतुरंग जीवन गौरव
२००८ महाराष्ट्र राज्य (पणशीकर) जीवन गौरव पुरस्कार
चांगली माहिती
लेख आणि प्रतिसादांतून चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद!
असेच
असेच म्हणतो
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
सुरेख लेख..
सुरेख लेख..
आमचे अण्णा पेंढारकर म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरील एक खरोखरच ऋषितुल्य व्यक्तिमत्व.
अण्णा म्हणजे मराठी संगीत रंगभूमीचा एक चालताबोलता इतिहास. संगीत रंगभूमीवरील दुर्मिळ छायाचित्रे, ध्वनिफिती, ध्वनिचित्रफिती यांचा खजिना आहे अण्णांकडे.
मराठी संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या नाटकांना जो ऑर्गन साथीला असे तो आजही अण्णांच्या संग्रही व्यवस्थित जतन केलेला आहे!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
धन्यवाद
प्रतिसाद देणार्या सर्व उपक्रमींचा मी आभारी आहे. एका विशिष्ट जाहीर कार्यक्रमाचा वृत्तांत ही साधी एक वर्तमानपत्रातील बातमी झाली असे म्हणून तो लेख उपक्रमाच्या दर्जाला शोभून दिसणार नाही अशी शंका उपस्थित झाली होती. प्रतिसादांमधील उत्तेजनात्मक मजकुरावरून ती अनाठाई होती असे मी समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद.
दैनिक लोकसत्ता मधिल खालिल लेख वाचनीय
‘ललितकलादर्श’च्या कार्याचा पुरस्कारातून सन्मान -पेंढारकर
पुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी
सरपोतदार कुटुंबीयांच्या वतीने मला जो ‘नानासाहेब सरपोतदार’ जीवनगौरव पुरस्कार दिला जात आहे, तो वैयक्तिक माझा नसून, ललितकलादर्श संस्थेच्या शतक महोत्सवपूर्ततेसाठी ज्या कलाकारांनी सहकार्य केले त्यांचा आणि ललितकलादर्श संस्थेच्या कार्याचा सन्मान आहे, असे
मनोगत ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांनी आज व्यक्त केले.
सरपोतदार कुटुंबीयांच्या वतीने भारतीय चित्रपट सृष्टीचे आद्यशिल्पकार, नरहर दामोदर तथा ‘नानासाहेब सरपोतदार’ जीवन गौरव पुरस्कार भालचंद्र पेंढारकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच परेश मोकाशी यांच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटास चित्रपट निर्माते व वितरक विश्वास नरहर तथा नानासाहेब सरपोतदार सवरेत्कृष्ट चित्रपट निर्मिती हा पुरस्कार राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण, पंडित दाजीशास्त्री पणशीकर, अजय सरपोतदार आदी उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून बोलताना कुवळेकर म्हणाले की, पेंढारकर यांनी केवळ व्यवसाय करण्यासाठी नाटकाचे प्रयोग केले नाही. मला वेगळं सांगायचे आहे, कलात्मकता गाठायची आहे, या भावनेतून त्यांनी प्रयोग केले. त्यांनी तीनशेपेक्षा अधिक नाटकाच्या ध्वनिचित्रफितींचे संकलन करून ठेवले. त्यांनी जपून ठेवलेला हा ठेवा पुढील पिढीलाही पाहता यावा म्हणून आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजे. ध्वनिचित्रफितींच्या संकलनाच्या कामासाठी आपण सर्वानी आर्थिक निधी दिला पाहिजे.
कार्यक्रमात पेंढारकर यांचे मनोगत त्यांची कन्या गिरिजा काटदरे यांनी वाचून दाखवले.
धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह