अलंकार : समारोप
अलंकार : समारोप
शाळेत शिकलेल्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या, काव्याच्या भूषणांची आठवण करून देणे एवढाच या लेखमालेचा माफ़क उद्देश होता. मला स्वत:ला व्याकरणाची गोडी नाही. त्यामुळे व्याख्या दिल्या तरी त्यापेक्षा वाचकांनी,दिलेल्या उदाहरणांची, लज्जत लुटावी, मला मिळणारा आनंद त्यांनाही मिळावा ही मनोमन इच्छा. त्यामुळे सर्व अलंकार देत बसत नाही.
असेअलंकार आहेत तरी किती ? केशव मिश्रा १४ म्हणतात तर अप्पया दीक्षित १२४. मम्मटाने काव्यप्रकाशात ६७ दिले आहेत. मराठीत सगळे आढळत नाहीत. साधारणत: हा आकडा ४० पर्यंत जावा.उरलेल्यांची यादी देता येईल. उदाहरणे दिली नाहीत तर नुसत्या यादीचा काय उपयोग ? जाऊं द्या.
अलंकार शास्त्र आपण संस्कृतातून घेतले. म.म.काणे ८७२ ग्रंथांचा उल्लेख करतात ! काही महत्वाचे ग्रंथकार, भरतमुनी (नाट्यशास्त्र), भामह (काव्यालंकार), दण्डी (काव्यादर्श ), उद्भट (अलंकारसारसंग्रह), वामन(काव्यालंकारसूत्र), रुद्रट(काव्यालंकार), आनंदवर्धन(ध्वन्यालोक), मम्मट(काव्यप्रकाश), रुय्यक(अलंकारसर्वस्व), विश्वनाथ(साहित्यदर्पण) आणि जगन्नाथ पंडित(रसगंगाधर).
ऋणनिर्देश.
कै. म.वा. धोंड यांच्या काव्याची भूषणे(प्रथमावृत्ती १९४८) या पुस्तकाचा उपयोग करून सर्व लेख लिहले. म.वा.धोंड यांच्या रसिकतेबद्दल काय लिहावे ? कॉलेजमध्ये असतांना पहिले पुस्तक खरेदी केले ते त्यांचे " मराठी लावणी ". मराठी वाङ्मय रसिकतेने वाचावे हे धडे त्यांच्याकडून घेतले.सर्वश्री. वाचन्कवी व धनंजय याचेही मार्गदर्शन होतेच. य.ना.वाला सरांनी बरेच दिवसांनी पेपर काढला हा त्यांचा मजवरील लोभ.सर्व प्रतिसाद देणाऱ्याचे मन:पूर्वक आभार.
शरद
Comments
प्रतिसाद
मला तुमची लेखमाला खूप आवडली आहे. जर तुमच्याकडे (सुमारे ४० पैकी ) आणखी काही अलंकार विश्लेषण करण्याजोगे , उदाहरणे देऊन लज्जत लुटण्याजोगे असतील , तर ते जरूर द्यावेत अशी विनंती करतो.
सहमत
सुरेख लेखमाला.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सुरेख लेखमालिका
सहमत आहे. लेखमालिका आवडली.
आणखी मराठी-हिंदी पुस्तके
कै. धोंड याच्या 'काव्याची भूषणे' या पुस्तकाखेरीज अन्य लेखकांची आणखीही काही चांगली पुस्तके आहेत. जिज्ञासूंनी मिळाल्यास जरूर बघावीत.
अलंकारचन्द्रिका( . . गोरे), अलंकारप्रदीप(यो. ग. नित्सुरे), काव्याची भूषणे(ग. त्र्यं. देशपांडे), काव्यविभ्रम(रा. श्री. जोग), अर्थालंकाराचे निरूपण (विद्याधर वामन भिडे) आणि हिंदीतले काव्यालंकारमालिका(पं. रेवाशंकर द्विवेदी).--वाचक्नवी
चवीसाठी नमुने देणारी लेखमाला
एखाद्या हलवायाच्या दुकानात जावे, आणि विचारावे पेढ्याची चव काय? काजूकतलीची चव काय? तेव्हा तो अर्धा पेढा, टिचकीभर काजूकतली चाखायला देतो. ही लेखमाला म्हणजे काव्य-आस्वादाची अशी "सँपल" सुरुवात आहे.
आता अधिक वाचन करावे, अधिक आस्वादावे, अशी चटक लेखमालेच्या कित्येक वाचकांना माझ्यासारखीच लागली असेल.
हलवायाने आम्हाला असेच दान देत राहावे. (असे तुळशीपत्रावर मी पाणी सोडतो.)
म. वा. धोंड यांचे मराठी लावणीचे पुस्तक मीसुद्धा हल्लीच खरेदी केले आहे, आणि वाचताना आनंद मिळतो आहे.
सहमत
आहे, सुरेख लेखमाला.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद.
असेच. लेखमाला आवडली. ह्या निमित्ताने काही पुस्तके पुन्हा चाळाविशी वाटत आहेत. धन्यवाद.