लेखन कसे असावे?

शरद यांनी लिहिलेला प्रतिसाद कशाप्रकारचे असावेत हा लेख वाचून काही विचार मनात आले. ते येथे मांडत आहे. खालील लेखन वाचताना लेखिका ही लेखन या विषयातील जाणकार किंवा तज्ज्ञ नाही याची कृपया नोंद घ्यावी.

उपक्रमासारख्या संकेतस्थळावर लिहिताना माहितीपूर्ण किंवा तांत्रिक विषयांवरील लेखन अधिकाधिक रोचक व्हावे या दृष्टीने किती लेखक प्रयत्नशील आहेत हा पहिला प्रश्न मला शरद यांचा लेख वाचून पडला. आपल्या लेखनाला लोकांचे प्रतिसाद यावेत ही प्रत्येक लेखकाची अपेक्षा असते. शरद यांच्या लेखातील १-५ मुद्दे उपक्रमासाठी उपयुक्त आहेत असे मला वाटले तरी दुसरा मुद्दा सुचवतो की लेख आवडला नाही किंवा पटला नाही तर ते लेखकाच्या लक्षात आणून द्यावे. येथे मला माझ्या अनुभवावरून आवर्जून सांगावेसे वाटते की प्रतिसादाच्या अपेक्षेतून लिहिणार्‍या लेखकाला ही टीका पसंत पडतेच असे नाही.

माझ्यामते लेखकाने वाचकांकडून अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःसमोर काही अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे आणि त्या अपेक्षा कोणत्या ते बघूया. अपेक्षा मांडण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की विरोधासाठी हा लेख लिहिलेला नाही. माझ्यासह इतर सर्वांनाच याचा फायदा व्हावा म्हणून (लेख नाही) ही चर्चा सुरू करत आहे. तांत्रिक लेखन हा माझा विषय नाही परंतु नोकरीच्या निमित्ताने अनेकदा तांत्रिक लेखनातील काही पाने भरावी लागतात. ही पाने भरत असताना औत्सुक्यापायी तांत्रिक लेखनातील काही मुद्दे ध्यानात आले ते येथे मांडत आहे. माझ्यापेक्षा अधिक माहिती एखाद्या तांत्रिक लेखनिकाला (टेक्निकल रायटर) असावी. अशा सर्वांनी चर्चेत भाग घेऊन हातभार लावावा.

चर्चेतील मुद्दे मांडण्यापूर्वी काही प्रश्न उपस्थित करते.

१. उपक्रमावरील लेख हे मनोगत किंवा मिसळपावावरील लेखांच्या धाटणीपेक्षा वेगळे असावेत हे तुम्ही कसे ठरवता?
२. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवता का? काही अटींची पूर्तता करता का?
३. लेखासाठी लागणारे संदर्भ शोधताना तुमचा बराच वेळ खर्च होतो का? तो खर्च होताना तुम्हाला समाधान वाटते की कधी एकदा लेख टाकतो आणि प्रतिसाद येतात ते पाहून समाधान वाटते?

आता तांत्रिक लेखन कसे असावे याबद्दल माझी वैयक्तिक मते:

१. लेखाचा हेतू: लेखाच्या सुरूवातीला लेखाचा उद्देश प्रस्तावनेतून, खुलाश्यातून किंवा लेखाच्या पहिल्या परिच्छेदातून स्पष्ट व्हावा. यालाच लेखाचा "स्कोप" ठरवणे असे म्हणतात.

२. लेखाचा प्रवाहः लेखकाने लेख लिहिण्यापूर्वी लेखाचे टप्पे आणि लेखाचा प्रवाह निश्चित करावेत. प्रत्येक टप्प्यावर लेखाला उप-शीर्षक देता आले तर लेख अधिक वाचनीय होतो असा माझा अनुभव आहे. यामुळे वाचक लेख टप्प्या टप्प्यानेही वाचू शकतात.

३. चित्रः एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हटले जाते. (ही केवळ म्हण आहे हे काही उपक्रमींनी लक्षात घ्यावे.) तेव्हा, हजार शब्दांचे पाल्हाळ कमी करून एखादे चित्र आपला लेख सुशोभीत, माहितीपूर्ण आणि सुलभ करेल काय हे पहावे.

४. सुवाच्य लेखन: लेख सुवाच्य आहे आणि लेखनातील काही नियम पाळतो का हे पहावे.

उदाहरणार्थः आपण लेखात कोणत्या प्रकारची चिन्हे वापरतो. शरद यांच्या लेखात मला सातत्याने चौकोनी कंस दिसतात. लेखनात जे कंस उपलब्ध आहेत त्यांना एक विशिष्ट अर्थ आहे. मला स्वतःला अर्धगोलाकार कंसांऐवजी चौकोनी किंवा त्रिकोणी कंस पाहिले की लेखाविषयी प्रथमदर्शनी उत्सुकता वाटत नाही हे प्रामाणिकपणे सांगते. असेच-

१] आंबा
[२] चिकू
३> संत्रे

असे आकडे वापरण्याबद्दल. उपक्रमाचा संपादक एचटीएमएल आकडे उपलब्ध करून देतो ते असे -

  1. आंबा
  2. चिकू
  3. संत्रे

याखेरीज कोणत्याही चांगल्या संपादकाचे (जसे, मायक्रोसॉफ्ट वर्ड) क्रमांक घ्यावे. अर्धगोलाकार कंस आणि पूर्णविराम या खेरीज दुसरे चिन्ह सहसा आढळणार नाही. तर मग उपक्रमावरील लेखांतच असे का? हेच, बाकीच्या विरामचिन्हांबद्दल म्हणावे लागेल. ......., !!!, *** ही चिन्हे, परिच्छेदानंतर न सोडलेली मोकळी ओळ, गिचमीड, मोठमोठे परिच्छेद , भडक रंगसंगती हे सर्व वाचकांना लेख वाचण्यास निरुत्साही करत असावेत याचा विचार लेखकांनी करणे गरजेचे आहे. सुवाच्य लेखन कसे होते ते कोणत्याही वृत्तपत्रात पाहता येईल. उदाहरणार्थ, महाराष्ट्र टाईम्समधला आजचा हा लेख.

शुद्धलेखनाविषयीही येथेच बोलता येईल पण त्याविषयी नेहमीच इतके लिहिले जाते की तो मुद्दा आज उगाळत नाही.

५. सारांशः लेखाच्या शेवटी लेखाने आपल्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण केल्या का याची पडताळणी करावी. तसा मुद्दा लेखात मांडता येतो का ते पहावे.

६. संदर्भः लेखाच्या खाली शक्य असल्यास संदर्भ द्यावेत.

७. तपासणी: हा मुद्दा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. लेख लिहिल्यानंतर आणि प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही तो एखाद्याला दाखवला आहे का किंवा इतरांना तपासायला (रिव्ह्यू) लावला आहे का? त्या माणसांनी दिलेला प्रतिसाद (फीडबॅक) तुम्ही विचारात घेतला आहे का? दरवेळेस हे करणे शक्य नसते हे मला मान्य आहे पण असे करणे लेखकाला चांगला लेख तयार करण्यात मदत करते हे निश्चित आहे.

याखेरीज अधिक मुद्दे इतरांनी मांडावेत ही विनंती.

लेखक वरील मुद्द्यांची पूर्तता करत असेल तर आपल्या लेखांकडून त्याची स्वतःचीच अपेक्षा वाढेल असे मला वाटते आणि अशी अपेक्षा लेखक स्वतःकडून ठेवू लागला की लेखनाचा दर्जा उत्तम होतो असा माझा अनुभव आहे आणि लेखनाचा दर्जा उत्तम असेल तर प्रतिसादही अपेक्षेप्रमाणे (शरद यांच्या लेखातील १-५ पैकी) येण्याची शक्यता वाढते.

लेखन कसे असावे यावर हे माझे वैयक्तिक विचार. यशाची गुरुकिल्ली मिळवणे तसे कठिण असावे पण ती किल्ली तुमच्याच खिशात आहे का हे तपासून पाहाणे हीच यशाची पहिली पायरी.

विशेष सूचना: वरील लेखन मी कोणालाही तपासायला दिलेले नाही म्हणूनच त्याला लेखाचा दर्जा न देता केवळ चर्चाविषय समजावे. तसेच, वर दिलेले सर्व मुद्दे दरवेळेस मला पाळणे जमतेच असे नाही परंतु पाळले जावेत याबद्दल मी प्रयत्नशील असते.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला चर्चा विषय

चर्चेचा विषय आवडला.

सर्वप्रथमः मी सुरवातीच्या काही चर्चांमधे अथवा इतरत्र लिहीले आहे की, जे काही ज्या संकेतस्थळाचे म्हणून नियम अथवा हेतू असतील त्यामधे बसणारे लेखन एकतर तेथे करा अथवा नवीन संकेतस्थळ काढा :-). अर्थात त्याच बरोबर संकेतस्थळचालकांना (केवळ उपक्रमच असे नव्हे तर इतर कुठलेही) सभासदांना आवडेल, आकर्षित करता येईल अशा पद्धतीचे बदल मूळ धेय/उद्दीष्ट न बदलता कसे करता येतील याचा विचार करायला हवा असे नक्की वाटते. हे मोठमोठ्या संस्थापण करतात तर आपण केले म्हणून काही बिघडत नाही असे वाटते, अर्थात "डायल्यूशन" न करता.

आता चर्चेतील प्रश्नांची उत्तरे:

१. उपक्रमावरील लेख हे मनोगत किंवा मिसळपावावरील लेखांच्या धाटणीपेक्षा वेगळे असावेत हे तुम्ही कसे ठरवता?

मी मनोगतावर लिहीत नाही पण मिपावर लिहीतो. मला वाटते जसे माझे दोन्हीकडे सभासद नाव तेच आहे, तसेच लेखनाचे प्रकार पण फार बदलत नाही. कधी कधी विरंगुळा या सदरात मोडतील असे तेथे लेखन होते पण जेंव्हा लेख अथवा चर्चा टाकतो तेंव्हा त्यात बदल करत नाही. असे किमान मला वाटते. ;)


२. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवता का? काही अटींची पूर्तता करता का?

लेख लिहीताना (चर्चा हे वेगळे प्रकरण आहे) - मुख्य निकष हा असतो की, "आपणास जे जे ठावे, ते ते दुसर्‍यासी सांगावे." ते करत असताना त्यात मुख्य ध्येयधोरणांशी जमते का ते पहातो. त्यात नवीन काही माहीती देता येते का ते पहातो. बाकी मला शुद्धलेखन आवडते पण मी त्यात काही "पापड" नाही, त्यामुळे चुका घडतात. लक्षात आल्यातर बदलतो नाहीतर दुर्लक्ष करतो. पण शक्य तितक्या कमी करायचा प्रयत्न करतो.


३. लेखासाठी लागणारे संदर्भ शोधताना तुमचा बराच वेळ खर्च होतो का? तो खर्च होताना तुम्हाला समाधान वाटते की कधी एकदा लेख टाकतो आणि प्रतिसाद येतात ते पाहून समाधान वाटते?

उपक्रमावरील (अथवा मिपावर) लेखासाठी मला संदर्भ शोधण्यास वेळ जात नाही. कारण त्यात मला काय लिहायचे हे माझ्या डोक्यात असते परीणामी संदर्भपण माहीती असतात. मात्र कधी कधी असे होते की एखाद्या विषयावर लिहावेसे वाटते पण त्याचे मराठीकरण करायला अथवा मनाप्रमाणे "इंटरेस्टींग" करायला वेळ देता येत नाही आणि मग वाचनमात्र रहावे लागते. पण तो (वाचनमात्र रहाणे हा) स्वभाव नसल्याने मग सगळेच अडते. :)

लेख टाकल्यावर का प्रतिसाद मिळाल्यावर समाधान? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना मला एकदम राजेश खन्ना/झिनतच्या गाण्यातील, "प्यार के लिये मगर पैसा चाहीये..." ही ओळ आठवली! लेख टाकल्याचे समाधान तर नक्की होते पण प्रतिसाद मिळाल्यावर पण समाधानच होते, अगदी टिका करणारे प्रतिसाद आले तरी. अर्थात ती टिका पण अभ्यासू अथवा मैत्रीपूर्ण असली तर त्यात जर खवीसपणा असला तर "अँटीखवीस" व्हावे लागते. पण ती या माध्यमाची मर्यादा आहे. हल्ली मी पण कधी कधी "+१" प्रतिसाद देत असलो, तरी मला माझ्यासकट सर्वांनी तसे प्रतिसाद देणे शक्यतोवर टाळावे असे वाटते.

बाकी तांत्रिक लेखनासंदर्भात म्हणलेले मुद्दे पटले. सारांश सांगणे हा चांगला मुद्दा लेखा संदर्भात होवू शकतो पण त्याला काही मर्यादा राहतील असेही वाटते. "...." देण्याची मला इथे लिहायला लागल्यापासून सवय झाली आहे, का ते माहीत नाही. पण बर्‍याचदा ह्यात अजून बरेच काही लिहीता येईल अथवा एखादा विषय जास्त चघळायचा नाही असे सांगावेसे वाटते तेंव्हा मी असे कुठेतरी वापरतो. त्याच बरोबर येथे लिहायला लागल्यापासून स्माइलीज् ची पण सवय झाली आहे...

तपासणी नक्की करावी, विशेष करून जर लेखन हे माहीतीपूर्ण लेख असेल तर.

मात्र मला सर्वात महत्वाचा मुद्दा "माहीतीपूर्ण लेखांच्या" संदर्भात वाटतो, तो वरील प्रश्न क्रमांक#२ शी संदर्भात आहे: बर्‍याचदा लेख हे संदर्भहीन असतात. त्यात कधी कधी खूप चांगली माहीती असते, म्हणून अथवा काहीतरी त्यातील न पटल्याने, पण जर का संदर्भ मागितले, तर लेखकाला ते "ऑफेन्सिव्ह" होते. तसे ते वास्तवीक होऊ नये असे वाटते. तसेच जर का आपण कुठलेही वाचून लिहीत असलो तर त्याचा संदर्भ सांगणे, शक्यतोवर दुवा देणे हे स्वतःवर बंधन घालून घेतले पाहीजे असे वाटते.

असो.

डिसक्लेमरः मोठ्ठा असला तरी हा लेख नसून प्रतिसाद आहे. म्हणून तो तपासणी न करताच देत आहे! ;)

सहमत आहे

मला वाटते जसे माझे दोन्हीकडे सभासद नाव तेच आहे, तसेच लेखनाचे प्रकार पण फार बदलत नाही. कधी कधी विरंगुळा या सदरात मोडतील असे तेथे लेखन होते पण जेंव्हा लेख अथवा चर्चा टाकतो तेंव्हा त्यात बदल करत नाही. असे किमान मला वाटते.

आता असं करा - कथा लिहायला घ्या, नाहीतर कविता/ विडंबने आहेतच. ;-) आणि मग मिपा आणि उपक्रमाच्या लेखनात कसा फरक वाटतो ते सांगा. ह. घ्या. मला वाटतं की तुम्ही ललित लेखन फारसे करत नसल्याने दोन्हीकडील लेखनात फरक जाणवत नसावा असे असावे का?

बर्‍याचदा लेख हे संदर्भहीन असतात. त्यात कधी कधी खूप चांगली माहीती असते, म्हणून अथवा काहीतरी त्यातील न पटल्याने, पण जर का संदर्भ मागितले, तर लेखकाला ते "ऑफेन्सिव्ह" होते. तसे ते वास्तवीक होऊ नये असे वाटते. तसेच जर का आपण कुठलेही वाचून लिहीत असलो तर त्याचा संदर्भ सांगणे, शक्यतोवर दुवा देणे हे स्वतःवर बंधन घालून घेतले पाहीजे असे वाटते.

सहमत आहे. कधीतरी लेखकालाही संदर्भ देणे शक्य नसते, तेव्हा वाचकांनीही इच्छा असल्यास अधिक माहिती गोळा करून शंकेचा उहापोह करणे योग्य वाटते.

चांगला उहापोह

मुळ लेख व विकास यांचा प्रतिसाद दोन्ही आवडले.

चांगली चर्चा

१. उपक्रमावरील लेख हे मनोगत किंवा मिसळपावावरील लेखांच्या धाटणीपेक्षा वेगळे असावेत हे तुम्ही कसे ठरवता?

वाचकगण वेगवेगळा आहे हे लक्षात ठेवून, आणि संकेतस्थळाची उद्दिष्ट्ये काय आहेत ते लक्षात ठेवून मी लिहितो. अन्यत्र मी कविता, लघुकथा, आणि स्फोटक चर्चाप्रस्ताव (भरकटत जाण्यातच त्यांचा हेतू असतो) लिहिलेले आहेत. उपक्रमावर माझे लेखन अनेक प्रकारचे आहे. (अ) ऊहापोहात्मक लेख - हे दीर्घ चर्चाप्रस्ताव आहेत, आणि २-३ लोकांशीच सांगोपांग चर्चा प्रतिसादांत झालेले आहेत; (आ) माहिती देणारे लेख; (इ) एक [माझ्या मते सर्वात वैयक्तिक महत्त्वाचा] मूळ विचार [ओरिजिनल] लेख; (ई) तात्विक चर्चांची भाषांतरे; (उ) छायाचित्रे, वगैरे

२. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवता का? काही अटींची पूर्तता करता का?

होय. वरीलपैकी कुठल्या प्रकारचा लेख/चर्चाप्रस्ताव आहे, त्याची सुरुवातीला कल्पना असते.

३. लेखासाठी लागणारे संदर्भ शोधताना तुमचा बराच वेळ खर्च होतो का? तो खर्च होताना तुम्हाला समाधान वाटते की कधी एकदा लेख टाकतो आणि प्रतिसाद येतात ते पाहून समाधान वाटते?

दोन्ही.

तांत्रिक लेखांबद्दलचे तुमचे विवेचन आवडले. जे व्यावसायिक निबंधलेखन करतो, त्यात प्रत्येक नियतकालिक त्यांचे आकृतिबंध देते. म्हणजे सुरुवातीचे संक्षिप्तकथन (ऍब्स्ट्रॅक्ट) लिहिताना काय मुद्दे आले पाहिजेत, प्रस्तावन-सामग्री-विश्लेषण-टिप्पणी (किंवा असेच काही) लेखाचे स्वरूप असावे... हे सगळे ठरवून सूचना संपादक आधीच देतो.

त्या मानाने उपक्रमावरील माझे लेखन धाटणीच्या दृष्टीने बरेच स्वतंत्र/स्वैर असते.

सहमत

वाचकगण वेगवेगळा आहे हे लक्षात ठेवून, आणि संकेतस्थळाची उद्दिष्ट्ये काय आहेत ते लक्षात ठेवून मी लिहितो.

वाचकगण वेगवेगळे आहे हे लक्षात ठेवून, आणि संकेतस्थळाची वैद्दिशिष्ट्ये काय आहेत ते लक्षात ठेवून मी लिहितो.त्याच बरोबर आपल्या व्यक्तिमत्वात दडलेले वेगवेगळेपण लक्षात ठेउन त्याच्याशी सुसंगत वेगवेगळे संकेत स्थळांवर लिहितो.

प्रकाश घाटपांडे

सुरेख लेख..

प्रियालीजी,

आपला लेख अतिशय सुरेख आणि मुद्देसूद वाटला. या प्रतिसादाद्वारे सदर लेखात मांडल्या गेलेल्या प्रत्येक मुद्द्याशी मी सहमती व्यक्त करतो..

हा लेख वाचून आपल्याबद्दल असलेला आदर दुणावला आहे!

आपला,
(फ्यॅन) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उपयोगी मार्गदर्शन

लेखन कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन. मराठी लेखनात अर्धगोल आणि चौकोनी कंसांच्या अर्थात फ़रक असतो हे माहितच नव्हते. छान
माहिती मिळाली. आता या पुढे जास्त विचारपूर्वक लेखन करण्याचा प्रयत्न करेन. जर एकाही वाचकाला कंसांमुळे वाचन करावेसे वाटत
नसेल तर मा. संपादकांनी या बद्दल नवीन लेखकांना सुरवातीसच जाणीव करून द्यावी. वाचन ( शक्य तेवढे )सुवाच्य करण्याचे प्रयत्न करीन असे आश्वासन देणारा,
शरद

शरद यांस,

सर्वप्रथम आपल्या लेखनाचा नकारात्मक उदाहरण म्हणून वापर केल्याबद्दल माफी मागते.

जर एकाही वाचकाला कंसांमुळे वाचन करावेसे वाटत नसेल तर मा. संपादकांनी या बद्दल नवीन लेखकांना सुरवातीसच जाणीव करून द्यावी.

मला वाटते की अनेक सदस्यांना त्यात काही वेगळे जाणवलेही नसावे. ही चर्चा सुरू करण्याचे मनात आले म्हणून तुमचा लेख समोर असल्याने उदाहरण म्हणून वापरला इतकेच. आपण चर्चा मोठेपणाने आणि खेळीमेळीने घेतल्याबद्दल आभारी आहे.

मी जेव्हा लेखन करतो ........

चर्चेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे -

१. उपक्रमावरील लेख हे मनोगत किंवा मिसळपावावरील लेखांच्या धाटणीपेक्षा वेगळे असावेत हे तुम्ही कसे ठरवता?
मी आजकाल फक्त उपक्रमवरच लिहितो. पूर्वी मनोगतवर लिहीत असे. पण उपक्रमवर लिहिण्यासाठी धाटणीत बदल करावा असे वाटले नाही.

२. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवता का? काही अटींची पूर्तता करता का?
वाचनीयता, नावीन्य, महितीची उपयुक्तता, विचारांना खाद्य पुरवण्याची क्षमता, या गोष्टी डोळ्यासमोर ठेवतो. वाचकांना काय शंका येऊ शकतात याचाही विचार करतो. शब्दसंख्या साडेतीनशेहून ज्यास्त होऊ नये याची काळजी घेतो. (मात्र सृजनशीलतेवरील लेखांत ही मर्यादा पाळणे शक्य झाले नाही कारण वैचारिक सलगता कायम ठेवणे महत्वाचे वाटले). शक्यतो संदर्भ देतोच. ऐकीव माहिती असेल तर तसे लिहितो. याबाबतीत मी स्वतःशी प्रामाणिक राहतो.

३. लेखासाठी लागणारे संदर्भ शोधताना तुमचा बराच वेळ खर्च होतो का? तो खर्च होताना तुम्हाला समाधान वाटते की कधी एकदा लेख टाकतो आणि प्रतिसाद येतात ते पाहून समाधान वाटते?
संदर्भ शोधायला कधीकधी बराच वेळ लागतो. मित्रांशी संपर्क साधावा लागतो. लेखांत बदल करावे लागतात. बहुतेक वेळा अगोदर मसुदा तयार करतो. थेट उपक्रमवर टाइप करायला घेत नाही. (अगदी प्रतिसाद सुद्धा). लेख माझ्या दृष्टीने लेख चांगला उतरला की बरे वाटते. लेखाच्या बिनचूकपणाविषयी खात्री झाल्याशिवाय मी तो सुपूर्त करीत नाही. प्रतिसादांबद्दल उत्सुक असतो पण मला वाचनसंख्या महत्वाची वाटते.

उत्तम

चांगला चर्चाविषय. सध्या मी फक्त उपक्रमावर (आणि माझ्या ब्लॉगवर) लिहीतो. आणि इथेही मी १००% तांत्रिक(!) असे लेख फारच कमी लिहीले आहेत त्यामुळे चर्चेमधील सर्व निकष त्याच क्रमाने पाळतोच असे नाही. व्यावसायिक क्षेत्रात जेव्हा निबंध लिहीतो तेव्हा (धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे) जसे नियतकालिक असेल तसे त्यांचे नियम अत्यंत काटेकोरपणे (फॉंटपासून ते रचना, इष्टाइल इ.) पाळावे लागतात. त्या मानाने उपक्रमावर बरेच स्वातंत्र्य मिळते. लेख लिहीताना एक सामान्य आकृतीबंध डोक्यात असतो. प्रथम विषयाची ओळख, नंतर मसुदा आणि मग सारांश. संदर्भ असतील तर देतोच आणि कधीकधी हे शोधायला वेळही लागतो. याचा व्यत्यास म्हणजे जर एखाद्या विषयासाठी मला दिवसेंदिवस संदर्भ शोधावे लागत असतील तर याचा अर्थ मला त्या विषयात त्या क्षणी फारसे ज्ञान नाही आणि लेख लिहायची घाई करू नये असा घेतो.

थोडे मसविषयी. (खरे तर हा विषय एनसायक्लोपीडीयात घालण्याच्या तोडीचा आहे.) आणि इथे लिहायला कधीकधी नाखुषी का वाटते त्याविषयी. अर्थात त्यातले त्यात उपक्रमावर याचे प्रमाण फारच कमी आहे हे मान्य. कुठल्याही लेखनावर असहमती किंवा टीका करणारा प्रतिसाद दिला तर लेखकाला तो वैयक्तिक अपमान वाटतो. अर्थात याचे कारण असे आहे की बरेचदा वैयक्तिक अपमान करण्यासाठी विरोधी कंपूंमधून असे प्रतिसाद दिले जातात. हे दुष्टचक्र आहे. दुसरे म्हणजे घाटपांडे यांनी इतरत्र म्हटल्याप्रमाणे सादक कोण आहे ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी ब्लॉगविश्वातही आपापल्या मित्रमैत्रिणींच्या ब्लॉगनाच प्रतिसाद दिले जातात. हे एका पातळीवर ठीक आहे पण याचा अतिरेक झाला तर नको वाटते. शेवटी आपण इथे का येतो याचे प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असणार. मी तरी सादक कोण आहे याची पर्वा न करता विषय जसा आहे आणि जसा मला (जर) समजला त्याप्रमाणे प्रामाणिक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे मान्य पण त्याचे दुसरे टोक म्हणजे इथे लोकसभेप्रमाणे पार्ट्या तयार होत असतील तर मला व्यक्तिशः त्यात सीता(स्त्रियांचे समान हक्क :-) ) वाटत नाही.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

उपक्रमवर आतापर्यंत

उपक्रमवर आतापर्यंत झालेल्या लिखाणात तुम्हाला आवडलेले लेख कोणते?- की जे तुम्ही सांगितलेल्या नियमाचे पालन जवळपास करतात. त्याचा संदर्भ दिल्यास तसे लेख वाचुन तुमचे मुद्दे आणखी ठळकपणे समजतील् असे वाटते.

उदाहरणे

उपक्रमवर आतापर्यंत झालेल्या लिखाणात तुम्हाला आवडलेले लेख कोणते?- की जे तुम्ही सांगितलेल्या नियमाचे पालन जवळपास करतात.

असे अनेक आहेत. गेल्या काही दिवसांत आलेले -

धनंजय यांचा - किती वाढते आहे ही लोकसंख्या - कुठे गेल्या त्या महामार्‍या ?
वरदा यांचा - भूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती
आणि
चित्रा यांचा स्थापत्यकलेतील कमानींचा वापर (तरी, नाक खुपसून चित्रा यांनी लेखातील महत्त्वाचे टप्पे ठळक करून दाखवायला हवे होते असे लिहिते.)

अशा प्रकारचे लेख तयार करण्यासाठी लेखकाला १-२ किंवा अधिक महिन्यांचा कालावधी लागतो अशी माझी धारणा आहे. सदर लेखकांनी योग्य कालावधी लिहिल्यास अधिक माहिती मिळेल.

चर्चा

चांगला चर्चा विषय आहे आणि बरेच मुद्दे आले आहेत. उपक्रमावर अनेकदा चांगले लेखन/चर्चा काही उपद्रवी सदस्यांमुळे भरकटलेले अनुभवले आहे. चांगल्या लेखनाच्या मार्गदर्शना सोबतच उपद्रवी सदस्यांना आवर घालणारे नियम बनणे हे सुद्धा गरजेचे आहे. अनेकदा फक्त वाचक असणारे सदस्य उपद्रवी सदस्यांच्या भितीने लेखनच करत नाहीत. हे मार्गदर्शन उपयोगी आहेच. त्यासोबत प्रशासनाची करडी नजर सुद्धा गरजेची आहे. नाहीतर लेख/चर्चा कितीही चांगले असले तरीही प्रतिसादातील उपद्रव मुल्यांमुळे तो दर्जाहिन बनतो.
याच सोबत, काही विशिष्ठ प्रकारचे लेखन होताना त्यासाठी मार्गदर्शक तत्वे बनण्याची गरज आहे. उदाहरण द्यायचे झाले तर पुस्तक परिचय, छायाचित्राचा दुवा देताना काय करावे (ज्यांना तांत्रिक माहिती नाही त्यांना हे गरजेचे असते)? हे आहेतच. एक अशा लेखन प्रकारांचा चांगला साचा तयार झाल्यास लेखकांचा आणि वाचकांचा हुरुप नक्कीच वाढेल.


साचा

उपक्रमावर अनेकदा चांगले लेखन/चर्चा काही उपद्रवी सदस्यांमुळे भरकटलेले अनुभवले आहे.

हो ते दिसते आहेच.

काही विशिष्ठ प्रकारचे लेखन होताना त्यासाठी मार्गदर्शक तत्वे बनण्याची गरज आहे. उदाहरण द्यायचे झाले तर पुस्तक परिचय, छायाचित्राचा दुवा देताना काय करावे (ज्यांना तांत्रिक माहिती नाही त्यांना हे गरजेचे असते)? हे आहेतच.

हो असे मार्गदर्शन किंवा सहाय्य हवे तसेच एखादे विशिष्ट प्रकारचे लेखन कसे यायला हवे यावरही विचार करता येईल. छायाचित्र टीका या सदरावर मागे एकदा एका माजी सदस्याने बरीच नाराजी व्यक्त केली होती. त्यांची पद्धत मला पसंत नसली तरी त्यांच्या म्हणण्यात थोडे तथ्य होते असे वाटते. विशेषतः या प्रकारच्या लेखनात छायाचित्राचे स्थळ, छायाचित्र काढल्याची वेळ, कॅमेराची माहिती, विशेष टीप असे काही टप्पे टाकता येतील.

मनोगतावर पाककृती या सदरासाठी असे साचे निर्माण केले आहेत. त्यामुळे सर्व पाककृती साचेबद्ध दिसतात. उपक्रमावर असे करणे शक्य आहे का याबद्दल विशेष माहिती नाही परंतु उपक्रमावर जे अनेक समुदाय आहेत त्यांच्या निर्मात्यांना या विषयावर विचार करता येईल आणि साचेबद्ध लेखन करण्यास इतरांना उद्युक्त करता येईल असे वाटते.

कळावे.

असहमत

त्यांची पद्धत मला पसंत नसली तरी त्यांच्या म्हणण्यात थोडे तथ्य होते असे वाटते. विशेषतः या प्रकारच्या लेखनात छायाचित्राचे स्थळ, छायाचित्र काढल्याची वेळ, कॅमेराची माहिती, विशेष टीप असे काही टप्पे टाकता येतील.

माजी सदस्याशी आणि सदर प्रतिसादाशी असहमत आहे. प्रत्येक लेखाखाली कुठला कळफलक वापरला, लेख कधी लिहिला, लिहिताना टेबल-खुर्ची वापरली, की पलंगावर लोळत लिहिला, हे लिहून काहीही उपयोगाचे नाही.

--- उपक्रमी
(मराठी संकेतस्थळांवरील सर्व सदस्य तमाशाप्रेमी असतात. काही उघडपणे तमाशा बघतात/करतात, तर काही चोरून, एवढाच फरक!)

ही चर्चा व्हावी असे अनेकदा वाटायचे.

उपक्रमवर ही चर्चा सुरु झाली हे पाहून् आनंद झाला. ही चर्चा व्हावी असे अनेकदा वाटायचे.
मला वाटते की, लेखकाला स्वत:ला त्या/तीला कसा प्रतिसाद हवा आहे हे देखिल स्वच्छ शब्दात लिहिले तर प्रतिसादींला ती अपेक्षा कळेल व् शक्यतो तसा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे तुम्ही दिलेल्या सुचनांच्या शेवटी ते ही दिल्यास योग्य होईल का ते पहावे.

मी उपक्रमवर दिलेल्या एका लेखामधे अशी सुचना केली होती; ती अपेक्षा पुन्हा एकदा येथे देत् आहे-

  1. तटस्थ बाजू: जे विचार मांडले आहेत, त्यावर एका विलग व दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहून, विचार मांडावेत. ह्यामुळे इतरांनाही हा लेख वेगवेगळ्या बाजूंनी पाहता येईल व त्यामुळे संवादाची उंची वाढेल. मांडलेल्या विचारांच्याही पुढे जाऊन विचार मांडावेत व लेखात मांडलेले मुद्दे एका नव्या प्रकाशाखाली आणा की, त्यामुळे आपल्याला एक नवी माहीती मिळेल.
  2. तुलना: ह्या लेखात मांडलेले मुद्दे तुमच्या वाचनात इतरत्र आले असतील तर त्यांच्याशी ह्या लेखातील मुद्दे तुलना करुन पाहा. ह्या लेखातील विचारांची त्रुटी, वेगळेपणा, साधर्म्य, अशी तुलना करुन ते मांडावेत.
  3. अ/सहमती: तुम्ही कशाशी सहमत आहात, कशाशी नाही ते स्पष्टपणे लिहावे.
  4. प्रश्न: तुम्हाला अधिक माहीती हवी असल्यास प्रश्न विचारावेत
  5. लेखकाने कोणते मुद्दे विचारात घेतले नाहीत, जे मुद्दे मांडलेत त्यात सुस्पष्टपणाचा अभाव आहे का?, मुद्द्याच्या शेवटी स्पष्टपणे उकल होते का? मुद्दे काही सीमांमधेच अडकून पडले आहेत का? त्यांची सीमा [स्कोप] कशाप्रकारे वाढवता येईल?
  6. सर्वात शेवटी, हाच लेख/एखादा मुद्दा तुम्ही लिहीला असता तर कसा लिहीला असता?

अपेक्षा

१-४ मुद्दे रास्त आहेत. प्रश्न येतो तो मुद्दा ५ आणि ६ बाबत. तेथे अनेकांनी म्हटल्याप्रमाणे लेखकाला हे मुद्दे ऑफेन्सिव वाटतात. तसेच, प्रत्येकाला अनेकदा मनात असूनही लांबलचक प्रतिसाद देणे शक्य असते असे नाही. एखादा त्रोटक, थोडक्यातला प्रतिसाद गैरसमज वाढवून गेल्याचेही दिसते आणि यामुळेच अनेक वाचक गप्प राहणे पसंत करतात.

माझी उत्तरे

चर्चाविषय चांगला आहे. काही प्रश्नांची उत्तरे -

१. उपक्रमावरील लेख हे मनोगत किंवा मिसळपावावरील लेखांच्या धाटणीपेक्षा वेगळे असावेत हे तुम्ही कसे ठरवता?
मी हल्ली केवळ उपक्रम आणि मिपावर लिहीते. उपक्रमावरील माझे लेखन हे मिपावरील लेखनापेक्षा वेगळे म्हणण्यापेक्षा वेगळ्या विषयांवरचे आहे. मिपावर त्यामानाने अजून पर्यंत लेखन कमी कारण मी ललित वाचत असले तरी ललित लेखन लिहून माझे अनुभव मोकळेपणे सांगण्याची प्रगल्भता मला अजून आलेली नाही. त्यामुळे माझे लेखन एकसुरी वाटण्याची शक्यता आहे याची कल्पना आहे त्यामुळे लिहीले कमी जाते.

२. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवता का? काही अटींची पूर्तता करता का?
इथले लेखन हे कामासाठी नसल्याने ते कसे असावे याचे नियम हे मी स्वत:पुरते ठरवू शकते. लेख शक्य तितका वाचला/चर्चिला गेला पाहिजे असे वाटते. मी शक्यतो काही एका विषयाला धरून लिहीण्याचा प्रयत्न करते. त्यातही एका दुसर्‍या कल्पनेपेक्षा अधिक कल्पनांना हात घालायला जात नाही. माझे विषय हे माझ्या आवडीचे असतात, कधीकधी थोडे माझ्या नेहमीच्या परिघाबाहेरचे. पण मला माहिती असलेल्या काही विषयात तांत्रिकी माहिती जास्त देण्याचा मोह होतो, जसे मला कमानींच्या लेखासाठी होत होता, पण तो आवरते. कारण वाचकवर्ग कितीही अनुभवाने श्रेष्ठ असला तरी त्यांना माझ्या विषयात पूर्ण गम्य असेलच असे नाही. अर्थात काही ठिकाणी जेथे चित्रे, छायाचित्रे आवश्यक आहेत तेथे ती देते. इतर लेखकांच्या शैलीचा अभ्यास करून थोडी शैली बदलण्याचा प्रयत्नही करीत आहे.

३. लेखासाठी लागणारे संदर्भ शोधताना तुमचा बराच वेळ खर्च होतो का? तो खर्च होताना तुम्हाला समाधान वाटते की कधी एकदा लेख टाकतो आणि प्रतिसाद येतात ते पाहून समाधान वाटते?

हो, होतो आणि त्यामुळे दरवेळी समाधान वाटतेच असे नाही कारण संदर्भांसहित लेख लिहायला आवडत असले तरी प्रत्येक संदर्भ तपासून मग लेख लिहीण्याइतका शांत वेळ मला सहसा नसतो. मसूदा आधी तयार कधीच नसतो पण डोक्यात कल्पना तयार असते. त्यामुळे कधीकधी ८०% पूर्ण अवस्थेतला लेख टाकून मग सुधारणा घडवता येतील असे वाटते. जसे कमानींच्या लेखातील उणीव अशी आहे की तेथे कालनिश्चिती केली नाही. शिवाय वाचक्नवी यांनी म्हटल्याप्रमाणे कमानींचे अनेक प्रकार देता आले असते, पण त्या लेखाचा उद्देश हा कमानींच्या प्रकारांची माहिती देण्याचा नसून देशविदेशात वापरल्या गेलेल्या या स्ट्रक्चरल फॉर्मबद्दल अधिक रस तयार व्हावा यासाठी होता. तेथे कॉर्बेल्ड पद्धतीच्या कमानीची माहिती आली आहे, पण ती अशासाठी दिली होती की तो एक कमानी स्वस्तात तयार करण्याचा एक ओबडधोबड मार्ग होता हे लक्षात यावे.

काही मुद्दे

उपक्रमावरील लिखाण हे माहितीपूर्ण असावे असा संकेत असला तरी ते रुक्ष (सुतकी?) असलेच पाहिजे असे बंधन असेल असे वाटत नाही. टेक्निकल रायटरचा मुद्दा येथे लागू होत नाही. टेक्निकल रायटरला 'विषयाची चपखल शब्दांत मांडणी करणे' हे प्रामुख्याने सांभाळावे लागते. टेक्निकल स्वरुपाच्या लिखाणात रंजकता अपेक्षित नाही. उपक्रमाला बाकी रंजकतेचे वावडे आहे असे वाटत नाही. त्यामुळे उपक्रमावरील लिखाणात माहितीबरोबरच वाचनीयता आणि रंजकता हे दोन्ही घटक आवश्यक आहेत असे मला वाटते.
लेखन कसे असावे? तर कोणत्याही संभाषणकलेला आवश्यक असे सात 'सी' सांभाळून केलेले असावे. हे सात 'सी' असे:

1.Content
2.Context
3.Coherence
4.Conciseness
5.Completeness
6.Clarity
7.Courtesy

याशिवाय लेखन कसे असावे? तर आग्रही असले तरी दुराग्रही नसावे, शुद्धलेखनाचे सर्वसंमत नियम पाळून केलेले असावे, 'मीच कोण तो /ती शहाणा / शहाणी' या आविर्भावात केलेले नसावे, कोणतेही जुने हिशेब चुकते करण्याच्या उद्देशाने केलेले नसावे... असे बरेच लिहिता येईल. पण हे सगळे आदर्श लिखाणाचे ठोकताळे झाले. सर्वसामान्य लेखकांना हे सगळे जमेलच असे नाही.

सन्जोप राव

सहमत आहे

याशिवाय लेखन कसे असावे? तर आग्रही असले तरी दुराग्रही नसावे, शुद्धलेखनाचे सर्वसंमत नियम पाळून केलेले असावे, 'मीच कोण तो /ती शहाणा / शहाणी' या आविर्भावात केलेले नसावे, कोणतेही जुने हिशेब चुकते करण्याच्या उद्देशाने केलेले नसावे... असे बरेच लिहिता येईल. पण हे सगळे आदर्श लिखाणाचे ठोकताळे झाले. सर्वसामान्य लेखकांना हे सगळे जमेलच असे नाही

ह्यातले बरेचसे संपादनामध्येही लागू होते. विशेषतः अधोरेखित भाग.

"संपादन कसे असावे?" असा लेख लिहिल्यास इथल्या प्रशासनाची परवानगी असेल का?

सात "सी"

उपक्रमावरील लिखाण हे माहितीपूर्ण असावे असा संकेत असला तरी ते रुक्ष (सुतकी?) असलेच पाहिजे असे बंधन असेल असे वाटत नाही. टेक्निकल रायटरचा मुद्दा येथे लागू होत नाही. टेक्निकल रायटरला 'विषयाची चपखल शब्दांत मांडणी करणे' हे प्रामुख्याने सांभाळावे लागते. टेक्निकल स्वरुपाच्या लिखाणात रंजकता अपेक्षित नाही. उपक्रमाला बाकी रंजकतेचे वावडे आहे असे वाटत नाही.

नाही, उपक्रमावर रुक्ष लेखन असावे असे बंधन नाही आणि असूही नये. टेक्निकल रायटींगचा मुद्दा लेखनाचा साचा दर्शवण्यासाठी घेतलेला आहे. उदाहरणार्थ,वरदा आणि धनंजय यांचे वर दिलेले लेख काहीजणांना बर्‍यापैकी रुक्ष वाटतील पण त्यात रंजकता वाढवण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज वाटत नाही. ते लेख एका विशिष्ट अंगाने जातात आणि बहुधा तसे गेले नाहीत तर विस्कळीत दिसतील असे वाटते. चू. भू. दे. घे. मला व्यक्तिशः हे दोन्ही लेख रुक्ष वाटले नाहीत. अर्थात, हा साचा उपक्रमावरील सर्वच लेखांना लागू होतो असे म्हणता येत नाही किंवा असाच साचा सर्व लेखांना लावावा असेही चर्चेतून सांगायचे नाही. लेखाला प्रवाही करणारी, रंजक बनवणारी अनेक टेम्प्लेट्स असावीत. त्यापैकी मी दिलेले एक. आपले "सात सी"देखील असेच उपयुक्त आहेत. ते येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

तर आग्रही असले तरी दुराग्रही नसावे, शुद्धलेखनाचे सर्वसंमत नियम पाळून केलेले असावे, 'मीच कोण तो /ती शहाणा / शहाणी' या आविर्भावात केलेले नसावे, कोणतेही जुने हिशेब चुकते करण्याच्या उद्देशाने केलेले नसावे... असे बरेच लिहिता येईल. पण हे सगळे आदर्श लिखाणाचे ठोकताळे झाले. सर्वसामान्य लेखकांना हे सगळे जमेलच असे नाही.

सर्वसामान्य लेखकाला जमेलच असे नाही हे मान्य आणि जमायलाच हवे असा आग्रहदेखील नाही पण संकेतस्थळाचे वेगळेपण राखण्याचा, आपले लेखन इतरांना आकर्षित करते की नाही हे पाहण्याचा प्रयत्न तर करता येईल. :-)

धन्यवाद

चर्चेत भाग घेणार्‍या सर्वांचे धन्यवाद. चर्चाप्रस्तावक म्हणून माझ्याकडून प्रतिसाद येण्यास थोडा विलंब झाला असण्याची शक्यता आहे तरी वेळ होईल तसे महत्त्वाच्या प्रतिसादांना उत्तरे देईनच.

चांगले मार्गदर्शन

लेखन कसे असावे या विषयांवर प्रियालीताईंनी चांगले मार्गदर्शन केले आहे. पण एकादा विषय घेतल्यावर त्याबद्दल जे सुचले ते लिहिले अशा भूमिकेतूनमी आतापर्यंत लिहीत गेलो आहे. कांही लोकांना ते चालते किंवा कदाचित आवडते असा माझा (गैर)समजसुद्धा आहे. ही कदाचित पहिली पायरी असेल. त्यात हळू हळू सुधारणा करता येईल.

तांत्रिक विषयावर इंग्रजी भाषेतून मी आयुष्यभर लिहिले आहे, पण त्या प्रत्येक वेळी त्या लिखाणाचा वाचकवर्ग कोण आहे हे स्पष्ट असायचे आणि त्यांची पात्रता व आवश्यकता यांचे भान ठेऊन ते करावे लागत असे. उपक्रमासारख्या संकेतस्थळावर सर्व प्रकारची मंडळी असणार, त्यातले कोण माझे लेख वाचतात ते मला समजण्याचा मार्ग नाही. त्यामुळे ठरवून लिहिणे थोडे कठीण वाटते.

मस्त !

चर्चा प्रस्तावातील मुद्दे आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत..!!!

-दिलीप बिरुटे

असेच म्हणतो

बिरुटेंशी सहमत आहे.

--- उपक्रमी
(मराठी संकेतस्थळांवरील सर्व सदस्य तमाशाप्रेमी असतात. काही उघडपणे तमाशा बघतात/करतात, तर काही चोरून, एवढाच फरक!)

थ्यांक्यू

नवीन सदस्यांना मार्गदर्शन झाले.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

 
^ वर