उत्प्रेक्षा
उत्प्रेक्षा
उपमा आणि उत्प्रेक्षा यात फ़रक काय ? श्री.शरत कोर्डे यांनी तो थोडक्यात सांगितला आहेच. प्रस्तुत आणि अप्रस्तुत यातील साम्य दाखविणे हा दोघांचाही उद्देश. उपमेमध्ये सादृश्यवाचक शब्द सम, परी, प्रमाणे , जैसे वगेरे असतात. उत्प्रेक्षेमध्ये हे जणुं काही, कीं , भासे असे असतात. वरवर पहाता हा फ़रक किरकोळ वाटेल. तर मग थोडॆ खोलात जाऊं.
उपमेय हे जणु काय उपमानच आहे अशी जेव्हा संभावना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. संभावना म्हणजे उत्कट कोटीचा संदेह.असे बघा, कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान तीन प्रकाराचे असू शकते. [१] निश्चित ज्ञान. खरे असेल वा खोटे, पण शंकेला वाव नाही. [२] संदिग्ध. दोनही बाजू ख़या असतील वा खोटया असतील असे वाटते. मनाचा कल कोठे नक्की नसतो. [३] संभावना. हेही असेल, तेही असेल अशी संदिग्धता असते पण मनाचा कल मात्र एका बाजूला झुकलेला असतो. उपमेय हे उपमेयच आहे किंवा उपमानच आहे .. निश्चित ज्ञान. उपमेय हे उपमेयही असेल वा उपमानही असेल असे वाटते.... संदिग्ध ज्ञान. पण उपमेय हे जणु काय उपमानच आहे असा संदेह उत्कट प्रतीचा असेल तर संभावनात्मक ज्ञान. हा संदेह काव्यात्मक असेल तर उत्प्रेक्षा. साध्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हा संदेह खराखुरा नसून कवीने प्रतिभेने निर्माण केलेला असतो. या अलंकारात की, जणु काही, भासे, इत्यादी संदेह निर्माण करणारे
शब्द वापरलेले असतात.
उत्प्रेक्षा चार विभागात सांगितली आहे.
[१] स्वरुपोत्प्रेक्षा
प्रस्तुत पदार्थ किंवा क्रिया जणु काय अप्रस्तुत पदार्थ किंवा क्रिया आहे असे वर्णन असते,
सरित्पात्र तें स्वच्छ तैसे विशाल,
तदा भासले कीं दुजे अंतराल;
तशी त्यावरी शोभली दीपिकांची,
उदेली जणो पंक्ति कीं तारकांची.
माधवानुज
नदीचे स्वच्छ व विशाल पात्र हे जणु काही आकाश आहे व त्यात सोडलेले दिवे हे जणु काही तारका आहेत अशी नदीच्या स्वरुपाबद्दल कल्पना केली असल्याने स्वरुपोत्पेक्षा.
[२] हेतूत्प्रेक्षा
एखादी गोष्ट कवीप्रतिभाकृत कारणाने घडून आली असे जेव्हा वर्णन असते तेव्हा हा अलंकार होतो.
कैसा ॠतु मातविता नलिनीचें आलिंगनु न सोडी सविता
भणवोनि मज पांता . दीसु वडीले होती
शिशुपालवध-- भास्करभट्ट.
काय बहारदार कल्पना आहे पहा. वसंत ॠतूत दिवस मोठा होता याचे कवीप्रतिभानिर्मित कारण बघा. वसंतात सर्वांप्रमाणे सूर्यालाहे उन्माद चढतो, त्यास नलिनीचे आलिंगन सोडवत नाही ! वाहवा, निसर्गावर मानवी भावनांचा आरोप. कालिदासाची आठवण झाली ना ?
[३] फ़लोत्प्रेक्षा
वस्तुस्थितीपासून कोणते तरी कवीप्रतिभानिर्मित फ़ल इष्ट आहे असे वर्णन असते तेव्हा फ़लोत्प्रेक्षा होते. येथे संभावना प्रयोजनासंबंधी असते.
नोहेच नाभि तरि काय सुरुंग आहे,
रोमावळी गमतसे मज श्रृं खळा हे,
राया तिचे स्तन असे गड घ्यावया तो,
राजा मनोभव उपाव जणो करितो.
दमयंतीस्वयंवर ---
नाभी हा सुरुंग व रोमावळी ही श्रृंखला या गोष्टी, जणु काय दमयंतीचे स्तन हेच गड सर करण्याच्या हेतूने मदनाने योजिल्या आहेत, ही फ़लोत्प्रेक्षा.[ पहिल्या व तिसऱ्या ओळीतले अलंकार ओळखा]
[४] मालोत्प्रेक्षा
जेव्हा उपमेय एक व संभावना अनेक असतात तेव्हा हा अलंकार होतो.
घांट पाट हा जणु शोभेचा वहात आला दिसे,
कांची वनदेवीची वसे;
शूर शिपाई अपुला म्हणुनी सृष्टी ज्या देतसे,
असा हा पट्टा गिरिचा असे;
कीं भांग सृष्टीच्या विगलत वेणीतला,
कीं अंत :पाट हा गिरिदरियुग्मातला,
हा कुंकुम पडुनी ईषदरुण जाहला,
वर खालीं वा जाण्यापथ हा नरजन्माचे परीं,
इकडे पर्वत इकडे दरी !
पर्वतरोहण --- टिळक
वाई-महाबळेश्वर घाटातील रस्त्यावर शोभेचा वाहणारा पाट, वनदेवीची कांची, --- नरजन्मशा विविध संभावना केल्या आहेत.
उत्प्रेक्षा आणि उपमा
दोनीतही भिन्न वस्तुतले साम्य दाखविले असते.उपमेत जसे, सारखे या सारखे दुसरे शब्द स्पष्ट किंवा सुचित अस्तात. उत्प्रेक्षेमध्ये जणुं काय, भासे वा य़ा अर्थाचे शब्द असतात.
उपमेमध्ये दोन वस्तुंमधील साम्य दाखविण्याचा उद्देश असतो. उत्प्रेक्षेमध्ये कवीप्रतिभेचा विलास दाखवावयाचा असतो.
शरद
Comments
थोडे समजू लागले आहे
पण फारसे नाही.
इथे "सोन्याचा गोळा" ही लुप्तोपमा की कवीचा कल्पनाविलास?
सोन्याच्या गोळ्या(सारखा पिवळाधमक) (सूर्य)
की
सोन्याचा गोळा (भासणारा) (सूर्य)
की
सोन्याचा गोळा(रूपी) (सूर्य)
हे समजा बदलले
यात अर्थी-अर्थी काय फरक आहे? "सम" शब्दाने काव्यात्मक संदेह प्रकट होतो, की स्पष्ट तुलना? दुसर्यात कवी साम्य सांगण्याचा "तथ्यात्मक" प्रयत्न करत आहे, पहिल्यात तो कविप्रतिभेचा विलास आहे, हा फरक मला ठसठशीत वाटत नाही.
तुलनात्मक अर्थालंकारांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष-साम्य-साम्यदर्शक असे विश्लेषण मला मूलगामी वाटले. त्यांची पुढील वर्गीकरणे मला शब्दच्छल असल्यासारखी वाटतात.
(शब्दालंकारांमध्ये व्यंजनांची आवृत्ती/स्वरांची आवृत्ती हा भेद मात्र मला शब्दच्छल वाटत नाही. कारण त्या प्रकारांची संगीत-अनुभूती मला वेगळी जाणवते. बाकी लोकांना जणू/जसे मधील अर्थानुभूती तशी ठळक वेगळी जाणवते का? हे कुतूहल वाटते. तसे असल्यास अर्थातच हे वर्गीकरण म्हणजे केशभेद नाही.)
रूपक अलंकार
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"पहा पाखरें चरोनि होती झाडावर गोळा।
कुठें बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा॥"
इथे सूर्याऐवजी सोन्याचा गोळा असे शब्द वापरले आहेत.म्हणजे प्रस्तुत (सूर्य) आणि अप्रस्तुत (सोन्याचा गोळा) यांत अभेद आहे. किंबहुना प्रस्तुताचा लोप केला आहे.माझ्या मते हा रूपक अलंकार आहे.
चार अर्थालंकार
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चार अलंकार
उपमा,उत्प्रेक्षा, रूपक आणि अपह्नुती या चार अलंकारांविषयी माझा ढोबळ समज पुढील प्रमाणे आहे.
या चारही अलंकारांत प्रस्तुत (उपमेय.. इथे तुरा) आणि अप्रस्तुत (उपमान..इथे जास्वंदीफूल) या दोन्ही गोष्टी असतात.(क्वचित एखादीचा लोपही असतो).या दोन गोष्टींतील साम्याच्या प्रमाणावरून चार भिन्न नांवे आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात,"उपमा हीच कोणी नटी निरनिराळी सोंगे आपल्या पुढे येते आणि आपण त्या त्या प्रसंगी त्या रचनेला अलंकाराचे भिन्न नाव देतो."
*
उपमा: प्रस्तुत आणि अप्रस्तुत यांत आल्हादजनक रीतीने साम्य दाखवलेले असते. दोहोंतील भेद स्पष्ट असतो. सम,समान,प्रमाणे, परी,जैसा, सा,असे शब्द असतात.
उदा.: जास्वंदीच्या कुसुमासम हा शिरीं शोभतो तुरा।
इथे तुरा फुलासारखा दिसतो एव्हढेच म्हटले आहे. अन्यथा या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे मान्य आहे.
*
उत्प्रेक्षा: यांत दोन गोष्टीचे साम्य अधिक गडद असते. इतके की उपमेय (तुरा) हे उपमान (फूल) असावे असा भास निर्माण होतो.यात जणो,जणूकाही,भासे, गमे असे शब्द येतात.( मात्र हे व्यवच्छेदक लक्षण नव्हे. हे शब्द असले म्हणजे हा अलंकार असेलच असे नाही.तसेच हा अलंकार असला म्हण्जे हे श्ब्द असतीलच असेही नाही.)
उदा. शिरोभागीं छानसा तुरा हाले। जणू जास्वंदी फूल उमललेले।
*
रूपक: यांत उपमेय आणि उपमान यांतील भेदच नाहीसा होतो.
उदा.: रक्तवर्ण जास्वंदफुलाचा शिरीं छानसा तुरा।
इथे कोंबड्याच्या शिरोभागी असलेला तुरा जास्वंदीचे फूलच आहे असे म्हटले आहे.म्हणजे दोघांत अभेद आहे.
*
अपह्नुती: यात प्रथम उपमेय स्पष्टपणे नाकारून (दडवून) त्याजागी उपमानाची स्थापना केली जाते.
न,नव्हे ,नाही असे शब्द येतात.
उदा: नव्हे लाल हा तुरा शिरावरि, जपाकुसुम हे खरोखरी।
.....................................................................................................................................................................
यात थोडा फरक जाणवत असला तरी
यात थोडा फरक जाणवत असला तरी तो कृत्रिम भासतो.
कोंबड्याचा तुरा इतका लालभडक आहे, मला जास्वंदीच्या फुलासारखा भासतो आहे.
हे वाक्य मला वावगे वाटत नाही. कुठल्या निबंधात वाचले तर मी परीक्षक असल्यास लाल पेन मुळीच वापरणार नाही. "भासतो" म्हणून साम्य गडद झाले आहे, की फुलासारखा म्हटल्यामुळे तितकेच साम्य सांगून भेद स्पष्ट ठेवला आहे? उपमा की उत्प्रेक्षा?
रूपक की अपह्नुती?
शरद यांनी छेकापह्नुतीची उदाहरणे म्हणून एक अर्थ नकारलेले श्लेष दिलेले आहेत.
कुठल्याशा संस्कृत काव्यालंकारांच्या पुस्तकात (आता शोधले पाहिजे, हल्लीच संगणकावर उतरवलेले आहे) नकारलेल्या अप्रस्तुतांच्या माळेला वेगळेच काही नाव दिलेले आहे.
"साम्य (लटकेच) नकारून साम्याची अनुभूती अधिक गडद करणे" विरुद्ध "साम्य आहे असे कमी-अधिक जोराने ठासून सांगणे", यांच्यातला फरक मला पटतो. म्हणजे अपह्नुती विरुद्ध बाकी तीन.
पण तुलना (भिन्नात साम्य->->अभेद ही मिती) ठासून सांगण्याच्या जोराच्या प्रमाणात उपमा-उत्प्रेक्षा-रूपक म्हणून काय साधते ते समजले नाही. तीनच टप्पे का? "सम,समान,प्रमाणे, परी,जैसा, सा" यांनी वेगवेगळ्या प्रमाणात साम्य ठसवले जाते. "सम/समान" म्हणजे "अभेद"च्या जवळ पोचणारे पर्यायी शब्द! तसेच "जणू, भासे..." वगैरे. मग प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळ्या अलंकाराचे नाव देण्याची पाळी येऊ शकेल.
उपमा-उत्प्रेक्षा-अपह्नुती
जास्वंदीच्या फुलासारखा आहे/असतो/दिसतो/भासतो(साम्य गडद). या सर्व उत्पेक्षाच. परंतु फुलासारखा शोभतो ही उपमा. (साम्य फिकट.)
कोंबड्याचा तुरा म्हणजे जास्वंदीचे फूलच .--रूपक.
दोन्ही पूजेच्या लालभडक वस्तू; तरी तुरा फूल नाही, हे गणपतीला आवडणारे, तर तो मरीआईला आवडणारा.-- हे साधे अनलंकृत वाक्य.
साम्य लटकेच नाकारणे हे अपह्नुतीचे मुख्य लक्षण, हे मान्यच आहे.--वाचक्नवी
अलंकारविषयक लेखांना जोडावे
उपक्रमरावांनी अलंकारविषयक लेखांना द्रुपल पुस्तिका स्वरुपात जोडावे. म्हणजे शरदरावांनी लिहिलेल्या लेखांचे दुवे एकत्र उपलब्ध होतील.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
(मला) जास्त पटण्यासारखे विश्लेषण
हेमचंद्राच्या काव्यानुशासनातून देत आहे. सटीक प्रत डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया वरून प्राप्त झाली (दुवा) :
ज्यांना संस्कृत संधि-समास पटापट सोडवता येत नाहीत त्यांच्या सोयीसाठी (म्हणजे माझ्यासारख्यांच्या सोयीसाठी) ते सुटेसुटे देत आहे. पुढे मला जमेल तसे भाषांतर देत आहे.
(पान २४७ वरून)
---
भाषांतर :
नसलेल्या गुणधर्माची संभावना, "इव"वगैरे शब्दांनी तीवर प्रकाश पडतो, ती उत्प्रेक्षा,
संदर्भाला धरून अर्थात जे धर्म गुण, क्रियेची लक्षणे असतात, त्यांच्या अभावाची जी लक्षणे असतात त्यांची संभावना करायची, त्यांच्या संयोगाबद्दल दुर्लक्ष (उत्प्रेक्षण) करायचे, ती उत्पेक्षा. जणू, मानतो, शंका येते, निश्चितच, प्रायः, खरोखर, इत्यादि शब्दांनी तिच्यावर प्रकाश पडतो.
असंतोषाद्-इवाकृष्टकर्णयो: प्राप्तशासनः ।
स्वधाम-कामिनीनेत्रे प्रसारयति मन्मथः ॥
जणू असंतोषामुळे कान आकुंचित होता कामदेवाला शिक्षा झाली, त्याचे राहाते ठिकाण असलेले कामिनीचे डोळे त्याने मोठे केले.
येथे संतोषगुणाच्या अभावाबद्दल दुर्लक्ष केलेले आहे.
...
तसे
स्थितः पृथिव्याम् इव मानदण्डः ।
पृथ्वीवर जणू मापाची काठी असावा असा स्थित आहे.
वगैरे, अशा ठिकाणी उत्प्रेक्षाबुद्धीचे विधान करू नये.
- - -
साधर्म्याचा कमीअधिक एकवद्भाव केल्याने उपमा-उत्प्रेक्षा यांच्यात फरक होतो, असे म्हणणे म्हणजे मला गोंधळात पाडणारे, म्हणून असार वर्गीकरण वाटते.
साधर्म्याचे प्रतिपादन करणे - उपमा
असाधर्म्याचे चमत्कृतीसाठी बळेच प्रतिपादन करणे - उत्प्रेक्षा
साधर्म्य स्पष्ट असताना साधर्म्य-असाधर्म्यासकट एक दुसर्याचे रूप असल्याचा आरोप - रूपक
असे काही वर्गीकरण संस्कृतातील सौंदर्यमीमांसक देतात, ते मला त्या मानाने स्पष्ट वाटते.
छान!
उपमा-उत्प्रेक्षा-रूपक यांतील फरक यांहून कमी शब्दांत आणि तोही इतक्या स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. हेमचन्द्राची 'उत्प्रेक्षा'ची व्याखाही उत्तम.
इत्यादौ उत्पेक्षाबुद्धि: न विधेया । हा सल्ला वाचकांना आहे का?--वाचक्नवी
होय - वाचक/सौंदर्यमीमांसकासाठी सल्ला आहे
हिमालयावर पृथ्वीवर ठेवलेला मानदंड म्हणताना साम्य दाखवले जात आहे, मुद्दामून दुर्लक्ष करून साम्य नसलेली गोष्ट भासते आहे, असा अर्थ निघत नाही. इथे वाचक/सौंदर्यमीमांसकाने उत्प्रेक्षा केलेली आहे असे विधान करू नये, असे हेमचंद्र सांगत आहे. "इव" शब्दाने कोणाचा गोंधळ होऊ नये, म्हणून हेमचंद्र अशीच दोन-तीन उदाहरणे देतो - इथे उत्प्रेक्षा नाही, सांगत.
वरील भाषांतरात मी एकच "अमुक गुणधर्माची उत्प्रेक्षा आहे" आणि एकच "येथे उत्प्रेक्षा नाही" असे उद्धृत केले आहे.