फोर्थ डायमेन्शन ४

उपकाराची फेड

व्ही पी मेनन (कृष्ण मेनन नव्हे!) नावाची एक व्यक्ती आपल्या देशात होती याचे विस्मरण बहुतेकांना झाले असेल.स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही प्रशासकीय सोपस्कार करणे गरजेचे असते. त्यात मेनन यांचा फार मोठा सहभाग होता. गंमत म्हणजे नेहरू, गांधी, पटेल यासारख्या भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या मातब्बर नेत्याइतकेच त्यांच्या विरुध्द बाजूचे माउंटबॅटन व त्यांचे वरिल ब्रिटिश अधिकाऱ्यांनासुध्दा हा माणूस फार आवडत असे. प्रशासनातील कुठलिही किचकट समस्या असली तरी, मेनन फार चाणाक्षपणे कुणालाही न दुखवता हाताळत असत. सत्तांतराच्या अटींच्या मुद्यांचा आराखडा तयार करण्याची अत्यंत महत्वाची कामगिरी लॉर्ड माउंटबॅटन यानी मेननवर सोपवली होती. मेनन यानी दोन्ही पक्षांना समाधान होईल अशा रीतीने याची मांडणी केली होती. स्वातंत्र्यकाळातील इतर अनेक व्यक्तींपेक्षा मेनन फार वेगळे होते. त्यांचे स्वयंभू असे व्यक्तिमत्व होते. ऑक्सफर्ड-केंब्रिजची डिग्री त्यांच्याकडे नव्हती. खानदानी पार्श्वभूमी नव्हती. त्यांच्याभोवती उच्च जातीचे वलय नव्हते.
बारा भावंडामध्ये सर्वात मोठा असल्यामुळे मेनन यांना वयाच्या तेराव्या वर्षी शाळा सोडावी लागली. रस्ता बांधणीचा मजूर, खाण कामगार, गिरणीतील कामगार, फिरता विव्रे।ता, शाळेत मास्तर, अशा प्रकारची सटरफटर कामं त्यांना करावी लागली. भारतीय प्रशासनव्यवस्थेत साधा कारकून म्हणून भर्ती झाल्यानंतर कार्यकौशल्य व उपजत कार्यक्षमतेमुळे वरच्या अधिकारपदावर पोचण्यास त्यांना वेळ लागला नाही. ब्रिटिश व भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्यांच्यावर विशेष मर्जी असे. कारण काम करण्याची तत्परता, कौशल्य, वैचारिक अधिष्ठान यावर त्यांचा भर होता. नेहरू व माउंटबॅटन यांनी मनापासून त्यांच्या या गुणविशेषाबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत.
प्रशासकीय कौशल्याव्यतिरिक्त मेनन यांच्या आणखी एका गुणविशेषाची दखल घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे निरपेक्ष परोपकारी वृत्ती. मेनन यांच्यातील परोपकारीवृत्तीचा उल्लेख करताना त्यांच्या मुलीने मेनन यांच्या आयुष्यातील एका घटनेची आठवण करून दिली आहे. मेनन सरकारी नोकरीच्या शोधात दिल्ली स्टेशनवर येऊन पोचले. नोकरीची सर्व कागदपत्रे, सामान व फ्से स्टेशनवर चोरीला गेले. मेनन हवालदिल झाले. काय करावे सुचेना. कुणाचीही ओळख नाही. 2000 किलोमीटर्सवरील आपल्या गावी पायी पायी परत जाण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग त्यांना त्यावेळी सुचत नव्हता. याच मानसिक दुरवस्थेत सर्व धैर्य एकवटून स्टेशनवर उभे असलेल्या एका शीख गृहस्थाला आपली विदारक कहाणी ऐकवली व त्यांच्याकडून पंधरा रुपये उसने मागितले. ते गृहस्थ पैसे दिले व चालू लागले. मेनन त्यांच्यामागे धावतधावत गेले व फ्से परत करण्यासाठी त्यांचा पत्ता मागू लागले. त्या गृहस्थाने आपला पत्ता न देता ज्या प्रकारे मी एका अनोळख्या माणसावर उपकार केले आहेत, त्याच प्रकारे तूसुध्दा आयुष्यभर अनोळख्या गरजूना मदत करत जा. यातूनच माझे ॠण फिटेल असे सांगून निघून गेले. मेनन यांनी त्यांचा हा शब्द पाळला. व आयुष्यभर या उपकारव्रताचे निमुटपणे पालन केले. एका अनोळख्याची मदत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या... अशा अनेक अनोळख्यापर्यंत पोचवली.
मेनन ते ॠण कधीच विसरले नाहीत. त्या अनामधेयाचा विश्वास व ते पंधरा रुपये मेनन कधीच विसरू शकले नाहीत. मेनन मृत्युश!येवर असताना दारासमोरील एक भिकारी पायातील चपलेसाठी विनवत होता. मेनन त्याही अवस्थेत मुलीला सांगून चपलेची व्यवस्था केली. ही त्यांची शेवटची परोपकारी कृती होती.
आपल्याही आयुष्यात अशाच प्रकारचे प्रसंग आलेले असतात. येणारही आहेत. अशावेळी आपण कसे वागतो यावरून आपले दात्रृत्व कळते. घरासमोर तोंड वेडे वाकडे करत भीक मागणाऱ्याची काहीतरी टिंगल टवाळी करणे सोपे असते. धडधाकट माणूस जेव्हा आपली कहाणी सांगण्याच्या प्रयत्नात असताना आपण धुडकावून लावतो. एकही शब्द ऐकण्याची मनस्थितीत आपण नसतो. एखाद्याने आपल्याला मदत केली असेल तर इतरानाही आपण मदत करावे, त्याची परतफेड करावी हा विचार आपल्याला कधीच शिवत नाही. उर्मटपणे कंडक्टरने सुटे पैसे नाहीत म्हणून एखाद्या खेडुताला बाईला म्हाताऱ्याला खाली उतरवण्यास भाग पाडत असताना आपणहून त्याचे तिकिट काढून दिल्यानंतर त्या व्यक्तिच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगत असतात. या गोष्टी फार छोटया वाटतील, परंतु याच माणसाना जोडतात, माणुसकी जागवतात.
मदतीचा हात पुढे केल्यास माणसातील माणुसकी जागृत राहू शकते, यावर विश्वास ठेवायला हवे. प्रत्येक अनोळखीग व्यक्ती आपल्याला फसवते किंवा त्याला कटवल्यामुळे फार मोठा पराव्र।म गाजविला या मानसिकतेला वेसण घालणे गरजेचे आहे. एखाद्याने आपल्याला कसे लुबाडले या कडू आठवणीपेक्षा आपल्या अडचणीच्या वेळी मदतीचा हात पुढे केल्यांचे स्मरण सदैव राहील. अशा स्मरणीय व्यक्तींच्या नावाच्या यादीमध्ये आपलेही नाव यावे यासाठी आपण प्रयत्न करायाला काय हरकत आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख

लेख आवडला. मेनन यांच्याविषयी माहिती नव्हती. त्यांची कारकीर्द आणि वृत्ती यातून बरेच शिकण्यासारखे आहे असे वाटते.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

असेच म्हणतो

मेनन यांच्याविषयी माहिती नव्हती. त्यांची कारकीर्द आणि वृत्ती यातून बरेच शिकण्यासारखे आहे असे वाटते.

असेच म्हणतो.

मेनन ह्यांच्या विषयीची ही माहिती मराठी विकिवरसुद्धा जरूर टाका.

खूपच छान!!!

अतिशय सुरेख लेख. मेनन यांच्यासारख्या उत्तुंग पण सद्य:स्थितीत पूर्णपणे विस्मृतीत गेलेल्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकल्याबद्दल आभार.

भारताला बालपणात (स्वातंत्र्योत्तर लगेचच्या काळात) खूप मोठमोठ्या व्यक्तींचे (त्या व्यक्ती त्यांच्यातले गुणदोष जरी बघितले तरी मोठ्या होत्या) संगोपन लाभले ही अतिशय भाग्याची गोष्ट होती. नाहीतर आपले पण शेजारी राष्ट्रासारखे झाले असते का? असे बरेच वेळा वाटते. मेनन हे त्यातील एक अग्रक्रमाने घ्यायचे नाव.

मेनन यांच्याबद्दल बरेच ऐकले होते. पण त्यांची जास्त ओळख 'फ्रीडम ऍट मिडनाईट' वाचताना झाली. (प्रस्तुत लेखातील माहिती बहुतेक त्याच पुस्तकाच्या संदर्भातून आलेली असावी.) भारताला स्वातंत्र्य मिळाताना ज्या घडामोडी झाल्या त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा माउंटबॅटननी तयार केलेला मसुदा त्यांनी आधी नेहरुंना दाखवला. (याला पर्श्यालिटी म्हणता येईल. ;) ) हा मसुदा नेहरुंनी सरळ केराच्या टोपलीत टाकला. या मसुद्याप्रमाणे, एखाद्या प्रांताच्या (प्रांत... संस्थान नव्हे) बहुसंख्य जनतेने स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्या प्रांताला वेगळा सार्वभौम देश म्हणून मान्यता मिळाली असती. सर्वात मोठा धोका बंगालमधे होता. या अतिशय नाजूक क्षणी अवघ्या केवळ ६ तासात नवीन मसुद्याचा कच्चा खर्डा तयार करून तो नेहरुंना दाखवून त्यांची संमती मिळवण्यात माऊंटबॅटन यांना केवळ मेनन यांच्यामुळेच शक्य झाले.

हिंदुस्थान स्वतंत्र होता होता तत्वतः सार्वभौम असलेल्या संस्थानिकांना साम-दाम-दंड-भेद वापरून हिंदुस्थानात सामील करून घेण्यात पटेलांच्या बरोबरीने मेनन यांचा हिस्सा होता. कित्येक महत्वाच्या वाटाघाटीत मेनन आणि त्यांचे खबरे नसते तर स्वतंत्र भारताला खूपच महागात पडले असते. जोधपूरच्या आणि जैसलमेरच्या महाराजांना वठणीवर त्यांनीच आणले (मेनन यांच्या जीवावर बेतले होते या भानगडीत), अन्यथा आज बराचसा राजस्थान शेजारी राष्ट्रात दिसला असता.

असा जबरदस्त माणूस द्रष्टाही असावा. जरी फाळणी स्वीकारली गेली असली तरी त्यावेळी एवढी मोठी हिंसा होईल याची सुतरामही कल्पना कोणाला नव्हती. पण १५ ऑगस्टच्या पहाटे (१४ ऑगस्टच्या रात्री) जेव्हा सगळीकडे जल्लोष चालला होता तेव्हा मेनन मात्र घरी शांतपणे बसले होते. जल्लोषाचे आवाज कानावर आले तेव्हा ते एवढेच म्हणाले, "नाऊ, अवर नाईटमेअर रिअली स्टार्ट्स.... दु:स्वप्न आत्ताशी कुठे चालू होत आहे." !!!

माणूस जेव्हा स्वच्छ आणि निरलस असतो तेव्हा त्याच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास असा येतो की तो कोणाची भीडभाड ने ठवता मनात असेल ते ठणकावून सुनवू शकतो. दिल्लीत दंगल उसळली. भारतीय नेते आणि प्रशासन नवीन होते. माऊंटबॅटन सारख्या अनुभवी माणसाची गरज होती. तेव्हा माऊंटबॅटन यांनी आता भारतीय नेत्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे, मी नामधारक राष्ट्रप्रमुख (गव्हर्नर जनरल) आहे, मंत्रीमंडळाने निर्णय घ्यावेत, मी फक्त सही करेन अशी भूमिका घेतली. ते सिमल्यात होते. तेव्हा त्यांना "तुम्हाला यावेच लागेल दिल्लीत. तुमची गरज आहे. आत्ता येणार नसाल तर कधीच येऊ नका." असे सुनावणे हे केवळ मेनन यांच्यासारखा चारित्र्यवानच करू जाणे.

(श्रेयनिर्देश : माझ्या प्रतिसादात फ्रीडम ऍट मिडनाईट या पुस्तकातून संदर्भ घेतले आहेत.)

बिपिन कार्यकर्ते

उत्तम् लेख

बर्‍याच नवनविन गोष्टी कळाल्या. बिपिनचा प्रतिसादही छान.
कोलबेर म्हणतात तसे विकीला लेख जोडावा.

मेनन आणि निर्हेतुक परोपकार

लेखाच्या मथळ्यावरून पाहता निरिच्छ भावनेने लोकांना मदत करीत रहावे हे सांगणे हा लेखाचा मुख्य उद्देश दिसतो. त्यासाठी व्ही.पी.मेनन यांचे उदाहरण दिले आहे. पण बरीचशी चर्चा मात्र मेनन यांच्या कर्तृत्वावर झाली आहे. त्यातल्या बहुतेक गोष्टी निदान देशाचे हित डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केल्या होत्या. आपण कोणा अनोळखी माणसाला कशा प्रकारे मदत केली किंवा आपल्याला कोणी अशी मदत केली याच्या आठवणी सांगितल्या तर ते अधिक उपयुक्त होईल असे मला वाटते.

मला असेही वाटते की देणार्‍याचा हात बहुधा नेहमी वरच असतो, त्यामुळे घेणार्‍याला त्याची परतफेड देणार्‍यालाच करण्याची संधी क्वचितच मिळत असेल. त्याऐवजी त्याने पुढे इतरांना देत रहावे ही उपकाराची परतफेड होऊ शकत नसली तरी त्यामुळे देण्याघेण्याचे चक्र पुढे चालत राहते. त्याचा समाजाला फायदा होतो. कदाचित त्यालासुद्धा!

पे इट फॉर्वर्ड

वरील प्रतिसादांशी सहमत. मेनन यांची अशी एक ओळख आवडली.

 
^ वर